कौटुंबिक आयुष्याच्या उत्तरार्धात अनेक विवाहितांना ‘आषाढ वैभव’ स्पष्ट उलगडलेले असते!
संकीर्ण - व्यंगनामा
रवींद्र लक्ष्मीकांत तांबोळी
  • प्रातिनिधिक चित्र
  • Sat , 10 July 2021
  • संकीर्ण व्यंगनामा कालिदास दिन Kālidāsa Din कालिदास Kālidāsa आषाढस्‍य प्रथमदिवसे AshaaDhasya Prathamdivase

उद्या, ११ जुलै. ‘आषाढस्य प्रथम दिवसे’. त्यानिमित्ताने हा विशेष लेख.

विनोदी लेखक रवींद्र तांबोळी यांचे ‘पत्नीपुराण’ हे पुस्तक पद्मगंधा प्रकाशतर्फे लवकरच प्रकाशित होत आहे. त्यात १२ मराठी महिन्यांचे कौटुंबिक महत्त्व त्यांनी शोधले आहे! त्यातला हा आषाढ महिन्यांवरील लेख...

..................................................................................................................................................................

वैवाहिक आयुष्याचा कोणताही कालखंड असू द्या, त्या काळामध्ये आषाढाची ओढ असतेच. ही ओढ कशी जागी असते, याचे स्पष्ट आकलन होत नसते, मात्र त्या असोशीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तर काही संदर्भ मिळतात. ते खरे असू शकतात असे वाटते.

आषाढ महिन्याची नक्षत्रे असलेल्या पूर्वाषाढा आणि उत्तराषाढा नक्षत्रांना, आपल्या ऋषी-मुनींनी ‘गोऱ्या रूपयौवना’ मानलेले आहे, तर काही ऋषींनी त्यांना ‘यौवनाचेच झाड’ म्हटले आहे.

हा एक आधार घेतला तर प्रत्येक स्त्री ही आयुष्यभर रूपयौवना असतेच, हे सूत्र धरून आणि ती कोणत्याही वयात ह्या आषाढात यौवनधारी बनते, हे उमजून आषाढाकडे कौटुंबिक दृष्टीने बघितले तर काय आढळते? 

ह्या काळात आसमंतात प्रचंड घनदाटी झालेली दिसते. आसमंतात काळोख दाटलेला दिसतो. कधीही बरसू पाहणारे मेघ दिवस-रात्र दिसत राहतात आणि जी जाणीव होते, ती संकेत देते की, कितीही तप्तभूमी असली तरी तिला आपल्या जलवर्षावाने तृप्त करण्याची क्षमता आता निसर्गात आहे.

हा एक मोठा आधार आषाढ असोशीचा असू शकतो आणि दुसरी महत्त्वाची बाब ही की, आषाढामध्ये कधीही अचानक जलवर्षा होते. कोणीही अचानक भिजू शकतो. त्यात एखादी स्त्री असू शकते. ओलेती स्त्री ही देखणी दिसतेच. ती पुन्हा यौवनात आल्यासारखा भास होतो. 

वास्तविक पाहताना कोणाच्याही कौटुंबिक आयुष्याचे वैवाहिक आयुष्याचा पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे दोन भाग केले तर आषाढ असोशीमागील काही कारणे उलगडून जातात.

एखाद्याचे लग्न वैशाखात झाले असले तर त्या कुटुंबियांना आपले नियमित कौटुंबिक जीवन म्हणजे काय?, ह्याची नेमकी जाणीव केवळ आषाढात होते.

घडते काय की, कोणत्याही नवथर विवाहितांची लग्नानंतरची अवस्था गोंधळलेली असते.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

पूर्वीच्या काही दशकात म्हणे, लग्नानिमित्त जमलेली पाहुणेमंडळी परत जायला तर बराच काळ लागायचा. पाहुण्यांरावळ्यांनी गजबजलेले घर, विवाहोपरांत देवदर्शने, घरी सत्यनारायण, अशी पारंपरिक कृत्ये घडेपर्यंत हे ताजे जोडपे प्रचंड ग्रीष्मदाह सहन करत बसे! ही कृत्ये घडून जाईपर्यंत वैशाख महिना संपत आलेला असे. प्रचंड उन्हाळ्याचे वातावरण त्यांना तुलनेने बाधक ठरे. अशा नवदाम्पत्याच्या वाट्याला येणारा पहिला ज्येष्ठ मास मात्र थोडा का होईना मोलाचा ठरे. त्यात एकीकडे शेतीची कामे आणि दुसरीकडे अधूनमधून पत्नीचा माफक सहवास, त्यांना सुख म्हणजे केवळ कुटुंब असतं ही खात्री देई. विवाहानंतरच्या पहिल्या वटपौर्णिमेला आपल्या पत्नीची आपल्यावरची निष्ठा पाहून ही खात्री हमीमध्ये बदलून जाई.

असे ऋतुचक्र चालू असताना जेव्हा नवविवाहित जोडीला पूर्ण एकांत हवाहवासा वाटे, मात्र ते घडत नसे.

परिपूर्ण एकांत देणारा महिना म्हणजे आषाढ, हे त्यांना पहिला आषाढ संपल्यावर कळून जाई.

कौटुंबिक आयुष्याच्या उत्तरार्धात अनेक विवाहितांना ‘आषाढ वैभव’ स्पष्ट उलगडलेले असते.

एकादशी वगळून संपूर्ण महिनाभर उपास करण्याची गरज नसलेला आषाढ उन्मुक्त वातावरणाला प्रेरक असल्याची त्यांना जाणीव होते.

ह्याच आषाढाच्या काळात सात्त्विक मानली गेलेली मेंदीही फुललेली दिसून येते, तर हव्याहव्याश्या आंबटपणाची साथीदार असलेली चिंच नवी पोपटी पालवी घेऊन मिश्किल रूपात हसत असते.

आसक्तीचा परमोच्च महिना म्हणजे आषाढ ह्याची त्यांना जाणीव होते.

ह्या महिन्यात घराबाहेर सततची धो धो आषाढवृष्टी असल्याने ते घरातच बंदिस्त असतात आणि त्याच वेळी घरामधली प्रेमवृष्टी त्यांना हवीहवीशी मुक्ती प्रदान करते.

वैवाहिक आयुष्याच्या पूर्वार्धात हे जाणवलेले सगळे संकेत आणि असाच वेगवेगळा घटनाक्रम दरवर्षीच नियमित अशी विरहव्यथा देत-देत ती व्यथा असोशीमध्ये बदलून टाकतो .

ह्या विरहव्यथेवर महाकवी कालिदासाने फार पूर्वी आषाढाच्या पहिल्याच दिवशी ‘मेघदूत’ लिहून पत्नीगौरव करून ठेवला असल्याने, ज्या कुटुंबीयांना विरहव्यथा नसते, त्यांना हे माहीत असते की, तापलेली वसुंधरा जशी तृप्त होऊ शकते, तशी ही असोशी कौटुंबिक तृप्तीही देऊ शकते!

कौटुंबिक चावटपणाचे संसुचन करताना शास्त्रीबुवा अडखळत आहेत, हे आम्ही जोखले होते. आमचे शास्त्रीबुवा आम्हाला आषाढ असोशीचे सौंदर्य समजावून देत होते, तेव्हाचे आमचे हे निरीक्षण होते.

रूढ महिन्यांपैकी तो जुलै महिन्याचा उत्तरार्ध चालू असलेला कालखंड होता. आषाढ लागलाच होता आणि आम्ही त्या वर्षी आमच्या चिरंजीवाची शैक्षणिक कागदपत्रे आणायला म्हणून आमच्या मूळ गावी अर्थात नंदीग्राम नगरीला गेलो होतो. योगायोगाने आमचे ते काम एका दिवसातच झाले आणि ह्या कामासाठी म्हणून आम्ही जी रजा घेतली होती, ती रजा आपोआपच गावातल्या भेटीगाठीसाठी कामाला आली होती. शास्त्रीबुवा अर्थात एल.के. शास्त्री म्हणजे आमचा जीवनाधार! 

ते जरी नंदीग्रामनिवासी असले तरी आम्ही विविध माध्यमांतून त्यांच्या संपर्कात असतोच. आमचे कौटुंबिक जीवन सफल होण्यामागे त्यांची शिकवण कामी आली आहे, हे तर आम्ही जाहीर कबूल करतो.

ह्याच कारणाने त्याही वेळी आम्ही शास्त्रीबुवांच्या घरी गेलो होतो. आमच्या रंगलेल्या गप्पागोष्टींवेळी आम्हाला ही जाणीव झाली होती.

शास्त्रीबुवांच्या विचारांचा रसभंग होऊ नये म्हणून आम्ही त्यांना म्हणालो, “गुरुवर्य, तुम्हाला जसे सांगायचेय तसे सांगा! शब्दसंकोच करू नका! आषाढ आणि एकांत हे आम्हीही अनुभवलंय!, तुम्ही ते सारे विविधांगाने सांगा!, मोकळेपणाने बोला!”

आमच्या ह्या आश्वासक आणि कुतूहलभरीत जिज्ञासेमुळे शास्त्रीबुवांच्या अंतर्मनात आषाढवृष्टी सुरू झाली असावी. त्यामुळे की काय, शास्त्रीबुवांच्या मुखावर तारुण्य दाटून आल्याचा भास आम्हाला झाला आणि  आमच्या तशा अवस्थेवेळी शास्त्रीबुवांनी आपले आषाढ चिंतन सुरू केले आणि ते म्हणाले, “पूर्वी घडायचे काय की, ज्येष्ठात शेतीची पेरणी पूर्ण होऊन जायची, पर्जन्यप्रतीक्षेसोबत निवांतपणा भरभरून साचलेला असे. प्रतीक्षा असायची ती केवळ दमदार पावसाची. ज्येष्ठातल्या फसव्या मेघमालांवर आपल्या शेतकऱ्यांचा विशेष विश्वास नसे. ते प्रतीक्षा करत आषाढाची! आषाढवृष्टी म्हणजे विश्वासार्ह आणि दमदार! इतका पाऊस की, घराबाहेर पडण्याची हिंमत न होऊ देणारा! 

परंपरेनुसार हा आषाढ ग्रीष्म ऋतू घेऊन येत असला तरी ह्याचे मैत्र वर्षा ऋतूच्या पावसाशी. पावसामुळे लाभणाऱ्या निवांतपणाशी. ह्याच आषाढातल्या एकांतसोयीसाठी दुसरी एक परंपरा ज्येष्ठात आगळीच सोय करून जाते. ज्येष्ठातील काही ठरलेल्या तिथींवर गावोगावचे वारकरी आषाढातल्या एकादशीसाठी पंढरपूरला निघून जातात. मात्र अशी वारकरी मंडळी आपल्या कुटुंबातील नवदाम्पत्याला मात्र घरीच थांबण्याचा आग्रह करून त्यांना ह्या एकांताचा अप्रत्यक्षपणे लाभ देऊ पाहतात!”

एवढे बोलून शास्त्रीबुवा जरासे थांबले. आसमंतातील कुंदपणा त्यांना दम घ्यायला कारणीभूत ठरला असावा. पुढे संवादातून विषयांतर करीत आम्हाला ते म्हणाले की, “आता आम्ही जे म्हणालो, त्या संदर्भातला एक अनुभव तुम्हाला सांगतो. तो आमच्या मित्राचा असून ते मित्र पोलीस अधिकारी होते. त्यांचे नाव जीवनराव! ते नुकतेच आम्हाला भेटून गेले. ते मूळ विदर्भाचे असल्यामुळे त्यांचा सेवाकाल विदर्भातच व्यतीत झालेला होता. आपल्या नोकरीतील शेवटची पदस्थापना त्यांना रामटेक या गावी मिळाली होती. ते तेव्हा खात्यामध्ये निरीक्षक होते. रामटेक येथे नोकरी करताना महाकवी कालिदासाबाबतचे जे संशोधन त्यांनी स्वयंस्फूर्तीने केलेले होते, त्याबाबत ते या भेटीवेळी सांगून गेले.

जे संशोधन त्यांनी विषद केले होते, त्यातील निष्कर्षानुसार, महाकवी कालिदास म्हणे हे तत्कालीन भारतीय सेवेतील उच्च अधिकारी असावेत आणि अत्यंत कुटुंबनिष्ठ असावेत, असे जीवनरावांना ठामपणे जाणवले होते. आपल्या त्या अद्वितीय निष्कर्षाला त्यांनी जो धागा दिला होता, त्यात आषाढी एकादशीचा संदर्भ जोडला होता. 

त्या संदर्भाने जीवनरावाच्या म्हणण्यानुसार कालिदासाला ‘मेघदूत’ हे काव्य ज्या काळात सुचले असेल, तो काळ तेव्हाच्या आषाढी एकादशीचा होता. तत्कालीन सारे वारकरी पंढरपूरला निघून गेल्यावरचा होता. त्या वेळी कालिदासाने हे पाहिले असावे की, ‘विठ्ठल विठ्ठल’ हा गजर करीत कैक खेड्यातील अनेक वारकरी जेव्हा गावातून वारीसाठी बाहेर  पडत, तेव्हा ते गेले की घरी उरायचे कोण? तर घरातील विवाहित तरुण मुलगा अथवा प्रौढमुलगा आणि त्यांच्या पत्नी!

त्याही काळात आषाढमेघ उत्कटपणे वसुंधरेवर जलवर्षा करीत असणारच!

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

इकडे घरी नवविवाहित सून असली काय किंवा थोडीफार प्रौढ झालेली सून असली काय, घडायचे असे की मृगारंभानंतर झालेल्या पेरणीमुळे शेतीचा कामे नसायची!, बाहेरची आषाढाची वृष्टी ‘घरात थांब!’, असेच म्हणायची! हे सगळे वास्तवातले चित्र म्हणे महाकवी कालिदास बघत बसत, ते केवळ त्यांच्या उज्जैनहून विदर्भात झालेल्या प्रतिनियुक्तीमुळे!

(संयुक्त राष्ट्रसंघ आपल्या सहयोगी अशांत राष्ट्रात शांतता पथकाला पाठवते, ज्यात शांत सहयोगी देशांचे पोलीस प्रमुख, सैन्यप्रमुख जातात, तसेच काही ते होते! उदाहरण म्हणून कोसावा, अफगाणिस्तान यांची आठवण करता येते, असे तेव्हा जीवनराव म्हणाले होते!)

कालिदासाची प्रतिनियुक्ती मात्र वेगळ्या कारणासाठी तेव्हा उज्जैनच्या राजाने केली होती.

तेव्हा असे घडले होते की, उज्जैनचा विक्रमादित्य राजा (दुसरा) हा चक्रवर्ती होता. त्याने माळवा, काठेवाड, मगध, कौशल असा संपूर्ण उत्तर भारत जिंकून सुराज्य निर्माण केले होते. विदर्भातील वाकाटकांच्या राजाशी मात्र युद्ध न करताच, त्याने आपली मुलगी त्या राजघराण्यात देऊन सोयरेपण जोडले होते.

मराठी माणसांच्या पुरुषार्थाला तेव्हाही मान मिळत असे, हे यावरून सिद्ध होतेच.

या विक्रमादित्याच्या दरबारात जे राजकीय अधिकारी होते, त्यात कवी कालिदाससुद्धा होते. हे कालिदासराव ‘जॅक ऑफ ऑल’ आणि ‘मास्टर इन एव्हरीथिंग’ होते. ते उच्च दर्जाचे प्रशासक होते. अर्थतज्ज्ञ होते. कला पारंगत होते. गुप्तहेरशास्त्र निपुण होते. ही सगळी गुणवैशिष्ट्ये त्यांच्यात होती, म्हणूनच तेव्हाचे ते नामनियुक्त प्रशासक असावेत आणि त्यांच्या चौफेर निरीक्षणशक्तीचा सन्मान म्हणून तेव्हा त्यांना विक्रमादित्य राजाच्या गृह खात्याचे महासंचालक पद देण्यात आलेले असावे.

विक्रमादित्य राजाची जी मुलगी विदर्भात दिलेली होती, ती दुर्दैवाने तारुण्यातच विधवा झाली. तिला त्या वेळी लहान मुलगा होता. आपल्या या वैधव्य प्राप्त करून बसलेल्या मुलीचा मुलगा राजकुमार बनेपर्यंत आणि राज्यकारभार बघण्यासाठी समर्थ होईपर्यंत त्या विदर्भाच्या प्रदेशाला सांभाळायला म्हणून विक्रमादित्याला एका अत्यंत चारित्र्यसंपन्न आणि कुटुंबनिष्ठ अधिकाऱ्याची गरज होती.

कालिदासाशिवाय दुसरे कोणी योग्य नव्हते. यामुळेच कालिदासराव राजाज्ञेने विदर्भात वास्तव्याला आले.

विदर्भाचे एक वैशिष्ट्य आजही टिकून आहे, जे ऋतूंबाबत आहे. विदर्भात उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे तिन्ही ऋतू अतितीव्र आहेत. विदर्भाच्या उन्हाळ्यात सजीवच काय, निर्जीवही मरगळून जातात. तिथल्या हिवाळ्यात सजीवांचे सांधे विचित्र थंडीने दुखतात. तिथला पावसाळा मात्र सृजनकारक आहे, हे वारंवार सिद्ध होत गेलेले आहे. कालिदासाच्या काळातही असेच घडले असावे. आषाढ लागला असेल आणि कालिदासाने तेव्हा आपल्या सिक्युरिटीला आवाज दिला असेल, तेव्हा तो उशिरा आलेला असेल. या उशिराचे कारण तेव्हा त्याने कदाचित ‘आषाढ एकांत’ सांगितले असावे आणि या एकांताला कारणीभूत एकादशी आणि वारीला गेलेले वडीलधारे असे त्याचे उत्तर असावे.

इथेच या महाकवीला तीव्रपणे आपल्या त्या कृशकटी, कमलनेत्री, केतकीवर्णी पत्नीची तीव्र आठवण झाली असावी आणि ‘मास्टर इन एव्हरीथिंग’ असल्याने कालिदासाला जे विरह काव्य सुचले, ते त्याने लिहिले असावे.

या काव्यात त्याने जो कृष्णमेघ दिला आहे, तो कदाचित त्याचा ऑर्डरली असावा आणि शापित यक्ष म्हणजे स्वतः कालिदास असावेत. ही यक्ष कल्पना कालिदासाला सुचण्याचे कारण म्हणजे त्यांचे स्वतःचे तेव्हाचे प्रोफेशन होते. संस्कृतीमान्य यक्षकृत्य म्हणजे कुबेराच्या धनाचे रक्षण करणे, इंद्राच्या नंदनवनाचे सौंदर्य टिकवणे, स्वर्गलोकीचे स्थैर्य राखणे.

विक्रमादित्य राजाचे हा अधिकारीपुरुष तत्कालीन महासंचालक असल्याच्या संशयाला इथेच पुष्टी मिळते. कारण ते स्वतः ही सगळी कामे करत असावेत, याचा निष्कर्ष मान्य होतो. कालिदासाला आपली अवस्था तेव्हा शापित वाटली असावी, कारण मधु इथे आणि चंद्र तिथे असे त्यांच्या बाबतीत घडले होते. कालिदासाची पत्नी एकटीच उज्जैनला राहिली होती. आपल्या सोज्ज्वळ पत्नीचे घर कोठे आहे, हे सांगताना कालिदासाने उज्जैनला जाताना रस्त्यात काय लागेल हे वर्णन केले. त्यात त्याने उज्जैनच्या अलीकडील टेकडीवरील गुहेत नगरवधूंची सौंदर्यप्रसाधने सापडतील, असे लिहिले आहे.

याचा अर्थ तेव्हाही आताच्या बारबालांसारख्या ‘केव्हबाला’ असाव्यात. यांच्यावर तेव्हाही ‘रेड’ पडत असावी. याचाच अर्थ कालिदासांकडे तेव्हा कधी तरी सामाजिक गुन्हे शाखेचा कार्यभार असावा. गृह खात्यातील खरा अधिकारी, हा समाजातील गुप्त आणि उघड विकृतींना ठेचून सुसंस्कृतपणा वृद्धिंगत करतो, हे तेव्हा मानले जाई. कालिदासरावांनीसुद्धा तेव्हा असंख्य वेळी असे छापे टाकले असावेत.

आपण केलेला तर्क अगदी अचूक आहे, हे आमच्या समोर विशद करताना जीवनरावांनी एक प्रश्न विचारला. त्या प्रश्नांनुसार आजही समाजात आपण असे पाहत आहोत का?, की उच्च शासकीय अधिकाऱ्याला वधू म्हणून त्याच्या समाजातील अत्यंत प्रतिष्ठित घराण्यातील रूपवती कन्या दाखवली जाते. बहुसंख्य वेळी असा विवाहयोग असतो का?, याचे उत्तर आजही होकारार्थी येते. या उत्तरामुळे कालिदासरावांची पत्नी खूपच लावण्यवती असेल, हे मान्यच करावे लागते.”

जीवनरावांचे हे कालिदास निरीक्षण अद्भुत असल्याने त्याला तुमच्या समोर आनंदाने ठेवताना एक मोठा शोधही पूरक शोध म्हणून ठेवत आहोत, असे शास्त्रीबुवा पुढे बोलताना म्हणाले-

“ज्या घरातील वडीलधारी मंडळी पंढरीच्या वारीसाठी जाते, त्या घरातच पुढे वारीची परंपरा सहसा चालू राहते. हे का घडते?, याचे उत्तर असे की, या वडीलधाऱ्यामुळेच त्या घरातील तरुण मुलांना किंवा प्रौढ मुलांना आणि सुनांना उत्कट असा ‘आषाढ एकांत’ भोगायला मिळतो, याची कृतज्ञ जाणीव अशा घरातील मंडळींना राहते. आपल्याही मुलांना हे आषाढ वैभव प्राप्त व्हावे म्हणून पुढे ही आजची नवदाम्पत्य स्वतः नंतर भक्तिमार्गाला लागतात आणि आपल्या मुलांच्या तारुण्यकाळात त्यांना मुक्तवाटेवर जाण्यासाठी प्रोत्साहन देतात. स्वतःहून, आम्ही यंदापासून वारीला जात आहोत असे जाहीर करतात. वारकऱ्यांची संख्या वाढण्याचे हेही एक वेगळे कारण असेल काय? कालिदासाला ‘मेघदूत’ सुचण्यासाठी कारणीभूत ठरणारा हा आषाढ, ही आषाढी, अशा कौटुंबिक अर्थानेही अंतर्मनाला व्यापून बसते.”

जीवनरावांचा  आषाढाबाबतचा हा नवा शोध आम्हाला ऐकवून शास्त्रीबुवा थांबले आणि तिथेच आम्ही त्या वेळच्या  संभाषणाचा ताबा घेत म्हणालो, “गुरुवर्य, जीवनरावांचे हे संशोधन आम्हाला आवडलेय. दुसरे म्हणजे तुम्हाला तर कल्पना आहेच की, आषाढी एकादशीला ‘शयनी एकादशी’ म्हणतात आणि या तिथींवर सृष्टीच्या सुस्थितीची जबाबदारी असलेले विष्णू योगनिद्रेला प्रारंभ करतात. हे बघून सर्वसामान्य संसारी सद्गृहस्थ ह्या त्यांच्या चातुर्मासाच्या निद्राकाळात आपण मनमुरादपणे मुक्त जगावे, असे ठरवतात की काय, हे नीटसे उलगडले नाही. ते गूढ उलगडो अथवा न उलगडो, पण प्रत्येक संवत्सरातील ह्या नियमितपणे चालणाऱ्या बाबी असून ह्या बाबीतले इतर घटकही महत्त्वाचे असतात बघा!

आषाढातल्या ह्या शयनी एकादशीचा मानवी कल्पनेने बोध घेतला तर एक सहज तथ्य मिळते, ज्यात शेषनागाचे मनोगत शोधता येते. ते मनोगत निरखून बघताना सापडते की, भूलोकी यंदाही चांगली पर्जन्यवृष्टी होईल, असा अंदाज शेषनाग दरवर्षी बांधत असतो.

शेषनाग हा खरा मानवमित्र! त्याला मानवजातीच्या कल्याणाची नेहमीच काळजी असते. ह्या काळजीमुळे तो दरवर्षी तपासतो की, इंद्रदेव पावसाबाबत वरुणराजाला काय बोलले असतील? 

ही माहिती तो सदैव घेऊन विष्णूदेवांना सांगत असतो म्हणतात!

त्याची आयुधे म्हणजे नांगर!

आपले आयुध असलेला नांगर तो अनेक प्रगतीशील शेतकऱ्यांना देऊन टाकत असतोच. 

प्रत्येक वर्षी शेषनागाला वाटते की, आपल्या दैवी नांगराच्या नांगरणीमुळे आणि शेतकऱ्याच्या कष्टामुळे भरभरून उत्पन्न वाढेल.

असंख्य शेतीनिष्ठ शेतकऱ्यांची संख्या चांगले पीक बघून वाढेल.

हे असे नक्की घडेलच हा त्याचा दरवर्षीचा अंदाज असतो.

त्याचे दुसरे आयुध म्हणजे कोयता!

ते त्याने शेतीतील तण काढण्यासाठी साऱ्याच शेतकऱ्यांना बहाल केलेले असते. त्याची गरज मात्र भाद्रपदात पडणार असते, ह्याचे भान शेषनागाला सदैव असते. पिकातील तण काढल्यानंतर पिकाला जोम येतो, बळ मिळते, दाणे भरतात, हा त्याचा अनुभव असतो.

शेषनागाला मात्र खरी चिंता असते ती शयनी एकादशीची!

ती दारावर येते आणि भगवान विष्णु देव एकादशीच्या आधी थोडेसे आळसावलेले असतात, हे त्याचे त्यालाच ज्ञात असते!

पुढे स्वतःच्या चातुर्मासातील योगनिद्रेच्या कल्पनेने विष्णूदेवाचे डोळे जड झाले असावेत, हा कयास तो बांधत असतो. त्यामुळे त्याला स्वतःचे शरीर स्वच्छ करणे गरजेचे वाटत असते. ही दरवर्षीची त्याची अवस्था असते.

आपल्या मृदूमुलायम शरीररूपी शय्येवरच भगवंतांचा डोळा चांगला लागतो, त्यांना गाढ झोप लागावी म्हणून शेषनागाला नेहमीच वाटते की, त्यासाठी शेतकरी सुखी ठेवणे गरजेचे असते. म्हणून दर वर्षी देऊन इंद्रदेवांचे काय ठरलेय, हे तपासून टाकतो, यासाठी शेतकऱ्यांनी शेतीकामात गुंतण्यासारखी परिस्थिती आहे की नाही, हे तपासताना, तो त्याचे मित्र असलेल्या तक्षकांकडून इंद्रदेव पर्जन्यवृष्टी करणार की नाही, याचाही आढावा घेऊन टाकत असतो. 

एकदा का शेतकरी शेतीकामात गुंतला की, त्याची मानसिकता पुढे कोणताही उत्सव साजरा करावा अशी राहत नसते. 

अशा काळात कुठलीही नैसर्गिक आपत्ती येऊ नये म्हणून भगवान शंकराची आराधना करण्यासाठी त्याने शेतकऱ्यांना सुचवलेले असते. कारण त्या काळात भगवान शंकरांना निवांत वेळ असतो आणि भगवान शंकराची आराधना करणे म्हणजे प्रत्येक महिलेच्या व्रताचा आणि उपवासाचा जास्त संबंध असतो.

हे सगळे आपल्या कुटुंबासाठी त्या करत असतात. त्यांची अपेक्षा असते की, अशी आराधना केल्यानंतर चांगली सुगी येईल. भगवान शिवानंतर पुढे विघ्नहर्ता गणपती, मग आदिशक्ती!

श्रावण-भाद्रपदात अशा साऱ्या देवांचे आशीर्वाद एकदा मानवांनी घेतले की, छान समृद्धी राहते. हे सगळे पारंपरिक संकेत भगवान विष्णूंनी काढलेत, हे शेषाला मान्य असते.

सारी मानवजात केवळ आपल्या भक्तीत गुंतून जाऊ नये, म्हणून त्यांनी इतर देवतांचे कालावधी ठरवून दिले आहेत, असेही शेषाचा अनुभव असतो. या सार्‍या काळात विष्णुदेव समृद्धीची स्वप्नमालिका बघत आपल्या शय्येवर प्रगाढ झोपी जातात. ह्याचा त्याला आनंद असतो.

प्रत्येक संवत्सरात हे नियमितपणे चालू असते.

कौटुंबिक जीवन जगणारे बहुसंख्य या भूतलावर आहेत म्हणून तर ब्रह्मदेवाने जलप्रलय आणून सृष्टीचा लय करावा, असे भगवान विष्णूंनाही वाटत नसते. या संसारी सज्जनांची काळजी विष्णूदेव दक्षपणे घेत असतात, ह्याचा सार्थ अभिमान शेषनाग बाळगतो...

जे कोणी सदाचारी सद्गृहस्थ असतात, भक्तिमार्गी कुटुंबे असतात, त्यांची काळजी घेण्याची प्राथमिकता विष्णूदेवांनी घेतलेली असते हे शेषनागाने आजवर पाहिलेले असते. शेषनागाचे हे चिंतन दरवर्षी आषाढीच्या आधी सुरू होते आणि या चिंतन काळात क्षीरसागरातील मत्स्यकन्यांना तो सांगतो की, विष्णूदेवांना निद्रा लागेपर्यंत नृत्य सादर करायचे आहे, त्याची तयारी करा. हळूहळू एकादशीच्या तिथीवर सुस्थितीकारक विष्णूदेवांना निद्रादेवी प्रसन्न होईल आणि पुढे चातुर्मासानंतर समृद्धी नांदण्यासाठी आणि सर्व कुटुंबांच्या घरात आनंदीआनंद पसरण्यासाठी दैवी नृत्याची तयारी ठेवा!”

शेषनागाचे असेही मनोगत असू शकते, हे ऐकून एल.के. शास्त्रींच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.

त्यांची प्रसन्न अवस्था बघून आम्ही म्हणालो, “गुरुवर्य, ह्याच आषाढात चातुर्मास चालू होतो आणि तिथून कंदरूपी उग्र गंधाचे सारे काही ग्रहण करणे टाळले जाते. आरोग्याच्या दृष्टीने ते योग्य मानले तरी उत्कट एकांत काळी मुखदुर्गंध टाळावा म्हणून ही परंपरा पडली असेल काय?”

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

आमच्या ह्या अद्भुत शंकेमुळे तर शास्त्रीबुवा मनमुराद हसले. आपली उबळी शमल्यावर ते म्हणाले, “तुमचा मुद्दा विचार करण्यासारखा असून प्रत्येक नवविवाहित कन्येला असे मूल्यवान ज्ञान तिची सर्वार्थगुरू असलेली माता देत असावी, असे म्हणता येते. आपल्या मुलीचा संसार आटोकाट सुखाने भरलेला असावा, असे प्रत्येक मातेला वाटतेच. प्रत्येक माता ही आपल्या कन्येची सर्वार्थाने गुरू असते आणि ती तिला प्रत्येक सांसारिक बाबींचे सविस्तर ज्ञान देत असते. आषाढातच जी गुरू पौर्णिमा येते, त्यात आपल्या गुरूची षोडशोपचारे पूजा करावी असे सांगितले आहे. पत्नीमाता हे द्वादश गुरू असूनही तिचे ह्या दिवशी जाहीर पूजन केले जावे, असे आम्हाला वाटते बघा. प्रत्येक विवाहित पुरुषाची विचारगुरू आणि बोधकगुरू म्हणजे त्याची पत्नी असते. अशा साधकरूपी पतीच्या पत्नीची सर्वार्थगुरू ही तिची माता असल्याने प्रत्येकाने परखडपणे स्वतःच्या संसाराला तपासले तर ज्याने त्याने आपल्या भार्येमातेचे मानसपूजन केलेले निश्चित आढळते!”

आषाढ असोशीबद्दलचे असे विविध विचार व्यक्त करताना शास्त्रीबुवा थांबले. भर आषाढात आमच्याही मनावर अशा आवडणाऱ्या विचारांची धो धो वृष्टी झाल्याने आम्ही आनंदाने ओथंबून चिंब झालो होतो.

बराच वेळ गप्पांमध्ये रंगून गेल्यामुळे आम्हा दोघांनाही वेळेचे भान राहिले नव्हते. आषाढही विवाहित जोडप्याला कसा बेभान करतो, ह्याची स्पष्ट अनुभूती एव्हाना आम्हाला झाली होतीच. गप्पा थांबवून स्वतःला आपल्या कुटुंबाच्या स्वाधीन करावे, असा प्रापंचिक विचार आमच्या मनात येतो न येतो तोच अंतर्मनात एक नवी विचारशलाका चमकली. ती म्हणत होती, ‘संपूर्ण आषाढात पतीसान्निध्य सर्वोच्च मानणारी ज्याची त्याची पत्नी श्रावण लागताक्षणी संपूर्णपणे सात्त्विक आणि धार्मिक होऊन जाते, हे विसरायचे नसते! उत्साह आणि उन्माद क्षणात विसरून तीच अर्धांगिनी विरक्ती धारण करते, हेही मान्य करायचे असते. हे कुटुंबज्ञान स्पष्ट उमजले की, मग आषाढातल्या दीप अमावास्येला उंबरठ्यावर दिवे उजळवून पावित्र्य चेतवायचे असते!”

विचारशलाकेतून मिळालेल्या प्रेरणेने आम्ही शास्त्रीबुवांचा निरोप घेतला. त्या वर्षीच्या आषाढाचे उरलेसुरले दिवस असोशीने घालवावेत ह्या निश्चयाने थेट घराकडे निघालो. तेव्हा नभात ढग ओथंबून आले होते.

..................................................................................................................................................................

हेही पाहा\वाचा :

कालिदासानं फक्त ‘मेघदूत’ हेच काव्य रचलं असतं तरी त्याची जगातील अत्युउत्कृष्ट कवींमध्ये गणना झाली असती!

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Santosh Latkar

Sat , 10 July 2021

तांबोळी सर अप्रतिम लेख नेहमीप्रमाणेच तुम्ही नर्म विनोदी शैलीत एका वेगळ्याच विषयाचा आढावा घेतलात . जे ना देखे रवी, असे म्हणतात पण तुमच्या नावातच रवी ही आहे . आषाढाचा, कालीदासाचा आणि वारीचा असा संबंध मनाला भावून गेला . डॉ संतोष म लाटकर


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......