वर्जेश सोलंकी यांचे ‘वर्जेश ईश्वरलाल सोलंकीच्या कविता’ व ‘ततपप’ हे दोन कवितासंग्रह आणि ‘दीडदमडीना’ व ‘पेरूगन मुरुगन’ हे दोन गद्यलेखनाचे संग्रह. त्यानंतर त्यांचा ‘हुसेनभाय और गणपतभाय व्हाया अमेरिका’ हा कथासंग्रह नुकताच पार पब्लिकेशनने प्रकाशित केला आहे. या कथासंग्रहात १२ कथांचा समावेश आहे आणि तेरावा प्रकार संतप्त कथांवरच्या कल्पित व अकल्पित प्रतिक्रियांचा आहे.
या लेखकाची कथा आपल्याकडे जास्त वेळेची मागणी करत नाही. लेखक जे सांगायचे आहे ते स्पष्टपणे, थोडक्यात पण कथेचा बाज राखूनच सांगतो. कथा कोठे संपवावी, आपला वाचक कंटाळून जाणार नाही, याची काळजी व जागृत भान चांगल्या लेखकाच्या ठिकाणी असते, तेच वर्जेश सोलंकी यांनी सिद्ध केले आहे.
कथांतर्गत वातावरण निर्मितीसाठी लेखक जास्त वेळ घालवत नाही. त्याचं लक्ष दृश्य निर्माण करण्यावर आहे. संबंधित पात्रांच्या क्रिया-प्रतिक्रियेवर आहे. या कथा समाज परिसरातील व दैनंदिन जगण्यातील व्यंगावर बोट ठेवणाऱ्या आहेत. लेखकाने अलीकडच्या घटनांना हाताशी धरून गमतीजमतीचा खेळ मांडला आहे, पण म्हणून तो बिनमहत्त्वाचा ठरत नाही. सर्व व्यथा-वेदना काळाच्या एका टप्प्यानंतर तीव्रता गमावून बसतात आणि मिश्किलीचे रूप घेतात. कथा निवेदनाची प्रत नर्म विनोदाची आहे. कथेचे निवेदन तटस्थता व बेफिकिरी दाखवणारे आहे. असे असले तरी कथेतून प्रस्तुत होणाऱ्या विचारांना बगल दिली आहे, असे बिलकुल नाही. कथेचे कथन करताना लेखकाने संवेदनशीलता जपली आहे, पण वाचकाच्या गळ्यातून उसासे आणि कढ काढायचा कोणताही प्रयत्न केलेला नाही हे विशेष. त्यामुळे या कथा वेगळ्या पातळीवर येऊन रचनेचा अद्भुत साक्षात्कार घडवतात.
..................................................................................................................................................................
ऑनलाईन विज्ञान साहित्य लेखन कार्यशाळा
अधिक माहितीसाठी पहा -
https://www.facebook.com/aksharnama/posts/2780841678893566
..................................................................................................................................................................
कथेत संभाषणे, संवादापेक्षा निवेदन अधिकचे आहे, परंतु संवादाची भाषा लेखकाची न वाटता त्या त्या पात्रांची वाटते हे या कथांचे यश आहे. एका प्रसंगातून दुसऱ्या प्रसंगाकडे जाताना वाचकाला श्रम होत नाहीत. कथेतल्या निवेदनाचं वाचकाला ओझं वाटत नाही. प्रसंगाला धरून वाक्यं छोटी-मोठी, परंतु श्वास रोखून वाचण्यासाठी कसरत करावी लागत नाही.
या कथा कोणाचेही अनुकरण करत नाहीत किंवा कोणाच्याही प्रभावाच्या पांघरुणाखाली आहेत असंही दिसत नाही. लेखकाची स्वतंत्र शैली आहे. ती अनुभवजन्य आहे. लेखकाने कोठेही शैलीबाज होण्याचा घाट किंवा मनसुबा रचलेला नाही. कथेचे आशय-विषय यांनीच खरं तर शैलीची निवड केली आहे. म्हणून कथांनी कधी कविता, नाटक तर कधी पटकथेचा फॉर्म स्वीकारलेला आहे.
कथेतील वाचनीयता हरवून जात असल्याची खंत आज-काल बोलून दाखवली जाते. वाचकांना गुंतवणारी कितीतरी साधने सध्या मुबलक प्रमाणात उपलब्ध असताना आजच्या काळात लेखनातील वाचनीयता टिकून ठेवणं हे मोठं आव्हान आहे. ते वर्जेश सोलंकी यांनी समर्थपणे पेललं आहे. त्याचा प्रत्यय पानापानातून येतो. याचे कारण त्यांनी योजलेली भाषा. तिला प्रमाणभाषा अथवा बोलीभाषा म्हणण्याऐवजी ‘जीवन भाषा’ म्हटलं तर अधिक संयुक्तिक व न्याय्य होईल. त्यांनी कथेतून मुंबईत बोलल्या जाणाऱ्या हिंदी, इंग्रजी, गुजराती भाषांतील शब्द, तसेच दोन भिन्न भाषांतील शब्दांची गळाभेट घडवून नवीन शब्दांचा मुक्त वापर केला आहे.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
यामुळे जगण्याच्या संस्कृतीतील भाषिक भाग उजळला आहे. नाटक, कविता, पटकथेचे फॉर्म वापरल्यामुळे कथा प्रकाराची व्याप्ती वाढली आहे. निवेदनातील एकसुरीपणा संपुष्टात आला आहे. लेखकाने या कथेतून वापरलेली निवेदन पद्धत कधी प्रथमपुरुषी तर कधी तृतीयपुरुषी आहे. तृतीयपुरुषी निवेदन करताना निवेदक मधूनच निवेदनाची सूत्रं प्रथमपुरुषी निवेदकाकडे सोपवतो. त्यामुळे वाचनात अडथळा न येता उलट वाचनीयतेत आणखी भर पडते. परिणामतः आपण पात्रांच्या समोर साक्षात होतो.
एखादी घटना सांगताना आजूबाजूला घडणाऱ्या किंवा अनुभवाला येणाऱ्या इतर गोष्टीही सांगण्याचा लेखकाचा कल दिसून येतो. वरकरणी हे विषयांतर झाल्याचं वाटेल, पण सूक्ष्म विचारांती लक्षात येतं की, आपल्या विचार करण्याच्या पद्धतीशी आपला परिचय होतो. एखाद्या विषयावर केंद्रित होताना कितीतरी विषयांच्या अथवा संदर्भांच्या गर्दीतून धक्का देत, वाट काढत आपली बुद्धी आलेली असते. हे सर्व पकडणं जिकिरीचं काम आहे. मराठी कथेची सरळ, सपाट वाट कोणी सोडत नाही. परंतु वर्जेश सोलंकी यांनी ती सोडून दिली आहे. या लेखकाची कृती हायवेवरून उतरून पायवाट धरण्याची व पुन्हा हायवेवर येण्याची आहे. हे अकृत्रिम धक्कातंत्र आहे. त्यामुळे वाचनात बाधा न येता पुढील वाचनासाठी ऊर्जा मिळते. उदाहरणार्थ, निवेदक ‘जाडजूड’ या कथेत म्हणतो- ‘विषयाला सोडून व थोडं जोडून बोलणं झालं, माफ करा मित्रांनो गद्य लिखाणाचा सराव चालू आहे.’ आणि पुन्हा विषयाशी जोडून घेतो.
वास्तवाचं दिसतं तसं वर्णन करण्याचं लेखकानं टाळलं आहे. जे आजूबाजूला घडतं ते व्यक्तिगत पातळीवर आणून त्यांनी कथेतून रचनात्मक मांडणी केली आहे. अमेरिका या सत्तापिपासू वर्चस्ववादी देशाचं मानवीकरण करून त्याने विकसनशील देशांना नामोहरम करण्याचा चंग कसा बांधला आहे, हे लेखकानं उत्कृष्टपणे दाखवलं आहे. तसंच लोकशाहीचं मानवीकरण नववधूत केलं आहे. स्वातंत्र्यानंतर देशाची झालेली दुर्दैवी अवस्था अविवाहित माणसाच्या विस्कळीत घरासारखीच होती. घराच्या कोपऱ्याकोपऱ्यातून डोकावणारं दैन्य हटवण्याचं काम नववधूला करायचं आहे, त्यात ती कितपत यशस्वी झाली आहे, ते ‘तुम्ही किती बोटे मोडा’ व ‘अब की बार....बार बार वाले’ या कथांतून दिसून येतं.
या कथेतून मोजकीच पात्रं भेटतात. एका कथेत तीन-चारपेक्षा अधिक पात्रं नाहीत. पुन्हा ती प्रत्येक वळणावर भेटतात असंही नाही. एखादा प्रसंग उभा करण्यापुरताच त्यांचं काम, मग पुढे त्या पात्रांचं काय होतं, त्याची नंतरची काय भूमिका ठरते ते सांगण्यात लेखकाला स्वारस्य नाही. आपण एकंदर कथेला न्याय द्यावा ही त्याची अपेक्षा. म्हणूनच लेखकानं कोणत्याही पात्राला अवाजवी महत्त्व दिलेलं नाही. जगण्यातील व्यवहार्यता लिखाणात आणण्यासाठी लेखकाला तसं करणं भाग पडलं असावं. कथेतील पात्रं भूतकाळात जास्त वेळ रेंगाळत नाहीत. त्याचा संदर्भ आला तरी तो दोन-तीन वाक्यांत गुंडाळला जातो. कथेची गाडी पुढे चालवायची तर भूतकाळाच्या आरशाचं महत्त्व कमी असावं, हे लेखकाला पक्कं ठाऊक आहे. वृत्ती-प्रवृत्तीनं चांगल्या-वाईट व्यक्तींना या कथांतून जागा मिळाल्या आहेत. जशा या कथेत फसवणाऱ्या व्यक्ती आहेत, तसेच फसवले जाणारेही आहेत. जे दुसऱ्याला फसवतात, तेही पुढे फसवले गेल्याचं दिसतं.
प्रस्तुत कथासंग्रहातून अनेक गुण-दुर्गुण, वृत्ती-प्रवृत्ती, अपप्रवृत्ती मांडल्या आहेत. सत्तासंघर्ष, अस्तित्व टिकवण्याची धडपड, नात्यासंबंधी गैरसमज, त्यातील उथळपणा, अज्ञानापोटी मोजावी लागणारी किंमत, न केलेल्या कृत्यासाठी शिक्षा, व्यवस्थेतील सामान्यांचे दोलायमान स्थान, सृजनशीलतेचा ऱ्हास, अतिक्रमण, समाजकल्याणाच्या कृतीमागची दांभिकता, प्रतिस्पर्ध्यावर आरोप-प्रत्यारोप, विश्वासघात यांचं विचार करणारं दर्शन या कथेतून घडतं. बदलत्या काळाबरोबर माणसाची नैतिक आणि अनैतिकता कशी बदलत जाते, याचं स्पष्ट चित्र ही कथा उभी करते.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
वर्जेश सोलंकी यांची कथा समाजकारण, राजकारण, साहित्य, व्यवहार कॉर्पोरेट क्षेत्रातील बेबनाव व फसवणूक यांच्यावर लक्ष केंद्रित करते. आर्थिक संबंध, आर्थिक पर्यावरण स्वीकारल्याशिवाय माणसांची धडगत नाही, या वास्तव्याचा या कथांनी अपरिहार्यतेनं स्वीकार केल्याचं दिसतं. त्यामुळे कौटुंबिक नातेसंबंध जपणुकीकडे कमी वेळ व व्यवहारात टिकून राहण्यासाठी सर्वार्थानं चाललेली धडपड, यामुळे रुक्ष, संवेदनाहीन जग निर्मिती होणार असल्याचे संकेत मिळतात.
लेखक कोणत्याही चळवळीशी जोडलेला नाही, तसंच एखाद्या जात\वर्गाशी त्याचा संबंध नाही. त्यामुळे या कथेतून कोणती छुपाछुपी नाही किंवा कोणताही अजेंडा प्रस्तुत केलेला नाही. सर्व पक्षीय राजकारणातील सर्वसामान्य जनतेच्या त्रासदायक घटनेमागील बोच लेखक विडंबनाच्या पातळीवर येऊन नेमकेपणानं व निर्भीडपणे दाखवतो.
या कथेत अधिक तर लेखकाचे व्यक्तिगत अनुभव आहेत. जे जगलं, जे भोगलं, त्यांना कथेचे विषय बनवण्यात आलेलं आहे. त्यांना आपल्या आजूबाजूच्या निरीक्षणाची जोड दिली आहे. आजचं जगणं काळाच्या पटलावर ठेवून आपल्या जीवनविषयक जाणिवा उजेडात आणण्याचं अपूर्व काम या कथांनी केलं आहे.
फिल्मी दुनियेचा कथेवरचा प्रभाव हे या कथासंग्रहाचं आणखी एक वैशिष्ट्य सांगता येईल. ‘लोकशाही’ या कथेतल्या निवेदकाच्या वडिलांना चित्रपटांचं आकर्षण असल्याचं दिसतं. कथेतून काही प्रसंगांचं वर्णन करताना किंवा मनोवस्थांचं वर्णन करताना लेखकाने फिल्मी प्रसंगांचा आधार घेतला आहे. ‘शोले’चा अधिकतर उपयोग झाला आहे. सराईत गुन्हेगाराला काली बिल्ली पाळण्याचा शौक असल्याचं ‘हुसेनभाय और गणपतभाय व्हाया अमेरिका’ व ‘लोकशाही’ या दोन कथांतून दिसून येतं. ‘अमर होता होता राहिलेली मर कथा’मध्येही गुन्हेगारविश्वाच्या साखळीचं प्रतिमांकन करताना फिल्मच्या नामावलीचा आधार घेतलेला आहे. ‘ताक असंच असतं’ या कथेतला न्यायाधीशही चित्रपटाच्या प्रभावाखाली आहे असं दिसतं. ‘हा कोर्टाचा पिंजरा आहे, व्ही. शांतारामचा नाही’ असं विधान करतो. फिल्मी नायकाला मनुष्य गुन्ह्यातून वाचवण्यासाठी यंत्रणेची आक्रमक धडपड, ही फिल्मच्या प्रभावाची बाजू प्रकाशित करते. अशा नटाला वारंवार जामीन मिळणं, साक्षीसाठी हजर राहण्यास सूट मिळणं, त्याला लोक विधायक कार्यासाठी ब्रँड अम्बॅसिडरर म्हणून नियुक्त करणं, अशा चक्रावून टाकणाऱ्या घटनांचं दुर्दर्शन झाल्यानं या लोकशाहीचं पुढे काय होणार, हा प्रश्न लेखक वाचकावर सोपवून देतो.
लेखकाने ‘जनगणमन’ या राष्ट्रगीताला ‘मेरे देश की धरती’ हा पर्याय सुचवला आहे. या सर्व बाबी चित्रपटांचा या कथांवरचा प्रभाव स्पष्ट करणाऱ्या आहेत. याला कारण लेखकाचं घर आणि मुंबईची चित्रनगरी यांत फारसं नसलेलं अंतर आणि लहानपणी तर लेखकानं चित्रपटावर फावल्या वेळेचा खुर्दा उधळला होता. विशेष म्हणजे ‘कहानी पुरी फिल्मी है’ या शीर्षकाची एक कथा आहे. या कथेचे संवाद प्रचलित सुभाषितवजा वाक्यं वापरून व काही प्रचलित सुभाषितांचा तोंडवळा जरासा बदलून वापरल्याने गंमत वाढली आहे. उदाहरणार्थ – १) जो निवडून आला तो सिकंदर हारा वो गली का बंदर, २) हरतात त्यांच्या मयतीला लोक जात नाही, ३) ज्याच्या हातात माईक तोच व्यवस्थेचा पाईक, ४) पापी सीट का सवाल है, ५) कुछ अच्छे काम के लिए झूठ बोलना पडे, तो झूठ अच्छा होता है, ६) पडे लिखे आदमीही चुतीया बनते है, ७) छोटा बम बडा धमाका इ.
अमेरिकेतील ट्विन टॉवर उडवणारी घटना एका व्हिडिओ गेमच्या पातळीवर आणून त्याचं विडंबन केलं आहे. अमुभायच्या बायकोनं तेलाची विहीर आपल्या मालकीची व्हायला हवी, या हट्टापायी अमेरिकेनं आखाती देशावर हल्ला चढवला. वास्तवातल्या मोठमोठ्या घटना अशा छोट्या स्वरूपात एखाद्या खेळातील रंजकता आणून उलगडून दाखवण्याचा प्रयत्न याआधी कथेच्या रचनेचा विषय झाला नव्हता.
तसाच प्रयत्न नाणेटंचाई संदर्भातला आहे. निवेदकाच्या पत्नीला कोणीतरी शंभर रुपयाची जाली नोट देतं. दुकानदार ती घेत नाही, तेव्हा तिच्या लक्षात येतं. शंभर रुपयाचा घाटा सगळ्यांनाच का नको व्हायला यासाठी वरिष्ठामार्फत नोटबंदी आणली जाते. एका सामान्य घटनेशी नोटबंदी जोडल्यामुळे या कथेत नेमकं वर्मावर बोट ठेवलं आहे.
या निमित्तानं काही राजकीय घटनेकडे मागे वळून पाहता येईल. गुटखाबंदीचा निर्णयही याच मानसिकतेतून घेतला गेला होता. एका ज्येष्ठ नेत्याच्या पत्नीने आपल्या पतीची गुटख्यापासून सुटका करून घेण्यासाठी वरिष्ठ नेत्याला साकडे घातलं होतं. आणखी एका सत्तापुरुषाच्या पत्नीला राजकीय पक्षाने बंद पुकारल्यामुळे औषध उपलब्ध न झाल्यामुळे जीव गमवावा लागला होता. तेव्हापासून बंदमधून मेडिकल स्टोअर्स वगळण्यात आली. राजकारण्यांना, सत्येतल्या लोकांना ज्या गोष्टींचा त्रास होतो, त्यावर उपाययोजना केल्यानंतर हे सगळं जनकल्याणासाठी केलं म्हणून डांगोरा पिटण्यासाठी त्यांचे अनुयायी मोकळे असतात
या संग्रहातून यंत्रणेची पोलखोल केलेली आहे. ‘ताक असंच असतं’ ही कविता आहे की कवितासंग्रहाचं नाव याची जराही कल्पना विद्यापीठाच्या कुलगुरूला नसते. शिक्षणमंत्र्यांनी फैलावर घेतल्यामुळे विद्यापीठातील सर्वच कर्मचाऱ्यांशी कुलगुरूंचं संभाषण होतं. यंत्रणेतील समन्वयाचा अभाव या निमित्ताने अधोरेखित होतो. विद्यापीठीय समितीतील सदस्यांना अभ्यासक्रमात पुस्तक लावण्यासाठी लेखकांकडून वेगवेगळी प्रलोभने दाखवली जातात. एकंदरीत हा व्यवहार किती अशुद्ध आहे, रुक्ष आहे याची प्रचिती येते. वादग्रस्त कवितेमुळे कौटुंबिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागणाऱ्या कवीनं माघार घ्यायची ठरवलेलं असताना त्याच्या वतीनं त्याला कुठलीही पूर्वकल्पना न देता जाहीर माफी मागितली जाते. यात सोशल मीडियाचा हस्तक्षेप दिसून येतो.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
‘जाडजूड’ या कथेत महाराष्ट्रात गावगल्लीत असणाऱ्या ५१ पुरस्कार समित्यांपैकी ४५ समित्यांनी एका कादंबरीला पुरस्कार जाहीर केला आहे. उरलेल्या सहा समित्यांना हे पुस्तक आल्याचं माहीत नसल्यानं पुरस्कार घोषित झाले नाहीत. यातून पुरस्कार देण्याच्या धुळफेक पद्धतीतला हास्यास्पद प्रकार उघडकीस येतो.
खुनाचा आरोप असलेल्या अभिनेत्याची कोर्टातली सुनावणी त्याच्या छोट्या-छोट्या गरजानुसार, असमर्थननीय कारणावरून पुढे ढकलली जाते. इतर कैद्यांना हे नियम लागू होत नाहीत. एखादी सिस्टीम एखाद्याला उपकारक ठरते, तर तीच सिस्टीम दुसऱ्याला त्रासदायक. सरकार आणि या यंत्रणेविरुद्ध सामान्यांनी दाद कुठे मागायची, हा प्रश्न यानिमित्तानं आपल्या मनात आंदोलित होतो. आरोपातून सुटका झालेल्या सिनेअभिनेतेच्या चित्रपटाला उसळलेली गर्दी, पब्लिकची मानसिकता क्षय झाल्याचा प्रत्यय येतो
माणसाच्या स्वभावाच्या काळ्या-पांढऱ्या रंगातल्या व्यक्तिरेखा या कथासंग्रहातून भेटतात. आपल्या जगण्याच्या केंद्रातून विस्तारणाऱ्या व नवी दृष्टी देणाऱ्या या कथा आहेत. आकारानं मर्यादित पण आपल्या जगण्याची समज विस्तारीत करण्याचे बळ देणाऱ्या या कथा मराठी कथाविश्वाला वेगळे भान व अभिव्यक्तीला वेगळे आयाम देतील...
हुसेनभाय और गणपतभाय व्हाया अमेरिका - वर्जेश ईश्वरलाल सोलंकी
पार पब्लिकेशन, मुंबई,
मूल्य – २०० रुपये.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment