अजूनकाही
डॉ. सुधीर देवरे यांची ‘सायको’ ही नवी कादंबरी १९ फेब्रुवारी २०२१ रोजी इचलकरंजीच्या ‘तेजश्री प्रकाशना’कडून प्रकाशित होत आहे. या कादंबरीतील हा संपादित अंश…
..................................................................................................................................................................
गावातील मंदिराचा पार. पारावर जीवन, प्रताप, मधुकर, आत्माराम, कडू दिसतात. आत्माराम, कडू हे खाली बसलेले तर जीवन, प्रताप, मधुकर पारावर उभे आहेत. कडू दारूच्या नशेतच आहे. पण नशा बरीच उतरलेली दिसते. बाजीराव शेट मागे एका कोपर्यारत बसलेले दिसतात. आत मंदिरात काही माणसं आणि बायाही दिसतात दुरून. बाहेर अधूनमधून पाऊस पडतो. पाराखाली सगळीकडे पाणीच पाणी दिसतं. गावाशेजारच्या नदीला महापूर आलेला आहे आणि पुराचं पाणी गावात शिरलं आहे, अशी इथंि सगळी पार्श्वभूमी स्पष्ट दिसते. पारावरून आणि एखाद्या घरातून पाराकडे पाहिलं तरी परिस्थितीचं गांभीर्य लक्षात यावं.
जीवन आपल्याशीच पण सर्वांना ऐकू जाईल असं पुटपुटतो, ‘बाप रे किती पाणीच पाणी झालंय सर्वत्र. बरं केलं ना आपण लवकर निघून आलोत खोल्या सोडून पारावर ते.’ प्रताप पारावरून भुतबंगल्याच्या दिशेनं पाय उंचावून पहात, ‘आपल्या भूतबंगल्याचा पहिला मजला संपूर्ण गेला बघ पाण्याखाली.’ मधुकर, ‘संपूर्ण मजला नाही जाणार. तळमजल्यात पाणी शिरलंय हे नक्की. आज तिसरा दिवस ना पावसाचा? काय कहर केलाय बघ त्याने.’ आत्माराम मधुकरची चूक दुरुस्त करत, ‘तिसरा नाही, आज चौथा दिवस. इतका पाऊस तर मी माझ्या आयुष्यात कधीच पाहिला नाही अजून.’ बाजीराव बसल्याजागीच आपल्या स्वत:लाच बजावल्यासारखा, ‘अजून मी माझ्या आयुष्यात पावसामुळे घर सोडलं नव्हतं. भगवंता, काय दिवस दाखवला रे तू आज!’ कडू धुंदीतच पण नूर बदललेला, ‘मी झोपेतही सारखा अनुभव घेत असतो पहा. मी स्वप्नात आहे का? हो स्वप्नातच असेल हे. खरोखर जागं असताना इतकं भयानक कसं होऊ शकेल? आत्माराम कडूला सांत्वन देत, ‘नाही कडूराव. तुम्ही झोपेत नाहीत. आपण आज कोणीच झोपेत नाही आणि आपल्याला कोणी संमोहीतही नाही केलेलं. आपण ढळढळीत वास्तव जगत आहोत आज.’ जीवन आपल्याशीच बोलत, ‘श्री स्वामी समर्थ. लवकर मोकळं कर रे हे आभाळ. पाऊस थांबव आणि ऊन पाड ना लवकर.’ कडू जीवनला, ‘अजून तुमचा एकच देव आहे का जीवनराव? बदलला नाही अजून?’ मधुकर अशाही स्थितीत आपली विनोदी वृत्ती कायम ठेवण्याच्या पावित्र्यात, ‘फार पॉवरफूल आहे. इतक्या लवकर सुटणार नाही.’ प्रताप मूळ स्वभावात येऊन, ‘अंगात आलेलं भूत झाडाला लवकर सोडत नाही तसं.’ जीवन स्वत:शीच, ‘आमच्या गावात एकही फोन नाही. असता तर घरी फोन करून दिला असता आणि निरोप दिला असता कोणाजवळ काळजी करू नका म्हणून.’
प्रताप, ‘आमच्या गावालाच कुठं फोन आहे. काल मी एसटी स्टँडवर जाऊन गावाचा माणूस शोधून निरोप पाठवला की काळजी करू नका. मी ठीक आहे. शनिवारी घरी येऊन जाईन.’
मधुकर, ‘आमच्या गावाला एका किराणा दुकानात फोन आहे. काल चौधरींच्या दुकानावरून फोन केला आणि घरी निरोप द्यायला सांगीतला, मी ठीक आहे म्हणून. पण चौधरी काय बनेल आहे. एक मिनिट बोललो असेल. त्याने पाच रुपये घेतले.’
कडू, ‘मी तर धुळ्याला पत्रच टाकून देतो. पंधरा पैशात घरपोच जातं आणि तेही तिसर्याच दिवशीच. कटकट नाही.’
मधुकर, ‘कडू काकांनी ती बातमी वाचली तशी आपल्याकडे मोबाईल फोन असते तर या पारावरून सुद्धा आपण कुठंही बोललो असतो आता जगात.’
प्रताप, ‘आणि असतेही समजा आपल्या भागात मोबाईल फोन तरी आपल्याला ते परवडले असते का? नुसता फोन आला तरी साताठ रुपये लागतात म्हणे. आणि आपण केला तर पंचवीस रुपये. असं काहीतरी आहे.’
मधुकर सल्ल्याच्या आविर्भावात, ‘खरंच प्रताप, तू लिहीच हे नाटक. जमेल तुला. काय सिच्युएशन आहे पहा.’
..................................................................................................................................................................
अधिक माहितीसाठी पहा - सर्व प्रकारच्या कट्टरतेला नाकारणाऱ्या ‘इन्शाअल्लाह’ या अभिराम भडकमकर यांच्या बहुचर्चित कादंबरीवरील ‘परीक्षण’ स्पर्धा
..................................................................................................................................................................
प्रताप मधुकरला, ‘कसली आणि काय स्टोरी आहे या नाटकाला? इनमिन सहा पात्र. नाही सूत्र, नाही विचारसरणी, नाही कथानक. लिहायचं कसं? सगळेच इथं सायकोसारखं बोलतात. सायकोसारखं वागतात. नाटक भरकटेल नुसतं.’ मधुकर, ‘कशी नाही स्टोरी. आपण जे आज जगतोय ते आहेच या नाटकात अस्सल. तुला वाटलं तर त्याच्यात एखादं स्त्री पात्रही टाक. दिली मोकळीक तुला.’ कडू कमी झालेली धुंदीची पातळी वाढवत, ‘नाटकाला स्टोरी राहातच नाही प्रतापराव. नाटक फक्त नाटक असतं. मी एक नाटक पहायला गेलतो मागे आणि अर्ध्या तासात उठून आलो घरी. का तर त्याला काहीही स्टोरी नव्हती. मात्र आपण जे काही जगतो आहोत याला स्टोरी आहेच. नाही कसं? समजा, आपला भूतबंगला हा एक देश मानला आणि प्रत्येक खोली एक राज्य नाहीतर जिल्हा नाहीतर तालुका नाहीतर गाव नाहीतर नागरिक नाहीतर मतदार मानलं तर. तर नाटक सहज उभं राहील. नाही कसं? रहायलाच पाहिजे उभं!’ मधुकर टवटवीत होत, ‘व्वा. व्वा. क्या बात है!’
कडू तंद्रीत पण शास्त्रशुद्ध बोलण्याच्या पावित्र्यात, ‘आणि आपल्या भारताला सगळीकडून जसं अतिरेक्यांनी पोखरून काढलं, तसं आपल्या भूतबंगल्याला उंदरांनी!’ प्रताप, ‘अरे व्वा. कडू काकांनी खरं तर लेखक व्हायला हवं.’ कडू तंद्री लावून, ‘आणि आपल्या भारतातले पुढारी जसे लोकांना नाडून नाहीतर लोकांसाठी आलेल्या पैश्यांनी स्वत:च्या तुंबड्या भरुन घेतात तसे बाजीराव शेट आपल्याला भाड्यासाठी वेठीस धरतात! भाडे वाढवून घेतात ! आणि उंदरं फुकट चरतात राजरोस.’ भान येऊन सर्वजण बाजीरावशेटकडे पाहतात. बाजीराव शेटने हे ऐकलंय. पण इथं उत्तर देऊन उपयोग नाही आणि फायदाही नाही म्हणून न ऐकल्यासारखं करून ‘श्रीराम श्रीराम’ म्हणत राहतात बिचारे. सुस्कारा टाकत स्वत:शीच म्हणतात, ‘लवकर ऊन पाड रे देवा आता. बास झालं ना आता.’ जीवन मध्येच, ‘जय मारुतीराया, लवकर उघडू दे रे पावसाला.’ प्रताप, ‘बदलला का देव जीवनराव? मारुती का आता?’ जीवन तात्काळ आरोप धुडकावत, ‘कशाला बदलू देव? इथून तिथून सर्व देव सारखेच. आपण आता मारुतीच्या पारावर बसलोत ना, म्हणून घेतलं नाव मारुतीचं.’ मधुकर तात्विकपणे, ‘मग तो कशाला करील मदत? साहेबाच्या पुढं पुढं करतात सरकारी नोकर तसं देवाचा चमचा व्हायला चाल्लास का तू?’
कडू धुंदीत मधुकरची बाजू घेत, ‘माणसाला निष्ठा राखता आली पाहिजे. ती माणसावरील निष्ठा असो, धर्मावरील असो की देवावरील निष्ठा असो. निष्ठा राखलीच पाहिजे. कामापुरता मारुती आणि नंतर स्वामी समर्थ. हे काही बरं नाही जीवनभाऊ.’
पाऊस कोसळायला लागला अचानक. आणि वीजेच्या लोळासह पुन्हा गडगडाट. पारावरच पण आडोश्याला सर्व जण तारांबळीने सावरतात. आत मंदिरात बाजीराव शेटच्या कुटुंबासह अंतर राखून कडूचं कुटुंब पण दिसतंय.
आत्माराम वैतागाने, ‘पुन्हा पाऊस सुरू झाला पहा हा.’ कडू उलट बोलत, ‘वाहू द्या पाणी. खूप येऊ द्या पाऊस. जसजसा भूतबंगला पाण्याखाली बुडेल तसतसे उंदरं बिळातून बाहेर निघतील. उध्वस्त होत जाईल सगळ्या उंदरांचा संसार. खरं तर आक्खं जग सपाट झालं पाहिजे आणि नंतर नव्याने उतरला पाहिजे या जमिनीतून ताजा टवटवीत हिरवागार कोंभ...’ पावसाने जोर धरला. खूप आवाज आहे पावसाला. म्हणजे टपोरा थेंब आहे.
जीवन, ‘अजून जोरात सुरू झालाय पाऊस. मी पैसेसुद्धा खोलीतच टाकून आलो. बरोबर घ्यायला हवे होते. श्री स्वामी समर्थ.’ आत्माराम सल्ला देत, ‘मोह- मायेत अडकायचं नाही जीवनराव आता.’ कडूही सरसावत, ‘आणि आध्यात्मिक माणसाने तर पैशात मुळीत अडकू नये.’ पावसाची रपरप सुरूच.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
मधुकर पावसाला चिथावणी देत, ‘खरंच ये म्हणा अजून जोरात. आपण इथंच झोपू रात्री पारावर.’ प्रताप, ‘पण खायचं काय?’ कडू विधायक सुचना करत, ‘शेंगा भरून आणायला पाहिजे होत्या खोलीवरून उरलेल्या.’ जीवन आपल्या तंद्रीत विषयाशी तारतम्य सोडून, ‘माझं नाव जीवन आहे. या जीवनात माझं जगणंच एक कविता आहे.’ मधुकर पुन्हा प्रतापला सुचवतो, ‘तू लिहून टाक हे नाटक. अगदी जसं घडतंय तसं यथार्थ.’ जीवन तंद्रीत विषयाचे वावडे सोडून, ‘सगळा वेळ वाया जातो अशाने. एकुलत्या एका आयुष्यात कसा भरून काढता येईल हा वेळ पुन्हा? आता गेला तो गेलाच ना?’ मधुकर प्रतापला पुन्हा नाटकाच्या विषयावर घेत, ‘वाटल्यास आशालाही एक पात्र म्हणून नाटकात आण. पण लिहीच.’ प्रताप, ‘नको. जड होईल मला हे सूत्रात बांधताना सगळं.’ मधुकर आपलं घोडं दामटत, ‘आशा हे पात्र म्हणून जरी तू नाकारलं तरी जीवनात आशेवर आपण जगतोच ना? आशा नाकारता येत नाही रे प्रताप जीवनात. आशा आहे तर जीवन आहे. निराशेत खूप दिवस जगता येत नाही.’
जीवन कान टवकारतो. पण जीवन हे आपलं विशेषनाम नसून सामान्यनाम म्हणून ते उच्चारलं जातंय हे लक्षात येताच दुर्लक्ष करतो. कडू आपली धुंदी मुद्दाम ओढवत, ‘प्रश्नच नाही. पाऊस थांबेल अशी सगळ्यांना आशा आहेच. आणि माणूस सोडणार नाही जगायचं. कसंही जगायला सांगा. तो जगेलच. खूप चिगट आहे हा माणूस उंदरांपेक्षा.’
...
पावसाची रीपरीप सुरूच. कडू बोलतच राहतो पुढं, ‘आपण आपापल्या खोलीत पुन्हा जाऊ अशी आपल्याला आशा आहे. भूतबंगल्याची इमारत या पावसातही न पडता तगून राहील अशी बाजीराव शेठना आशा आहे. बाजीराव शेठनाच नाही फक्त. ती इमारत आपली नाही तरी ती वाचावी अशी आपलीही आशा आहे. कारण आपले भांडेकुंडे, कपडेलत्ते, पैसे अडका रूमवर आहे आणि इतक्या स्वस्तात आपल्याला दुसरीकडे कोणी खोली देणार नाही. जास्त भाडे आपल्याला परवडणारं नाही. म्हणून तरी हा भूतबंगला वाचलाच पाहिजे राव.’
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
मधुकर प्रतापला पुन्हा, ‘वा काय सिच्युएशन आहे. खरंच तू नाटक लिहीच प्रताप.’ प्रताप, ‘नको. नाही पकडता येणार मला यातलं तरल नाट्य.’ जीवन वैतागत, ‘श्री स्वामी समर्थ. काय शूद्र जीवन आहे देवा माणसाचं. तू नसतास तर आमचं काय झालं असतं?’ कडू धुंदीत पुढे सुरू करतो, ‘जीवन देवाच्या भरोश्यावर जगतो. मी दारुच्या भरोश्यावर जगतो. मधुकर, आत्मारामजी कवितेच्या भरोश्यावर जगतात. प्रताप आशाच्या भरोश्यावर जगतो! कोणी कशाच्या ना कशाच्या भरोश्यावर जगतात. माणसाचं ज्ञान किती तोकडं आहे पहा! खरं म्हणजे, ज्ञानाच्या भांडवलावर इथं जगताच येत नाही कोणाला...’ मधुकर पसायदान म्हटल्यासारखा बोलू लागतोय, ‘हे विश्वात्मके देवे, जीवनला भरपूर पगाराची नोकरी मिळू दे म्हणजे देवावरचा विश्वास त्याचा अजून दृढ होईल. आशासारखी कोणतीही सामान्य पोरगी पाहून प्रतापच्या हृदयात प्रेम निर्माण होऊ दे. आशाला सुख मिळू दे. कडूकाकांना दारूसाठी पैसे उपलब्ध होऊ दे. आत्मारामकाकांचा कवितासंग्रह छापायला पैसे न मागणारा प्रकाशक मिळू दे. उदंड कवी- संमेलनं होऊ दे. म्हणजे कोणताही कवी रस्त्यात कोणालाही कविता ऐकवणार नाही. आमच्या सारख्या उंदरांसाठी मुईमुंगाच्या भरपूर शेंगासुद्धा पिकू दे! आणि बाजीराव शेटचा आमच्या भाड्यात महिन्याभराचा खर्च भागू दे! म्हणजे ते आमच्यामागे भाडे वाढवण्याचा लकडा लावणार नाहीत.’
पावसाचा पुन्हा जोरदार सळका सुरू होतो. विजा चमकू लागतात. गडगडाट होतोय. कानठळ्या बसण्याइतका. धडाम. जसा एखादा बॉम्बस्फोट व्हावा...
...
पावसाने किती नासाडी केली याचा कोणाला कळणार नाही खरा आकडा. पण एखादं तरी फूल नवीन उमलेल? आणि त्या फुलासाठी जन्माला येईल का एखादं फुलपाखरू?
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment