‘भूप’ (२००४), ‘आर्त’ (२००८) आणि ‘शिल्प’ (२०११) या तीन संग्रहांत मिळून आजवर १८ कथा …इतकी मोजकी कथानिर्मिती असूनही लक्ष वेधून घेणारी लेखिका म्हणून आपण मोनिका गजेंद्रगडकर यांना ओळखतो. आपल्या कथांमधून मानवी नात्यांच्या अनेकविध शक्यतांचा शोध त्या घेत आल्या आहेत. तपशिलांच्या बारकाव्यांसह आशयाचे अगदी सूक्ष्म पदर उलगडत त्यांच्या कथा संथपणे, विलंबित गतीने पुढे सरकतात. चार-दोन जोरकस स्ट्रोक्स, रंगांचे फटकारे मारून चित्र रंगवण्यापेक्षा तुलनेनं मोठ्या कॅनव्हासवर बारीक कुसरीचं काम करणं, घाई-गडबड न करता चैनदारीनं चित्र रंगवणं, हा त्यांच्या पिंडाचा भाग आहे. त्यामुळेच २०११नंतर तब्बल १० वर्षांनी त्यांचा तीन दीर्घकथांचा संग्रह ‘त्रिपर्ण’ आपल्यासमोर आला आहे.
या संग्रहात ‘वंश’, ‘फ्लेमिंगो’ आणि ‘सारांश’ अशा तीन दीर्घकथा आहेत. तिन्ही कथांमध्ये निर्णायक घटक आहे तो परदेश. ‘आपलं’ आणि ‘पर’ या गोष्टी कशा ठरतात, अगदी लहान वयातही त्याची सूक्ष्म जाणीव कशी काय दिसते, माणसाच्या आयुष्यात ती कशी उलथापालथ घडवते, याचा अगदी वेगळ्या पातळीवरचा अनुभव या कथा देतात.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
‘वंश’ या पहिल्याच कथेतील ज्योतिका-ज्यो या नायिकेचा संघर्ष दोन पातळ्यांवर चालू आहे. गॅब्रिएल या अत्यंत बुद्धिमान कृष्णवर्णीय प्राध्यापकाच्या प्रेमात पडून ती लग्न करते, ते आपल्या आईवडिलांचा विरोध पत्करून. ज्योशुचा जन्म होतो. तो रंगरूपानं अगदी सहीसही वडिलांसारखा. ज्योच्या मनात कधीच न आलेला रंगाचा आणि त्यातून प्रगटणारा वंशाचा विचार गॅब्रिएलच्या मनात मात्र थैमान घालतो. तिला आपला प्रश्न, आपली वेदना कधीच समजू शकणार नाही, असं वाटून ज्योच्या उत्कट प्रेमाला तो दयेचे आणि उद्धारकर्तीचे रंग विनाकारण चिकटवतो. आणि परिणती त्यांच्या विभक्त होण्यात होते. ज्योशुला घेऊन ज्यो भारतात परतते, ती अमेरिकेतील हा वंशाचा आणि वंशद्वेषाचा विचार मुलाच्या मनात उगवूच नये, म्हणून. त्यामुळे त्याही पातळीवर तिचा संघर्ष सुरू असतो. तिकडे गब्रिएल इझाबेला या कृष्णवर्णीय कार्यकर्तीशी लग्न करतो. त्यांना एक मुलगाही होतो.
पण इथेही परिस्थिती काही फार वेगळी नसते. घरात ज्योतिकाची आई आणि बाहेर शाळेतली मुले, कोणीच ज्योशुला त्वचेचा रंग विसरून सामावून घेऊ शकत नाहीत. अगदी लहान शाळकरी मुलेही त्याला वेगळं पाडतात. जिथं प्रौढ माणसांच्या नात्याला प्रेमासारखी ताकद आणि विचार-विवेक-बुद्धिमत्ता पुरेशी ठरली नाही, तिथे लहानग्यांच्या मनातला हा भेदाचा मुद्दा कसा पुसून टाकणार... प्रेमाच्या पातळीवर पराभव पत्करावा लागला म्हणून खंतावलेली ज्योतिका या पातळीवर एक नवा झगडा करत असताना तिला अमेरिकेतली जीवश्च मैत्रीण डोरोथी कॅन्सरने आजारी असल्याचं समजतं, म्हणून ज्योशुला घेऊन ती अमेरिका गाठते.
गॅब्रिएलला मुलाला भेटावं, असं वाटत असतं आणि ज्योशुलाही बापाबद्दल कुतूहल असतंच. ज्योतिका मात्र कुठल्याशा भीतीनं ही भेट टाळत राहते. आजारात डोरोथी तिला तिच्या प्रेमाविषयी सांगते. कृष्णवर्णीय माणसावर केलेलं प्रेम तिला निभावता आलं नाही, याची कबुली ती देते. आणि ज्योशुला वडिलांच्या भेटीपासून वंचित ठेवू नको, म्हणून सांगते. अखेरीस ज्योतिका त्या बापलेकाला भेटवते. तिला ज्याची भीती होती तेच घडतं. वडील, त्यांचं नवं कुटुंब ज्योशुला क्षणात आपलं वाटतं... ही कुठली आंतरिक ओढ, इथंही आता पराभूत होणार का आपण... हा ज्योतिकाचा आणखी एक संघर्ष आहे. त्याला निर्णायक उत्तर नाहीच. लेखिका ते देतही नाही.
या कथेतील डोरोथी आणि तिचं अत्यंत आत्मप्रेम, तिचं त्वचाप्रेम यांच्या तुलनेत ज्योतिका माणूस म्हणून कितीतरी अधिक वरच्या इयत्तेत आहे, हे जाणवतं. इझाबेलाची सहजता, सारा, ज्योतिका आणि डोरोथी यांच्यातलं मैत्र यांचा हृद्य पदर या सर्व घडामोडींना आहे. माणसातला माणूसपणाचा बंध बळकट आहे, हे दिसत असतानाच ज्योतिकाच्या प्रेमाला, मातृत्वाला आव्हान देत समोर ठाकलेल्या या वंशभेदाचं, द्वेषाचं जीवघेणं सावट पसरून राहतं आणि जीव अक्षरशः कळवळतो. या संग्रहातली ही सर्वांत जमून आलेली कथा.
‘फ्लेमिंगो’ कथेतला संघर्ष आणखी वेगळा आहे. अमेरिकन मुलीशी लग्न करून सुजय भारतातली नातीच विसरून गेला आहे, म्हणून दुःख आणि राग मनात ठेवून इथं- भारतात आपलं आयुष्य रेटत राहणाऱ्या त्याच्या आईवडिलांचा - जयंतराव आणि लताबाई - यांचा झगडा उच्च पातळी गाठतो, तो सुजयच्या आकस्मिक मृत्युनंतर. इथून आपली मुळं सोडवून दूर गेलेल्या परदेशस्थ मुलांच्या आईबापांची घालमेल त्यात उमटली आहे. मुलाच्या आठवणी आणि त्याच्या मृत्यूची वेदना मनात गाडून वर्तमानकाळ जगत असताना अचानक अमेरिकन सून आणि नातू सॅम त्यांना भेटायला येतात. नातवाच्या बोलण्यातून आपला मुलगा काय आणि कसा होता, याचा साक्षात्कार त्यांना होतो. रंग, रूप आईचं घेतलेल्या त्या ‘गोऱ्या’ नातवात त्यांना आपल्या मुलाच्या खुणा सापडतात. त्यालाही वडिलांची ही भूमी, त्यांची माणसं यांची ओढ वाटते. वडिलांची पुस्तकं, त्यांच्या वस्तू, त्यांची शाळा यांत तो त्यांना शोधतो.
जोशुला आपल्या वंशाच्या बापाबद्दल क्षणात वाटलेली जवळीक आणि सॅमला भारतीय आजी-आजोबांबद्दल वाटलेला जिव्हाळा यांचे अर्थ खरे पाहता एकच आहेत. पण परिस्थिती आणि दृष्टी बदलली की, त्यांचे अर्थ पार उलटसुलट होऊन जातात. जयंत आणि लताबाईंच्या आयुष्याच्या शुष्क कोरड्या हिवाळ्यात दरवर्षी स्थलांतर करून उबदार प्रदेशात येणाऱ्या फ्लेमिंगोप्रमाणे सॅम इथं येत राहील, असा दिलासा मिळतो.
‘सारांश’ ही आणखी वेगळा संघर्ष रंगवणारी कथा. तेरा-चौदा वर्षाच्या अडनिड्या वयात वडिलांचा मृत्यू झाल्यामुळे बसलेला धक्का आरतीच्या मनात खोलवर जाऊन बसला आहे, याची न तिला कल्पना, न तिच्या आईला-ललिताला. या खोलवर घुसलेल्या वडिलांविषयीच्या प्रेमाचा आणि त्याच्या वास्तवातील अभावाचा परिणाम नकळत घडत राहतो. त्यामुळे चमकदार शैक्षणिक कारकीर्द, अमेरिकेत उत्तम नोकरी, उदयसारखा प्रेम करणारा नवरा आणि हुशार मुलगी असं तिच्या आयुष्याचं रेखीव चित्र पाहतापाहता फिस्कटतं आणि लहानपणीच हरवलेलं वडिलांचं प्रेम, त्यांची माया शोधण्याच्या नादात आरतीच्या हातून जे अभावितपणे घडून जातं. त्यामुळे तिची मनोवस्था बिकट होत जाते, त्यातच तिचा मृत्यू होतो. ती, उदय आणि ललिता ही तीन आयुष्यं आपला ठाव हरवतात.
इथं मुद्दाम नमूद करायला हवं की, ती ज्यांच्यामध्ये आपल्या वडिलांचं प्रेम शोधते, त्या मॉरगनची व्यक्तिरेखा धूसर ठेवण्याचा लेखिकेचा निर्णय महत्त्वाचा आहे. त्यामुळे कथेचा प्रवास भरकटत नाही. या कथेत केटी या पात्राबरोबरचं तुटकपणा ते मैत्री असं बदलत गेलेलं ललिताचं नातं ही मोठी जमेची बाजू आहे. एका पातळीवर ललिताचं निखळ माणूसपण त्यातून उजळत जातं आणि दुसऱ्या बाजूनं मृत आरतीला समजून घेण्याच्या ललिताच्या प्रयत्नाला आधार सापडतो. अमेरिकेत स्थायिक झालेली आरती आणि भारतामधली तिची आई ललिता यांच्या नात्याचा हा चमत्कारिक गुंता लेखिकेनं तरलपणे सोडवला आहे. आरतीच्या पश्चात आता आपल्या आयुष्याचा सारांश काय… या विचारात पडलेली ललिता इथून यापुढे काय करण्याची शक्यता आहे, याचं सूचन करून कथा संपते.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
तिन्ही कथा मृत्यू किंवा दुरावा यांमुळे निर्माण झालेलं अंतर दाखवतात. कधी हे अंतर या दोन्हींमुळे निर्माण होतं. उदा. ‘फ्लेमिंगो’त उदयचा मृत्यूही आहे आणि आधी निर्माण झालेला दुरावाही. ‘सारांश’मधल्या आरतीबाबतही तेच... मनःस्वास्थ्य हरवलेली विमनस्क आरती आणि तिची आई, नवरा आणि मुलगी... यांतला दुरावा तिच्या मृत्युनेही पूर्णपणे संपत नाही.
या कथांमधील स्त्रीव्यक्तिरेखा अत्यंत सशक्त, पण त्यातील प्रश्न मात्र केवळ स्त्रीचे नाहीत, तर माणूस म्हणून कोणाच्याही वाटायला येणारे. स्त्रीचं माणूसपण अधोरेखित करणारे.
तिन्ही कथांत परदेशी पात्रं आणि त्यांची भारतीय माणसांशी रक्ताची नाती. नात्यांमध्ये येणारा अंतराय कधी मानवनिर्मित तर कधी समाजनिर्मित. त्यांवर मात करण्याची जिद्द मात्र मानवी. संघर्षांची अटीतटी परिस्थितीजन्य, भावनिक आणि वैचारिक अशा तिन्ही पातळ्यांवर. कोणत्याही संघर्षाचा पार निर्विवादपणे, निर्णायकपणे कधी असत नाहीच. पण कधी स्वतःला दुमडून घेऊन, कधी दृष्टी बदलून, कधी अधिक प्रगल्भ होऊन, तर कधी तडजोड म्हणून माणूस मार्ग काढत राहतोच. तशीच या कथांमधली पात्रेही. ती हरणार नाहीत तर काही न काही मार्ग काढतील... असा दिलासा मिळतो. पण तूर्तास कथा संपतात त्या शेवट खुले ठेवून. मार्ग काढण्याच्या अनेक शक्यता आहेत, हे दाखवून. हा मार्ग आहे माणूस म्हणून आपल्या कक्षा अधिक विस्तारण्याचा, अधिक प्रगल्भ होण्याचा, समजूत अधिक वाढवण्याचा.
सहसा कथासंग्रहातील एखाद्या कथेचं शीर्षक संग्रहाला देण्याची पद्धत आहे. इथं मात्र या संग्रहाचं ‘त्रिपर्ण’ हे शीर्षक स्वतंत्रपणे योजलं आहे आणि ते फार समर्पक आहे. तिन्ही कथांचा, या त्रिपर्णांचा देठ एक आहे. वर म्हटलं तसं... तिन्ही घडतात परदेशाशी संबंधित अवकाशात. त्यामुळे हा अवकाश त्रिपर्णांना जीवनरस पुरवतो. ‘वंश’ आणि ‘सारांश’ तर अमेरिकेतच घडतात. म्हणजे त्यांचा भौगोलिक अवकाश उघडच परदेश आहे. आणि ‘फ्लेमिंगो’ या शीर्षकातून सुचवला गेलाय तोही अवकाश निव्वळ इथला नाही. या कथेतील सॅम त्याचा आणि उदयबरोबरच्या नात्याचा अवकाश सोबत आणतो… तो अमेरिकेतला आहे… पण त्याचा आणि जयंतराव व लताबाई यांचा भारतीय अवकाश यांचा एक गोफ नकळत गुंफला जातो आणि त्याचं एक उबदार आश्वासन तयार होतं.
मोनिकांच्या कथालेखनशैलीबद्दल थोडं बोलायलाच हवं. तिन्ही कथांमध्ये उत्तम वातावरणनिर्मिती साधली आहे. निसर्ग, त्याचे रंग, झाडं पानं-फुलं, आणि संगीत यांचे तपशील, माणूस, त्याचा परिसर हॉस्पिटल, घरं, समारंभ, या सगळ्यांच्या वर्णनात अस्सलता आहे. थेट अभिव्यक्ती आणि अलंकारणाचा मुळीच सोस न बाळगणारी भाषा कथांच्या आशयाचा पोत सांभाळणारी आहे. पात्ररेखाटनाची त्यांची एक विशिष्ट पद्धत आहे. लहानशा प्रसंगातून कथेला सुरुवात होते... प्रसंगांची मालिका जसजशी सरकत जाते तसे कथानक आकार घेते, आणि त्याच वेळी एकेक पात्रही. पात्रांच्या विचार-भावना आणि उक्ती-कृती मधून तेते पात्र हळूहळू अनेकमिती धारण करत जाते. कथा वाचून होता होता ती पात्रं आणि त्यांचं जगणं वाचकाच्या दाट ओळखीचं होत जातं. प्रत्येक कथेतील परदेशी पात्रंही त्यांच्या वृत्ती आणि धारणा यांसह विश्वासार्ह वाटतात, कारण लेखिका त्यांच्या अंतरंगाला भिडली आहे. ज्योशुसारखा अगदी लहान मुलगा, सॅमसारखा कुमारवयीन मुलगा यांची चित्रणे त्या दृष्टीनं जरूर पहा. इझाबेला, सारा आणि केटी या स्त्रियाही पूरक भूमिका-दुय्यम नव्हे- निभावताना कथेतील अनुभवाला भरघोस बनवतात.
तिन्ही कथांमधील संघर्षात एक सामायिक धागा आहे. शिताचा, सुताचा किंव छताचा हा प्रश्न नाही, हे खरे. माणूस म्हणून अधिक मौलिक जगताना, नैतिक जगताना, बहुसांस्कृतिक पातळीवर जगताना निर्माण होणारे हे प्रश्न आहेत. समकालीन आशय असलेल्या, विसावं शतक उलटून गेल्यावर लिहिलेल्या या कथांमधून परदेशी वास्तव्य, तिथली भावनिक गुंतवणूक, तिथं नव्यानं निर्माण होणारी नाती आणि दोन संस्कृतीमधील भिन्नत्व यांमुळे आमूलाग्र नवे प्रश्न पात्रांच्या वाट्याला येतात. या प्रश्नांकडे पाहताना, ते समजवून घेताना लेखिकेच्या मूल्यदृष्टीचा जो प्रत्यय येतो, तो महत्त्वाचा आहे. कोणत्याही एका बाजूला न झुकता, परिस्थितीचं नीट आकलन करून हे प्रश्न मांडण्याचा कसोशीचा आणि प्रामाणिक प्रयत्न त्यात दिसतो.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
................................................................................................................................................................
लेखिका बिल्वदल किंवा बिल्वपत्र किंवा त्रिदल म्हणू शकली असती. पण या शब्दांना एक सांस्कृतिक आशय बिलगला आहे. तो केवळ एकाच भारतीय संस्कृतीशी, भारतीय अवकाशाशी जोडलेला आहे. ‘त्रिपर्ण’ या शीर्षकामधून तो टाळण्यात एक कलात्मक निवड दिसते. विशिष्ट भूभागाशी आणि त्याला लगटून असणाऱ्या सांस्कृतिक अस्मितेपेक्षा तिथल्या माणसाला आणि माणूसपणाला शोधणारी ही दृष्टी महत्त्वाची आहे.
लेखक स्व-शोध घेण्यासाठी लिहितो, असं म्हटलं जातं. हा स्व-शोध म्हणजे तरी दुसरं काय… अनेक पात्रांच्या जगण्याचा तळ शोधताना लेखक स्वतःच्याही तळाशी जात असतो, तिथली गृहीतं तपासून पाहत असतो. ती तपासताना त्याची स्वतःची मूल्यदृष्टी काय आहे, हे वाचकाला जाणवत असते. माणसाचा गाभा प्रामाणिकपणे शोधणारी ही दृष्टी या कथांमधून प्रत्ययाला येते.
क्वचित काही ठिकाणी शब्दांच्या अवाजवी प्रेमातून काहीशी कृत्रिमता आली आहे. ‘सारांश’ कथेत काही वेळा कथानकावरची पकड सैलावली आहे. निवेदकाला बाजूला सारून लेखिकेला थोडे स्पष्टीकरणात्मक लिहिण्याची गरज भासते आहे, अशा काही बाबी नजरेआड करूनही या कथा वाचायलाच हव्यात, आपली समज वाढवण्यासाठी.
‘त्रिपर्ण’ - मोनिका गजेंद्रगडकर
मौज प्रकाशन गृह, मुंबई
पाने - १३०, मूल्य – २०० रुपये.
..................................................................................................................................................................
वंदना बोकील-कुलकर्णी
vandanabk63@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment