‘यसन’ ही ज्ञानेश्वर प्रकाश जाधवर या तरुण लेखकाची कादंबरी. माणसाने काही प्राणी उपयोगीतेसाठी पाळावयास सुरुवात केली. गाय, बैल, म्हैस, रेडे, घोडे, गाढव यांच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टींचा उपयोग केला गेला. गाय, बैल, म्हैस, रेडे यांच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी वेसन उपयुक्त ठरते. ती नाकात घातली जाते. शरीराच्या संवेदनशील भागावर ताण, वेदना देऊन प्राण्यांना नियंत्रणात ठेवण्याचे कसब माणसाने अवगत करून कितीतरी शतके उलटली आहेत!
माणसांना नियंत्रित करण्यासाठी काळानुसार नवनवी साधने निर्माण केली जातात. मानसिक, शारीरिक, आर्थिक, भावनिक नियंत्रणासाठी काळानुसार ही साधने निर्माण केली जातात. माणसे नियंत्रित करून गुलाम बनवली जातात. गुलाम माणसांचे स्वतंत्र अस्तित्व असत नाही. अषा माणसांच्या व्यथा, वेदना फार जीवघेण्या असतात, अस्वस्थ करणाऱ्या असतात.
‘यसन’मधून व्यवस्थेने नियंत्रित केलेल्या, अस्तित्व पुसलेल्या माणसांची दुःखे मांडली आहेत. व्यवस्था बदलण्यासाठी शिक्षण फार महत्त्वाची भूमिका बजावत असते. पण व्यवस्थेनेच शिक्षणप्रणालीवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. सरंजामी मानसिकतेतील भांडवलदार शिक्षणप्रणालीला धंद्याचे रूप देत आहेत. धंदा म्हटलं की, फायदा-तोटा आला. यातून उपयोगिता मूल्य तपासले जाते. जे उपयोगी तेच ठेवले जाते, बाकी नष्ट केले जाते. संवेदना, मूल्यव्यवस्था, मूल्यभान न जपणाऱ्या भांडवली व्यवस्थेकडून उपेक्षितांची पुन्हा कोंडी केली जाते. त्यातून बाहेर पडण्यासाठी पुन्हा संघर्ष केला जातो. व्यवस्था परिवर्तनासाठी पुन्हा उपेक्षित आहुती देतात. व्यवस्था उपेक्षितांचा बळी घेते. या बळी जाणाऱ्या माणसांचे मन, त्यांच्या मनातील धग अस्वस्थ करणारी असते.
१९९०नंतर शिक्षणव्यवस्थेचे नवे भांडवली प्रारूप तयार झाले. उदारीकरण-खासगीकरण- भांडवलीकरणातून समाजाचे शोषण करणारी एक नवी व्यवस्था उदयाला आली. तिने उपेक्षितांच्या शिक्षित झालेल्या पहिल्या पिढीला बटिक बनवले. या पहिल्या पिढीच्या षंढ होण्याची प्रक्रिया ‘यसन’मधून मांडली जाते. उपेक्षितांच्या, कष्टकऱ्यांच्या पहिल्या शिक्षित पिढीच्या गारद होण्याची प्रक्रिया या कादंबरीतून उलगडते.
.................................................................................................................................................................
हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये ऑनलाईन खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5250/Being
.................................................................................................................................................................
पारंपरिक शिक्षणाच्या पदव्या मिळवून व्यवस्थेच्या प्रक्रियेत आत्मविश्वास, आत्मसन्मान हरवून बसलेल्या आजच्या पिढीची ही कहाणी मनाला अस्वस्थ करणारी आहे. उपेक्षितांचा, शोषितांचा शिक्षणव्यवस्थेवरील विश्वास कमी होत आहे. शिक्षणाकडे रोजगार निर्मितीचे साधन म्हणून पाहणारा दृष्टिकोन तयार होत आहे.
पारंपरिक, कौशल्य नसलेले शिक्षण घेतलेल्या अकुशल तरुणांच्या लढण्याची ही कथा आहे. आपण जे शिक्षण घेतले त्याची उपयोगिता काय? त्याचा फायदा काय, असा रोखठोक प्रश्न या कादंबरीतून उभा राहतो. नायक वामन विठ्ठल सोनवणे इंग्रजी एम.ए., नेट-सेट परीक्षा पास आहे. विनाअनुदानित पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम करतो. या नायकाचा संघर्ष म्हणजे ही कादंबरी. ही कादंबरी मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील धानोरा व सोलापूर जिल्ह्यातील बोरगाव खुर्द गावापासून सुरू होऊन पुण्यासारख्या महानगरात येऊन संपते.
दुष्काळी गावातील ऊसतोड मजुराच्या जन्मापासून ते उच्चशिक्षित होण्याचा हा प्रवास अतिशय खडतर, दुःखमय असा आहे. विठ्ठल सोनवणे या ऊसतोड मजुराच्या घरात जन्म घेऊन, नोकरी मिळवून मध्यमवर्गीय होण्याकडे वाटचाल करण्याचा वामनचा प्रवास प्रचंड दु:खदायक, वेदनामय असा आहे. महाराष्ट्रातील साखर कारखान्यातून नवे आर्थिक समृद्ध विश्व उभे राहिले. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये विकासाची बेटे तयार झाली. ही समृद्धी ऊसतोड कामगारांच्या घामावर, रक्तावर पोसली गेली. ऊसतोड कामगारांच्या शोषणातून साखर उद्योगाची भरभराट झाली.
१९७०नंतर महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्याचा विस्तार वाढला. राजकीय मंडळी, बडे भांडवलदार, मोठे शेतकरी यांनी स्वतःचा विकास करून घेतला. या कारखान्यात काम करणारे कामगार, ऊसतोड मजूर, छोटे शेतकरी यांच्या शोषणातून ही व्यवस्था आकाराला आली. यातून ठराविक मंडळी गब्बर झाली. ऊसतोड मजुरांचे आर्थिक, शारीरिक, लैंगिक, भावनिक, मानसिक शोषण केले गेले. मुकादम, श्रीमंत बागायतदार, कारखान्यातील व्यवस्थापन मंडळ, कारखान्यातील साहेब, वाहन चालक-मालक हे सर्व घटक ऊसतोड मजुरांचे शोषण करतात.
कादंबरीच्या पूर्वार्धामध्ये ऊसतोड मजुरांचे दुःख मांडले आहे. जो भोग आपल्या वाट्याला आला, तो भोग आपल्या मुलांच्या वाट्याला येऊ नये असे आई-बापाला वाटते. हे आई-बाप आपल्या मुलाबद्दल स्वप्न पाहतात. ते पूर्ण करण्यासाठी स्वतःचे आयुष्य पणाला लावतात.
विठ्ठल सोनवणे आणि कुसुम सोनवणे हे दाम्पत्य एक स्वप्न पाहते - पुन्हा कोयता जन्माला येणार नाही. शिक्षणाच्या साह्याने आपण या परिस्थितीतून बाहेर पडू, असा विश्वास असणारी ही अडाणी माणसे आहेत. वामनला उभा करण्यासाठी हे दाम्पत्य स्वतःचे आयुष्य खर्ची घालते. ‘यसन’ सोनवणे कुटुंबाच्या दुःखाची गाथा ठरते. शिक्षणातून सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील, असा भाबडा आशावाद ठेवणारी ही माणसे आहेत. वामन पदवी-पदव्युत्तर शिक्षण घेतो. या पदव्या मिळाल्यामुळे आपल्याला नोकरी मिळाली पाहिजे असे त्याला वाटते. वामन ज्या व्यवस्थेत पाय ठेवतो, ती व्यवस्था पोखरली गेलेली आहे. समाजाचा आत्मा असणाऱ्या शिक्षणव्यवस्थेत भ्रष्टाचार मुळापर्यंत पोहोचला आहे.
..................................................................................................................................................................
‘खिंडीत’ : शैक्षणिक जगताच्या अंतरंगाची विरूपता भेदकपणे उलगडणाऱ्या कथा
हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये ऑनलाईन खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5254/Khindit
..................................................................................................................................................................
ऊसतोड मजुराच्या वाट्याला येणारे शोषण नव्या व्यवस्थेत, नव्या रूपात उभे राहिले आहे. ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी व्यवस्था नवा सापळा रचते आहे. या सापळ्यात वामन अलगद सापडतो. त्याचा असह्य कोंडमारा होतो. तो केवळ व्यक्तिगत नसून आजच्या हजारो तरुणांच्या जगण्याचा कोंडमारा आहे. शिक्षणातून आत्मभान येते. आपल्या स्वतःच्या अस्तित्वाचे, शिक्षणाच्या बाजारीकरणाचे, व्यवस्थेच्या षडयंत्रीपणाचे आत्मभान वामनला आले आहे.
वामन स्वतःच्या जगण्याचा आत्मशोध घेतो. त्यातून त्याला व्यवस्थेतील स्वतःचे स्थान दिसते. ही व्यवस्था केवळ आपले शोषण करणार आहे याचे पूरेपूर आत्मभान आलेला वामन विद्रोहाकडे वळतो. स्वतःच्या हक्कासाठी बोटचेपेपणाची भूमिका सोडून लढण्याचा निर्णय घेतो. व्यवस्थेविरुद्ध उभा राहतो. महाविद्यालयाचे व्यवस्थापन मंडळाच्या विरुद्ध उपोषणाचे हत्यार उपसतो. यातून दुखावलेले व्यवस्थापन मंडळ त्याला नोकरीवरून काढून टाकते. लग्न झालेला, पदरात लहान मुले असलेला वामन पुढे कोणता निर्णय घेईल याबद्दलच्या भविष्याच्या अनंत शक्यता मागे ठेवत कलाकृती संपते.
व्यवस्था कायम आहे. ती केवळ रूप बदलते. ऊसतोड मजूर असणाऱ्या विठ्ठल सोनवणे यांचे शोषण करणारी व्यवस्था तीच आहे. व्यवस्था ३० वर्षानंतर त्याच्या मुलाचे वामनचे शोषण नव्या रूपात करते. ऊसतोड मजुराच्या जीवनात अनिश्चितता असते. काहीही होऊ शकते. साप चावून मृत्यू येऊ शकतो, तर कधीही छोट्या-मोठ्या अपघाताने मृत्यु येऊ शकतो. जीवनाची शाश्वती सांगता येत नाही. आज शिक्षण घेतलेल्या वामनच्या जगण्यातही अनिश्चितता भरलेली आहे. नोकरीची कुठलीच खात्री नसलेला वामनचा वर्तमान अनिश्चित आहे, हे फार भयानक असते. उद्याची कोणतीच खात्री सांगता येत नाही. या जीवघेण्या अनिश्चिततेत वामन जीवन जगत राहतो. हे रोजचेच मरण व्यवस्थेने वामनला दिले आहे.
ही केवळ वामनची कथा नाही. गेल्या ३० वर्षांत जागतिकीकरणाच्या रेट्यात उभ्या राहिलेल्या नव्या व्यवस्थेतील अख्ख्या पिढीची ही कादंबरी आहे. भांडवली व्यवस्थेला शह देण्याची ताकद नसलेली नपुंसक पिढी तयार झाली आहे. या पिढीच्या जगण्याला कोणताही बेस नाही. आला दिवस ढकलायचा ही प्रवृत्ती दिसते. विशेषत: शिक्षण व्यवस्थेत कार्यरत असलेल्या माणसांच्या जीवनातील चित्रण या कादंबरीत येते.
वामनच्या वडिलांची पिढी जीवन जगताना अंधश्रद्धा, अज्ञान यांच्या आहारी गेलेली दिसते. वामनला शिक्षणामुळे दृष्टी मिळाली आहे. जीवनाकडे, जीवनातील प्रश्नांकडे पाहण्याची चिकित्सक वृत्ती त्यामध्ये निर्माण झाली आहे. ग्रामीण भागातील कष्टकरी कुटुंबातील नवशिक्षित तरुणाचे जीवन, त्याची विचारप्रक्रिया यावर या कादंबरीतून प्रकाश पडतो.
शिक्षण घेण्यासाठी संघर्ष करावा लागतो. नंतर रोजगारासाठी पुन्हा नवा संघर्ष करावा लागतो. शिक्षणासाठीच्या संघर्षाला शेवट असतो. रोजगाराच्या, जगण्याच्या संघर्षाला शेवट असत नाही. त्यात वामनचे पुढे काय झाले असेल? त्याचा शहरात टिकाव लागला असेल की नाही? हे प्रश्न कादंबरी वाचताना अस्वस्थ करत राहतात.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
आजच्या संघर्ष करणाऱ्या तरुण पिढीला ही कादंबरी अधिक जवळची वाटते. त्यातील वास्तव आपले वाटते. या कादंबरीतून वामनला शिक्षणाच्या प्रत्येक टप्प्यावर मदत करणारी माणसे, संस्था यांचे चित्रण येते. समाजामध्ये सर्व काही नकारात्मक नसून काही चांगल्या गोष्टीसुद्धा आहेत, यावर या प्रकाश पडतो. दुष्काळी पट्ट्यातील वंजारी जातीतील माणसाचे जगणे या कादंबरीच्या केंद्रस्थानी आहे. वंजारी समाजाच्या बोलीभाषेतून ही कादंबरी व्यक्त होते. भाषेतील जिवंतपणा, सहजता कादंबरीला वाचनीय बनवतो.
ऊसतोड मजुराच्या लढण्याची ही कादंबरी आहे. आपल्या नव्या पिढीला शिक्षणातून नव्या संधी मिळतील याबद्दल आत्मविश्वास असणारी पहिली पिढी या कादंबरीतून चित्रित होते. शिक्षण तर घेतले, पण व्यवस्थेने वाट अडवून धरली आहे. या व्यवस्थेशी संघर्ष म्हणजे कपाळमोक्ष होण्याची शक्यता जास्त आहे. ऊसतोड मजुरांच्या रक्तातच संघर्षाचे बीज आहे. बलाढ्य व्यवस्थेविरुद्ध दंड थोपटण्याचे बाळकडू वामनला आपल्या कुटुंबाच्या जीवनसंघर्षातून मिळाले आहे. तो संघर्ष करण्याचा निर्णय घेतो. खाजगी शाळा, महाविद्यालयांमधील ‘वर्क कल्चर’ला नेमकेपणाने मांडणारी ही कलाकृती आहे. शिक्षणाकडे धंदा म्हणून पाहण्याची मानसिकता नव्याने जन्म घेत आहे. फायदा मिळवण्यासाठी मूल्यांना फाट्यावर मारणारी ही प्रवृत्ती सरंजामी, सनातनी आहे. या प्रवृत्तीतून माणसांमध्ये सत्तेचा माज येतो. सर्वसामान्य माणसाला नाडण्याचे धाडस येते. ही प्रवृत्ती शिक्षणव्यवस्थेला संपवून टाकणारी आहे. या व्यवस्थेत सर्वांचे शोषण होते. विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, समाज या सर्वांच्या हातात या नव्या व्यवस्थेने फारसे सकारात्मक काहीच दिलेले नाही. विद्यार्थ्यांकडून भरमसाठ फी घेतली जाते. पालक पैसा कमावण्याच्या नादात घाण्याला जुंपलेल्या बैलासारखे काम करतात. शिक्षकांकडून वेठबिगारी करून घेतली जाते. शिक्षकांच्या नोकऱ्या तात्पुरत्या, अस्थिर झाल्या आहेत. विनाअनुदानित शाळा, महाविद्यालयातील शिक्षकांची अवस्था अत्यंत बिकट आहे.
मुळात आजच्या खाजगीकरणाच्या रेट्यातून उभी राहिलेली शिक्षणव्यवस्था अत्यंत तकलादू आहे. निकृष्ट, कस नसलेले शिक्षण दिले जात आहे. ही सगळी आजची वास्तव व्यवस्था या कादंबरीतून संवेदनशीलपणे मांडली जाते. सरंजामी, मगरूर संस्थाचालक शिक्षणाचा धंदा बंद करून दुसरा सुरू करू शकतात. त्यांच्याकडे प्रचंड भांडवल उभे राहिले आहे. त्यांचे या व्यवस्थेत काहीच बिघडत नाही. पण या व्यवस्थेतील कर्मचारी, शिक्षक यांच्या भविष्याबद्दल केवळ अंधार आहे. या समकालीन वास्तवाच्या विविध कंगोऱ्यांवर कादंबरी अगदी अचूकपणे बोट ठेवते.
मुळात गरीब, कष्टकरी, मजूर, शेतकरी, कामगार यांच्या मुलांनी शिक्षण घेऊच नये, असे येथील सरंजामी मानसिकतेतील नेतृत्वाला वाटते. वामनच्या वडिलांच्या पिढीला स्वतःच्या दुःखाची जाणीव नव्हती. ती नशिबावर हवाला टाकून जगणारी माणसे होती. शिक्षणामुळे नवे भान आले. शिक्षणातून जीवनाचा अर्थ लावता येऊ लागला. प्रश्न पडू लागले. यातून वामनचा कोंडमारा होऊ लागला. अगतिक, असाहाय्य वामन विद्रोहाचे पाऊल टाकतो. ‘शर्यत अजून संपलेली नाही. कारण आम्ही अजून जिंकलो नाही’ असा विचार मांडणारी ही कादंबरी आहे.
२०००नंतर डी.एड.-बी.एड. महाविद्यालये सुरू झाली. पुढील दहा वर्षात ती बंद पडली. संस्थाचालकांनी बंद पडलेल्या महाविद्यालयात नवा व्यवसाय सुरू केला. परंतु या महाविद्यालयात काम करणाऱ्या हजारो शिक्षकांचे पुढे काय झाले असेल, असा प्रश्न कुणाला पडत नाही. दुसरे कोणतेच काम न करू शकणाऱ्या या माणसांचे काय झाले असेल? या माणसांचे या व्यवस्थेत कुठे समायोजन झाले असेल? जगणे हरवून बसलेली ही माणसे या कादंबरीतून येतात. त्यांच्या दुःखाला या कादंबरीतून वाचा फुटते.
.................................................................................................................................................................
हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये ऑनलाईन खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5255/Srujan-Sanwad-bhag-1-ani-bhag-2
..................................................................................................................................................................
अनुदानित संस्थांमध्ये भ्रष्टाचाराचा कळस झाला. शिक्षणासारख्या क्षेत्रात शिक्षकांच्या जागांचा लिलाव सुरू झाला. ज्यांच्याजवळ पैसा नाही परंतु गुणवत्ता आहे, अशी हजारो माणसे जगणे हरवून बसली. दुसरा काही व्यवसाय करण्याची धमक गमवून बसलेली ही माणसे व्यवस्थेचा बळी ठरली. या शैक्षणिक प्रश्नांचे, वास्तवाचे संसूचन ही कादंबरी करते.
ऊसतोड मजूर आणि खासगी शिक्षण संस्थांमध्ये काम करणारे शिक्षक या दोघांच्या जगण्यात साम्य आहे. शोषणाचे नवे मार्ग निर्माण झाले आहेत. साधने आणि साधनांच्या मिळकतीचा प्रश्न तसाच आहे. पैशाच्या अडचणी सारख्याच आहेत. ऊसतोड मजूर, छोटे शेतकरी, कामगार या उपेक्षित वर्गाचे शोषण करणारी व्यवस्था आता नव्या रूपात सज्ज झाली आहे. या व्यवस्थेच्या मुळापर्यंत जाण्याचा वामनचा प्रयत्न अत्यंत भावनिक आहे.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
या कादंबरीची रचना आत्मचरित्रात्मक आहे. ती अत्यंत भावनिक आणि प्रांजळपणे स्वतःला उलगडत जाणारी आहे. हातचे काहीही न ठेवता सगळे संपूर्ण जगणे मांडणारी आणि कृत्रिमतेपेक्षा प्रामाणिक मांडणीला महत्त्व देणारी कादंबरी आहे. तिचे कथानक ओघवत्या शैलीत घडत जाते. व्यक्तिरेखा अत्यंत सजीव, संवेदनशीलपणे चित्रित झाल्या आहेत. घटना-प्रसंग ताकदीने उभे राहतात. तिची भाषाशैली संवादी, बोली रूपातील आहे. मराठवाड्यातील वंजारी समाजाच्या भाषेचे उपयोजन लेखकाने अत्यंत नीटसपणे केले आहे.
‘धंदेवाल्या गाडीवानाच्या हातात यसन गेल्यावर बैलाच्या नाकातोंडातून रगत आल्याशिवाय राहत नाय’ हे सूत्र ही कादंबरी मांडते. यातून मुके प्राणी आणि माणूस यांच्यातील बंध उलगडून दाखवला आहे. बैल आणि नायक यांच्या जगण्यातील अनुबंधाचा खोलवर जाऊन शोध घेतलेला आहे. तो शोध वाचकाला अंतर्मुख करतो. शेवटी वामन ‘यसन’ तोडण्याचा निर्धार करतो, नव्या व्यवस्थेच्या उभारणीला सुरुवात करतो. ‘यसन’ गळून पडलेला नायक शेअर मार्केटच्या बुलसारखा मस्तवाल होणार नाही. पुन्हा उपेक्षित लोकांवर तुटून पडणार नाही. हा बुल नसेल तर हा बळीराजाचा सखा, मित्र असणारा वृषभ असेल. सृजनाच्या उभारणीसाठी खर्ची पडणारा वृषभ नव्या पोशिंद्याच्या भूमिकेत असेल, हा आशावाद पेरणारी ही कादंबरी आहे.
‘यसन’ – ज्ञानेश्वर प्रकाश जाधवर
स्वयंदीप प्रकाशन , पुणे
पाने – २६०, मूल्य – २५० रुपये.
..................................................................................................................................................................
लेखक डॉ. गणपतराव ढेंबरे हे श्री .व्ही.एस. नाईक कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय, रावेर जि. जळगाव इथं सहाय्यक प्राध्यापक आहेत.
dhembregr@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment