“मराठी समीक्षा अजून बाल्यावस्थेतच आहे, असे मला वाटते. लहान मूल जसे मोठ्याचे बोट धरून चालते, तसे आपली समीक्षा पाश्चात्य समीक्षेचे बोट धरून चालते.” - सुधीर रसाळ
संकीर्ण - मुलाखत
संवाद - प्रा. अविनाश सप्रे
  • ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ आणि त्यांच्या ‘कविता आणि प्रतिमा’ आणि ‘वाङ्मयीन संस्कृती’ या पुस्तकांची मुखपृष्ठे
  • Fri , 09 April 2021
  • संकीर्ण मुलाखत सुधीर रसाळ कविता आणि प्रतिमा वा.ल. कुलकर्णी म. भि. चिटणीस उस्मानिया विद्यापीठ मराठवाडा विद्यापीठ साहित्य-समीक्षा मर्ढेकर नेमाडे कविता आणि प्रतिमा वाङ्मयीन संस्कृती

मराठीतील नामवंत समीक्षक डॉ. म. सु. पाटील यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या देणगीतून शिवाजी विद्यापीठाच्या वतीनं मराठीतील महत्त्वाच्या समीक्षाग्रंथाला/समीक्षकाला दिला जाणारा ‘पहिला डॉ. म. सु. पाटील समीक्षा पुरस्कार’ नुकताच ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांना ज्येष्ठ लेखक वसंत आबाजी डहाके यांच्या हस्ते देण्यात आला. त्यानिमित्ताने कोल्हापूर आकाशवाणीसाठी ज्येष्ठ समीक्षक प्रा. अविनाश सप्रे यांनी त्यांची दीर्घ मुलाखत घेतली आहे.  ही मुलाखत ४ ऑगस्ट, २०२० रोजी कोल्हापूर आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित झाली. त्या मुलाखतीतील काही भाग व काही प्रा.रणधीर शिंदे यांनी विचारलेल्या प्रश्नांवरच आधारित भाग ‘समाज प्रबोध पत्रिके’च्या ऑक्टोबर-डिसेंबर २०२०च्या अंकात प्रकाशित झाला आहे. तिच्या पुनर्मुद्रणाचा हा  उत्तरार्ध...

..................................................................................................................................................................

मराठी समीक्षेने मराठी वाचकांची अभिरुची घडवण्यात काहीएक योगदान दिलं आहे, असं वाटतं काय?

रसाळ - मी समीक्षेचे तीन प्रकार मानतो. एक वाचकांसाठी लिहिलेली समीक्षा आणि दुसरी समीक्षा म्हणजे वाङ्मयाभ्यास. एका किंवा अनेक वाङ्मयकृतींच्या स्वरूपाचा, विविध वाङ्मयकृतींत असलेल्या अनेक प्रकारच्या नात्यांचा-प्रामुख्याने तिच्या निमार्त्यांशी आणि तिची सामग्री असलेल्या सामाजिक-सांस्कृतिक वास्तवाशी तिच्या असलेल्या नात्याचा शोध घेणाऱ्या लेखनाला ‘वाङ्मयाभ्यास’ म्हणतात. मूल्यमापन हे वाङ्मयाभ्यासाचे उद्दिष्ट नसते. तरीही तेथे अप्रत्यक्ष मूल्यमापन असते. या अर्थाने समीक्षेचा हा प्रकार हे शास्त्र आहे. ‘सैद्धांतिक समीक्षा’ हा समीक्षेचा तिसरा प्रकार असून तो समीक्षेचा मूल प्रकार आहे. वाचकांची अभिरुची घडवण्यात सैद्धांतिक समीक्षेचा आणि वाङ्मयाभ्यासाचा काहीही उपयोग नसतो.

वाङ्मयकृतीचे स्वरूप आणि तिची महत्त्वाची वैशिष्ट्ये स्पष्ट करून तिचे मूल्य ठरवणाऱ्या परीक्षणपर आणि अभिप्रायपर लेखनाचा मात्र वाचकांच्या अभिरुचीवर परिणाम होऊ शकतो. पाश्चात्य देशांत वाङ्मयकृती प्रकाशित होण्यापूर्वी तिची कच्ची प्रत काही समीक्षकांकडे पाठवून तिची परीक्षणे लिहून घेतली जातात. ती प्रकाशन-दिनांकाला वृत्तपत्रांतून छापली जातात. यांपैकी जो परीक्षणलेखक वाचकांना विश्वासार्ह वाटतो, त्याच्या मतानुसार ती वाङ्मयकृती विकत घ्यायची की नाही, हे वाचक ठरवतात. अशा परीक्षणांचा वाचकांच्या अभिरुचीवर परिणाम होतो.

मराठी वाङ्मयजगतात असे काहीही घडत नाही. वृत्तपत्रे आवश्यक शब्दसंख्येची परीक्षणे छापत नाहीत. ५०० त १००० शब्दांपर्यंतचीच परीक्षणे छापली जातात. अनेकदा पुस्तक प्रकाशित झाल्यावर काही वर्षांनी वृत्तपत्रात एखादे परीक्षण आल्याचेही घडते! अशा परीक्षणाचा काहीही उपयोग नसतो. आपल्या नित्य गरजांत वाङ्मयाचा क्रमांक खालून पहिला आहे! अशा परिस्थितीत समीक्षा वाचकाची अभिरुची घडवण्यात किती उपयुक्त आहे, हा प्रश्न गैरलागू होऊन जातो.

याबरोबरच वाचकांचाही ‘वाचन-संस्कृती’त कोणता सहभाग असावा?

रसाळ - म्हणून मी नेहमी असं म्हणत असतो की, वाङ्मयाबद्दल असा गैरजसमज आहे की, वाङ्मयाचं आकलन करायला तुम्हाला काही प्रशिक्षणाची गरज असते. म्हणजे एखाद गाणं ऐकूनं मालकंस चांगला आहे की, वाईट आहे ठरवायला तुम्हाला संगीताचा कान तयार व्हावा लागतो. तसं तुम्हाला वाङ्मय समजून घ्यायला एक अभिरुची घडवावी लागते. याची जाणीवचं आपल्याकडे नाही. यातून दुर्बोधतेचा प्रश्न निर्माण झालेला आहे.

..................................................................................................................................................................

ऑनलाईन विज्ञान साहित्य लेखन कार्यशाळा

अधिक माहितीसाठी पहा -

https://www.facebook.com/aksharnama/posts/2780841678893566

..................................................................................................................................................................

आपण असं म्हटलेलं आहे की, मराठी साहित्य असं ज्याला आपण म्हणतो, हे साहित्य आपल्या एकूण समाजाच्या केंद्रस्थानी नाही आहे. ते परिघावरच वावरतं. आणि ज्या अर्थाने आपण साहित्य म्हणतो, ते आपण म्हटल्याप्रमाणे धार्मिक, मुक्तीसाठी वगैरे. त्यामुळे साहित्याचं साहित्यपण असलेलं जे साहित्य आहे, ते साहित्य आपल्या समाजाच्या परिघावरचं आहे, असं आपलं म्हणणं आहे. तर त्याचं काय कारणं सांगता येईल?

रसाळ - याचं मूळ कारणचं हे आहे की, हे साहित्य मला आपलं वाटतच नाही. सामान्य वाचकाला हे साहित्य आपलं वाटत नाही. आजही खेड्यामध्ये मध्ययुगीन परंपरेतले काव्य निर्माण होतं. ज्याची दखल कुणीच घेत नाही. अनेक खेड्यांमध्ये अभंग लिहिणारे, लावण्या लिहिणारे अजून आहेत. त्या त्या भागामध्ये ते कवी, लेखक, ऐकले जातात. त्यांना हे आपलं काहीच माहीत नसतं. शहरामध्ये जे वाङ्मय आलं म्हणून वाङ्मय. जर संपूर्ण समाजाच्या केंद्रस्थानी यायचं असेलं तर त्या समाजाच्या संस्कृतीतूनच ते जन्माला यायला पाहिजे, तरच हे होईल. हे आपल्याकडे होत नाही. उदा. अस्तित्ववाद ही संकल्पना पाश्चात्य संस्कृती जीवनातून निर्माण झालेली आहे. दैनंदिन जीवनातल्या प्रश्नातून या सैद्धांतिक संकल्पना येतात. म्हणजे मॉडर्ननिझम असेल, पोस्ट मॉडर्ननिझम असेल. हे त्यांच्याबाबत अपरिहार्य आहे. तेव्हा कुठल्याही सामान्य माणसाला हे कळतं की, हे आपल्या जीवनातील आहे. हे आपल्याकडे होतच नाही. आता अस्तित्ववाद. याचा आपल्या जीवनाशी काहीही संबंध नाही. एक तर भांडवलशाही आपल्यावर लादलेली आहे, मुख्यतः ती आपल्या जीवनातून निर्माण झालेली नाही. त्यामुळे आपल्या जीवनाचा ती कधी भागच झाली नाही. मग भांडवलशाहीचा स्वीकार आपण कुठल्या मर्यादेपर्यंत केला? आमची मूल्यव्यवस्था सगळी मध्ययुगीत जीवनपद्धती भांडवलशाही पद्धतीची. असा एक अंतःर्भेद आपल्यामध्ये निर्माण झालेला आहे. या सगळ्यांचे परिणाम असे होतात की, वाङ्मयात जे काही प्रकट होतं, ते त्या समाजाचं होतच नाही.

आपल्या लेखकांमध्ये दोन महत्त्वाच्या संकल्पना आपल्यामध्ये आलेल्या आहेत, त्या मला सांगाव्याशा वाटतात. एक म्हणजे विश्वदृष्टीचा अभाव. अपवाद वगळता आपल्याकडे एक सैद्धांतिक दृष्टी ज्याला म्हणता येईल तसे तत्त्वज्ञ समीक्षक नाहीत. आपल्याकडे सैद्धांतिक दृष्टीचा अभाव आहे. मुख्य म्हणजे विश्वदृष्टीचा अभाव आहे....

रसाळ - तत्त्वज्ञ समीक्षक निर्माण व्हायला वाङ्मयाच्या अनेक प्रकारच्या चिकित्सेतून तुम्हाला अंतिम सिद्धांत काढता आले पाहिजेत. ही प्रक्रिया एकदम घडत नाही, त्याला दीर्घकाळ लागतो. एकतर आपल्या समीक्षेचा इतिहास दीडशे वर्षांच्या जवळपास आहे. त्याच्या आधी समीक्षाच नाहीये. त्याच्याआधी सैद्धांतिक रससिद्धांताची मांडणी केली गेली. परंतु ज्याला कलाकृतीच्या विश्लेषणाची परंपरा म्हणतात, तशी कुठे आहे आपल्याकडे? १८५० पासून साधारणपणे समीक्षात्मक लेखनाला प्रारंभ झाला. तरी इतक्या अल्पावधीत हे होणं शक्य नाही. पण हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की, आपल्याकडे सैद्धांतिक मांडणी करणारे समीक्षक नाहीत. आणि हे जोपर्यंत निर्माण होत नाही, तोपर्यंत आपली समीक्षा खऱ्या अर्थानं अस्तित्वात येऊ शकत नाही. याची जाणीव व्हावी आणि त्यादृष्टीनं प्रयत्न होत राहावेत असं मला वाटतं.

मराठीत सैद्धांतिक समीक्षा नाही, याची दोन कारणं आहेत. गेल्या अनेक शतकांपासूनच्या आपल्या वाङ्मयीन आणि काव्यशास्त्रीय परंपरेपासून आपण पूर्णपणे तुटलो. आजच्या मराठी समीक्षकाला भारतीय काव्यशास्त्र नीट कळत नाही. या काव्यशास्त्राखाली भारतीय तत्त्वज्ञानाची-दर्शनांची पक्की भूमी आहे. तिचं जोपर्यंत नीट आकलन होत नाही, तोपर्यंत त्यातील सिद्धांतांची यथार्थता लक्षात येणार नाही. बा. सी. मर्ढेकरांना, गंगाधर गाडगीळांना रससिद्धांत अडगळवजा वाटला. एखाद्या वाङ्मयकृतीतील स्थायीभाव आणि अन्य रसघटक यांची नाती तपासून त्याची उपयुक्तता आम्ही पाहिलीच नाही. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी या दृष्टीने काहीएक सूचक मांडणी केली आहे. एखाद्या कथेत आलेल्या प्रत्येक प्रसंगातील स्थायी वेगवेगळा असू शकतो. एका प्रसंगातील स्थायी विभावअनुभावदिकांशी संयुक्त होत होत दुसऱ्या प्रसंगातील दुसऱ्या स्थायीकडे जात जात शेवटी अंतिम स्थायीपर्यंत पोचून त्या वाङ्मयकृतीचा अंतिम रस अभिव्यक्त केला जाऊ शकतो. त्यासाठी स्थायीभावाची संकल्पना काहीशी बदलून घ्यावी लागणार. परंतु काव्यशास्त्रातील आनंदवर्धन-मम्मटादिकांनी सांगितलेल्या सर्वच कल्पना अपरिवर्तनीय आहेत, असे मानण्याचे कारण नाही. काहींना नाकारत, काहींना नवा अर्थ देत हे काव्यशास्त्र विकसित केले गेले नाही. ‘कविता आणि प्रतिमा’ या ग्रंथात लक्षणा आणि व्यंजना असे दोन व्यापार मानण्याची गरज नाही, असे काही युक्तिवादांसह मी म्हटले होते. मला ‘भारतीय काव्यशास्त्र’ कळालेच नाही, असा निष्कर्ष काढणारा एक लेख नंतर प्रसिद्ध झाला. त्यात तेच ते पुन्हा मांडलेले होते. या काव्यशास्त्राला आपण अश्मिभूत बनवून टाकले आहे.

पाश्चात्य साहित्यशास्त्राने नवनवे सिद्धांत त्यांनी मांडावेत आणि आम्ही त्यांची उचल करावी, अशीच आतापर्यंत आपली भूमिका राहिली. ज्ञानेश्वर ते तुकारामपर्यंतच्या आपल्या वाङ्मयाच्या विश्लेषणातून आपण काही नवे शोधायचा प्रयत्न केला नाही. या क्षेत्रात आपण मूल्यमापनात दुय्यम भूमिका स्वीकारण्यातच समाधान मानले.

माझ्या या भूमिकेवर ‘जगात एकच शास्त्र असते. प्रत्येक भाषेत वेगवेगळे शास्त्र संभवत नाही. शास्त्रे ही मूलत:च वैश्विक असतात.’ या प्रकारचे आक्षेप घेतले जाऊ शकतात, याची मला कल्पना आहे.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

मराठीमध्ये कलावाद-रूपवाद यांची चर्चा खूप झाली पण त्यांचे प्रत्यक्ष उपयोजन झाल्याचे दिसत नाही. त्याबद्दल आपलं मत काय? तुम्ही एके ठिकाणी कलावाद-जीवनवाद हा छळणारा प्रश्न आहे, असं म्हटलं होतं. ते जरा स्पष्ट करावं.

रसाळ - स्वत:ला रूपवादी म्हणवून घेणारे बहुतेक सर्व समीक्षक जीवनदर्शन घडवणं हे वाङ्मयाचं कार्य असल्याचं मानतात. आता जीवनदर्शन घडवणं म्हणजे काय करणं, हे मात्र स्पष्ट करत नाहीत. सर्वांनाच जीवनाचं प्रामाणिक, यथार्थ चित्र रंगवणं, हाच जीवनदर्शनाचा अर्थ अभिप्रेत असतो. म्हणून वाङ्मयकृतीतील वास्तवाचं ‘खरेपण’ ते तपासतात. म्हणजेच, कथात्म-नाट्यात्म साहित्यकृतीची प्रत्यक्ष समीक्षा करताना सर्वच जण अ‍ॅरिस्टॉटलचे निकष वापरतात. मर्ढेकरांची प्रारंभीची ‘वाङ्मयीन महात्मते’तील समीक्षा आशयाचाच विचार करणारी आहे. नंतर त्यांनी लयतत्त्वांचा रूपवादी सिद्धांत मांडला. पण त्यांनी जी थोडी उपयोजित समीक्षा लिहिली, तीही पुन्हा पारंपरिकच आहे. क्षीरसागरांच्या ‘राक्षसविवाहा’वरच्या त्यांच्या लेखात त्या कादंबरीतील वास्तवाची संभवनीयता या निकषाच्या आधारेच विचार केला आहे. याचं कारण आपल्या मध्ययुगीन साहित्यापासून आपल्या सर्व वाङ्मयाची चिकित्सा करत राहून आपण आपल्या वाङ्मयातून निकष निष्पन्न केलेच नाहीत. हे सर्व आपण आयात केले.

मराठीत समीक्षाविचाराला जो प्रारंभ झाला, तो कलावाद की जीवनवाद? या प्रश्नावरच्या चर्चेनं. परंतु या काळात याची केवळ चर्चाच होत राहिली. कलावाद्यांची उपयोजित समीक्षा आणि जीवनवाद्यांची उपयोजित समीक्षा यांचा चेहरा एकच होता. श्री. कृ. कोल्हटकर. न. चिं. केळकर, वा. म. जोशी, ना. सी. फडके, वि. स. खांडेकर हे सर्व समीक्षक १८९० ते १९५० या काळातले. यांची जर उपयोजित समीक्षा वाचली तर ती कथानकातल्या विसंगती दाखवणं, कवितेतील भाषेतील अलंकार, छंद यांच्या चुका दाखवणं आणि कवितेत कोणता रस आहे, हे सांगून तो कितपत ‘बहारीचा’ झाला आहे, याची चर्चा करणं, याचंच दर्शन होतं. या उपयोजित समीक्षेचा कलावादी किंवा जीवनवादी सिद्धांताशी कसलाही संबंध नाही. वाङ्मयकृतीच्या आंतररचनेचा विचार वा. ल. कुळकर्णी, गंगाधर गाडगीळ या १९५०नंतर लेखन करणाऱ्या समीक्षकांपासून सुरू झाला. आणि समीक्षाविचार प्रथमच वाङ्मयाच्या उद्दिष्टचर्चेकडून प्रत्यक्ष वाङ्मयकृतीच्या चर्चेकडे वळाली. कलावाद की जीवनवाद, याभोवती तेच ते मुद्दे घेऊन काथ्याकूट करत राहणं, हे दीर्घ काळ घडत राहिलं! हा एक छळवादच होता!

स्वातंत्र्योत्तर काळातील मराठी समीक्षेतून कोणता नवा विचार पुढे आला?

रसाळ - स्वातंत्र्यप्राप्त्युत्तर काळात आपण सौंदर्यशास्त्राकडे वळलो. मर्ढेकरांपासून पुढे मराठीत दहा-पंधरा वर्षं केवळ सौंदर्यशास्त्राचीच चर्चा होत राहिली. मराठीच्या प्राध्यापकांनी तर सौंदर्यशास्त्राचा धसकाच घेतला होता. आता सौंदर्यशास्त्राचं कोणीच नाव घेत नाही. साहित्यशास्त्र ही एक स्वायत्त ज्ञानशाखा आहे, हे आपल्याला उशिरा का होईना कळलं.

कथनपर आणि नाट्यात्म साहित्याच्या उपयोजित समीक्षेत केवळ अ‍ॅरिस्टॉटलचे सिद्धांत लावायचे, कवितेबाबत रससिद्धांत वापरायचा, अशी ब्रिटिश कालापासून ते स्वातंत्र्यप्राप्त्युत्तर काळापर्यंत आपली उपयोजित समीक्षा होती. सैद्धांतिक पातळीवर कला ही कलेसाठी की जीवनासाठी? यावर काथ्याकूट करत बसायचं. त्यातही कलावाद म्हणजे केवळ रंजनवाद, अशी समजूत करून घ्यायची. स्वातंत्र्यप्राप्त्युत्तर काळात वा. ल. कुळकर्णी, गंगाधर गाडगीळ, दि.के. बेडेकर यांनी आणि अन्य समीक्षकांनी मराठी समीक्षा वाङ्मयकृतिकेंद्रित केली. वाङ्मयकृतीचं विश्लेषण करण्याला आणि वाङ्मयकृतीच्या आंतररचनेबद्दलच्या, तिच्या घटकांबद्दलच्या प्रश्रांवर विचार करण्याला महत्त्व दिलं जाऊ लागलं. यातून पुढे रूपवादाचा प्रभावही वाढलेला दिसतो.

वाङ्मयीन महात्मता, कलांचे माध्यम आणि शब्दांतील भावनिक अर्थांची लयबद्ध रचना ही वाङ्मयकृतीच्या कलात्मकतेची कसोटी, यांबद्दलचे मर्ढेकरप्रणित सिद्धांत हाच एकमेव नवा विचार मराठी सैद्धांतिक समीक्षेत आला. हा नवा विचार १९३५ ते १९५६ या काळात साकार होत गेला. त्यानंतर मात्र मराठी समीक्षेत कुठलाही नवा विचार आलेला नाही.

‘मराठी समीक्षा बाल्यावस्थेत आहे’ असं तुम्ही मागे म्हणाला होतात. ती अवस्था संपून मराठी समीक्षा आता ‘वयात’ आली असं तुम्हाला वाटतं का?

रसाळ - आपल्या समीक्षेत नवं असं काहीच घडत नाही. खरं म्हणजे मराठीत वाङ्मयनिर्मितीच्या तुलनेत समीक्षक अतिशय कमी आहेत. त्यामुळे किती तरी महत्त्वाच्या साहित्यकृतींची दखलच घेतली जात नाही. नवं पुस्तक प्रसिद्ध झालं की, त्यावर परीक्षण येत नाही. महत्त्वाच्या लेखकाच्या समग्र लेखनाची चिकित्सा करणारी पुस्तकं नाहीत. एकेका वाङ्मयीन कालखंडातील वाङ्मयाची, त्या कालखंडातील वाङ्मयीन प्रवाहाची चिकित्सा करणारं लेखन नाही. पूर्वी होऊन गेलेल्या लेखकांच्या वाङ्मयाचा नव्यानं विचार करण्याची गरज असते. परंतु या प्रकारचं लेखनही मराठीत होत नाही. समीक्षकांच्या फुटकळ लेखांचे संग्रह प्रसिद्ध होतात, पण लेखकांच्या समग्र वाङ्मयाचा सांगोपांग अभ्यास असलेले ग्रंथ लिहिले जात नाहीत. सामान्यपणे समीक्षकवर्ग हा मराठी विषय घेऊन एम. ए. करणाऱ्या विद्यार्थ्यांतून तयार होतो. या विषयाला विद्यार्थी कमी येतात.

दुसरं म्हणजे ज्यांना वाङ्मयाची आवड नाही, जे सुमार बुद्धीचे विद्यार्थी आहेत, अशा विद्यार्थ्यांतूनच विद्यार्थी मराठीकडे येतात. अशा विद्यार्थ्यांतून चांगले समीक्षक कसे निर्माण होणार? पूर्वी ज्यांचं मराठी विषयाचं रीतसर शिक्षण झालेलं नव्हतं, अशांतूनही मराठी समीक्षक तयार होत. श्री. कृ. कोल्हटकर, न. चिं. केळकर, वा. म. जोशी, फडके, खांडेकर इ. नंतरच्या काळात गंगाधर गाडगीळ, दि. क. बेडेकर, माधव आचवल इ. आता असे समीक्षक पहायला मिळत नाहीत. तेव्हा समीक्षेची मदार मराठीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर! मग चांगले आणि पुरेसे समीक्षक कसे उपलब्ध होणार? जे चांगले समीक्षक आहेत, त्यांचा भर पाश्चात्य समीक्षेतून उचलेगिरी करण्यावर! जिला ‘मराठी’ समीक्षा म्हणता येईल, असं काहीच नाही.

ही अवस्था समीक्षेच्या ‘बाल्यावस्थेची’च म्हणावी लागेल. ही बाल्यावस्थाही आता खुरटून गेली आहे! तिचा परिपोष होतच नाही. मग ती ‘वयात’ कशी येणार?

मराठी समीक्षेच्या सद्यस्थितीबद्दल तुम्हाला काय वाटते? तसेच भविष्यातील तिचा रोख कसा असू शकेल? या विषयी काही अंदाज बांधता येऊ शकतो का?

रसाळ - मराठी समीक्षा अजून बाल्यावस्थेतच आहे, असं मला वाटतं. लहान मूल जसं मोठ्याचं बोट धरून चालतं, तसं आपली समीक्षा पाश्चात्य समीक्षेचं बोट धरून चालते. त्यांचे सिद्धांत घेऊन त्यांचे उपयोजन आपण आपल्या वाङ्मयाबाबत करतो. त्यांच्या वाङ्मयीन सिद्धांतांच्या पाठीमागे त्यांनीच निर्माण केलेलं तत्त्वज्ञान किंवा समाजशास्त्र, मानसशास्त्र असे कुठले न कुठले शास्त्र उभे असते. अगदी अ‍ॅरिस्टॉटलपासून हे पाहायला मिळते. परंतु आपल्यापैकी बहुतेकांना त्यांचा जुजबी परिचय असतो. त्यामुळे त्यांच्या वाङ्मयीन सिद्धांताचं आपलं आकलन वरवरचं असतं आणि या सिद्धांतांचं सामर्थ्य आणि मर्यादा आपल्या लक्षातच येत नाहीत. त्यामुळे या सिद्धांतांची मांडणी करणारी मराठी समीक्षा कितपत विश्वासार्ह आहे, हे सांगता येत नाही.

संस्कृतमधील साहित्यशास्त्राबाबतही आपलं असंच झालं आहे. आनंदवर्धनादिकांच्या वाङ्मयीन सिद्धांतांमागे काश्मिरी शैव तत्त्वज्ञान आहे. रा. श्री. जोगादिकांना ते ज्ञात नसल्यामुळे त्यांच्या ‘अभिनव काव्यशास्त्रा’त काही चुका राहून गेल्या. पुढे ग. त्र्यं. देशपांड्यांच्या पुस्तकामुळे या संबंधी बरंच नवं कळालं. मग रा. श्री. जोगांनीही आपल्या काव्यशास्त्राच्या नंतरच्या आवृत्तीत काही सुधारणा केल्या. आपल्याला आपलं तत्त्वज्ञान-षडदर्शने नीट माहीत नाहीत. त्यामुळे आपण संस्कृतमधील काव्यशास्त्र नीट समजून घेऊ शकत नाही. आता तर त्याच्याशी आपलं नातं तुटलेलं आहे. आपण पाश्चात्य तत्त्वज्ञान ‘आपले’ बनवू शकत नाही. त्यामुळे आपल्याला पाश्चात्य समीक्षाही पूर्णपणे ‘आपली’ बनवता येत नाही. म्हणून आपण आपली समीक्षा घडवण्यास आपणच मुळापासून प्रारंभ केला पाहिजे. आपण एकोणिसाव्या शतकात पाश्चात्य वाङ्मयप्रकार स्वीकारले. त्याबरोबरच त्यांच्याशी संलग्न असलेली साहित्यशास्त्रही स्वीकारलं. आता आपण तेच कायम ठेवून आपल्या साहित्याच्या संदर्भात त्यांचा स्वतंत्रपणे विकास केला पाहिजे. त्यासाठी मध्ययुगीन भाष्यकाव्यं, आख्यानक कविता, पद, भारुड, विराणी, गौळण, स्तोत्रं, लावणी, बखरी अशा प्रकारांना हे पाश्चात्य साहित्यशास्त्र लावून ते त्यांना लागू करण्याच्या दृष्टीनं त्यात सुधारणा, बदल करत गेलं पाहिजे. यातूनच हळूहळू आपलं साहित्यशास्त्र उभं राहू शकेल. प्रत्येक भाषेला किंवा भाषासमूहाला त्यांचं त्यांचं साहित्यशास्त्र असतं. या शिवाय काही सिद्धांत सर्वच भाषांना लागू होणारे असतात. प्रत्येक भाषेचं साहित्यशास्त्र काही वैश्विक साहित्यसिद्धांत आणि त्या भाषेपुरते सिद्धान्त यांनी मिळून बनतं.

कुठलीही सैद्धांतिक समीक्षा उभी करण्याची एक सनातन रीत आहे. आपल्या भाषेतील वाङ्मयकृतींचं विश्लेषण करून प्राप्त होणाऱ्या वाङ्मयीन समजेच्या आधारे अधिकाधिक वाङ्मयकृती तपासत जायचं आणि त्यातून आपली वाङ्मयीन समज अधिकाधिक परिपूर्ण करत जायचं. यातून आपण सिद्धांतांपर्यंत पोचू शकतो. हे सिद्धांत नवनव्या वाङ्मयकृतींना लावत त्यांची यथार्थता सतत तपाशीत राहायचं. अशा प्रकारे घडलेले सिद्धांत आपल्या भाषेतील वाङ्मयाचं अर्थपूर्ण मूल्यमापन करणारे असतील. अ‍ॅरिस्टॉटलने शोकांतिकांचा विचार केवळ ग्रीक शोकांतिकांच्याच आधारे केला. त्या नंतर या सिद्धांतांची यथार्थता पाश्चात्य देशांत निर्माण होत आलेल्या नवनव्या वाङ्मयकृतींच्या संदर्भात आजपर्यंत तपासली जात आहे. कादंबरीतली ‘गोष्ट’ जेव्हा लुप्त झाली, तेव्हा अ‍ॅरिस्टॉटलच्या कथानकसिद्धांतासमोर आव्हान उभं राहिलं. साहित्यसिद्धांत सक्षम ठेवण्यासाठी प्रस्थापित सिद्धांतांची सातत्यानं पुनर्तपासणी होत राहिली पाहिजे. परंतु आपल्या समीक्षेत असं काहीच घडवलं जात नाही. आपण एक सोपा मार्ग निवडला आहे. तिकडे नवा सिद्धांत मांडला गेला की, तो तात्काळ स्वीकारायचा आणि आपण समीक्षेबाबत अद्ययावत आहोत, याचं समाधान मानत राहायचं.

आपली परिस्थिती जर अशीच राहिली तर आपल्या समीक्षेत नवं काहीच निर्माण होणार नाही. आपण पाश्चात्यांच्या दारात उभं राहून त्यांनी शोधलेल्या नव्या सिद्धांतांची भीक आपल्या पदरात केव्हा पडते, याची वाट पाहत राहू. पाश्चात्य समीक्षेकडे डोळे लावून बसणं असाच भावी काळात आपल्या समीक्षेचा रोख राहणार आहे, असं वाटतं.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

मराठी संस्कृतीचा आणि वाङ्मयाचा तुम्ही गंभीरपणे विचार करत आला आहात. त्यातही तुमच्या साहित्य विचारात भारतीयत्वाचा विचार आहे. मराठीतील श्रेष्ठ लेखक भालचंद्र नेमाडे यांनीही भारतीयत्वाचा वेगळा विचार मांडला आहे. या दोन विचारांतील साम्यभेद कोणते आहेत.

रसाळ - मी वाङ्मयाचा सांस्कृतिक अंगानं विचार करायला सामान्यपणे १९६६पासून प्रारंभ केला. त्या वर्षी केशवसुतांची जन्मशताब्दी होती. त्या निमित्तानं मी केशवसुतांवर लिहिलेल्या ‘केशवसुतांच्या जाणिवांचे स्वरूप’ या लेखात केशवसुतांनी आपल्या कवितेत पाश्चात्य रोमँटिसिझमला भारतीय रूप कसं दिलं याचं विवेचन केलेलं आहे. त्यानंतर १९७५मध्ये कराडला दुर्गा भागवतांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संमेलनाप्रसंगी प्रसिद्ध झालेल्या स्मरणिकेत ‘ग्रामीण आणि नागर अभिरुची’ हा माझा लेख प्रसिद्ध झाला. त्यात मी पुन्हा माझी वाङ्मय आणि संस्कृती या विषयीची भूमिका सविस्तर मांडली. पाश्चात्य वाङ्मयातील जाणिवा स्वीकारून लिहिलं जाणारं ‘नवसाहित्य’ हे मराठी वाचकाला परकंच वाटतं; कारण त्यात त्याला आपल्या सामाजिक-सांस्कृतिक वास्तवातून जन्मलेल्या जाणिवांचा प्रत्यय येत नाही. त्यामुळे हे साहित्य त्याच्या अनुभवांना अर्थच देत नाही, हा मुद्दा मांडला होता. १९८२ साली प्रसिद्ध झालेल्या माझ्या ‘कविता आणि प्रतिमा’ या पुस्तकातील समारोपाच्या प्रकरणात मी साहित्य आणि संस्कृती यांच्या नात्याविषयी माझी भूमिका मांडली आहे. माझ्या ‘वाङ्मयीन संस्कृती’ या पुस्तकात हा विचार सविस्तरपणे मांडला गेला आहे. त्यात पाश्चात्य संस्कृतीचं रूप दिलेला जो ख्रिस्ती धर्म भारतात आला, त्याला केवळ भारतीय संस्कृतीचं रूप देण्याचा प्रयत्न रेव्ह. नारायण वामन टिळक यांनी कसा केला; त्यांच्या या भूमिकेतून त्यांनी ख्रिस्ती अभंग लिहून ख्रिस्ती धर्मात नसलेला भक्तिमार्ग रुजवण्याचा प्रयत्न कसा केला, याचं सविस्तर विवेचन मी केलं आहे.

भालचंद्र नेमाड्यांनी आपली देशीवादासंबंधीची भूमिका १९८३ साली मांडली.  खरं म्हणजे विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात वाङ्मयातील देशीवादाचा विचार वि. का. राजवाडे, ज्ञानकोशकार केतकर यांनी मांडलेला आहे. भारतीयांची जीवनपद्धती, मूल्यव्यवस्था (म्हणून संस्कृती) पूर्णत: वेगळी आहे, या आपल्या भूमिकेतून म. गांधींनी एका मुलाखतीत म्हटलं होतं - ‘पाश्चात्यांचं अनुकरण करणं सोडून देऊन जेव्हा आपण आपल्या संस्कृतीप्रमाणे जगायला लागू, तेव्हा खऱ्या अर्थानं ‘स्वराज्य’ येईल.’ म. गांधी हे पूर्णत: देशीवादी विचारवंत. तेव्हा आपल्याकडे देशीवादाचा पुरस्कार सातत्यानं केला गेला आहे.

व्यक्ती जन्मापासून ज्या सांस्कृतिक पर्यावरणात वाढते, त्या सांस्कृतिक पर्यावरणातून तिचं व्यक्तिमत्त्व, तिची अनुभव घेण्याची आणि विचार करण्याची पद्धती, एकूण तिची संवेदनशीलता घडलेली असते. म्हणून लेखक-कवी ज्या संस्कृतीत वाढतो, त्या संस्कृतीच्या पर्यावरणातून त्याचा जाणीवव्यूह आकाराला आलेला असतो. लेखक-कवींवर परसंस्कृतीतील लेखक-कवींच्या जाणिवांचाही प्रभाव पडू शकतो. पण अशा वेळी या जाणिवांना तो आपल्या संवेदनशीलतेत बसेल असे रूप\अर्थ देतो. मी इतर देशांतील अनेक गोष्टी घेईन आणि त्यांना आपल्यात मुरवून त्यांना वेगळे अर्थ देईन, आणि मग या नव्या अर्थांसह त्या त्यांना परत करेन, असे गांधीजी म्हणाले होते. माझ्या दृष्टीनं परक्या गोष्टी घेताना त्या आपल्या संस्कृतीत मुरवून घेण्याची प्रक्रिया आपल्या आधुनिक वाङ्मयाबद्दल घडवली गेली नाही. त्यामुळेच मला नववाङ्मय परकं वाटतं, असं मी एका लेखात म्हटलं आहे.

भारतात एका व्यापक सांस्कृतिक चौकटीत अनेक उपसंस्कृती नांदतात. मराठी, बंगाली, तमीळ इत्यादी संस्कृतींना त्यांचा त्यांचा चेहरा जरी असला तरी या सर्व संस्कृती एका कुळातील आहेत. त्यामुळे रवींद्रनाथ, प्रेमचंद या अन्य भारतीय भाषांतील लेखकांना मी मराठी लेखकांसारखाच प्रतिसाद देऊ शकतो. असा प्रतिसाद मी पाश्चात्य वाङ्मयाला देऊ शकत नाही. याचा अर्थ असा की, भारतीय भाषांतील वाङ्मयाचं एकच कूळ आहे. मध्ययुगातही दक्षिणेत तमिळ भाषेमध्ये जन्मलेला भक्तिसंप्रदाय सर्व भारतीय भाषांनी आपापल्या भाषिक संस्कृतीचं रूप देऊन स्वीकारला. उत्तर भारतीय मधुराभक्तीला मराठी विराण्यात आलेलं रूप जर पाहिलं तर हे लक्षात येईल. इंग्रजी राजवटीत अन्य भारतीय भाषांशी असलेलं आपलं नातं तोडून आपण ते पाश्चात्य वाङ्मयाशी जोडलं आणि आपण दुय्यम दर्जाची वाङ्मयीन संस्कृती घडवण्याला प्रारंभ केला.

समीक्षेतल्या देशीयतेबद्दल नेमाडे यांनी जे म्हटलं ते असं : ‘देशीयतेचे तत्त्व असे सांगते की, आपण निर्माण केलेली प्रमाणके सोडून इतरांच्या प्रमाणकांचा स्वीकार करता कामा नये; कितीही मोठ्या प्रमाणावर बाहेरून उसनवारी केली तरी त्यामुळे देशीपणाला बळकटीच येईल. परंतु ज्या प्रमाणकांवर हा उसनवारीचा व्यवहार चालेल, ती प्रमाणके आपलीच असली पाहिजेत.’

याचा अर्थ, सर्वस्वी नवे असे परदेशी प्रमाणक स्वीकारण्याला नेमाड्यांच्या देशियतेमध्ये प्रतिबंध करण्यात आला आहे!

आपल्या वाङ्मयाच्या आकलन-मूल्यमापनाला जर आपल्या प्रमाणकश्रेणीमध्ये नसलेलं एखादं नवं परदेशी प्रमाणक उपयुक्त ठरत असेल तर त्याला आपल्या प्रमाणकश्रेणीशी सुसंगत ठरेल अशा प्रकारचं रूप देऊन ते वापरावं. कुठलंही प्रमाणक आपल्या वाङ्मयाच्या आकलन-मूल्यमापन क्रियेच्या दृष्टीनं समर्थ असलं पाहिजे. असं सामर्थ्य परदेशी प्रमाणकाला मिळवून देण्याच्या दृष्टीनं त्यात काही बदलही संभवतील तर ते करूनच ते वापरलं पाहिजे. या प्रक्रियेमुळे परदेशी प्रमाणकं ‘आपली’ बनून जातात.

माझा दुसरा मुद्दा असा की, आता आपण पाश्चात्य वाङ्मयप्रकार स्वीकारले आहेत आणि त्या बरोबर आपण पाश्चात्य समीक्षाही स्वीकारली आहे. आता घड्याळ उलटं फिरवता येणार नाही. आपण एवढंच करायला पाहिजे की, आपल्या नवनव्या वाङ्मयकृतींच्या आकलनमूल्यमापनाला आवश्यक ते बदल स्वीकृत प्रमाणकात करत रहावं, काही अनुपयुक्त झालेली प्रस्थापित प्रमाणकं नाकारावीत. गरजेप्रमाणे पाश्चात्य समीक्षेच्या तोंडाकडे पाहायचं नाकारून, नवी प्रमाणकं तयार करत जावीत. असं केल्यानं काही काळानंतर आपली समीक्षा तयार होईल. प्रत्येक वेळी पाश्चात्य समीक्षेकडे हात पसरवू नये.

या दोन भूमिका विचारात घेतल्यास नेमाडे आणि माझ्या समीक्षाविचारातील देशीयता वेगळी कशी हे लक्षात येईल.

आता आपल्या एकूण सगळ्या वाङ्मयीन संस्कृतीमध्ये संस्थात्मक असं जे काम आहे, त्यामध्ये आपण अतिशय सक्रियपणे भाग घेतलेला आहे. म्हणजे मराठवाडा साहित्य परिषदेचे आपण अनेक वर्षं कार्यवाह होतात. किंवा ‘प्रतिष्ठान’सारखं नियतकालिकाचे संपादक म्हणून आपण काम केलेलं आहे. तेव्हा वाङ्मयाच्या वृद्धीसाठी संस्थात्मक, स्वरूपाचं जे काम झालं पाहिज, त्याचं स्वरूप कसं असलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं?

रसाळ - एक गोष्ट अशी की, वाङ्मयीनदृष्ट्या ज्या संस्कृती प्रगत आहेत, तिथं या प्रकारच्या कार्याची गरजच नाही. म्हणजे इंग्लडमध्ये काही इंग्रजी भाषेची अशी संस्था नाही, आपल्याकडे याची गरज आहे. कारण असं की, वाङ्मय ही फार सीमित वर्गापुरतच अस्तित्वात आहे. संपूर्ण समाजाचं ते काही झालेलं नाही. म्हणून वाङ्मयाला एक अशी प्रतिष्ठा समाजजीवनाचा एक महत्त्वाचा असा तो भाग आहे, असं रूप द्यायचं असेल तर मुद्दाम काम करायला पाहिजे. वाङ्मयाचं स्वरूप लोकांपर्यंत पोहचवण्याच्या दृष्टीनं म्हणून या प्रकारच्या संस्थांची अजूनही आपल्याकडे गरज आहे. म्हणूनच साहित्य संमेलनाची गरज आहे. संमेलनाला लेखक अनेक दोष देतात. फालतू काही तरी आहे असं म्हणतात. पण तरीही गरज आहे. त्यामधून फार काही सिद्ध होतं असं नाही. तरीही मला त्याची गरज वाटते. कारण आजही सामान्य वाचक या साहित्य संमेलनात जातो. त्याला कुतूहूल आहे. आता साहित्य संमेलनात जे लेखक येतात, ते गांभीर्यानं गोष्ट घेत नाहीत हा दुर्दैवाचा भाग आहे.

मी जेव्हा महामंडळाचा अध्यक्ष होतो आणि साहित्य संमेलन भरवत होतो, तेव्हा यवतमाळचा एक ना.ग. टिळक म्हणून एक तरुण मला भेटायला आला. तो म्हणाला, ‘सर मी मोलमजुरी करतो, मुख्यतः जमीन खोदण्याचं वगैरे काम माझ्याकडे असतं. मी विद्यार्थी आहे, परंतु हे काम करून मी शिकतो. यातून मी पैसे साठवतो आणि साहित्य संमेलनाला येतो की, लेखक काय बोलतात हे ऐकावं. पुस्तकं आम्हाला पाहायला मिळत नाहीत. इथं पुस्तकं आम्हाला पाहायला मिळतात. एखादं-दुसरं पुस्तकंही मी विकत घेतो.’ त्यामधून ही वाङ्मयाबद्दलची ओढ निर्माण होते.

दुसरीकडे आपण तिला पूरक असं वातावरणच निर्माण करत नाही. ते करायचं असेल तर ते काम साहित्य संस्थांनी केलं पाहिजे. म्हणून समाजाची अभिरूची विकसित करणं, वाङ्मयाची गोडी सामान्य माणसाला लावणं, यासाठी साहित्य संस्थांनी काम केलं पाहिजे. याच कल्पनेतून न्यायमूर्ती रानड्यांनी हे काम केलं. त्यामध्ये प्रामुख्यानं ब्रिटिश स्थानिक भाषांच्या विकासाला कोणत्याही प्रकारची मदत करणार नाहीत, हे काम आपणच केलं पाहिजे, या जाणिवेतून साहित्य संमेलनं अस्तित्वात आली.

लेखकांनी एकत्र यावं, वाङ्मयावर चर्चा करावी, ते समजून घ्यावं, त्याचे चांगले परिणाम प्रत्येक कवी, लेखकाच्या वाङ्मयावर पडतील, ही त्यांची भूमिका होती. आज असं झालेलं आहे की, आपण स्वतंत्र झालो. महाराष्ट्र राज्य स्थापन झालं. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी फार महत्त्वाचं काहीही केलं जात नाही दुर्दैवानं. आता इंग्रजी माध्यमातून शिकवलं जातं. त्यामुळे तर मराठी वाङ्मयाचा वाचक वर्ग हळूहळू  कमीच होत चाललेला आहे. अशा परिस्थितीमध्ये मराठी भाषा टिकवणं, ती विकसित करणं, तिला वाङ्मयीन प्रतिष्ठा मिळेल असं रूप देणं, हे काम आता पुन्हा रानडेंच्या काळासारखीच परिस्थिती आल्यामुळे साहित्य संस्थांनीच केलं पाहिजे असं मला वाटतं. म्हणून प्राज्ञ, विशारद वगैरे परीक्षा महाराष्ट्र साहित्य परिषद घेत होती. आमची साहित्य परिषदही घेत होती. त्या बंद झाल्या सगळ्या आता. त्या पुन्हा सुरू केल्या पाहिजे असं मला वाटतं. एखाद्या पालकाला असं वाटतं की, आपल्या मुलाला इंग्रजीतून शिकवणं काळाची गरज आहे, पण त्याला मराठी आलं पाहिजे, तो आपल्या मुलाला अशा परीक्षांना बसवेल. त्याच्यावर आपण मराठीचे संस्कार करू शकू.

दुसरं अभ्यास मंडळं चालवणं भाषण वगैरे याला आता गर्दी होत नाही. परंतु अभ्यास मंडळं जर चालवली वाङ्मयीन चर्चा करणारी, नागपूरला देवदांपत्य ‘माग्रस’ नावाची संस्था चालवत. एखादा ग्रंथ घ्यायचा आणि चार लोकांनी तो वाचायचा. एकानं त्यांच्यावर बोलायचं व इतरांनी चर्चा करायची, या पद्धतीनं अभिरूची संवर्धनाचं काम साहित्य संस्था करतील. भाषणं, लेखकांचा परिचय, लेखकांना बोलावून वाचक आणि लेखक यांचा एक संवाद घडवून आणणं, अशा पद्धतीनं जर काम केलं तर वाङ्मयीन अभिरूची मोठ्या प्रमाणात विकसित होऊ शकते.

निजामी राजवटीचा संस्कार असल्यामुळे मराठीसाठी सामाजिक-सार्वजनिक पातळीवर काम करायला पाहिजे, याचे संस्कार लहानपणापासूनच होते. त्यातून मी या प्रकारच्या कामाकडे आलो आणि जवळपास पन्नासेक वर्ष वेगवेगळ्या प्रकारचं काम केलं. म्हणजे अगदी ‘प्रतिष्ठान’ मासिकाची रॅपर चिटकवून त्याच्यावर पत्ते लिहिण्यापासून कामं केलेली आहेत.

या सगळ्या बदलत्या काळामध्ये आता असं दिसून येतं की, मराठी विषय घेण्याकडे नव्या पिढीतल्या तरुणांचा फारसा कल दिसत नाही. किंबहुना वेगवेगळ्या महाविद्यालयात अगदी विद्यापीठाच्या पातळीवरसुद्धा विद्यार्थी संख्या दिवसेंदिवस घटतच चाललेली आहे. मराठीकडे विद्यार्थी ओढला जाईल, त्याला ही भाषा घ्यावीशी वाटेल, अशा तऱ्हेचं काय काम केलं पाहिजे, पुनर्रचना केली पाहिजे... यासंबंधी आपल्या अनुभवातून आणि आत्ताच्या परिस्थितीतून काय सांगू शकाल.

रसाळ - एक  गोष्ट म्हणजे आपलं सगळं शिक्षण, सगळी शैक्षणिक व्यवस्था ही उपजीविकेशी जोडली गेली आहे. दुर्दैवानं आता ही चांगली की वाईट हा वेगळा प्रश्न आहे. त्याच्यावर इथं बोलूया नको. जोपर्यंत मराठी विषय घेणाऱ्या विद्यार्थ्यांला त्या विषयाच्या संदर्भात उपजिवीकेची सोय होत नाही, तोपर्यंत मराठीला चांगला विद्यार्थी येणारच नाही. आणि हे करणं सरकारच्या स्वाधीन आहे. उदा. मराठीमधून जर राज्य चालवायचं असेल तर मराठी वाङ्मय घेऊन जो विद्यार्थी तयार होतो, त्याला प्राधान्य मिळालं तर तो म्हणेल की ठीक आहे, मी मराठी घेतो. जेव्हा एखादा समाज आर्थिकदृष्ट्या संपन्न असतो, तेव्हा शिक्षण आणि उपजिविका यांचं नातं राहत नाही. आपलं तसं नाही. म्हणून मराठी विषय घेणाऱ्या विद्यार्थ्यांला नोकरीमध्ये कुठेतरी वाव मिळेल, अशी जोपर्यंत तरतूद होत नाही, तोपर्यंत मराठी घेऊन विद्यार्थी येणारच नाहीत.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

या दृष्टीने मराठीच्या अभ्यासक्रमाची पुनर्रचना ही मोठ्या प्रमाणावर व्हायला पाहिजे

रसाळ - कारण हा विषयच गौण आहे, असं एकदा विद्यापीठात प्रस्थापित झालं तर मग कोणीही त्याकडे लक्ष देत नाही. आमच्या विद्यापीठात वा.ल. कुलकर्णी यांनी या क्षेत्रात या प्रकारचं खूप काम केलं. त्यांनी जे अभ्यासक्रम तयार केले, त्या काळात ते अतिशय उत्तम दर्जाचे होते. सर्व प्रकारचे म्हणजे ज्याला वाङ्मयाचा अभ्यास या दृष्टीनं समीक्षेपेक्षाही महत्त्व मिळेल या दृष्टीने ते अभ्यासक्रम तयार केले होते. तसे अभ्यासक्रम आता पुन्हा तयार व्हायला पाहिजेत. आणि या दृष्टीने विद्यापीठानं सतत नवा विचार करायला पाहिजे.

वाङ्मयीन संस्कृतीचा विचार करताना तुम्ही इतिहास, मानववंशशास्त्र अशा इतर ज्ञानशाखांचा उपयोग करून घेतला. अभ्यासक्रमामध्येदेखील इतर ज्ञानशाखांचा समावेश असायला हवा. याबद्दल तुम्हाला काय वाटतं?

रसाळ - मी अनेकदा सांगितलंय की, मराठी एम. ए.मध्ये मानसशास्त्र आणि वाङ्मयाच्या संदर्भात एक छोटा पंधरा दिवसाचा कोर्स ठेवा. तत्त्वज्ञान आणि वाङ्मय यासंबंधी पंधरा दिवसांचा कोर्स ठेवा. त्या त्या विषयातील तज्ज्ञांना व्याख्यानांना बोलवा. अभ्यासक्रमाबाहेर ही व्याख्यानं घडवून आणा. विद्यार्थ्यांना ती अनिवार्य करा. त्याची परीक्षा घेऊ नका, पण त्याचे संस्कार विद्यार्थ्यांवर होतील असं करा. माझ्या दृष्टीनं हे सगळ्यात सोपं आहे. पण हे आपण करत नाही. आंतरविद्याशाखीय असं आपण काहीही करत नाही..

शासकीय पातळीवर यादृष्टीने ही औपचारिकताच आहे, असं आपण म्हणू शकू का? म्हणजे ते स्वतंत्र मंत्रालय आहे, त्याचे विभाग आहेत, असं सगळं असूनही त्या प्रमाणात मराठी भाषेची समृद्धी फार काही होत नाही.

रसाळ - शासकीय पातळीवर संस्था स्थापन केली की, काम झालं असं मानलं जाऊ लागलेलं आहे. आणि आपणही तेच स्वीकारतो. म्हणजे भाषा संचालनालय आहे. त्यामध्ये साहित्य संस्कृती मंडळ… पुन्हा भाषा विकासासाठी पुन्हा आणखी नवी संस्था. संस्था स्थापन करून काही होत नाही, असं मला वाटतं. त्याऐवजी तुम्ही भरीव काम केलं पाहिजे. एक तर शासकीय पातळीवर कामच होत नाही. शासकीय पातळीवर काम करण्याची मुळी आपल्याला सवयच नाही. तुम्ही संस्थांकडे काम सोपवा. तिला अनुदान द्या. उदा. ज्ञानकोश करावयाचा, तुम्ही संस्थेकडे सोपावा आणि ती जे काम करेल त्याची कठोर परीक्षा घ्या आणि मग अनुदान घ्या. तुम्हीच ते हातात घेऊ नका. महाराष्ट्रात निष्ठेने काम करणाऱ्यांची ज्ञानकोशकार केतकरांपासून चित्रावशास्त्री, दाते, स.मा. गर्गे अशी मोठी परंपरा आहे. ती आम्ही मोडीतच काढली. सरकारने स्वतःकडेच हे काम घेतलं. पण ते व्यक्ती वा संस्थेकडे सोपवलं पाहिजे असं मला वाटतं. तरच ते चांगल्या प्रकारे होऊ शकेल.

भविष्यात तुमचे लेखनप्रकल्प काय आहेत?

रसाळ - आता माझं वय इतकं आहे की, भविष्यात काय प्रकल्प असणार? तरीही एक गोष्ट करायची इच्छा आहे. मराठीत कुठल्याही वाङ्मप्रकारावर अभ्यासक, वाचक यांना उपयोगी पडेल असं पाठ्यपुस्तक नाही. कवितेवर असं एक छोटंसं पाठ्यपुस्तक तयार करायची इच्छा आहे. पण हे घडेलच असंही नाही.

शब्दांकन : ऋचा जांभळे

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......