‘डोह : एक आकलन’ - ललितगद्याचे बंदिस्त आणि सांकेतिक स्वरूप बदलून ते अधिक प्रसरणशील, मोकळे करणार्‍या लेखकाविषयीचा संग्राह्य, मौलिक ग्रंथराज
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
द. तु. पाटील
  • श्रीनिवास विनायक कुलकर्णी आणि ‘डोह : एक आकलन’चे मुखपृष्ठ
  • Mon , 24 January 2022
  • ग्रंथनामा शिफारस श्रीनिवास विनायक कुलकर्णी Shrinivas Vinayak Kulkarni डोह Doh डोह : एक आकलन Doh - Ek Akalan

मराठी ललितगद्य म्हटले की, श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचे नाव ठळकपणे समोर येते. कथात्म साहित्यातील या एका वाङ्मय प्रकारामध्ये त्यांनी निष्ठेने लेखन केले आहे. ‘डोह’ (१९६५), ‘सोन्याचा पिंपळ’ (१९७५), ‘पाण्याचे पंख’ (१९८७), ‘कोरडी भिक्षा’ (२०००) हे त्यांचे ललित लेखसंग्रह ‘मौज प्रकाशन गृहा’तर्फे प्रकाशित झाले आहेत. या सर्व ललित लेखसंग्रहांच्या आवृत्त्या निघत आहेत आणि त्यांचा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील विद्यापीठीय अभ्यासक्रमामध्ये अंतर्भाव करण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य पुरस्कार, महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार अशा पुरस्कारांनी श्रीनिवास विनायक कुलकर्णी सन्मानित झाले आहेत. ललित गद्यलेखनासोबत त्यांनी कवितालेखनही केले आहे. याशिवाय ‘रूप’ या कवितेला वाहिलेल्या चक्रमुद्रित अनियतकालिकाचे संपादक (१९६०-६२), मौज प्रकाशन गृहाचे संपादक (१९८४-२००७), औदुंबर (सांगली) येथील सदानंद साहित्य मंडळाचे गेली ७५ वर्षे अध्यक्ष, कर्‍हाड येथे भरलेल्या ५१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पुरस्कार निधीचे विश्‍वस्त आणि वाङ्मयीन कार्यक्रमांच्या आयोजनात सहभाग, दुसर्‍यांदा कर्‍हाड येथे भरलेल्या ७६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष, अशा अनेक साहित्याशी संबंधित संस्था, साहित्य संमेलनात त्यांनी महत्त्वाच्या जबाबदार्‍या स्वीकारलेल्या आहेत.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

मराठी ललितगद्याचा परमोच्च आविष्कार असा लौकिक मिळवलेल्या आणि ललित साहित्यातील शिखर स्थानावर असलेल्या ‘डोह’ला २०१५ साली पन्नास वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून विजया चौधरी यांनी ‘डोह : एक आकलन’ या ग्रंथाचे संपादन केले आहे. हा ग्रंथ ‘मौज प्रकाशन गृहा’कडून प्रकाशित झाला आहे. यामध्ये श्रीनिवास विनायक कुलकर्णी आणि त्यांच्या लेखनाविषयी नियतकालिकांतून आलेले लेख, श्रीनिवास कुलकर्णी यांचे स्वतःबद्दलचे लेखन, भाषणे एकत्रित केली आहेत. सोबत लेखिका विजया चौधरी यांची अभ्यासपूर्ण दीर्घ प्रस्तावना आहे.

प्रस्तावनेमध्ये विजया चौधरी यांनी सुरुवातीला ग्रंथनिर्मिती पाठीमागची आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्या म्हणतात, ‘‘एखादे पुस्तक जेव्हा सतत पन्नास वर्षांहून अधिक काळ चर्चेत राहते, तेव्हा त्यामागील कारणांचा शोध घेणे अनिवार्य ठरते. असा शोध घेताना, समीक्षकांनी मांडलेली मते, तसेच त्यांनी केलेले साहित्यकृतीचे मूल्यमापन साहित्याच्या अभ्यासकांना मार्गदर्शक ठरत असते. त्या विशिष्ट लेखकाच्या संपूर्ण साहित्याचा अभ्यास करण्यासाठी, तसेच त्या लेखकाच्या साहित्याचे व लेखकाचेही वाङ्मयेतिहासाच्या दृष्टीकोनातून असलेले स्थान निश्‍चित करण्यासाठी, समीक्षकांनी केलेले विश्‍लेषण आधारभूत ठरत असते. याच कारणाने डोहवर आलेल्या व उपलब्ध झालेल्या परीक्षणे/समीक्षालेखांचे संपादन करून अभ्यासकांना ते एकत्रितपणे उपलब्ध करून द्यावेत असे वाटते.’’ (प्रस्तावना पृष्ठे ९-१०)

विजया चौधरी यांनी मराठीमध्ये लघुनिबंध या साहित्यप्रकाराचा उगम कसा झाला, हे सांगून लघुनिबंध-ललित निबंध- ललित लेख हा विकसित प्रवास उलघडून दाखवला आहे. आणि त्यामध्ये पूर्वसुरांनी चोखळलेली वाट श्रीनिवास कुलकर्णी यांच्या लेखनातून कशी विकसित होत गेली ते स्पष्ट केले आहे.

श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचे बालपण दत्तात्रयाचे ठिकाण असलेल्या कृष्णा नदीकाठच्या औदुंबर या छोट्याशा गावात गेले आहे. तिथले दत्तात्रयाचे मंदिर, नदीचा परिसर, निसर्ग, प्राणी, पक्षी, माणसे आणि तिथल्या प्रथा, परंपरा, चालीरीतीशी एकरूप झालेल्या आपल्या कुटुंबाबरोबर एक समृद्ध असे बालपण त्यांना लाभलेले आहे. लहानपणीचे हे समृद्ध अनुभवविश्‍व ‘डोह’चा विषय झालेले आहे. सूक्ष्म निरीक्षणशक्ती, तीव्र संवेदनशीलता व तरल मन यांच्या साहाय्याने पुननिर्मित झाल्यामुळे कलात्मक उंचीवर गेलेल्या या अनुभव विश्‍वाचा पूर्वसुरीच्या लेखनापेक्षा असलेला वेगळेपणा विजया चौधरी यांनी सांगितला आहे.

‘‘पूर्वसुरीच्या लेखनांमध्ये बालजीवनाचे चित्रण मोठ्यांशा नजरेतून आणि सांकेतिकपणाने झालेले आढळून येते. इथे मात्र बालपणीच्या अनुभवांच्या सांकेतिक प्रकटीकरणाला मुळातूनच छेद देत डोहने स्वतःची परंपरा निर्माण केलेली आहे. मनात साठवलेल्या अनुभवांना दृश्यरूप देताना, अनुभवाच्या मूळ स्वरुपाला धक्का न लावता, बाल्यभाव कायम राखत केलेले अनुभवांचे प्रकटीकरण आणि हे करणारा ‘मी’ हा एकाच वेळी भोगणारा आणि साक्षीभूत असा, हे पूर्वसुरींपेक्षा निश्‍चितच काहीतरी वेगळे व उत्क्रांत असे होते.’’ (प्रस्तावना पृष्ठ १२)

‘डोह’ या पुस्तकातील सर्व अकरा लेखांची तेज, वायू, आप या तीन महाभूतांशी संबंधित, प्राणिसृष्टीशी किंवा अमानवी सृष्टीशी संबंधित, ग्रामजीवनाशी संबंधित आणि गावातील बालपणीच्या अनुभवांशी संबंधित अशी वर्गवारी करून प्रत्येक लेखाच्या अंतरंगाची स्वतंत्रपणे ओळख करून दिली आहे. त्यातून संपादिकेला श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांच्या ललित लेखनाचे काही ठळक गुणवैशिष्ट्ये जाणवली आहेत. चित्रित केलेल्या बालपणीच्या अनुभवाचे स्वरूप अदभुत व विस्मयकारक असल्याने विश्‍वरूप घडल्याची वाचकांना येणारी अनुभूती, वास्तव अनुभवाला कलेचा, प्रतिभेचा स्पर्श झाल्याने प्राप्त झालेले सौंदर्य व अलौकिकता, अनुभवाचा ताजेपणा, प्रगल्भ जाणीवेने आणि समर्थ भाषाशक्तीने तरलता हरवू न देण्याचे सामर्थ्य पेलल्यामुळे सर्व लेखनाला प्राप्त झालेली काव्यात्मता इत्यादी.

अशी आपणाला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये विजया चौधरी सांगतात. आणि त्यानंतर समीक्षकांनी दाखवून दिलेल्या गुणवैशिष्ट्यांतील एकेक गुणवैशिष्ट्य विचारात घेऊन त्यासंबंधीचे विवेचन त्यांनी पुढच्या भागात केले आहे. ते करत असताना समीक्षकांनी कोणत्या मुद्द्यांची चर्चा केली आहे, त्यांनी कशाकडे लक्ष वेधले आहे. त्यांच्या कोणत्या विधानातून काय स्पष्ट होते, त्यांनी काय शोधण्याचा प्रयत्न केला, तसा कशाचा शोध घ्यायला हवा होता, अशा काही अंगाने प्रत्येक गुणवैशिष्ट्यांची चर्चा विजया चौधरी यांनी केली आहे. काही ठिकाणी आपले निष्कर्ष नोंदवलेले आहेत. कधी गरज पडेल तिथे आणखी काही आपल्या विचारांची भर घातली आहे.

प्रस्तावनेच्या उत्तरार्धात श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांच्या इतर ललित लेखसंग्रहांवरील समीक्षेची थोडक्यात चर्चा केली आहे आणि शेवटी काही निष्कर्ष नोंदवलेले आहेत. ‘डोह’ इतकी त्यांच्या इतर ललित लेखसंग्रहांची समीक्षा झालेली नाही. त्यांच्या संपूर्ण लेखनाचा तुलनात्मक अभ्यास झालेला नाही. त्यांच्या लेखनावरील विद्यापीठीय प्रबंध पुस्तकरूपाने बाहेर आलेले नाहीत आणि ‘‘लेखकाच्या अनुभव क्षेत्राची बदलती आणि विस्तृत रूपे, लेखकाची जीवन सन्मुख मूल्यदृष्टी, जाणिवांची बदलत गेलेली रुपे, अतीद्रिय अनुभवांची त्यांना वाटणारी ओढ, त्यांच्या लेखनात आढळणारा पार्थिव-अपार्थिवाचा खेळ अशा अनेक मुद्यावर चर्चा होणे गरजेचे आहे.” (प्रस्तावना पृ. ४०) हे ते निष्कर्ष आहेत.

त्यानंतर शेवटी प्रस्तावनेचा समारोप केला आहे. विजया चौधरी यांनी ‘डोह : एक आकलन’ या ग्रंथाची बांधणी करताना श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचे ललित लेखन आणि त्यावरील समीक्षेसोबत ललित गद्य वाङ्मय प्रकाराचाही सखोल अभ्यास केल्याचे दिसून येते. चांगली प्रस्तावना कशी असते, याचा वस्तुपाठ विजया चौधरी यांनी घालून दिला आहे. त्यामुळे मराठीतील चांगल्या प्रस्तावनेपैकी ही एक आहे.

या ग्रंथात ‘श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांच्या डोह या पुस्तकावरील समीक्षा लेख/परीक्षणे’ हा पहिला विभाग आहे. त्यामध्ये तब्बल २० मान्यवर समीक्षकांचे लेख आहेत. वा. ल. कुलकर्णी, राम पटवर्धन, राजा ढाले, आनंद यादव, सरोजिनी वैद्य हे त्यातील काही समीक्षक आहेत.

‘श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांच्या डोहसह इतर पुस्तकांवरील लेख’ हा नऊ लेखांचा दुसरा विभाग आहे. त्यामध्ये सुधा जोशी, म. द. हातकणंगलेकर यांचे ‘सोन्याचा पिंपळ’वरील लेख, वासंती मुझुमदार, प्रभा गणोरकर यांचे ‘डोह’वरील लेख, ‘डोह’, ‘सोन्याचा पिंपळ’, ‘पाण्याचे पंख’वरील दुर्गा भागवत, द. भि. कुलकर्णी यांचे लेख आणि सोमनाथ कोमरपंत यांचा चारीही पुस्तकांवरचा लेख समाविष्ट आहे.

‘श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांच्याबद्दलचे लेख’ या तिसऱ्या विभागात आठ लेख आहेत. म.द. हातकणंगलेकर, अनिल अवचट, वीणा देव, वासंती मुझुमदार अशा मान्यवर साहित्यिकांबरोबर तरुण चित्रपट दिग्दर्शक उमेश कुलकर्णी, श्रीनिवास कुलकर्णी यांचा मुलगा आलोक इत्यादींचे लेख आहेत.

‘श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचे स्वतःबद्दलचे लेखन’ या चौथ्या विभागात ‘डोह पलीकडे...?’, ‘डोहविषयी’ हे त्यांचे दोन लेख आहेत. त्याशिवाय पुणे आकाशवाणीवरून ‘साहित्याने मला काय दिले?’ या नावाने केलेले एक भाषण आणि ‘माझ्या साहित्याच्या प्रेरणा’ या नावाने केलेल्या पाच भाषणांचा समावेश आहे. या दोन्ही विभागांतून श्रीनिवास कुलकर्णी यांची साहित्यिक जडणघडण, त्यांचे कुटुंब, साहित्यिक गोतावळा इत्यादीची माहिती मिळते. श्रीनिवास कुलकर्णी यांच्यातील लेखक आणि माणूस समजावून घेता येतो.

श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचे घराणे सुसंस्कृत, कलेचा वारसा असलेले आहे. पुणे जिल्ह्यात शिक्षणाधिकारी म्हणून काम केलेल्या आजोबा दत्तात्रेय विष्णू कुलकर्णी यांच्या कविता ‘प्रतोद’ नियतकालिकातून प्रकाशित झाल्या होत्या. आणि त्यांनी रेखाटलेले वास्तुशिल्प अरुण टिकेकर संपादित ‘शहर पुणे’ या द्विखंडात्मक ग्रंथात आहे. साहित्य, संगीत, चित्रकलेची उत्तम जाण असलेले वडील विनायक दत्तात्रेय कुलकर्णी कविता करायचे. चित्रे काढायचे. लग्नानंतर येताना ‘मानससंगीत सरोवर’ आणि गाण्याचे एक पुस्तक घेऊन आलेल्या आईला वाचनाचा छंद होता. घरामध्ये राहायला आलेले डॉक्टर विश्‍वनाथ मोरेश्‍वर सामंत यांचे इंग्रजी, संस्कृत, कन्नड, मराठी ग्रंथवाचन आणि त्यातील त्यांच्याकडून कानांवर पडलेले संदर्भ, त्यांचा मुलगा प्रतिभावंत लेखक सदानंद सामंत यांचे साहित्य लेखन, वाचन या सगळ्यांचा संस्कार श्रीनिवास कुलकर्णी यांच्यावर झाला.

ते स्वतः म्हणतात, ‘‘अक्षर घोटवावे, चित्रे काढावीत, वाचन करावे, सर्व समजून घेत असावे आणि स्वतःच्या मर्यादाही ओळखाव्यात हे शिक्षण घरातच मिळाले.’’ (पृ. २०५) लहानपणीच साहित्य वाचन आणि निर्मितीची ओढ निर्माण झाली. त्या काळात आपण ‘इसापनीती’, ‘हितोपदेश’, ‘पंचतंत्र’, कवी यशवंतांचे ‘मोतीबाग’, हरिभाऊंची ‘उषःकाल’, अशी अनेक पुस्तके वाचल्याचे श्रीनिवास कुलकर्णी सांगतात. मुंबईतील महाराष्ट्र ग्रंथ भांडारमध्ये नोकरीला असलेला सदानंद सामंताचा धाकटा भाऊ आप्पा सामंत औदुंबरला येताना आपल्यासाठी पुस्तके घेऊन येत असल्याची आठवण श्रीनिवास कुलकर्णी सांगतात. पहिली कविता लिहिण्याचे धाडस वडिलांच्यामुळे त्यांना झाले. ज्यात आनंद वाटतोय त्यावर कविता लिहायची हा वडिलांचा सल्ला मानून मित्रांच्या आंघोळीच्या कार्यक्रमावर त्यांनी कविता लिहिली.

मराठी दुसरीत असताना ‘बालसन्मित्र’मधून कविता छापून आली. पुढे मराठी शाळेत असतानाच ‘खेळगडी’ मासिकातून सोबती ही गोष्ट छापून आली. सांगलीच्या आरवाडे हायस्कूलमध्ये त्यांना कलाप्रेमी शिक्षक भेटले. त्यामधील मुख्याध्यापक दत्त आपटेंचा ते आवर्जून उल्लेख करतात. बाल आणि तरुणपणाच्या उंबरठ्यावरील हे पोषक वातावरण श्रीनिवास कुलकर्णी यांच्या साहित्यिक जडणघडणीला उपकारक ठरले.

श्रीनिवास कुलकर्णी यांनी सुरुवातीच्या काळात प्रामुख्याने कविता लिहिल्या. त्या प्रतिष्ठित नियतकालिकातून प्रकाशित झाल्या. आज त्यांच्या कवितेची संख्या दोनेशेच्या आसपास भरेल इतकी आहे. आपली कवितेवर नितांत निष्ठा असल्याचे आणि चांगली कविता वाचायला मिळाली की, अतिशय आनंद होत असल्याचे ते सांगतात. श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांच्याकडून अनेक कवींच्या कविता आपण ऐकल्याचे आणि इतक्या कविता मुखोद्गत असणार्‍या पहिल्या माणसाला भेटल्याचे चित्रपट दिग्दर्शक उमेश कुलकर्णींनी म्हटले आहे. त्यांचे गद्यलेखन अनेक समीक्षकांना काव्यात्म वाटते. सरोजिनी वैद्य यांनी बालकवींच्या, आनंद यादव यांनी मर्ढेकरांच्या आणि द. भि. कुलकर्णी यांनी या दोघांच्या कवितेशी श्रीनिवास कुलकर्णी यांच्या ललित गद्याचे नाते जोडले आहे. म. द. हातकणंगलेकर यांनी त्यांना ‘मराठी ललित गद्याचे बालकवी’ म्हटले आहे.

कवितेवर जीव असलेले श्रीनिवास विनायक कुलकर्णी कवितेसोबत नंतर ललित गद्यलेखन करू लागले. त्याचे कारण त्यांनी सांगितले आहे. ‘मृगजळांतल्या यक्षघराला’ या नावाची कविता त्यांनी लिहिली होती. ती कविता कवी शांताराम शिंदे यांना दाखवली. त्यांनी कविता चांगली आहे; पण हा अनुभव गद्यामध्ये उतरून काढायचा सल्ला दिला. त्यातून ‘मृगजळातल्या यक्षघराला’ या लेखाचा जन्म झाला. आपला अनुभव पुष्कळदा काव्यात येत नाही, हे श्रीनिवास कुलकर्णींना समजून आले. शांताराम शिंदे यांचेही तेच मत पडले. त्यानंतर त्यांनी ‘मनातल्या उन्हात’ हा ललितलेख लिहिला. तो १९६०च्या ‘सत्यकथा’मधून आला. ‘सत्यकथा’मधून आलेला हा पहिला ललितलेख. आणि पुढे ‘सत्यकथा’, ‘मौज’बरोबरचा जो श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचा ऋणानुबंध जुळला तो कधी न संपणारा!

श्रीनिवास विनायक कुलकर्णी साहित्यनिर्मितीकडे गंभीरपणे पाहणारे लेखक आहेत. संख्येपेक्षा गुणवत्ता त्यांना महत्त्वाची वाटते. त्यांचे लेखन त्यांची साक्ष देते. त्या संदर्भात श्रीनिवास कुलकर्णी आणि प्रकाश संतांविषयी इंदिरा संतांनी काढलेल्या पुढील उद्गाराची आठवण होते. त्या म्हणतात, ‘श्रीनिवास आणि प्रकाश यांत एका गोष्टीचं साधर्म्य आहे. दोघेही कमी लिहितात किंवा लिहीतच नाहीत.’ (पृ. १९९) लिहिण्यासारखे पुष्कळ अनुभव जवळ असताना ते सगळं लिहीत का नाही, या मुलगा आलोकच्या प्रश्‍नाला श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांनी दिलेले उत्तर मार्मिक आहे.

ते म्हणतात, ‘‘विहिरीतील पाणी जसं जसं खाली जावं, तसं जास्त शुद्ध मिळतं. तसंच अनुभवांचं. ते खूप खालून येण्यासाठी वेळ द्यायला हवा. आणि खरं तर हे अनुभव स्वतःला आनंद देत असतातच की, सगळेच अनुभव सर्वांसाठी खुले कशाला करायचे?’’ (पृ. १९९) साहित्यिकाचे कुटुंब साहित्याशी नाते सांगणारे असतेच असे नाही. घर ग्रंथ, पुस्तकांनी भरलेले असतेच असे नाही. आणि साहित्यिक साहित्यिकांच्या गोतावळ्यामध्ये रमतोच असे नाही.

श्रीनिवास विनायक कुलकर्णी या सगळ्यांला अपवाद असणार्‍या लेखकांपैकी एक आहेत. आपल्याकडे साहित्य, संगीत, चित्रं आदी कला सलग पाच पिढ्या ठाण मांडून बसल्या आहेत, असे सांगून आलोक आपल्या पुढच्या पिढीतील लहानांतही त्याचे संकेत दिसू लागल्याचे दाखवून देतात. श्रीनिवास कुलकर्णी यांच्या घरी प्रतिभावंतांचे नेहमी येणे-जाणे आहे. त्यांच्या घरातील आदरातिथ्याबद्दल अनिल अवचट कौतुकाने बोलतात. वसंत बापट यांनी श्रीनिवास कुलकर्णी यांच्या घराचा ‘एक मोठे सांस्कृतिक केंद्र’ या शब्दांत गौरव केला आहे. उमेश विनायक कुलकर्णी यांचा ‘श्री. विं. चे ‘यक्षघर’ ’ नावाचा लेख आहे. ‘ ‘यक्षघर’ ही रवीन्द्रनाथ टागोरांची बंगाली कविता. शब्दांच्या, कलेच्या क्षेत्रातले जे जे उत्तम ते ते घरात नांदावे आणि ज्या घरात ते नांदते, ते ‘यक्षघर’- ही ती संकल्पना’, (पृ.१८१) असा यक्षघराचा अर्थ त्या लेखाच्या सुरुवातीला उलगडून दाखवला आहे. हा लेख मुळातून वाचल्यानंतर लेखाचे शीर्षक किती सार्थ आहे, ते समजून येते.

पुस्तकांनी भरलेली कपाटे आणि बाहेरही तितक्याच पुस्तकांच्या थप्प्या. अनिल अवचट आणि उमेश कुलकर्णींच्या लेखांमध्ये हा उल्लेख येतो. पुस्तके हीच या घराची लाखमोलांची संपत्ती! पण ती चोराला काय उपयोगाची? त्यांच्या घरात चोरी करून गेलेला चोर नंतर पोलिसांना सापडतो. पोलीस श्रीनिवास विनायक कुलकर्णींना बोलवून घेतात. त्या वेळी चोर म्हणतो, ‘काय नाय तुमच्या घरात. नुस्ते कागद. आता तुमचं घर आमच्या लिश्टीतून कटाप.’ (पृ. २००) चोर खरे तेच बोलला. मुळात श्रीनिवास कुलकर्णी व्यावहारिक जगापासून दूर राहणारे गृहस्थ दिसतात. त्यांनी काही काळ ओगलेवाडीच्या काच कारखान्यात नोकरी केली होती. कारखाना बंद झाला आणि त्यांच्या पगाराची, फंडाची बरीच रक्कम अडकली; पण त्याविषयी त्यांच्या मनामध्ये विखार नसल्याचे उलट तिथल्या अनुभवाकडे ते गंमत म्हणून पहात असल्याचे म.द. हातकणंगलेकर यांना दिसून आले.

श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचा साहित्यिक गोतावळा खूप मोठा आहे. श्री. पु. भागवत, दुर्गा भागवत, पु. ल. देशपांडे, इंदिरा संत, गो. नि. दांडेकर, विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, वसंत बापट, शांता शेळके, व्यंकटेश माडगूळकर, नरेंद्र चपळगावकर, भारत सासणे, अशा कितीतरी नावांचा उल्लेख श्रीनिवास कुलकर्णी यांच्या लेखांतून आणि त्यांच्याविषयी लिहिलेल्या इतरांच्या लेखांतून येतो. प्रकाश संत हे तर सख्खे मित्र. दोघेही एकाच गावात राहणारे. यशवंतराव चव्हाण यांचाही त्यांच्यावर विशेष लोभ होता. आपल्याला सर्व साहित्यिक स्नेहमंडळींकडून आलेल्या पत्रांचा संग्रह त्यांनी जपून ठेवला आहे.

साहित्यिकांसारखीच आपल्या ओळखीच्या माणसांशीही श्रीनिवास कुलकर्णी यांची जवळीक आहे. औदुंबरमधील गावकरी आणि त्यांच्यातील भावनिक नातेसंबंध सांगताना उमेश कुलकर्णी म्हणतात, ‘‘त्यांच्याबरोबर त्यांच्या गावाला, औदुंबरला गेलो आणि त्यांचे प्रत्येक घराशी असलेले नाते पाहून मी थक्क झालो. प्रत्येक घरामध्ये किती माणसे आहेत, त्यांच्या आयुष्यामध्ये काय घडले, काय अडचणी होत्या, इथपासून त्यांची मुले आता काय करतात या सगळ्यांची एक साखळी त्यांच्या मनामध्ये चालू असते.’’ (पृ. १८७)

साहित्य आणि साहित्यिक यांच्यावर जीवापाड प्रेम करणार्‍या श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांच्या स्वभावाचे इतर काही पैलू, वागण्यातील बारकावे मान्यवरांनी आपल्या लेखांतून टिपले आहेत. त्यांचा ऋजू, मितभाषी, प्रसिद्धीपराड्मुख स्वभाव मान्यवरांना भूरळ घालताना दिसतो. औदुंबरच्या ग्रामीण साहित्यसंमेलनामध्ये झालेल्या पहिल्या भेटीत म. द. हातकणंगलेकर यांना श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचा जो अनोखा स्वभाव जाणवला, तो सांगताना ते म्हणतात, ‘‘एका तपस्वी, सात्त्विक घराण्यात बालवयात सिद्धी मिळालेल्या मुलाप्रमाणे ते सर्वांना दिसत होते. त्यात अहंकाराचा किंवा दांभिकतेचा वास नव्हता.’’ (पृ. १६४)

त्याशिवाय श्रीनिवास कुलकर्णी घरगुती समारंभ, कार्यक्रमात रमणारे, समारंभामधील बारकावे आणि उपचार मनोमन पाळणारे आणि अत्यंत दक्ष असे संसारी गृहस्थ असल्याचे हातकणंगलेकर यांना दिसून आले आहे. त्यांचा साधा पोषाख, साधा स्वभाव, जड पिशवी घेऊन हिंडणे, नवनवे लेखक शोधणे इत्यादी गुण वीणा देव अधोरेखित करतात. आपल्या आण्णाला खायाची, खायाला करून घालण्याची आणि बॅगा, बॅटर्‍या खरेदी करण्याचा नाद असल्याचा आलोक सांगतात.

श्रीनिवास कुलकर्णी यांच्या हस्ताक्षरानेही अनेकांना आपल्या प्रेमात पाडले आहे. त्यांच्यावर ज्यांनी लेख लिहिले त्यातील बहुतेकांनी त्यांच्या हस्ताक्षरांचा उल्लेख केला आहे. वीणा देव यांना ते जिरेसाळ तांदळाच्या किंचित लांबट, स्वच्छ दाण्यासारखे वाटते. म. द. हातकणंगलेकर म्हणतात, ‘‘श्रीनिवासांचा स्वतःचा पत्रव्यवहार अतिशय सुबक. त्यांचे अक्षर तर असे देखणे आणि मंजुळ, निर्मळ झर्‍यासारखे स्फटिकशुभ्र वाहते! माझी तर समजूत आहे की, त्यांच्या सुंदर अक्षरांच्या ओढीने अनेक जण त्यांच्याशी पत्रव्यवहार वाढवत असतील.’’ (पृ. १६५)

आपण अक्षराचं वळण दादांकडून उचलल्याचं सांगून श्रीनिवास विनायक कुलकर्णी आपल्या सुरेख अक्षराचे श्रेय वडिलांना देतात. वडिलांनी गवताच्या काड्यांचा बोरू करणे, तो बोरू घेऊन श्रीनिवास कुलकर्णी यांनी वडिलांच्या अक्षरांवरुन फिरवणे, नंतर शाईत बडवून तशी अक्षरे काढायला शिकणे, पुढे दोघांचा कर्‍हाड, सांगली मधील घरे, देवळांवरील अक्षरं बघायचा कार्यक्रम, अक्षरांविषयी दोघांमधील चर्चा, त्यात बापूरावांनी सहभागी होणे, बापूरावांनी अक्षरांसंबंधी वचने, सूत्रं सांगणे, असा हा सगळा तपशील श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांनी पुणे आकाशवाणी केंद्रावर केलेल्या तिसर्‍या भाषणात आला आहे.

अक्षर ओळखीने श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांना अलीबाबाच्या गुहेतील खजिना सापडल्याचा आनंद झाला आणि हा आनंद पुढे कसा द्विगुणीत होत गेला, हे या ग्रंथातील तिसऱ्या आणि चौथ्या विभागातील लेखांतून लेखांतून समजते.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

पाचवा विभाग ‘ललित गद्याच्या आढाव्या’त आलेल्या महत्त्वाच्या नोंदी’ हा आहे. ‘मराठी विश्‍वकोश खंड १२’, ‘वाङ्मयीन, संज्ञा-संकल्पनाकोश’, ‘संक्षिप्त मराठी वाङ्मयकोश’ आणि इतर काही ग्रंथातून ललित गद्याच्या आढाव्यात डोहसंबंधी महत्त्वाच्या नोंदी केल्या आहेत. त्यांचा समावेश या प्रकरणात केला आहे. ललित गद्याचे पूर्वीचे बंदिस्त आणि सांकेतिक स्वरूप बदलून ते अधिक प्रसरणशील, मोकळे करणार्‍या लेखकांपैकी श्रीनिवास कुलकर्णी हे एक आहेत. त्यांच्या लेखनाने ललितगद्य वाङ्मय प्रकाराच्या कक्षा रुंदावून नवी परिमाणे दिल्याचे काही नोंदीतून सांगितले आहे.

चित्रकार पद्या सहस्त्रबुद्धे यांची ग्रंथाच्या मुखपृष्ठावरील व आतील बोलकी चित्रे, मलपृष्ठावरील ज्येष्ठ लेखक भारत सासणे यांची अचूक व मोजक्या शब्दातील पाठराखण, छायाचित्रकार शेखर गोडबोले यांच्या कॅमेर्‍यातील श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचे छायाचित्र आणि चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांनी केलेली ग्रंथाची कल्पक मांडणी, यामुळे हा ग्रंथ अधिक उठावदार झाला आहे. तो मौजेच्या परंपरेला साजेसा झाला आहे.

विजया चौधरी यांनी कष्टपूर्वक संपादित केलेला हा ग्रंथ गुणात्मकदृष्ट्या श्रेष्ठ झाला आहे. त्याला संदर्भ आणि संग्राह्यमूल्यही लाभले आहे.

..................................................................................................................................................................

‘डोह : एक आकलन’ - संपादन विजया चौधरी, मौज प्रकाशन गृह, मुंबई, पाने - २६४, मूल्य - ६०० रुपये.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5179/Doh-Ek-Akalan

..................................................................................................................................................................

लेखक द. तु. पाटील कादंबरीकार आहेत.

dtpatil944@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे.......

जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक.......