अविनाशला एका क्षणासाठी एक गहन सत्य कळले. मानवता हे सर्वोच्च मूल्य आहे. अंतिम मूल्य आहे. बाकी कुठलीही मूल्ये ही महत्त्वाची असली तरी दुय्यम आहेत
संकीर्ण - व्यंगनामा
श्रीनिवास जोशी
  • प्रातिनिधिक चित्र
  • Mon , 03 May 2021
  • संकीर्ण व्यंगनामा कोविड-१९ Covid-19 करोना Corona करोना व्हायरस Corona Virus लॉकडाउन Lockdown ऑक्सिजन Oxygen ऑक्सिजन सिलिंडर Oxygen Cylinder

आज ३० एप्रिल २१२१. बरोबर शंभर वर्षांपूर्वी बखरकार शिरोजी याने बखर लिहायला सुरुवात केली. तो काळ मोठा खळबळीचा होता. हिंदू धर्माच्या रक्षणाची जबाबदारी ‘हिंदुत्ववाद’ नावाच्या राजकीय तत्त्वज्ञानाने घेतली होती. शिरोजी ज्यांचा उल्लेख मोदीजी असा करतो, ते म्हणजे तत्कालीन भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी होत. आज त्यांचे नाव राजकीय विश्लेषक सोडून कुणाला माहीत असणे अवघड आहे. परंतु तत्कालीन भारतात त्यांनी मोठी खळबळ उडवून दिली होती. पुढे ‘हिंदुत्ववाद’ या राजकीय विचाराची नौका विशाल हिंदू धर्माच्या सागरात गडप झाली. नौकेला सागराचे रक्षण कसे करता येणार? सागराला रक्षणाची गरज नसते. असे करणे म्हणजे एखाद्या महावृक्षावर राहणाऱ्या पाखरांनी त्या महावृक्षाचे रक्षण करण्यासारखे आहे. ‘हिंदुत्ववादा’ची जागा पुढे ‘हिंदू आंतरराष्ट्रीयवाद’ या फार मोठ्या, विशाल, सौहार्दपूर्ण, अहिंसक आणि सहिष्णुतावादी तत्त्वज्ञानाने घेतली ही गोष्ट वाचकांच्या परिचयाची आहेच. असो.

आम्हाला ही बखर त्या काळात वैचारिक लिखाणासाठी प्रसिद्ध असलेल्या ‘अक्षरनामा’ या वेब पोर्टलच्या जुनाट सर्व्हरवर सापडली. ती आम्ही वाचकांच्या हवाली करत आहोत. एक महत्त्वाचा ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून ही बखर बाविसाव्या शतकात मान्यता पावेल, याबद्दल आम्हाला शंका नाही. एकविसाव्या शतकाच्या पहिल्या तीस वर्षांतील राजकीय आणि सामाजिक जीवनाचे ही ‘शिरोजीची बखर’ म्हणजे जिवंत हुंकार आहेत. शिरोजीने तत्कालीन सामान्य माणसांची जीवने या बखरीत आपल्या तटस्थ लेखणीने टिपली आहेत.

एवढी तटस्थता या बखरकारात त्या ध्रुवीकरण झालेल्या काळात कुठून आली, हा मोठा संशोधनाचा विषय आहे. या विषयावर आम्ही एक प्रबंध लवकरच लिहिणार आहोत. असो. हे शिरोजी म्हणजे तत्कालीन लेखक श्रीनिवास जोशी असावेत आमचा होरा आहे. कारण ‘अक्षरनामा’मध्ये शिरोजीची बखर श्रीनिवास जोशी या नावाने प्रसिद्ध झालेली दिसते. या श्रीनिवास जोशी यांच्या नावाची त्यांच्या कालखंडातील वर्तमानानेच दखल घेतली नव्हती. त्यामुळे अर्थातच इतिहासानेही त्यांची दखल घेतलेली नाही. शिवाय नावांचा ग्रास करण्याची इतिहासाची भूक मोठी प्रचंड असते, हे वाचकांना माहीत आहेच. श्रीमान नरेंद्र मोदी या त्या काळातील सर्वांत प्रसिद्ध नावाचाच इतिहासाने ग्रास केला आहे. त्यापुढे हे श्रीनिवास जोशी कोण? असो. सर्व्हरवरून जसजशी ही प्रकरणे आम्ही डी-कोड करू शकू, तसतशी ही प्रकरणे आम्ही वाचकांच्या हवाली करणार आहोत.

आपला,

श्रीमान जोशी

संपादक - शिरोजीची बखर.

............................................................................................................................

शिरोजीची बखर

प्रकरण पहिले

भक्ताला लागलेला छोटा धका -

अविनाश वाघ हे तसे फर्मास प्रकरण होते. याचा जगातील सर्व कॉन्सपिरसी थिअरीजवर विश्वास होता. सगळ्या जगात फक्त कट कारस्थाने चालली आहेत, यावर त्याचा विश्वास होता.

त्याचे हिंदू जीवनपद्धतीवर अपार प्रेम होते. हिंदू धर्मातील ग्रंथ, सणवार, देव-देवता, ध्वज-पताका ही या जगातील सर्वोच्च संस्कृतीची प्रतीके आहेत, असे त्याला वाटत होते. या सगळ्या गोष्टींचे प्राणपणाने रक्षण केले गेले पाहिजे, अशी त्याची मनोधरणा होती. या जीवन पद्धती विरुद्ध काही हालचाल होत असेल, तर ती वेळीच रोखली गेली पाहिजे, असे त्याला वाटत होते. हिंदू धर्माविरुद्ध सतत कट-कारस्थाने होत आहेत, असे त्याचे मत झाले होते.

या जगात रात्रंदिवस फक्त कट-कारस्थाने केली जात असतात अशी तुझी धारणा झालीच कशी, असा प्रश्न अविनाशचा मित्र त्याला विचारत असे. या मित्राचे नाव समर असे होते. हा डाव्या विचारसरणीचा होता. समर अविनाशला सांगत असे की, माणसाच्या मनात संशय घुसला असेल तर त्याला कट-कारस्थानांची सतत भीती वाटत राहते. माणूस संशयी का होतो, असा पुढचा प्रश्न समर उपस्थित करायचा. त्यावर समरच उत्तर द्यायचा की, कशाचे तरी रक्षण व्हावे, असे माणसाला मनापासून वाटत रहिले तर अशी भीती तयार होते.

यावर अविनाश समरला इस्लामचा ‘एजंट’ म्हणायचा.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

अविनाशचा अजून एक मित्र होता. भास्कर. हा पूर्वाश्रमीच्या डावा होता. त्याने जीवनात कुठल्याही सामाजिक आणि राजकीय कडवेपणाचा त्याग केला होता. त्याने जीवनाच्या समुद्रात कम्युनिस्ट विचारसरणीची नौका डुबलेली पाहिली होती. तेव्हापासून त्याने तटस्थ ज्ञानाची कास धरली होती.

एके दिवशी भास्कर अविनाशला म्हणाला की, तुला मुसलमान हिंदूंना ‘ओव्हरटेक’ करून भारतात मेजॉरिटीमध्ये जातील असे वाटते आहे ना? ठीक आहे. आपण एक गणित करू. तो म्हणाला की, गेल्या सेन्ससप्रमाणे भारतात हिंदू दर वर्षी १.५५ टक्क्यांनी वाढत आहेत. आज भारतात हिंदू जवळ जवळ ऐंशी टक्के आहेत. भारतात मुसलमान दर वर्षी २.२ टक्क्यांनी वाढत आहेत. आज भारतात मुसलमान साधारण १४.५ टक्के आहेत. आता तू गणित कर. ८० टक्के लोक १.५५ ने वाढत आहेत आणि १४.५ टक्के लोक २.२ने वाढत आहेत, तर अजून ५० वर्षांनी भारतात किती टक्के हिंदू आसतील. गणित कागदावर मांडून भास्कर अविनाशला दाखवून दिले की, याच गतीने मुसलमान आणि हिंदू वाढत राहिले तर २०७१ साली भारतामध्ये हिंदू ८१ टक्के असतील.

यावर अविनाश म्हणाला की, बघ ते आपल्यापेक्षा जास्त वेगाने वाढत आहेत.

त्यावर भास्कर म्हणाला की, १९९१ ते २००१ या दशकात हिंदू १.८ टक्क्यांनी वाढत आहेत, ते आता १.५५ टक्क्यांनी वाढत आहेत. आणि त्या काळात मुसलमान २.८ टक्क्यांनी वाढत होते, ते आता २. २ टक्क्यांनी वाढत आहेत. म्हणजे हिंदूंच्या वाढीचा वेग ०.२५ ने कमी झाला, तर मुसलमानांच्या वाढीचा वेग ०.६०ने कमी झाला. जसे जसे एखाद्या समाजाचे जीवनमान आणि शिक्षण वाढते, तसा तसा त्याच्या वाढीचा वेग कमी होतो. कमी मुलेमुली असतील तर चांगले आयुष्य जगता येते, हे लोकांना कळते.

अविनाश भास्करला म्हणाला की, तू भारताचा इतिहास नीट लक्षात घेतलास तर तू ही बडबड करणार नाहीस.

भास्कर म्हणाला की, इतिहासच जर बघायचा असेल तर फक्त मुसलमानी आक्रमणांचा इतिहासच का बघायचा? लोकसंख्येची वाढ जगात कशी कशी होत गेली आहे, हा इतिहास का नाही बघायचा? भास्करने नेटवरून त्याला भारताच्या लोकसंख्यावाढी विषयीचे अनेक स्टडीज डाऊनलोड करून मेल केले. त्या सगळ्या स्टडीजचा अभ्यास करायला सांगितले.

अविनाशने त्याला त्यावर महंमद घोरीने सोमनाथ मंदिर कसे लुटले, त्याविषयीचे मेसेजेस पाठवले.

तू मुसलमानांचा एजंट आहेस, असे अविनाश भास्करला म्हणाला.

जी गोष्ट इतिहासाने अनेकवेळा दाखवली आहे, जी गोष्ट डोळ्यासमोर दिसत आहे, त्या गोष्टीचा अभ्यास कशाला करायचा असा विचार अविनाशच्या डोक्यात येत होता. लोकसंख्यावाढीच्या इतिहासाचा अभ्यास का नाही करायचा, या भास्करच्या प्रश्नावर अविनाश थोडा गोंधळला होता. पण भास्करला ‘मुल्ला’ वगैरे शिव्या देऊन त्याने आपल्या मनातील गोंधळ दूर केला होता. त्याने भास्करला ‘भास्करमुल्ला’ असे नाव दिले. 

अविनाशला एक स्वप्न पडत असे. संपूर्ण पुणे मुसलमान झालेले आहे. सगळे लोक डोक्याला मुसलमानी टोप्या लावून, हातात हिरव्या माळा घेऊन आकाशात बघत ‘या अल्ला या अल्ला’ असे करत रस्त्यात फिरत आहेत. अविनाशला या स्वप्नाचा चांगलाच धक्का बसत असे. स्वप्नातील पुढचा भाग बघून तर त्याला घाम फुटत असे. पुण्यातील वैशाली आणि रूपाली या हॉटेलात कबाब मिळू लागले आहेत आणि पुण्यातील बायका बुरख्याचा पडदा बाजूला करून ते कबाब खात आहेत, असा तो अविनाशच्या स्वप्नाचा पुढचा भाग होता.

यानंतर गंमतच झाली. २०१४ साली मोदीजी भारताचे पंतप्रधान झाले. अविनाशला पराकोटीचा आनंद झाला. हिंदू धर्माविरुद्ध केल्या जाणाऱ्या सगळ्या कट-कारस्थानांना पुरून उरणार नेता भारताला मिळाला होता. शिवाय आता भ्रष्ट भारतीय लोकांनी परदेशात काळा पैसा लपवला होता, तो सगळा काळा पैसा मोदीजी भारतात परत आणणार होते. भारत एक महासत्ता होणार होता. भारतात आता ‘अच्छे दिन’ येणार होते. भारत एक ‘हिंदू राष्ट्र’ होणार होता. भारत विश्वगुरू होणार होता. भारत जगाला श्रीमंती आणि संस्कृती हे एकत्र कसे नांदू शकतात, त्याचे उदाहरण घालून देणार होता.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

७० वर्षांचा काँग्रेस राजवटीचा अडसर दूर झाल्याचा आनंद और होता. मुसलमानांचे तुष्टीकरण करणारी काँग्रेस सत्तेवरून दूर गेली होती. आता मुसलमान लायनीवर येणार होते. जे देशकार्याला सहकार्य करणार होते, त्यांना सांभाळून घेतले जाणार होते. जे देशकार्याच्या आड येणार होते, त्यांना दूर केले जाणार होते. अविनाश अत्यंत आनंदात होता.

या सगळ्या राजकीय गप्पा ऐकून समर पराकोटीच्या डिप्रेशन मध्ये गेला. तो अविनाशला सांगत राहिला की, तू ज्यावर विश्वास ठेवतो आहेस, त्यातील काहीच होणार नाहिये. झाला तर फक्त लोकशाही जीवनपद्धतीचा नाश होणार आहे. समर सांगत राहिला की, काळा पैसा येणार नाही. भारत तीन वर्षात महासत्ता होणार नाही. ‘अच्छे दिन’ येणार नाहीत. हा सगळा बोलण्याचा भाग आहे. ‘बोलाचा भात आणि बोलाची कढी’!

पुढच्या सात वर्षांत अविनाश आणि समरमध्ये भीषण मेसेज युद्ध झाले.

शिव्यांच्या लखोल्या वाहिल्या गेल्या. दोघांचे रक्तदाब कीती वेळा वाढले त्याची गणतीच नाही. दोघांचा कीती वेळ वाया गेला, त्याची गणती नाही. दोघांची किती ऊर्जा गेली, त्याला गणती नाही.

भास्कर दोघांना सांगत राहिला की, काही करा पण सत्य बघण्याचा प्रयत्न करत राहा. माणुसकीचा हात विचारांच्या कुठल्याही वादळात सोडू नका.

दोघांनी ऐकले नाही. मोदी हा माणूस धनदांडग्या लोकांचा एजंट आहे, या स्वरूपाचे मेसेजेस समर पाठवत राहिला. त्यावर, समर आणि सगळे विरोधक हे मुसलमानांचे एजंट आहेत, असे मेसेजेस अविनाश पाठवत राहिला. बाकी रोज घडणाऱ्या घटनांवरून किती मेसेजेस आले आणि गेले त्याची गणनाच नाही. भारतातील सगळ्या खऱ्या खोट्या चांगल्या घटनांना नरेंद्र मोदी जबाबदार असे अविनाश म्हणत राहिला. भारतातील सगळ्या खऱ्या-खोट्या वाईट घटनांना नरेंद्र मोदी जबाबदार असे समर म्हणत राहिला. मेसेज युद्धाला अंत राहिला नाही.

हाच प्रकार भारतभर सगळ्या उजव्या आणि डाव्या विचारसरणीच्या मित्रांमध्ये या काळात सतत सुरू राहिला.

मोदींच्या बाजूचे अनेक लोक मोदींना दैवी अवतार मानत. अशा लोकांना मोदीभक्त म्हणण्याची प्रथा पडली होती. तर मोदी विरोधक त्यांना ‘फॅसिस्ट’ मानत. मुसोलिनी किंवा हिटलर यांच्यासारखेच मोदीजी आहेत, असे त्यांच्या विरोधकांचे म्हणणे होते.

(आज शंभर वर्षं झाल्यानंतर ही दोन्ही मते वाचताना किती मौज वाटते आहे ना? ही दोन्ही मते खरी नव्हती हे आपल्याला आज २१२१मध्ये मागे वळून पाहताना दिसते आहे. एखादा सामान्य पुढारी सत्तेवरून दूर होताच विस्मृतीत जतो, तसेच मोदीजींचे झाल्याचे त्यांच्या भक्त लोकांना त्यांच्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहावे लागले. भविष्याचा ठाव घेणारी दृष्टी प्राप्त करून घ्यावी लागते. त्यासाठी इतिहासाचे सूक्ष्म परिशीलन करावे लागते. शिरोजीकडे ही दृष्टी नसली तरी त्याने लिहिलेल्या भास्कर या पात्राकडे ती निश्चित होती, हे आपल्याला या बखरीत दिसून येते. आता इथे एक वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. भास्कर हे पात्र शिरोजीने स्वतःवरून बेतले असावे, असा अंदाज काही वाचक लावू शकतात. का भास्कर हा खराखुरा हाडामासांचा माणूस होता? शिरोजी आणि श्रीनिवास जोशी हे एकच होते असे मानले तर गोंधळ अजून वाढतो. असो. या तीनातील एक जण नक्की जिवंत होता आणि तो पराकोटीचा तटस्थ होता, असा निष्कर्ष सहज काढता येतो आहे. - संपादक)

२०२० साल सुरू होताच करोना व्हायरस चीनमध्ये जन्माला येऊन जगभर पसरला. तो भारतातही आला. हा व्हायरस अत्यंत संसर्गजन्य होता. संसर्ग झाल्यावर थंडी-ताप-सर्दी होत असे. तोंडाची चव जात असे. नाकाचा वास जात असे. काही लोक येथूनच परत येत असत. पण काही लोकांमध्ये हा रोग पुढच्या पातळीवर जाऊन फुप्फुसांचे नुकसान करत असे. ऑक्सिजन देणे आवश्यक होत असे. श्वास घेणे जास्तच अशक्य होऊ लागले तर रोग्याला व्हेंटिलेटरवर ठेवावे लागत असे. काही रोगी या कसल्याही उपायांचा उपयोग न होता दगावत.

करोना भारतात येताच मोदीजींनी जगातील सगळ्यात कडक लॉकडाऊन लावला. लोकांना एका संध्याकाळी वेळ देऊन टाळ्या आणि थाळ्या वाजवायला सांगितले. एका संध्याकाळी तर चक्क दिवे लावायला सांगितले!

या उपायांनी करोना कसा थांबणार हे समरला कळत नव्हते. अविनाश मात्र खुश झाला. मोदीजींसारख्या समर्थ हातामध्ये देश आहे, याचे त्याला समाधान वाटले. लॉकडाऊनमुळे संसर्गाची चेन तुटणार होती. थाळ्या आणि टाळ्या वाजवल्यामुळे भारतभर पवित्र नाद तयार होणार होता. दिव्यांमुळे पवित्र आणि तेजोमय वातावरण तयार होणार होते. भौतिक आणि आध्यात्मिक अशा दोन्ही पातळ्यांवर मोदीजी करोनावर हल्ला करत आहेत, असे अविनाशला वाटले. काही भक्तांनी मोदीजींचा भविष्य शास्त्राचाही अभ्यास असल्याचे मेसेजेस प्रसारित केले. राहू आणि केतूच्या अनिष्ट शक्तींशी मोदीजी कसे युद्ध कसे करत आहेत, याची रसभरित वर्णने भक्तांनी मेसेज मागून मेसेज पाठवून केली.

अविनाशला तर साक्षात परशुरामाची आठवण झाली. वेळ पडली तर बाणांनी आणि वेळ पडली तर शापानेसुद्धा लढणाऱ्या 'शरादपी, शापादपी' परशुरामाची आठवण! त्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले.

या सगळ्या लोकांना भुलवायच्या क्लृप्त्या आहेत, असे समरला वाटत राहिले. आपण कसे वेगळे आहोत, हे लोकांच्या मनावर बिंबवण्यासाठी मोदीजी या क्लृप्त्या आहेत, असे समरचे स्पष्ट मत होते.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

करोनाची पाहिली लाट आली आणि गेली. अमेरिका वगैरे देशांच्या मानाने ही लाट सौम्य होती. ही लाट परतवून लावण्याचे सगळे क्रेडिट मोदीजींनी घेतले.

भास्कर म्हणाला थाळ्या वाजवणे आणि दिवे लावणे या मानसिक आधार देणाऱ्या गोष्टी होत्या, असे आपण समजू आणि संशयाचा फायदा मोदीजींना देऊ. वाटला होता तेवढा हाहा:कार भारतात माजला नाही, याचेही क्रेडिट आपण मोदीजींना देऊ.

भक्तांनी या यशाच्या क्रेडिटचे पुरेपूर माप मोदीजींच्या पदरात घातले.

यात एकच गोंधळ होता, भारताने नक्की असे काय केले म्हणून भारतात ही लाट पसरली नाही, याचा अभ्यास विजयोन्मादाच्या नादामध्ये केला गेला नाही.

भारतात विजयोत्सव केला गेला. आरत्या ओवाळल्या गेल्या. भारत हे जगासाठी एक उदाहरण आहे असे बोलले गेले.

परकीय लोकांनी संशोधन करून तयार केलेल्या लशींचे उत्पादन करण्याची कंत्राटे काही भारतीय कंपन्यांना मिळाली. त्या लशींना भारतीय लसी म्हटले गेले. खरे तर संपूर्ण भारतीय म्हणता येईल, अशी एकच लस होती. तरीही भारत जगाची फार्मसी आहे असे भारतातील नागरिकांना आणि अर्थातच सगळ्या जगाला सांगितले गेले. क्रेडिट अर्थातच मोदीजींचे होते. अविनाशला पराकोटीचा आनंद झाला. समरला पराकोटीचा राग आला. भास्करने ‘प्रचार’ म्हणून या प्रकाराकडे दुर्लक्ष केले.

इतक्यात समरला करोनाने होणारा कोव्हिड-१९ हा आजार झाला. समर कसाबसा वाचला. समर देशद्रोही असल्याने आणि मोदीजींसारख्या अवतारी पुरुषाचा द्वेष्टा असल्याने त्याला कोव्हिड होणे हा काव्यात्म न्याय तर आहेच, पण दैवी न्यायसुद्धा आहे, असा मेसेज अविनाशने भास्करला पाठवला.

भारत मोदीजींच्या नेतृत्वाखालील करोनावरील विजयात मश्गुल झाला. भारताने सहा कोटी लशींच्या कुप्या इतर देशांना देऊन टाकल्या. मोदीजींच्या या निर्णयाचे भक्तांनी खूप कौतुक केले.

भास्कर अविनाशला म्हणाला, अमेरिकेने आपल्या लोकसंख्येपेक्षा जास्त कुप्या साठवल्या आहेत. भारताने तसे काही केले आहे काय? यावर अविनाश म्हणाला की, मोदीजी सगळा विचार करूनच निर्णय घेतात. भास्कर म्हणाला, मला वैयक्तिक पातळीवर हा निर्णय पटत नाहिये, पण येथेही आपण मोदीजींना संशयाचा फायदा देऊ. अविनाश म्हणाला की, मोदीजींनी भारताला नुसतेच ‘आत्मनिर्भर’ बनवले आहे असे नाही, तर मोदीजींच्या नेतृत्वाखाली आपण लशींचे नेट एक्सपोर्टर झालेलो आहोत. यावर भास्कर म्हणाला की, आपली गरज पूर्ण होऊन आपण लशी निर्यात करत असू तर आपल्याला नक्की तसे म्हणता येईल. परंतु भारतातील दोन टक्के लोकांनाही लस मिळालेली नाही, आणि आपण नेट एक्सपोर्टर झालेलो आहोत, असे कसे म्हणता येईल? त्यावर अविनाश भास्करला ‘तू ‘देशद्रोही’ आहेस आणि तुला तुरुंगात टाकले पाहिजे’ असे म्हणाला.

ही सगळी चर्चा सुरू असताना करोनाची दुसरी लाट भारतावर आली. रोजच्या रुग्णांची संख्या काही कळायच्या आत दोन लाखांवर गेली. रुग्णालये अपुरी पडू लागली. रोग्यांना ऑक्सिजन मिळेना. रेमडेसिव्हीर नावाचे औषध मिळेना. भारताच्या आरोग्य यंत्रणेवर भयंकर ताण आला. चोहोकडे हाहा:कार उडाला. रोग्यांचे नातेवाईक ऑक्सिजनसाठी, बेडसाठी, रेमडेसिव्हीरसाठी रस्तोरस्ती भटकत आहेत, अशी चित्रे वर्तमानपत्रात आणि टीव्हीवर दिसू लागली. हॉस्पिटलच्या दारात आणि आवारात रोगी तडफडत उपचारांची वाट पाहात आहेत, अशी चित्रे सर्व वर्तमानपत्रांत दिसू लागली. मृतांच्या प्रियजनांचा अनावर आक्रोश, शोक आणि संताप पाहावेना. स्मशानात चिता अहोरात्र धडधडत आहेत, अशी चित्रे भारतीय आणि आंतरराष्ट्रीय मीडियावर दिसू लागली.

या सर्व प्रकारचे खापर अविनाश आणि भक्त लोकांनी राज्य सरकारांच्या आनागोंदी कारभारावर फोडले आणि भारतविरोधी आंतरराष्ट्रीय कट-कारस्थानांवर फोडले. यावर समर आणि भास्कर नुसते हसले. करोनाची पहिली लाट गेल्याचे श्रेय मोदीजींचे असेल, तर दुसरी लाट आल्याची जबाबदारी राज्यातील सरकारांची कशी हा प्रश्न त्यांनी अविनाशला विचारला नाही.

जगभरातून ऑक्सिजन टँक मदत म्हणून दिले गेले. जर्मनीने ऑक्सिजन तयार करणारे प्लांट दिले. अमेरिकेने औषधे दिली. चीनने तांत्रिक साहाय्य द्यायची तयारी दाखवली. अगदी पाकिस्तानसारख्या शत्रूराष्ट्राने रुग्णवाहिका आणि रुग्णसेवक पाठवण्याची तयारी दाखवली.

अविनाशला आनंदाचे भरते आले. हे सगळे मोदीजींनी जगभर मैत्रीची जी ‘इकोसिस्टीम’ तयार केली आहे, त्याचे परिणाम आहेत, असे मेसेजेस त्याने समर आणि भास्करला पाठवले.

भारत ‘आत्मनिर्भर’ असेल तर या गोष्टी कशासाठी घ्याव्या लागत आहेत, हा प्रश्नसुद्धा समर आणि भास्करने अविनाशला विचारला नाही. सोशल मीडियावर मात्र भारताला ही भीक का घ्यावी लागत आहे, असे प्रश्न विचारले गेले. त्यावर असा करोनासारखा प्रश्न शतकाशतकातून एकदाच येत असल्याने असे करावे लागते, असे उत्तर दिले गेले.

त्यावर तुम्ही करोनावर विजय मनवत होता त्याच काळात दुसऱ्या लाटेची तयारी का केली नाहीत, असा प्रश्न भास्करने विचारला नाही. करोनाची दुसरी लाट येते आहे, हे इतर देशांकडे बघून कळत नव्हते का? कुठल्याही संसर्गजन्य रोगांच्या अनेक लाटा येतात हे तुम्हाला माहीत नव्हते का? हे पुढचे प्रश्नसुद्धा त्याने विचारले नाहीत.

भास्करने प्रश्न विचारणे बंद केले, कारण आता जनता प्रश्न विचारणार हे त्याला कळत होते. आणि इतके होऊनही जनता मोदीजींना प्रश्न विचारणार नसेल तर त्याला भास्करची काही हरकत नव्हती. शेवटी लोकशाही आहे. तिचा आदर झाला पाहिजे.

आपल्या आणि आपल्या प्रियजनांच्या जिवावर बेतलेले लोकांना आवडत नाही, हे समर आणि भास्करला कळत होते. कळत नव्हते ते फक्त अविनाशला.

एके दिवशी अविनाशच्या घरात करोना घुसला. आई-वडील, बायको, तो स्वतः असे सर्वजण आजारी पडले. हॉस्पिटल मिळेना, बेड्स मिळेनात. आई ऑक्सिजनवर गेली. तिला ऑक्सिजन मिळेना. अविनाशचा जीव तीळ तीळ तुटू लागला. बायकोला रेमडेसिव्हीर मिळेना. डोळ्यापुढे आपल्या कच्च्या बच्च्यांचे चेहरे दिसू लागले. पैसा पाण्यासारखा खर्च होत होता. सगळी सेव्हिंग्ज संपून गेली. त्याला स्वतःला रुग्णालयात दाखल व्हावे लागले. धाप लागू लागली. डोळ्यासमोर मृत्यू दिसू लागला. त्याला ऑक्सिजनची गरज होती. ऑक्सिजन मिळत नव्हता. मोदीजींनी उभी केलेली कुठलीही ‘इकोसिस्टीम’ इथे कामी येत नव्हती. परदेशी पाठवलेल्या सहा कोटी लशीतील सहा लशी आपल्या घरात मिळाल्या असत्या तर आपल्यावर आलेला हा प्रसंग टळला असता का असा विचार अविनाशच्या मनात येऊन गेला. अविनाश स्वतःच्या मृत्यूकडे बघत उदास पडून राहिला. एका क्षणी त्याला जाणवले की, त्याच्या हातावर एक हात आहे. त्याने कष्टाने डोळे उघडून पाहिले. संरक्षक सूट घातलेली एक नर्स त्याचा हात हातात घेऊन उभी होती. ती म्हणत होती - ऑक्सिजन आला आहे. काळजी करू नका. त्याला ऑक्सिजनपेक्षा तिचा हात आधार देऊन गेला.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

त्याला एका क्षणासाठी एक गहन सत्य कळले. मानवता हे सर्वोच्च मूल्य आहे. अंतिम मूल्य आहे. बाकी कुठलीही मूल्ये ही महत्त्वाची असली तरी दुय्यम आहेत.

मृत्यू डोळ्यात डोळा घालून उभा असताना जे मूल्य महत्त्वाचे वाटते ते अंतिम मूल्य. बाकी सगळे दुय्यम!

पंधरा दिवसांनी सगळे घरी आले. समर आणि भास्करने करता येईल तेवढी मदत केली होती.

आता मोदीजी किंवा विरोधक असे कोणीही टीव्हीवर दिसले तरी अविनाश रिकाम्या डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहत बसे. त्याला तो रिकामा ‘तमाशा’ वाटत होता.

आजारानंतर भास्करने त्याला अविनाशने समरला कोव्हिड-१९ झालेला असतानाचा काव्यात्म आणि दैवी न्यायाचा मेसेज पाठवला. अविनाशच्या डोळ्यात पाणी आले. त्याला स्वतःची शरम वाटली.

अविनाशला मानवतेचे मूल्य साक्षात दिसले होते. पण तो क्षण पकडून आपले आयुष्य एका वरच्या स्तरावर नेण्याएवढी संपृक्तता त्याच्यात नव्हती. एवढा मोठा आजारही त्याचा अहंकार कमी करू शकला नव्हता. द्वेष आणि संताप ही विषे आहेत, हे त्याला दिसले होते तरी पटले नव्हते. त्यात त्याच्या भक्त मित्रांचे मेसेजेस येतच होते.

आपण वाचलो आहोत, याची एके क्षणी त्याला खात्री पटली. भारतातली करोनाची दुसरी लाट थोडी कमी झाली होती. आता मोदीजींनी दुसऱ्या लाटेच्या कठीण काळात भारताचे नेतृत्व कसे केले, याचे डिंडिम वाजवण्याची वेळ झाली होती. एका रात्री अविनाशला वैशालीमध्ये बुरखा घातलेल्या बायका कबाब खात आहेत, हे स्वप्न पडले. अविनाश उठला. त्याने अनावरपणे आपला मोबाईल हातात घेतला. आणि, मोदीजींमुळे मिळालेल्या करोना विजयाचा मेसेज समरला पाठवून दिला.

(वाचकांना या बखरीच्या पहिल्या प्रकरणाच्या निमित्ताने भारतीय इतिहासातील एका खळबळजनक प्रसंगातील वैचारिक आदानप्रदानाची ओळख झाली असेलच. बखरीचे दुसरे प्रकरण आम्ही डी-कोड करायला घेतले आहे. भास्कर, शिरोजी आणि श्रीनिवास जोशी यातील खरे कोण हा गोंधळ हळूहळू सुटेल असा विश्वास आम्हाला आहे. एक विचार म्हणून प्रस्तुत करावेसे वाटते की, यातील श्रीनिवास जोशी हे नाव काल्पनिक असावे. शिरोजी किंवा भास्कर यातीलच कोणीतरी श्रीनिवास जोशी या नावाने लिखाण करत असावे. शिरोजी किंवा भास्कर यातील जो खरा लेखक होता, तो  प्रसिद्धिपराङ्मुख असल्याकारणाने त्याने ‘अक्षरनामा’मध्ये श्रीनिवास जोशी या टोपणनावाने लिखाण केले असावे. असो. नावांचा हा गोंधळ लवकरच संपेल. याविषयीचे संशोधन सुरू राहील याची वाचकांनी खात्री बाळगावी. आपला, श्रीमान जोशी, संपादक, शिरोजीची बखर.)

..................................................................................................................................................................

लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.

sjshriniwasjoshi@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......