‘इन्शाअल्लाह’ : धर्मांच्या ध्रुवीकरणाला विरोध करत ‘सच्ची इन्सानियत’, ‘सच्चा मजहब’ आपल्यापुढे मांडणारी कादंबरी
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
वसंत कुलकर्णी
  • ‘इन्शाअल्लाह’ या कादंबरीचे मुखपृष्ठ
  • Sat , 13 March 2021
  • ग्रंथनामा शिफारस इन्शाअल्लाह Inshallah अभिराम भडकमकर Abhiram Bhadkamkar

विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे २१व्या शतकात प्रत्येक देश आपापल्या परीने मागील काळाहून प्रगत होताना दिसत आहेत. भारतासारख्या विकसनशील देशात मात्र हा बदल अत्यंत स्पष्ट जाणवतो. मागील ५० वर्षांत भारतात कोणकोणते आणि कसेकसे बदल झाले, हे सांगणे अत्यंत क्लिष्ट आणि जिकिरीचे काम आहे. अशा व्यामिश्र काळात वावरताना सगळ्यात गोंधळ उडतो तो सर्वसामान्य माणसांचा. वेगाने होत जाणाऱ्या बदलाप्रमाणे स्वतःत बदल करताना त्याची दमछाक होते आहे. हा सगळा बदल, ही सगळी प्रगती विज्ञान-तंत्रज्ञानामुळेच झाली आहे, याविषयी कोणाचं दुमत नसणार; पण या बदलाचा स्वीकार माणसांनी फक्त आपल्या बाह्य आणि भौतिक गोष्टींसाठीच करून स्वतःभोवती एक मर्यादा आखून घेतली आहे. ना विज्ञानाला आपल्या अंतर्मनात डोकावू दिलं, ना आपल्या मनातील परंपरेनं आलेल्या विचारसरणीला विज्ञानाशी ताडून पाहिलं. यामुळे माणसाच्या मनातील विचार बुरसटलेलेच राहिले आहेत. भाषा, प्रांत, वेश, जात, धर्म याबाबतीत विचारातील कट्टरता तसूभरही कमी झालेली नाही. या कट्टरतेनेच माणसा-माणसांमध्ये मोठमोठ्या भिंती निर्माण केल्या. धर्माविषयीची कट्टरता तर माणसांच्या मनात खोलवर रुतून बसली आहे. परिणामी २१व्या शतकातही धर्मा-धर्माविषयीची अढी, तेढ माणसांच्याच जगण्यात अडथळा निर्माण करत आहेत. समाजाचा विकास व्हायचा असेल तर माणसांचे विचार काळानुसार बदलायला हवेत; पण त्या विचारांची पाळेमुळे धर्माच्या, जातीच्या भोवतीच गुरफटलेली, गुंतलेली आहेत. याचा प्रत्यय अभिराम भडकमकर लिखित ‘इन्शाअल्लाह’ या कादंबरीतून आपणास येतो.

अभिराम भडकमकर हे साहित्य आणि कला क्षेत्रातील एक चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व आहे. त्यांनी चित्रपटांसाठी कथा, पटकथा, संवाद, अभिनय आणि दिग्दर्शन, तर साहित्याच्या प्रातांत कथा, कादंबरी, एकांकिका आणि नाटक अशी वैविध्यपूर्ण कामगिरी केली आहे. त्यांनी आतापर्यंत ‘अॅट एनी कॉस्ट’, ‘असा बालगंधर्व’ व ‘इन्शाअल्लाह’ या तीन कादंबऱ्याचं लेखन केलं आहे. ‘असा बालगंधर्व’ या कांदबरीचा हिंदी अनुवाददेखील झाला आहे. याशिवाय ‘चुडैल’ हा त्यांचा कथासंग्रहही प्रसिद्ध आहे.

‘इन्शाअल्लाह’ या कादंबरीच्या सुरुवातीलाच रहिमनगर मोहल्ल्यात तीन मुस्लीम तरुणांना पकडून नेण्यासाठी पोलीसगाडी येते आणि दोन तरुणांना पकडून घेऊन जाते. मोठा घातपात घडवून आणण्यात, या तिघांचा हात असल्याची माहिती मिळालेली असते. यातील तिसरा मात्र सापडत नाही. हा तिसरा तरुण जुनैद. तो कुठे गेला? त्याचं काय झालं? तो कुठे लपला आहे? जिवंत आहे की मृत? या प्रश्नांच्या उत्तराचा शोध घेत कादंबरी प्रवाहीत होते खरी, पण केवळ जुनैदचाच शोध यापुरती ती सीमित राहत नाही. या अनुषंगाने मुस्लीम मोहल्ल्यातील शिक्षणाचा अभाव असलेले तरुण, स्त्रियांची होत असलेली फरफट, व्यसन, बेकारी, अस्वच्छता याबरोबरच धार्मिक कट्टरता, वैचारिक मागासलेपण, आपमतलबी प्रवृत्ती अशा अनेक बाबींचा ऊहापोह या कादंबरीत होतो. महत्त्वाचे म्हणजे मुस्लीम धर्म आणि त्याचीच चिकित्सा कादंबरीत होते असं नाही, तर एकूणच हिंदू काय नि मुस्लीम काय धर्मांधता किती भयंकर बाब आहे, यावर प्रामुख्यानं प्रकाश टाकलेला आहे.

..................................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी पहा - https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

धर्माचा अव्हेर न करता हजारो वर्षापूर्वी सांगितलेली धर्माची रीत, आचरणाच्या पद्धती काळानुसार बदलायला हव्यात. परंतु याचाच आधार घेत समाजातील विशिष्ट प्रवृत्तीची माणसं आपल्या समाजाचं विभाजन करण्यात मशगूल असतात, त्यातच धन्यता मानतात. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर, तसंच धर्माशी संबंधित असणाऱ्या संघटना यांनी तर धर्म आणि त्याचं तत्त्वज्ञान हे एक प्रकारे स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्याचं, स्वतःची प्रतिमा, प्रसिद्धी शाबूत ठेवण्याचं हत्यार बनवलं आहे. कादंबरीत हे पानोपानी पाहायला भेटतं. प्रत्येक धर्मातील विविध सण, सामाजिक-सांस्कृतिक सोहळे, संमेलनं, शिबिरं ही खरं तर माणसांना एकत्र आणतात. एकमेकांविषयी आदर, विचारांचं मंथन, समाजाप्रती ऋण व्यक्त करण्याची संधी, तसंच आपल्या विचारांना तपासून त्यात बदल घडवून आणण्यासाठी आवश्यक असे हे प्रसंग आहेत. पण यांवरसुद्धा धर्माचं जोखड करकचून कसं लावता येईल, याचा प्रयत्न करणारे समाजातील सो-कॉल्ड प्रतिष्ठित धर्माच्या नावानं माणसाचा गळा घोटण्याचंच काम करतात. अशा प्रवृतीच्या खऱ्या चेहरावरील बुरखा फाडण्याचं काम ही कादंबरी करते.

या कादंबरीत माणसांचे विचार प्रगल्भ झाले तर आपली सत्ता, हुकमत संपून जाईल, या भीतीनं सामान्य माणसांसाठी धर्म, धर्मग्रंथ, देव यांचा साखळदंड म्हणून कसा वापर केला जातो आणि त्यात त्यांना जखडून टाकत खरा धर्म, धर्मग्रंथातील विचारांपासून लांब ठेवण्याची कशी धडपड केली जाते, याचीही मांडणी केली गेली आहे. अशा विचारांनी बुरसटलेल्या स्वयंघोषित विचारवंतांना विरोध करून धर्मातील खरी शिकवण नेमकी काय आहे, हे सांगून माणसांच्या विचारात बदल घडवून आणण्यासाठी धडपडणाऱ्या तरुणांना चहूबाजूंनी घेरलं जातं आणि त्यांच्यावर ‘धर्मद्रोही’ असा शिक्का मारून त्यांची अडवणूक केली जाते. विनाकारण मोर्चे, दंगे, प्रक्षोभक भाषणं याचं हत्यार उपसून समाजाची घडी विस्कटण्याचा प्रयत्न केला जातो. खरा मजहब, खरी इन्सानियत यापासून सामान्यांना कसं लांब ठेवता येईल, याचाच प्रयत्न होत असतो, यावरही या कादंबरीत प्रकाश टाकलेला आहे.

या कादंबरीतील व्यक्तिरेखा या समाजातील विशिष्ट प्रवृत्तीचंच प्रतिनिधित्व करत असल्याचा प्रत्यय येतो आणि या प्रवृत्ती आपल्या आसपासच वावरत असल्याचं जाणवत राहतं.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

हजारो वर्षांपूर्वी लिहिलेल्या धर्मग्रंथातील विचारच आपल्या जगण्याचे एकमेव आधार आहे, असं मानून धर्माचं ध्रुवीकरण करण्यात धन्यता मानणारी, धर्माचं अस्तित्व धोक्यात आहे, अशी मानसिकता बाळगून इतर धर्मांचा तिरस्कार करणारी प्रवृत्ती. (उदा. रोहित, बर्वे, शब्बीरचाचा, अश्रफमिया)

परिस्थिती बघून सावध भूमिका घेणारी समाजातील प्रतिष्ठित, स्वतःची प्रतिमा जपणारी, त्यांच्याकडील पदाच्या ताकदीचा वापर योग्य वेळी, योग्य ठिकाणी न करण्याची भूमिका घेणारी, स्वतःची कातडी वाचवणारी प्रवृत्ती (उदा. बोरावके वकील, आमदार हसनसाहेब)

आहे त्या परिस्थितीत जगण्याची धडपड करणारी, स्वतःची स्वतःला ओळख न पटलेली, संसाराचा गाडा हाकताना पदोपदी अन्याय, अत्याचार सहन करत जगणारी, आहे त्या चौकटीत दिवस ढकलणारी प्रवृत्ती (उदा. मुमताज, फातिमा, जमिला, रजियाआपा, कय्युम, नदीम, अकबर)

शिक्षणानं सुशिक्षित होऊन स्वतःला आपल्याच समाजापासून विलग करून घेणारी, स्वतःभोवती इतरांप्रती तिरस्काराचे कोष विणून घेणारी, कोणाच्याही अध्यात न मध्यात राहणं पसंत करणारी प्रवृत्ती (उदा. सुहैल )

घरातील पत्नीला माणूस म्हणून न वागवणारी, व्यसनाधीन झालेली रिकामटेकडी प्रवृत्ती (उदा. उस्मान आणि त्याचे मित्र )

स्वतःची ओळख पटूनही कचरणारी, धर्माचा विचार करणारी, ठोस पावलं उचलताना विचार करणारी प्रवृत्ती (बागीचाचा, नसिमा मॅम)

विचारांनी प्रगल्भ असलेली, खरी इन्सानियत कशात आहे, हे ओळखून असलेली, इन्सानला आणखी बेहतर इन्सान बनवण्यासाठी धडपडणारी, धर्मावरून समाजात वाढत चाललेलं स्तोम पाहून अस्वस्थ होणारी, समाजाची विस्कटणारी घडी पुन्हा व्यवस्थित करण्यासाठी धडपडणारी प्रवृत्ती (उदा. रफिकजी, झुल्फी, अन्वर, श्री, अनंता, फिदाजी, इम्तियाज)

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

या कादंबरीची भाषा हे तिचं एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणावं लागेल. कथानकाच्या निवेदनसाठी प्रमाण मराठी, तर व्यक्तिरेखांमधील संवादसाठी कोल्हापूर परिसरात बोलली जाणारी बागवानी भाषा वापरली आहे. त्यातून कथानकातील परिसर, तेथील लोकांची बोलण्याची ढब अचूक पकडली गेली आहे. भाषा टोकदार नसली तरी ती कुठेही बोथट वाटत नाही. या भाषेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ती प्रवाही आहे. त्यामुळे कुठेही कथानक रेंगाळत नाही. घटना एकामागे एक घडत जातात. भाषेतील नेमकेपणामुळे प्रत्येक घटनाप्रसंगात जिवंतपणा आला आहे. व्यक्तिरेखा आपल्या आसपासच वावरणाऱ्या आहेत, याचा प्रत्यय या भाषेमुळे येतो.

एकूणच काय तर या कादंबरीतील रफिकजी, झुल्फी यांची समाजात, व्यक्तींच्या विचारात परिवर्तन घडवून आणण्यासाठी चाललेली धडपड वाचताना केवळ कथानक वा एखादी घटना वाचत नसून आपण आपल्याच विचारांशी संघर्ष करू लागतो, स्वतःला तपासून पाहू लागतो. कारण आपल्या अंतर्मनाला ढवळून काढत समाजातील वास्तवाचं दाहक चित्रण भडकमकर यांनी अत्यंत संयमानं केलं आहे.

धर्म, धर्मग्रंथ, देव या अत्यंत संवेदनशील विषयावर व्यक्त होताना कादंबरीकारानं तटस्थ राहून कादंबरीचा पट मांडला आहे. धर्माच्या बाबतीतील कट्टरतेला कडाडून विरोध करत माणसाला धर्मांधता आणि विवेक यातील फरक स्पष्ट करून सांगणारी, धर्मांच्या ध्रुवीकरणाला विरोध करत सच्ची इन्सानियत, सच्चा मजहब आपल्यापुढे मांडणारी, मानवी मनाच्या तळाशी खोलवर चाललेल्या धर्माच्या बाबतीतील द्वद्वांना अलगदपणे उलगडणारी ही कादंबरी आहे!

..................................................................................................................................................................

वसंत कुलकर्णी

vkulkarni185@gmail.com

..................................................................................................................................................................

‘इन्शाअल्लाह’ या कादंबरीच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5223/Inshallah

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे.......

जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक.......