अजूनकाही
ज्येष्ठ लेखक डॉ. सुधीर रा. देवरे यांची ‘सोन्याची शाळा’ ही कादंबरी लवकरच लोकवाङ्मय गृहातर्फे प्रकाशित होत आहे. त्यानिमित्तानं या कादंबरीतल्या एका प्रकरणाचा हा संपादित अंश…
..................................................................................................................................................................
दिवाळीच्या दिवसांची चाहूल लागली की, फटाके फोडण्याच्या तयारीसोबतच आकाशदिवा तयार करायची लगबग गावात सर्वत्र सुरू होई. दिवाळीच्या आधीच सहामाही परीक्षा होऊन शाळेला सुट्ट्या लागत. त्यामुळे दिवाळी अगदी समरसून साजरी करायला सोन्या उतावीळ झालेला असायचा. चान्नी, इमान, गोल डबा असे अनेक प्रकारचे आकाशकंदील घरोघरी तयार केले जात. आकाशकंदील कसे बनवतात हे गावात, जवळपासच्या थोराड मुलांना कंदील बनवताना सोन्या लहानपणापासून पाहत आला होता. कोणी कंदील बनवत असताना त्यांच्या ओट्यावर तो जाऊन बसत असे. अमूक एखादा माणूस वा त्याच्यापेक्षा पुढच्या इयत्तेतला थोराड मुलगा कंदील कसा बनवतो, हे तो ध्यान देऊन मनात साठवीत असे. काही इथं काही तिथं असं सर्वत्र थोडं थोडं पाहून शिकून झाल्यावर आपल्याला आता चान्नी नाहीतर इमान हमखास बनवता येईल, असा विश्वास सोन्याला वाटू लागला. पण त्याला पहिल्यांदा चान्नी म्हणजे चांदणी बनवायची होती. विमानापेक्षा चान्नी बनवणं सोप होतं. चान्नीला कामड्या आणि रंगीत कागदही कमी लागणार होते.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
आता सोन्याची आठवीची सहामाहीची परीक्षा संपली. या सुट्टीत आपण आकाशकंदील बनवायचा, हे त्याने आधीच नक्की करून ठेवलं होतं. सुट्टी लागताच दुसर्या दिवशी दुपारी सोन्याने आपल्या मागच्या दारच्या वाड्यातून टोकराच्या काही कामड्या शोधून काढल्या. खोलीतला इळा घेतला आणि आकाशदिव्याच्या चान्नीसाठी कशा कामड्या लागतील, त्या इळ्याच्या सहाय्याने तयार करू लागला. एका फुटाच्या आकाराच्या बारीक बारा काड्यांच्या कामड्या त्याने तासून तासून तयार केल्या. आता बिल्लासभर आकाराच्या सहा त्याच जाडीच्या कामड्या तयार करायला घेतल्या. ह्या कामड्या तयार करताना कामडीची शिळीक त्याच्या हाताच्या बोटात घुसली. तो रस्ताळला. ती दुसर्या बोटाने हळूच काढून आणि बोटाबाहेर येणार्या रक्ताकडे दुर्लक्ष करून त्याने आपले काम सुरू ठेवले. पण थोडी शिळीक बोटात रूतली असल्याचं त्याच्या ध्यानात येत होतं. कामडीच्या बारीक तसूला शिळीक म्हणतात. ती हातापायात घुसली तर रूतलेल्या काट्यापेक्षाही आत जास्त ठसठसते.
बिल्लासभर अशा आडव्या कामड्याही तयार करता करता तो खूप दमला. पण आतून आनंद होत त्याने काम बंद केले नाही. तो मायकडे पक्का दोरा घ्यायला घरात गेला. आज नाहीतर उद्या संध्याकाळपर्यंत आपला आकाशदिवा तयार होईल आणि उद्या तो आपण आपल्या दारासमोर लावायचाच, असा त्याने मनातल्या मनात निश्चय केला होता.
दोर्याच्या तुकड्यांनी त्याने आधी तीन तीन कामड्या बांधून कामट्यांचे चार त्रिकोण तयार केले. नंतर एका त्रिकोणावर वेगळ्या पद्धतीने दुसरा त्रिकोण ठेवल्याने कामट्यांचा आता छटकोन तयार झाला. तो छटकोन एकजीव करण्यासाठी दोर्यांच्या तुकड्यांनी ते पुन्हा तीन ठिकाणी बांधले. तशाच पध्दतीने दुसरा छटकोन बनवला. असे दोन छटकोन, आता त्या बिल्लसभर सहा काडक्यांनी आडवे जोडायचे होते. तेही त्याने न थकता न थांबता केले. कामट्यांची चांदणी तयार झाली होती. पण ती पक्की नव्हती. डुगडुग हलायची. आकाश दिव्याचा सांगाडा असा डुगडुग हलायचं कारण त्याने आपल्या ओट्यावरूनच मॅट्रिकला शिकत असलेल्या आपल्यापेक्षा थोराड नामदेवला विचारलं. नामदेव म्हणाला, ‘वरतीन घोट्या कागद चिटकाडा का मंग त्या दोरासना सांधा पक्का व्हयी जातंस. तवपावत चान्नी आशीच ढील्ली वाटस. घोट्या कागद चिटकाडशीना तू, तथळ दोराना सांधासले जरासा जास्त खळ लायी दे’.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
हे ऐकल्यावर आपण बरोबर आहोत, याचा आनंद सोन्याला झाला. आता त्याने पणती ठेवण्यासाठी पुन्हा नवीन छोट्या चार काड्या तासून आकाशदिव्याची खालची बाजू कोणती राहील हे ठरवून बांधल्या. हे करताना त्याने पणतीचे माप घेऊन काड्या बांधल्या आणि बांधून झाल्यावर आत पणती ठेवून पाहिली तर त्या चौकोनात पणतीही फिट्ट बसली. ज्या कामडीला आकाशदिवा टांगला जाणार होता, तिथे तो त्याने एका हाताने उचलून पाहिला. पणती ठेवली तर तिरपी होईल का, याचा अंदाज घेतला. कंदील बरोबर वर उचलला गेला. म्हणजे पहिल्याच प्रयत्नात सर्व त्याच्या मनाप्रमाणे ठाकठीक होत होतं.
आता त्याने आकाशदिव्याचा तो सांगाडा घराच्या एका कोपर्यात जिथं कोणी जाणार नाही, कोणी धक्का लावणार नाही, अशा ठिकाणी ठेवला. दुसर्या दिवशी घोट्या कागद कंदिलाला चिकटवायचं ठरवलं. वेगवेगळ्या रंगांचे घोटे कागद दुकानातून आणावे लागणार होते. चान्नीच्या आकारात कापून ते चिटकावे लागणार होते. नंतर चान्नी टांगण्यासाठी काठी आणि दोर्याची गुंडी लावावी लागणार होती. हे त्याने दुसर्या दिवसावर ढकललं आणि आता एका बोटात कामडीची जी शिळीक भरली होती ती सुईने बाहेर काढण्याचा प्रयत्न तो करत होता. कारण ती शिळीक बोटात ठसठसत होती. तिचं कनोरं बोटात मुडलेलं होतं.
दुसर्या दिवशी सकाळी उठून आपण काल तयार केलेला आकाशदिवा जागेवर आहे की नाही, याची त्याने पहिल्यांदा खात्री करून घेतली. नंतर तो चहा पिऊन पुढच्या कामाला लागणार होता. अगोदर त्याने दुकानातून घोट्या कागद विकत आणायला मायकडे पैसे मागितले. गावातले काही लोक आकाशदिव्यांना बेगड कागद लावत असत. बेगड कागद घोट्या कागदापेक्षा महाग होता, म्हणून बहुतेक जण घोट्या कागदच वापरायचे. जे लोक आकाशदिव्याला बेगड वापरत त्यांचा आकाशदिवा आकर्षक आणि जास्त उजेड देतो, असं पाहणार्याला वाटायचं. सोन्याने मात्र आधीच ठरवलं होतं की, आपल्या आकाशदिव्याला घोट्या कागदच वापरायचा. मायने हो नाही करता करता त्याला तीस पैसे दिले. त्यातून त्याने गुलाबी, पिवळा आणि निळा असे तीन वेगवेगळ्या रंगांचे कागद आणलेत.
..................................................................................................................................................................
उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...
हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal
................................................................................................................................................................
सोन्याने चांदणी आडवी करून गुलाबी कागदावर ठेवली. चांदणीच्या मधल्या भागाचे माप घेत त्या कागदावर त्याने पेन्सिलीने खुणा केल्या. मग त्या आकाराचे दोन गुलाबी कागद कात्रीने कापून घेतले. आता चान्नीच्या एका छोट्या त्रिकोणाचे माप घेत सोन्याने पिवळ्या कागदाचे बारा छोटे छोटे त्रिकोण केले. आता राहिले चान्नीच्या मधल्या भागाचे माप. ते माप घेऊन निळ्या रंगाच्या कागदाचे काप घेतले.
मायला त्याने खळ करायला सांगितला. गव्हाच्या पिठात पाणी टाकून चुल्ह्यावर चाळून थोडा वेळ पिठल्यासारखा गदकवला की, खळ तयार होतो. गव्हाच्या पिठाचा असा खळ चिकट असल्यामुळे कागद डकवायला तो डिंकासारखं काम करतो. मायने त्याला खळ तयार करून दिला. काप घेतल्याप्रमाणे त्याने सर्व कागद आकाशदिव्याला चिटकवले. दोरा बांधलेल्या सांध्यांना जास्त खळ लावला. पणती ठेवण्याच्या जागेखाली आणि वरून पणती ठेवण्यासाठी – दोरी बांधण्यासाठीच्या जागा कागद न चिटकवता सोडून दिल्या. आता चान्नी पूर्णपणे तयार झाली होती. चान्नीचा आकार थोडा वाकडा वाटत असला आणि कागद चिटकवतानाही कागदाला कुठं कुठं थोड्या गुड्या पडलेल्या दिसत असल्या तरी सोन्याने तयार केलेल्या चान्नीला चान्नीच म्हणता येईल, असा कंदील तयार झाला होता. विशेष म्हणजे सोन्या व्यतिरिक्त कोणाचीही मदत नसलेला तो आकाशकंदील तयार झाल्यामुळे त्याला स्वत:ला खूप आनंद मिळत होता.
चिटकवलेले कागद आता वाळवण्यासाठी त्याने तो आकाशदिवा कोणाचा धक्का लागणार नाही, अशा कोपर्यात ठेवून तो पुढच्या तयारीला लागला. आकाशदिवा टांगण्यासाठी त्याने लांब अशी दोरी शोधली. गावातल्या आबा शिंप्याकडून एक रिकामी दोर्याची गुंडी मागून आणली. ती गुंडी एका काठीवर फिरण्यासाठी काठीला चूक ठोकली. चुकीमध्ये गुंडी टाकून ती चुकीबाहेर निघू नये म्हणून चुकीच्या टोकाला दोरा गुंडाळून अडथळा निर्माण केला. (लहान आकाराच्या खिळ्याला चूक म्हणतात.) ती काठी आणि दोरी तो धाब्यावर घेऊन गेला. गुंडीचा भाग पुढच्या वरंडीवरून थोडा पुढे करून काठीच्या मागच्या टोकावर काही विटा आणि दगडी ठेवल्या. धाब्यावर कधीच्या काही दगडी पडून होत्या त्या आता कामाला आल्या. काठी हलत तर नाही ना याची खात्री करून घेतली. आकाशकंदील आणि तिच्यातल्या पणतीच्या वजनाने काठी तिरपी तर होणार नाही ना, याचा आपल्या हातानेच अदमास घेतला. असं होऊ नये म्हणून चुकीचं दुसरं टोक जरा वर राहील, अशी थोडी तिरपी काठी पक्की केली. गुंडीवरून दोरी सोडून दोरीचे दोन्ही टोके त्याने खाली सोडून दिले. एवढे झाल्यावर तो पुन्हा शेजारून मागून आणलेल्या साट्यावरून (शिडीवरून) धाब्यावरून खाली उतरला.
खाली येताच त्याने आकाशदिवा दोरीच्या एका टोकाला बांधला आणि दोरीचे दुसरे टोक ओढले. गुंडीवरून दोरी फिरत आकाशदिवा वर गेला. कंदील थोडा तिरपा दिसतो, असं लक्षात आल्यावर त्याने तो आकाशदिवा दोरी ढिली सोडत खाली आणला. बांधलेली दोरी मध्यभागी नव्हती. ती मध्यभागी बांधली. आकाशदिवा पुन्हा वर नेला. आता सरळ दिसत होता. दोरीचं टोक त्याने खुंटीला बांधून दिलं. आताचा पणतीशिवायचा रीकामा आकाशदिवा घराला टांगलेला होता. संध्याकाळी पणती पेटवून आत ठेवली की झालं.
आता तो पणतीच्या तयारीला लागला. मायकडून वाता वळवून घेतल्या. पणतीमध्ये दोन वाता ठेवल्या. माय म्हने, ‘येकेरी वात घिऊ नही. दोन घेवा.’ म्हणून दोन वातांचा पिळ करून तयार केलेली एक वात पणतीत ठेवली. पणतीत गोडतेल भरलं. आतापर्यंत संध्याकाळ झालीच होती. पणती आणि काडीपेटी घेऊन सोन्या बाहेर आला. खुंटीची दोरी सोडून कंदील खाली आणला. जमिनीवर टेकू दिला. पणती पेटवून आल्हाद वरून आकाशकंदिलात ठेवली. पणती ठेवण्याचा खालचा चौक त्याने पणतीचे माप घेऊनच तयार केला असल्यामुळे पणती छान बसली. आतून आकाशदिवा उजळून निघाला. दोरी ओढत त्याने आकाशदिवा वर नेला. आकाशदिवा पन्हाळजवळ जाताच त्याने ती दोरी ताणून खुंटीला बांधली. हात सोडला.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
सोन्याच्या घरासमोर लागलेला हा त्याच्या घराच्या आयुष्यातला पहिला आकाशकंदील होता. आजपर्यंतच्या दिवाळींना बाहेर सान्यात पणती लावली की, मायचं काम संपायचं. आकाशकंदिलाचा उजेड ओट्यावर जेमतेमच पडत होता. सान्यात लावलेल्या पणतीच्या उजेडापेक्षाही कमीच. पण दुरून पाहताना आपल्या घराला आकाशकंदील लावला आहे हे कोणाच्याही लक्षात येत होतं, हे सोन्याला जास्त महत्त्वाचं वाटलं.
गावात वीज नव्हती. तरी काही व्यापारी आणि नोकरदार लोक तालुक्याहून आयता आकाशदिवा आणायचे आणि त्यात पणती ठेवायचे अथवा वेगळ्या प्रकारची मेनबत्ती ठेवायचे. पण आयते आकाशकंदील गावात दोन चार घरासमोरच पहायला मिळायचे. बाकी हाताने बनवलेलेच आकाशकंदील असत. सोन्याने आपल्या घरासमोर नुसता आकाशकंदीलच लावला असं नाही तर तो ही त्याने स्वत: बनवलेला आकाशकंदील लावला याचा त्याला खूप आनंद होत होता. जो आनंद आजपर्यंत त्याला कशानेच झालेला नव्हता. सोन्याचा आनंद गगनात मावत नव्हता. ‘आनंद गगनात न मावणे’ हा वाक्प्रचार त्याने शाळेत अभ्यासला होता. त्याचा अर्थ सांगून वाक्यात उपयोगही त्याने सहामाही परीक्षेत केला होता. पण आनंद गगनात न मावणे म्हणजे काय, हे तो आज पहिल्यांदा ह्या आकाशकंदिलाच्या निमित्ताने स्वत: अनुभवत होता.
‘सोन्याची शाळा’ - डॉ. सुधीर रा. देवरे
लोकवाङ्मय गृह, मुंबई
मूल्य – २५० रुपये.
.................................................................................................................................................................
डॉ. सुधीर रा. देवरे
drsudhirdeore29@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment