‘राजहंस प्रकाशन’ आणि ‘अक्षरनामा’ यांच्या संयुक्त विद्यमाने कादंबरीकार अभिराम भडकमकर यांच्या ‘इन्शाअल्लाह’ या बहुचर्चित कादंबरीवर १ ते २८ फेब्रुवारी दरम्यान घेण्यात आलेल्या ‘परीक्षण स्पर्धे’त प्रथम क्रमांकाचे बक्षीसप्राप्त ठरलेले परीक्षण...
..................................................................................................................................................................
इन्शाअल्लाह’ ही अभिराम भडकमकर लिखित कादंबरी वाचली. खरं तर त्यावर झालेली चर्चा ऐकून वाचण्याची उत्सुकता वाढली होती. ही कादंबरी वाचताना काहीतरी वेगळं वाचल्याचा, वेगळ्या सांस्कृतिक जगात वावरल्याचा आणि वेगळी भाषा कानावर पडल्याचा आनंद झाला. (‘कानावर पडणं’ हे मुद्दाम वापरते आहे. कादंबरीतली पात्रं वापरतात ती बागवानी बोली वाचताना, मी ती ऐकतेच आहे, असा भास झाला आणि हे त्या भाषेचं सौंदर्य आणि लेखकाचं बलस्थान दोन्ही आहे!) या कादंबरीतली भाषा, पात्रं, अनुषंगानं येणारा सांस्कृतिक परिवेश, हे सगळं लोभसवाणं वाटलं, आनंद देणारं ठरलं तरी एकंदर कथन मात्र निराश करतं.
कादंबरी सुरू होते, ती कोल्हापुरातील एका मोहल्ल्यातून जुनैद हा विशीचा तरुण गायब होतो, या घटनेपासून. जुनैदसह त्याच मोहल्यातला आणखी एक तरुण आणि बाहेरून मोहल्यात आलेला तिसरा एक तरुण असे तिघे गायब होतात. काही दिवसांनी जुनैद वगळता इतर दोघांचा पत्ता लागतो, पण जुनैदचं काहीच कळत नाही. कोल्हापूर रेल्वे स्टेशनवर बॉम्बस्फोट घडवण्याचा कट पोलीस उधळून लावतात आणि या अयशस्वी कटात जुनैदचा सहभाग असल्याच्या संशयावरून ते त्याचा शोध घेऊ लागतात, पण जुनैद कुठेच सापडत नाही, तेव्हा तो कुठे जातो, त्याचं नेमकं काय होतं? या घटनेमुळे त्याची आई जमीलावर होणारा दु:खाचा आघात, जुनैदचा शोध घेण्याचा तिचा प्रवास, त्यातले खाचखळगे आणि या सगळ्याला समांतर असणारा तिच्या मोहल्ल्याचा एक मोठा प्रवास, या प्रवासातली सांस्कृतिक स्थित्यंतरं असा बऱ्यापैकी मोठा पट या कादंबरीतून उलगडलेला आहे. जुनैदच्या शोधासह समांतर अशी अनेक उपकथानकंही कादंबरीत सहज गुंफलेली आहेत आणि हे करताना कथनाची वीण कुठेही सैल झालेली नाही. कादंबरीतलं प्रवाहीपण अखेरपर्यंत टिकून राहिलेलं आहे, ही या एक कादंबरीची चांगली बाजू.
तरीही कादंबरीचं कथन निराश करतं, किंबहुना ते वास्तव आहे असं भासवलं जातं, मात्र वस्तुस्थिती इतकी एकांगी, एकसुरी नाही, असं सतत वाटत राहतं. अनेक प्रश्नही पडतात. कादंबरीत एखाद्या मुख्य पात्राप्रमाणेच ‘दिसत’ राहणारा कोल्हापूरमधला एक मोहल्ला, तिथली माणसं, त्यांच्या धारणा, त्यांचं जगणं, त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन, त्यांचं सश्रद्ध असणं, रीतीरिवाज, परंपरा हे सगळं वैविध्यतेनं दाखवण्याचा, मांडण्याचा लेखकानं आटोकाट प्रयत्न केलेला आहे, पण तरीही तो असफल ठरतो. कारण सगळेच नसले तरी बहुसंख्य मुस्लीम आपल्या धर्मश्रद्धांप्रती कट्टर असतात, जुनाट रूढी-परंपरांना कवटाळलेले असतात, नवं काही स्वीकारण्याप्रती उदासीन असतात आणि मग एखाद-दुसरी झुल्फीसारखी पात्रं याला छेद देण्याचा प्रयत्न करतात, असं यात दिसतं. रफिकसारखा एखादा कडवा धर्मसुधारक, चिकित्सक व्यक्ती आणि झुल्फीसारखा विशीतला मुलगा - ज्याला त्याच्या धर्मातल्या जुनाट-बुरसटलेल्या गोष्टी मान्य नाहीत, पण त्यावर त्याला टीकेची झोड उठवण्याऐवजी लोकांना धरून राहत टप्प्याटप्प्याने बदल करावासा वाटतो, अशी दोन टोकं (अर्थात सकारात्मक) दोन व्यक्तिमत्त्व कादंबरीभर फिरतात.
..................................................................................................................................................................
अधिक माहितीसाठी पहा - https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
याशिवाय आणखी एक-दोन सुधारणावादी किंवा प्रागतिक विचारांच्या व्यक्तिरेखा असलेली पात्रं. त्याव्यतिरिक्तचा बहुसंख्य समाज हा साचेबद्ध पद्धतीनंच रंगवलेला आहे, जसा तो आताच्या व्हॉटस्अॅप विद्यापीठातून पसरवल्या जाणाऱ्या आशयात दिसतो. मात्र यातला मुख्य फरक हा की, व्हॉट्सअॅप विद्यापीठातल्या आशयात वा बहुसंख्याक हिंदू समाजाच्या मनात वर्षानुवर्षं असलेल्या मुस्लिमांबद्दलच्या धारणांमध्ये द्वेष, विखार, अज्ञान दिसतं. इथं लेखकाच्या धारणांमध्ये द्वेष आणि विखार दिसत नाही, मात्र पूर्वग्रह आणि काही आधीच ठरवून टाकलेल्या चौकटी दिसतात.
कादंबरीत मुख्य कथानकाच्या सोबतीनं येणाऱ्या उपकथानकांच्या अनुषंगानं लेखकानं समान नागरी कायदा, तीन तलाक यांसारख्या गंभीर मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. विशेषत: तीन तलाकसारख्या पद्धतीमुळे मुस्लीम स्त्रियांच्या वाट्याला येणारं आयुष्य - कौटुंबिक हिंसाचार, सततची असुरक्षितता, संपूर्ण कुटुंबाचा भार त्या स्त्रीवरच असणं, तलाकनंतरही तिला सन्मानानं जगता येण्यासाठी आर्थिक तरतुदी नसणं इ. यातल्या काही स्त्री पात्रांच्या जगण्यातून दिसतं नि हे दाहक आणि बदलून टाकावंसं वाटेल असंच वास्तव होतं (तीन तलाकविरोधी कायदा झाला आहे, याची नोंद घेता) मात्र पुन्हा इथं लेखकानं ही एकच बाजू पाहिली आहे.
तीन तलाकविरोधी कायद्याची चर्चा होत असताना, त्यावरील कायदा झाल्यावरही मुस्लीम पुरुषांचं झालेलं गुन्हेगारीकरण याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे. समान नागरी कायद्याबाबतची चर्चाही अशीच एकांगी आहे. हिंदू आणि मुस्लीम दोन्ही समूहांतील कट्टरता वाईटच असा लेखकाचा सूर असला तरी हिंदू वा उजव्या कट्टरतेची सखोल चिकित्सा वा चिरफाड करणारे प्रसंग, संवाद कथानकात येत नाहीत, तशी ती मुस्लिमांमधील कट्टरतावादाची चिकित्साही येत नाही, येतात ती निव्वळ मतं वा एकाच चष्म्यातून पाहिलेलं एकमितीय वास्तव.
मुस्लिमांमधील कट्टरतावादाची चिकित्सा करायची झाल्यास आधी त्यांना आलेली सांस्कृतिक ‘परात्मता’ (कल्चरल एलिनेशन) पाहावी लागते, ती वगळून पुढे जाताच येत नाही. भडकमकर मात्र या दोन्ही पायऱ्या चुकवून थेट तिसऱ्या म्हणजेच कट्टरतावादावर भाष्य करण्याच्या पायरीवर उडी मारतात. नाही म्हणायला सौहेल हे कादंबरीतलं पात्र कसं इतर माणसांपासून तुटलेलं आहे, याचे त्रोटक तपशील येतात पण सौहेलला असं सगळ्यांपासून तुटल्यासारखं का वाटतं? त्याच्यासोबत असं काय घडलं आहे? ते कुणाकडून घडलं वा घडवलं गेलं आहे? याचा उहापोह होत नाही. सौहेलसारख्या उच्चशिक्षित माणसाला घर भाड्यानं घेताना त्रास होतो, त्याला मिश्र वस्तीत घर मिळत नाही आणि त्यामुळे त्याला या बकाल मोहल्ल्यात येऊन राहावं लागतं, याची बोच त्याला लागून राहिली आहे, हा इतका तपशील आला तरीही त्याला त्याच्या धर्मामुळे घर नाकारण्याऱ्या माणसांच्या मानसिकतेवर लेखकाला काहीही भाष्य का करावंसं वाटलं नाही, हा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
तोंडी लावण्यापुरता काही काही घटनांचा उल्लेख लेखकानं केला आहे. उदा., दरवर्षी ईद जवळ आल्यावर या सणाची थट्टा करणारे मॅसेज सोशल मीडियावरून पसरवले जाणं, अखिल विश्वाच्या संस्कृतीरक्षणाचा भार स्वत:च्या डोक्यावर आहे, असं समजून त्यासाठी तोडफोडीपासून काय वाट्टेल ते करणाऱ्या काही हिंदू संघटनांचे काही कारनामे, हे करणाऱ्या तरुणाईच्या अंतरंगात डोकावून पाहण्याचा प्रयत्न करणं, गोमांस बाळगल्यावरून झालेल्या मॉब लिंचिंगच्या एखाद्या घटनेचा उल्लेख इ. पण हे सगळं कथनात ‘समतोल’ साधण्यासाठी लिहिलं गेलंय असं वाटत राहतं.
जुनैदचा शोध घेत जसं पोलीस मुस्लीम वस्तीत येतात, तशी धरपकड वा कोम्बिंग ऑपरेशन्स मुस्लीम वस्त्यांत नेहमीच होतात, हे सामाजिक वास्तव आहे. याशिवायही विविध कारणांनी गरीब मुस्लिमांना पोलीस स्टेशनची पायरी नेहमी चढावी लागते. त्या वेळी त्यांच्याशी पोलिसांकडून केला जाणारा व्यवहार कसा असतो, यासाठी वेगळं संशोधन करण्याची गरज नाही. भडकमकरांना मात्र पोलिसांचा वर्तनव्यवहार प्रचंड आशावादी, माणुसकीनं ओतप्रोत भरलेला असा दिसला आहे.
बॉम्बस्फोटाच्या आरोपाखाली ज्या मुलांना तुरुंगात ठेवलं आहे, त्याच्या नातेवाईकांना, त्या मुलांसाठी पोलीस कोठडीत घरचा डबा देण्यासाठी पोलिसांनी परवानगी देणं, जगदाळे नावाच्या कॉन्स्टेबलनं भावूक होणं, हे असं सगळं केवळ कादंबरीतच घडू शकतं. अर्थात असं घडावं, या आशेनं कथात्म साहित्यात मुद्दाम अशी आशावादी बीजं पेरण्यात काहीच वावगं नाही, कारण बऱ्याचदा जे वास्तवात घडू शकत नाही, त्या सुखकारक गोष्टी निदान कल्पनेत तरी साकारल्या जाव्यात, हा एक उद्देश फिक्शन लिहिण्यामागे असतोच, पण म्हणून वास्तवात घडणाऱ्या, घडवल्या जाणाऱ्या मुस्लिमांसोबतच्या पोलिसी क्रौर्याकडे शुद्ध डोळेझाक करणं, पुन्हा एकसुरी एकरंगी मांडणीकडे जातं आणि सत्याशी अपलाप होतो ते वेगळंच.
अशाच प्रकारचे आणखीही काही प्रश्न पडतात आणि हे प्रश्न या कादंबरीतला कल्पनाविलास कितीही मनोहारी असला तरी आपल्याला रखरखीत वास्तवापासून पळ काढता येत नाही, याची सतत जाणीव करून देतात. जुनैदचं पुढे काय झालं, हे शेवटपर्यंत कळत नाही. तो एखाद्या अतिरेकी कॅम्पला जाऊन मिळाला आहे की, फरार आहे की, तो अस्तित्वात आहे की, नाही हे कळत नाही... आणि हे ठीकच आहे. काही तरी आकर्षक सुरुवात, मग प्रचंड उलथापलथींचा मध्य आणि मग काही तरी कटू-गोड शेवट अशा छापाच्या जुनाट शैलीप्रमाणेच कथन असायला हवं, अशी आवश्यकता नाही.
मात्र जुनैदच्या न सापडण्याला त्याच्या आईनं (जमीला) दिलेला प्रतिसाद पचत नाही. इथं वर्तमान काळातली एक घटना हमखास आठवते. जेएनयुचा एक विद्यार्थी नजीब हरवल्याची. आजतागायत त्याचा काहीही पत्ता लागलेला नाही. अर्थात कादंबरीतल्या कथनाप्रमाणे जुनैदवर असलेलं स्फोटाच्या आरोपांचं सावट त्याच्यावर नाही. पण म्हणून त्याच्या आईच्या अस्वस्थ जगण्यात क्रांतिकारी बदल घडून आलाय, असंही नाही. असा बदल कादंबरीत मात्र जमीलामध्ये होताना दिसतो.
इथं स्वाभाविकपणे काही प्रश्न पडतात की, नवऱ्यानं सोडून दिलेली, दिवसभर राबून कसाबसा संसार चालवणारी, मुलाचं पालनपोषण करणारी, फारशी न शिकलेली जमीला नंतर इतकी आध्यात्मिक, भवतालाचा सजगपणे अर्थ लावू पाहणारी कशी काय बनते? समजा अपवाद म्हणून तिचं असं मानसिक परिवर्तन होणंही गृहीत धरलं तरी ती पुढे पुढे (कादंबरीच्या उत्तरार्धात) तिच्या मुलाला जुनैदला शोधण्याचे प्रयत्न, त्याची न्यायालयीन लढाई याबाबतीत काहीच का करत नाही? की आपल्या एकुलत्या एक मुलाचं - जो हुशार होता, अभ्यासू होता, त्याचं असं परागंदा होणं जमीलानं स्वीकारलेलंच आहे? या स्वीकाराशिवाय तिच्याकडे काही पर्यायच नाही म्हणून मग ती वाईटातून चांगलं म्हणून भवतालाकडे सम्यकतेनं पाहण्याचं ठरवते, अशी अपरिहार्यता तिच्या वाट्याला का येते? ही अपरिहार्यता तिच्या पदरात टाकणाऱ्या व्यवस्थेबद्दल, धारणांबद्दल लेखकाचं काहीच मत नाही का? हा प्रश्नही महत्त्वाचा वाटतो.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
हिंदू-मुस्लिमांमधील सांस्कृतिक देवाणघेवाणीचं चित्रण करण्याचा लेखकाचा प्रयत्न चांगला असला तरी त्यातून पुन्हा काही सूक्ष्म, अतिसूक्ष्म एकमेकांना आंतरछेद देणारे प्रश्न निर्माण होतातच. ईदनिमित्त मोहल्यात रक्तदानाचा कार्यक्रम घेणाऱ्या झुल्फीला त्याचे मित्र जी.ए. कुलकर्णींची पुस्तकं भेट देतात. जी.ए. जुनैदनंही वाचलेले असतात, असं त्याच्याच पुस्तकाच्या कपाटाच्या, वहीच्या वर्णनावरून कळतं. एका बकाल मुस्लीम वस्तीत राहणारा जुनैद, त्याच्या सांस्कृतिक, भाषिक परिवेशाशी, जगण्याशी जवळ जाणारं नामदेव ढसाळ आणि तत्सम लेखकांचं लेखन का वाचत नाही? तो थेट जी.ए. कसं काय वाचतो? असा प्रश्नही पडल्याशिवाय राहत नाही, कारण जुनैद काही साहित्याचा विद्यार्थी नाही. झुल्फीला मात्र ही पुस्तकं त्याच्या मित्रांनी भेट दिल्यामुळे वा तो ग्रंथालयांमध्ये वेड्यासारखं वाचन करत असल्याने त्याचं जी.एं.च्या साहित्याशी जोडलं जाणं असहज वाटत नाही.
असे अनेक प्रश्न असले तरी या कादंबरीच्या काही जमेच्या बाजूही आहेत. त्यावरही बोलायला हवं. भडकमकर हे मुळात नाटककार असल्याने दृश्यमयता हे त्यांच्या लेखनाचं एक बलस्थान आहे. त्यामुळे कादंबरीतलं दृश्य नि दृश्य डोळ्यापुढे उभं राहतं. घटनांचा पट वेगानं पुढे सरकतो आणि त्याचा दृश्य परिणाम वाचनीयता आणखी वाढवतो. लेखकानं रंगवलेला मोहल्ला अगदी वाचकाच्या डोळ्यासमोर उभा राहतो किंवा वाचकाला बसल्याजागी स्वत:च त्या त्या ठिकाणी फिरून आल्यासारखं वाटावं इतकं रसरशीत आणि उत्कट चित्रण मोहल्ल्याचं केलेलं आहे. त्याकरता लेखकाला पैकीच्या पैकी मार्क्स द्यायला हरकत नाही. मात्र माणसं, समूह, मुस्लीम समूहाचं इतर समूहांशी असलेलं नातं, मुस्लिमांचं राजकारण, त्याचे विविध पैलू, जीवनदृष्टी, मुस्लिमांबाबतचं राजकीय, सामाजिक वास्तव आणि त्याप्रती असलेलं बहुसंख्याक समाजाचं राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक उत्तरदायित्व याबाबतचं आकलन पूर्वग्रहदूषित, एकमितीय आहे आणि ते मांडताना कळत-नकळत बहुसंख्याकांना सुखावणारी, किंबहुना त्यांना अपेक्षित अशीच मांडणी वा कथन समोर येतं, ही या कादंबरीची आशयाच्या दृष्टीनं मोठी मर्यादा आहे.
या कादंबरीकडे लिंगभावाच्या अंगाने पाहिल्यासही काही महत्त्वाच्या गोष्टी सापडतात, त्याचा उल्लेख महत्त्वाचा आहे. यातली बहुतांश स्त्री पात्रं ही खमकी, स्वतंत्र विचार करू पाहणारी, अन्यायाचा प्रतिकार करणारी, चांगल्याची आस असणारी आहेत. या बहुतांश स्त्रिया कष्टकरी समूहातल्या आहेत, तसंच धर्मातल्या जुनाट रीतीरिवाजामुळे, पुरुषसत्ताक व्यवस्थेमुळे गांजलेल्या आहेत, पण त्या हतबल, असहाय नाहीत. परिस्थितीला धीटपणे सामोरं जाण्याची किंबहुना त्यावर मात करण्याची तळमळ, व्यवहारज्ञान, शहाणीव त्यांच्याकडे आहे. म्हणूनच त्या आपापल्या परीनं संघर्ष करताना दिसतात, जे घडतंय ते आपलं भागधेय म्हणून गपगुमान त्याचा स्वीकार करत नाहीत.
एकंदरीत, वास्तवाचं अधिक सखोल, बहुमितीय आकलन जर या कादंबरीत उतरलं असतं तर ती साहित्यिक - सामाजिकदृष्ट्या एक अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज ठरली असती, ती संधी मात्र दवडली गेली आहे.
..................................................................................................................................................................
प्रियांका तुपे
tupriya2911@gmail.com
..................................................................................................................................................................
‘इन्शाअल्लाह’ या कादंबरीच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5223/Inshallah
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment