अजूनकाही
कवी जेव्हा आतून पोखरून जातो
तेंव्हा तो बाहेरून फुलून येतो
या तजेलदार ओळी आहेत आतून-बाहेरून बहरून येत मनाच्या फांद्यांना रसरशीत आशयघन काव्यपुष्पे लगडून आलेल्या कवीच्या, पवन नालटच्या. वर्तमानकाळात कवींच्या वाढत्या गर्दीमधील आश्वासक आणि अभ्यासू कवीचा चेहरा म्हणून पवनचे नाव घ्यावे लागते. महाराष्ट्रातील बहुतांश महत्त्वाच्या नियतकालिकांमधून त्याची कविता सातत्याने भेटत असते. त्याच्या कवितेत विविधता, जाण, आक्रोश आणि सामाजिक भान आहे.
कुणासाठी कविता लिहितो आपण...
सज्जनांच्या वस्तीतल्या नीतीभ्रष्टांसाठी...
किती भिंती आणि भीती उभ्या आहेत, हे पवन सांगत असतानाच या कवितेत शेवटी
लिहित्या माणसाला वेठबिगार करण्याची परंपरा आली नाही अजून
नाहीतर कवीचा विचार कलम करण्याची
केविलवाणी धडपड केली असती
व्यवस्थेच्या वतनदारांनी.
असेही म्हणतो.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
त्याच्या कविता थोड्या पूर्वकालीन समजाच्या किंवा स्वाभिमानी लेखक, कवी, पत्रकारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आहेत. साहित्यिक-पत्रकारांची लेखणी आज निमूटपणे व्यवस्थेची भलावण करताना किंवा मौन स्वीकारून शांत बसताना दिसते आहे. स्वतःच्या भूमिकेशी प्रामाणिक राहत पवन म्हणतो-
तसं लिहिता येतं
पानांवर, फुलांवर
निर्माल्य झालेल्या मनावर
तसा लावता येतो सूर
कोमल स्वर वगळूनसुद्धा
तशी करता येते जिद्द
आभाळ फोडून जगण्याचीसुद्धा
पण तसं काहीच करू नये
जगण्याचे पापुद्रे निघतील
इतकं कोरड होऊ नये माणसाने
वाट्टेल त्या तडजोडी करत जीवनाशी सातत्याने वेगवेगळी युद्धे किंवा तहनामे करत श्वास जिवंत ठेवण्यापेक्षा देवपूजेतील पानाफुलांप्रमाणे जीवन कारणी लावावे आणि थांबावे. जगण्याचे पापुद्रे निघतील इतकं कोरड होऊ नये माणसानं. मनाची ओल आणि हिरवेपण ताजेपणा सतेज ठेवावा. रुक्ष आणि ओसाड जीवन कुरवाळत बसू नये, असे पवन आवर्जून सांगतो.
जीवनाचा ओलसरपणा आणि भावनिक जपणुकीच्या इतरही काही कविता या संग्रहात आहेत. ‘गाभारा’ही अशीच एक छोटेखानी कविता. त्यात ‘काहीच कसं वाटत नाही कळ्या तोडून टाकताना’ असं जेव्हा पवन म्हणतो, तेव्हा त्यात बशीर बद्र या जगप्रसिद्ध शायरच्या ‘लोक तूट जाते है एक घर बनाने में तुम तरस क्यों नहीं खाते बस्तिया जलाने में।’ या ओळीतील दुःख आणि सहवेदना स्वाभाविकपणे जाणवते.
स्वतःच्या भूमिकेशी प्रामाणिक राहत असताना पवन आजच्या परिस्थितीवर निर्भीडपणे भाष्य करताना दिसतो. ‘परमेश्वर खरंच असतो?’ या कवितेत जगण्याचे आणि जीवनाचे बकाल दर्शन घडवत शीर्षकात विचारलेला प्रश्न अस्वस्थ करून जाणारा ठरतो. येणाऱ्या पिढीला नोकऱ्या नाहीत, गावं ओस पडत आहेत, माध्यमं विकली जात आहेत, अशात परमेश्वर आहे, असे कोणी कसे म्हणू शकतो? ही सल त्यांच्या आंतरिक अनुभवविश्वातून आलेली आहे. ती समस्त युवकांच्या मनातील व्यथा व्यक्त करते.
भारत लोकशाही प्रधान देश आहे, मात्र स्वार्थी आणि इच्छाशक्तीहीन राजकीय नेत्यांनी या लोकशाहीचा गळा घोटून सामान्य माणसांसाठी ती वेदनादायी ठरवली. ती व्यथा ‘सोपस्कार’ या कवितेतून मांडताना,
पुन्हा लोकशाही नावाच्या करवतीवर
आमची मान कापली जाणार आहे
असे सांगत पवन पुढे म्हणतो,
बोकडाला कापण्यापूर्वी
चढवला जातो जसा
सुक्या मेव्याचा मलिदा
तसाच आश्वासनांचा खुराक
दिला जातोय अनुचरांना
‘देशच झाला काळा’, ‘लालफीतशाही’, ‘बधीरता’, ‘गुलामीच्या भोवऱ्यात’, ‘जाळ’ अशा कवितांमधून देशातील अस्ताव्यस्त वर्तमान आणि अस्वस्थता यावर, तसेच हा देश चालवणाऱ्या व्यवस्थेवर पवन प्रखर आसूड ओढताना दिसतो. त्याच्या मनातील हा आक्रोश जनसामान्यांच्या मनातील आहे.
तेच देव
तेच भक्त
युगे लोटली तरी
तुझ्या दगडाच्या पायरीला
चोखोबाचं रक्त
आजही अनेक गावांमध्ये मंदिराच्या पारावर खालच्या जातीचा नवरदेव चढला म्हणून संपूर्ण वरात झोडपली जाते. ही जातीय व्यवस्था पवनला मान्य नाही, म्हणून तो थेट विठ्ठलालाच प्रश्न करतो.
जातीयता आणि धर्मांधता हा आपल्या देशातील एक सामाजिक विकार. त्याविरुद्ध सातत्याने संत, समाजसुधारक आणि साहित्यिकांनी आवाज उठवला आहे. त्यातून किती परिवर्तन झाले, हे मुद्दे बाजूला ठेवले तरी त्या सर्वांचा प्रयत्नातून बरेचसे जीवन सुकर झाले आहे, असे आपल्याला दिसते. मात्र माणसाच्या मनातली जातीय भिंती अजूनही अबाधित आहेत. त्यावर पवन आपल्या कवितेतून प्रहार करतो-
मला माहित होतं
थडग्यांवर जीव लावणारी माणसं
सर्वच धर्मात असतात
माणसावर जीव लावणारी माणसं
सापडत नाहीत कुठेही!
‘जातीय सलोखा’, ‘कौमी एकता’ असे गुळगुळीत झालेले शब्द आज सर्वत्र वापरले जात असले तरी सामाजिक जीवनात धर्मांधता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. भाषणात, सूत्रसंचालन इत्यादींमध्ये सुफी तत्त्वज्ञान किंवा शायरीची नजाकत ऐकत राहणारे लोकही हिंदू-मुसलमान या भेदाच्या भिंतीत द्वेषाचे सिमेंट टाकून त्या मजबूत करताना दिसतात.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
‘मी संदर्भ पोखरतोय’मध्ये सुफी विचारसरणी आणि इस्लाम धर्माबद्दलचा जिव्हाळा व्यक्त करताना पवनची जी भूमिका दिसते, ती निव्वळ मानवतावादी आणि निव्वळ माणूस म्हणून उभी राहणारीदेखील आहे. ‘हम-नफ़स : काही नोंदी’ या दीर्घ कवितेत एक मुस्लीम मित्र धर्मांध न होता निव्वळ भावनिक नात्याने बोलतो. तो प्रसंगी रामराम किंवा तत्सम कुर्निसात सहज करतो, पण आपण त्याला कधीही ‘वालैकुम अस्सलाम’ म्हणत नाही, ही खंत पवन व्यक्त करतो. त्याच वेळी इतरांना ‘धर्मांध’ म्हणून स्वतःच्या धार्मिक अस्मितेला जोपासण्याच्या वृत्तीवरसुद्धा प्रकाश टाकला आहे. या कवितेत गोध्रा हत्याकांडाच्या संदर्भात एक महत्त्वाचे अवतरण आहे, ते सर्वच जातीय दंगलींबाबत समजून घेण्यासारखे आहे -
तसा सहज नसतोच माणसाचा मृत्यू
धर्माची झापडं लावल्यानंतर
अजीम नवाज राही यांच्या कवितेतील मोहल्ला आणि तेथील जीवनानंतर अशी सूक्ष्म टिपणे पवनच्या कवितेतून दिसतात. या संग्रहातील बहुतांश कविता मुक्तछंदात असल्या तरी त्यात एक लयबद्धता आहे. मुक्तछंदासह यमक आणि लयबद्धता वापरून गेयतेकडे जाणाऱ्या कविताही तितक्याच प्रभावी आणि आशयघन आहेत.
निखळलेल्या ताऱ्यांतून
साकारता येतो का
मनोरथाचा सप्तर्षी?
‘दृष्टीवंत्या’सारख्या कवितेत स्त्री फुटलेल्या आकाशाच्या आरशात तुटलेले बाजूबंद पाहताना दिसते, तर ‘आजीबाई’मधून आजीच्या रूपातील भावनिक नात्याची स्त्री हरवल्याची वेदना दिसते. ‘बाईचं जगणं : दहा कविता’ यातून बाई कशी असते, हे सांगत पवन बाईला ‘काळी माती’, ‘दुरडीतली अर्धी भाकर’ अशा शब्दांत गौरवतो. तो स्त्रियांबद्दल जितकं भरभरून लिहितो, तितक्या मोकळ्यापणाने पुरुषांची मनोव्यथाही मांडतो.
कविता जगण्याचा आणि जीवनाचा एक भाग असते. त्यामुळे त्याचे संदर्भ पवनच्या काव्यात उतरत राहतात. पेशाने शिक्षक असल्याने त्याच्या कवितेत शाळा आणि शिक्षण स्वाभाविकपणे येतात.
बालपण हरवलेली मुलं
फिरवतायत कचऱ्यात भेटलेली बाबागाडी
मोठया उत्साहाने
काही नवजात लुचतायत फाटलेल्या
ब्लाऊजमधून उघड्या पडलेल्या स्तनातील
आटलेले दूध
पवनला हे भटके आणि उपासमारीत फिरणारे जीवन व्यथित करते. समाजाचा हा भेसूर चेहरा खरोखर फार भयावह आहे. ‘शाळा : काही नोंदी’ ही अतिशय भावपूर्ण अशी कविता या संग्रहात आहे.
समजून घेतला मानवी उन्मादाचा भूगोल
इतिहासाच्या कानांमधून वाहणारा तप्त लाव्हा
गणिताच्या तासिकेत
गरिबीच्या चक्रवाढ व्याजात अडकून पडलेली
प्रश्नांकित चेहऱ्याची फुलपाखरं
अशीच आणखी एक अस्वस्थ करणारी कविता म्हणजे ‘देशच झाला काळा’ -
विद्यार्थी निवडत असतात खिचडीतल्या अळ्या
मेळघाटात पोटं होतात भाकरीसारखेच सपाट
या ओळीतून शाळा, शाळेतील पोषण आहार योजना, मेळघाटातील कुपोषण अशा अनेक बाबींवर पवन प्रकाश टाकतो.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
वर्तमानाच्या वास्तव स्वरूपाला अधोरेखित करणाऱ्या सांस्कृतिक, राजकीय आणि सामाजिक अंगाच्या कवितांसोबत जीवनाचे आणि मनाचे भावकल्लोळ ‘मी संदर्भ पोखरतोय’मध्ये दिसतात. प्रामाणिकपणे पोखरले तर दगडातून अजिंठा आणि वेरूळ उभे राहते. निव्वळ अधाशीपणे पोखरत राहिले तर बाहेरून सुबक आणि आकर्षक दिसणारी लाकडे आतून वाळवीने पोखरून ठेवलेली असतात. ‘पोखरणे’ दोन्ही ठिकाणी आहे. सकारात्मक आणि नकारात्मक! मात्र पवनच्या ‘संदर्भ पोखरण्या’तून भावनेचा अजिंठा जन्मास आला आहे, असे म्हणावेसे वाटते. त्यांच्या पुढील शब्दांच्या कोरीवकामास खूप खूप शुभेच्छा!
राजहंस प्रकाशनाने या संग्रहाची सुंदर निर्मिती केली आहे. चंद्रमोहन कुलकर्णी यांनी साजेशे मुखपृष्ठ केलेय. ज्येष्ठ समीक्षक दा.गो. काळे यांची अभ्यासपूर्ण अशी प्रस्तावना आहे.
‘मी संदर्भ पोखरतोय’ - पवन नालट
राजहंस प्रकाशन, पुणे, पाने – १५६, मूल्य – २८० रुपये.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment