दारासिंग  : ‘पंडित नेहरू माझी कुस्ती तब्बल ५० मिनिटे अतिशय रंगून पाहात होते!’
ग्रंथनामा - झलक
रविराज गंधे
  • ‘माध्यमयात्रेतील माणसं’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि दारासिंग व त्यांच्या काही सिनेमांची पोस्टर्स
  • Sat , 06 February 2021
  • ग्रंथनामा झलक माध्यमयात्रेतील माणसं Madhyamyatretil Mansa रविराज गंधे Raviraj Gandhe दारासिंग Dara Singh

प्रसिद्ध पत्रकार रविराज गंधे यांचं ‘माध्यमयात्रेतील माणसं’ हे दूरदर्शनच्या काळातल्या सहवास मिळालेल्या मान्यवर व्यक्तींविषयींचं पुस्तक ग्रंथालीतर्फे प्रकाशित झालं आहे. या पुस्तकात प्रसिद्ध कुस्तीपटू, अभिनेता आणि खासदार दारासिंग यांची प्रदीर्घ मुलाखत आहे. तिचा हा संपादित अंश...

.................................................................................................................................................................

१९७०च्या दशकाच्या आसपासची ती वर्षे म्हणजे नुकतीच तारुण्याला जाग आल्यानंतर जीवनाची नशा उपभोगायला निघालेल्या कुठल्याही सर्वसाधारण तरुणासारखीच मंतरलेली होती. जी.ए. कुलकर्णी, भालचंद्र नेमाडे, चि. त्र्यं. खानोलकर, श्री. ना. पेंडसे यांची शब्दकळा सदैव भुरळ घालायची. लताच्या गळ्यातून निघालेल्या मदनमोहनच्या धुंद गाण्यांच्या सुरावटी सकाळी स्नानापासून रात्री झोपेपर्यंत अंगावर निथळत राहायच्या. ‘असली नकली’मधील, चांदण्या रात्री गच्चीवर प्रियकराच्या आठवणीनं व्याकूळ होणारी साधना अन् ‘तेरा मेरा प्यार अमर.... फिर क्यूं मुझको लगता हे डर...’ या लताच्या आर्त गाण्यावर झुलणारा साधनाचा जीवघेणा अंबाडा, इराण्याच्या हॉटेलात संगमरवरी टेबलावर रिचवल्या जाणाऱ्या बीअरच्या थंडगार बाटल्या... अशा जीवाला पिसे लावणाऱ्या रंगीबेरंगी छंदाची फुलपाखरं अंगावर बागडत असायची. या सगळ्यात दारासिंग किंवा त्याचे सिनेमे कुठेच नव्हते. मित्राच्या आग्रहावरून मी दारासिंगचा ‘ठाकूर जर्नेलसिंग’ हा सिनेमा पाहायला अंमळ नाखुशीनेच गेलो. दारासिंगच्या या देमार अशा सुमार चित्रपटात एकदम ‘हम तेरे बिन जी ना सकेंगे सनम हम...’ हे अवीट गोडीचं सुंदर गाणं म्हणताना हेलन पडद्यावर दारासिंगला आळवताना दिसली अन् माझ्या अंगाखांद्यावर दारासिंगच्या चित्रपटाचं फुलपाखरू नकळत अलगद विसावलं. ‘लुटेरा’तलं ‘किसी को पता न चले बात का के है आज वादा मुलाकात का...’ ही आणि अशी असंख्य दारासिंगच्या चित्रपटातील सुमधुर गाणी ऐकण्यासाठी मी त्याचे चित्रपट पाहू लागलो.

असा काहीसा दारासिंगविषयी अस्पष्ट आणि धुसर संदर्भ माझ्या मनात असतांना आपण त्यांच्याशी काय बोलणार आणि ते तरी आपल्याला काय सांगणार असा विचार करतच मी ‘दारा व्हिला’मध्ये दाखल झालो. गेल्या काही वर्षांपासून सर्वच क्षेत्रांत भाकडपणा पसरत चालला आहे. जिवंत, रसरशीत अन् चैतन्यदायी असं नावीन्यपूर्ण काहीच ऐकायला मिळत नाही. तेच ते विचार आणि विविध विषयांवरची मतं आपल्याला वेगवेगळ्या आवाजात ऐकायला मिळतात. दारासिंगनं माझा हा समज खोटा ठरवला. कित्येक वर्षांनंतर सलग अडीच-तीन तास मी एका माणसाला मंत्रमुग्ध होऊन एकाग्रतेने ऐकत होतो. माझ्यासमोर दारासिंग नावाच्या तुफान दंगलीचा रंगीबेरंगी धुरळा उडत होता.

प्रश्न - तुम्ही कधी नापास झाला होता का?

दारासिंग - मला कधी शिकायलाच मिळालं नाही तर नापास काय होणार? आमच्या अख्ख्या गावात फक्त दोनच बी.ए. झालेली माणसं होती. रूढ अर्थानं मी कधीच शाळेत गेलो नाही. माझे आजोबा आणि काका यांना मी लिहावं शिकावं असं वाटत नव्हतं. ते म्हणत, ‘‘शेतात काम करणार्‍या माणसाला शिकून काय करायचं?’’ तरी माझ्या आईनं मला फट्टी म्हणजे मातीनं रंगविलेली पाटी आणि कायदा (बोरू) घेऊन थोडंफार लिहायला शिकवलं.

..................................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी पहा - सर्व प्रकारच्या कट्टरतेला नाकारणाऱ्या ‘इन्शाअल्लाह’ या अभिराम भडकमकर यांच्या बहुचर्चित कादंबरीवरील ‘परीक्षण’ स्पर्धा

..................................................................................................................................................................

प्रश्न - कुस्तीच्या क्षेत्रात तुम्ही कोणाला आदर्श मानता? 

दारासिंग - लहानपणी गावात असल्यापासून माझा किंग काँग हा पहिलवान आदर्श होता. झोपलेल्या वाघाच्या अंगावर एक पाय ठेवून उभ्या असलेल्या भीमकाय किंग काँगचे चित्र मी तासन्तास पाहात असे. पुढे याच किंग काँगला मी हरवलं तो माझ्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा क्षण होता. लाहोरचा गामा पहिलवानही माझा आदर्श होता. लाहोरचा गामा पहिलवानही माझा आदर्श होता. सिंगापूरला मी त्रिलोकसिंग आणि टायगर जोगिंदरसिंग यांना हरवून हिंदुस्थान चॅम्पियनशिप मिळवली, तर लंडनमध्ये लुथेनला जिंकून वर्ल्ड चॅम्पियन झालो. हा माझ्या आयुष्यातला रोमांचक क्षण होता. १९५७च्या आसपासची गोष्ट. माझे गुरु आदर्श गामा पहिलवान खूप आजारी होते. त्यांना पाहायला मी व माझा मित्र रशीद लाहोरला गेलो. आम्हाला पाहून गामांना खूप आनंद झाला. हिंदुस्थानामधील आपल्या वास्तव्यातील अनेक आठवणी सांगताना त्यांचे डोळे भरून आले. मी त्यांना हिंदुस्थानात येण्याचं आमंत्रण दिलं. ‘‘पण देवाची मर्जी असेल अन् शरीराने साथ दिली तरच ते शक्य होईल.’’ असं विषादाने गामा म्हणाले. वयाच्या चौसठाव्या वर्षापर्यंत गामा नेहमीसारखाच व्यायाम व कसरत करीत होते. त्यामुळं त्यांचं शरीर खिळखिळं होत गेलं. पहिलवानाने उतारवयात एवढा व्यायाम करणं योग्य नाही. कारण शरीराची साथ ही साठीनंतरच सुटायला लागते.

प्रश्न - पंडित जवाहरलाल नेहरूंनी तुमची कुस्ती पाहिली होती. त्यावेळच्या ऐतिहासिक क्षणांविषयी काय सांगाल?

दारासिंग - भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना मी पहिल्यांदा १९५६ साली अमृतसर इथे काँग्रेसच्या वार्षिक अधिवेशनाच्या वेळ पाहिले होते. परंतु तेव्हा भेटीचा योग आला नाही. मला त्यांची भेट कुठल्याशा प्रश्‍नावर चर्चा करण्यासाठी नको होती, तर फक्त एकदा ‘नमस्ते’ म्हणून हस्तांदोलन करण्याची मला तीव्र इच्छा होती. नेहरूंचं व्यक्तिमत्त्वच तसं लोभसवाणं अन् सर्वप्रिय होतं. पुढं मग मी वर्ल्ड चॅम्पियनशिपचा किताब जिंकून भारतात आलो, तेव्हा मला नेहरूंना भेटायचं एक चांगलं कारण आयतंच मिळालं. १९५९ साली कॉमन वेल्थ चॅम्पियनशिपचे सामने दिल्ली आणि हैदराबाद येथे चालू होते. ते पाहण्यास नेहरूंनी यावं अशी इच्छा होती. तसंच कुस्त्यांच्या खेळाचे प्रचारक अन् प्रवर्तक मिस्टर गोगी यांचीही नेहरूंना एकदा तरी आयुष्यात भेटावं अशी तीव्र इच्छा होती आणि मलाही त्यांना एकदा नमस्ते करण्याची मनस्वी इच्छा होतीच. त्यामुळे भेटीसाठी मी नेहरूंना पत्र लिहिलं. एका आठवड्यानं नेहरूंच्या सचिवाचा मला फोन आला आणि त्यानं भेटीसाठी वेळ दिली. त्यानुसार मी, माझा भाऊ रंधावा आणि मिस्टर गोगी ठरल्या दिवशी नेहरूंच्या निवासस्थानी पोहोचलो. पंडितजींना भेटायला अन्य बरेच लोक आले होते. मी सचिवांना विचारलं, ‘‘आमची भेट व बोलणं कसं होणार?’’ सचिव म्हणाला, ‘‘तुम्हाला फक्त दर्शनासाठी वेळ देण्यात आला आहे. तरीदेखील मी त्यांना तुमच्याशी बोलण्याविषयी सांगेन.’’ सर्व लोक आपापल्या जागी उभे होते. सर्वांशी हस्तांदोलन करत नेहरू आमच्यापाशी आले. सचिव म्हणाले, ‘‘हे पहिलवान दारा सिंह आणि त्यांचे भाऊ व मिस्टर गोगी.’’ पंडितजींनी माझ्याशी हस्तांदोलन करत मला विचारलं, ‘‘कुठल्या देशांचे दौरे करून आलात?’’ मी उत्तरलो, ‘‘रशिया, ब्रिटन, युरोप आणि कॅनडा आदी देशात दौरे झाले.’’ त्यांनी विचारले, ‘‘आपल्या आणि विदेशी कुस्तीगीरांमध्ये काय फरक जाणवतो?’’ मी म्हणालो, ‘‘तिथल्या कुस्तीगीरांच्या असोसिएशन्स खूप चांगल्या आहेत. त्या सर्वतोपरी खेळाडूंची काळजी घेतात. आपल्या उथं पहिलवानांना स्वत:च आपली काळजी घ्यावी लागते.’’ त्यावर पंडितजी म्हणाले, ‘‘मग तुम्हीदेखील भारतामध्ये अशी संस्था काढा.’’ मी म्हणालो, ‘‘हो. अवश्य प्रयत्न करीन. दिल्लीत सध्या कुस्तीचे सामने चालू आहेत. आपण ते पाहण्यास यावं अशी माझी विनंती आहे. आपण आलात तर कुस्तीगीरांचा उत्साह वाढेल. किमान दहा मिनिटांसाठी तरी आपण यावं.’’ पंडितजींनी विचारलं, ‘‘माझ्या येण्यानं खरंच पहिलवानांचा उत्साह वाढेल का?’’ मी म्हणालो, ‘‘नक्कीच.’’ पंडितजींनी सचिवांशी बोलून दहा मिनिटे येण्याचं कबूल केलं आणि त्यांनी सचिवांना आम्हाला चहा-नाश्ता करून पाठवण्याविषयी बजावलं व ते निघून गेले.

कुस्तीच्या दिवशी पंडितजी, राजीव व संजयसह कुस्ती पाहाण्यास आले. मी आणि माझा भाऊ रंधावा एका बाजूला तर दुसर्‍या बाजूला किंग काँग आणि ऑस्ट्रेलियाचा जीन मर्फी अशी लढत होती. पंडितजी आल्यावर आमची कुस्ती सुरू झाली. आले होते फक्त दहा मिनिटांसाठी, पण तब्बल पन्नास मिनिटे ते अतिशय रंगून कुस्ती पाहात होते. ही कुस्ती मी व रंधावानं जिंकली. पंडितजींना खूप आनंद झाला. कुस्तीनंतर प्रमोटर गोगींनी आम्हाला सांगितलं की, कुस्ती चालू असताना पंडितजींचे सचिव वारंवार त्यांना वेळेची आठवण करून देत होते आणि पंडितजी त्यांना ‘और थोडी देर...’ असं सांगत होते. आम्ही कुस्तीनंतर जेव्हा पंडितजींना गाडीपर्यंत सोडवायला गेलो तेव्हा विजयांच्या घोषणांनी आकाश दुमदुमून गेलं होतं- ‘जवाहरलाल नेहरू की जय...!’, ‘दारासिंग की जय...!’ मॉस्कोमधील स्टेडियमची मला या वेळी आठवण झाली. तिथंही राज कपूर आणि पंडितजींचा असाच जयजयकार होई. माझं मन आनंदून गेलं.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतच्या अनेक ठिकाणी मी कुस्त्या लढलो. सर्व प्रांताच्या, धर्मांच्या रसिकांचं मला भरभरून प्रेम अन् कौतुक मिळालं आणि भारतीयांच्या एकात्मकतेचाही साक्षात्कार झाला.

प्रश्न - कुस्ती हा तुमचा प्राण असताना तुम्ही चित्रपटसृष्टीत कसे आलात? 

दारासिंग - माझा चित्रपटप्रवेश हा एका कुस्तीच्या दृश्याद्वारे १९५४ साली ‘पहिली झलक’ या चित्रपटाद्वारे झाला. त्यात मी हास्यअभिनेता ओम प्रकाशबरोबर कुस्ती खेळलो होतो. ओम प्रकाशच्या डुप्लीकेट होता पहिलवान सौदागर! त्यानंतर मी भगवानदादाच्या एका फिल्ममध्ये कुस्तीचं दृश्य रंगवलं. त्यावेळी मला दोन-चार शब्द बोलायचे होते. पण ते मला काही नीट बोलता आहे नाहीत. दिग्दर्शक वारंवार कट् कट् असं म्हणत चित्रीकरण थांबवीत होता. अखेरीस ते दृश्य कसेबसे संपले. चित्रीकरण संपल्यानंतर हॉटेलवर आल्यावर मी तोच विचार करत होतो. माझं काय चुकलं हे कोणी सांगत नव्हतं. पुढं मी उर्दू, हिंदी भाषा शिकलो. तेव्हा मला भाषेच्या चुका कळल्या. पुढं माझा मित्र हरबंस पहिलवान याने मला ‘‘तू फिल्ममध्ये काम का करत नाहीस?’’ असं विचारलं. ‘‘तुझा चेहरा, शरीर सिनेमात काम करण्यायोग्य आहे. संधी मिळाल्यास तू जरूर काम कर.’’ असा सल्ला दिला. पुढे मी ती गोष्ट हसण्यावारी नेऊन टाळली.

१९६० साली दोन फिल्म निर्माते माझ्याकडे चित्रपटाचा प्रस्ताव घेऊन आले, तेव्हा मला त्याचं बोलणं आठवलं. हे दोन फिल्म निर्माते माझी कुस्ती पाहायला आले आणि त्यांनी मला चित्रपटात काम करण्याविषयी विचारलं. आम्ही तुम्हाला दररोज एक हजार रुपये देऊ. आणि जितके दिवस शुटिंग चालेल तितके पैसे तुम्हाला मिळतील असं सांगितलं. मी त्यांना म्हटलं, ‘‘मुझे तो अॅक्टिंग आती नहीं। क्या मैं काम कर पाऊंगा?’’ त्यांनी टिपीकल फिल्मी भाषेत सांगितलं, ‘‘वो सब हम संभाल लेंगे।’’ ‘हॅरक्युलस’ आणि ‘सॅमसंग’ असे ते दोन चित्रपट होते. पण माझा रिलीज झालेला पहिला चित्रपट होता ‘किंग काँग’. हा माझा पहिला चित्रपट. त्याच्या शुटिंगसाठी मला नैरोबीला जायचे होते. परंतु देवीची लस ही पंधरा दिवसांऐवजी तीन दिवस आधी टोचून घेतल्यामुळे विमानतळावरच्या कर्मचार्‍यांनी मला आठवडाभर ‘क्वॉरनटाईन’मध्ये डांबून ठेवलं. तो आठवडा असाच वाया गेला. नंतर आम्ही आफ्रिकेत जाऊन ‘किंग काँग’चं शुटिंग केलं. देवी शर्मा यांना माझ्याबरोबर लढण्यासाठी एका पहिलवानाची गरज होती. मी त्यांना खुद्द किंग काँगलाच फिल्ममध्ये घेण्यास सांगितले. नाहीतरी ही फिल्म किंग काँगच्या करामती आणि किश्श्यांवर आधारित अशीच होती. माझा हा चित्रपट प्रचंड गाजला अन् माझा चित्रपटसृष्टीत पाय रोवला गेला. पुढं मी चित्रपटनिर्मातादेखील झालो. ‘नानक दुखिया सब संसार’ या माझ्या चित्रपटास चांगलं यश मिळालं. ‘मेरा देश मेरा धर्म’ ही माझी महत्त्वाची फिल्म लोकांना आवडली. चित्रपटाच्या दिग्दर्शनाबरोबरच मी ‘रुस्तुम’ या चित्रपटाचं संवादलेखनदेखील केलं आहे.

..................................................................................................................................................................

आंबेडकरांना सहन करावा लागलेला विकृत व अविचारी वैरभाव या व्यंगचित्रांमधून उघड होतो. त्याचबरोबर ऐतिहासिक अन्याय सहन केलेल्या आंबेडकरांचं वास्तविक चरित्रही उजेडात येतं.

हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये खरेदीसाठी करण्यासाठी क्लिक करा - 

https://www.booksnama.com/book/5282/Hasanyawari-Neu-Naka

..................................................................................................................................................................

प्रश्न - दाराजी तुम्ही मुमताज, हेलन, निशी आणि कुमकुमसारख्या मादक आणि सुंदर नायिकांबरोबर अनेक चित्रपटांत कामं केलीत. तुमच्या आयुष्यात काही रोमँटिक गोष्टी घडल्या की नाही? की तिथेही तुम्ही ‘हनुमान’ बनूनच राहिलात?

दारासिंग - होय. मुमताज, हेलन आदी नट्यांबरोबर मी नायक म्हणून काम केलं. पण माझ्या आयुष्यात अशी रोमँटिक वळणं वगैरे आली नाहीत. मुळात या विषयात मला फारशी रुची नव्हती. माझं सर्व लक्ष कुस्ती आणि कसरती-व्यायाम करण्याकडेच होतं. एकदा एका सिनेमात कुमकुम माझी नायिका होती. ती लाडानं बोलत बोलत माझ्याजवळ येते अणि मी खांद्यानं हलकासा धक्का मारतो असा सीन होता. दिग्दर्शकाने हे दृश्य समजावून सांगितले आणि याची काही रिहर्सलची आवश्यकता नाही असं म्हणून चित्रीकरणाला सुरुवात झाली. टेकच्या वेळी कुमकुम बोलत बोलत माझ्याजवळ आली. तेव्हा मी तिला खांद्यानं हलकासा धक्का मारला तर ती धाडकन दहा फूट लांब फेकली गेली. शुटिंग थांबलं. धाडकन पडल्यामुळे कुमकुमच्या अंगालाही थोडाफार मार लागला. या प्रसंगानंतर माझ्या सर्व नायिका माझ्यापासून दोन हात लांबच राहायला लागल्या.

प्रश्न - कारकीर्दीचे यशस्वी टप्पे दारासिंगच्या वाट्याला आले. आणि त्यात शेवटची भर पडली ती भाजपमध्ये प्रवेश करून राज्यसभेचा खासदार झाल्याची.

दारासिंग - त्याचं असं झालं, पूर्वी मी काँग्रेससाठी कमलनाथ, सुनील दत्त यांचा प्रचार करत असे. पूर्वीची नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्या काळात जी एकसंध अशी काँग्रेस होती, ती नंतरच्या काळात लयाला गेली असं मला जाणवलं. त्या वेळीदेखील मला राज्यसभेचा सदस्य करण्याचे प्रयत्न झाले होते. नंतर मी भाजपमध्ये प्रवेश केला. त्या वेळी सुषमा स्वराज यांनी माझं नाव वाजपेयींना सुचवलं. यावेळीदेखील सुनील गावस्कर आणि क्रीडाक्षेत्रातील अन्य मोठ्या नावांची चर्चा होती. पण अटलजी आणि प्रमोद महाजनांनी माझ्या नावाला पसंती दिली आणि मी खासदार झालो.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

प्रश्न - संसदेत फारशा येत नाहीत किंवा कुठचेच प्रश्‍न मांडत नाहीत असा लतादीदींवर आरोप झाला होता. तुमचा परफॉर्मन्स तुम्हाला कसा वाटतो?

दारासिंग - खरं सांगायचं तर राज्यसभेच्या नामनिर्देशित खासदाराचं कुणी फारसं ऐकत नाही. एकूण तिथं जो गोंधळ, भांडण आणि आरडाओरडा चालतो तो सामान्य माणसाच्या आकलनापलीकडचा आहे. पूर्वी मतभेद असतील तर विरोधी पक्षातील लोक ‘वॉक आऊट’ करून बाहेर जात. आज काय स्थिती आहे हे तुम्ही पाहताच. तरीदेखील मी चित्रपटसृष्टीतील चित्रनिर्मितीच्या खर्चावरील सर्व्हिस टॅक्सच्या संदर्भात, अॅक्सिडेंट झाल्यानंतर प्रथम पोलीस केस आणि नंतर वैद्यकीय उपचार या संदर्भातील विचित्र कायद्याबाबत मी अनेक वेळेला प्रश्‍न मांडले. प्रस्ताव सूचना पाठवल्या. आपल्या ऑलिंपिक कमिटीच्या मनमानी कारभाराविषयी मी आवाज उठवला. या कमिटीच्या बोर्ड मेंबरवर किती वारेमाप खर्च होतो, हे तुम्हाला माहितीच आहे. ऑलिंपिक गेमसाठी भारतातर्फे ७२ खेळाडुंबरोबर कमिटीचे ४७ अधिकारी जातात. पुन्हा गोल्ड मेडल मिळत नाही ते वेगळंच. याबाबत मी लिखित विरोध प्रकट केलेला आहे.

प्रश्न - भाजपचं राजकारण आणि निवडणुकीसाठी केला जाणारा प्रचार हा धर्मनिरपेक्ष आहे असं तुम्हाला वाटतं का?

दारासिंग - प्रत्येकाला आपला धर्म प्यारा असतो व त्याप्रमाणेच त्यानं वागावं. धर्माचा लोक चुकीच्या पद्धतीने वापर करू लागले की, काही वेळा सर्वांसाठी समान नागरी कायदा असावा असं वाटतं. भाजपच्या सडक, पाणी, वीज आणि नद्यांची जोडणी या संदर्भात अनेक चांगल्या व लोकोपयोगी योजना रालोआ सरकारकडे होत्या. पण लोकांना त्यांचं काम पसंत पडलं नाही. आपल्याकडे मतदान करण्याकडे लोकांचा कल नसतो. सर्वांनी जरूर मतदान करावं नाहीतर एक दिवस बदमाषांचं राज्य येईल. मतदानाच्या वेळी मतपेटीबरोबर एक उमेदवारावरचा रोष प्रगट करणारा पेटाराही असावा असं मला वाटतं. लोक आपल्यावर किती नाराज आहेत हे त्यामुळे उमेदवारांना कळेल.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......