‘सुगीभरल्या शेतातून’ : हे संपादन भालेराव यांच्या कवितेचं पीक कसं जोमदार, दमदार आणि कसदार आहे, याचं मासलेवाईक उदाहरण आहे!
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
शरद ठाकर
  • ‘सुगीभरल्या शेतातून’ या कवितासंग्रहाचं मुखपृष्ठ
  • Thu , 15 April 2021
  • ग्रंथनामा शिफारस सुगीभरल्या शेतातून इंद्रजित भालेराव

‘सुगीभरल्या शेतातून’ हे सुप्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव यांच्या निवडक कवितांचं समीक्षक प्रा. रणधीर शिंदे यांनी केलेलं संपादन नुकतंच प्रकाशित झालं आहे. पिळवणूक आणि पाचवीला पुजलेलं अस्मानी-सुलतानी संकट हे कायम शेतकऱ्यांच्या नशिबी असले तरी भालेराव यांच्या कवितेतील शेतकरी याही परिस्थितीत रडगाणं गात बसत नाही. शेतकरी आत्मविश्वासानं जगला पाहिजे, कठीण परिस्थितीतही तो संकटांना तोंड देत उभा राहिला पाहिजे, यासाठी शेतकऱ्याचं आत्मबळ वाढवणाऱ्या कविता ते लिहितात.

शेतकरी जेव्हा त्याच्या खूप जवळच्या आत्मीयता असलेल्या पाहुण्याराहुळ्यांना, आपल्या मित्राला शेतातला वानवळा द्यायचा असेल तर तो पुन्हा डांभ्यात जातो. म्हणजे शेतातलं जे सर्वोत्कृष्ट पिकलेलं आहे, ते आपल्या प्रिय व्यक्तीला देतो. त्याच पद्धतीनं या संग्रहात भालेराव यांच्या निवडक १०६ कविता निवडलेल्या आहेत. हे संपादन भालेराव यांच्या कवितेचं पीक कसं जोमदार, दमदार आणि कसदार आहे, याचं मासलेवाईक आहे. 

‘मातीच्या मार्दवामुळेच’ या कवितेत डांभ्याचं पोषण कसं होतं, कठाळ्याला डांभा जसा आपल्याच मालकीचा वाटतो, तसाच तो गरीब गाईलाही आपला वाटतो, एवढंच नाही तर रानातली माणसं डांभ्या जवळच सापडतात किंवा चिमणी पाखरंही हमखास डांभ्यावरच असतात, हे सांगताना इंद्रजित भालेराव म्हणतात -

‘भाग्यवंताच्या शेतात 

 अनेक डांभे असतात 

 ज्याच अख्खं शेत डांभा 

असा बळीवंत एखादाच’ (पृ.१२५)

भालेराव यांनी शेती-मातीचीच कविता लिहिली, त्यामागचं कारण ते ‘दो जीवाची’ या कवितेतून सांगतात-

‘भर उन्हात जन्माला माती तोंडात घेऊन,

वाढलास एवढा तू धान मातीचं खाऊन

मातीसाठीच जगावं मातीसाठीच मरावं

बाळा, माती लई थोर 

तिला कसं इसरावं’ (पृ.४८ )

या संग्रहामध्ये माझं ‘माहेर तुटलं’, ‘मीया मनलं’, ‘ऐक ऐक सूनबाई’, ‘उभ्या उभ्या आड रातर’, ‘जाय तुला बोलायचे न्हाय’, ‘लेकीचा जलम’, ‘माहेरचा झोका’, ‘सांग’ या कवितांतून माय-लेक, बाप-लेक, बहीण-भाऊ असे विविध नातेसंबंध उलगडतात. त्यासोबतच लेकीला, सुनेला कसं जगलं-वागलं पाहिजे, हे साध्या सोप्या भाषेत या कवितांमधून सांगितलं आहे. लेकीला पाहुणे पाहायला येणार असतात, तेव्हा आई ताडमाड वाढलेल्या लेकीला कवितेत काय म्हणते ते पहा -

‘काल मागीतली साय

मला मनलिस पोरी

जानं परायाच्या घरा 

नको होऊस आघोरी’ (पृ.६५ )

असा लेकीबाळीला सल्ला देतानाच ‘गावाकडं’ या कवितेत भालेराव म्हणतात -

‘काट्याकुट्याचा तुडवीत रस्ता 

माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता’ (पृ.७०)

गावात उन्हातानात माणसं कशी कष्ट करतात, त्यांना शेती करताना किती यातना भोगाव्या लागतात, हे या कवितेतून सांगताना शेतकरी या भूमीचा मूळ अधिकारी असून त्याला आज कसं भिकाऱ्यासारखं काम मागत गावोगाव फिराव लागतंय हे सांगतानाच जागतिकीकरण आणि त्यामुळे बदलत गेलेला गाव, गावात आलेलं बकालपण, बदलत गेलेले माणसांचे स्वभाव, नातेसंबंध, बदललेल्या निसर्गानं शेती आणि शेतकरी जीवनावर झालेले परिणाम, हेही सांगितलंय. ‘गावपांढरी ओस झाली’, ‘जागतिकीकरण’, ‘मनाचे कुपोषण’ या कवितांमधून बदललेल्या गावाबद्दल बोलतानाच ते ‘होते विठूचे मंदिर’ या कवितेतून पुढील आशावाद व्यक्त करतात -

‘कुणी यावा भगीरथ | गंगा आणावी गावात |

आम्ही त्याच्याच नावात | देव शोधू ||’ (पृ.५७ )

गाव बदललं, गावातली माणसं बदलली तरी गवत बदलत नाही. भालेराव आपल्याला सहज सोप्या भाषेत गवताचे विविध प्रकार, त्यांची नावं, त्यांची वैशिष्ट्यं सांगतात. ते सांगतात -

‘कुठेही पडो कसंही पडो आपल्या अवतीभोवती

सृष्टी उभी करण्याची ताकत गवतात असतेच असते’ (पृ.१३७) 

‘याच्या हिरव्या’, ‘रानलहू आणि पानलहू’, ‘धान पूर्वी तनच होत’, ‘गवत’, ‘भुईवर पसरलेली’, ‘कावसाड –कसई’, ‘आवधान नावाचं’, ‘चालणारे बैल’, ‘गरोदर बाईच्या’, ‘दिवाळी आणि उन्हाळी’ या गवता संदर्भातल्या कवितांचाही समावेश या संग्रहात आहे.

‘सर्वांनाच बांधता यावीत’ या कवितेतून भालेराव यांच्यातला सर्वांचं भलं होण्यासाठी तळमळणारा कवी आपल्याला दिसून येतो. सर्वांना चौसोपी वाडे बांधता यावेत, सर्वांनाच दही-दूध-तूप-लोणी खायला मिळावं, गोठ्यात गाई अन् वासरं असावीत, सासुरवाशिणींना सासर-माहेर वेगळं वाटूच नये, गावाला तटबंदी नसावी किंवा आतबाहेर वेगवेगळ्या जातीधर्माच्या वस्त्या नसाव्यात, सर्वांनी गुण्यागोविंदानं नांदावं, असं गाव असावं असं भालेराव यांना वाटतं.

अशीच माणुसकीची शिकवण ‘दिवाळी’, ‘पावसा पावसा’, ‘बाप म्हणायचा’, ‘बैलांना वेळेवर’ या  कविताही देतात. सर्वांचं भलं चिंतणाऱ्या, सर्वांना योग्य मार्गदर्शन करणाऱ्या कविता भालेराव  लिहितात, पण शेवटी म्हणतात -  

‘व्हावा कोणता माणूस ज्याचे त्याने ठरवावे 

कानी व्हावे का कणीस ज्याचे त्याने ठरवावे’ (पृ.११० )

शेतात काही उत्पन्न होवो अगर न होवो शेतकरी नित्यनेमानं पाऊस पडला की, काळ्या आईची ओटी भरायचं काम करतो. त्याची शेतीनिष्ठा ढळू देत नाही. ‘शेतच ईमान’, ‘एकाचे दाने हजार’, ‘बापाची लोककथा’ या कवितांतून शेतकऱ्याची ही निष्ठा मांडलेली दिसते.    

काही शेतकरी आपल्या मालाला योग्य भाव मिळावा, शेतीला चांगले दिवस यावेत, कोणीतरी आपला तारणहार व्हावा म्हणून वेगवेगळ्या पुढाऱ्यांच्या मागेपुढे फिरतात, त्यांची कथा ‘हे निष्ठावान’, ‘बिल्ला’ या कवितेतून दिसून येते. पण थोडीशी लालूच दाखवून इथली व्यवस्था पुढाऱ्यालाच आपल्या दावणीला बांधते, त्यामुळे शेतकरी हिताचे निर्णय झालेले पाहायला मिळत नाहीत. म्हणून ते ‘खांदा’ या कवितेत म्हणतात -

‘खांदे घडवण्यात आपण अपयशी झालो

की आयते खांदे पळवण्यात ते यशस्वी’ ( पृ.१५०)

अशा पद्धतीनं पुढारी जरी शेतकऱ्याची साथ सोडणारे, बाजू न घेणारे असले तरी शेतकऱ्यांना आहे त्या परिस्थितीत हिंमतीनं लढण्याचं बळ देण्यासाठी शेतकऱ्याच्या पोराला ते म्हणतात -  

‘शीक बाबा, शीक लढायला शीक 

कुणब्याच्या पोरा,

आता लढायला शीक’ ( पृ.८२ )

कारण गपगुमान अन्याय सहन करत राहिलं तरी इथली व्यवस्था त्याचा विचार करणार नाही, त्यामुळे त्यांना नाईलाजानं म्हणावं लागतं -

‘सांगा माझ्या बापानं नाही केला पेरा,

तर तुम्ही काय खाल? धत्तुरा!’ ( पृ.८१ )

‘माझ्या वासराने’, ‘इडा पिडा टळो’, ‘उपाय’, ‘माती पाणी’, ‘दुःख असो जीवघेणे’, ‘फोटो’ या कविता शेतकऱ्यांचं आत्मबळ वाढवणार्‍या आहेत. भालेराव यांच्या कवितेतला शेतकरीच फक्त परिस्थितीशी लढणारा आहे, असं नाही तर त्यांच्या कवितेतील स्त्रियाही खंबीरपणे लढणाऱ्या आहेत. ‘रानातल्या उन्हातानात’, ‘किती टाकलं साऱ्यांन’, ‘कणगी सारखी भरलेली’ या कविता त्या संदर्भात वाचण्यासारख्या आहेत. ‘रानातल्या उन्हातानात’ या कवितेत ते म्हणतात -

‘रानावनातल्या उन्हातान्हात वाळलेल्या सासुरवाशिनी गोवऱ्या वेचते

आपल्या फाटक्या जिंनगानीचा पदर

एकदाचा खच्चून कंबरेला खोचते’ ( पृ.५५ )

‘आडलेली बाई सोडवताना’ ही जातधर्म विसरून सुईनपण करणाऱ्या सुईणीची कविता सामाजिक सलोखा शिकवणारी, बुद्धाचं शांतीचं तत्त्वज्ञान सांगणारी आहे.

या संग्रहाचे संपादक प्रा. रणधीर शिंदे यांनी स्वातंत्र्योत्तर काळापासून इंद्रजित भालेराव यांच्या कवितेपर्यंत मराठी कवितेचा आढावा घेणारी दीर्घ प्रस्तावना लिहिली आहे. ती मुळातून वाचावी अशीच आहे. 

एकंदरीत नातीगोती सांभाळत ‘सुगीभरल्या शेतातून’ आनंदानं सुगीचे दान देणारी कविता या संग्रहात वाचायला मिळते. रविमुकुल यांनी सुंदर असं मुखपृष्ठ साकारलं असून सुरेश एजन्सी, पुणे यांनी हा संग्रह प्रकाशित केला आहे.

‘सुगीभरल्या शेतातून’ : संपादन - प्रा. रणधीर शिंदे

सुरेश एजन्सी, पुणे

पाने – १६०, मूल्य - २२० रुपये.

..................................................................................................................................................................

शरद ठाकर

sharadthakar17@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे.......

जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक.......