‘इन्शाअल्लाह’ने मराठी कादंबरीच्या क्षितिजावर एक नवी आश्वासक पहाट, तिच्यातील उणीवा गृहित धरूनही उमलवली आहे!
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
राजेंद्र नाईकवाडे
  • ‘इन्शाअल्लाह’ या कादंबरीचे मुखपृष्ठ
  • Fri , 12 March 2021
  • ग्रंथनामा शिफारस इन्शाअल्लाह Inshallah अभिराम भडकमकर Abhiram Bhadkamkar

‘राजहंस प्रकाशन’ आणि ‘अक्षरनामा’ यांच्या संयुक्त विद्यमाने कादंबरीकार अभिराम भडकमकर यांच्या ‘इन्शाअल्लाह’ या बहुचर्चित कादंबरीवर १ ते २८ फेब्रुवारी दरम्यान घेण्यात आलेल्या ‘परीक्षण स्पर्धे’त तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीसप्राप्त ठरलेले परीक्षण...

..................................................................................................................................................................

मराठीतील सुप्रसिद्ध पटकथा-संवादलेखक, नाटककार, अभिनेते आणि दिग्दर्शक अभिराम भडकमकर यांची एका वेगळ्या विषयावरची ‘इन्शाअल्लाह’ ही कादंबरी (राजहंस प्रकाशन, पुणे) मार्च २०२०मध्ये प्रकाशित झाली. शीर्षकाप्रमाणेच एका अनोख्या वादविषयावरील आणि मराठीत बहुधा अस्पर्शित राहिलेल्या भावविश्वावरील कादंबरी म्हणून तिचे वेगळेपण नजरेत भरणारे आहे. भडकमकर हे त्यांच्या ‘देहभान’, ‘पाहुणा’, ‘ज्याचा त्याचा प्रश्न’, ‘प्रेमपत्र’, ‘हसत खेळत’, ‘सुखांशी भांडतो आम्ही’ इत्यादी रंगभूमीवर आलेल्या आणि गाजलेल्या नाटकांनी जसे मराठी रसिकांना सुपरिचित आहेत; तसेच किंवा त्यापेक्षा अधिक ते ‘चाणक्य’, ‘दामिनी’, ‘सीआयडी’, ‘आहट’, ‘सैलाब’, ‘रास्ते’, ‘क्षितिज’ या मालिकांच्या आणि ‘बालगंधर्व’, ‘पछाडलेला’, ‘आई’, ‘खबरदार’, ‘एक रेनी डे’, ‘पाऊलवाट’ इ. चित्रपटांचे पटकथा-संवाद लेखक म्हणूनही लोकप्रिय आहेत. अभिनय आणि दिग्दर्शन हेही त्यांच्या कलामग्न व्यक्तिमत्त्वाचे पैलू असून त्यांच्या ‘धोबीपछाड’, ‘पाच शून्यांची बेरीज’, ‘झाड’, ‘ये ग ये ग सरी’ इ. एकांकिकाही गाजलेल्या आहेत. कथात्म साहित्यलेखनाचा त्यांचा अनुभव तुलनेने कमी असला, तरी यापूर्वी त्यांचा ‘चुडैल’ हा कथासंग्रह आणि ‘असा बालगंधर्व’ व ‘अॅट एनी कॉस्ट’ या कादंबऱ्याही वाचकांनी व जाणत्यांनी गौरवल्या आहेत.

अशी कला आणि साहित्याची भक्कम पार्श्वभूमी लाभलेल्या भडकमकरांच्या ‘इन्शाअल्लाह’ या कादंबरीने मराठी वाचकांच्या मनात खूप अपेक्षा निर्माण करून ठेवल्या होत्या, यात नवल नाही. मराठीतील सर्वसामान्य आणि चोखंदळ वाचकांच्या अपेक्षांची कितपत पूर्ती ही त्यांची नवी कादंबरी करते आणि अतिशय समृद्ध आणि विविधांगी अशी परंपरा लाभलेल्या आधुनिक मराठी कादंबरीच्या प्रवाहात ती आपले स्वतंत्र, पृथगात्म आणि श्रेष्ठ स्थान निर्माण करण्यास कशा प्रकारे समर्थ ठरू शकते, याचा शोध घेणे लक्षणीय ठरावे.

३२१ पानांच्या, साध्यासरळ कथासूत्राच्या, तृतीयपुरुषी निवेदनशैलीतून कथन केलेल्या, थेट समकालीन समाजवास्तवाला भिडू पाहणारे परिचित पण उपेक्षित विचारसूत्र मांडू पाहणाऱ्या या कादंबरीचे परीक्षण हे एक आव्हानात्मक काम ठरते. कारण भारतीय समाजजीवनातील एका महत्त्वाच्या पण वादग्रस्त ठरलेल्या प्रश्नाला हात घालून त्यास उलगडू पाहणारी ही एक धाडसी साहित्यकृती असल्याचे प्रथमदर्शनीच लक्षात येते. परंतु कुठल्याही साहित्यकृतीचे मोठेपण वा वेगळेपण त्यातील केवळ विशिष्ट विषयावर अवलंबून नसते, तर त्या वर्ण्यविषयाला आकृतिबंधातील विविध घटकांच्या जैविक एकात्म समन्वयातून आणि त्या घटकांच्या कलात्मक मांडणीतून सामग्य्राने कशा प्रकारे रूप लाभते, त्यावर त्या कलाकृतीची गुणवत्ता आणि सोबतच तिची संवादक्षमता व आवाहनक्षमता अवलंबून असते.

एका वेगळ्या आव्हानात्मक विषयाला जेव्हा भडकमकरांसारखा अनुभवी व कसलेला कलावंत-साहित्यिक हात घालतो, तेव्हा अर्थातच अशा सर्व आव्हानांची त्यालाही जाणीव असतेच! मूल्यामापनासाठी आकृतिबंधाच्या घटकांप्रमाणेच, एकूण मराठी कादंबरीच्या परिप्रेक्ष्यातील तिचे वेगळेपणही लक्षात घ्यावे लागते. प्रस्तुत कादंबरीचे मुस्लीम-समस्याप्रधान, विचारप्रधान, राजकीय वादविवादप्रधान, चर्चा-चिकित्सा-चिंतनाप्रधान स्वरूप पाहता मराठीतील अशा प्रकारच्या कादंबऱ्यांचा एक पटही आपल्या डोळ्यांपुढे पार्श्वभूमीसारखा साकार होतो. ४०च्या वर व्यक्तिरेखांच्या परस्पर संबंधातून आणि त्यांच्यातील चर्चा-संवादातून मुस्लीम भावविश्वापुढील विविध प्रश्नोपप्रश्नांची मांडणी करणारी आणि मुस्लीम-मानसाचा वेध आणि शोध घेऊ पाहणारी ही कादंबरी आहे. तिचे विश्लेषण आणि मूल्यांकन करण्याचा हा एक छोटासा प्रामाणिक प्रयत्न.

घटना-प्रसंग आणि व्यक्तिरेखांनी संपृक्त कॅनव्हॉस

कादंबरीचे मोठेपण (आणि छोटेपणही) त्यातील घटना-प्रसंगांच्या योग्य वास्तवसन्मुख व सूक्ष्म तपशीलप्रधान रचनेतून आणि व्यक्तिरेखांच्या समग्र, विकसित व परिपूर्ण रेखाटनातून प्रत्ययाला येत असते. प्रस्तुत कादंबरीचे कथासूत्र काही प्रमुख प्रसंगांच्या आधारे पुढे सरकते.

१. नजामाचा लग्नप्रसंग, २. अतिरेकी कारवायांमधील आरोपींच्या धरपकडीचा व जुनैदच्या बेपत्ता होण्याचा प्रसंग, ३. तबलिग ए-इजतेमामधील झुल्फीच्या सहभागाचा प्रसंग, ४. मुस्लीम तरुणांच्या अटकेविरुद्धचा मोर्चा व सभा, ५. बकरी ईदनिमित्त रहिमनगरमधील रक्तदानाचा प्रसंग, ६. सन्नीच्या सुंतेचा प्रसंग, ७. कय्युमच्या नसबंदीचा फसलेला प्रयोग, ८. आग्राच्या मुस्लीम परिषदेत झुल्फीचा सहभाग, ९. झुल्फीची बहीण मिनाजचे लग्न जुळवण्याची घटना, १०. रफीकची रहिमनगर वस्तीभेट, ११. जमिलाच्या प्रकृतीत अचानक बिघाड आणि रुग्णालयात, १२. तुरुंगातील संशयित आरोपींना भेटण्याची व डबा देण्याची अनुमती, १३. अ. भा. साहित्य संमेलनाच्या पूर्वतयारीचे व नोंदणीचे कार्यालय रहिमनगरात, १४. रफिकचा हृदयविकार आणि मृत्यू. १५. रहिमनगरमधून निघणाऱ्या चित्ररथाची तयारी, शेवटचा संघर्ष ज्यात झुल्फी जख्मी होते आणि पालखी पुढे निघते.

..................................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी पहा - https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

हे सर्व घटनाप्रसंग कांदबरीच्या कथावस्तूची घट्ट गुंफण आणि तालेवार पोत स्पष्ट करतात. या कालक्रमाने एका मागोमाग एक घडणाऱ्या प्रसंगांतून कथानक गतिमानतेने पुढे सरकते. या प्रसंगांनी संपृक्त अवकाशाला अनुरूप अशा व्यक्तिरेखा वेळोवेळी सहजपणे कथानकात मिसळत जातात. नजमा, जमिला, रजियाआपा, शमशी, बांगीसाब, इस्माईल, अश्रफमिया, जुनैद, नसीमामॅम, रफीक, झुल्फी, निहालचाचा, सर्फराज, कय्युम, शब्बीरचचा, मोमीन, नीना, बोरवाके, रास्ते, कल्याणी, रोहित, अंजुम, मुमताज, उस्मान, दादासाहेब, किशोर, फिदासाब, श्रीनिवास, हसन, अनंता, बर्वे, अन्वर, सुहैल, अशा क्रमाक्रमाने अवकाशात प्रवेश करून त्यास भरून, भारून टाकतात. त्यातील काही केंद्रवर्ती, काही प्रमुख आणि काही गौण. काही विशिष्ट कामापुरत्या. काही अदृश्यपणे वावरणाऱ्या, तर काही केवळ नावापुरत्या. रहिमनगरची वस्ती आणि त्यास जोडणारा वस्ती बाहेरचा सामाजिक-राजकीय अवकाश योग्य तऱ्हेने चैतन्यशील करण्यासाठी या विविध-व्यक्तिरेखांची चपखल योजना कादंबरीकार करतो.

व्यक्तिचित्रणाच्या संदर्भात काहीसे असमाधान जाणवत असले, तरी कादंबरीचे विचारप्रधान व चिंतनप्रधान मूळ प्रतिपाद्य बघता त्यास आवश्यक तो अवकाश लेखकाने प्रदान केलेलाही दिसतो. विशेषतः कादंबरीतील स्त्रीव्यक्तिरेखांची अभावांनी भरलेली आयुष्ये जेव्हा प्रभावी रूपात अवतरताना दिसतात, तेव्हा स्त्रीचित्रणातील सखोल सहानुभूतीचा प्रत्यय संवादांतून वाचकांपर्यंत अचूकपणे पोचतो. कादंबरी मुस्लीम-प्रश्नकेंद्री असल्याने स्वाभाविकपणेच ती स्त्रीकेंद्रीसुद्धा होते. झुल्फीचा अपवाद वगळता पुरुष व्यक्तिरेखांना केवळ वरवर स्पर्श करत जाणारा निर्माता, स्त्रीव्यक्तिरेखांना मात्र अधिक नेमके, अधिक परिपूर्ण साकारण्यात गढलेला स्पष्ट दिसतो. जमिला, मुमताज, नसीम इ. व्यक्तिरेखा त्यांच्या जगण्यातील नियतीप्राप्त वेदनेसह भावपूर्ण व परिपूर्ण (नसीमाचे व्यक्तिचित्र तुलनेने अपुरे-अधुरे वाटते!) साकारल्या गेल्या आहेत. स्त्रीची दुरवस्था वर्णन करणारे जमिलाचे हे पुढील मनोचिंतन कादंबरीच्या आशयसूत्राचा एक पक्का धागा बनलेला दिसतो-

“...पण कुणीचं आलं नाही. ना तिची कुणी आसवं पुसली, ना आधार दिला. नंतर तो कोडग्यासारखा निघूनच गेला. जमिलाला एकटं टाकून... ‘तलाक तलाक तलाक’ या शब्दांना भिऊन रहायचं किंवा ‘निकाह करके लाया हूँ इसे’ हे शब्द ऐकायची तयारी ठेवायची.... लय मुस्कील हय जीना औरतांका.... औरतच वह. चार दिन बाद उसको बी बुरशी लगती हय... बासी हो जातीच ना वह.... इससे मर जाना अच्चा.” (पृ. २०२)

‘अबला जीवन हाय तेरी यही कहानी, आंचल में है दूध और आँखों में पानी’ या कवितेच्या ओळींचे स्मरण करून देणारी स्त्रीदुःखाची कहाणी कादंबरीत सर्वत्र अध्येमध्ये येत राहते. “जमिलाचा नवरा तिला टाकून गेलेला. नीनाचा उपरवाला घेऊन गेला. मुमताजचा धडधाकट असला तरी सासऱ्याच्या घरची रोटी तोडत बसलेला, कामचुकार. व्यसनी. आणि आपला असा अपाहिज. असून नसल्यासारखा. औरतजातीला काय भोगावं लागत, ते तिलाच कळतं... औरतजातीच्या दुःखाची ओळख लागतच नाही या मरदजातीला... फतिमाच्या नजरेत बायकांची दुःख तरळू लागली.” (पृ. १८० ते १८५) असे अत्रतत्र स्त्री दुःखाचे कढ व्यक्त होत राहतात.

झुल्फीच्या बहिणीचा मिनाजच्या लग्नाचा प्रश्न येतो, तेव्हाही मुस्लीम स्त्रीप्रश्नावर चर्चा-चिंतन होते. (पृ. १९३ ते २०३). कादंबरीच्या अंतिम टप्प्यात झुल्फी म्हणतो - “जिहाद पुकारायला हवा दारिद्रयाशी, अडाणीपणाशी, औरतजातीला मुकं जनावर समजणाऱ्या वृत्तीशी.” (पृ. २९२) या सगळ्या पडझडीतही  खंबीरपणे उभं राहणारी स्त्री पुढे येते. “आजची औरतजात स्वतःला सांभाळू शकते. मरदजातीच्या भरौशावर राहायची गरजच नाही,” असं बांगीचाचाला वाटतं, तर- “औरत कधीच मरद के भरौसेपर नहीं रही. उसने अपनेच भरौसेपे दिन गुजारे हय” असा आत्मविश्वास जमिलाच्या मनोगतातून (पृ. २७९) व्यक्त होतो.

उस्मानच्या जाचातून सुटण्याची धडपड करणारी व उत्तरोत्तर बदलत गेलेली, इस्लामविषयक सुधारणांची महती पटत गेलेली मुमताज धीटपणे सर्वांसमोर म्हणते- “चाचाजान मेरे को तलाक हुनाय.... भाईजान मेरे को तलाक हुनाय” (पृ. २७९) मुमताजच्या व्यक्तिरेखेच्या निमिताने मुस्लीम स्त्रीची व्यथा (पृ. २५२ ते २६२) साकारली जाते.

एकीकडे विविध विचारधारांचा पक्ष मांडत राहणारे कादंबरीचे कथासूत्र अशा प्रकारे मानुषतेचा पक्ष मात्र कुठेही त्यागताना दिसत नाही. श्रेष्ठ साहित्यकृतीचा हा एक निकष अंगी बाणवताना कादंबरीतील अशा भावपूर्ण व वास्तव व्यक्तिरेखाटनातून लेखकाची खोल व निरपेक्ष सहजाणीवही आपोआप व्यक्त होत राहते. मूकपणे दुःख भोगणाऱ्या सश्रद्ध निरागस मनाच्या जमिलाच्या व्यक्तिरेखाटनातून कादंबरीचे हे वैशिष्ट्य विशेषत्वाने जाणवते. रफीकच्या वस्तीभेटीच्या वेळी जमिलाला बसलेला धक्का, नंतरचे तिचे आजारपण, त्यातून श्रद्धेच्या बळावर तिचे परत निर्धाराने उभे राहणे, हा भाग (पृष्ठ २२८ ते २५१) प्रत्ययकारी साकारला आहे.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

याच प्रसंगचित्रणात संशयित आरोपी असलेल्या अंजुमच्या अम्मीच्या व्यक्तिरेखेच्या विकासाला वाव मिळाला आहे. अशा प्रकारे कादंबरीतील विचारविमर्शाच्या मध्यवर्ती सूत्राला अधिष्ठान म्हणून, वा आधार म्हणून वा पार्श्वभूमी म्हणून येणारी स्त्री व्यक्तिचित्रणे कादंबरीच्या सामाजिक आशयाला आणि त्या आशयाच्या अचूक अभिव्यक्तीला शक्ती प्रदान करतात.

कादंबरीत पारंपरिक स्वरूपाचे नायक-नायिका नसले तरी झुल्फीच्या रूपाने मुस्लीम सुधारणावादाचे आणि भविष्यातील नव्या जीवनाच्या स्वप्नाचे प्रतीक प्रभावीपणे साकारले आहे. दुसऱ्या बाजूला ‘जमिला’च्या रूपाने मुस्लीम स्त्री प्रश्नांची चिकित्सा कादंबरीत येते. अशा तऱ्हेने ही दोन पात्रे मध्यवर्ती पात्रे बनून कादंबरीच्या आशयसूत्राला सुरळीतपणे पुढे नेण्याचे काम करतात. इतर व्यक्तिरेखा मात्र पुरेशा पूर्णत्वाने विकसित होत नाहीत. त्यांची वाढ खुरटल्यासारखी आणि त्यांची निर्मिती केवळ काही विचारसूत्रे मांडण्यापुतीत झालेली आहेत असे वाटत राहते. ‘इन्शाअल्लाह’च्या गुणवान निर्मितीतला, हे अपुरे, अविकसित व पुरेशे सघन नसलेले व्यक्तिरेखाटन, हा एक कच्चा दुवा ठरू शकतो, अशी खंत सातत्याने वाटत राहते.

असाच एक कच्चा दुवा हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या रेखाटनातही जाणवत राहतो. भारतीय मुस्लीम-प्रश्नाची दुसरी बाजू म्हणून येणाऱ्या कडव्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या कादंबरीतील व्यक्तिरेखा, हा ‘इन्शाअल्लाह’मधील एक कच्चा दुवा वाटत राहतो. कारण त्यांना रहिमनगरमधील इतर मुस्लीम व्यक्तिरेखांसारखे नीट परिपूर्ण रंगरूप लाभत नाही. लेखकाच्या विचारसूत्राला आणि चर्चासूत्राला केवळ एक भाग म्हणून येणाऱ्या कळसूत्री बाहुल्यांची कळा रोहित, रास्ते, कल्याणी इत्यादींना लाभते. कारण त्यांच्या व्यक्तिरेखा कादंबरीच्या कथावस्तुतून स्वाभाविकपणे विकसित होत नाहीत. त्याचप्रमाणे कादंबरीतील हा कडवा हिंदुत्ववादी विचारप्रवाह भारतातील मूळ हिंदुत्वप्रवाह मानल्या जाणाऱ्या रा.स्व. संघाच्या विचारांचे प्रतिनिधित्व न करता, बजरंग दल, शिवसेना किंवा अन्य स्थानिक पातळीवरील छोट्यामोठ्या हिंदुसेनांचे प्रतिनिधित्व करताना दिसतो.

याउलट श्रीनिवास आणि अनंता यांच्या विचारांमध्ये मात्र संघाच्या उदार व समावेशक हिंदुत्वाचे विचारकण सामावलेले स्पष्ट पाहता येतात. भडकमकर यांची विचारदृष्टी आणि जीवनदृष्टी कशी व्यापक सामाजिक सहानुभूती बाळगते आणि भारतीयत्वाची अथवा राष्ट्रीयत्वाची कशी उदार, व्यापक व समावेशी अनुभूती व्यक्त करते, याचा प्रत्यय निवेदनातून व श्री, अनंता, झुल्फी या व्यक्तिरेखांच्या विचारमांडणीतून येतो. हे कादंबरीचे आणि तिच्यातील समतोल वैचारिक संघर्षचित्रणाचे, तिच्यात सहजपणे मूर्तरूप धारण करण्याचा इस्लाम-चिकित्सेच्या संतुलित मांडणीचे मोठेच यश मानले पाहिजे.

कादंबरीची खरी शक्ती याच अंतःसूत्रात, चर्चासूत्रात सामावली आहे. तरीही व्यक्तिरेखाटनाच्या संदर्भात एक उणीव सतत जाणवत राहते. कदाचित कादंबरीची आंतरिक मागणी बघता तिच्यात अधिक तपशील लेखकाला भरता आला असता! त्यामुळे तिच्या आकार वाढला असता, पण सोबतच तिचा रूपबंध अधिक सघन व व्यामिश्र होऊ शकला असता. कादंबरीच्या सुबोधता व वाचनीयता या गुणांसोबतच व्यामिश्रता, वास्तवता, सामाजिकता हे गुणधर्मही तुलनेने अधिक चैतन्यमय व गडद स्वरूपात व्यक्त होऊ शकले असते. प्रसंग आणि व्यक्तिरेखा यांची अधिक घट्ट व एकात्म वीण साकारू शकली असावी.

“कालावकाशाच्या संवादात्मक संबंधांची प्रगल्भ जाण, अवकाश आणि पात्र व काळ आणि पात्र यातील आंतरिक नाते निर्माण करण्याची क्षमता, विशिष्ट सामाजिक वास्तवाचा तपशील उचलून समग्र समाजाच्या आणि मानवी अस्तित्वाच्या पातळीवर नेणाऱ्या ‘व्हिजन’ची (लेखकाच्या) नितांत गरज” हे श्रेष्ठ कादंबरीचे निकष हरिश्चंद्र थोरात मिखाईल बाखितच्या आधारे मांडतात. (गेल्या अर्धशतकातील मराठी कादंबरी, पृ. ८०, ८४, ९५,) या निकषावर ‘इन्शाअल्लाह’चा ती एक विशुद्ध सामाजिक-राजकीय स्वरूपाची कादंबरी असल्याने विचार करणे महत्त्वाचे ठरते. या शोधात तिच्या सामर्थ्यस्थानांबरोबरच तिची काही दुर्बलस्थानेसुद्धा गवसतात. काळ आणि अवकाशाचा परीघ इथे कादंबरीकाराने घटना-प्रसंग, व्यक्तिचित्रण आणि चर्चाचिंतन यातून एकजीवपणे कसा भरला आहे, हेसुद्धा लक्षात येते. हा एकसंधपणा (परिपूर्ण नव्हे!) जो मोठ्या प्रमाणात इथे जाणवतो, त्यातच या कादंबरीची खरी गुणवत्ता आणि वाङ्मयीन महात्मता आपल्याला गवसते. याविषयीची एक आलेखवजा आकृती इथे मांडली असून त्याद्वारे कादंबरीच्या समाजनिष्ठ अवकाशाची एकंदर कल्पना येऊ शकेल.

काळ आणि अवकाश : ‘इन्शाअल्लाह’चा चिंतन-परीघ

येणाऱ्या पिढ्यांशी बोलण्याचे स्वप्न

‘कादंबरी’ या प्रसिद्ध निबंधात इतिहासकार वि.का. राजवाडे म्हणतात- “उत्तमोत्तम कादंबरीकार व्हावयाचे म्हणजे मनोवृत्ती अशी अत्यंत जाज्वल्य पाहिजे. श्रेष्ठविद्या, विस्तृत वाचन, मोठा प्रवास, तीक्ष्ण निरीक्षण, कडक परीक्षण, थोर औदार्य, गाढ सानुभूती व नाटकी लेखन हे गुण तर नाव घेण्यासारख्ये प्रत्येक कादंबरीकारात हवेतच. परंतु सर्वांत मुख्य गुण म्हटला म्हणजे जाज्वल्य मनोवृत्ती हवी. तिच्या अभावी वरील सर्व गुण व्यर्थ होत.” (निवडक मराठी समीक्षा, पृ. २१) त्याचप्रमाणे कादंबरीतील दृष्टेपणाची मीमांसा करतांना रा.ग. जाधव राजवाड्यांच्या आधारे सांगतात- “राजवाड्यांचा भर वास्तवता व अद्भुत यांच्या सेंद्रिय एकात्मतेवर, एकरसतेवर आहे व या एकात्मतेतच द्रष्टेपणाची बीजे असतात असे म्हणता येईल... भविष्यकालीन असे जे दिसू शकणारे आहे. ते बघणे व दाखविणे म्हणजे द्रष्टेपण होय... एक प्रकारची भविष्यवेधक मर्मदृष्टी म्हणजे द्रष्टेपण होय.” (गेल्या अर्धशतकातील मराठी कादंबरी, पृ. २०७, २१०)

या दोन वचनांच्या प्रकाशात ‘इन्शाअल्लाह’कडे आणि तिच्यातील केंद्रवर्ती व्यक्तिरेखा असलेल्या झुल्फीच्या मनातील उज्ज्वल उद्याच्या स्वप्नाकडे पाहिले तर या कादंबरीची वैशिष्ट्यपूर्णता समजून घेण्यास मदत होऊ शकते. भारतातील मुस्लीम समाजविषयक कळीच्या प्रश्नांना उजागर करताना लेखक नक्कीच विशिष्ट प्रकारच्या स्वप्नांमागे धावताना दिसतो. विशेषतः प्रगतीशील भारतीय समाजाचा अविभाज्य भाग असलेल्या मुस्लीम तरुणाईने एकविसाव्या शतकातील नव्या जगाला सामोरे जाताना जुन्या रूढींची जळमटे टाकून द्यायला हवीत आणि मुख्य प्रवाहात सामील होत स्वतःचा आणि देशाचा विकास साधायला हवा, हे एक साधे स्वप्न स्वतः लेखकाने बघितले असावे असे वाटते. त्याच कळवळ्यातून आणि सह-अनुभूतीतून अशा साहित्यनिर्मितीची प्रेरणा त्यास मिळाली असावी. त्यामुळेच कादंबरीतील ‘झुल्फी’ या नायकाच्या रूपाने आणि इतरही व्यक्तिरेखांच्या रूपाने हीच स्वप्ने कादंबरीच्या पानांमधून डोकावताना वाचकाला दिसतात.

रा.ग. जाधव म्हणतात ते कांदबरीकाराचे आणि कादंबरीचे ‘द्रष्टेपण’ याच वैशिष्यपूर्ण व्यक्तिरेखाटनात व कथासूत्रात आपल्याला सापडू शकते. झुल्फीच्या मनातील विचारतरंगांच्या रूपाने एकप्रकारे लेखकाचेच स्वप्न प्रकट होत राहते.

“रात्र झाली होती. पडवी एका नवेपणानं चमकत होती. रातकिड्यांचा आवाज ऐकू येत होता. त्याला जाणवलं. हे आपलं कार्यक्षेत्र. इथून आता आपली दुनिया खूबसूरत करायचा प्रयत्न करायला हवा. इथे खूप पढेलिखे विद्वान येतील. चर्चा झडतील, मंथन होईल. त्यातून नवे विचार, नवी दुनिया आकाराला येईल. त्यानं वर पाहिलं. वर चाँद होता. त्याच्याकडेच कौतुकानं पाहात असल्यासारखा.... आता ही दरी मिटेल. आपसातलं बैर दूर होईल. परस्परांवरचा अविश्वास खत्म होईल. जुनैद एका हसीन दुनियेत कदम ठेवेल. ऐसा होगा.... फाटकातून बाहेर पडताना त्याच्या मनात एकच ख्याल होता.... जरूर होगा.... यकिनन होगा. बाईकवर स्वार होत तो जाऊ लागला. जणू तो त्या बेहतरीन कलच्या दिशेनं चालला होता.” (पृ. २०८) कादंबरीच्या अखेरच्या भागात येणारा रहिमनगरमधून नवविचारांचा चित्ररथ काढण्याचा झुल्फी आणि मंडळींचा संघर्षशील प्रयत्न काहीसा काल्पनिक वाटला, तरी याच स्वप्नस्थ वास्तवाकडे अंगुलिनिर्देश करतो.

‘इन्शाअल्लाह’ या शब्दाचा अर्थ - “जब कोई भविष्य मे कोई कार्य करना चाहता है, या उसका इरादा करता है, या भविष्य में कुछ होने की आशंका व्यक्त करता है, या कोई वादा करता है, या कोई शपथ लेता है, तो इस शब्द का उपयोग करता है। ऐसा करने का हुक्म कुरान में है। इंशाल्लाह का मतलब होता है ‘अगर अल्लाहने चाहा.” हाही भावार्थ याच स्वप्नस्थ वास्तवाचे सूचन करतो. त्यातून सुरेश भटांच्या त्या ओळींशी या प्रयत्नांची सम साधली जाते! भडकमकरांच्या एका नाटकाच्या शीर्षकात दिसणाऱ्या त्या ओळी-

“जगाची झोकुनी दुःखे सुखाशी भांडतो आम्ही

स्वतःच्या झाकुनी भेगा मनुष्ये सांधतो आम्ही...

जरी या वर्तमानाला कळेना आमुची भाषा

विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही.”

या पार्श्वभूमीवर स्मरत राहतात आणि या कादंबरीच्या एकूणच निर्मितिप्रक्रियेच्या संदर्भात सार्थ ठरतात. कादंबरीच्या अखेरी येणाऱ्या घोषणा, “सब पढिंगे सब बढिंगे। इन्शाअल्ला इन्शाअल्ला, नये दौर के साथ चलिंगे। इन्शाअल्ला इन्शाअल्ला, हम जिहादी अमनशांती के, इन्शाअल्ला इन्शाअल्ला” एकप्रकारे कादंबरीचे आशयसूत्र, विचारसूत्र आणि स्वप्नसूत्रच घोषित करतात!

चिंतनशील आणि विचारप्रक्षोभक साहित्यकृती

‘इन्शाअल्लाह’चे एक वैशिष्ट्यपूर्व वेगळेपण तिच्यातील अत्यंत प्रभावी आणि सघन अशा वैचारिकतेत समावलेले आहे. अगदी कादंबरीच्या प्रारंभी घडलेल्या संशयित आरोपींच्या अटकेनंतर जी विविध मुस्लीम-प्रश्नांविषयी, इस्लामविषयी आणि संबंधित विचारपरिघाविषयी चर्चा-चिकित्सा सुरू होते, ती कादंबरीच्या अखेरपर्यंत निरंतर सुरू असते. प्राध्यापक असलेली नसिमामॅडम आणि ‘फतेह’ नावाच्या मुस्लीम सुधारणावादी चळवळीचा म्होरक्या व मार्गदर्शक रफिक यांच्या भेटीतून आणि चर्चेतून याचा ओनामा होतो.

“हा धार्मिक उन्माद आहे आणि धर्माच्या ठेकेदारांची ती गरज आहे. नव्हे त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, हा! म्हणून मग निष्पाप तरुणांची माथी धर्माच्या नावाने भडकवून.... कधी संपायचा आपल्या धर्मातला हा कट्टरपणा? हे मुल्लामौलवी बरबाद करताहेत तरुणांना! कसली-कुठली हजारो वर्षापूर्वी लिहिलेली शरीयत पाळायला सांगताहेत. आऊटडेटेड सगळं... या शिकणाऱ्या मुली, घरच्याही उत्तम दिसताहेत. पण बुरखा घालून फिरतात. का नाही लोक हसणार यांना? जुनाट, बुरसटलेलं म्हणणार? संधी मिळाली, तरी यांना चिखलातून बाहेरच यायचं नाहीये.... आपल्या समाजातल्या या मानसिकतेबद्दल त्याचा संताप त्याचं रक्त जाळू लागला.... मॅडमबद्दलच नव्हे तर तमाम मुसलमान बायकांबद्दल त्याच्या मनात एक कळवळा दाटून गेला. काय काय भोगताहेत या अजून! यांच्यासाठी स्वातंत्र्याची फज्जर झालीच नाहीये. आग लावून टाकायला हवी या रूढी-परंपरांना आणि पुरुषी मानसिकतेला.” (पृ. १५-१६)

अशा प्रकारे रफीकच्या विचारतरंगांच्या माध्यमातून वैचारिक चिकित्सेला कादंबरीत सुरुवात होते आणि लेखक थेट विषयालाच धीटपणे हात घालतात. पुढे संशयित आरोपींच्या समर्थनार्थ झालेल्या सभेत इतरांपेक्षा वेगळी मते मांडताना हाच रफीक म्हणतो- “...जर ते दोषी असतील तर त्यांना न्यायालयानं फाशी द्यावं. पण... या सगळ्यांच्या मुळाशी जे आहे, त्याचं काय करायचं आपण?.... दहशतवादाचं मूळ आहे आमच्या मुलांचा अडाणीपणा, अशितक्षितपणा आणि अज्ञान! आणि यात शिकलेले, उच्चविद्याविभूषितही असतात! काश्मीरमध्ये दिलंय ते.... हजारो वर्षापूर्वी लिहिलेलं पुस्तक आज काय कामाचं? जग कुठे चाललंय? आम्ही कुठं जातोय? नसत्या कल्पना डोक्यात भरवून या पोरांना वापरून घेतात. कसली जन्नत आणि कसली कयामत? कसला जिहाद? ऑ? आउटडेटेड आहे सगळं... एकच सांगतो. धर्म सुधारणा, धर्म चिकित्सा याला पर्याय नाही.” (पृ. ६५-६६)

ही ‘इस्लाम-चिकित्सा’ पुढेही विविध पात्रांच्या संवादांतून आणि निवेदनातून प्रभावीपणे आकाराला येते. पुढे झुल्फी या नायकाच्या निमित्ताने पृ. १२७ ते १५६ अशी दीर्घ विचारचिकित्सा कादंबरीत येते. अर्थात ही चर्चा-चिकित्सा अजिबात एकांगी मात्र होऊ देत नाही लेखक! या चिकित्सेत श्रद्धा, विश्वास, त्यातून मिळणारी शक्ती, आत्मविश्वास, या सुधारणांची व परिवर्तनाची गती, विशिष्ट पद्धत आणि शैली याही बिंदूंची सर्वांगपरिपूर्ण चर्चा विविध पात्रांच्या माध्यमातून होत जाते. जमिलाआपाला ‘कुराणशरीफ’च्या वाचनातून प्राप्त होणारी जगण्याची उमेद, मशिदीचे मौलवी बांगीसाब यांचा निरागस व प्रामाणिक धर्मभिरूपणा, नायक झुल्फीला पटणारे नमाजचे महत्त्व, इत्यादी विविध आयामांचाही उहापोह या चिकित्सेत येत राहतो.

रफीकच्या रूपाने लेखकाने मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक व सुधारणावादी लेखक-कार्यकर्ते हमीद दलवाई यांना कादंबरीच्या वैचारिक अवकाशाचा एक महत्त्वाचा भाग बनवल्याचे दिसून येते. त्यांच्या नावाचा उल्लेखही कादंबरीत अनेकदा येतो. इस्लाम धर्माशी आणि त्यातील कालबाह्य रूढी-परंपरांशी संबंधित तलाक, बुरखा, सुंता, जन्नत, कयामत, सैतान, जिहाद, नमाज, शरीयत, कुराण-शरीफचे प्रामाण्य, ईदची प्राणीहिंसा, महिलांची दुरवस्था, त्यांचा मशीद प्रवेश, त्यांचे रक्तदान, काफीर इत्यादी विविध संज्ञासंकल्पनांची मुक्तपणे चिकित्सा या कादंबरीतून साकारते. अनेकानेक प्रश्नांची एक मालिकाच उभी राहते. ‘इस्लाम-चिकित्सा’ हा इथल्या विचारविश्वाला व राजकीय जगताला सतत नकोसा वाटणारा, (मतपेटीच्या राजकारणसाठी वा अन्य कारणासाठी) भयकंपित करणारा, विषय भडकमकर इथे सहजतेने व कुशलतेने हाताळताना दिसतात.

या परखडपणाच्या संदर्भात ‘इन्शाअल्लाह’ची तुलना भैरवांच्या ‘आवरण’शी आणि तसलिमा नासरीन यांच्या ‘द्विखंडित’ व इतर पुस्तकांमधील अत्यंत परखड अशा इस्लाम-चिकित्सेशीच फक्त होऊ शकते! मराठीत कादंबरीच्या रूपाने होत असलेला हा प्रयोग अपूर्वच म्हटला पाहिजे. इस्लाम-चिकित्सेप्रमाणेच भारतातील लांगुलचालनवादी सेक्युलर राजकारण आणि त्याचा मुस्लीम सुधारणेच्या शक्यतेवर होत आलेला विपरीत परिणाम याचीही चिकित्सा कादंबरीत अत्रतत्र येते. म्हणजे ‘इस्लाम-चिकित्से’च्या चुकीच्या व भरकटलेल्या पद्धतींची व राजकीय वहिवाटीची चिकित्सा, हासुद्धा या कादंबरीच्या विचारसूत्राचा महत्त्वपूर्ण भाग आहे.

त्यासोबत या प्रश्नाचा तिसरा कोन म्हणजे कडवा हिंदुत्ववादी वर्ग! जो मुस्लिमांविषयीचा द्वेषभाव आणि वैरभाव जोपासण्याची एकही संधी सोडत नाही व त्या आधारावर आपली राजकीय पोळी शेकू पाहतो! लेखकाने या संदर्भात अप्रतिम संतुलन साधल्याचे कादंबरीत दिसते. सोबतच ही चर्चा-चिकित्सा नेमक्या व मोजक्या शब्दांतून व संतुलित-समावेशक दृष्टीतून आकाराला येते. ती कादंबरीच्या कथाप्रवाहाला आणि व्यक्तिरेखांच्या कालानुरूप विकसनाला अजिबात बाधित न करता आपले अंगिकृत कार्य करते हे महत्त्वाचे!

इथे दलवाई यांच्या धर्मचिकित्सेविषयीच्या काही मतांची नोंद करणे महत्त्वाचे ठरेल! ते म्हणतात- “मुस्लिम समाजात माझा जन्म झाला आहे. मुस्लीम समाज व धर्माची चिकित्सा करणे हे माझे कर्तव्य व ध्येय आहे. जेव्हा हिंदू उदारमतवादी हिंदू जमातवादाबरोबर मुस्लीम जमातवादासंदर्भात चिकित्सा करतील, तेव्हा माझे मुस्लीम चिकित्सेचे काम थांबवेन...ज्या हिंदूंना मुस्लीम जातीयवादाचा प्रतिकार करावयाचा आहे, ते हिंदूंना सनातनी बनवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ज्या हिंदूंना हिंदू समाजाला आणि पर्यायाने देशाला आधुनिकतेच्या रस्त्याने न्यायचे आहे ते मुस्लीम जातीयवाद्यांना मिठ्या मारत आहेत. हे दृश्य बदलले पाहिजे...सध्याच्या मुस्लीम जातीयवादाला भारतातील सर्वच राजकीय पक्ष कारणीभूत आहेत; त्यांनीच मतांच्या राजकारणापायी मुस्लिमांचा जातीयवाद अप्रत्यक्षपणे पोसला आहे...सेक्युलरवाद्यांनी राजकारणातील उद्गार मुस्लीम समाजाच्या मनोवृत्ती प्रकट करणारे आहेत, अशी सोयीस्कर समजूत करून घेतलेली आहे. मुस्लीम समाजात बदल होण्याच्या दृष्टीने हा सेक्युलर वर्ग आपल्या चुकीच्या भूमिकेमुळे अडथळा होऊन बसलेला आहे...धर्मचिकित्सेचा सबंध इस्लामी परंपरेत अभाव आहे; आणि चिकित्सा टाळून धर्मश्रद्धा बदलण्याचा प्रयत्न इस्लामी जगतात चाललेला आहे... इस्लामचे ८० टक्के सामाजिक कायदे कालबाह्य झाले आहेत असे भारतातील एक आधुनिक मुस्लीम विचारवंत ए.ए. फैजी यांनी आपल्या ‘Modern Approach to Islam’ या पुस्तकात म्हटले आहे...धर्मशास्त्राकडे पाहण्याच्या मुसलमानांच्या प्रवृत्तीत मूलभूत बदल असा अजून झालेलाच नाही. (जसा ख्रिश्चन व हिंदूत झाला) त्यामुळे आधुनिक वेशात वावरणारी मुस्लीम मने विचाराने मध्ययुगीन धर्मशास्त्रात रेंगळताना दिसतात. जेहादच्या घोषणा अजूनही अत्याधुनिक मुसलमान करताना दिसतात, याचा संबंध येथे आहे.” (हमीद दलवाई : क्रांतिकारक विचारवंत, पृ. १३, १६, १६१, १६३, १७०,) हमीदभाईंच्या विचारांची टिपणे समोर ठेवूनच भडकमकरांनी कादंबरी लिहिली की काय असे वाटावे इतके साम्य या दोन भूमिकांत जाणवत राहते. सोबतच नरहर कुरुंदकरांच्या मुस्लीम-प्रश्नाच्या परखड व वेगळ्या (समाजवादी-पुरोगामी-सेक्युलर पठडीपेक्षा वेगळ्या) चिकित्सेचेही अनायास स्मरण इथे होते.

कादंबरीची चर्चाप्रधानता व विचारप्रधानता

‘इन्शाअल्लाह’ त्यातील सशक्त, पारदर्शक, ठाम, एकसंध, वास्तववादी, दिशादर्शक मांडणीमुळे वेगळी अशी उठून दिसते. चर्चाप्रधान असूनही ती तिच्यातील वास्तव सामाजिक अवकाशाला अंतर देत नाही. विचारप्रधान असूनही विशिष्ट मानवी नातेसंबंधांनी आणि सामाजिक ताण्याबाण्यांनी घडलेले भावविश्वही ती सघनपणे साकारत जाते.

रहिमनगरमधील मुस्लीम मानसाची विविध प्रातिनिधिक रूपे झुल्फी, अश्रफमियाँ, शब्बीरचाचा, नदीम, अकबऱ्या कय्युम, जुनैद, बांगीसाब, उस्मान या पुरुषपात्रांच्या आणि जमिला, मुमताज, रजिया, नजमा, मिनाज, शमशी, शायरा इ. स्त्रीपात्रांच्या निमित्ताने कादंबरीकार अचूकपणे व प्रभावीपणे रेखाटतो. पूर्वार्धातील सूक्ष्म तपशीलप्रधान आणि उत्तरार्धातील चर्चा-प्रसंगप्रधान घडणीतून कादंबरीच्या कथाप्रवाहात एक संतुलन साधले जाते आणि तिला निश्चित असे मुस्लीम-भावविश्व साकारणारे भरीव व आश्वासक रूप प्राप्त होते. रहिमनगरच्या बाहेरच्या पण रहिमनगरच्या विविध प्रश्नसमस्यांशी मनाने व विचाराने जोडल्या गेलेल्या रफीक, अन्वर, इम्तियाज, फिदाजी, सईदाजी, नसिमा, सर्फराज, निहालचाचा, हसन रसूल, इम्तियाजचे राजकरणी आईवडील, सुहैल इत्यादी विविध व्यक्तिरेखा मुस्लिम भावविश्वाला अधिक परिपूर्ण, व्यामिश्र आणि सघन बनवण्याचे कार्य करतात. त्यामुळे मराठीतील चर्चाप्रधान, राजकीय आणि मुस्लीम मानसप्रधान अशा तिन्ही प्रवाहात ‘इन्शाअल्लाह’ तिच्या पृथगात्म वैशिष्ट्यांनी उठून दिसते. तिची संवादक्षमतेची आणि आवाहनक्षमतेची शक्ती निश्चितपणेच सर्वस्तरीय मराठी वाचकांना सारख्याच तीव्रतेने जाणवल्याशिवाय राहणार नाही.

या मागे अर्थातच लेखकाचा संबंधित विषयाशी असणारा दीर्घकालीन निकटचा अनुबंध; (जो त्यांच्या ‘चुडैल’ या कथासंग्रहातील ‘वापसी’ आणि ‘चुडैल’ या कथांमधून पूर्वी प्रकट झालेला आहे!) कादंबरीतून साकार होणाऱ्या वैचारिक संघर्षाविषयीचे त्याचे व्यापक, सखोल, समावेशक असे चिंतन, पंथ-पक्ष-जात-धर्म-विचारधारा या पलीकडे जाणारी मानवीय प्रश्नांविषयीची त्यांची मानवतावादी आस्था, भारतीय जनजीवनातील एका कळीच्या आणि अश्वत्थामाच्या जखमेसारखा बनून राहिलेल्या मुस्लीम-प्रश्नाबाबतची त्यांची सर्वांगीण जाण, त्या प्रश्नाची बीजे इस्लामच्या मूलगामी व आधुनिक चिकित्सेतच रूतली असल्याची त्यांची प्रामाणिक भावना आणि या सर्व प्रश्नांचा भारतीय लांगूलचालनवादी छद्मसेक्युलर विचारमांडणीत, तसेच कडव्या हिंदुत्वाच्या सामाजिक वर्तनात लपलेल्या धाग्याची सूक्ष्मतर जाण, या साऱ्या गोष्टींमुळे कादंबरीचा अवकाश नेमकेपणाने साकारण्याची प्रतिभाशक्ती लेखकाच्या अंगी असल्याचे जाणवल्याशिवाय राहत नाही.

विविध प्रकारची माध्यमे आणि साहित्यकृतीचे विविध आकृतिबंध गेल्या तीन दशकांपासून (९० पासून साधारण) हाताळण्याचा दीर्घकालीन सराव असल्यानेच हे विशिष्ट आव्हानात्मक आशयविश्व पेलून दाखवण्याचे कसब पूर्णांशाने नाही, तरी बहुतांशाने लेखकाला साधू शकले आहे.

कथासूत्र, चर्चासूत्र, विचारसूत्र आणि आशयसूत्र यांचे एकजीवित्व

‘इन्शाअल्लाह’चे रूपरंग न्याहाळताना एकाच वेळी तिच्यातील सामर्थस्थाने आणि तिच्यात राहून गेलेले कच्चे दुवे, दोहोंचीही जाणीव झाल्याशिवाय राहत नाही. विचारप्रधान अथवा चर्चात्मक मांडणीत भडकमकरांचा हातखंडा सर्वमान्य आहेच, कारण ते मूलतः ‘संवादातून’ मानवी जीवन साकारू पाहणारे एक नाटककार, पटकथा-संवादलेखक आहेत! ‘सुखांशी भांडतो आम्ही’सारख्या नाटकांमधून भडकमकरांचे संवाद-चर्चांमधून, वाढविवादांमधून नाट्य फुलवण्याचे व प्रश्नांना थेट हात घालण्याचे वादातील सामर्थ्य रसिकांनी पूर्वी अनुभवले आहे.

भारतातील अल्पसंख्य असा मुस्लीमधर्मीय समाज स्वातंत्र्याचा अमृत-महोत्सव दाराशी येऊन ठाकलेला असताना इतक्या वर्षानंतरही आणि मुस्लिमांचे आपणच एकमेव तारणहार, असा ठेका घेतलेला काँग्रेस पक्ष वर्षानुवर्षे सत्तेवर असतानाही अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण आदि मूलभूत गरजांपासून वंचित राहिलेला आणि विविध राजकीय-सामाजिक प्रश्नांशी झुंजत राहिलेला दिसून येतो. एकीकडे केवळ मतांच्या राजकारणासाठी निवडणूक-सत्तासापेक्ष व्होटबँक म्हणून मुसलमानांचे आंधळे लांगुलचालन करणारी काँग्रेसी राजसत्ता, त्याच राजकारणाला बळ पुरवणारी, वैचारिक क्षेत्रात सेक्युलॅरिझमच्या नावाखानी केवळ आंधळा हिंदूद्वेष आणि अविचारी मुस्लिमपरस्ती त्यांचा सातत्याने बटबटीत आविष्कार करणारी मार्क्सवादी, छद्मपुरोगामी व छद्मसेक्युलर अशी विचारसत्ता, दुसरीकडे रूढीग्रस्त आणि कालबाह्य इस्लामिक धारणांचा कडवेपणाने पुरस्कार करणारी जिहादी मानसिकतेकडे झुकलेली मुल्ला-मौलवींची इस्लामी-धर्मसत्ता आणि तिसरीकडे निव्वळ मुस्लीमद्वेषाचे राजकारण करून मुस्लिमांना भयभीत करू पाहणारी कडव्या हिंदुत्वनिष्ठ मंडळींची विचारसत्ता, या तीन प्रमुख विचारप्रवाहांच्या दडपणाखाली सतत वावरणारे मुस्लीम-मानस आणि त्यात मुस्लिममनाची होणारी घुसमट व तडफड साकार करण्याचा प्रयत्न ‘इन्शाअल्लाह’च्या निमित्ताने भडकमकर प्रामाणिकपणे करू पाहतात असे दिसते.

या उपरोक्त तीन दडपणांखाली संभ्रमित झालेला, वाट न सापडलेला व कालबाह्य रूढी-परंपरांमध्ये अडकून पडण्यास बाध्य झालेल्या मुस्लिममानसाची, विशेषतः तरुण मुस्लीम मनाची व्यथा-वेदना साकारण्याचा प्रयत्न ही कादंबरी करते. विशेषतः कुठलीही बोटचेपी भूमिका न घेता, कथित कडव्या इस्लामी वा कडव्या छद्मसेक्युलरी वा कडव्या हिंदुत्ववादी विचारगटाचे दडपण विषय मांडणीवर येऊ न देता ‘इन्शाअल्लाह’ आकाराला येते, हेच मी तिचे प्राथमिक, महत्त्वाचे यश मानतो. कारण अशा प्रकारे धैर्याने प्रत्यक्ष इस्लाम-कुराण-चिकित्सा, ग्रंथप्रामाण्य-चिकित्सा करण्याचे धाडस मराठी कथात्म साहित्यात अपवादानेच आढळते. हे करून भडकमकरांनी एकूणच मराठी साहित्यविश्वात एक नवे विचार-दालन खुले केले आहे.

कादंबरीचे हेच गृहितक असून मुस्लीम मनाची हीच ससेहोलपट लेखकाला कादंबरीतून वाचकांपुढे मांडायची असावी असे लक्षात येते. आपल्या त्या ‘लक्ष्यावर’ अचूकपणे लक्ष केंद्रीत करून कथानक, आशयसूत्र, विचारसूत्र, व्यक्तिचित्रण, घटना-प्रसंग, वर्णन निवेदन, संवाद, सामाजिक-राजकीय पर्यावरणनिर्मिती इत्यादी घटकांच्या प्रभावी व एकात्म उपयोजनातून लेखक ‘लक्ष्यभेद’ करण्यात यशस्वी झाला आहे असे दिसते. अश्रफमियां आणि राजियाझापा यांची कन्या नजमाच्या विवाहप्रसंगापासून आणि त्यास मागोमाग घडणाऱ्या रहिमनगर वस्तीतील मुलांच्या आतंकवादी गतविधीशी जोडल्या (अंजुमची अटक व जमिलाआपाच्या जुनैदचे बेपत्ता होणे) जाण्याच्या प्रसंगापासून कादंबरीची सुरुवात होते. मुस्लीम तरुणांच्या अतिरेकी कारवायांमधील संभाव्य समावेशाची ही घटना कादंबरीच्या कथासूत्राच्या केंद्रस्थानी असून त्याच केंद्राच्या अवतीभावती इतर उपकथासूत्रे गुंफली जातात. विविध विचारप्रवाहांच्या चक्रव्यूहात अडकलेला तरीही स्वतःचा नवा मुस्लीम सुधारणावादाचा मध्यममार्ग शोधू पाहणारा आणि त्यासाठी सतत कृतिशील राहून आपला मार्ग संघर्षातून प्रशस्त करू पाहणारा ‘झुल्की नसीर बागवान’ हा या कादंबरीचा नायक आहे. मांडणीसाठी घेतलेला विषय हाताळण्यास नाजूक व संवेदनशील असल्याने व थोडाही लंबक इकडे-तिकडे झुकला तर कादंबरीचा सामाजिक संतुलित बाज बिघडण्याचा संभव असल्याने, रचनेतील प्रयोगशीलता वगैरे गोष्टी टाळून लेखकाने साध्यासरळ शैलीत कादंबरीची रचना केलेली दिसते. कारण पुष्कळदा मांडणीतील, निवेदनातील व रचनेतील प्रयोगाच्या अट्टाहासामुळे वर्ण्यविषयाचा नेमकेपणा हरवला जातो व विषयावरील फोकस दुर्लक्षित होतो असा अनुभव आहे. या संदर्भात लेखकाने कुठलीही जोखीम पत्करलेली नाही. कारण त्याच्या लेखी महत्त्वाचे म्हणजे, एक नवा संवेदनशील वैचारिक पेच समाजापुढे उत्तम रीतीने व नेमकेपणाने मांडला जावा. त्यातून किमान काहीएक निश्चित अशी विचारदिशा विशिष्ट समाजमनाला प्राप्त व्हावी, ही कादंबरीकाराची नैतिक व सामाजिक भूमिका इथे प्रभावी ठरलेली दिसते.

कथासूत्र सोप्या, सरळ व इन्टॅक्ट पद्धतीने कादंबरीतून पुढे सरकते ते त्याचसाठी! कुठल्याही कादंबरीचे प्राथमिक यश तिच्या वाचनीयतेत, संवादक्षमतेत आणि आवाहनक्षमतेत सामावलेले असते. त्यासाठी कथावस्तूची आणि त्यातील विविध कथासूत्रांची एकात्म, घट्ट व सेंद्रीय वीण आकाराला येणे महत्त्वाचे असते. त्याचप्रमाणे कादंबरीचा कालावकाश जिवंत आणि वास्तव व्यक्तिरेखांच्या साहाय्याने आणि त्या व्यक्तिरेखांच्या अवतीभवतीच्या सामाजिक-सांस्कृतिक पर्यावरणाने भरून काढणे हे लेखकापुढचे महत्त्वाचे आव्हान असते. त्यातही कादंबरी जर विचारप्रधान व त्यामुळे संवाद-चर्चाप्रधान असेल तर त्या कथावस्तूच्या कालावकाशातच ही विचारप्रधानता विरघळून एकजीव झालेली वाचकांच्या प्रत्ययास आली पाहिजे.

‘इन्शाअल्लाह’चे एक ‘कादंबरी’ म्हणून जे प्राथमिक यश आहे, ते तिच्यातील कथासूत्र, आशयसूत्र आणि विचारसूत्र यांच्या एकरस, एकात्म मांडणीत दिसून येते. नजमाच्या लग्नसमारंभापासून, जुनैदच्या बेत्ता होण्यापासून व अंजुमच्या अटकेपासून सुरू झालेली रहिमनगर वस्तुतील घटना-प्रसंगाची गजबज आणि त्यातले चैतन्य अखेरपर्यंत सारख्याच सघनपणे कायम राहिलेले दिसते. अ.भा. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने रहिमनगरमधून निघणाऱ्या मुस्लीम सामाजिक सुधारणावादाचे प्रतीक असलेल्या चित्ररथाच्या निमित्ताने घडणाऱ्या संघर्षापर्यंतचा झुल्फी आणि इतर व्यक्तिरेखांचा प्रवास उत्तम रीतीने रेखाटण्यात कादंबरीकार यशस्वी झाला आहे.

जवळजवळ ४० एक मुख्य-गौण व्यक्तिरेखांचे नेमके आणि प्रभावी रेखाटन हे कादंबरीचे एक प्रमुख शक्तिस्थान आहे. कोल्हापूर परिसरातील मुस्लीम समाजाची ‘बागवानी’ मराठी बोली ही तर कादंबरीतील पात्रांना जिवंतपणा आणि कादंबरीला चैतन्य प्रदान करणारी एक वेधशक्तीच म्हटली पाहिजे. त्या बोलीच्या सहज प्रयोगातून जी रहिमनगरची वस्ती वाचकांपुढे उभी राहते तो कथाभाग वैचारिक डोलारा सांभाळणारा पाया वाटतो. अन्यथा नुसती चर्चा आणि वादविवादाने कादंबरीला वैचारिक प्रबोधाचे रूप प्राप्त झाले असते! प्रभावी विचारधारा वाचकांच्या मनात कादंबरीचे प्रतिपाद्य म्हणून रूजवताना त्याला जे प्रत्यक्ष मुस्लीम जीवन-वास्तवाचे अधिष्ठान लाभते, त्यामुळेच ‘इन्शाअल्लाह एक यशस्वी व प्रभावी ‘साहित्यकृती’त रूपांतरित होते.

लेखकाच्या विवक्षित जीवनदृष्टीला आणि विचारदृष्टीला संवादी असे भावविश्व उभे करण्यासाठी लेखकाजवळ केवळ शब्दांचे, भाषेचे, वाक्यरचनेचे, यथातथ्य प्रसंगवर्णनाचे सामर्थ्य असून भागत नाही, तर समाजातील प्रश्नांविषयीची खरी तळमळ, व्यापक मानवीय स्वरूपाची सामाजिक सहानुभूती असावी लागते.  त्या सखोल सह-अनुभूतीतूनच एक आंतरिक निकड म्हणून मग वर्ण्य विषयाला त्याने हात घालायला हवा. ‘इन्शाअल्लाह’ ही अपेक्षा मोठ्या प्रमाणात पूर्ण करणारी साहित्यकृती ठरली आहे. लेखनपूर्व आणि लेखनगर्भ आत्मनिष्ठा व सोबतच प्रत्ययाला येणारे निर्मात्याचे त्याच्या निर्मितीशी म्हणजे वर्ण्यविषयाशी असणारे भावनात्मक आणि ज्ञानात्मक नाते महत्त्वाचे असते. याशिवाय ‘इन्शाअल्लाह’सारखी एक उत्तम-परिपूर्ण साहित्यकृती निर्माणच होऊ शकत नाही.

महात्मता आणि मर्यादा

‘कादंबरी’ या वाङ्मयप्रकाराचे प्रधान वैशिष्ट्य तिच्यातून प्रकट होणारी ‘सामाजिक-सांस्कृतिक’ जाणीव असून कादंबरीकाराची त्या त्या कादंबरीतून प्रकट होणाऱ्या समग्र सामाजिक संदर्भावर पकड असणे कादंबरी-समीक्षेत महत्त्वाचे मानले जाते. (गेल्या अर्धशतकातील मराठी कादंबरी- के.ज. पुरोहित, पृष्ठ ५१) परंतु या सामाजिक सहअनुभूतीच्या पक्क्या पायाप्रमाणेच कलाकृतीला आवश्यक असणारा ‘एकसंधपणा’ ही शांताराम महत्त्वाचा मानतात. सामाजिकतेच्या थरात दडलेला अनुभव कादंबरीत किती सघनतेने उतरला आहे, यावर तिची गुणवत्ता अवलंबून असून एखाद्या कादंबरीतला अनुभव जर सामाजिक भान देऊ शकत नसेल, तर ती कादंबरी अपेक्षित उंची गाठू शकत नाही, हेही ते मांडतात. ‘कादंबरीचे अंतर्द्रव्य म्हणजे तिच्यातील जिवंत सामाजिकता’ हे त्यांचे विधान ‘इन्शाअल्लाह’ची गुणवत्ता तपासण्यास आणि ती सिद्ध करण्यास महत्त्वाचे ठरते. याच विषयाच्या संदर्भात बांदिवडेकर “समाजजीवनाचा मोठा पट समग्र वास्तव कवेत घेत उलगडून ठेवण्याचा प्रयत्न आणि हे करताना काही उत्तुंग व्यक्तिरेखांची निर्मिती (आणि अर्थातच त्यांच्याबरोबर अनेक पात्रांचा जमावही) ज्या कादंबरीत होते, त्या कादंबऱ्यांना श्रेष्ठ कादंबऱ्या म्हणता येईल,” (गेल्या अर्धशतकातील मराठी कादंबरी, पृ. २५५) असा जो निकष मांडतात, त्याच्याही प्रकाशात ‘इन्शाअल्लाह’चे परीक्षण करणे सार्थक ठरू शकते. कारण लेखकात जर प्रातिभ क्षमता आणि व्यापक सामाजिक सहानुभूती नसेल तर लेखन फक्त बहिर्मुख, रंजक, वरवरचे होऊ शकते, पण त्यात श्रेष्ठ कलाकृतीची व्यामिश्वता आणि सघनता येऊ शकत नाही!

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

‘इन्शाअल्लाह’ ही भारतातील एका मोठ्या वैचारिक पेचप्रसंगाला मुठीत धरू पाहणारी आव्हानात्मक साहित्यकृती ठरते. काल-अवकाशाचा विलक्षण प्रत्ययकारी आणि विस्मयचकित करणारा खेळ मांडत साकारलेली, भारतातील कथित सेक्युलर इतिहासकार-विचारवंतांचा दंभस्फोट करणारी, कमाल उंचीची स्फोटक विचारकृती ठरलेली, लोकप्रियतेचे आणि विक्रीचे नवे उच्चांक गाठणारी एक बहुचर्चित कादंबरी भैरप्पांच्या ‘आवरण’च्या रूपाने यापूर्वी आपण अनुभवलेली आहे. भैरप्पा हे एक थोर भारतीय कादंबरीकार! भारतीय विचारविश्वातील एका प्रभावी गटाच्या पक्षपाती इस्लामचिकित्सेची व हिंदुसंस्कृतीचिकित्सेची कादंबरीच्या कलात्मक रूपबंधातून पुनर्चिकित्सा-नवचिकित्सा करणारी ‘आवरण’ नक्कीच भडकमकरांच्या डोळ्यापुढे असली पाहिजे! त्यामुळेच ते थेट इस्लाम-चिकित्सेचे एक मोठे धाडस मराठीत करू शकले आहेत! हे आव्हानच अर्थात फार मोठे आहे आणि ते पेलण्यात बऱ्याच अंशी ‘इन्शाअल्लाह’ यशस्वी झाली आहे, असे निःसंदिग्धपणे म्हणता येते.

सोबतच काही उणीवाही राहून गेलेल्या दिसतात. चित्रकार ज्याप्रमाणे चित्र रेखाटण्यापूर्वी आणि संपूर्ण रंगविण्यापूर्वी एक कच्चे रेखाटन करीत असतो, त्याचप्रमाणे, कादंबरीकारही आपल्या कथावस्तूचा आणि त्यातील व्यक्तिरेखाटनाचा, आशयसूत्रांचा आणि विचारसूत्रांचा एक कच्चा आराखडा नक्कीच तयार करतो. कादंबरी वाचताना किंवा एखादी नाट्यकृती आस्वादताना अशी कच्ची रेखाटने सतत अध्येमध्ये दिसत राहिली, जाणवत राहिली तर ती निर्मात्याची काही एक कलात्मक उणीव मानली पाहिजे.

‘इन्शाअल्लाह’ वाचताना आणि त्यातील मुस्लीममानसाचा, मुस्लीम जीवनचित्रणाचा, मुस्लीमसमस्या प्रकटीकरणाचा, त्यातून गुंफलेल्या आशयसूत्राचा आणि विचारसूत्राचा प्रत्यय घेताना काही टप्प्यांवर असा एक बाळबोध आराखडा उठून समोर येतो आणि कादंबरीची कलात्म व सेंद्रिय जडणघडण किंचित उणावल्यासारखी वाटते. विशेषतः झुल्फीच्या निमित्ताने नवजीवनाच्या आकाशतुकड्याचे जे रम्य स्वप्न मुस्लीम-तरुणमन पाहते, लेखक पाहतो, त्या स्वप्नस्थ वास्तवाच्या मूर्तरूपास दर्शवण्यासाठी येणारे काही प्रसंग बघताना हा विशविशीतपणा जाणवत राहतो. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने निघणारा मुस्लीम सुधारणावादी विचारांचा प्रतीक-चित्ररथ ज्या वेळी रहमीमनगरमधून निघून नव्या पहाटेकडे झेपावू पाहतो आणि हरप्रकारच्या संघर्षास सिद्ध होणारे तरुणमानस लेखक रेखाटू पाहतो, तेव्हा कादंबरीचा तो शेवट सूचकता, प्रतीकात्मकता, प्रयोगशीलता, कलात्मकता आदि गुणवैशिष्ट्यांपासून वंचित राहतो. आणि पूर्वार्धामध्ये विणली गेलेली योग्य, घट्ट, एकात्म आणि कलात्म वीण शेवटाकडे जाताना मात्र काहीशी विसविशीत झालेली दिसते.

एका सामान्य व भाबड्या आदर्शाकडे अंगुलीनिर्देश करणारा हा शेवट कादंबरीच्या स्वाभाविक विकासक्रमाचा अविभाज्य भाग असला, तरी अभिव्यक्तीच्या अंगाने यात एक प्रकारचा उणेपणा जाणवल्याशिवाय राहत नाही. यासंदर्भात श्रेष्ठ कादंबरीकार भालचंद्र नेमाडे यांचे एक विधान लक्षात घेणे महत्त्वाचे ठरावे! ते म्हणतात- “कादंबरी हा निव्वळ निर्मितीलाच दीर्घकाळ घेणारा वाङ्मयप्रकार आहे. त्या आधीचा गरोदरपणा आणि नंतरचा संगोपणाचा प्रदीर्घ काळ मिळून कादंबरी लिहिणाऱ्याला मोठीच एकांताची आवश्यकता तो सूचित करतो... कादंबरी ही दीर्घकाळ चालणाऱ्या युद्धासारखी लेखकांना कागदाच्या ढिगाशी जखडून ठेणारी भयस्वप्नासारखी आणि अमानुष अशी कृती असते.” (गेल्या अर्धशतकातील मराठी कादंबरी, पृ. ३५)

इतःपरही ‘इन्शाअल्लाह’ने मराठी कादंबरीच्या क्षितिजावर एक नवी आश्वासक पहाट, तिच्यातील अन्यत्र निर्देशिलेल्या काही उणीवा गृहित धरूनही, उमलवली आहे, असे निःसंदिग्धपणे म्हणता येते.

..................................................................................................................................................................

डॉ. राजेंद्र नाईकवाडे

rgnaikwade2@gmail.com

..................................................................................................................................................................

‘इन्शाअल्लाह’ या कादंबरीच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5223/Inshallah

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे.......

जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक.......