अजूनकाही
कविता प्रसवत असते व्यथा, वेदना, दु:ख, विरह, प्रेम, संवेदना आणि भोवतालच्या जगाचा घेत असते वेध. कवी लिहीत असतो त्याच्या मनाच्या पटलावर उमटलेले प्रासंगिक घटनांचे, सागरी लाटांचे, भावनिक तरंग. कवी जागा असतो, चाचपत असतो आपल्या अवतीभवती अज्ञाताने, अज्ञानाने आपल्या स्वप्नांना लावलेला वणवा आणि लावलेले सुरुंग… तसेच आपल्यासाठी उभारलेले अकाली तुरुंग. कवी असतो सजग आपल्या जगण्याविषयी. पाना-फुलावर प्रसन्न होऊन, फुलपाखरांचे रंग लेवून कवींनीही बागडावे मनसोक्त. पण माणसांच्या जगताचे बारकावे टिपून त्यावर मांडावेत आपले पोक्त विचार. कवी कसा असावा, कसा नसावा या किमान, कमाल अपेक्षेच्या फंदात पडायला नको. हा ज्याच्या त्याच्या अभिव्यक्तीचा, विचारधारेचा, विचारक्षमतेचा आणि त्याला असलेल्या आकलनाचा प्रश्न असतो. पण किमान कोणत्या तरी अंगाने तो कवी वाचकांच्या हृदयात जाऊन भिडावा, ही तरी अपेक्षा ठेवणे गैर नाही.
इतक्यात गावखेड्यातल्या मातीशी स्पष्टपणे संवाद साधणारी सोप्या, सरळ भाषेतली मांडणी असलेला, मातीच्या नातीगोत्यातली पडझड आणि एकंदर बेगडी जीवन जगण्याच्या रूढ होऊ पाहणाऱ्या अमानवी जीवनपद्धतीवर भाष्य करणारी कविता चर्चेत आली. ती कविता आहे देवा झिंजाड यांची. गावखेड्यातल्या नव्याने बदलत चाललेल्या कृषी संस्कृतीचा छान आलेख मोजक्या शब्दांत मांडण्याची कवी झिंजाड यांची काव्यशैली मनाचा ठाव घेते.
जे काही कवितेच्या माध्यमातून त्यांना पोहचवायचं आहे, अनेकविध प्रश्नांना, समस्यांना वाचा फोडायची आहे, त्यासाठी ज्या शब्दांची ते मांडणी करतात, ते काळजापर्यंत थेट पोहचवण्यात ते यशस्वी होतात. पण प्रदूषित संस्कृतीचा भोवताल, पूर्वापार जोपासत आलेल्या रूढी-परंपरांचा आजवरचा प्रवास आणि त्याचा एकूण प्रभाव पडून निब्बरगठ्ठ झालेली प्रस्थापित समाजव्यवस्था ही हाक कितपत मनावर घेते, ही कवीच्या निर्मितीची कसोटी आहे.
झिंजाड यांनी अगदी जाणीवपूर्वक याविषयीही आपली बाजू मांडली आहे. ‘कवितेनं फारसा बदल होईल असं नसलं तरी बोलावंच लागेल…’ या कवीच्या भूमिकेशी सहमत होता येतं. ‘सगळं उलथवून टाकलं पाहिजे’ या समर्पक शीर्षकासोबतच ते उलथवून टाकण्यासाठी व्यवस्थेच्या गर्भात शिरण्यासाठी जी कवितेची भाषा आहे, तेच या कवितेचं खरं शस्त्र आहे आणि शास्त्रसुद्धा!
..................................................................................................................................................................
अधिक माहितीसाठी पहा - सर्व प्रकारच्या कट्टरतेला नाकारणाऱ्या ‘इन्शाअल्लाह’ या अभिराम भडकमकर यांच्या बहुचर्चित कादंबरीवरील ‘परीक्षण’ स्पर्धा
..................................................................................................................................................................
‘अगतिकीकरण’, ‘जागतिकीकरण’, ‘भाकरायण’ आणि ‘हरवलेल्या हिरव्या बांगड्या’ अशा चार विभागात कवितांची मांडणी केली आहे. प्रत्येक विभागातील विषयानुरूप कविता मनोवेधक आहेत.
शेतकरी अवघ्या विश्वाचा पोशिंदा. या शेतकऱ्याच्या जीवावर जगणारी माणसंच जर त्याच्या जीवनाच्या लिलावात सामील होत असतील तर यापेक्षा मोठं दु:खं नाही. राबणारे, जगवणारे हात थांबले तर या जगाच्या पोटाचं कसं होईल? याची साधी कल्पनाही करणे इथल्या न्यायाचे माप हाती घेतलेल्या निब्बरगठ्ठ व्यवस्थेला जमत नाही. त्यामुळे आवाज उठवणारा कुणीतरी प्रत्येक वेळी पुढे आलाच पाहिजे. आजमितीला दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्यांनी आंदोलन चालवलेलं आहे. प्रत्येक राज्यातील शेतकऱ्यांच्या हवामान परिस्थितीनुसार समस्या निरनिराळ्या असल्या तरी उत्पन्नाचे, आर्थिक मिळकतीचे प्रश्न सारखेच आहेत. त्या कारणाने जगण्याच्या व्यथा सारख्याच आहेत. या प्रश्नाचा प्राथमिक आढावा, कवीचा प्रातिनिधिक आवाज होऊन व्यक्त होत आहे-
योग्य भाव मिळत नाही म्हणून
लेकराबाळांची कोवळी स्वप्नं फेकून द्यावी लागतात रस्त्यावर
अन अगतिक बळीराजाची तडफड कधीच कळत नाही
टायघाल्या लोकांना एसीत बसल्यावर…
कशी गाडून घेते बळीराणी चिखलामातीत
हे कधीतरी समजावं
घरदार सांभाळून
ऑफिसमध्ये काम करणाऱ्या
माझ्या भगिनींना…
इथल्या षंढ बनून मूग गिळून सर्व सहन करणाऱ्या प्रवृत्तीला सवाल करणारी आणि चिंतन करायला लावणारी ही कविता -
मध्यमवर्गीयांना वेळ नाही
श्रीमंतांना गरज नाही
गरिबाला भीती वाटते
ज्याच्याकडं आहे सगळं त्याला लाज वाटते
कशी करणार क्रांती?
अशा मन:स्थितीतला समाज…
कि लावायचे आता रोजाने क्रांतिकारक?
कुठून आणायचे आता पुन्हा फुले-शाहू-आंबेडकर
काहीतरी केलं पाहिजे
सगळं उलथवून टाकलं पाहिजे…
प्रत्येकाला वाटतं हवाबदल झाला पाहिजे, पण जिकडेतिकडे माणसांच्या स्वार्थीपणामुळे आपल्याला भेटलं पदरात पडलं की, सगळं संपलं... प्रश्नच उरत नाही भांडण्याचा, मांडण्याचा… म्हणून झिंजाड म्हणतात -
कुणीच लावत नाही स्वत:च्या स्वार्थीची बोली
ग्लोबल झालेत मेंदू…
…,…,
एसटीच्या कंडक्टरशी किंवा
ट्रॅफिक हलावदाराशी हुज्जत घालण्यापलीकडे
आपल्या बिगुलाची ताकद पोहचत नाही
म्हणून स्वत:पासून क्रांती झाली पाहिजे…
ही सूचक अपेक्षा कवी नोंदवतो. अर्थात कवीच्या सूचक अपेक्षेला त्याच्या प्रातिनिधिक नेतृत्वात साथ देण्यासाठी किती हात पुढे येतात आणि कवी आपली निडर पावलं किती निर्भयतेनं पुढे टाकतो ते येणारा काळ ठरवणारच आहे.
पण ‘एक वादळ आलं होतं, झाडांना हालवून गेलं होतं’, याची साक्ष देणारा हा कवितासंग्रह असल्याची नोंद सध्यातरी करायला हरकत नाही. कवीची प्रांजळ भाषा, मनाची कबुली आणि परिस्थिती बदलासाठी ठाम असा न केलेला दावा… हा युक्तीवादही तितकाच जोरकस वाटतो. आता ही व्यवस्था, ही अवस्था, पुन्हा पुन्हा आलेली मरगळ, अमानुषतेची, अराजकतेची, भांडवलशाहीची पायपसर थांबवण्यासाठी आता कोणते क्रांतिकारक रोजंदारीवर आणायचे?
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
मानवतेची पुन्हा मांडणी, समतेची मशाल आणि दुर्लक्षित मानवांना सोन्याच्या मखरात बसवून माणसांच्या जिवाचं सोनं करणारे क्रांतीसूर्य जोतीराव फुले, छ. राजर्षी शाहू महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आता कुठून आणायचे? ही कवीच्या मनातली तगमग आपण सगळे जाणून आहोत. ती गोष्ट आता शक्य नाही. म्हणून जे मिळालं या महामानवांकडून ते टिकवून ठेवणंच आता अगत्याचं आहे.
आपल्या लेखणीतल्या विश्वासानं इथल्या दुर्लक्षित किटाडांची भुई पोतेरा मारून सारवून काढावी आणि आळसून पडलेली मनातली गुरंढोरं हाकलून द्यावी, शुद्ध विचाराची बुद्धविहारं गावोगावी उभी व्हावीत, महिलांच्या विचारशक्तीत ही बीजं रुजावीत आणि गावाबाहेरच्या इंदिरा आवास योजनेतून एखादी तरी ‘इंदिरा’ घडावी, असा भक्कम आशावाद घेऊन कवी साद घालतो आहे आजच्या वर्तमानाला…
सर्वत्रच अराजकतेचं पीक आलेलं असताना तीच ती माणसं पुन्हा पुन्हा नेतृत्वाची स्वार्थीपणाची बेगडी धुरा सांभाळण्याचा खेळ करत पुढे येत आहेत, तेव्हा बिनडोकाच्या पायावर माथा टेकवावा लागतो आहे. आपला उद्धार होईल या आशेनं अशा लोकसेवक गेंड्यांना वेळीच धडा शिकवण्याची वेळ कधीचीच आलेली आहे, हे कवीनं ‘अश्व लावू या लोक हो…’ या कवितेतून मांडलं आहे. पुराव्याअभावी गुन्हेगार मोकाट सुटतात अशा वेळी कितीक निर्भया, सुरेखा भोतमांगे, मनिषा अशा कितीतरी अनामिक लेकीबाळी अत्याचाराला बळी पडल्या आहेत. हे दुष्कृत्य करण्याचं धाडस करणारी मानसिकता जाग्यावरच कुचवली पाहिजे. ‘अगतिकरण’ ही जागतिकीकरणाच्या नादात मातीत राबणाऱ्या साध्या माणसांचं कसं झपाट्यानं अगतिकरण झालं ही सत्यता मांडणारी ही कविता -
डाव्या हाताची किंमत कळायला लागली
तेव्हा हात थरथरायला लागलेला
अन गावात मान वाढला तेव्हा
गावकऱ्यांनीच गाव शहराला विकाया काढलेला…
….
म्यागित मग्न राहिलेले मगनलाल
आणि चिक्कीत रममाण असलेले छगनलाल
मातीचा बाजार मांडून लढवत राहिले आपला किल्ला
मढवलेल्या अस्ताव्यस्त पोटासाठी.
ही अवस्था प्रत्येक गाव-शहराची झाली आहे.
गावखेड्यातून पोट भरण्यासाठी शहराकडे स्थलांतरित झालेली माणसं अन वर्षानुवर्षं त्यांची वाट पाहत राहणारी त्या घरातली म्हातारी माणसं शहराच्या दिशेनं टक लावून बघतात अन जाग्यावरच खंगून जातात.
गावाकडं राहतात फक्त खाट्या गाईसोबत
म्हातारीकोतारी काठीवर चालणारी माणसं
येतो कधी मधी मिसकॉल त्यांचा
दुसऱ्यांच्या मोबाईलवरून
तेव्हा गलबलून जातं शहरात आलेलं काळीज
- कधी येणार लेकरा परत?
सर्वच प्रकारच्या दुष्काळानं वेढलेली ही गाव-शहरं शेवटी माणुसकीच्या दुष्काळानं पार करपून गेली. हंगामाचा दुष्काळ कमी-जास्त होत राहील, पण माणुसकीचा दुष्काळ परवडणारा नाही. त्यासाठी माणुसकीचं पीक तगलं पाहिजे. ‘कोरडी बेटं’ ही कविता गाव-आठवणीत डोळे ओले करून जाते.
नवऱ्याच्या मदिरेच्या नादात आयुष्याची होळी झालेली धुरपदा नवऱ्याला तशीच पोसत राहते. त्याच्यासाठीच राबत राहते. तो दारुडा असला तरी समाजानं आपल्याला नावं ठेवू नये म्हणून सगळं काही पदरात घेऊन जीवनाशी लढत राहते. हे गावातल्या मदिराभक्ताचं चित्र ‘धुरपदा’ या कवितेतून छान मांडलं आहे. बायकोचंच काही चुकत असेल म्हणून नवरा दारू पित असेल, हे उघड्या तोंडानं म्हणणारी तोंडंही गावात असतात, हा बारकावा इथं कवीनं टिपलेला दिसतो.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
या संग्रहात समाविष्ट कविता एकूणच या सर्व परिस्थितीवर एल्गार पुकारणाऱ्या आहेत. ‘भाकरायण’ या विभागात ‘अर्धी भाकर’, ‘भाकरायण’, ‘एल्गार’, ‘दौरा’, ‘श्रीमंत तुकडे’, ‘चूल’, ‘लेगपिस’ या कविता गरीब आणि श्रीमंतांच्या जगण्यातला भेदाभेद सांगून कल्लोळ मांडून जातात.
ही कविता मातीशी एकनिष्ठ राहण्यासाठी माणसाला आवाहन करत राहते. ज्या चिमणीच्या उजेडात जगण्याची, बघण्याची दिशा तिला मिळाली, त्या चिमणीच्या उपकाराला विसरू नको, हे सांगणारी ‘घासलेट’ ही कविता -
तुहा जल्म झाल्ता
तव्हा
चिमणीत घासलेट नव्हतं
दुसऱ्या दिवशीच तुला पाह्यलं
एकवेळ मला विसर
पण
विसरू नकोस चिमणीला
कारण
मी मोकळी झाले तव्हा
तीही जागली होती रिकाम्यापोटी
अंधाराच्या डोळ्यात डोळे घालून
आपल्या दोघांसोबत…
‘हरवलेल्या बांगड्या’ या विभागातल्या ‘चिंचा’, ‘भुंड्या हातांनी’, ‘तरण्याबांड देवा’, ‘बेसन भाकर’, ‘कावळा शिवला की’, ‘बांगडी’, ‘घासलेट’, ‘पीएच.डी.’ या कविता लक्षवेधी आहेत.
या संग्रहातील सर्वच कविता सरळ सोप्या आहेत. या कविता संभ्रम ठेवत नाहीत. त्या सरळ सरळ काळजाला हात घालतात. विसंगतीची पाळेमुळे खोदून काढण्याचा प्रयत्न करतात. या कविता नुसतं दु:ख मांडत नाहीत, तर त्यावरील उपायही सुचवत राहतात. परिवर्तनवादी विचाराच्या मुळाला हात घालत त्यासारखं चिंतन करायला लावतात.
..................................................................................................................................................................
‘सगळं उलथवून टाकलं पाहिजे’ - देवा झिंजाड, हर्मिस प्रकाशन, पुणे, मूल्य - १५० रुपये.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment