अजूनकाही
महाराष्ट्र शासनाच्या ‘महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समिती’च्या वतीने आजवर १३ खंडातील ५० ग्रंथांचे प्रकाशन झालेले आहे. यातील ‘महाराजा सयाजीरावांच्या सुधारणा - भाग-१० औद्योगिक’ या २५व्या खंडाचा परिचय करून देणारा हा लेख...
..................................................................................................................................................................
महाराष्ट्र शासनाच्या महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समितीच्या वतीने महाराजा सयाजीराव यांच्या संदर्भातील दुसऱ्या टप्प्यामध्ये १३ ते २५ खंड नुकतेच प्रकाशित झाले. यामध्ये एकंदर ५० ग्रंथांचा समावेश आहे. या समितीने २०१८ मध्ये पहिल्या टप्प्यात सुरुवातीचे १२ खंड प्रकाशित केले आहेत. नुकत्याच प्रकाशित झालेल्या या दुसऱ्या टप्प्यातील ग्रंथ-प्रकल्पात ‘महाराजा सयाजीरावांच्या सुधारणा - भाग - १० औद्योगिक’ हा ग्रंथ सौरभ गायकवाड यांनी लिहिला आहे. या ग्रंथामधून भारतीय उद्योगाचा ‘बीजपुरुष’ म्हणून महाराजा सयाजीरावांची ओळख आपल्याला होते.
या ग्रंथामध्ये एकूण सात प्रकरणे असून त्यातून महाराजा सयाजीरावांचे उद्योगविषयक कार्य स्पष्ट केले आहे. पहिल्या प्रकरणात भारतातील औद्योगिक क्षेत्राचा आरंभ आणि विकासाचा थोडक्यात आढावा घेतला आहे. अठराव्या शतकात इंग्लंडमध्ये झालेल्या औद्योगिक क्रांतीने उद्योगधंद्यांच्या विकासाला वेगाने आरंभ झाला. ब्रिटिशांच्या भारतातील आगमनामुळे भारतीय उद्योगाच्या प्रवासात सातत्याने चढउतार होत राहिला. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस भारतातील उद्योगाची भरभराट होण्यास सुरुवात झाली.
बडोद्यातील औद्योगिक विकासाचा शोध दुसऱ्या प्रकरणामध्ये घेण्यात आला आहे. १८८१मध्ये राज्याधिकार प्राप्तीनंतर लगेचच उद्योगधंद्यांच्या विकासाच्या दृष्टीने महाराजांनी प्रयत्न सुरू केले. उद्योगधंद्याच्या विकासासंदर्भात विविध कायदे करून सर्व उद्योगधंद्यांना कायदेशीर पाठबळ दिले. कंपनी अॅक्ट (१८९७), सालचा बॉयलर अॅक्ट (१८९८), कस्टम ॲक्ट (१९०४), रूल्स फॉर ओपनिंग फॅक्टरीज अँड अॅक्वीजिशन ऑफ लँड (१९०४), वेट अँड मेजर्स ॲक्ट (१९०४), मायनिंग ॲक्ट (१९०८), फॅक्टरीज अॅक्ट (१९१३) आणि रूल्स ऑफ डेव्हपमेंट ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज (१९१५) इ. प्रकारचे कायदे सयाजीरावांनी केले. बडोदा संस्थानात महाराजांच्या प्रयत्नाने ओखा मीठ कारखाना, सयाजी स्टील वर्क्स, अश्विनी उद्योग, टाटा केमिकल्स, महाराणी वूलन मिल, फिशरी उद्योग, डिंक उद्योग, पेटलाद येथील पेन्सिल निर्मितीचा कारखाना, मातीची निर्मितीचा कारखाना इ. महत्त्वाचे उद्योग बहरले.
..................................................................................................................................................................
हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
सयाजीरावांचे उद्योग धोरण कसे होते, हे तिसऱ्या प्रकरणातून समजते. महाराजांचे उद्योगविषयक धोरण केवळ बडोदा संस्थानापुरते मर्यादित नव्हते, तर प्रत्येक धोरण राष्ट्रीय वृत्तीने प्रेरित होते. एक राष्ट्र म्हणून महाराज विचार करत होते. प्रत्येक नवा उद्योग संस्थानच्या निधीतून प्रायोगिक तत्त्वावर सुरू करून उद्योगाच्या यशस्वीतेची खात्री पटल्यानंतर ते खाजगी सक्षम उद्योजकाच्या ताब्यात देऊन उद्योजक तयार करण्याची दूरदृष्टी महाराजांकडे होती. व्यापार आणि उद्योग यांचा समन्वय साधून औद्योगिक प्रगती करण्याच्या उद्देशाने स्वतंत्र वाणिज्य व उद्योग खात्याची स्थापना केली. १९१७ मध्ये महिलांमध्ये उद्योगासंबंधी तांत्रिक ज्ञान व कौशल्यांचा विकास करण्यासाठी ‘चिमणाबाई स्त्री उद्योगालय’ सुरू केले.
सयाजीरावांनी औद्योगिक धोरण आखताना केवळ पुरुषांनाच विचारात न घेता महिला व किमान पात्रता वय पूर्ण असणाऱ्या बालकांचादेखील बारकाव्याने विचार केला. औद्योगिक धोरणांची काटेकोरपणे अंमलबजावणी केल्यामुळे बडोदा संस्थान समकालीन इतर प्रगत संस्थानांच्या तुलनेत औद्योगिक विकासात अग्रेसर होते. कोणत्याही राजाने अशा प्रकारे जनतेच्या कल्याणासाठी हे अखंड कार्यरत राहणे, हे आज दुर्लभच म्हणावे लागेल.
चौथ्या प्रकरणात महाराजांनी कृषी औद्योगिक विकासाची पायाभरणी कशा प्रकारे केली होती, हे सांगितले आहे. सयाजीरावांनी कृषी क्षेत्राचे महत्त्व ओळखून शेतीपूरक उद्योगधंद्याची जोड देणे किफायतशीर असल्याचे आपल्या कृतीतून पटवून दिले. कृषीक्षेत्राचा विस्तार करताना प्रथम शेतीच्या परंपरागत पद्धतीत व साधनांमध्ये सुधारणा करून प्रगत प्रशिक्षणाची जोड देत उत्तम हित साधले.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
१८८२मध्ये सूतगिरण सुरू करून बडोदा संस्थानात उद्योगाची पायाभरणी केली. १८८५ मध्ये गणदेवी सहकारी साखर कारखाना सुरू करून भारतातील कृषी-औद्योगिक समाजरचनेचा पाया सयाजीरावांनी घातला. १८९०मध्ये शेतीतील प्रगत ज्ञान आत्मसात करण्यासाठी खासेराव जाधव यांना परदेशात पाठवले. प्रजेत उद्योगांबाबत आवड निर्माण व्हावी व त्यांना विविध प्रयोगांची माहिती मिळावी, यासाठी संस्थानात कृषी व औद्योगिक प्रदर्शनांचे आयोजन केले. महाराजांनी १९१७मध्ये बडोद्यात एक भव्य ‘कृषी औद्योगिक प्रदर्शन’ भरवले. या प्रदर्शनामुळे उद्योगांना प्रचंड चालना मिळाली. याबरोबरच कृषी उद्योगाचा पाया समजून शेतकऱ्यांना कर्जबंधनातून तसेच दुष्काळ व इतर नैसर्गिक आपत्तीपासून मुक्त करण्याकरता शेतीला अखंड पाणीपुरवठ्याच्या सोयी निर्माण केल्या.
महाराजांचे कुशल व्यवस्थापन व उद्योगधंद्यांचा विकासाचे अभियान पाचव्या प्रकरणातून उमगते. सयाजीरावांनी संस्थानातील संसाधनांच्या उपलब्धतेनुसार उद्योगांची स्थापना केली. काळानुरूप बदलणाऱ्या तंत्रज्ञानाशी पारंपारिक ज्ञानाची योग्य प्रकारे सांगड घालून कारागीर जातींना औद्योगिक विकासाच्या मुख्य प्रवाहात आणले. ग्रामीण भागातील परंपरागत हुन्नर जिवंत ठेवत त्यांना आणखी टोकदार करण्यासाठी नवी कार्यक्षेत्रे विकसित केली. विणकाम, कातडी कमावणे, रंगकाम, लाकूडकाम, मातीकाम, धातुकाम, कुक्कुटपालन अशा प्रकारच्या लोककौशल्यावर आधारित शिक्षणवर भर दिला.
१९०८मध्ये सयाजीरावांनी बडोदा संस्थानातील कृषी, सहकार आणि औद्योगिक विकासाला आधारभूत अशी बडोदा बँक उभारली. या बँकेच्या माध्यमातून अनेक लोकोपयोगी योजना राबवल्या. कमी व्याजदरात कर्जपुरवठा लागल्याने नवउद्योजकांना उद्योग स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले. बँकेच्या माध्यमातून लोकांच्या आर्थिक सवयी बदलतील व अर्थव्यवहारात पैसा खेळता राहील अशा व्यापक दृष्टिकोनातून या बडोदा बँकेचा विस्तार केला. आपले सर्व संस्थान रेल्वेने जोडण्याच्या उद्देशाने ९०० किमीचा रेल्वेमार्ग विकसित करून सर्व संस्थान रेल्वेने जोडले. तसेच सर्व संस्थान पक्क्या रस्त्याने जोडले, संस्थानच्या मालकीची जलविद्युत निर्मिती संस्था स्थापन केली. ओका बंदरासारखे बंदर विकसित करून व्यापार उद्योगाला चालना दिली. कापड गिरण्या, रासायनिक उद्योग, साखर उद्योग यासारखे ३५ ते ४० प्रकारचे उद्योग बडोद्यात बहरले.
सहाव्या प्रकरणात सयाजीरावांनी बडोद्यातील सुरू केलेल्या औद्योगिक शिक्षणाच्या सोयी-सुविधांची चर्चा केली आहे. महाराजांनी १८८८मध्ये टी.के. गज्जर यांच्याकडून औद्योगिक शिक्षणाचे धोरण तयार करून घेऊन १८९० मध्ये कलाभवन ही औद्योगिक व तांत्रिक शिक्षणाची जागतिक मान्यता असणारी संस्था सुरू केली. तरुणांना नवे उद्योगधंदे सुरू करता यावेत अशा प्रकारच्या उद्योजकतेचे शिक्षण देणारी कलाभवनची रचना महाराजांनी होती. कलाभवनमध्ये सर्व जाती धर्माच्या स्पृश्य-अस्पृश्य, कारागीर व आदिवासींना शिष्यवृत्तीसह मोफत औद्योगिक शिक्षण देऊन नव्या समतावादी समाजरचनेचा पाया रचला.
उद्योगधंद्याच्या विकासासाठी आवश्यक असणारे तांत्रिक शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना जगभरातील युरोप, अमेरिका, जपान व इतर देशांमध्ये पाठवले. शेतीपूरक उद्योगधंदे खेड्यापाड्यांमध्ये सुरू करण्यासाठी आवश्यक तांत्रिक कौशल्ये आत्मसात करणे कलाभवनमुळेच शक्य झाले. महाराजांनी पुढील काळात प्रत्येक जिल्ह्याला एक औद्योगिक शाळा, महिलांसाठी तांत्रिक शिक्षणाची सोय केली.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
या ग्रंथाच्या अखेरच्या प्रकरणात भारतीय औद्योगिक विकासाचे ‘सयाजी मॉडेल’ यथार्थपणे पटते. सयाजीरावांनी संस्थानातील सर्व प्रयोग प्रथम संस्थानाच्या भांडवलातून उभे केले व त्यांची यशस्विता लक्षात आल्यानंतरच उद्योगधंद्यांना आर्थिक मदत व इतर विशेष सवलती देऊन खाजगी उद्योगांच्या स्थापनेला प्रोत्साहन दिले. प्रत्येक उद्याचे वेळोवेळी गरजेनुसार अद्यायावतीकरण करून उत्पादन वृद्धिंगत केले. उद्योगधंद्याच्या विकेंद्रीकरणाकडे जाणीवपूर्वक लक्ष केंद्रित केले. त्यामुळे संस्थानात समप्रमाणात उद्योगांचा विकास झाल्याचे चित्र आज दिसते.
सयाजीरावांनी राबवलेले औद्योगिक धोरण, कृषी-औद्योगिक विकासाची केलेली पायाभरणी व उद्योगधंद्याचे कुशल व्यवस्थापन आणि बडोद्यातील औद्योगिक शिक्षणाची व प्रशिक्षणाची केलेली सोय या सर्वातून भारताच्या औद्योगिक विकासाचे एक ‘सयाजी मॉडेल’ आकाराला आलेले आपणास दिसून येते. आज भारताने हे मॉडेल शेती आणि उद्योगाची स्थिती सुधाण्यासाठी अग्रक्रमाने स्वीकारावे असेच आहे.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment