विराट कोहलीमध्ये चीड, राग, जिद्द, विनम्रता, मदत करण्याची वृत्ती, अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची जिगर असे सगळे गुण एकवटले आहेत
ग्रंथनामा - झलक
विनायक राणे
  • ‘विराट’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Fri , 05 March 2021
  • ग्रंथनामा झलक विराट Virat विनायक राणे Vinayak Rane विराट कोहली Virat Kohli सचिन तेंडुलकर Sachin Tendulkar महेंद्रसिंग धोनी Mahendra Singh Dhoni

अधीर नि आतूर दिल्ली का छोकरा... वयाला न शोभणारी आव्हानं बेधडकपणे स्वीकारणारा... प्रारंभालाच यशाचं मांद्य शरीरावर चढल्याने बहकलेला गुलछबू-गोबरा क्रिकेटपटू... ही विरोट कोहलीची अर्थातच भूतकाळातली तीन रूपं. पण वर्तमानातला विराट याहून पूर्णपणे वेगळा आहे. त्याचं हे वेगळपण क्रिकेटपटू विनायक राणे यांनी ‘विराट’ या नव्या-कोऱ्या पुस्तकातून आपल्यासमोर मांडलं आहे. हे पुस्तक नुकतंच अक्षर प्रकाशनाने प्रकाशित केलं आहे. त्यातील हे एक प्रकरण...

..................................................................................................................................................................

संघात आला, तेव्हा विराट सुरुवातीला खूप खोडकर होता, सतत मस्ती सुरू असायची; पण त्यातही कुणी दुखावणार नाही, याची खबरदारी तो बाळगत असे. संघात विराटप्रमाणेच इतरही तरुण मुलं होती. त्यामुळे वातावरण अगदी युथफूल, खेळीमेळीचं असायचं. विराटची ऊर्जाच एवढी प्रचंड की, पोरगा ड्रेसिंगरूम दणाणून सोडायचा. तो, सुरेश रैना, शिखर धवन असे सगळे तेव्हा साधारण एकाच वयोगटातले खेळाडू होते. त्या सगळ्यांमध्ये विराट मात्र सर्वांत मस्तीखोर आणि खेळातही हुशार.

विराट असला की, तिथे गलबला आणि चैतन्य असणार, हे नक्की. तुम्ही त्याच्या सहवासात कधीच बोअर होऊ शकत नाही. आता तो वयानुरूप प्रगल्भ झाला आहे. एका खोडकर, मस्तीखोर मुलाचं मॅच्युअर्ड, यशस्वी खेळाडूत रूपांतर झालं आहे.

जेव्हा तो संघात आला, तेव्हा त्याचा आणखी एक गुण दाद घेऊन गेला. तो नकला इतक्या हुबेहूब आणि सुरेख करायचा की, समोरच्यानं मुक्तकंठानं दाद दिलीच पाहिजे. बरं, हे सगळं गंमत म्हणून चालायचं. कुणालाही दुखवायचा किंवा हिणवायचा हेतू त्यामागे नसायचा. आता काळानुरूप खेळाडू आणि माणूस म्हणून त्याच्यामध्ये कमालीचा सकारात्मक बदल झालेला, आपण बघत आहोत. यात त्याचं साफ मन, त्याचं जिंदादिलपण, जे मनात तेच तोंडावर आणि स्पष्टवक्तेपणा ही स्वभाववैशिष्ट्यं आजही कायम आहेत. मैदानावर असताना त्याची आक्रमकता आपल्याला दिसते, काहींना ती खटकते; पण हे सगळं क्रिकेटच्या प्रेमापोटी. त्याला जिंकायला आवडतं. विकेट गमावणं, त्याला जगातला सर्वांत मोठा गुन्हा वाटतो.

सुरुवातीला तो बाद झाला की, स्वतःवरच चिडायचा. आजही तो नाराज असतो, दिसतो; पण पूर्वीचा बाद होऊन ड्रेसिंगरूममध्ये परतणारा विराट वेगळा असायचा बरं का! त्याला सहनच व्हायचं नाही की, आपण बाद झालो आहोत. त्यामुळे ड्रेसिंगरूममध्ये आला की, त्याची आदळआपट सुरू होई. त्यामुळे तो बाद झाला की, आम्ही आपले घाबरून कुठे तरी लपायचो. माझ्यासोबत नेहमी एक स्पीकर असायचा, ज्यावर मी गाणी लावायचो. त्याने ड्रेसिंगरूममधलं वातावरण हलकं-फुलकं नि सकारात्मक होण्यास खूप हातभार लागायचा. पण विराट बाद होऊन परतू लागला की, तो छोटासा स्पीकर लपवायचो. जेणेकरून विराटच्या नाराजीत, त्या स्पीकरचं नुकसान होऊ नये. तर विराट परतला की, त्याचं जोरात ओरडणं, हेल्मेट, बॅट भिरकावून देणं, हे ठरलेलं असे; पण गेल्या तीन-चार वर्षांत त्याच्यामध्ये कमालीचा बदल झाला आहे. त्याच्यात समज आली आहे. त्याची आताची परिपक्वता पाहिली की, मीच कधी कधी हैराण होतो. प्रश्न पडतो की, ‘अरेच्चा, हा तो पूर्वीचाच विराट आहे का?’ कधी, कधी मनात शंका येते, आमचा मस्तीखोर, खोडकर विराट हाच आहे का? आता बाद झाला की, तो खूप शांत असतो. ड्रेसिंगरूममध्ये येऊन एखाद्या योगीप्रमाणे स्थिरचित्त होऊन बसतो. विचारमंथन करतो. पराभवाचे खापर तो आता कुणावर फोडत नाही. अर्थात, प्रतिस्पर्ध्याची विकेट पडत नसेल, तर अस्वस्थ झालेला, कधी रागावलेला विराट तुम्हाला दिसेलही; पण पराभवाचं खापर त्यानं कधीच कोणत्या खेळाडूवर फोडलेलं मी बघितलेलं नाही.

..................................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी पहा - https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

संघाचा विजय असो किंवा पराभव कर्णधार म्हणून लढतीनंतरचं त्याचं ड्रेसिंगरूममधलं जे भाषण असतं, ते खरोखरच ऐकण्यासारखं असतं. यशाचं वर्णन करताना, आपल्याला शब्द सुचत नाहीत; पण कधी विराट पराभवानंतरही आपल्या भाषणातून एवढं छान बोलत असे की, संघातील खेळाडूंमध्ये आपल्या चुका सुधारून पुढे जाण्याचं मनोबल आपोआप येई. कर्णधार म्हणून ही त्याची खासीयतच आहे. त्याचं म्हणणं, ‘खेळ आहे, आपण सर्वोत्तम द्यायचं. जिंकणं, हरणं खेळाचाच भाग आहे. तणाव घेऊ नका, पुढच्या लढतीत आणखी झोकून देऊन उतरू. चला, आता आपण मस्त फुटबॉल खेळूया’. की मग, सगळ्या सहकाऱ्यांना घेऊन, तो मैदानात फुटबॉल खेळायला उतरत असे.

विराटनं कायम स्वतःला एक उदाहरण म्हणून संघासमोर ठेवलं. त्यानं संघसहकाऱ्यांपुढे आदर्श घालून दिला. मी इथे फिटनेसबाबत म्हणतो आहे. लोकांना उपदेश देण्याआधी, विराट स्वतः त्याची अंमलबजावणी करून मोकळा झालेला असे. त्याचा जिममधील व्यायाम आणि सरावाच्या वेळा कधीच चुकत नाहीत. तिथे ‘सुट्टी’ हा शब्दच नाही. व्यायाम, रिलॅक्स होण्यासाठी त्याचं स्विमिंगही कधी चुकत नाही. त्याने या सगळ्याला बगल दिली आहे किंवा सुट्टी घेतली आहे, हे सगळं सोडाच; पण या सगळ्या गोष्टींसाठी तो उशिरा आला आहे, असंही कधी झालं नाही. सराव, व्यायामात त्याला एखादी गोष्ट १०० वेळा करायला सांगितली असेल, तर तो नेहमी ११० किंवा १२० अशा रिपिटेशन्स हमखास करतो. त्यातही सगळ्या गोष्टीत सफाईदारपणा दिसतो.

या सगळ्या गोष्टी करत असताना, मग त्याची अपेक्षा असते की, माझ्या सहकाऱ्यांनीही तसं योगदान द्यायला हवं; म्हणूनच तुम्ही बघा संघाचा सराव, व्यायामाचे तास यात तुम्हाला खूप सुधारणा झालेली दिसेल. भारतीय संघाच्या क्षेत्ररक्षणात झालेली कमालीची सुधारणा आपण सगळेच पाहतो आहोत, यालाही विराटच कारणीभूत आहे. पूर्वी धोनी लढतीआधी किंवा इतर दिवशीही धोनी क्षेत्ररक्षणाचं ट्रेनिंग फार कमी करायचा. मुख्य लढतीत स्वतःला झोकून देणं हा त्याचा स्वभाव आहे. अन् तसंही त्यांच्यात यष्टिरक्षणाचे उपजत गुण आहेतच. आज विराटनं संघाची नेतृत्वाची धुरा हाती घेतल्यापासून धोनीसारखा माणूसही कसून ट्रेनिंग करतो. हा बदल घडला, तोदेखील विराटमुळेच. आणि फक्त धोनीच का, विराट येण्याआधी बरेचसे खेळाडू जिमकडे वळायचे नाहीत. जिममधील व्यायामाचा तास असला की, खेळाडू कारणं देत हमखास पळ काढायचे.

मला आठवतंय, विराट नेतृत्व करत असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघात एक खेळाडू ट्रेनिंग आणि फिटनेसकडे दुर्लक्ष करत होता. ही बाब विराटच्या नजरेतून सुटली नव्हती. संपूर्ण मोसम विराटनं त्याला अंतिम अकरामध्ये खेळवलं नाही. तो खेळाडू अंतिम अकरामध्ये खेळला असता, तर कदाचित बेंगळुरूला फायदा झाला असता; पण संबंधित खेळाडू शिस्तीचं पालन करत नसल्यानं विराटनं त्या खेळाडूला अंतिम अकरामध्ये संधी दिली नाही. मुळात, विराट हा संघासाठी आदर्श होतो, आणि मग आपल्या संघानंही तशा शिस्तीचं पालन करावं, अशी त्याची रास्त अपेक्षा असते. हे सगळं संघ आणि खेळाडूंच्या हिताचंच असतं, हे ओघानं आलंच.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

पूर्वी भारतीय संघाचा डाएट कधीच चोख असा नव्हता. त्यात संघ परदेश दौऱ्यावर असेल, तर डाएटचे तीनतेरा वाजलेच म्हणून समजा. जे मिळेल ते खावं लागे; कारण पूर्वी परदेशात भारतीय जेवण उपलब्ध नसे, आतासारखी भारतीय हॉटेलंही नव्हती. विराटनं संघाची जबाबदारी घेतल्यानंतर त्यानं संघाच्या डाएटबाबत खूप कटाक्ष पाळला. वाफवलेले शाकाहारी पदार्थ, हे बहुतांशी विराटचं खाणं आहे, त्याला पाहून आता संघातील अनेक खेळाडू शाकाहारी होत आहेत.

गंमत म्हणजे, विराटच्या या डाएटमुळे माझ्यातही बदल झाला. पूर्वी माझी रूम म्हणजे, खेळाडूंच्या भाषेत अलीबाबाची गुहा होती. कारण कुठल्याही वेळी भूक लागली, तरी माझ्याकडे काही तरी खाण्याचे पदार्थ असत. आजही माझ्याकडे खाण्याचे मुबलक पदार्थ असतात; फक्त ते पदार्थ आता पौष्टिक झाले आहेत. पूर्वी माझ्याकडे ठेपला वगैरे असे. आता माझ्याकडे भाजलेले चणे, भाजलेले शेंगदाणे, काजू, बदाम, पिस्ता, नाचणीचे भाजलेले चिप्स असे पदार्थ आले आहेत. आता संघाचा चहाही बदलला आहे. आलं, दालचिनी, लवंग, वेलदोडे, काळीमिरी टाकून पाणी उकळायचं आणि लिंबू टाकून प्यायचं, हा आमचा चहा आहे. अर्थात, काहींना आपला नेहमीचा दुधाचा चहा लागतो; पण त्या चहात साखरेऐवजी गूळ घातला जातो. हे सगळं आम्ही विराटच्या मार्गदर्शनाखाली केलं आहे.

आपल्या खेळाडूंची मुख्य ताकद ओळखण्यात विराट पारंगत आहे. मग त्यानुसार संबंधित खेळाडूला तो प्रोत्साहन देतो, पाठिंबा देतो. मी खात्रीनं सांगू शकतो की, विराटमुळेच चहलसारख्या खेळाडूची कारकीर्द बहरली. केदार जाधव, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत अशा खेळाडूंना भारतीय संघात संधी मिळणं, त्यांच्यात खेळाडू म्हणून सुधारणा होणं, यात विराटच्या पाठिंब्याचा, मार्गदर्शनाचा मोठा वाटा राहिला आहे. इतकंच नव्हे, तर विराटला आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींमधील चांगल्या गोष्टी शिकण्याची खूप चांगली सवय आहे. आपल्या सीनियर सहकाऱ्यांमधील चांगले गुण त्यानं सहजपणे आत्मसात केले आहेत. धोनीकडून तो खूप गोष्टी शिकला आहे. सचिन तेंडुलकर तर त्याचा आदर्शच आहे. त्यामुळे त्याच्याकडून, त्याला फक्त बघून विराट मोठा झाला आहे. एवढंच काय; पण रोहित शर्माही विराटला खेळाडू म्हणून खूप आवडतो. अनेक बारकावे विराटनं रोहितकडूनही शिकून घेतले आहेत.

विराटचा हा सगळा प्रवास वाखाणण्याजोगाच आहे. पण मला विचाराल तर विराटमध्ये आजवर सर्वाधिक बदल झालाय, तो अनुष्का शर्मामुळे! त्याची खास मैत्रीण आणि पत्नी... ती मला अभिनेत्री, अशी कधीच वाटली नाही. ती एक सरळ, साधी तुमच्या-आमच्यापैकीच एक गुणी मुलगी आहे. अनुष्काच्या निगर्वी स्वभावानं, तर सुरुवातीला मीही चकित झालो होतो. लहान वयात मोठे यश मिळवलेली, तरीही पाय जमिनीवर घट्ट रोवलेली अशी ती व्यक्ती आहे. संघातल्या खेळाडूंप्रमाणेच तिचंही माझ्या रूममध्ये हक्कानं येणं, कधी सुरू झालं ते मलाही आता आठवत नाही. माझ्या रूममध्ये येऊन चहा करणं, खिचडी तयार करणं, तिला आवडायचं. माझ्याकडे खिचडीचं साहित्य कायम सोबत असे. अगदी भांडंही मी माझं घेऊन जात असे.

ती अशीच एके दिवशी आली आणि म्हणाली, ‘काका तुम्ही नको, मी खिचडी करते.’ तिची खिचडी करण्याची पद्धत मलाही आवडली. मी खिचडीत खडे मसाले पिसून टाकायचो, तर मला तिनं सांगितलं की, ‘काका अशी पावडर करायची नाही. मसाला अख्खा टाका, अगदी दालचिनीदेखील.’ पण, फक्त खिचडीसाठीच नव्हे, तर नेहमीच्या गप्पा आणि मेडिटेशन करण्यासाठीही ती माझ्या रूममध्ये अनेकदा यायची. मुळात, ती स्पिरिच्युअल आहे, हे मला तिनं सांगितलेल्या एका अनुभवामुळे लक्षात आलं. पूर्वी मेडिटेशनला नको म्हणणारा, विराट आज छान मेडिटेशन करतो. या सकारात्मक बदलांचं मोठं श्रेय नक्कीच अनुष्काला आहे.

विराटमधले धार्मिक, आध्यात्मिक पैलू मला कधीच दिसले नव्हते. पूर्वी तो मंदिरात वगैरे गेल्याचंही, मी कधी पाहिलं नव्हतं. दिखाऊपणा त्याच्या स्वभावातच नाही. त्यामुळे स्टेडियममध्ये किंवा मैदानात कधी, कुठे पुजेसाठी त्याला बोलावलं जातं, तुम्ही येऊन नारळ फोडा, अशी विनंती त्याला केली जाते. विराटला खरं तर हे पसंत नाही; पण संबंधितांचा मान ठेवून विराट पूजेच्या ठिकाणी जातो. नारळ फोडतो, नमस्कारही करतो. हे सगळं माणुसकीला मान म्हणून.

एकदा तर आम्ही विराटला सोबत घेऊन मंदिरात घेऊन गेलो होतो. त्याने नकार दिला नाही; पण आपण गर्दीच्या वेळी न जाता वर्दळ नसेल तेव्हा जाऊ असं विराटनं सुचवलं. आमच्या शब्दांचा मान ठेवत तो मंदिरात आला, त्या वेळी ख्रिस गेलही सोबत होता. विराट आणि ख्रिस गेल या दोघांनीही मनःपूर्वक पूजा केली. देवस्थानाची मंडळी तेव्हा आजूबाजूला होती. मात्र विराटचा अजिबात बडेजाव नव्हता. हे सगळं सकारात्मक बदल त्याच्यात अनुष्कामुळे झाले आहेत, अशी माझी धारणा आहे. हे विराटही मान्य करतो. त्याच्याकडे पहिल्यांदा भारतीय संघाच्या कर्णधारपदाची धुरा आली, तेव्हादेखील त्याच्यासह अनुष्का होती. ‘ती माझ्यासाठी लकीच आहे,’ असे तोच म्हणतो.  

क्रिकेटपटू सहसा आपली बॅट कुणालाच देत नाहीत. त्यांचा जीव जणू त्या बॅटमध्ये असतो. अशी भावना असणं साहजिकच आहे. बॅटशी आठवणी जोडलेल्या असतात, नातं निर्माण झालेलं असतं. शिवाय काहींना बॅट लकीही वाटतात. विराटनं मात्र आपल्या बॅट होतकरू फलंदाजांना दिलेल्या मी पाहिल्या आहेत. एखाद्याची कामगिरी आवडली, त्याच्यामध्ये गुणवत्ता आहे, असं विराटला वाटलं की, आपली बॅट विराट त्या खेळाडूला बक्षीस, भेट म्हणून देतो. बॅगा, कपडे हे तर तो सातत्याने भेट देत असतो. 

विराटच्या स्वभावाचं दर्शन घडवणारा अगदी अलीकडे आयपीएलदरम्यान एक प्रसंग घडला. त्यानं मी खूप भारावलो. एक लहान मुलगी विराटकडे आली. तिने विराटला तिच्या ‘डॉग सेंटर’मध्ये येण्याची विनंती केली. तुमची दहा मिनिटं जरी दिलीत, तरी खूप बरं वाटेल, अशी विनंती ती मुलगी करताना दिसत होती. विराटनं क्षणाचाही विलंब न लावता होकार दिला. इतर संघ सहाकाऱ्यांसह मीदेखील त्याच्यासह त्या ‘डॉग सेंटर’मध्ये गेलो होतो. दहा मिनिटांसाठी त्या सेंटरमध्ये गेलेला, विराट तिथे दोन तास थांबला होता. तिथल्या प्रत्येक कुत्र्याला त्यानं गोंजारलं. त्या सेंटरची बारकाईनं पाहणीही केली, ते एक अॅनिमल सेंटर होतं. त्या सेंटरमध्ये विराटच्या मदतीनं आता ऑपरेशन थिएटर सुरू झालं आहे. ही सगळी मदत करताना त्यानं संबंधित संस्थेला सूचनाही केली की, माझ्या या मदतीबाबत कुणालाच सांगू नका. आजही स्टेडियमची पाहणी करणारं श्वानपथक आलं की, त्यातील डॉग स्क्वॉडशी विराटची चटकन गट्टी जमते. त्या कुत्र्यांसह खेळणं, त्यांना आपल्या ओंजळीतून पाणी पाजणं असं त्याचं सुरू राहतं. एकदा तर त्या कुत्र्यांसह मैदानात लोळतानाही त्यानं न्यूनगंड बाळगला नाही.

मागे आमच्या एक सपोर्ट स्टाफमधील अधिकाऱ्याच्या घराबाबत काही अडचण निर्माण झाली होती. अमुक एक रक्कम त्याला तत्काळ भरणं आवश्यक होतं. ही बाब विराटला समजली. विराटनं त्याला तत्काळ चेक काढून दिला. असं पूर्वी सचिन तेंडुलकर करत असे. खरं तर सचिन आणि विराटमध्ये खूप साम्य आहे. सचिन आपले गुरू आचरेकरसरांना कधी विसरला नाही आणि विसरणारही नाही, तसाच विराट त्याचे बालपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांना विसरत नाही. त्यानं आज एवढ्या मोठ्या स्थानावर झेप घेतली आहे; पण आजही त्यांना वेळात वेळ काढून भेटणं, फोनवरून संवाद साधणं, हे सुरूच असतं. आपल्या जीवनातील महत्त्वाच्या क्षणी शर्मासर उपस्थित असतील, याची खबरदारी तो घेत असतो.

मला सचिनबाबतही असाच एक किस्सा आठवतो आहे. आम्ही ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होतो, आमच्या सपोर्ट स्टाफमधील एकाला अचानक पाठदुखीचा त्रास जाणवू लागला. सचिनने अक्षरशः त्याला आपल्या पाठीवर उचललं, मला लिफ्ट बोलवायला सांगितली. आम्ही खाली आलो, सचिननं रुग्णवाहिकेची व्यवस्था केली. त्या सपोर्ट स्टाफच्या हॉस्पिटलमध्ये जाण्याची सोय केली. शिवाय त्या सपोर्ट स्टाफच्या उपचारात कुठलीच कसर राहणार नाही, याचीही खबरदारी तो सातत्यानं घेत होता.       

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

भारतीय संघासह मी त्याच्या आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघासहदेखील काम करतो आहे. त्याचा एक शिरस्ता आजही कायम आहे अन् तो म्हणजे, आजही संघात नवे खेळाडू आले की, त्यांचा माझ्याशी परिचय करून देण्यासाठी विराट आवर्जून त्यांना माझ्या रूममध्ये घेऊन येतो. ‘आमच्या काकांच्या रूमचे दरवाजे सदैव खुले असतात. तेव्हा काहीही हवं असेल, अॅक्युप्रेशर, मसाज तर काकांकडे नक्की यायचं,’ असे तो संघातील नव्या सदस्यांना सांगतो. या खेळाडूंमध्ये आणि माझ्या वयात पिढ्यांचं अंतर असलं तरी त्यांच्यासह काम करताना एक मैत्रीपूर्ण नातं मी कायम ठेवलं आहे.

सूफी, पंजाबी गाणी विराटला आवडतात. माझ्या आयपॉडमध्येही तशी गाणी असतात. त्यामुळे या गाण्यांचे शेअरिंग आणि एकत्र ऐकण्याच्या आमच्या मैफलीही झाल्या आहेत. मला कायम असं वाटतं की, खेळाडू हा जसा मैदानात आपल्या गुणांनी मोठा होतो, तसाच तो माणुसकीमुळेही मोठा होतो. सचिन आणि विराट याची मोठी उदाहरणं आहेत.

चीड, राग, जिद्द, विनम्रता, मदत करण्याची वृत्ती, अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची जिगर असे सगळे गुण विराटमध्ये एकवटले आहेत. संघ आणि संघातील सहकारी यांच्या हक्कासाठी तो बीसीसीआयशीदेखील झगडायला मागेपुढे बघत नाही. एकवेळ तो स्वतःचं सुख-दुःख मागे ठेवेल, पण संघातल्या प्रत्येकासाठी पुढाकार घेण्यास कमी पडणार नाही. हा विशालहृदयी विराट आहे. त्याला आजच्या जगात तोड नाही.  

विराट - विनायक राणे, अक्षर प्रकाशन, मुंबई, मूल्य - १७५ रुपये.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे.......

जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक.......