सुप्रसिद्ध कथक कलावती, गुरू, विदुषी पं.रोहिणी भाटे यांचे ‘रोहिणी निरंजनी’हे वंदना बोकील-कुलकर्णी लिखित चरित्र येत्या १४ डिसेंबर २०२१ रोजी राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशित होत आहे. त्यानिमित्तानं त्यातील एका प्रकरणाचा हा संपादित अंश ...
..................................................................................................................................................................
रोहिणीताईंनी म्हटल्याप्रमाणे ‘पुणे उणे नृत्य’ ते ‘नृत्यसंपन्न पुणे’ हा प्रवास त्यांच्या आयुष्याशी समांतर असलेला प्रवास आहे. कथक नृत्याचा अहर्निश ध्यास घेतलेल्या या नृत्यांगनेचा हा प्रवास अत्यंत संघर्षमय होता. संघर्षमय जगण्यात व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू झळाळून उठतात. सर्वस्व पणाला लागल्याशिवाय काही गोष्टी स्वतःलाही कळत नाहीत. आणि हातीही लागत नाहीत. त्यांचे गुरू पं.मोहनराव यांचे “Struggle –that is the keynote of Rohini’s success….She has earned these palmy days with sheer grit and hard work,” हे उद्गार म्हणूनच यथार्थ ठरतात.
संपूर्ण भारतात जिथे जिथे कथकसंबंधाने अकादमिक चर्चा, परिसंवाद, उत्सव होत असत, तिथे तिथे रोहिणीताईंना निमंत्रण असेच. भले त्या तिथे जावोत किंवा न जावोत. हे कसं घडलं, याचा शोध घ्यायला लागलं की, त्यांची साधना त्यामागे उभी आहे, हे लक्षात येतं. त्या स्वतः उत्तम परफॉरमर, श्रेष्ठ गुरू, दूरदृष्टीच्या संस्थाचालक, कलामाध्यमाचा विचार करणाऱ्या चिंतनशील विचारवंत, विद्यापीठीय चर्चेत नृत्यशिक्षण व नृत्यविचार समाविष्ट करणाऱ्या अॅकॅडेमेशियन, संगीतरचनाकार, वाग्गेयकार आणि लेखिका अशा परिपूर्ण कलाकार- ‘टोटल आर्टिस्ट’- बहुआयामी कलावती होत्या. त्यामुळे रोहिणीताईंचं नृत्यक्षेत्रातील योगदानही स्वाभाविकच विविधरंगी आहे.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
एकेकाळी रोहिणीताईंचं नृत्य बघून पालकांना आपल्या मुलींनी नृत्य शिकावं असं वाटलं. त्यातील अभिजातता आणि सच्चेपणा, यांचा परिणाम होता तो! एखादी कला व्रत म्हणून, जीवनवृत्ती म्हणून स्वीकारली की, कलाकाराच्या सर्व कृतींमध्ये त्याचं तेज झळकतं. त्यामुळे अल्पावधीत ‘नृत्य म्हणजे रोहिणीताई’ असं समीकरण पुण्यात-महाराष्ट्रात तयार झालं.
असाधारण उंची आणि बारीक डोळे असूनही त्यांचं नृत्य अभिजात सुंदर होतं. त्यांच्या हालचाली डौलदार, ललितसुभग आणि चपळ होत्या. मंचावर त्या नुसत्या लवलवत असत. जणू मूर्तीमंत चैतन्य तिथे अवतरे. त्यांचे लयीचे अंदाज काटेकोर होते. सात्त्विक अभिनयाचा मानदंड म्हणावा, असा त्यांचा अभिनय उच्च दर्जाचा होता. त्यांचा चेहरा अत्यंत बोलका, भावदर्शी होता. त्यांच्या चमकत्या डोळ्यांमधून प्रतिबिंबित होणारे भाव, नाक, पापणी, मनगट यांचं काम यांत खोली होती, गहराई होती. कथकमधील ‘नृत्त’ या तांत्रिक भागातही अंग-हस्तक यांमधून निर्माण होणारे आकार त्या दाखवत. त्यात केवळ पदन्यासाची करामत नसे, मात्रांचे गणित नसे तर बोलांचे सौंदर्य त्यातून दिसत असे. बोलांच्या मधल्या जागांमध्ये कमनीय अंगविभ्रमांमधून तालाचे भावसौंदर्य प्रकट करता येते, हे त्यांच्या सादरीकरणातून दिसत असे.
त्या म्हणत, ‘कथा कहे सो ही कथक’ कहावत कथक शब्द के विशिष्ट अर्थ का पूर्वप्रचलित प्रमाण है| इसी कारण किसी भी कथक प्रस्तुति में कथा का, भावाभिनय का महत्त्वपूर्ण समावेश होना, मुझे आवश्यक लगता है|’
अगदी सुरुवातीपासून त्यांच्या सादरीकरणात एखादी लहान-मोठी कथा असेच गुंफलेली. अर्थात इतके बारकावे खरा रसिकच समजू शकतो. पण तरी सामान्य प्रेक्षकालाही त्यांचं नृत्य खिळवून ठेवी. त्यांच्या नृत्यसादरीकरणाच्या मागे त्यांचं चिंतन आणि समग्र विचार उभा असे. हिमनगाचा अगदी लहान भाग पृष्ठभागावर दिसतो, पण त्याची खोली त्याहून कितीतरी अधिक असते, जी गोचर नसते. त्याप्रमाणे त्यांच्या अभ्यासाचा प्रत्यय मंचीय आविष्कारातून येई. भावसमृद्ध आणि ज्ञानवंत अशा व्युत्पन्नमती कलाकार होत्या त्या. वागण्या-बोलण्यातला भारदस्त डौल त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होता. त्याचेही प्रत्यंतर त्यांच्या सादरीकरणात येई.
रोहिणीताईंच्या नृत्याचं अपील बुद्धीला आणि आत्म्याला अधिक असे. कथकची भाषा परिष्कृत आहे. काळ, प्रसंग, थीम-विषय यांसाठी ती भाषा त्या वळवून, वाकवून घेत असत. त्यांचे सादरीकरण चोख असे. ते सहज वाटे पण सहज नसे. नृत्यकलेच्या रूपसौंदर्याचा अनुभवसिद्ध गाढ विचार त्यात असे.
‘संगीत नाटक अकादमी’चे माजी संचालक श्री.जयंत कस्तुवार या संदर्भात म्हणाले की, “विचक्षण आणि बुद्धिमान तसंच रसिक दोन्ही प्रकारच्या लोकांना त्यांचे नृत्य अपील होत असे. मात्र ते गर्दीसाठी नव्हते कधी. नृत्याची त्यांची समज सम्यक होती. नृत्याच्या साहित्य, संगीत या सहघटकांचे त्यांचे ज्ञान, व्यासंग सखोल होता. she was master of all!” याचं महत्त्वाचं कारण म्हणजे नृत्य ही त्यांची जीवनवृत्ती होती. “It will not be an exaggeration if I say that she eats Kathak,drinks Kathak,and breathes Kathak.” असं पं.मोहनरावजी त्यांच्याविषयी म्हणाले, ते अगदी यथार्थ आहे.
..................................................................................................................................................................
संतसाहित्यातील तत्त्वज्ञानविषयक संज्ञांचा हा कोश प्राचीन मराठी साहित्याच्या प्रगत अभ्यासासाठी उपयुक्त आहे. वाङ्मय अभ्यासक, भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि जिज्ञासू वाचक यांच्यासाठी हा संज्ञाकोश गरजेचा, महत्त्वाचा आणि संदर्भसंपृक्त आहे.
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/marathi-sant-tatvdnyan-kosh
..................................................................................................................................................................
वस्तुतः कथक ही उत्तर भारतामधली कला. महाराष्ट्राला तिचे नावही अपरिचित होते, त्या काळात कथकची परंपरा जणू भगीरथ प्रयत्नांनी मराठी मातीत, या ‘राकट, कणखर दगडांच्याही देशात’ त्यांनी रुजवली. त्यांनी नृत्यकलेची भूमी तयार केली इथे. ज्या काळात तडकफडक नाचाचा प्रभाव होता त्या- अगदी सुरुवातीच्या काळातही- आपल्या अत्यंत कलात्मक आणि अभिजात नृत्यातून, सिनेमाच्या नाचापेक्षा शास्त्रीय नाच वेगळा आहे, हे त्यांनी निश्चितपणे ठसवलं. समाजाची दृष्टी नृत्यानुकूल व्हावी म्हणून समग्र प्रयत्न केले. आज पुणं हे दक्षिणेतलं महत्त्वाचं कथक केंद्र म्हणून मान्यता पावलं आहे, ही त्यांची आपल्याला अभिमान वाटावा, अशी मौलिक देणगी आहे.
मुंबईत- पूर्वीचं बॉम्बे- कथकनृत्य अधिक करून चित्रपटाशी जोडलेलं गेलं. पं.गोपीकृष्ण, सितारादेवी इतकंच काय पण पं. लच्छूमहाराज यांचंही नाव मुख्यत्वे चित्रपटांशी जोडलेलं होतं. चित्रपटाचं माध्यम नवीन होतं, लोकप्रिय होऊ लागलं होतं. लवकर पैसा आणि प्रसिद्धी देऊ करत होतं. त्यातून समाजात नृत्य लोकप्रिय केलं गेलं, हेही नोंद घ्यावं असंच आहे. रोहिणीताईंची कर्मभूमी पुणे. तत्कालीन बॉम्बेशी तुलना केली की, लक्षात येतं की कथक… ‘as an art form’- एक कलाप्रकार आणि ‘कथकची परंपरा’ या दोन्हींचा उत्तम समन्वय त्यांनी घातला. आज भारतीय स्तरावर कथकचा नकाशा रेखाटायचा तर पुण्याचे नाव ठळक आहे ते त्यांच्यामुळे!
केवळ हौस या पातळीवर मुलीबाळींसाठी त्यांनी नृत्यवर्ग चालू ठेवला असता, तरी हा वर्ग त्यांच्यासाठी अर्थार्जनाचा स्रोत होऊ शकला असताच. पण त्यांना नृत्याला ‘कला’ म्हणून प्रतिष्ठा मिळवून द्यायची होती आणि इथे नृत्यचळवळ रुजवायची होती. त्यामुळे लेखन-भाषण, शिक्षण आणि नृत्यसादरीकरण अशा चौफेर माध्यमांतून त्या सातत्यानं काम करत राहिल्या. आपली साहित्याची जाण, आपलं लेखनकौशल्य, आपली संगीतकलेची रुची आणि अध्ययन, स्वतःची कला आणि कलाविचार यांच्या अहर्निश विकासाचा ध्यास, शिकवण्याची आस आणि क्षमता, यामुळे त्यांनी इथे नृत्यकलेचं उत्थान घडवून आणलं.
ऐतिहासिक दृष्टिकोनातून रोहिणीताईंचं काम पाहता आणखी काही गोष्टी ठळकपणे नजरेत भरतात. स्वातंत्र्य मिळाल्यावर भारतीय नृत्यशैलींचं पुनरुत्थान करायचा जाणीवपूर्वक प्रयत्न शासकीय पातळीवरून झाला. ह्यातून एकेका शैलीच्या रीतसर अभ्यासासाठी, शिक्षणासाठी भारतात विविध ठिकाणी केंद्रे स्थापन झाली. ‘कलामंडलम’, ‘कथक केंद्र’ वगैरे संस्था सुरू झाल्या. पुण्यात मात्र त्यापूर्वीच रोहिणीताईंनी नृत्यचळवळ उभी केली. आपल्या शिष्यवर्गाला त्यांनी या चळवळीत, या नृत्ययात्रेत सामील करून घेतलं. इथे नृत्यरसिकता घडवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. पुण्यासारख्या शहराला आपल्या नृत्यविषयक धारणांमध्ये बदल घडवायला लावून, पारंपरिक, बाळबोध आणि काहीशा पूर्वग्रहदूषित कल्पनांमधून मुक्त करणाऱ्या रोहिणीताईंच्या ‘नृत्यभारती’ या संस्थेनं यंदा (२०२१) अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केलं आहे. एका व्यक्तीच्या कार्यकर्तृत्वाचा आधार असलेली पुण्यातली ही आद्य नृत्यसंस्था. कोणतेही शासकीय वा अन्य खाजगी आस्थापनांचे आर्थिक पाठबळ नसूनही गुणवत्ता आणि निष्ठा या दुर्मीळ होत चाललेल्या गुणांच्या भक्कम पायावर उभी आहे.
..................................................................................................................................................................
उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...
हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal
................................................................................................................................................................
रोहिणीताई ज्या काळात काम करत होत्या तो काळ नव्या कल्पना, नवे विचार यांना चालना देणारा काळ होता. १९६०-१९८० ही दोन दशकं महाराष्ट्रात सांस्कृतिकदृष्ट्या नवे वारे वाहत होते. या काळालाच जणू प्रयोगशिलतेचं वरदान लाभलं होतं.
पु.ल. देशपांडे यांची ‘तुझे आहे तुजपाशी’ आणि ‘सुंदर मी होणार’ ही नाटकं गाजत होती. त्यांचे ‘वाऱ्यावरची वरात’ आणि ‘बटाट्याची चाळ’ हे एकपात्री प्रयोग लोक गर्दी करुन पहात होते.आचार्य अत्रे यांच्या ‘तो मी नव्हेच’ आणि वसंत कानेटकर यांच्या ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकांनी मराठी रंगभूमीला पुन्हा व्यावसायिक वैभवाचे दिवस दाखवले होते. ‘थिएटर अॅकॅडमी’, ‘आविष्कार’ सारख्या नाट्यसंस्था, समांतर चित्रपटांची चळवळ जोम धरत होती. १९७०मध्ये ‘नटसम्राट’ हे नाटककार वि.वा. शिरवाडकरलिखित नाटक व्यावसायिक रंगभूमीवर आलं. नाटकाच्या संगीतात बदल घडला. त्याचं श्रेय पं.भास्कर चंदावरकर आणि अभिषेकीबुवांचं. ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकानं संगीत नाटकाचा वेगळा बाज दाखवला. ‘घाशीराम कोतवाल’ ह्या विजय तेंडुलकरांच्या नाटकानं जागतिक रंगभूमीवर नवतेची पताका फडकावली. डॉ.लागू, पं.सत्यदेव दुबेजी, विजयाबाई मेहता यांनी रंगभूमीला नवचैतन्य दिलं.
संगीताच्या क्षेत्रात पं.भीमसेन जोशी, पं.अभिषेकीबुवा यांची कारकीर्द बहरत होती. कुमारजी रागाचा ‘प्रोफाईल बघा’, ही नवी परिभाषा आणत होते.
भालचंद्र नेमाडे यांची ‘कोसला’, रणजित देसाईंची ‘स्वामी’ आणि शिवाजी सावंतांची ‘मृत्युंजय’ हे मराठी साहित्य क्षेत्रातील ‘हॅपनिंग’ होतं. साठच्या दशकातील या कादंबऱ्यांचं गारुड अजूनपर्यंत टिकून आहे. साहित्यात नवकथाकारांची पिढी स्थिरावली होती. नवं नाटक, नवी कविता असा सगळा आमूलाग्र बदलांचा हा काळ. ही नवता केवळ चूष म्हणून नव्हती. खरोखर ती दृष्टी वेगळी होती. आशय आणि त्याची मांडणी दोन्हींत ती दिसत होती.
इथे पुण्यात इरावती कर्वे (१९०५-१९७०), मालतीबाई बेडेकर (१९०५-२००१, योगायोगानं बेडेकर दाम्पत्य नंतर अनेक वर्षं ‘मनुस्मृति’ या बंगल्यात वास्तव्याला होतं.) सामाजिक कार्यकर्त्या विद्याताई बाळ, शिक्षणतज्ज्ञ चित्रा नाईक, अर्थतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्या सुलभा ब्रह्मे, या कर्तृत्ववान स्त्रिया याच काळात रोहिणीताईंच्या आसपास वावरत होत्या. या सर्वांचा एकमेकांच्या विचारांवर आणि कामावर कमीअधिक प्रभाव पडत होता. रोहिणीताईंच्या कामातील प्रयोगशीलतेला हाही संदर्भ आहे.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
कोणतीही कला एका विशिष्ट टप्प्यापर्यंत शिकता व शिकवता येते; त्याचप्रमाणे कला केवळ धुंदीवर पुढे नाही जात; पुढचा प्रवास हा अभ्यास, चिंतन याच मार्गानं करावा लागतो तर तिचं मर्म गवसतं आणि तिच्या आविष्कारात नाविन्य येतं. ज्या कलेनं भावश्रीमंत केलं, जगण्याला अर्थपूर्णता दिली, त्या कलेला आपण काय देत आहोत किंवा द्यायला हवे, असाही त्यांचा विचार असावा. त्यामुळे कथक या माध्यमातून त्या सतत नव-दर्शन घडवत राहिल्या. कथकशैलीत मराठी विषय, मराठी कविता मांडता येतात, हे त्यांनी शोधलं आणि त्याचं यशस्वी मंचनही केलं.
सादरीकरणाच्या कला या काही पुरातन वस्तू नव्हेत, त्यांमध्ये जडता नसते, त्यांचं स्वरूपच काळाशी बांधलेलं असतं. त्यामुळे त्या जतन करायच्या म्हणजे काय करायचं, तर त्यांचं सत्त्व समजून घेणं नि ते पुढे प्रवाहित करणं. याही दृष्टीनं रोहिणीताईंनी परंपरा पुढे नेली. कोणत्याही माध्यमात नवीन असताना पूर्वसुरींचे अनुकरण केले जाते. पण नंतर शास्त्राचा आणि तंत्राचा पक्का संस्कार झाला, तो कलाकाराच्या तनमनात रुजला की स्वत:च्या चिंतनातून आणि साधनेतून कलाकाराची स्वतंत्र दृष्टी विकसित होऊ लागते. या नव्या दृष्टीचं परंपरेशी असणारं नातं नाळेचं नातं असतं. दोन्हीही एकमेकींशिवाय अर्थहीन ठरतात. नवतेला परंपरेचं पाठबळ हवं आणि परंपरेला नवतेचे धुमारे आवश्यक. नवे झरे निर्माण होणं, मूळ प्रवाहाला ते येऊन मिळणं गरजेचं असतं. त्यातूनच प्रवाह वाहता राहतो, विस्तारतो.
स्वतःच्या परंपरेचं महत्त्व राखूनही इतर संस्कृतींचा आदर करण्याचं बाळकडू रोहिणीताईंना घरच्या संस्कारांतून मिळालं होतं. परंपरेची आणि अभिजाततेची सर्व मूल्ये त्यांच्या नृत्यसाधनेत आणि नृत्याविष्कारातही म्हणूनच उजागर झाली. कथकच्या अनेकविध पैलूंचं दर्शन त्यांच्या प्रयोगांमधून घडलं. ‘नृत्त’पक्षात विविध ताल, आडमात्रांचे ताल, तालमाला, सरगम, तराणा असं निःशब्द कंठसंगीत आणि वाद्यसंगीत यांवर आधारित रचना त्यांनी केल्या.
‘नृत्य’प्रकारात स्व.बिंदादिनमहाराज यांच्या विविध ठुमऱ्या, भजने, आपलं प्राचीन गीतभांडार, अगदी वेदकालीन सूक्तं, श्लोक, स्वरचित गीतं, कवित् यांचबरोबर संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, रवींद्रनाथ टागोर, कुसुमाग्रज इत्यादी प्राचीन-अर्वाचीन कवींच्या कविता, यांचंही नृत्यामधून सादरीकरण केलं. परंपरेच्या बाहेरून आलेली व्यक्ती किती मोठं आणि सखोल काम करू शकते, याचा प्रत्यय रोहिणीताईंनी दिला. आपल्या कलामाध्यमाचा त्यांनी खोलवर विचार केला होता. त्यामुळे कलांतर करताना नेमकं काय करायला हवं, याबाबत त्यांच्या विचारात आणि कृतीत स्पष्टता होती.
“रोहिणीजी ने कथा के काव्यधार को अधिक उत्कट, सघन और विविध बनाया है I वैदिक ऋचाओं से लेकर कालिदास या अमरु की रचनाओं का उनका नृत्यान्वेषण या कि नृत्यसंयोजन कथक को कविता के ऐसे भूगोल में ले जाती है जहाँ वह सदियों से नहीं गया है भले ही कभी पहले वह वहीं उपजा और रसा-बसा होगा I रोहिणी भाटे ने अपने विनम्र लेकिन असंदिग्ध साहस से उसके अपने लगभग विस्मृत उद्गम की याद दिलायी और फिर से पहचान करायी है I” असे उद्गार प्रख्यात हिंदी कवी श्री.अशोक वाजपेयीजी यांनी काढले आहेत.
हे करताना कथक नृत्यशैलीच्या परिघात राहून अंग, हस्त, लय या सर्व पातळ्यांवर रोहिणीताईंनी नव्या शक्यता शोधल्या आणि कथक परंपरा आणखी समृद्ध केली.
कथकला ‘मार्गम्’ म्हणावा, असा प्रस्तुतीचा आराखडा नसतो. त्यामुळे नर्तकाला मोकळीक घेता येते. कथक ही इतर शैलींच्या तुलनेनं मोकळी आणि लवचिक (open and flexible) शैली आहे. त्यामुळेच तिचं सत्व (essence) समजणं अवघड आहे. त्यांनी ते सत्त्व आत्मसात करून विविधांगांनी कथक पुढे नेलं, समृद्ध केलं. कथकमध्ये प्रयोग करायला खूप वाव आहे, हे नेमकं हेरून समकालीन विषय त्यात येऊ शकतात, हे त्यांनी ‘कठपुतली’सारख्या रचनेत दाखवलं. त्यांच्या काळातील कुमुदिनीजी लाखिया यांनीही असे विषय किंवा काळाच्या पुढचे विषय हाताळले. रोहिणीताईंची कल्पनाशक्ती परंपरेच्या मागे आणि पुढे दोन्ही दिशांनी धाव घेई. रासक्रीडा वगैरे कथकला परिचित आहे.पण रोहिणीताई त्याच्याही मागे गेल्या. आणि ‘उषःसूक्त’सारखी वेदकालीन रचना त्यांनी केली. आणि काळाच्या पुढेही गेल्या आणि कॅलीडोस्कोप, समय यांसारख्या विषयांना त्यांनी हात घातला. त्यांनी ज्ञानेश्वर तुकाराम, आणि सूरदास केले आणि रवींद्रनाथ, कुसुमाग्रज आणि पद्मा गोळे यांच्या कवितांवरही नृत्य केलं.
डॉ.अशोक केळकर लिहितात, “She could let us see that the language of Kathak is a language of freedom and order because for her Kathak was not just a form of dance,but a form of life.The way of Kathak spoke to her because it was congruent with her way of life, or rather because it helped her to see what her way of life was really like.”
..................................................................................................................................................................
संतसाहित्यातील तत्त्वज्ञानविषयक संज्ञांचा हा कोश प्राचीन मराठी साहित्याच्या प्रगत अभ्यासासाठी उपयुक्त आहे. वाङ्मय अभ्यासक, भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि जिज्ञासू वाचक यांच्यासाठी हा संज्ञाकोश गरजेचा, महत्त्वाचा आणि संदर्भसंपृक्त आहे.
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/marathi-sant-tatvdnyan-kosh
..................................................................................................................................................................
व्यक्तिमत्त्वाचा विचार केला तर त्यांना ‘आत्माभिव्यक्ती’ महत्त्वाची वाटत होती. ‘कथक’ ही उत्तर भारतीय नृत्यशैली त्यांच्या व्यक्तिमत्त्वाशी सुसंगत ठरली. आपली भाषा, आपलं खाणंपिणं, आपलं संगीत हे दक्षिण भारतापेक्षा उत्तर भारताशी अधिक जोडलेलं आहे. संथ गतीपासून द्रुत लयीपर्यंत खूप मोठी रेंज कथक देतं. त्यामुळे त्यांना कवितेतलं सौंदर्य, तरल भाव आणि तत्त्वज्ञानदेखील कथक मधून मांडता आलं. नव्या वाटा शोधण्यासाठी या माध्यमानं अवसर दिला. कथकपरंपरेत व्यंजना दाखवता येते. परंपरेची तत्त्वं सांभाळत त्याला नवे घटक जोडता येतात. त्यामुळे कथकमध्ये वैविध्य आहे.
रोहिणीताईंनी ‘कथक’ला आधुनिक आयाम दिला गुरूंनी दाखवलेल्या वाटा निष्ठेनं चालताना स्वतःही नव्या वाटा शोधल्या, त्या रुळवल्या. रोहिणीताईंनी या संदर्भात म्हटलं आहे, “इतर कोणत्याही नृत्यशैलींपेक्षा कथक नृत्यशैली अधिक स्वतंत्र आहे आणि स्वातंत्र्य देणारीही आहे...तशीच ती स्वाभाविक आहे… कथकच्या मर्यादांची, नियमांची चौकट लवचिक आहे... आपला वेगळा बाज, आपली ऊर्ध्वरेषांची आगळी अस्मिता निश्चितपणे सिद्ध होण्याइतपत संकेतांची, नियमांची चौकट कथकने पाळली आहे. त्यामुळे सर्जनशीलता जागृत राहावी इतपत मोकळीक, इतपत स्वातंत्र्य नर्तकांना मिळत असतानाही कल्पनांचे ‘पर’ सुटे न होतील,गळूनच न पडतील असा आधार, असा भरवसा ही चौकट देतेच...”
कथकमध्ये प्रादेशिक घटकाचा प्रभावही मोठा आहे... काही लोकगीतंदेखील परिष्कृत होऊन शास्त्रीय दर्जाला पोहोचली आहेत. शास्त्रीय कोणतं आणि परंपरासिद्ध म्हणजे काय याचं अचूक भान रोहिणीताईंना होतं. मुद्रा कशा असाव्यात, शरीर संचालन कसं असावं, हे शास्त्र सांगतं. परंपरा सौंदर्यमूल्य विचारात घेऊन काही गोष्टी सांगते. प्रादेशिकता, सांस्कृतिकता, सामाजिकता, साहित्य वगैरेंचं बेमालूम मिश्रण होत जातं आणि परंपरा सिद्ध होतात. परंपरा संकेत ठरवते. आणि त्यांचं पालन केलं जाणं म्हणजे परंपरा सांभाळणं. प्रत्येक नृत्यशैलीची शरीर वापरायची पद्धत आहे, ती सांभाळून करणं म्हणजे पारंपरिक सत्त्व आणि संवेदनशीलता यांची बूज राखणं. रंगाच्या विविध छटा असतात तशा शरीर वापरण्याच्या छटा आहेत वेगवेगळ्या. विषय-आशयानुसार त्या छटा सुयोग्य रीतीनं वापरण्यानेच परंपरा विस्तारते, समृद्ध होते. भाषेत नवे शब्द येतात, किंवा जुने शब्द नव्या तऱ्हेने वापरले जातात तसंच आहे हे. लोकांना आवडत नाही ते परंपरेत समाविष्ट होत नाही. उदा. बडा ख्याल नृत्यातून करण्याचे प्रयोग झाले, पण त्यांचा प्रवाह होऊन तो परंपरेचा भाग नाही होऊ शकला.
काही काळ शिक्षण झालं की, समाधानी होऊन मिळालेल्या पुंजीवर काम भागवणारे अनेक लोक आहेतच आजूबाजूला. रोहिणीताई मात्र नवं शिकत राहिल्या आणि मांडतही राहिल्या. बहुसंख्य नर्तक तीनताल नाचत. अजूनही नाचतात. तो तर तालांचा राजा आहेच. पण रोहिणीताई नेहमी नव्या शक्यता आजमावून पहात. त्यांना साडेदहा मात्रांचा आडताल पं.मोहनरावजींनी दिला हे खरं, पण त्याची पूर्ण रचना रोहिणीताईंनी बांधली. त्याला ‘चित्ररूपक’ हे नावही त्यांनीच बहाल केलं. हा ताल हे तांत्रिक कसब आहे. ‘रूपक’ तालाच्या मात्रांची दीडपट केलेला हा ताल. साडेदहा मात्रा मुळात अवघड. तिथे मात्रांच्या बारीक अंशांचे तीव्र भान जरुरी असते. त्यामध्ये रोहिणीताई गतीचे विविध प्रकार गोवत. साडेदहाच मात्रांचं वैशिष्ट्य दाखवणाऱ्या एकेका आवर्तनाच्या बंदिशी त्यांनी रचल्या आणि मांडल्या... नाहीतर साडेदहा आणि साडेदहा म्हणजे २१ मात्रा होतात. वादक आडमात्रांचे ताल वाजवत, अजूनही वाजवतात. पण नृत्यात ते नव्हते. आजही ते सर्रास नाही केले जात.
या संदर्भात एक किस्सा सांगितला जातो. भारताच्या स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवाचा शानदार समारंभ दिल्लीत साजरा झाला, तेव्हा दमयंती जोशी, रोहिणीताई आणि सितारादेवी यांना नृत्यसादरीकरणासाठी निमंत्रित केलं होतं. त्या वेळी रोहिणीताईंची ओळख करून देताना सितारादेवी म्हणाल्या की, ‘या नेहमी आडमात्रांचे ताल नाचतात...’, असं सांगतात की त्यांचा सूर काहीसा उपहासात्मक होता, पण तरी त्यातूनही रोहिणीताई आणि प्रयोगशीलता, रोहिणीताई आणि आडमात्रांचे ताल हे समीकरण तेव्हाच रूढ झालं होतं, ही वस्तुस्थिती ठळकपणे दिसतेच!
‘नादविद्या अपरंपार’! ह्या अपरंपार विद्येचा सागरात त्या विहरल्या आणि असंख्य नव्या रचना त्यांनी रसिकांना दिल्या. रोहिणीताईंची विचक्षण बुद्धी अशी की, त्या फ्रान्सला गेल्या, तेव्हा जाताना बोदलेअर या फ्रेंच कवीच्या कवितेवर रचलेले नृत्य घेऊन गेल्या. वास्तविक हा एकोणिसाव्या शतकातला कवी, त्यात पुन्हा पाश्चात्य! अशा वेळी दोन भिन्न संस्कृतींमध्ये कोणतं नातं सापडतं, कोणता धागा जुळतो, त्याचा शोध घेऊन ते नातं त्यांनी कथकमधून मांडलं. चीन दौऱ्यावर गेल्या, तेव्हा तिथला ‘स्कार्फ डान्स’ शिकून आल्या आणि इथे आल्यावर आपल्या मुलींकडून तो करवूनही घेतला! आहार्य अभिनयाचा विचारही त्यांनी नव्यानं केला. कथक नृत्य साधारणपणे ठराविक पोशाखात सादर होतं. रोहिणीताईंनी विषय-आशय यांना अनुरूप धोतीसारखे अनेकप्रकार वापरले. रंगसंगती रचनेला साजेशी आकर्षक पण भडक नव्हे, अशी योजली.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
रोहिणीताईंनी आपल्या सुरुवातीच्या नृत्याबद्दल म्हटलं आहे, “the dances we did in those days were based on light, musical comopositions and easy to appreiciate.” इथपासून ते शुद्ध कथक परंपरेत भरघोस काम करुन ते कथकला नव्या मिती देण्यापर्यंतचा त्यांचा सुदीर्घ प्रवास म्हणजे महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील कथकशैलीच्या परंपरेचा देदीप्यमान इतिहास आहे.
कथकने त्यांना खूप काही दिलं आणि त्यांनीही कथकला दिलं, ही फार उच्च कोटीची देवघेव होती.
अगदी सूत्रबद्धरीतीनं बोलायचं तर...
नृत्याला कलेचं स्थान देताना ‘नाच’ न म्हणता ‘नृत्य’ शब्द योजणं, वापरणं, इथूनच त्यांनी अभिजात मांडणीला सुरुवात केली.
ज्या भूभागात यापूर्वी कधीही नृत्य नव्हतं तिथे कथक भगीरथ प्रयत्नांनी खेचून आणलं. प्रतिष्ठित केलं, प्रस्थापित केलं.
पारंपरिक कथक नृत्यकलेला कालसमांतर आशयाची नवी आशयसंपन्नता बहाल केली. रोहिणीताईंच्या उत्स्फूर्त कल्पनेला विचारपूर्णतेची जोड होती. त्यांनी सर्वार्थानं नृत्य पाहिलं आणि सर्वांगानं फुलवलं. कलेचं उच्च स्तरावरचं, व्यापक, सखोल आणि सौंदर्यशाली वैभव दाखवलं.
ज्येष्ठ संगीतसमीक्षक स्व.श्री.अरविंद मंगरुळकर यांनी म्हटलं आहे, “कथकच्या आधारभूत तत्त्वांपासून विचलित कथकचे कथकपण कायम ठेऊन त्यांनी कथकच्या रूपबंधाचा सातत्याने शोध घेतला... रूपबंधाचे केंद्रवर्ती स्थान लक्षात घेऊन कथकला एकाच वेळी परंपरेचा घरंदाजपणा आणि नवतेचा ताजेपणा देण्याचा यशस्वी प्रयत्न केला.”
‘रोहिणी निरंजनी’ - वंदना बोकील-कुलकर्णी
राजहंस प्रकाशन, पुणे
पाने - ३१०
मूल्य – ४०० रुपये.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment