अजूनकाही
काळोखाच्या गर्भातच असतो सूर्यप्रकाश. लाखमोलाच्या समागमाचा अत्युच्च आनंदही मिळतो काळोखातच. क्रांतीच्या ज्वालाही पेटतात काळोखातच. चराचराला व्यापतो तो अंधार. सृष्टीच्या कणाकणात दडलाय तो अंधार. सर्वव्यापी, शाश्वत असतो तो अंधार. ३६५ रात्री नसत्या, तर कोणाच्या कुशीत माणूस निजला, सुखावला किंवा शांत पहुडला असता? भुईच्या गर्भातील काळोखातच अंकुरतात बीजं. काळोखातच उठतात बायका अन् फिरवतात रहाटगाडगं. आईच्या गर्भात असतोच ना अंधार; म्हणजेच आपला पहिला सामना होतो तो अंधाराशी. मग कसलं भय, भीती, भयग्रस्तता काळोखाशी? नीरव, शांत रात्रींशी? म्हणून कवी, अभिनेता अक्षय शिंपीला आवडतो काळोख! काळोखाच्या छटा. रात्रीच्या गर्भातील स्पर्श मायेचा. ओलावा आपलेपणाचा अन् पांघर मृत्यूचा.
कलेच्या कोणत्याही प्रांतात मुशाफिरी केली असता, दिसतो तो ध्यास उजेडाचा, जन्माचा. पराजय असतो तो काळोखाचा. काळ्याचा. मृत्यूचा. रजनीकांत यांच्या ‘काला’ या चित्रपटात पहिल्यांदा विजय होतो तो काळ्याचा. काळ्या रंगाचा. काळ्या छटेचा. काळ्या रूपाचा. काळ्या गंधाचा.
अक्षय शिंपी यांचा ‘बिनचेहऱ्याचे कभिन्न तुकडे’ हा काव्यसंग्रह वाचत असताना मला चुकल्या- चुकल्यासारखं वाटू लागलं. कारण या संग्रहात काळोख आणि मृत्यूवर अपार प्रेम आहे. साधारणतः आपण ‘उजेडगोष्टी’ गाणारे, जगणारे. उजेडावर, नवनिर्मितीवर प्रेम करणारे. मग मी परत-परत संग्रह वाचू लागलो आणि हळूहळू उमगत गेलं - अक्षय शिंपी यांना सांगायचा तो काळोख आणि गावयाचं मृत्यूगीत.
समाजानं कायमस्वरूपी काळ्याचा तिरस्कार केलाय. साहित्यानेही काळोख बदनाम केलाय. पण आपण सारीच काळी माणसं आहोत. अनादी, अनंत. पांडुरंग काळा. रुक्मिणी काळी. आपले पूर्वज काळे. माती काळी. शेतं काळी. शेतात, मळ्यात, कारखान्यात राबलेली माणसं काळी. काळ्या माणसांच्या काळ्या चळवळी. रानावनात किर्र अंधार असतो. काळ्या मेघांतूनच प्रसवतात पाण्याच्या धारा. शुभ्र आभाळाला कधीच नसतं गर्भारपण. डोहात असतो अंधार. मानवी देहात असतो तो अंधार. पोटातील बाळ वाढतं नऊ महिने नऊ दिवस अंधारात.
.................................................................................................................................................................
बीइंग – विजय अशोक इंदुशोकाई, आऱ्हान मीडियास्मिथस, नाशिक, पाने – २२२ (हार्डबाऊंड), मूल्य - ३६० रुपये
हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये ऑनलाईन खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5250/Being
.................................................................................................................................................................
प्रकाशात दडवाव्या लागतात नको असलेल्या गोष्टी. अंधार झाकून घेतो अलगद उणीदुणी. अंधारात डोळे मिटून घेण्याची गरज नाही. स्व-शोध अंधारातूनच सुरू होतो. उलट प्रखर प्रकाशात मिटून घ्यावे लागतात डोळे. माणसं सातत्यानं प्रकाश शोधतात. त्यामुळे स्व-शोध संपूनच जातो. पण आपण आपल्या आतमधील अंधार पाहिला पाहिजे आणि त्यामधून नव्यानं आत्म्याचा शोध घेतला पाहिजे.
असा काहीसा शोध कवी अक्षय शिंपी यांच्या काव्यात दिसून येतो. काळोख अन् मृत्यूला घेऊन अक्षय प्रश्न विचारतो. काळ्याला, अंधाराला, मृत्यूला आपण सातत्यानं बदनाम करत आलोय, ते का? उलट काळोख, मृत्यू हा अनादी, शाश्वत आहे. प्रश्न विचारणं हेच जिवंत असल्याचं लक्षण आहे. म्हणूनच प्रश्न विचारले पाहिजेत. आजच्या अराजकतेत प्रश्न उपस्थित करणं लाखमोलाचं आहे. आपला मुद्दा उपस्थित केला पाहिजे. राज्यकर्त्यांना, प्रशासनाला प्रश्न विचारले पाहिजेत.
अक्षय शिंपीच्या काव्यात काळोख आणि मृत्यूची वीण असली आणि प्रत्येकच कवितेत काळोखाची व मृत्यूची छाया असली तरी अक्षयची प्रत्येक कविता ही नावीन्य घेऊन येते. एका कवितेवर दुसऱ्या कवितेची पडछाया पडलेली नाही. प्रत्येक कविता स्वतःचा स्वतंत्र ठसा उमटवणारी आहे. त्यामुळे कवितेगणिक आपली आस्वादात्मक भूमिका नोंदवावी लागते.
मरण आणि काळोख यामध्ये साम्य आहे शाश्वततेचं. मरणाला मान्य करून काळोखातूनच स्व-शोध घेतला पाहिजे. स्वतःचं उत्खनन केलं पाहिजे. आपल्यात असलेली अस्तित्वाची आदिम तडफड आपण शोधली पाहिजे. अनेक संस्कृती लयाला गेल्या आहेत. लयाला गेलेल्या संस्कृतींचा आपण सातत्यानं शोध घेत असतो. जे आहे ते एक दिवस नसणार; मग आपण का घाबरतो?
मृत्यू हा सर्वांगसुंदर आहे. शाश्वत आहे. आज अस्तित्वात असलेल्या संस्कृतीच्या पाऊलखुणा आपण नोंदवून ठेवल्या पाहिजेत. कालांतरानं आजचीही संस्कृतीही लोप पावेल, नवी संस्कृती जन्मेल आणि ती पूर्वसंस्कृतीचा शोध घेईल उत्खननातून.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
याचबरोबर स्वउत्खनन केलं पाहिजे. स्वतःमधील रंग, रूप, द्रव्य, आस्वाद, दलदल आपणच शोधली पाहिजे. म्हणूनच ‘व्यसन’ कवितेमध्ये कवी म्हणतो,
पण मी वेगळ्याच कामात
गुंतलेलो असतो,
मी माझ्या शरीराचा द्रोण करून
पाताळातला अंधार पीत असतो
कसोशीनं!
रस्त्याकाठी किंवा उकिरड्यापाशी
फलाटाच्या एका कोपऱ्यात,
किंवा कुठेही गर्दुल्ले नशा करत
असल्याचं पाहिलं असेलच तुम्ही-
नेमका तसाच मी बसलेलो असतो
स्वतःकाठी येऊन-
आणि अंधार भरून घेत असतो घोटाघोटाने!
प्रत्येकालाच नशा असते कशाची तरी. आपण बुडून गेलो असतो नशेत; पण या नशेचं चिंतन सारेच करत नसतात. गुढघ्यात मान खुपसून अंधारात बसून एकट्यानं चिंतन करून स्व-शोध घेणं गरजेचं आहे. एखाद्या अस्वस्थतेत आपण गुरफटलो असलो, तर त्यातून बाहेर पडलो पाहिजे. यासाठी मदत करतो तो अंधार. म्हणजेच उत्खननासाठी मदतीला धावून येतो तो अंधार. खचलो, थकलो, हतबल झालो, हरलो तर अंधार दाटून येतो आणि हाच अंधार नवसृजनाचीही वाट दाखवतो, असं कवीचं म्हणणं आहे. आणि ते अगदी खरंय!
रात्र कवितेत अक्षय म्हणतो-
रात्र पाण्यावर मारलेल्या काठीसारखी
पचवते विजांचे वळ
रात्र घुमत राहते
वार भरल्यागत
रात्र नग्न होते
रात्रीसारखीच.
रात्र निगुतीन नेसवते
काळ कफन
चराचराला
पाणी तुटत नाही तोडल्याने, तशीच रात्रही तुटत नसते. चराचरात समान पसरते. दुःखी, दीनदुबळ्यांची साथ सोडत नसते. ती काळा, गोरा असा भेद करत नसते. साऱ्यांनाच आपल्या कुशीत घेऊन एकवटलेली असते. रात्र निनादत असते, आपले सूर घेऊन. प्रकाशासारखी करत नसते ती भेदभाव. महालात असतो उजेड. पण कधीच साथ सोडत नसतो, अंधार आपल्या वारसांचा.
या काव्यसंग्रहात अंधारापेक्षाही मृत्यूबद्दल अधिक लिहिलं गेलंय. जणू कवीला दिवस-रात्र मृत्यूच्या आराशी दिसत असाव्यात. अतिशय जवळच्या व्यक्तींना गमावल्याचं शल्य असल्यागत. म्हणून किंवा मग मृत्यूच कवीला अद्भुत वाटत असावा. मृत्यूविषयी पहिल्याच काव्यसंग्रहात अक्षय भरभरून बोलतोय. एखाद्या वयोवृद्ध लेखकाने किंवा कवीने मृत्यूचं स्वागत करत, मृत्यूविषयी स्वगत लिहावं तसं. अनेकांगाने अक्षय मृत्यूच्या जवळ जाऊ पाहतो, पण मृत्यू ही त्याला पानगळ किंवा पुनःश्च नवी सुरुवात वाटत नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याला मृत्यू शाश्वत, सत्य, सुंदर, वाटतो. जणू मृत्यूला प्रेमानं आलिंगनच द्यावं.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
इथं अजून एक लक्षात घ्यावं लागतं, ते म्हणजे मृत्यू ही सुटका नाही. जबाबदाऱ्यातून मुक्त होणं नाही. पराजय नाही. तर अक्षयला म्हणायचं की, मृत्यू हादेखील अंधारासारखाच शाश्वत आहे. तो आपल्या आसपास आहे. सारं काही सुटेल, पण मृत्यू नाही. मृत्यू हाच सर्वांना समान रेषेत उभा करतो. मृत्यू हा विषमतेच्या बेड्या तोडतो. मृत्यूच अनादी अनंतकाल विजयश्री असतो.
अक्षय मृत्यूला विविधांगानं बघतो. स्मृती, आजाराचं केंद्र, कब्रस्तान, शवपेटी, मुडदा, मुडदे, श्राद्ध, पिंडदान, महारोग, मरणाची वाट, चितेवर, कफन, कणकेचे पिंड, नामशेष, प्रेतवत, नरडीचा घोट, रक्ताची मेहंदी, पार्थिव, मृत्यूनंतर, मर्डर, अपघात, जगबुडी, रक्ताचे कारंजे, मुक्तीचा आनंद, जहर, आत्महत्या, मयताला, समाधी, जखमा, इ. या प्रकारे अक्षय मृत्यूला विविध कंगोऱ्यातून बघतो.
माझ्यानंतर कुणीही वारस
नसेल
काळा सर्प होऊन
बसेन त्यावर
जगबुडीपर्यंत.
अवघे पार्थिव। आनंदनिधान।
स्पर्श त्याप्रती गा। जहराचा ।।
देहावरी फिरे
मरणाचा हात।
मायस्पर्शाची गा
अनुभूती।।
मृत्यूच्या विविधांगी छटा अलवार, अलगद, हळुवारपणे अक्षय एकएक करत उलगडत जातो. मृत्यूचं आकर्षण असणं आपणही समजू शकतो; पण अक्षयचं मृत्यूप्रेम अगदीच निराळं, आसक्त असं म्हणावं लागेल. वरील ओळीत तो म्हणतो, मृत्यू हा मला मायेच्या स्पर्शाची अनुभूती देतो. आईनंतर जर कुणी मायेनं कुरवाळत असेल तर तो फक्त मृत्यू……
.................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
अंधार, मृत्यू सोडल्यास काही कविता चिंतनीय आहेत. मी अक्षयच्या कवितेला चिंतनीय कविताच म्हणेन. शिवाय अक्षयची कविता स्वतंत्र आहे. या कविता रसग्रहण करत असताना आपल्याला इतर कोणत्याही कवीची आठवण होत नाही. अक्षयवर कोणत्याही पूर्वसुरींचा किंवा समकालीन कवींचा प्रभाव दिसत नाही.
‘असहिष्णूता’ या कवितेमध्ये तो म्हणतो,
ही सनातन हिंसा, साळींदरीच्या तीक्ष्ण काट्यांसारखी
स्थूलपासून सूक्ष्मापर्यंत वेध घेते
मेंदूत चिणून भरलेल्या कट्टरतेत,
असहिष्णुता सुखेनैव तरंगत असते,
जसे गर्भात मूल.
डोळ्यांत असते धुंदी,
मनगटावर स्वार असतो मूलतत्त्ववाद आणि
मुठीत हत्यार….
संपवला जातो थंडपणे
एकएक सिद्धार्थ बुद्ध होण्यापूर्वी…
अशा अनेक कवितांमधून अक्षयची कविता वैचारिकतेच्या खाणाखुणा पेरत येते. अगदी लयदारपणे. प्रमोदकुमार अणेराव सरांची अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रस्तावना या काव्यसंग्रहाला लाभली आहे.
अक्षयच्या शब्दांनीच या रसग्रहणाची इतिश्री करतो- ‘एवढ्या कविता लिहिल्या गेल्या पाहिजेत, की गावोगावच्या, देशोदेशीच्या अन्यायकारक सत्ता हादरल्या पाहिजेत.’
.................................................................................................................................................................
बिनचेहऱ्याचे कभिन्न तुकडे - अक्षय शिंपी, शब्दमल्हार प्रकाशन, नाशिक, पाने – ९०, मूल्य - १८० रुपये.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment