नरेंद्र भिडे : आपली माणसे म्हणजेच आपले जग असते. त्यातले कोणी निघून गेले की, आपले जग थोडेसे का होईना आपल्यामधून निघून जाते...
संकीर्ण - श्रद्धांजली
श्रीनिवास जोशी
  • नरेंद्र भिडे १० डिसेंबर २०२०
  • Mon , 21 December 2020
  • संकीर्ण श्रद्धांजली नरेंद्र भिडे Narendra Bhide

प्रसिद्ध संगीतकार नरेंद्र भिडे यांचे १० डिसेंबर २०२० रोजी निधन झाले. वयाच्या ४७व्या वर्षी त्यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. या आनंदयात्री मित्राला त्यांच्या एका जिवलग मित्राने वाहिलेली ही श्रद्धांजली.

..................................................................................................................................................................

मी पुणे विद्यापीठात असताना माझा एक केरळी मित्र होता – सी. एम. व्ही. मोहनन. तो फ्रेडरिश नीत्शेचा चाहता होता. एके दिवशी पुणे विद्यापीठाच्या जुन्या कँटीनमध्ये वाचता वाचता मोहनने पुस्तकातून डोके वर काढले आणि तो मला म्हणाला – ‘सी जोशी, व्हॉट नीत्शे सेज अबाउट म्युझिक – ‘विदाउट म्युझिक लाइफ वुड बी अ मिस्टेक!’

हे वाक्य माझ्या लक्षात राहिले. पुढे बबड्या भेटला आणि त्याच्या सहवासात मला त्या वाक्याचा अर्थ जास्त जास्त कळत गेला. बबड्या म्हणजे संगीतकार नरेंद्र भिडे. संगीताशिवाय राहण्याची चूक बबड्याने आयुष्यात एक क्षणसुद्धा केली नसेल! बबड्या रस्त्यावर स्कूटर वगैरे चालवताना दिसला तर ओळख वगैरे दाखवून उपयोग होत नसे. क्लच किंवा ब्रेकच्या लेव्हरवर तो पेटी वाजवत असायचा!!

१९९०च्या दशकातली गोष्ट. कर्वे रोडवर काका हलवाईच्या दुकानाला लागून असलेल्या गल्लीत एका बंगल्यातल्या एका खोलीत मी गिरीश जोशीबरोबर अनेक वेळा गेलो होतो. ती खोली आणि त्या खोलीतील माहोल मला अजूनही आठवतो आहे. एक दोन गाद्या पसरलेल्या. खूपश्या सिगारेटी, कागद-पेन असला ऐवज आणि एक हार्मोनियम. तिथे बबड्या, गिरीश जोशी आणि आशीष मजुमदार एकांकिका, नाटके आणि संगीत अशा गोष्टींवर बोलत बसायचे. एखादी थीम सांगितली जायची, एखादी धून सुचली की वाजवली जायची. इंग्लंडमध्ये सतत पाऊस पडत असतो, तसा त्या खोलीत विनोदाचा पाऊस सतत पडत असायचा!

त्या तिघांनाही बुद्धी, आनंदी जीवनदृष्टी, कला आणि पाहिजे तसे मित्र असे सर्वच लाभले होते. त्यामुळे त्या तिघांच्या खोलीपासून विनोद दूर राहूच शकत नव्हता.

तिघेही इंजिनियरिंगला गेलेले. आशीष थोडासा अभ्यास वगैरे करून एम. ई. झाला, पण बबड्या आणि गिरीश यांच्या मनात अभ्यास वगैरे क्षुद्र गोष्टी करायचा विचार येणे शक्यच नव्हते. संगीत आणि नाटक साथीला असल्यावर अभ्यास वगैरे कोण करेल?

जगण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा वगैरे गोष्टी गरजेच्या असतात हे जरी खरे असले तरी, कला ही त्याहूनही जास्त आवश्यक आणि महत्त्वाची अशी गोष्ट आहे, हे त्या वेळी बबड्या आणि गिरीश यांच्या चेहऱ्यावरून आणि त्यांच्या एकूण जगण्यातून स्पष्टपणे दिसून येत असे.

गिरीशने डिग्री न घेता इंजिनियरिंग सोडले होते. बबड्याने फारसा अभ्यास न करता डिग्री घेतली आणि इंजिनियरिंग सोडले. तसे बघायला गेलं तर या दोन्हीत काय फरक आहे म्हणा!

.................................................................................................................................................................

सृजन-संवाद (भाग १) - गोपाळ अवटी, भाग्यश्री प्रकाशन, कोल्हापूर, पाने - ३८४, मूल्य - ४२५ रुपये.  

सृजन-संवाद (भाग २) - गोपाळ अवटी, भाग्यश्री प्रकाशन, कोल्हापूर, पाने - ३६२, मूल्य - ४२५ रुपये.

हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये ऑनलाईन खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5255/Srujan-Sanwad-bhag-1-ani-bhag-2

..................................................................................................................................................................

गिरीश आणि बबड्या यांनी अन्नवस्त्रनिवाऱ्याकडे लक्ष दिले नाही, तरी त्यांना त्या गोष्टी मिळत गेल्या. सगळ्यांनाच त्या मिळतात, यांना न मिळण्याचे कारण नव्हते. देव कला वगैरे करणाऱ्या त्याच्या मुलांकडे थोडेबहुत लक्ष देतोच की!

दोघांना कलेचे आयुष्य जगायला मिळाले. आनंद दोघांनाही सोडून गेला नाही कधी.

आता बबड्या गेला. वयाच्या सत्तेचाळीसाव्या वर्षी हार्ट अटॅकने अचानक गेला. बातमी आली, तेव्हा पाहिल्या धक्क्यानंतर माझ्या डोळ्यासमोर जर काही आले असेल तर गिरीश, बबड्या आणि आशीषची ती खोली! कला, विनोद, मैत्री, पॅशन आणि आनंद यांनी मंतरलेली ती खोली! मंतरलेल्या आयुष्याचे एक प्रतीक म्हणून ती खोली माझ्या मनात इतकी वर्षं घर करून राहिली आहे!

फार मजा असायची त्या खोलीत! आशीष आणि बबड्या पेटी वाजवत बोलत राहायचे. लताबाईंनी अमूक गाण्यात धैवत असा लावलाय आणि तमुक गाण्यात निषाद तसा लावलाय, अशा चर्चा चालायच्या. ‘रंजिश ही सही’मध्ये मेहदी हसनसाहेबाने कोमल धैवत कसा लावला आहे, हे कुणीतरी गाऊन दाखवायचे! गिरीशला ते दोघे काय बोलत आहेत हे कळत असे. त्याच्या ओठावर फक्त त्याचेच असे स्मित येत असे. मी आपला सिगारेटी ओढत ती सर्व मजा पाहात असे. खरा गंधार लागला की, संगीत कळणाऱ्या लोकांचे नक्की काय होत असेल याचा विचार करत असे. मला सूर वगैरे कळत नाहीत. त्यामुळे मला कानांनी आणि डोक्याने संगीत ऐकता येत नाही. कुठलाही स्वर क्लासी पद्धतीने लागला तर तो हृदयात स्पंदन पावतोच, हे मला पुढे कळले. त्यामुळे हृदयाने संगीत ऐकायची एक पद्धत पुढे मला सापडली. त्यामुळे माझे बरेचसे दुःख कमी झाले. पण तरीही या स्वर कळणाऱ्या लोकांना संगीतातून जास्तीची काही तरी मजा मिळत असणार, असा संशय मला अजूनही आहे.

..................................................................................................................................................................

नरेंद्र भिडे यांची सांगीतिक कारकीर्द

चित्रपट : श्वास, सरीवर सरी, माती माय, मुळशी पॅटर्न, रानभूल, त्या रात्री पाऊस होता, हिप हिप हुरे, पाऊलवाट, अनुमती, दिल-ए-नादान (बायोस्कोप), देऊळ बंद, कलम ३०२, साने गुरुजी, शासन सिंहासन, चौदहवी का चाँद, आंधळी कोशिंबीर, आघात, शेवरी, रमा माधव, एलिझाबेथ एकादशी, यशवंतराव चव्हाण, हरिशचंद्राची फॅक्टरी, मालक, मसाला, समुद्र, चाँद फिर निकला (हिन्दी), सरसेनापती हंबीरराव (आगामी) इत्यादी.

नाटके : हमीदाबाईची कोठी, जोडी तुझी माझी, एक झुंज वाऱ्याशी, कोण म्हणतं टक्का दिला?, माकडाच्या हाती शॅम्पेन, काटकोन त्रिकोण, चिरंजीव आईस, चांदणे शिंपीत जा, गोडी गुलाबी, फायनल ड्राफ्ट, लव्ह बर्डस, व्हाईट लिली अँड नाईट रायडर, अलीबाबा आणि ४० चोर, छापा काटा, आषाढातील एक दिवस, संगीत गर्वनिर्वाण इत्यादी.

मालिका : पेशवाई, नूपुर, अबोली, श्रावण सरी, अवंतिका, फुकट घेतला शाम, उन-पाऊस, साळसुद, घरकुल, मानो या ना मानो, पळसाला पाने पाच, भूमिका, सुर-ताल, कॉमेडी डॉट कॉम, अमर प्रेम इत्यादी.

..................................................................................................................................................................

या तिघांच्या आयुष्याचे गुपित मला सेहवाग बॅटसमन म्हणून पुढे आला तेव्हा कळले. अनकॉम्प्लिकेटेड बॅटिंग! फार विचार नाही. हाणण्यासारखा बॉल आला की, हाणायचा. हाणण्यासारखा नसेल तर नाइलाजाने गप्प बसायचे. टीमचा स्कोअर काय आहे, आपण टिकून राहणे टीमसाठी गरजेचे आहे का? आदल्याच बॉलला आपला कॅच उडाला होता, म्हणून मग पुढचाच बॉल कसा मारायचा, असले भंपक विचार सेहवागच्या मनात बॅटिंग करताना कधी आले नाहीत. या तिघांच्या मनात आयुष्य जगण्याविषयीचे सावध विचार कधी आले नाहीत. आला आनंदाचा बॉल की, हाण आनंदाची सिक्सर!

हेच मंतरलेले आयुष्य हे तिघेही जगत राहिले. यातले कोणीही कधी भेटले आणि वातावरण आनंदी झाले नाही असे कधीच घडले नाही. हे आले की विनोद होणार, चेष्टा होणार, फिदीफिदी हसणे होणार, खदाखदा हसणे होणार. धमाल उडणार, भयंकर मजा तयार होणार.

या तिघांची अजून एक मजा म्हणजे तिघानांही स्वतःविषयी विलक्षण आदर. विनय, नम्रता वगैरे गोष्टी फार चांगल्या असल्या तरी फार बोअर आहेत असे यांचे म्हणणे! 

म्हणजे उदाहरणार्थ - आशीषने एखादी चाल लावली असेल तर तो म्हणत असे – ‘बरं का, मी आज एक अशक्य म्हणजे अशक्य म्हणजे अगदीच अशक्य अशी चाल लावली आहे. म्हणजे अगदी अफलातूनच चाल लावली आहे. तर ती तुम्ही आता नीट बसून वगैरे ऐका! ऐका म्हणजे ऐकाच!!!’

अशी अत्यंत ‘माजखोर’ प्रस्तावना झाली की  बबड्या म्हणत असे – ‘अशक्य चाल लावणं अगदीच शक्य अशी गोष्ट आहे. पण अशक्य चाल म्हणणं तुला शक्य आहे का? साधारणपणे अशक्य चाली गळ्यांना पेलवत नाहीत!’ यावर बबड्या आणि गिरीशच काय पण आशीषसुद्धा फिदीफिदी हसायचा!

त्यावर पेटी पुढे ओढत आशीष म्हणे – ‘ऐका xxxच्यांनो!’

असा सगळा माहोल.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

स्वतःविषयीचा आदर आणि दुसऱ्याविषयीचा अनादर या सगळ्या गोष्टी मजेच्या होत्या. निर्विष होत्या! इथे जीवन म्हणजे मजा होती. मजा हा जीवनाचा पार्ट नव्हता, जीवन हा मजेचा पार्ट होता!

पुढे यांच्यात विवेक बेळेची भर पडली. विवेक बेळे म्हणजे एक वेगळेच आणि अशक्य असे प्रकरण! ज्या गोष्टी या तिघांनी इंजिनिअरिंगकडे दुर्लक्ष करून केल्या, त्या बेळ्याने मेडिकलकडे लक्ष देऊन केल्या. ही गोष्ट मी बबड्याला स्पष्टपणे सांगितली तेव्हा बबड्या शून्यात बघत आणि हसत म्हणाला – ‘तू आम्हा तिघांना अगदी म्हणजे अगदी म्हणजे अगदीच कमीपणा आणला आहेस.’ (खरं तर या तिघांना ‘कमीपणा’ आणण्याची माझी अजिबात इच्छा नव्हती, पण माझाही इलाज नव्हता. नाटकं करत करत बेळ्या चक्क एम डी वगैरे झाला होता.)

या चौघांचे हसणेसुद्धा चार प्रकारचे. बबड्या मनमोकळेपणाने सगळेच्या सगळे दात दाखवत हसायचा. अशीषचे मनमोकळेपणाने गालाची खळी दिसेल असे हसणे, गिरीशचे ओठांच्या कडा मुडपून हसणे आणि बेळ्याचे फक्त डोळ्यातून हसणे!

सगळ्यांचे जगणे मस्त!

कसले कॉम्प्लिकेशनच नाही! गाणे करावेसे वाटले गाणे केले, शिक्षण सोडावेसे वाटले शिक्षण सोडले, नाटक करावेसे वाटले नाटक केले!

अ‍ॅम्बिशनने यांची आयुष्ये कधी काळवंडून गेली नाहीत. लोकांना काय पाहिजे आहे, याचा कसलाही हिशोब यांनी कला करताना कधी केला नाही.

देवसुद्धा असे लोक मुद्दाम तयार करत असावा! सगळ्यांनीच व्यवस्थितपणे इंजिनिअरिंग केले, मान खाली घालून नोकऱ्या केल्या, बॉसला सांभाळत टार्गेट्स पूर्ण केली, दमड्या जोडल्या, हफ्ते फेडत फ्लॅटस केले तर कसे व्हायचे? हे जग सामान्य आणि डल आणि बोअरिंग नाही का होणार? असे ‘ऑफ बीट’ लोक तयारच झाले नाहीत तर, या जगात कला वगैरे श्रेष्ठ प्रकार कोण करणार? मनसोक्त आणि निरामय जीवन कोण जगणार?

ज्याच्या अंगात सातव्या वर्षी कर्नाटकातून पळून जाऊन दिल्ली अमृतसर भागात गायन शोधायची हिंमत असते, तोच ‘भीमसेन जोशी’ होतो!

ज्याला गाणे बोलावते आहे, नाटक खुणावते आहे असे लोक असायला हवेतच की! 

कलावंत दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे भालचंद्र नेमाडे आणि शाम मनोहर यांच्यासारखे मनातल्या दुःखाच्या मातीत कलेचे हिरे शोधणारे; आणि बबड्या-बेळ्यासारखे आनंदाच्या मातीतून कलेची रास उगवून आणणारे.

कोण श्रेष्ठ, कोण कमी हा प्रश्न नाही. एकीकडे कलेचा कॉन्शसनेस जास्त आहे. एकीकडे कलेतली धुंदी जास्त आहे. जीवन ही प्रगतीची मालिका आहे असे म्हटले तर कॉन्शसनेसची कला मोठी. जीवन हा खेळ आहे, जीवन ही एक लीला आहे असे म्हटले तर धुंदीची कला मोठी.

.................................................................................................................................................................

बीइंग – विजय अशोक इंदुशोकाई, आऱ्हान मीडियास्मिथस, नाशिक, पाने – २२२ (हार्डबाऊंड), मूल्य - ३६० रुपये

हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये ऑनलाईन खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5250/Being

.................................................................................................................................................................

माझे वय जसे जसे वाढते आहे, तसे तसे मला धुंदीची कला मोठी असते असे वाटू लागले आहे. कारण, प्रगत होऊन तुम्ही शेवटी आनंदाकडेच जाणार ना? धुंदीकडेच जाणार ना?

माझ्या दोन नाटकांचं संगीत बबड्याने केलं होतं.

बबड्याकडे स्क्रिप्ट द्यायचं. मग बबड्या, दिलेल्या स्क्रिप्टवर संगीताच्या जागा काढायचा. त्याने काढलेल्या जागा पाहिल्या आणि बबड्याकडे चांगल्या प्रतीचा इमोशनल इंटेलिजन्ससुद्धा आहे, हे पहिल्याच नाटकात माझ्या लक्षात आले. आपणच लिहिलेल्या नाटकात संगीताच्या अशा अशा जागा आहेत, हे आपल्याला कसे कळले नाही, असे वाटत राहिले.

नाटक बबड्याकडे देताना मी बबड्यासारखाच माज करत म्हणालो – “बबड्या, एकदम भारीमधलं नाटक लिहिलं आहे मी, तितकंच भारीमधलं संगीत द्यायला जमेल ना तुला?” बबड्या म्हणाला – “भारीच काय पण विलक्षण असं संगीतसुद्धा देता येईल, पण त्यासाठी ३७० व्हायलिन्सचा ताफा लागेल आणि ४७० चेलो आणि चेलो प्लेयर्स लागतील. दोन कोटीपर्यंत तरी बजेट जाईल.” (अतिशयोक्ती अलंकार वापरावा तर बबड्यानेच!) एवढे बोलून झाल्यावर बबड्या गालातल्या गालात हसत म्हणाला – “बजेट काय आहे तुझं संगीताचं?” मी म्हणालो की मला एक सिंथेसायझरसुद्धा परवडणार नाहीये. त्यावर बबड्या हसून म्हणाला – “एका सिंथच्या खाली येता येणार नाही आपल्याला. तू तेवढ्या खर्चाची तयारी ठेव. केवळ मी आहे म्हणून तुला एका सिंथवर विलक्षण संगीत करून देतो, काळजी करू नकोस.”

आणि मग बबड्याने खरंच विलक्षण असं संगीत केलं. मी खुश होऊन गेलो.

टीव्ही सीरियल्स आणि सिनेमाच्या संगीताची रेकॉर्डिंग्ज वगैरे जंजाळातून वेळ काढून बबड्या नाटकाच्या तालमीला हजर राहायचा. संगीत ऑपरेटरला प्रत्येक पीस कसा इन आणि आऊट करायचा ते सांगायचा. अशा वेळी बबड्याच्या चेहऱ्यावर फक्त शांतता आणि आनंद. सगळ्या नट आणि नट्यांच्या चेहऱ्यावर बबड्याविषयीचं कौतुक दाटून यायचं.

बबड्याचं संगीत आलं की, सगळं वातावरण बदलून जायचं. नाटकाची खरी धमाल संगीत आलं आणि त्या संगीतावर तालमी सुरू झाल्या की सुरू होते!

पहिल्या नाटकाचे संगीत झाल्यावर बबड्याला मी ‘थँक यू’ वगैरे म्हटले आणि पैसे किती द्यायचे ते विचारले. बबड्या म्हणायचा- ‘पाच हजार’. माझ्या लक्षात आले की, बबड्याने कसेबसे स्टुडिओच्या भाड्याचे पैसे घेतलेले आहेत. एक सिंथेसायझर वापरून बबड्याने खरखुरे विलक्षण, अफलातून आणि अशक्य म्हणजे अशक्य म्हणजे अशक्य संगीत केले होते आणि पैसे किती घेतले तर पाच हजार! त्याला माहीत होते की, हा पैशासाठी नाटक करत नाहिये. कलेवरचे आणि कला करणाऱ्या माणसांवरचे प्रेम हा कलेचा अविभाज्य भाग आहे, हे बबड्याला कुणी न सांगता कळलेलं होतं. त्याला मैत्रीतलं आणि नात्यातलं संगीतही कळलेलं होतं. संगीत ऐकल्यावर लोकांनी मला विचारले – ‘किती खर्च आला? मी म्हटले बबड्याने पन्नास हजारात केले संगीत.’ लोक म्हणाले – ‘हे संगीत बघता वाटत नाही एवढे स्वस्तात झाले असेल!’

बबड्याने इतकी वाद्यं आणि इतके इफेक्ट्स वापरले होते की, लोकांना वाटत होते - या दोघांनी अख्खा ऑर्केस्ट्रा आणला होता काय रेकॉर्डिंगला! एका सिंथवर बबड्याने खऱ्या सोन्याचं जरतारी संगीत केलं होतं माझ्यासाठी! 

..................................................................................................................................................................

हेही पाहा : तुम्हाला मुस्लीम म्हणून भारतात कसे वाटते? - शफाअत खान

..................................................................................................................................................................

बबड्या गेल्यावर मी आणि आशीष भेटलो, तेव्हा हा किस्सा मी आशीषला सांगितला. तो म्हणाला ‘‘बबड्या आणि ए. आर. रेहमानमध्ये एक साम्य आहे. दोघेही इलेक्ट्रॉनिक्समधले बाप! १९८८ साली बबड्याने त्या वेळी अत्यंत महाग असलेला एन्सॉनिक कंपनीचा सिंथेसायझर आणला होता. त्यावेळी एन्सॉनिकचा एक पीस ए. आर. रेहमानकडे होता आणि दुसरा पीस बबड्याकडे. त्या सिंथेसायझरमध्ये इतकी फंक्शन्स होती की, गिरीश आणि बबड्या यांनी स्वतःला तीन दिवस आणि रात्री एका रूममध्ये कोंडून घेतलं आणि सर्व फंक्शन्स एक एक करून समजून घेतली होती. दोघांनी इंजिनियरिंग सोडलं असलं तरी इंजिनियरिंगने दोघांना सोडलं नव्हतं. ए. आर. रेहमान हासुद्धा चांगला इंजिनिअर आहे. त्यामुळेच तो अरेंजिंगमध्ये कुणाला ऐकत नाही.”

बबड्या आणि गिरीश हे इलेक्ट्रॉनिक्स् आणि कला यांच्यामधला इंटरफेस होते. (गिरीशने १९८८ साली प्रोग्रॅमेबल कॅल्क्युलेटरवर ‘आज का अर्जुन’ नावाचा ‘व्हिडिओ’ गेम तयार केला होता.) गिरीश आणि बबड्या कलेकडे आले नसते तर त्यांनी इंजिनियरिंगमध्ये कल्ला केला असता!

मराठी नाटकात नाटकाचे म्युझिक कळणारे दोनच संगीतकार आहेत असे माझे म्हणणे आहे.  एक अनंत अमेंबल आणि दुसरा बबड्या. नाटकाचे संगीत अ‍ॅग्रेसिव्ह असायला लागते. नुसती सुंदर सुरावट तयार करून उपयोग होत नाही. नाटकाच्या त्या त्या प्रसंगातील इमोशनच्या पार्श्वभूमीवर, झळाळत राहणारे संगीत असावे लागते. ते खऱ्या अर्थाने या दोघांनाच जमते, असे माझे मत आहे. 

बबड्याला स्टुडिओमध्ये पाहणं हा एक आनंद असायचा. समोर सिंथ किंवा पेटी घेऊन बबड्या शून्यात बघत बसलेला असायचा. चित्रकार जसा कॅनव्हासवर रंग वापरून चित्रं काढतो, त्याप्रमाणे आपल्या मनातल्या शांततेच्या कॅनव्हासवर सुरांची चित्रे संगीतकार काढत असतो, असे म्हटले जाते. बबड्याकडे बघून अगदी असेच वाटायचे. मनात आकार घेणाऱ्या अस्फुट अशा सुरांची चित्रे काढण्याच्या प्रयत्नात शून्यात बघणारा बबड्या. थोड्या वेळाने एकदम एखादी सुरावट सिंथ किंवा पेटीवरून ऐकू यायची. चित्राने आकार घ्यायला सुरुवात केलेली असायची… स्फूटाच्या करंज्यातून अस्फूट अवतरू लागलेले असायचे. सृजन सृजन म्हणजे तरी अजून दुसरे काय असते? 

..................................................................................................................................................................

हेही पाहा : ‘झुंड’ : आतून-बाहेरून खरवडणारं नाटक आहे, म्हणून ते (तिकीट काढून) पहावे!

..................................................................................................................................................................

लोक स्वतःची कुचंबणा करून घेऊन जगतात आणि त्या कुचंबणेतच मरून जातात. मानवी जीवनातली ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. म्हणूनच बेंजामिन डिझरेली म्हणाला आहे - “Most people die with their music still locked up inside them.”

बबड्या इतका उत्स्फूर्त आणि मोकळा आणि आनंदी होता की, त्याच्यात संगीत अडकून पडण्याचा प्रश्नच नव्हता. माझ्या मते बबड्या तर अजून पुढचा होता. त्याने आपल्यातले संगीत बाहेर उसळू तर दिलेच, पण ते सगळ्यांना नीट ऐकू यावे म्हणून कित्येक कोटी रुपये उभे करून पुण्यात एक वर्ल्ड क्लास स्टुडिओसुद्धा उभा केला! असा स्टुडिओ मुंबईमध्येसुद्धा नाही. बबड्याने त्या स्टुडिओचे नाव ठेवले होते – ‘डॉन स्टुडिओ’. नाव छोटे असावे म्हणूनच केवळ डॉन हे नाव घेतले गेले होते. त्या स्टुडिओचे खरे नाव – ‘अशक्य झालिंग माज स्टुडिओ’ असे होते! आणि ते नाव मिशीवर ताव देत उच्चारायची सक्ती होती! अशक्य झालिंग इनोसंट माज! 

बबड्या, ना आपल्यातल्या संगीताला एक्सप्रेशन द्यायला घाबरला ना; त्या संगीतासाठी पैसे उभे करायला घाबरला. लोक स्वतःसाठी पैसे उभे करतात. स्वतःतल्या कलेसाठी किती जणांनी पैसे उभे केले असतील?

बबड्याला भाषेतलेसुद्धा संगीत कळत होते. त्याने गंमतीत केलेले पितृपंधरवड्यावरचे शार्दूलविक्रिडित बघा. थोडक्यात सांगायचे तर चाल आहे – ‘आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक’ या कवितेची.

झाला उत्सव भूवरी पसरली आता खरी शांतता ।

जो तो आपुलिया घरी निजतसे खाओ (पिओनी) अता ।।

आता येतिल या इथे शुभतिथी वर्षातल्या पंधरा।

कामे टाकुन थंड लोळत पडा चिंता मनी ना जरा ।।

 

ताशे ढोल न डोलबी न कुठले डीजे ध्वनी ओकिती।

नाही चोर शिपाइ नाहि कुठले नेते न सेलिब्रिटी।।

हे काही नसण्याचि एकच मजा लै ब्येस तब्येतिस।

गोंगाटासम वाळवंटि हिरवे हे शांत ओएसिस।।

महाराष्ट्रात आज अनेक कवी लिहिते आहेत. किती जणांना इतके ‘प्युअर’ शार्दूलविक्रिडित लिहायला जमेल? इतकेच कशाला मराठी कवितेचे गेल्या पंचाहत्तर वर्षातले कवितासंग्रह उघडून बघा - किती ठिकाणी इतके स्लिक शार्दूलविक्रिडित सापडते आहे ते!

..................................................................................................................................................................

हेही पाहा : महाराष्ट्रीय म्हणून ओळखलं जाणं हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच! - इब्राहिम अल्काझी

..................................................................................................................................................................

या कवितेतला प्रसन्न आणि अभिजात विनोद तर अजून दूरची गोष्ट! दुसऱ्या ओळीतील ‘पिओनी’ भोवतीच्या कंसाने किती मजा आणली आहे! एकही मात्रा वाया न घालवता बबड्याने कंस वापरून विनोद केला आहे. कंसाला कसली द्यायची मात्रा! ना लघु ना गुरू! हा बबड्या, आशीष, गिरीश आणि बेळे मधला विनोद! याला खानदानी विनोदबुद्धी असलेल्या लोकांमध्ये ‘केवल विनोद’ असे म्हणायची पद्धत आहे. केवल आनंद ज्यातून जन्म घेतो तो केवल विनोद!

कवितेतलं संगीत, संगीतातले शब्द, जीवनाची अपूर्णता, आणि त्या अपूर्णतेमधून जन्म घेणारा विनोद - असा हा सगळा मामला! एक अत्यंत भारीमधली झिंग आणणारा!

आता एवढ्यात, सगळेजण वयाच्या पन्नाशीकडे झुकायला लागले होते. आता जीवनाच्या आणि मुख्य म्हणजे कलेच्या तत्त्वज्ञानाकडे वळण्याची गरज सगळ्यांनाच जाणवू लागली होती.

मोठा, कोट्यवधी रुपयांचा स्टुडिओ आपण पॅशन म्हणून तयार केला की, अ‍ॅम्बिशन म्हणून असे प्रश्न बबड्या समोर तयार झाले होते. कुणी पैसेवाला पार्टनर बघून, धंद्याचा भाग त्याच्याकडे सोपवून, फक्त संगीताकडे वळण्याची गरज त्याला वाटू लागली होती.

आशीषने ‘सुरांशी संवाद’ नावाचा एक सुंदर लेख लिहिला आहे. त्यात बिस्मिल्ला खान यांच्या मैफिलीचा उल्लेख आहे. त्या मैफिलीत बिस्मिल्ला खान यांचे शिष्य मुख्यत्वेकरून सनई वाजवत होते आणि स्वतः बिस्मिल्ला खान अधूनमधून त्यांच्यात शरीक होत होते. शिष्य तांत्रिकदृष्ट्या परफेक्ट होते. पण खानसाहेब स्वतः सनई वाजवत, तेव्हा सगळे सूर परफेक्ट बनून अवतरत होते. आता बबड्या आणि आशीष यांचा सुरांच्या परफेक्शनशी संवाद सुरू होऊ लागला होता. हे लोक आनंदी तर होतेच, पण आता ‘परमानंद’ काय असेल याचा विचार त्यांच्या डोक्यात सुरू झाला होता.

बिस्मिल्ला खान यांच्या एका मुलाखतीत त्यांनी त्यांच्या रियाझाचा किस्सा सांगितला होता. ते वाराणसीच्या बालाजी मंदिरात पहाटे तीन वाजल्या पासून रियाझ करत. त्या विषयी ते त्या मुलाखतीत म्हणाले होते – ‘उस मंदिर में रियाझ करते हुए हमने जो पाया हैं, ये एक तो हम जानते हैं और दुसरे श्री बालाजी जानते हैं.’

सगळ्या खऱ्याखुऱ्या कलावंतांचा प्रवास या परमानंदाकडेच चालू असतो. बबड्याचा या आयुष्यातला हा प्रवास एवढ्या अचानकपणे का थांबवला गेला हे एक गूढच राहील.

अनावर पॅशनला तत्त्वज्ञानाचे धुमारे फुटण्याच्या वयात बबड्या गेला.

त्याने ‘लोकसत्ता’मध्ये या ‘मातीतील सूर’ हे सदर चालवले होते. त्यात त्याने मराठी संगीतकारांच्या रचनांमधील अनेक रसरशीत सौंदर्यस्थळे उलगडून दाखवली आहेत.

‘अप्सरा आली’ ही अजय -अतुलची पारंपरिक लावणी आहे, पण या लावणीमध्ये त्यांनी नेहमीच्या ढोलकीबरोबर हलगी वापरल्यामुळे ती लावणी नावीन्याने कशी झळाळून उठली आहे – ‘किती किती गोड बाई जसे कमळ उमलले’ या गाण्यात अभिषेकी बुवांनी वॉल्ट्झचा वापर केल्यामुळे ते गाणे कसे अफाट झाले आहे, ‘गुंतता हृदय हे’ ह्या गाण्यात अभिषेकी बुवांनी कशा मनोहारी खोड्या काढल्या आहेत, ‘अवघा तो शकुन’ या गाण्यात किशोरी आमोणकरांनी देवगंधार आणि भूपेश्वरी या दोन रागांचा कसा रम्य संगम साधला आहे, ‘सख्या रे घायळ मी हरिणी’ या गाण्यात भास्कर चंदावरकर हे कल्याण थाटातून पुरिया धनाश्रीमध्ये कसे घुसतात, त्यातून ते तोडीमध्ये कसे घुसतात आणि त्यातून ते कल्याणमध्ये परत कसे येतात - संगीतातल्या सौंदर्याचा हा सगळा अभ्यास बघताना आपण स्तिमित होऊन जातो.

आजही हे सदर ‘लोकसत्ता’च्या साईटवर उपलब्ध आहे. या सदरातील लेख वाचले तर महाराष्ट्र कुठल्या दर्जाच्या संगीत प्रतिभेला मुकला आहे, हे वाचकांच्या लक्षात येईल.

बबड्यासाठी जीवन म्हणजे संगीत होतं, त्याच्यासाठी मरण म्हणजेसुद्धा संगीतच असणार आहे.

लँगस्टन ह्यूजची कविता आहे -

“Life is for the living.

Death is for the dead.

Let life be like music.

And death a note unsaid.”

आयुष्य म्हणजे म्युझिक आणि मरण म्हणजे अनसेड म्युझिक!

लँगस्टन ह्यूजच्या कवितांमध्ये मानवी जीवनाविषयीचे एक सुंदर लाँगिंग दिसून येते. बबड्या, आशीष आणि गिरीशमध्येसुद्धा तेच लाँगिंग दिसते. आनंदापासून फारकत घेणारे हे लोक नाहीत.

काहीही झाले तरी आशीष गात राहील, गिरीश नाटके, सिनेमे असे किडे करत राहील, नेटफ्लिक्ससारख्या चॅनेल्ससाठी इंटरनॅशनल सीरियल्स करत राहील, बेळे त्याची नाटके लिहीत राहील... आणि

बबड्यासुद्धा त्याचे त्याचे स्वतःचे असे म्युझिक करत राहील.

.................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

शांततेच्या एका सुंदर इन्टरेग्नम नंतर मोत्झार्टची सिम्फनी सौंदर्यशाली सुरांनी एकदम एक्सप्लोड होते, तसा बबड्या आपले संगीत घेऊन या विश्वातील अथांग शांततेच्या कॅनव्हास वर पुन्हा एकदा अवतरेल आणि त्याचा हा प्रवास पुन्हा एकदा सुरू करेल. हा त्याचा प्रवास सुरू राहील -  परमानंदाचा - ॐकाराचा तो ‘अल्टीमेट बँग’ त्याच्या हाताला लागत नाही तोपर्यंत! 

असो.

जीवनाचा प्रवास सुरू राहतो हे खरे आहे. प्रवास आणि प्रगती हे दोन्ही सनातन आहेत, हेसुद्धा खरे आहे. असे असले तरी आपण जे जीवन जगलो ते थोडे थोडे करून संपून चालले आहे, ही भावना अशावेळी आपल्याला अस्वस्थ करत राहाते.

बबड्या, माझ्या पिढीतील एक भन्नाट आनंदयात्री होता. त्याचे जाणे खूप खुपते आहे. तो गेल्यामुळे, आपले सगळे जग बदलून गेले आहे असे वाटते आहे. उदास वाटते आहे. आपली माणसे म्हणजेच आपले जग असते. त्यातले कोणी निघून गेले की, आपले जग थोडेसे का होईना आपल्यामधून निघून जाते.

म्हणूनच खालिद शरीफ आपल्या गेलेल्या मित्राविषयी म्हणाला आहे -

बिछड़ा कुछ इस अदा से कि रुत ही बदल गई,

इक शख़्स सारे शहर को वीरान कर गया.

..................................................................................................................................................................

लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.

sjshriniwasjoshi@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......