अजूनकाही
ज्या पुस्तकाची आतुरतेने वाट पाहत होतो, ते नुकतेच प्रकाशित झाले आहे. १६ मे २०२० रोजी पेंग्विन प्रकाशनातर्फे पत्रकार सुधीर सूर्यवंशी लिखित ‘चेकमेट - हाऊ द बीजेपी वोन अँड लॉस्ट महाराष्ट्र’ हे इंग्रजी पुस्तक बाजारात आले. एका ऐतिहासिक राजकीय नाट्याची मीमांसा या पुस्तकात चपखलपणे केली आहे. उभा महाराष्ट्र झोपेत असताना महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर पहाटे पहाटे आश्चर्यकारकरित्या शपथविधी घडला आणि सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक क्षेत्रातील मातब्बर, तसेच सामान्य माणूस अवाक् झाला. त्या संपूर्ण नाट्याचे पत्रकाराच्या नजरेतून केलेले रोमहर्षक व उत्कंठावर्धक विश्लेषण म्हणजे हे पुस्तक.
पण इंग्रजी भाषेमुळे या पुस्तकाच्या आस्वादाला मराठी वाचक मुकला होता. नुकताच डायमंड पब्लिकेशनने या बहुचर्चित पुस्तकाचा मराठी अनुवाद प्रकाशित केला आहे. मुक्त पत्रकार ममता क्षेमकल्याणी यांनी सार्थ असा अनुवाद केला आहे. सामाजिक-राजकीय, तसेच माध्यमांच्या वर्तुळात या पुस्तकाची बरीच चर्चा झाली\होत आहे. कारण बऱ्याच कालावधीनंतर राजकारणावर भाष्य आणि विश्लेषणात्मक मांडणी करणारे, शोधपत्रकारितेचे दर्शन घडवणारे, वाचकांचे कुतूहल वाढवणारे पुस्तक आले आहे. त्यामुळेच या पुस्तकाच्या इंग्रजी आवृत्तीला वाचकांनी उदंड प्रतिसाद दिला.
सामान्य माणसापासून ते राजकीय धुरंधरांपर्यंत, गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि परभणीपासून जर्मनीपर्यंत प्रत्येक माणूस महाराष्ट्रातल्या त्या पहाटे पहाटे झालेल्या शपथविधीने आश्चर्यचकित झाला. सारी गणिते, भाकिते आणि अंदाजांची मोडतोड करत देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाची, तर अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना लोकांनी छोट्या पडद्यावर पाहिले आणि तोंडात बोट घातले.
..................................................................................................................................................................
या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा -
https://www.aksharnama.com/client/article_detail/6766
..................................................................................................................................................................
कधी काळी क्रिकेट हा अनिश्चितता असलेला खेळ आहे असे म्हटले जायचे, मात्र अलीकडच्या काळात त्यात राजकारणाचाही समावेश झाला आहे. कोण, केव्हा, कोणाच्या गोटात सामील होईल, याचा कुठलाही भरवसा राहिलेला नाही. ‘काकांनीच पुतण्याला पाठवले आहे’ इथपासून ‘अजित पवार स्वतंत्र पक्ष उभा करत आहेत’ इथपर्यंतच्या चर्चा चवीने चघळल्या गेल्या. या राजकीय नाट्याच्या पडद्यामागील घडामोडींची सुधीर सूर्यवंशी यांनी केलेली चिकित्सा, मांडणी, तर्क आणि अंदाज खरोखरीच वाखाणण्याजोगे आहेत.
२४ नोव्हेंबर २०१९च्या दुपारनंतर लोकसभा निवडणुकीचे निकाल घोषित व्हायला सुरुवात झाली. ‘फिर एक बार मोदी सरकार’, ‘मोदी का जादू चल गया’, ‘मोदी लहर कायम आहे’, ‘मोदी हैं तो मुमकिन हैं’, असा घोष वृत्तवाहिन्यांचे निवेदक करत होते. या घटनेपासून या पुस्तकाची सुरुवात होते आणि पुढे महाराष्ट्र, महाराष्ट्राचा जन्म, शिवसेनेचा जन्म, ईडीच्या नोटिसांची राजकारण, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांना रामराम ठोकणारे नेते, ‘आमचं ठरलं आहे’ म्हणत बंद दाराआड अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांची जागावाटपासंदर्भात झालेली चर्चा आणि ‘अबकी बार २२०पार’, अशी भाजपने दिलेली ललकारी, पण निकालानंतर १०५ जागांवर थांबलेला भाजपचा अश्वमेध, त्यातून शिवसेना आणि भाजपची मुख्यमंत्रीपदावरून फिस्कटली चर्चा, ‘ऐन दिवाळीत फडणवीसांना फराळ महागात पडला’ असा संजय राऊत यांचा खोचक टोला, राजकीय पटलावर स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाची अवीट छाप पाडणारे शरद पवार यांची एंट्री, ‘टायगर अभी जिंदा हैं’, अशा विविध घडामोडींचा आढावा घेतला जातो.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
..................................................................................................................................................................
शरद पवार यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित मुलाखतीत मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी शरद पवार म्हणजे ‘महाराष्ट्राला मिळालेला आशीर्वाद आहे’ हे केलेले विधान, तीन चाकाची रिक्षा, तीन पायांची शर्यत अशी हेटाळणी करत तीन पक्षांचे सरकार जुळवताना होणारी दमछाक, त्यात महाविकास आघाडीत सामील व्हायचा सोनिया गांधींचा स्पष्ट नकार, महाराष्ट्रात ‘ऑपरेशन कमळा’चा बोलबाला, तरीही महाविकास आघाडीचा यशस्वी प्रयोग आणि तो साकारताना जयपूरमधील रिसॉर्टमधील गमती- जमती, पवार कुटुंबातील फूट, मध्य प्रदेशातील नालखेडामधील माता बागलमुखी मंदिराच्या पुजाऱ्याला बोलावून पहाटे चार वाजता फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ‘मिरची हवन’ करून पुन्हा सत्ताप्राप्तीसाठीचा प्रसिद्ध विधी केला.
माता बागलमुखी ही एक हिंदू तंत्र देवता आहे. उत्तराखंडामधील हरीश रावत यांचे सरकार वाचवण्यासाठी अशा प्रकारचा हवन करण्यात आला होता आणि त्यांचे सरकार वाचले होते, असा समज आहे. तेव्हापासून हा विधी राजकारणी आणि उद्योगपती यांच्यात प्रसिद्ध झाला आहे. हवन होताच तांत्रिकाला भरगच्च दक्षिणा देऊन विमानाने परत पाठवण्यात आले. याचे सर्व नियोजन प्रसाद लाड यांनी केले होते.
इतिहासकार इंद्रजित सावंत यांच्या प्रतिपादनानुसार शिवकाळामध्ये औरंगजेबाने रजपूत राजा मिर्झाराजा जयसिंगला शिवाजीमहाराजांच्या विरोधात पाठवले असताना जयसिंगाने असाच बागलमुखीचा ‘मिरची हवन’ हा विधी केल्याची नोंद इतिहासातील बखरीत सापडते.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ (२५० रुपये), ‘मायलेकी-बापलेकी’ (२९५ रुपये) आणि ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ (३०० रुपये) ही तीन ८४५ रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
.............................................................................................................................................................
असा हा मिरची हवन विधी, चांद्यापासून बांद्यापर्यंत २३ नोव्हेंबरच्या पहाटेच्या शपथविधीने काहीसे आश्चर्यचकित झालेले आणि गारद झालेले मराठी माणसाचे मन, २६ नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयाने खुल्या मतदान पद्धतीच्या बाजूने दिलेला निकाल, गुडगावमधील नाट्यमय बचाव मोहिमेत सोनिया दुहान या राजकीय कार्यकर्तीने जीवाची बाजी लावत दाखलेले धाडस आणि धीरज शर्मा यांची मिळालेली साथ, अजित पवार यांची घरवापसी, ‘बाबा, तुम्हाला आव्हान स्वीकारावे लागेल’, अशी आदित्य ठाकरे यांची पित्याला आर्तहाक, महाराष्ट्राच्या राजकारणात तरुण-तडफदार आमदार आणि मंत्री यांचा प्रवेश, अशा कितीतरी रोमहर्षक घटनांची मुद्देसूद मांडणी सुधीर सूर्यवंशी यांनी तरल संवेदनशीलपणे या पुस्तकात केली आहे.
तार्किक आणि चिकित्सकपणे केलेली ही मांडणी या पुस्तकाची सर्वांत जमेची बाजू आहे. प्रत्येक घटनेची सांगोपांग माहिती देताना सुधीर सूर्यवंशी यांनी घटनांची घेतलेली चिकित्सक नोंद, त्याचबरोबर कोणत्याही पक्षाविषयी ‘बायस’ न होता केलेले लिखाण महत्त्वाचे आहे. जे घडले त्याचा माग काढत त्यांनी शोधपत्रकारितेचे सडेतोड दर्शन घडवले आहे.
इलेक्ट्रॉनिक्स मीडिया सत्तेचा दावणीला बांधला गेला आहे, असा सूर सर्वसामान्य माणूस उघडपणे व्यक्त करत असताना प्रिंट मीडियाने दाखवलेला प्रामाणिकपणा लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला जिवंत ठेवण्याचे अनमोल काम करत आहे. त्यातला एक पत्रकार सत्यान्वेषी भूमिकेतून एखाद्या राजकीय नाट्याची मांडणी करून पुस्तक लिहितो आणि त्याची जोरदार चर्चा होते; त्यातून प्रिंट मीडिया चिरंतन आहे याचाच प्रत्यय येतो. ज्येष्ठ पत्रकार-प्राध्यापक जयदेव डोळे यांचे पट्टशिष्य असल्याने सुधीर सूर्यवंशी यांच्याकडून तटस्थ मांडणी अभिप्रेतच होती. या पुस्तकावर येत्या काळात चित्रपट किंवा नाट्यनिर्मिती झाली तर आश्चर्य वाटायला नको.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
................................................................................................................................................................
पुस्तकाचा अनुवाद करणे म्हणजे निव्वळ भाषांतर नव्हे; तर मूळ लेखनातील तत्त्व आणि सत्त्व हरवू न देता एक भाषिक संयुग आकाराला यावे लागते. शब्दाशी शब्द असा अनुवाद रटाळ आणि कंटाळवाणा होतो. शब्दांची सार्थकता अनुवादात आली तरच वाचक पुस्तकवाचनात तल्लीन होतो. तो धागा अनुवादक म्हणून ममता क्षेमकल्याणी यांनी खुबीने आणि कौशल्याने सलग राखला आहे.
शेतकरी मजूर कुटुंबातून पुढे आलेल्या पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांनी इंग्रजी पत्रकारितेत आपला ठसा उमटवला आहे. गावखेड्यांतील तरुणांसाठी ही गोष्ट प्रेरणादायी आहे. राज्याची राजधानी मुंबईत प्रसारमाध्यमांची सतत जीवघेणी म्हणावी अशी स्पर्धा चालू असते. त्यामुळे पत्रकारांना काम करताना खडतर कसरत करावी लागते. त्यात सुधीर सूर्यवंशी यशस्वी झाले आहेतच; पण या पुस्तकाने लेखक म्हणून त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. राजकारणावर भाष्य करताना नेहमी प्रभुत्वाचे राजकारण आडवे येते, पण त्याला न जुमानता ‘बरे लिहिण्यापेक्षा खरे’ लिहिण्याचे धाडस या गावखेड्यातील पत्रकाराच्या अंगी येणे, हा भारतीय संविधानाचा विजय आहे, असे वाटते.
इंग्रजी आवृत्तीप्रमाणे मराठी आवृत्तीचेही वाचक स्वागत करतील असा विश्वास वाटतो.
‘चेकमेट - निवडणूक जिंकूनही भाजपने महाराष्ट्रातील सत्ता का गमावली?’ - सुधीर सूर्यवंशी
अनुवाद : ममता क्षेमकल्याणी
प्रकाशक : डायमंड पब्लिकेशन्स, पुणे
पाने : २९०, मूल्य : २९९ रुपये.
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
लेखक प्रा.डॉ.सत्यजित साळवे जळगावच्या ‘डॉ. अण्णासाहेब.जी.डी. बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे प्रमुख आहेत.
satyajitsalve77@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment