अजूनकाही
‘काळ सारावा चिंतने’ ही तुकोबांची उक्ती सर्वश्रुतच आहे. कोणताही संवेदनशील माणूस आपल्या सभोवतालच्या परिस्थितीचे, त्यात होणाऱ्या बदलांचे, सांस्कृतिक स्थितीगतीचे चिंतन करत असतो. किंबहुना या परिवेशाचा प्रभाव आणि परिणाम अशा व्यक्तीवर होणेही स्वाभाविक असते. अशा अनुभवांचे कलात्म रूप, त्याचे प्रभावी प्रत्यंतर म्हणजे श्रीकांत देशमुख यांची ‘कोवळे वर्तमान’ ही कादंबरी होय. स्वातंत्र्योत्तर कालखंडातील शिक्षणाचे, सामाजिक परिस्थितीचे, त्यातील संघर्षाचे, जातवास्तवाचे, आजच्या चळवळीच्या स्थितिगतीचे आणि त्यातील मूल्यात्मक पडझडीचे कलात्मक चित्रण या कादंबरीने प्रभावीपणे केले आहे.
साहित्य अकादमी प्राप्त कवी, लेखक श्रीकांत देशमुख हे साहित्यसृष्टीतील आजचे एक आघाडीचे नाव. यापूर्वीच्या त्यांच्या ‘पिढीजात’ कादंबरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आणि काहीतरी सकस वाचण्याची अनुभूती दिली होती. सहकार, प्रशासन, राजकारण यातील संघर्ष शोषणाचे प्रभावी दर्शन जसे ‘पिढीजात’मध्ये आले होते.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
या पार्श्वभूमीवर समाजवास्तवाचा मोठा परीघ व्यापणारी ‘कोवळे वर्तमान’ ही दुसरी कादंबरी नुकतीच प्रकाशित झाली आहे. कामाजी कार्लेकर या प्राध्यापक नायकाच्या जीवनानुभवातून आजच्या शिक्षणातील बदलल्या जीवनजाणिवा, शिक्षणाकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन, शिक्षण संस्थांमधील अनाचार, भ्रष्टाचार, शिक्षणासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रास आज आलेले बाजारू स्वरूप, त्यातील दंभाचार, सामाजिक बांधीलकीच्या व सेवेच्या मुलाम्याखाली लपलेल्या नेतृत्वाचा बेगडी चेहरा, समाजातील न टळलेले जातवास्तव, त्याची खोलवर रुजलेली पाळेमुळे, विद्यापीठीय संशोधनातील संवगता, खोटी, प्रतिष्ठा, वाढता व्यक्तिवाद, आत्मगौरव, त्याचे उदात्तीकरण आणि तुष्टीकरण, सत्ताकेंद्राच्या जवळ असणारी माणसे आणि त्यांची स्वार्थपरायणता, या वातावरणात अलिप्त, प्रामाणिक, अभ्यासू, स्वाभिमानी माणसांचे होणारे शोषण आणि त्यांची या क्षेत्रातील वंचना, अशी बहुआयामी पार्श्वभूमी या कादंबरीला लाभली आहे. त्यामुळे ती आजच्या शिक्षण व समाजवास्तवाचा तलस्पर्शी शोध घेते.
काकासाहेब आणि गोकुळदास हे या कादंबरीतील जशी दोन टोके, तशीच प्राचार्य घाटपांडे आणि प्राचार्य फडके हेही दोन ध्रुव. या दोन बिंदूत पडत गेलेले वैचारिक अंतर, त्यातील बहुस्तरीय पदर या कादंबरीतून अत्यंत कलात्मकतेने आविष्कृत झाले आहेत. मागील काही दशकातील महाविद्यालये ही प्राचार्यांच्या नावाने ओळखली जायची. आता या पदाचे झालेले अवमूल्यनही या कादंबरीने अधोरेखित केले आहे. शिक्षण व्यवस्थेतील परिवर्तनाचा हा आलेख बरेच काही सांगणारा आहे.
मराठी कादंबरीला लाभलेली महाविद्यालयीन पार्श्वभूमी तशी नवी नाही. यापूर्वीच ‘चांगदेव चतुष्ट्य’मधून ती चित्रित झालेली असल्याने पुन्हा याच विषयावर कादंबरी लिहिणे कोणत्याही लेखकांसाठी अतिशय आव्हानात्मक आणि जोखमीचे होते. हे आव्हान स्वीकारून श्रीकांत देशमुख यांनी पुन्हा नव्याने मराठी कादंबरीतून महाविद्यालयीन विश्वातील समकालीन वास्तव नव्या रूपात पेश केले आहे. ही कादंबरी वाचताना कोणतेही पूर्वसंदर्भ आठवत नाहीत, ही या साहित्यकृतीची जमेची बाजू.
जीवन हे नेहमीच प्रवाही असते, जागतिकीकरणानंतर तर मानवी जीवनात बहुस्तरीय परिवर्तन झाले. त्याला कोणतेही क्षेत्र अपवाद नाही. त्यामुळे या कालखंडात उच्च शिक्षणक्षेत्रात व पर्यायाने महाविद्यालयीन विश्वातही आमूलाग्र बदल झाला. शिक्षणाला लाभलेली खाजगीकरणाची, व्यावसायीकरणाची किनार, हे आजच्या शिक्षण क्षेत्रातील भीषण वास्तव आहे. खाउजा संस्कृतीने या क्षेत्रालाही ग्रासले आहे. त्यामुळे हे नवे अनुभव पुन्हा साहित्यात मांडले जाणे गरजेचेच होते, परंतु आजवर ज्या लेखकांनी मांडलेल्या अनुभवानंतर आपण काय नवे लिहिणार? त्यात अनुकरणाचा, प्रेरणाप्रभावांचा प्रश्न या संदर्भात अनेक लेखकांना सतावणाराच होता. मराठी कादंबरीने आता महाविद्यालयाच्या बाहेर, जीवनातील व्यापक जीवनानुभव कवेत घेऊन तिच्या कक्षा विस्तारित केल्या पाहिजेत. अशा क्रिया-प्रतिक्रियाही ऐकिवात होत्याच. त्यामुळे या विषयावर या प्रस्थापित लेखकांच्या नंतर लिहिण्यास अनेक नवे लेखक बिचकत होते, त्यांची ही कोंडी फोडण्याचे, मोठे काम या कादंबरीने केले आहे.
..................................................................................................................................................................
उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे आणि तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधून मधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसे किणीकरसुद्धा वळत राहिले, पण एकंदर कवितेचा नूर बघितला तर किणीकर खय्यामपेक्षा अध्यात्मात फार खोल उतरले होते. त्यांनी संपूर्ण अध्यात्मविचार पचवला होता. प्रचितीचा दावा किणीकर करत नाहीत, पण त्यांनी सर्व भारतीय अध्यात्मविचार मन लावून समजून घेतला होता.
हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal
................................................................................................................................................................
शिक्षण, संशोधन, समाज, पुरोगामी चळवळ यातील अनेक हिणकस गोष्टी आणि त्यातील उथळ जाणिवांचे दर्शन इथे घडते. महात्मा फुले, महात्मा गांधी, शाहू महाराज, जयप्रकाश नारायण, साने गुरुजी, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचाराने भारलेल्या एका पिढीने अत्यंत निष्ठेने, त्यागाने, समाज- जीवनातील विविध क्षेत्रात देदीप्यमान कामगिरी करून, एक आदर्श निर्माण केला. या प्रेरणेतूनच साठ नंतरच्या दशकांत अनेक सामाजिक चळवळी, शिक्षणसंस्थांचे जाळे महाराष्ट्रभर विणले गेले. परंतु दुर्दैवाने त्या नंतर आलेल्या चळवळीतील व्यक्तींनी, या नेत्यांच्या नावाचा आधार घेऊन, त्यांच्या विचारांचा पराभव केला. ही नैतिक, सामाजिक मूल्यांची झालेली पडझड आणि तिला लागलेले व्यक्तिवादाचे ग्रहण, या कादंबरीतील आशयातून उजागर होते.
चळवळीतील दोन पिढ्यांमध्ये पडलेले वैचारिक अंतर, त्यातील भ्रमनिरास या वास्तवाचेही मर्मग्राही चिंतन ‘सत्य-असत्याशी मन केले ग्वाही’ या उक्तीप्रमाणे लेखकाने या कादंबरीत अत्यंत धाडसाने मांडले आहे. परंतु हे वास्तव समजत असूनही, दुर्दैवाने तिला स्वीकारण्याची अपरिहार्यता दाखवावी लागते, या भीषण वास्तवाचे दर्शनही काकासाहेब आणि गोकुळदास या दोन व्यक्तिरेखांच्या निर्मितीतून आणि त्यांच्या जीवनदर्शनातून या कादंबरीत आविष्कृत झाले आहे. एका अर्थाने सामाजिक चळवळीमध्ये प्रवेश केलेल्या आणि तिला पोखरणाऱ्या दांभिकतेचे, अनाचाराचे प्रभावी सूचनच या कादंबरीत येते. शैक्षणिक संस्था म्हणजे खाजगी मिरासदारी, असे शिक्षणाचे झालेले भांडवलीकरण म्हणजे शिक्षण व्यवस्थेला लागलेली कीडच.
प्रा. कामाजी कार्लेकर हा या कादंबरीचा नायक, नुकताच एम.जी.एम. कॉलेजमध्ये तो प्राध्यापकीस सुरुवात करतो. उणेपुरे एक वर्षाचाच त्याचा हा शैक्षणिक जीवनानुभव इथे आला आहे. परंतु त्या अनुभवास लाभलेली समाजविश्लेषणाची व चिंतनाची डूब हे या कादंबरीचं सर्वांत महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. हे चिंतन प्रतीकात्मक किंवा रूपकात्मक पातळीवर अभिव्यक्त होत नाही, तर ते सहजगत्या येते. पाण्यात पाणी मिसळून जावे, तसे ते आपोआप आशयाचा एक भाग होऊन जाते. चिंतन ही एक वृत्ती, तो जीवनधर्म म्हणूनच त्यांच्या लेखनातून झिरपतो. यात कोणतीही दार्शनिकता, अभिनिवेश जाणवत नाही. त्यामुळे सकाळच्या कोवळ्या उन्हाप्रमाणेच त्यांचे हे चिंतन वाचकांनाही चिंतनास प्रवृत्त करते. संतविचारांची आणि आधुनिक काळातील विचारवंत महात्मा फुले, महात्मा गांधी, कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षि शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साने गुरुजी यांच्या विचारांची प्रभा त्यांच्या या चिंतनातून दिसते. म्हणूनच सतीश बडवे यांनी या कादंबरीची पाठराखण करताना म्हटले आहे – ‘श्री.व्यं. केतकर ते भालचंद्र नेमाडे या दोन अक्षांमधील समाजशास्त्रीय चिकित्सेच्या पटाशी नाते जोडणारी ही कादंबरी एक प्रभावी चिंतनशील संभाषित आहे.’ ते यथार्थ वाटते.
श्रीकांत देशमुख हे मूलतः कवी असल्याने त्यांच्या निवेदनात, विश्लेषणात, वर्णनात पसरटपणा, पाल्हाळ जाणवत नाही. त्यामुळे कथनातील सहजता, नेमकेपणा आणि प्रवाही निवेदन, त्यातील अल्पाक्षरत्व व अर्थ बाहुल्य हे त्यांच्या कथनाची सामर्थ्य आहेत. त्यांची ही शैलीसुबकता या कादंबरीतून पुन्हा ठळक झाली आहे. काव्यशैली वरून जशी एखाद्या कवीची रचना ओळखता येते, तशीच श्रीकांत देशमुख यांच्या कथन शैलीवरून या लेखकाची ओळख व्हावी अशी स्वतःची खास, स्वतंत्र शैली, त्यांनी प्रतिष्ठित केली आहे. त्यांच्या लेखनातील प्रगल्भता आणि विविध विचार प्रवाहांना समजावून घेण्याची स्वीकारशीलता आणि तटस्थवृत्तीने त्यातील सत्यान्वेषण मांडण्याची संयमित भूमिका, हेही त्यांच्या अभिव्यक्तीचे प्रमुख लक्षण आहे.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
एकूणच त्यांच्या लेखनाच्या मुळाशी असलेला समष्टीबद्दलचा सहानुभाव, माणसाच्या जगण्याची, त्यांच्या दुःखावर फुंकर घालण्याची वृत्ती यामुळे ही कादंबरी सवंग रंजनात अडकत नाही. यांचे उत्तम उदाहरण म्हणजे त्यांच्या कादंबरीत येणारे लैंगिक संदर्भ. स्त्री-पुरुष संबंधातील नग्नता, त्यातील भडकता याचे दर्शन त्यांच्या दोन्ही साहित्यकृतीतून घडले नाही. याबाबतचा अत्यंत संयमित आविष्कार, त्यांचे संसूचन त्यांनी केले आहे. जिथे आशयाची, अपरिहार्यता असेल अशा, प्रसंगी या संबंधाचे सूतोवाच त्यांनी निर्भिडपणे केले आहे. परंतु या संदर्भाचा विस्तार ते वाव असूनही करत नाहीत, याची जाणीव प्रस्तुत कादंबरीतून होते.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
याचा अर्थ या संबंधातील वास्तवाला ते टाळतात असा नसून, इथेही त्यांची समंजस जाणीवच प्रकर्षाने प्रभावी ठरते. कारण अशा विषयबहुल कामुक संदर्भाने त्यांच्या लेखनातील समाजचिंतनास निश्चितच बाधा निर्माण झाली असती. गोळीबंद आशय देण्यास त्यांच्या कादंबरीने प्राधान्य दिल्याने या मोहात त्यांची लेखणी अडकत नाही. म्हणूनच त्यांच्या कादंबरीतील चिंतन वेगळ्या उंचीवर जाते त्याला सामाजिक चिकित्सेची मिती लाभते. तिच्यातून समूहजीवनाच्या निकोपतेची आंतरिक तळमळ उत्कटतेने व्यक्त होते. एकुणातच श्रीकांत देशमुख यांच्या कादंबरीला लाभलेला हा समाजचिंतनाचा पैस, त्यांच्या साहित्यकृतीला उजळ करणारा आहे. म्हणूनच ‘कोवळे वर्तमान’ म्हणजे शिक्षण, समाज-संस्कृतीचे चिंतनसुक्तच जणू! कोणतीही श्रेष्ठ साहित्यकृती ही वाचकांच्या कल्पनेला, त्यांच्या प्रतिभेला आवाहन करत असते. त्यासाठी अनेक जागा, मोकळा अवकाश लेखकाने सोडलेला असतो. वाचकांसमोर चिंतनाचा मोठा अवकाश ठेवून ही कादंबरी संपत नाही, तर वाचकांच्या मनात ती नव्याने सुरू होते. या कादंबरीचे हे मोठे यश आहे.
‘कोवळे वर्तमान’ - श्रीकांत देशमुख
राजहंस प्रकाशन, पुणे
पाने - ४०५
मूल्य - ५०० रुपये.
..................................................................................................................................................................
लेखक डॉ. अशोक लिंबेकर संगमनेर महाविद्यालय (संगमनेर) इथं मराठी विभागप्रमुख आहेत.
ashlimbekar99@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment