‘जैतापूर ते पॅरिस व्हाया बर्लिन’ : अणु-ऊर्जेला विरोध या एकाच ध्येयानं पछाडलेल्या, एकाच विचारानं भारावलेल्या लोकांबरोबरचा समृद्ध प्रवास
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
मकरंद जोशी
  • ‘जैतापूर ते पॅरिस व्हाया बर्लिन’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Wed , 19 May 2021
  • ग्रंथनामा शिफारस जैतापूर ते पॅरिस व्हाया बर्लिन Jaitapur Te Paris Vhaya Berlin प्रदीप इंदुलकर Pradeep Indulkar

प्रवासवर्णन हा साहित्य-प्रकार मराठीमध्ये इतका रुळला आहे की, अनेकदा त्यातील कृतक वर्णनांमुळे त्या त्या ठिकाणांविषयी उत्सुकता निर्माण होण्याऐवजी चक्क नकारात्मक भावना निर्माण होते. मात्र जेव्हा जेव्हा प्रवास करणाऱ्या व्यक्तीचा हेतू केवळ विरंगुळा म्हणून, मौजमजेसाठी म्हणून प्रवास करणं, हा नसतो, तेव्हा तेव्हा त्या व्यक्तीनं लिहिलेलं प्रवासवर्णन रंजक आणि वाचनीय तर असतंच, पण त्यामुळे ऐकलेल्या, पाहिलेल्या देशाचं-प्रदेशाचं वेगळंच दर्शन घडतं… जे कदाचित तुमचा दृष्टिकोन बदलायला भाग पाडू शकतं. काहीसा असाच अनुभव प्रदीप इंदुलकर यांनी लिहिलेलं ‘जैतापूर ते पॅरिस व्हाया बर्लिन’ हे पुस्तक वाचताना येतो.

मुळात प्रदीप इंदुलकर हे नाव परिचयाचं असेल तर हे साचेबद्ध पठडीतलं आणि सरधोपट प्रवासवर्णन असणारच नाही, हे सांगायला नकोच. ठाणे शहरात तोडल्या जाणाऱ्या झाडांपासून ते सार्वजनिक जागेवर उभारल्या जाणाऱ्या व्यावसायिक संकुलांपर्यंत विविध नागरी प्रश्नांवर आवाज उठवणारे, न्यायालयात धाव घेऊन सरकारी यंत्रणेला हलवणारे सामाजिक कार्यकर्ते म्हणून इंदुलकर प्रसिद्ध आहेत.

त्यांचं हे पुस्तक अशाच एका चळवळीसाठी बनवलेल्या माहितीपटामुळे घडलेल्या युरोप प्रवासाची निष्पत्ती आहे. त्यामुळे या पुस्तकात अणुविरोधी चळवळीचा प्रवास जसा वाचायला मिळतो, त्याचबरोबर फ्रान्स आणि जर्मनी या दोन देशांमधील प्रवासात भेटलेली माणसं त्यांच्या रंगरूपांसह साकार होतात.

जैतापूर इथं होणाऱ्या अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात स्थानिकांनी सुरू केलेल्या आंदोलनात प्रदीप इंदुलकर सहभागी होते. या प्रकल्पात फ्रान्सच्या अरेवा कंपनीबरोबरच अन्य देशांमधील अनेक कंपन्या सहभागी होणार होत्या. या सगळ्यांना जैतापूरचं वास्तव कळावं, या प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध का आहे, हे जगभरातील समविचारी लोकांना समजावं, म्हणून इंदुलकरांनी ‘हाय पॉवर’ या नावानं एक माहितीपट बनवला. त्यामध्ये तारापूर अणुऊर्जा प्रकल्पग्रस्तांचीही फरपट दाखवण्यात आली आहे.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

मात्र या माहितीपटाला भारतीय सेन्सॉर बोर्डानं प्रमाणपत्र नाकारलं, पण ब्राझीलमध्ये भरणाऱ्या युरेनियम फेस्टिव्हलमध्ये याच माहितीपटाला ‘यलो ऑस्कर’ मिळालं. त्यानंतर आता हा माहितीपट जगभरातील अणुविरोधी चळवळीच्या व्यासपीठावर नेण्याची धडपड सुरू झाली आहे. जर्मनी आणि फ्रान्समध्ये अणुविरोधी चळवळीच्या माध्यमातून या माहितीपटाचे शोज ठरवण्यात आले आणि त्यासाठी प्रदीप इंदुलकरांनी जो प्रवास केला, त्याचं फलित म्हणजे ‘जैतापूर ते पॅरिस व्हाया बर्लिन’ हे पुस्तक.

जर्मनीमधील म्युनस्टर, डुईसबोर्ग, फ्रायबोर्ग, म्युलहाइम, इजरलोन, कार्लसृह, लुट्विग्सबर्ग, ओल्डनबोर्ग, बर्लिन, गॉर्लिबन, फ्रँकफर्ट, मुरहार्ट, विजबादन, म्युनिक, बॅम्बर्ग, न्युबर्ग, कॉन्स्टान्स, हॅम्बुर्गया शहरांमध्ये आणि फ्रान्समधील कोलमार, बजंसॉं, ब्युर, नॉंसी, ॲन्सी, मियो, ब्रियुड, लाव्हलसेंट लॉरेल, रेन, फ्लेर, पॅरिस, या शहरांमध्ये ‘हाय पॉवर’ या माहितीपटाचे शो आयोजित करण्यात आले होते. त्यामुळे प्रदीप इंदुलकर या सगळ्या शहरांमधून तिथल्या स्थानिकांबरोबर फिरले, त्यांच्या घरी राहिले. साहजिकच हा सगळा प्रवास एकाच ध्येयानं (अणु-ऊर्जेला विरोध) पछाडलेल्या, एकाच विचारानं भारावलेल्या लोकांबरोबरचा आहे.

‘हाय पॉवर’ या माहितीपटाचे जे शो आयोजित करण्यात आले होते, ते सगळे काही सिनेमा थिएटर्समध्ये नव्हते, बहुतेक शो एखाद्या कॅफेत किंवा चळवळीच्या सभागृहात झाले. या सगळ्या प्रवासात इंदुलकरांना जर्मनी आणि फ्रान्समधील अनेक माणसं जवळून पाहायला मिळाली, त्यांच्या घरी राहायला मिळालं, त्यांच्याबरोबर प्रवास करता आला, खात-पिता आलं, गप्पा मारता आल्या, चर्चा करता आल्या… या सगळ्याचं फार सुंदर आणि मनोवेधक कवडसे या लेखनात पडले आहेत.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

व्यावसायिक लाकुडतोड्या आणि रसिक वाचक, संगीतप्रेमी असलेला मायकल, व्यवसायानं शिक्षिका असून आवड म्हणून फायर आर्टिस्ट म्हणून शोज करणारी स्टेला, मुळातली इंजिनिअर असलेली नेपाळी भाषा शिकून नेपाळमध्ये जाऊन प्रोजेक्ट केलेली आणि आता पॅरिसच्या आउट्स्कर्टवर शेती करणारी ॲना, फ्रेंच ट्रॅव्हल कंपनीसाठी गाईड म्हणून काम करणारा ३६ वेळा भारतात आलेला आणि राजस्थानी खिडक्यांपासून ते मुंबईच्या कटिंग चायच्या ग्लासेसपर्यंत भारतीय वस्तूंनी घर सजवणारा इव्ह, फक्त इंटरनेटवरच्या संपर्कातून फ्रान्समध्ये ‘हाय पॉवर’चे १३ शो आयोजित करणारा आणि त्यासाठी स्वतःच्या गाडीतून प्रदीप इंदुलकरांना सगळीकडे नेणारा आंद्रे… अशा माणसांमुळे हा सगळा प्रवास जिवंत झाला आहे.

जर्मनी आणि फ्रान्स या दोन्ही देशांत अणुविरोधी चळवळ मोठ्या प्रमाणात चालवली जाते. या चळवळीतील कार्यकर्त्यांचं, त्यांच्या कार्यशैलीचं, आंदोलनांचं, मिरवणूक-मोर्चा-सभा यांचं जे वर्णन येतं, त्यामुळे या चळवळीचा प्रवास काही प्रमाणात उलगडतो.

इंदुलकरांचा हा दौरा स्थलदर्शनासाठी नसल्यानं त्यात आयफेल टॉवर, शॉंज लिझे, लूव्र म्युझियम, ब्रॅनडेनबर्ग गेट, राइशस्टॅग, बर्लिन वॉल म्युझियम अशा ठिकाणांचा समावेश अर्थातच नव्हता. मात्र अणुविरोधी चळवळ चालवणाऱ्या लोकांची ॲक्टिव्हिटी सेंटर्स, सौर ऊर्जेवर चालणारे कारखाने, अणुकचरा साठवण्याची रिपॉझिटरी, अणुऊर्जेचं समर्थन करणाऱ्या राजकारण्यांची स्मशानभूमी (जी चळवळीतील लोकांनी त्यांचा विरोध व्यक्त करायला उभारली आहे), अशा काही अत्यंत वेगळ्या जागांचं (आणि जगाचंही) दर्शन इंदुलकर वाचकांना घडवतात.

सामाजिक चळवळीत आणि त्यातही पर्यावरणवादी विचारधारेत काम करत असल्यानं इंदुलकर त्यांच्या या प्रवासात त्यांना जाणवलेल्या, दिसलेल्या तिथल्या समाजजीवनातील विसंगतीही वाचकांसमोर कोणतंही भाष्य न करता ठेवतात. लोकांनी टाकलेल्या प्लॅस्टिक बॉटल्स गोळा करून मॉलला विकण्यासाठी रात्रीच्या अंधारात टॉर्च मारत फिरणारी व्यक्ती, सिनिअर सिटीझनच्या मदतनिसाचं सवलतीचं तिकिट विकून दोन पैसे जोडणारा म्हातारा, संपन्न शहरातले फुटपाथवरचे बेघर, यांचे अनुभव जसे इंदुलकर मांडतात, त्याचप्रमाणे काही ठळक विरोधाभासही दाखवतात.

एकिकडे अणुऊर्जेचे दुष्परिणाम टाळण्यासाठी सौर ऊर्जेचा पुरस्कार करणारे लोक तिथं आहेत, नैसर्गिक पद्धतीने इंधन खर्च न करताही इमारतीचं तापमान कायम राखण्यासाठी तशी वास्तूशैली विकसित करणारे लोक तिथं आहेत, इंदुलकरांची फिल्म पाहिल्यावर तारापूरच्या प्रकल्पग्रस्तांसाठी आम्ही काय करू शकतो, असं डोळ्यात पाणी आणून विचारणारे लोक तिथं आहेत, त्याच समाजात बटाटे, मका यांच्या भरघोस पिकांसाठी अतिरिक्त प्रमाणात रासायनिक खतं वापरून जमीन आणि पाणी प्रदूषित करणारेही आहेत.

काही पिढ्यांपूर्वी जर्मनीत आलेल्या कष्टकरी तुर्की लोकांना हुसकावून लावण्यासाठी सरकारी यंत्रणांची मदत घेणाऱ्या कंपन्याही याच देशात आहेत. कृष्णवर्णियाला ऑफिसला वेळेवर पोहोचता येऊ नये आणि त्याची नोकरी जावी म्हणून विनाकारण अडवून चौकशीचं नाटक करणारे पोलीसही याच देशात आहेत. अर्थात महिनाभराच्या धावत्या दौऱ्यात दिसलेल्या काही प्रसंगांमुळे त्या संपूर्ण देशाचं, तिथल्या नागरिकांचं मूल्यमापन करणं योग्य नसल्याची जाणीव इंदुलकरांना आहे. म्हणूनच ते यावर कोणतीही टिप्पणी करत नाहीत.

या दौऱ्याच्या शेवटी इंदुलकर पीटरला म्हणतात की, जर्मनी एक श्रीमंत देश आहे, पण गेल्या दोन आठवड्यांच्या प्रवासात मला ही श्रीमंती कुठेच दिसली नाही. भारतीय शहरं, त्यातील जगणं आणि इथलं जगणं मला बऱ्यापैकी सारखंच दिसलं... त्यावर पीटरने दिलेलं उत्तर जसं इंदुलकरांना अंतर्मुख करतं, तसंच वाचकांनाही नवी दृष्टी देतं… आणि हेच या प्रवासवर्णनाचं फलित म्हणता येईल. 

या पुस्तकातील लक्षवेधी भाग आहे, तो ‘हाय पॉवर’ पाहिल्यानंतर होणाऱ्या प्रश्नोत्तरांचा. जपानच्या फुकुशिमा अणु-दुर्घटनेपासून ते भारतातील कुडनकुलम अणु-प्रकल्पापर्यंत जगभरातील अणु-प्रकल्पांची साद्यंत माहिती असलेले श्रोते, भारतासारख्या नैसर्गिक स्रोतांनी परिपूर्ण असलेल्या देशानं अणु-ऊर्जेचा पर्याय का निवडावा, याबाबत त्यांना वाटणारं कुतूहल, भारतातील अहिंसक आंदोलनं-सत्याग्रहाबाबतची त्यांची भूमिका, अशा विविध पैलूंचं दर्शन या प्रश्नोत्तरांमधून घडतं.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊसने ‘जैतापूर ते पॅरिस व्हाया बर्लिन’ हे पुस्तक प्रकाशित करून एक प्रकारे तारापूर आणि जैतापूरच्या लोकचळवळीला आधारच दिला आहे. या पुस्तकामुळे निदान मुंबईजवळच्या तारापूरच्या प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न आजही सुटलेले नाहीत, याची जाणीव जास्तीत जास्त लोकांना नक्की होईल आणि जैतापूरच्या आंदोलनाकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलू शकेल.

पुस्तकाच्या सुरुवातीला ‘हाय पॉवर’ आणि ‘जैतापूर लाईव्ह’ हे माहितीपट बघण्यासाठी ‘क्यू आर कोड’ दिले आहेत. त्यांचा उपयोग अवश्य करावा. त्यामुळे या पुस्तकाची तीव्रता समजू शकेल.

या पुस्तकात तुकड्या तुकड्यांमध्ये ‘हाय पॉवर’ या माहितीपटाची निर्मिती कथा येते. आता इंदुलकरांनी ती सलग लिहावी आणि लोकचळवळीला लोकाधार कसा मिळत जातो, याचं आदर्श उदाहरण जगासमोर ठेवावं.

‘जैतापूर ते पॅरिस व्हाया बर्लिन’ - प्रदीप इंदुलकर

मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, मुंबई

मूल्य – ४०० रुपये.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5315/Jaitapur-Te-Paris-Via-Berlin

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे.......

जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक.......