पळसाचे सौंदर्य इतके मनोहारी आणि जालीम असते की, ते आपल्या मनाच्या तळात रुतून बसते!
संकीर्ण - ललित
श्रीनिवास जोशी
  • सर्व छायाचित्रे - श्रीनिवास जोशी
  • Thu , 07 January 2021
  • संकीर्ण ललित पळस Palas महाभारत Mahabharat व्यास Vyas अर्जुन Arjun

मी शांतपणे वेताळ टेकडीच्या माथ्यावरून चालत होतो. पळसाचा विचार ध्यानीमनीही नव्हता. कसा असेल? आत्ताशी डिसेंबर संपलेला. अजून काही गवतफुले फुलत आहेत, झुडपे फुलत आहेत. याचा अर्थ जमिनीत अजून पाणी आहे. अशा परिस्थितीत मोठ्या वृक्षांना पाण्याचा ताण कसा बसणार? आणि पाण्याचा ताण बसला नाही तर वृक्षांच्या खोडातून आणि फांद्यातून त्यांची फुले फुटून बाहेर कशी येणार? आत्ताशी हेमंत चालू आहे. अजून शिशिर जायचा आहे. पळस वगैरे वसंतातील खेळ. त्यांचे आत्ताच काय?

चालता चालता मी सहज उजवीकडे पाहिले तर एक पळस फुललेला! टेकडीवरच्या खडकाळ जमिनीतून पाणी लवकर निघून गेले असावे. मी जवळ जाऊन पाहिले दहा-अकरा फुटांचा पळस. त्याच्या सर्वांगावर केशरी फुलांचा वणवा लागलेला.

पळसाच्या कळ्या! डार्क शेवाळी व्हेल्वेटमधून पांढरट केशरी रंग उगवतो आणि मग डार्क केशरी!

मी बघतच राहिलो. डोंगराच्या सर्वांगावर एखाद्या रात्री वणवा लागलेला असेल तर आपण बघत राहतोच ना? त्या केशरी नजरबंदीतून थोड्या वेळाने मी थोडा सावरलो. मला महाभारतातली अत्यंत सुंदर प्रतिमा आठवली.

व्यासांनी वर्णन केले आहे की – ‘युद्धक्षेत्रावर जखमी झालेला अर्जुन फुललेल्या पलाश वृक्षासारखा सुंदर दिसत होता.’ पलाश वृक्षाची फुले आणि अर्जुनाच्या जखमा! जखमी अर्जुन व्यासांना फुललेल्या पळसाप्रमाणे दिसत होता. त्याच्या जखमा त्यांना पळसाच्या फुलांप्रमाणे सुंदर दिसत होत्या. जखमी अर्जुन व्यासांना सुंदर दिसत होता, कारण ते सौंदर्य अतिपराक्रमी पुरुषार्थाचे सौंदर्य होते! शांतपणे वेदना सहन करत, निर्धाराने आणि कौशल्याने शस्त्र चालवत, विजयश्री खेचून आणणाऱ्या पुरुषार्थाचे सौंदर्य. या क्षुद्र मानवी अस्तित्वाला विराट बनवण्याची क्षमता असलेले सौंदर्य!

अर्जुनाच्या जखमांना वेदना लगडलेल्याचे व्यासांना दिसलेले नाही. अस्सल पुरुषार्थातून जन्मलेली उमेद त्या जखमांना लगडलेली त्यांनी पाहिली. म्हणून त्या अद्वितीय जखमा व्यासांच्या प्रतिभेला पलाशपुष्पांप्रमाणे अद्वितीय सौंदर्याने निखरून आल्याप्रमाणे दिसत आहेत.

पळस फुलतो तेव्हा त्याला अजिबात पाने नसतात. ‘पळसाला पाने तीनच’ या म्हणीचा हा अर्थ!

कर्तृत्व असो वा पुरुषार्थातील कृतार्थता - सौंदर्य हेच मानवी जीवनाचे ईप्सित आहे. जीवनात सौंदर्य असेल तरच जीवनात ग्रेस आहे. आणि जीवनात ग्रेस असेल तरच जीवनात अर्थ उरून राहतो. नाहीतर सगळेच व्यर्थ!

पळस सौंदर्याने तापलेला दिसत होता. वृक्षभर लगडलेल्या फुलांचा लख्ख केशरी रंग! सौंदर्य जिवंत झाले होते. पाकळ्यांवर सूक्ष्म पांढरी लव. त्या पांढऱ्या जादूवरून प्रकाशाचे किरण परावर्तित होत होते. त्यामुळे पळसाची फुले स्वयंप्रकाशी आहेत असे वाटत राहिले होते. स्वयंप्रकाशी केशराचे मखमली सौंदर्य! हृदय धडधडायला लागले तो सगळा प्रकार बघून! राल्फ वॉल्डो एमर्सनची एक सुंदर कविता आहे- ‘ओड टू ब्यूटी’ (सौंदर्याचे स्तुति-स्तोत्र). त्या कवितेत तो म्हणाला आहे - 

“Who gave thee, O Beauty,

The keys of this breast,—”

हे सौंदर्य देवते, आमच्या हृदयाच्या किल्ल्या कोणी बहाल केल्या आहेत तुझ्या हातात - आमच्या हृदयाची धडधड कोणी केली आहे तुझ्या हवाली?

पळसाच्या लखलखत्या सौंदर्यामुळे त्याच्या फुलांच्या आकारांकडे काही काळ दुर्लक्ष झाले होते. हळूहळू ते आकार डोळ्यापुढे साकार होत गेले. सौंदर्याने पेटलेल्या केशराच्या ज्योती! एकापुढे एक लगडलेल्या. वरच्या दिशेला झेपावणाऱ्या! पळसाच्या काळ्या-पांढऱ्या लाकडाच्या पार्श्वभूमीवरच काय, या सगळ्या विश्वाच्या अफाट हृदयहीन पसाऱ्यावर उठून दिसणाऱ्या!

त्या सुंदर फुलांच्या आजूबाजूला तेवढ्याच सुंदर कळ्या! पळसाच्या डार्क शेवाळी मखमली कळ्या आणि त्यातून बाहेर येणाऱ्या पांढऱ्या-क्रीमिश पाकळ्या! सौंदर्य तरी किती आकार आणि रंग लेवून उतरते या जगात!

एमर्सन सौंदर्याविषयी लिहितो -

“Guest of million painted forms,

Which in turn thy glory warms!”

(हे सौंदर्या तू आहेस पाहुणा लक्षावधी रंगीत आकारांचा…)

या रंगीत आकारांमधून वाहत राहणारे सौंदर्य आणि त्याची प्रभा उष्ण आहे. कारण हे सौंदर्य जीवनाची उष्णता उराशी धरून जन्माला आलेले आहे. 

एमर्सन पुढे लिहितो -

“Thee gliding through the sea of form,

Like the lightning through the storm...”

(हे सौंदर्या तू वाहत राहतोस आकारांच्या समुद्रांमधून -

हे सौंदर्या, तू वाहत राहतोस जीवनामधून, जशी वीज वाहत राहाते एखाद्या वादळामधून.)

थोडक्यात जीवन नावाच्या वादळामधून जी वीज वाहत राहते, तिचे नाव सौंदर्य!

सौंदर्य हे पळसामधून वाहत आले किंवा दुसऱ्या कुठल्या आकारातून वाहत आले तरी त्याच्या बरोबर जीवनाची उष्णता हवी. जीवनशक्तीच्या विजेचा लखलखाट हवा. सौंदर्य बघणारे कोणी नसेल, किंवा सौंदर्यामधून जीवन जन्मणार नसेल तर सौंदर्याला काय अर्थ उरतो?

पळसाच्या फुलांचा केशरी रंग फॅक्टरीत तयार केला आणि तो फुलांच्या आकारांमध्ये ढाळला तर, जिवंत पळसाला पाहून हृदय धडधडते तसे कुणाचे हृदय धडधडेल काय? जिवंतपणा नसला तर सौंदर्य नसते. एमर्सनला हे चांगलेच कळले होते.

सौंदर्यदेवतेच्या ताब्यात आपल्या हृदयाच्या किल्ल्या असतात याचाच दुसरा अर्थ - सौंदर्य भावनेमध्ये कवितासुद्धा लपलेली असते हा सुद्धा आहे. सौंदर्यात कविता कशी लपलेली असते हे समजून घ्यायचे असेल तर कुसुमाग्रजांची ‘पळस’ ही कविता बघावी लागेल -

मेघांच्या पळसाचा

अस्तावर जाळ

अस्ताच्या कंठात

माणकांची माळ

 

माणकांच्या माळेला

केशराचे पाणी

केशराच्या पाण्यात

बालकवींची गाणी

 

बालकवींच्या गाण्यात

एक उदास पक्षी

पक्षांच्या पंखांवर

श्रावणाची नक्षी

 

श्रावणाच्या नक्षीत

देवळाचे कळस

कळसावर पुन्हा

मेघांचे पळस

कुसुमाग्रज येथे म्हणत आहेत की - पळसाच्या पाकळ्यांवरच्या केशराच्या पाण्यात बालकवींची गाणी लपलेली आहेत.

जी गोष्ट कुसुमाग्रजांची, तीच ना. धों. महानोर यांची.

‘कोणती पुण्ये अशी येती फळाला

जोंधळ्याला चांदणे लखडून जावे’

महानोरांची ‘या नभाने या भुईला दान द्यावे’ ही कविता आम्हाला शाळेतल्या पुस्तकात होती. तेव्हा मला वाटायचे की, जोंधळ्याला चांदणे लखडले आहे म्हणजे कणसात दाणे भरले आहेत. आता वाटते की, जोंधळ्याला चांदणे लखडले आहे म्हणजे कणसातल्या दाण्यांना चांदण्याचे तेज लगडले आहे.

तसे बघायला गेले तर या पळसालासुद्धा कोणाचे तरी लाल-केशरी रंगाचे तेज लगडले आहेच की!

काय बोलावे? पळसाचे सौंदर्य इतके मनोहारी आणि जालीम असते की, ते आपल्या ‘‘मनाच्या तळा’पर्यंत थेट उतरते! व्यासांच्या अंतर्मनात पळसाने नक्कीच स्थान मिळवले होते. काही शंकाच नाही.

केतू या ग्रहाची स्तुती करताना व्यासांना पळस आठवतो. केतू खरं तर काल्पनिक ग्रह आहे. त्यामुळे केतूची प्रतिमा व्यासांना आपल्या मनासमोर कल्पनेने उभी करावी लागली असणार. त्या कल्पनाशक्तीच्या तंद्रीत केतूची प्रभा मनासमोर निर्माण करताना व्यासांना पळस आठवला. ते लिहितात -

पलाशपुष्प संकाशं तारका ग्रह मस्तकं।

रौद्रं रौद्रात्मकं घोरं तं केतुं प्रणमाम्यहं।।

(ज्याची प्रभा पलाशपुष्पाप्रमाणे आहे, त्या केतू ग्रहाला मी प्रणाम करतो.)

सगळा कॉन्शसनेसचा खेळ! सगळा चैतन्याचा खेळ! या जगात अंतिम सत्य नावाचे काही असेल तर ते चैतन्यस्वरूपीच असणार. आणि चैतन्य हे अंतिम सत्य असेल तर सौंदर्य हेसुद्धा सत्यच असणार. सौंदर्याशिवाय दुसरे कुठलेही रूप सत्याने का घ्यावे?

याच अर्थाने जॉन कीट्स म्हणाला आहे -

“Beauty is truth, truth beauty,—that is all

Ye know on earth, and all ye need to know."

(सौंदर्य हेच सत्य आहे आणि सत्य हेच सौंदर्य आहे. मानवाला त्याच्या या पृथ्वीवरचा आयुष्यात फक्त एवढेच कळू शकते.)

आणि, सौंदर्य हेच सत्य कसे आहे हे कळत असेल तर अजून दुसरे काही कळवून घेण्याची गरजच काय आहे म्हणा!

..................................................................................................................................................................

लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.

sjshriniwasjoshi@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......