अजूनकाही
नुकतंच दिनेश पाटील यांनी लिहिलेलं ‘महाराजा सयाजीराव यांच्या सुधारणा : धर्म आणि सामाजिक- भाग ७’ वाचून पूर्ण केलं. आधीच इतिहास विषय कठीण आणि क्लिष्ट. त्यात पुन्हा धर्म आणि सामाजिक सुधारणा यांसारखा नाजूक विषय. पण तो लेखकानं अतिशय कुशलतेनं हाताळला आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणेच्या इतिहासात महाराजा सयाजीराव गायकवाड या सुविद्य राजाचं धर्म आणि जात सुधारणेचं कार्य अलक्षित राहणं, ही अत्यंत खेदाची बाब आहे. पण बाबा भांड यांचे अथक प्रयत्न आणि महाराष्ट्र शासनाचं बहुमूल्य साहाय्य यातून सयाजीरावांच्या कार्याला पुन्हा उजाळा मिळत आहे.
या पुस्तकाला बाबा भांड यांची प्रस्तावना लाभली आहे. ती महाराजांचा परिचय ‘चालता-बोलता इतिहास’ या मथळ्याखाली वाचकांना करून देते. या पुस्तकात एकूण पाच प्रकरणं आहेत. अस्पृश्यांसाठीचं कार्य, सर्वधर्मियांसाठी केलेले कायदे, वेदोक्त, धर्म-साक्षरतेतून समाजपरिवर्तन, धर्मांचा तुलनात्मक अभ्यास, महाराष्ट्रातील तत्कालीन समाजसुधारकांसह महाराजांचं सामाजिक सुधारणेचं अनुरूप कार्य, या आणि अशा वैशिष्ट्यपूर्ण घटकांचा समावेश या पुस्तकात आहे. लेखकाने वापरलेला धर्म आणि जात-‘साक्षरता’ हा शब्द या प्रकरणांचं सार सांगून जातो. ‘सुधारणा’ऐवजी ‘साक्षरता’ हा शब्द मनावर खोलवर परिणाम करतो. लेखकाला सापडलेलं लेखनाचं आणि सयाजीरावांच्या सुधारणांचं गमक या शब्दांत दिसून येतं.
या पुस्तकात लेखकानं महाराष्ट्राच्या समाजसुधारणेच्या इतिहासात सर्व महापुरुषांमधील समन्वयाचा दुवा असलेल्या सयाजीरावांना केंद्रस्थानी ठेवून इतर समाजसुधारकांना त्यांच्या कार्याशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे. हा प्रयत्न सयाजीरावांच्या तुलनात्मक धर्म-अभ्यास या संकल्पनेचा एक भाग होय. लेखकाने केलेल्या तत्कालीन महापुरुषांच्या तुलनात्मक अभ्यासाचं फलित म्हणजे या पुस्तकातून पुढे येणारा नवा इतिहास होय. तसंच धर्माच्या तुलनात्मक अभ्यासाचा हा स्तुत्य पायंडा आहे. महाराष्ट्राच्या समाजसुधारणेच्या इतिहासात फुले-शाहू-आंबेडकरांसोबत महाराजांचं नाव जोडलं जावं, असं वाटतं.
..................................................................................................................................................................
ऑनलाईन विज्ञान साहित्य लेखन कार्यशाळा
अधिक माहितीसाठी पहा -
https://www.facebook.com/aksharnama/posts/2780841678893566
..................................................................................................................................................................
या पुस्तकातील सर्वांत वैशिष्टपूर्ण गोष्ट म्हणजे लेखकाची भूमिका सर्वसमावेशक आणि अनाग्रही आहे. केवळ अगणित पुराव्यांचा आणि संदर्भांचा ढीग वाचकांसमोर ठेवून त्यांना चकित करावं, असा त्यांचा उद्देश नसून मोजक्या शब्दांतून आणि प्रसंगांतून वाचकांना सुखद धक्के देत जुन्या गृहीतकांना फाटा देण्याचा, तसंच धर्म आणि नवा इतिहास सांगण्याचा लेखकाचा प्रयत्न यशस्वी ठरलेला दिसतो.
या पुस्तकातून लेखकाच्या संशोधनाची आणि व्यासंगाची कल्पना येते. महात्मा फुल्यांपासून कॉम्रेड शरद् पाटील यांच्यापर्यंत तत्कालीन महापुरुषांचा इतिहास जोडून सांगण्याचं काम लेखकानं कुशलतेनं केलं आहे. ही तर्कसंगती या पुस्तकाला खऱ्या अर्थानं सुंदरता प्राप्त करून देते. लेखकानं महाराजांची ‘भूमिपुत्र’ म्हणून दखल न घेता; महाराज आणि तत्कालीन महापुरुषांचा एकांगी अभ्यास न करता सयाजीरावांच्या अनुषंगाने महाराष्ट्राची समाजसुधारणेची परंपरा आणि महापुरुषांचं प्रेरणास्थान उजागर करण्याचा प्रयत्न केला आहे.
अलौकिक शब्दसौंदर्य, सहज आणि सुंदर शब्दरचना या पुस्तकाची वाचनीयता वाढवतात. लेखकाच्या लेखणीत कमालीची सहजता जाणवते. ऐतिहासिक लिखाण म्हणजे भारदस्त शब्द ही संकल्पना दूर सारून सामान्य वाचकाच्या मनात घर करेल, अशी भाषा वापरल्यानं पुस्तक वाचनीय झालं आहे.
महाराजांच्या लक्ष्मी पॅलेसवरील कोरलेली सर्वधर्मीय चिन्हं या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर पहावयास मिळतात; तर आतमध्ये सयाजीरावांनी ज्यूबिली बागेत बसवलेल्या बुद्धांच्या पुतळ्याचं आणि महाराजांचे प्राण वाचवणार्या अर्जुन व हरी कोळी या आदिवासी बंधुंच्या पुतळ्याचं छायाचित्र आहे. तसंच महात्मा फुले यांच्या बैठकीच्या खोलीत लावलेलं सयाजीरावांचं छायाचित्रही आहे. यातून महाराजांचं महात्मा फुल्यांच्या आयुष्यातील स्थान अधोरेखित होतं.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
आज एकविसाव्या शतकात भारतासारख्या बहुधर्मीय आणि बहुभाषिक देशामध्ये सतत घोंगावणार्या जातीयतेच्या वादळाला शांत करण्याचं काम हे पुस्तक करेल. सर्व जात-धर्म-पंथांच्या लोकांना सोबत घेऊन राज्य कशा प्रकारे यशस्वीपणे चालवलं जातं, याचं उत्तम उदाहरण म्हणजेच महाराजा सयाजीराव गायकवाड होय. अशी सुविद्य व्यक्ती जेव्हा आपल्या पुत्रासमान प्रजेला सोडून गेली, तेव्हा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी उद्गार काढले होते- “अस्पृश्यांचा कैवारी गेला आणि सामाजिक सुधारणांचा पुढारी नाहीसा झाला.”
‘फुले-शाहू-आंबेडकर यांचा महाराष्ट्र’ असं म्हणताना आपण या महापुरुषांना वेगवेगळ्या जाती-धर्माच्या गटात बंदिस्त करतो आणि एकात्मतेच्या विचाराला बाधा पोहोचवतो. पण या पुस्तकातील लेखकाचा तुलनात्मक धर्म आणि महापुरुषांचा अभ्यास ही बाधा संपवण्याचं काम करेल. महाराजांच्या कार्यातून वर्तमानकालीन राजसत्तेला हे पुस्तक एक आदर्श वस्तुपाठ घालून देईल. त्याचबरोबर या राजसत्तेचे रागरंग बदलण्याची ताकदही या पुस्तकामध्ये आहे. सयाजीरावांच्या धर्म-साक्षरतेच्या कार्याची अवहेलना करणाऱ्या तथाकथित इतिहासकारांना हे तुलनात्मक अभ्यासाचं सत्य स्वीकारावंच लागेल. त्यातून महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणेच्या इतिहासाचा अभ्युदय होईल. महापुरुषांच्या स्तुतीपाठकांना नवा दंडक घालून देण्याचं काम या पुस्तकातून घडेल. तसंच जुन्या गृहीतकांवरील कोळीष्टकं हटवली जातील आणि तथाकथित इतिहासाला नवी कलाटणी मिळेल.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment