जनरीत वेगळी असते आणि जिवंत हृदय असलेल्या संतप्रवृत्तीच्या लोकांची रीत वेगळी असते!
संकीर्ण - ललित
श्रीनिवास जोशी
  • चित्र इंटरनेटवरून साभार. पेंटिंग - Tony B Conscious.
  • Wed , 24 March 2021
  • संकीर्ण ललित प्रसन्न हुबळीकर विक्षिप्त Mad माणुसकी Humankind संत Sant ख्रिस्त Christ प्रेम Love

मला आयुष्यात खूप ब्रिलियंट मित्र मिळाले. काही भयंकर विक्षिप्त होते. एका महाब्रिलियंट आणि त्याच वेळी महाविक्षिप्त असलेल्या मित्राची ही स्टोरी...

..................................................................................................................................................................

माणूस विक्षिप्तपणा का करतो? आजूबाजूच्या लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी काही लोक विचित्र वागतात, हे खरे आहे. पण, काही उच्च प्रतीच्या लोकांचा विक्षिप्तपणा त्यांच्या जीवनविषयक श्रद्धांमधून येतो, त्यांच्यातील जीवन जगण्याच्या आत्मविश्वासातून येतो, त्यांच्यातील जिवंतपणामुळे येतो.

काही लोक जग कसे असावे, याचा विचार करून जगतात. बाकीचे लोक जग कसे आहे, याचा विचार करून स्वतःला जगाच्या मुशीत ढाळतात. आपल्या व्यक्तिमत्त्वाचे जे भाग त्या मुशीत बसत नाहीत, ते कापून टाकतात. मग नंतर म्हातारपणी पस्तावा करत बसतात. कारण आपल्यातील जिवंतपणाचे हवन केल्याशिवाय आपण जगाच्या मुशीत फिट होत नाही. आणि जिवंतपणा न जपता जगलो की, आपले जीवन व्यर्थ गेले आहे, असे म्हातारपणी वाटणे अपरिहार्य ठरते.

हुबळी कसलीही तडजोड न करता जगला. हुबळी म्हणजे आमचा प्रसन्न हुबळीकर. ज्ञानावरचा विश्वास, प्रामाणिकपणावरचा विश्वास आणि माणुसकीवरचा विश्वास, ही त्याच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाची मूल्ये आहेत. यांच्याशिवाय हुबळी जगूच शकत नाही. त्याच्या आयुष्यातील विक्षिप्तपणाचे एकाहून एक सरस किस्से त्याच्या या मूल्यांवरील विश्वासातून जन्मले आहेत. ज्ञान, प्रामाणिकपणा आणि माणुसकी म्हटले की, त्याला जनरीत विसरायला होते.

मद्रास आयआयटी करून हुबळी पुण्यात आला. शिकवण्यासाठी. हुबळी चांगला इंजिनियर आहे. तरीही त्याचे मन इंजिनियरिंगमध्ये रमले नाही. त्याला शिकवावेसे वाटले. अप्लाइड ज्ञानापेक्षा शुद्ध ज्ञान त्याला साद घालत असावे. अप्लाइड ज्ञानाचे जीवन जगण्यात खूप तडजोड करावी लागते. कॉर्पोरेट जीवनातली धावपळ, त्यातला सिनिसिझम, त्यातली जीवघेणी स्पर्धा त्याला नको वाटली. शिक्षण क्षेत्र त्याला त्यामानाने शुद्ध वाटले. अप्लाइड ज्ञानातून येणारा पैसा त्याला नको वाटला, त्यापेक्षा शुद्ध ज्ञानाच्या दानातून येणारे समाधान त्याला हवे हवेसे वाटले.

..................................................................................................................................................................

हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

विद्यार्थ्यांना मनापासून शिकवावे. आपल्या विषयावर संपूर्ण पकड असली तरी वर्गात जाताना प्रत्येक वेळेस अभ्यास करून जावे. विद्यार्थ्यांवर प्रेम करावे, विद्यार्थी घडवावेत. त्यांना तृप्त करता करता आपणही अभ्यास करावा आणि आपल्यातील सनातन विद्यार्थ्याला तृप्त करावे, अशी भूमिका!

हुबळी ज्या कॉलेजात शिकवत होता, ते एका शिक्षणसम्राटाचे होते. तिथे अर्थातच शिक्षणाच्या धंद्याला महत्त्व होते. हुबळी ‘दगडापेक्षा वीट मऊ’ या न्यायाने कॉर्पोरेट क्षेत्र सोडून शिक्षणक्षेत्रात आला होता. त्याला लवकरच वीट दगडापेक्षा कठीण असल्याचा साक्षात्कार झाला. हुबळीने तो प्रश्न तडजोड न करता हाताळला. पण ते नंतर.

अशा सुंदर माणसात एक निरागस विक्षिप्तपणा लपलेला आहे, हे कुणाच्याच लक्षात येत नाही. कसे येणार? हुबळीचा चेहरा अत्यंत शांत आणि प्रसन्न आहे. अगदी नावाप्रमाणे प्रसन्न आहे. नाहीतर प्रसन्न हे नाव असलेली अनेक माणसे अत्यंत खबदाड असलेली आपण नेहमीच पाहतो.

हुबळीला शिकवायला आवडत असले तरी परीक्षांची सुपरव्हिजन आवडत नसे. आपल्याला जे काम आवडत नाही, त्या कामाचे पैसे घेणे त्याला अनैतिक वाटे. पण, सुपरव्हिजन तर कम्पल्सरी होती. शिक्षकांनी सुपरव्हिजनला नकार दिला तर सुपरव्हिजन कोण करणार? कुणा शिक्षकाला सुपरव्हिजन शक्य नसेल तर त्याला बदली शिक्षकाची व्यवस्था करावी लागे. हुबळी मग कॉरिडॉरमध्ये आपल्या सुपरव्हिजनच्या स्लॉटचा लिलाव करे. लिलाव कसला? तो रिव्हर्स लिलाव होता. म्हणजे लिलाव करणारा हुबळी लिलाव घेणाऱ्याला पैसे देत असे. म्हणजे सुपरव्हिजनचे पन्नास रुपये मिळत असतील तर हुबळी त्यात आपले पन्नास रुपये टाकत असे. कमीत कमी ‘वर पैसे’ घेणाऱ्याला बोली मिळत असे.

पैशाची गरज असलेले अनेक लेक्चरर लिलाव घ्यायला उत्सुक असत. जास्तीचे पैसे मिळाले तर त्यांना हवे असत. संसार कुणाला चुकला आहे? हुबळी इतका नीती-अनीतीचा विचार कोण करतो?

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

हुबळी एकदाच उत्साहाने सुपरव्हिजन करायला गेला.

हुबळीच्या वर्गात त्या शिक्षणसम्राटाचा पुतण्या होता. तो अर्थातच मठ्ठ् होता. तरीही तो दरवर्षी अत्यंत चांगल्या मार्कांनी पास होत असे. हुबळीने ठरवले की, हा एका विषयात तरी नापास झाला पाहिजे. हुबळीने शपथ घेतली की, मी याला कॉपी करू देणार नाही. पेपर सुरू झाला तसे हुबळी त्या दिवट्या पुतण्याच्या बेंच समोर जाऊन बसला. पुतण्याला काहीच लिहिता आले नाही. तो कोरा पेपर देऊन उठला. हुबळीने सगळ्या पेपरवर लाल पेनाने काटा मारल्या. त्यावर नंतर काही लिहिता येणार नाही, याची व्यवस्था केली. अनुभवी शिक्षक हुबळीला म्हणाले की, काही उपयोग होणार नाही. पुतण्या पास होईल. हुबळी म्हणाला, असे झाले तर मी राजीनामा देईन. पुतण्याचा अख्खा पेपर - हुबळीच्या सहीसह बदलला गेला. त्याला त्या पेपरमध्ये ८९ मार्क मिळाले. हुबळीने आपला शब्द पाळला. त्याने नोकरीचा राजीनामा दिला.

हुबळीची बायको इतकी ग्रेट, तिला आपल्या नवऱ्याचा तडजोड न करणारा स्वभाव आवडला होता. ती म्हणाली- ‘माझी नोकरी आहे. तू तुला पाहिजे तसे जग.’

हुबळीने मग घराची जबाबदारी घेतली. पुढील नोकरी मिळेपर्यंत दोन वर्षे मुलींचे सगळे केले. हुबळी स्वयंपाक शिकला. मुलींचे शाळा, ग्राऊंड, डॉक्टर वगैरे सगळे केले. आपला राहून गेलेला अभ्यास केला. बायकोची सेवा केली. जनरीतीच्या आणि महत्त्वाकांक्षेचा दबाव हुबळीवर एक क्षणही आला नाही.

इकडे कॉलेजमध्ये लोक हुबळीच्या आठवणी काढत राहिले.

लोकांना हुबळीचे लॅबमधले ‘पोहणे’ आठवत राहिले. तो किस्सा कुणीही परत परत आठवण काढत राहावे असाच होता. कुठलीही गोष्ट करायची म्हणजे त्यामागचे टेक्निक आणि त्या टेक्निकमागचा अभ्यास माहीत असायलाच पाहिजे, असे हुबळीचे म्हणणे होते. हुबळीला एकदा अचानक वाटले की, आपण पोहायला शिकले पाहिजे. पण, एक कोच नेमून पाठीला डबा बांधून पाण्यात उतरला तर तो हुबळी कसला!

हुबळीने ठरवले की, पहिल्यांदा सगळे स्ट्रोक्स आत्मसात केले पाहिजेत. सगळे स्ट्रोक्स आत्मसात करूनच पोहायला उतरायचे असे हुबळीच्या मनाने घेतले. आधी अभ्यास झाला पाहिजे, थिअरी परफेक्ट झाली पाहिजे, मगच प्रॅक्टिकलला अर्थ! निदान पोहण्याच्या बाबतीत तरी आधी प्रॅक्टिकल आणि नंतर थिअरी अशीच जगभर जनरीत आहे. हुबळीला ही व्यवस्था नको वाटली. हुबळीने पोहण्यावरची अनेक पुस्तके ब्रिटिश लायब्ररीमधून आणली. त्यांचा अभ्यास केला. फ्री स्टाईल, बॅक स्ट्रोक, ब्रेस्ट स्ट्रोक असे सगळे स्ट्रोक्स त्याने मनामध्ये ‘आत्मसात’ केले. त्यानंतर हे सगळे स्ट्रोक्स त्याने आपल्या स्नायूंच्या मेमरीमध्ये फिट करायचे ठरवले. स्नायूंना त्यांची त्यांची स्वतःची मेमरी असतेच की! आपण चालतो, तेव्हा विचार करून चालतो का? आपण आपल्या स्नायूंच्या मेमरीवर चालतो. आपण सतत प्रॅक्टिस केली की, ‘मसल मेमरी’ तयार होते. लॅबमधील मोठ्या टेबलांवर झोपून हुबळीने या सगळ्या स्ट्रोक्सची प्रॅक्टिस सुरू केली. हुबळीच्या दृष्टीने हे सगळे ठीक होते. पण बाहेरून बघणाऱ्या व्यक्तीला ते चित्र फार विचित्र दिसे. एक प्रौढ पुरुष पालथा पडून विविध प्रकारांनी हात पाय हलवतो आहे, हे चित्र काही लोकांच्या झेपण्याच्या पलीकडचे होते. त्या लॅबवरून लेडीज टॉयलेटचा रस्ता होता. येणाऱ्या जाणाऱ्या स्त्रिया लॅबच्या खिडकीतून दिसणारा तो नजारा बघून संकोचू लागल्या. इकडे हुबळीची प्रॅक्टिस तर जोरात सुरू होती. बिचाऱ्या लेडीज स्टाफने अशा परिस्थितीत काय करावे? त्या हतबल झाल्या. शेवटी स्त्री शिक्षकांनी शिपायांना पुढे पाठवायला सुरुवात केली. त्या शिपयाला म्हणत – ‘जा रे, हुबळीकर सर पोहत नाहीयेत ना ते बघून ये.’ हुबळी ज्या काळात पोहत नसे, त्या काळात कॉरिडॉरमध्ये ये-जा होत असे. हुबळी पोहायला लागला की, कम्प्लीट लॉकडाउन!

या पोहण्याच्या विविध स्ट्रोक्ससंबंधी विचार करत असताना, पाण्याचे प्रवाह कसे तयार होत असतील हा विचार हुबळीच्या मनात येऊ लागला. मग हुबळीने फ्लुइड डायनॅमिक्सचा अभ्यास सुरू केला. दोन-चार महिन्यात फ्लुइड डायनॅमिक्सचा अभ्यास पूर्ण झाल्यावर हुबळीने पोहण्याच्या कोचेसशी चर्चा सुरू केली. त्याच्या लक्षात आले की, पोहण्याच्या क्षेत्रातील गाजलेल्या कोचेसना फ्लुइड डायनॅमिक्स हा शब्दसुद्धा माहीत नाहिये. हुबळी फार निराश झाला. त्याने शपथ घेतली की, जो कोच माझ्याकडून फ्लुइड डायनॅमिक्स शिकेल त्याच्याकडूनच मी पोहणे शिकेन. असा कोच दुर्दैवाने महाराष्ट्र देशी पैदा झाला नाही. महाराष्ट्र देशी फ्लुइड डायनॅमिक्स शिकवणाऱ्या लोकांनाच फ्लुइड डायनॅमिक्स येणे मुश्किल होते. ते बिचारे काहीतरी पाठांतर करून वेळ मारून नेत. इथे हुबळी पोहण्याच्या कोचला फ्लुइड डायनॅमिक्स शिकवायला निघाला होता. हुबळी त्याच्या दोन्ही करांनी द्यायला तयार होता. घेणारे कोणीही नव्हते. या सगळ्या प्रकारात फ्लुइड डायनॅमिक्स तर कोणी शिकले नाहीच, पण हुबळीचे पोहायला शिकणे मात्र राहून गेले.

हुबळी आमच्या अमृत बोरीकरला म्हणाला, ‘जर कुणी माझ्याकडून फ्लुइड डायनॅमिक्स शिकलं असतं तर महाराष्ट्रात ऑलिंपिक्स गोल्ड विनर तयार झाला असता.’ बोरी त्याला म्हणाला, ‘प्रकरण फ्लुइड डायनॅमिक्सवर थांबलं नसतं, तू पुढे त्याला मसल डायनॅमिक्स शिकायला लावलं असतंस.’ यावर हुबळी प्रामाणिकपणे म्हणाला की, हो माझ्या मनात ते विचार सुरू झाले होते.

हुबळी ज्ञानासाठी आणि प्रामाणिकपणासाठी जन्मला आहे. त्याची ज्ञानलालसा संपत नाही.

हुबळीला खूप वर्षांपूर्वी कावीळ झाली. हुबळीने लगेच सगळे संदर्भ मिळवले. काविळीसंदर्भात सगळे माहीत झाले आणि आपल्याला मिळणारी ट्रीटमेंट योग्य आहे की चुकीची आहे, हे कळू लागले, की उपचार सुरू करू असा विचार हुबळीने केला. नाहीतरी कावीळ हा व्हायरसने होणारा रोग आहे. त्यामुळे तो आपोआप बरा होण्याची शक्यता होतीच. एकीकडे रोग पुढे जात राहिला, एकीकडे हुबळीचा अभ्यास पुढे जात राहिला. हुबळीचे वजन पासष्ट किलोवरून पस्तीस किलोवर गेले. मग मात्र हुबळीला जाणवले की, आपल्याला कुणा डॉक्टरवर विश्वास ठेवायलाच लागणार. पण केस इतकी पुढे गेली होती की, कुणी डॉक्टर हुबळीच्या बरे होण्यावर विश्वास ठेवायला तयार होईना. हुबळी म्हणाला, ‘ज्यांना आपल्या ट्रीटमेंटवर विश्वास नाही, त्यांच्या ट्रीटमेंटवर मी का विश्वास ठेवू?’ शेवटी एक वैद्य पुढे आला. त्याने खूप सारी पथ्ये सांगितली, खूप साऱ्या पुड्या दिल्या. हुबळी हळूहळू बरा व्हायला लागला. हुबळी पूर्ण बरा व्हायला दीड वर्ष लागले. पण, एवढा सगळा जिवावर बेतणारा किस्सा झाला तरी हुबळीचा अभ्यास करण्यावरचा विश्वास जराही कमी झाला नाही. जगातली सगळी क्षेत्रे त्याला अभ्यासायची होती. त्याची बुद्धीच इतकी तीव्र होती की, तिला एकही विषय परका वाटत नव्हता!

त्या वैद्याने सांगितलेल्या पथ्थ्यामधे तिखट आणि तेलकट खायचे नाही असेही एक पथ्थ्य होते. हुबळीला मिसळ खावीशी वाटायला लागली. पण गोची अशी की मी पथ्थ्य मोडणार नाही अशी शपथही हुबळीने घेतली होती. मग हुबळीने मिसळ ‘खाण्या’ची एक युक्ती लढवली. तो आमच्या बोरीला म्हणाला, ‘तू मिसळ खा, मी एन्जॉय करतो.’ हुबळी बोरीला घेऊन मिसळ खायला गेला. बोरीला त्याने समोर बसवले. आपल्याला जशी मिसळ पाहिजे तशी ऑर्डर दिली. एक्स्ट्रा तर्री मागवली. ती मिसळीवर ओतली. लिंबू पिळले. कांदा कोथिंबीर पेरली. बोरी हुबळीने सांगितल्याप्रमाणे मिसळ खाऊ लागला. हुबळी त्याला विचारू लागला – ‘आता तर्रीची चव सगळ्या जिभेवर पसरली आहे ना? त्याबरोबर कच्च्या कांद्याची चव लागते आहे ना? आता तर्रीमध्ये भिजलेल्या फरसाणची चव भारी लागते आहे ना.’ बोरी प्रत्येक प्रश्नाला ‘हो, हो’ म्हणत गेला. हुबळीने मिसळ खूप एन्जॉय केली. मिसळीचे पैसे अर्थातच हुबळीने दिले. नंतर बोरी मला म्हणाला, ‘श्राद्धाचे जेवण मृताच्या वतीने जेवताना ब्राह्मणांना कसे वाटत असेल ते मला आज कळले!’

पुढे हुबळीच्या अभ्यासाचा एक अनुभव मलादेखील आला.

ज्यांचे पहिले प्रेम यशस्वी होते, त्यांचा संसार यशस्वी होत नाही, असे काही लोक म्हणतात. माझा संसार यशस्वी होणार होता. त्यामुळे अर्थातच माझे पहिले प्रेम यशस्वी झाले नाही. पहिल्या प्रेमातील कटू अनुभवामुळे, पहिल्या नजराजरीमध्ये प्रेमात पडणे हा बकवास प्रकार आहे, असे माझे मत झाले. ते मी अर्थातच हुबळीला सांगितले. हुबळी म्हणाला, ‘बरोबर आहे तुझे. आपण कोणाच्या प्रेमात पडतो आहे, याचा पूर्ण अभ्यास झाला पाहिजे.’

अभ्यास करून प्रेमात पडण्याची आयडिया मला खूप आवडली. आम्ही पुण्यात सहकारनगरमध्ये ऋतुराज नावाच्या हॉटेलात बसलो होतो. हुबळी लगेच उठला ग्राफ पेपर घेऊन आला. मी विस्मयाने हुबळीकडे बघत राहिलो. हुबळीचा उत्साह बघण्यासारखा होता. आपल्या मित्राला चांगल्या मुलीचे प्रेम मिळावे म्हणून हुबळी किती मनापासून आणि किती उत्साहाने लढत होता! हुबळीने आमच्या अभ्यासाचे सगळे निकष लिहून काढले. मला आता त्या निकषातले अगदी थोडे निकष आठवत आहेत. त्यात मुलीचे एकूण व्यक्तिमत्त्व, तिचे दिसणे, आकर्षण इंडेक्स, तिचे शिक्षण, तिच्या आई-वडिलांचे व्यक्तिमत्त्व, ती पुढे जाड होईल की स्लिम राहील याचा अंदाज, असे काही निकष होते. प्रत्येक निकषाला दहापैकी मार्क द्यायचे होते. प्रत्येक मुलीचे एकूण मार्क काढले की, कुठली मुलगी मला आवडते आहे, हे आम्हाला कळणार होते.

ही पद्धत बरोबर आहे का, हे चेक करण्यासाठी मी त्या चार मुलीतील माझ्या व्यक्तिगत आवडीप्रमाणे एक ते चार नंबर काढले.

माझे नंबर आणि हुबळीच्या मार्किंग सिस्टीमप्रमाणे आलेले नंबर जुळेनात. मी हुबळीला तसे सांगितले. हुबळीने नम्रपणे आपल्या अभ्यासातील उणीव मान्य केली.

त्याने पुढे विविध निकषांचे गट तयार केले. त्यांच्या महत्त्वाप्रमाणे त्यांचे ‘वेटेज’ ठरवले. म्हणजे उदाहरणार्थ, मुलीचे सुंदर दिसणे हे मुलीच्या एकूण आकर्षणापेक्षा कमी महत्त्वाचे असल्याने आकर्षणाला सौंदर्यापेक्षा जास्त गुण, अशी सिस्टीम आखली.

पुढे पुढे तर हुबळीने मला सांगताही येणार नाही, अशी स्टॅटिस्टिक मधील चिन्हे वापरून अनेक फॉर्म्युले तयार केले. आता मुलींच्या गुणांबरोबरच त्यांच्या दोषांनाही मार्क्स दिले गेले. ग्राफ्सवर मुलींच्या गुण दोषांच्या रेघोट्या खालीवर जाऊ लागल्या.

शेवटी जो निष्कर्ष निघाला, तो माझ्या मनातील निष्कर्षाशी जुळणारा नव्हता. हुबळीने मग माणसाचे सब्जेक्टिव्ह जजमेंट चुकीचे कसे असू शकते, यावरचे विविध निबंध आणले. आमच्या अभ्यासात पहिला नंबर मिळवलेली मुलगीच मला कशी ‘मनापासून’ आवडते आहे, हे तो मला मनापासून पटवून द्यायला लागला.

तेवढ्यात आमच्या ओळखीच्या एका कुटुंबाने एक मुलगी सुचवली. तिची शांतता मला आवडली, मी तिला ‘हो’ म्हणून टाकले. हुबळीला तसे सांगितले. हुबळी शांतपणे हसला. मला त्याने शुभेच्छा दिल्या. मला म्हणाला, हे असेच होते. आपले जिच्याशी लग्न होणार असते, त्या मुलीला आपण आधी ‘हो’ म्हणतो आणि नंतर तिच्यावर आपले प्रेम बसते. हीच खरी सिस्टीम आहे. आधी प्रेम आणि नंतर लग्न ही बकवास सिस्टीम आहे. ही सिस्टीम भारतदेशी रोमँटिक कादंबऱ्या आणि हिंदी सिनेमांनी आणली आहे, आणि मानवी प्रणयाचा अभ्यास न करणाऱ्या विचारशून्य लोकांनी स्वीकारलेली आहे. हुबळी शून्यात बघत पुढे म्हणाला, ‘मीसुद्धा असाच खूप मुलींचा अभ्यास केला आणि शेवटी एका क्षणी त्या अभ्यासात अंतर्भाव नसलेल्या मुलीला ‘हो’ म्हणालो.’

आज इतक्या वर्षांनंतर मला आधी ‘हो’ म्हणणे आणि नंतर प्रेमात पडणे हीच सिस्टीम बरोबर वाटते आहे. लग्नाला ‘हो’ म्हणताना आपण गंभीर असतो. त्या मनःस्थितीत आपण जिला ‘हो’ म्हणतो, तीच आपल्याला खरी आवडलेली असते. बाकी इतर वेळा आपण प्रेमात पडतो, त्यात तेवढे गांभीर्य नसते. त्या प्रेमात सिनेमा, कादंबऱ्या आणि उल्लू कवितांचा प्रभाव जास्त असतो. कोल्ह्याला द्राक्षे आंबट असे काही लोक यावर म्हणतील. माझे आणि हुबळीचे त्यावर फारसे काही म्हणणे नाही.

हुबळीचा आणि माझा संसार चांगला झाला, यावरून आमचा थिसिस बऱ्यापैकी सिद्ध होतो आहे, एवढेच आमचे यावर म्हणणे असेल. असो.

माझा संसार चांगला झाला असे म्हणावे लागेल आणि हुबळने संसार चांगला केला असे म्हणावे लागेल.

हुबळीच्या एका पोरीने इंजिनियर व्हायचे डोक्यात घेतले. बाप मद्रास आयआयटीचा, आई मुंबई आयआयटीमध्ये शिकलेली. मुलीला तेच करावे वाटले तर काही वावगे नव्हते. पण हुबळीला कळत होते की, ही तिची क्रेझ आहे. तिचा पिंड इंजिनियरिंगचा नाही, हे त्याला जाणवत होते. मुलीने चांगले मार्क पाडून एका चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला. मुलगी इंजिनियरिंगला गेली म्हणून हुबळी खूप वाईट वाटले. त्याने नोकरीचा परत एकदा राजीनामा दिला. मुलीबरोबर वेळ घालवला. तिच्याशी संवाद साधला. आठ-दहा महिन्यांतर तिलाही जाणवले की, आपण उथळ क्रेझपोटी इंजिनियर व्हायला निघालेलो आहोत. तिने इंजिनियरिंग सोडले. भरलेली फी वाया गेली. हुबळीचा आनंद गगनात मावेना. आज हुबळीची मुलगी चांगली लेखिका म्हणून पुढे आली आहे. अनेक इंग्रजी वृत्तपत्रांत लेख लिहिते आहे. सुंदर फ्री लान्स जीवन जगते आहे.

इथे प्रश्न उभा राहतो - आपली मुले आर्थिकदृष्ट्या सुरक्षित व्हावीत म्हणून त्यांना काहीही करून इंजिनियर करण्यासाठी तडफडणारे आईबाप नॉर्मल की, आपल्या मुलीला रसरशीत आणि जिवंत आयुष्य जगता यावे म्हणून तळमळणारा हुबळी नॉर्मल?

मला माहीत आहे, अनेक आईबाप म्हणताना म्हणतील की हुबळी नॉर्मल आहे आणि वेळ आली की आपल्या मुलांना इंजिनियरिंगला ढकलतील.

माणसाला विविध प्रकारच्या प्रज्ञा असतात. पण त्या सर्व प्रज्ञांना नियमित करायला एक छोटीशी प्रज्ञा असते. त्याला ‘व्यवहार बुद्धी’ म्हणतात. साध्या भाषेत कॉमन सेन्स! या कॉमन सेन्सचे आणि इतर प्रज्ञांचे मानवी मनात कायम भांडण सुरू असते. सामान्य लोक व्यवहार बुद्धीला कळत न कळत शरण जातात. हुबळीसारखे लोक तिच्याशी भांडत बसतात. कारण त्यांना कळत असते की, आपण व्यवहार बुद्धीच्या आहारी गेलो, तर आपल्या इतर ज्ञानलालसेचा गळा घोटला जाणार आहे. व्यवहार बुद्धीशी सुरू असलेल्या या कलहामधूनच विक्षिप्तपणाचा जन्म होतो.

हुबळीच्या माणुसकीविषयीच्या प्रेमामुळे खूप अनुपम किस्से तयार झाले. त्याच्या डिपार्टमेंटला एक देवासारखा माणूस शिपाई म्हणून आला. त्याचे नाव सुद्धा देवा असेच होते. हा अत्यंत निरागस होता. त्याला शिपाई म्हणून कसे वागायचे हे अजिबात माहिती नव्हते. आणि गंमत म्हणजे बॉस म्हणून कसे वागायचे असते, हे हुबळीला माहीत नव्हते. या प्रकारातून फार मजा येई. हुबळीकडे पाहुणे आले की, हुबळी देवाला चहा आणायला सांगे. देवा म्हणे – ‘आ, जावा की! किती लांब जावं लागतंय आमाला! तुमीच आणा जावा!!!’ यावर हुबळी स्वतः जाऊन चहा आणत असे. त्याला देवाची निरागसता आवडत असे. पण या लाडामुळे देवा शिपाईपण अजिबात शिकेना झाला. हुबळीच्या समोरच्या खुर्चीवर आरामात बसून हुबळीशी गप्पा मारणे त्याला आवडू लागले. इतर शिक्षक वैतागले. ‘देवा, हरामखोरा, सरांच्या समोर तंगड्या फाकवून काय बसला आहेस’, असे त्याला दटावू लागले. यावर हुबळी चिडत असे. तो त्या शिक्षकांना म्हणे की, ‘तुम्ही याला बोललात तर मी राजीनामा देईन.’ देवाचा निरागसपणा राखला गेला पाहिजे असे हुबळीला मनापासून वाटे.

हुबळीचे माणुसकीवरचे प्रेमच असे आहे. त्याच्या या प्रेमाला संतांच्या किंवा ख्रिस्ताच्या प्रेमाचा सुगंध येतो आहे, असे मला आजकाल वाटू लागले आहे. हाताखालच्या शिपायाची निरागसता टिकवण्याचा प्रयत्न करणारा हुबळी आणि संत यांच्यात काहीतरी नाते असणार, असे मला वाटू लागले आहे. 

पुढे हुबळीने राजीनामा दिला. मग लोकांनी देवाला बोलून बोलून आणि शिव्या देऊन आदर्श शिपाई बनवले. स्वतःला कितीही त्रास झाला तरी आपल्या बॉसचे ऐकण्यात देवा धन्यता मानू लागला. हुबळीला हे सारे कळल्यावर हुबळी दुःखी झाला. म्हणाला – ‘हे सारे हिंसक आहे.’ हा सगळा किस्सा बघितल्यावर मला कळेना नॉर्मल कोण आहे - हुबळी की देवाला आदर्श शिपाई बनवणारे जग? 

अशा वेळी हुबळीच्या विक्षिप्तपणाला हसावे की, या दुनियेच्या असंवेदनशीतेवर रडावे हे मला कळेनासे होते.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

खूप दिवस झाले हुबळीची भेट नाही. काही दिवसांपूर्वी मी आणि बोरीकरमध्ये हुबळीचा विषय निघाला. पुन्हा एकदा हुबळीच्या विक्षिप्तपणाच्या किश्श्यांची उजळणी झाली. आम्ही खूप हसलो. थोड्या वेळाने, हुबळीच्या विक्षिप्तपणाचा उगम हा त्याच्या ज्ञानावरच्या, प्रामाणिकपणावरच्या आणि माणुसकीवरच्या श्रद्धेत आहे, ही नुकतीच सुचलेली थिअरी मी बोरीला सांगितली.

बोरी म्हणाला, ‘पूर्वी आपण माणसे खूप उथळ पद्धतीने पाहायचो. आता आपले वय वाढल्यामुळे आपल्या मनात उमटलेल्या लोकांच्या चित्रातील गहिरे रंग आपल्या लक्षात येऊ लागले आहेत. हुबळीच्या विक्षिप्तपणामागचे गहिरे अर्थ आपल्याला जास्त आकर्षक वाटू लागले आहेत.’

बोरीकरचे खरे असावे. तसं बघायला गेलं तर माणूस मोठा होत गेला की, जास्त जास्त गहिरा होत जातो. हुबळीकरला जे प्रेम माणसाविषयी वाटते आहे, ते सर्व भूतांविषयी वाटू लागले की, हुबळीकरचा विक्षिप्तपणासुद्धा जास्त गहिरा होईल. एका कुत्र्याने भाकरी पळवली, तेव्हा नामदेव त्याच्यामागे तुपाची वाटी घेऊन पळाले होते. पळणाऱ्या कुत्र्याला ते म्हणत होते – ‘अरे भाकरीवर तूप तरी घे!’ हे बघून नामदेवाच्या काळचे लोक नामदेवाला ‘विक्षिप्त’ म्हणून हसलेच असतील. पुढे नामदेव संत म्हणून प्रसिद्ध झाल्यावर या किश्श्याला वेगळी खोली प्राप्त झाली. मला कधीकधी वाटते हुबळी आम्हाला एकदा असाच एखाद्या कुत्र्यामागे तुपाची वाटी घेऊन पळताना दिसणार आहे. जनरीत वेगळी असते आणि जिवंत हृदय असलेल्या संतप्रवृत्तीच्या लोकांची रीत वेगळी असते.

..................................................................................................................................................................

लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.

sjshriniwasjoshi@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......