लता मंगेशकर उर्फ लतादीदी यांना ९१व्या वाढदिवसानिमित्त ९१ तोफांची सलामी...
संकीर्ण - पुनर्वाचन
टीम अक्षरनामा
  • लता मंगेशकर उर्फ लतादीदी
  • Tue , 29 September 2020
  • संकीर्ण पुनर्वाचन लता मंगेशकर Lata Mangeshkar लतादीदी LataDeedee

भारताच्या ‘गानगोकिळा’, ‘भारतरत्न’ आणि तमाम महाराष्ट्रीयांच्या ‘लतादीदी’ यांचा काल (२८ सप्टेंबर) ९१वा वाढदिवस होता. त्यांच्याविषयी आजवर अनेक मान्यवरांनी लिहिलं आहे. गेल्या साठ वर्षांत त्यांच्याविषयी कितीतरी लेख, विशेषांक, पुस्तके, कविता प्रकाशित झाल्या आहेत. त्यातील काही निवडक अभिप्राय वेचून तयार केलेले हे ‘लता-नवनीत’. यातून लतादीदींच्या व्यक्तिमत्त्वाचे, त्यांच्या स्वभावाचे, त्यांच्या गाण्याचे, त्यातील त्यांच्या वेगळेपणाचे, वैशिष्ट्यांचे दर्शन घडते... लेखकांची नुसती नावे वाचली तरी किती क्षेत्रांतल्या मान्यवरांनी त्यांच्याविषयी प्रेम, आदर, आपुलकी व्यक्त केली आहे, हे लक्षात येते... चला, तर मग...

..................................................................................................................................................................

१) आशा भोसले – माझी मते आणि तिची मते यांत दोन टोकांचे अंतर आहे. मी रुंद गळ्यांचे ब्लाऊज घालते, तर ती बंद गळ्यांचे. ती सारखीच पांढऱ्या रंगाचा पोशाख करते, तर मला गुलाबी रंग प्रिय. माझ्या तिच्या राहणीत, विचारात फरक आहे. एवढेच काय, मी एकदम फटकळ, तर ती सगळे मनात ठेवणारी. ती बारीक सडसडीत, तर मी चांगली गरगरीत. ती नाजूक, सॅड गाणी गाते, तर मी सगळ्या ढंगांची गाणी गात असते. ती म्हणते, मी कलेसाठी जगते, तर मी म्हणते, कला माझ्यासाठी आहे. सगळे म्हणतात, या दोघीजणी दोन डोळ्यांसारख्या आहेत. दोन डोळे शेजारी, भेट नाही संसारी. पण त्यांना हे माहीत नाही की, दोन डोळ्यांना प्रकाशाची जाणीव देणाऱ्या नसा एकच आहेत आणि जर का एका डोळ्यात काही गेले, तर दुसऱ्यात पाणी येते.

२) शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे – लतादीदी म्हणजे भारताचा अलंकार आहे. कोट्यवधी भारतीय व भारताबाहेरील गानलुब्ध रसिक त्यांचे सूर रोज वेड्यासारखे वेचीत असतात. सारा आसमंत लताच्या सुरांनी धुंद झालेला असतो. अगदी पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत.

३) गंगाधर गाडगीळ – लताचा आवाज ऐकताना नेहमी असा भास होत असतो की, आपण प्रत्यक्ष आवाज ऐकत नसून त्यांचा पडसाद आपल्या कानांत घुमत आहे. तो दुरून कोठून तरी एका अज्ञात पोकळीतून आल्यासारखा वाटतो. पडसादासारखा तो घुमत राहतो; हा त्या आवाजाचाच गुणधर्म आहे की, मायक्रोफोनच्या कुठच्या उपयोगामुळे त्यांना हा गुणधर्म प्राप्त झाला आहे, ते मला माहीत नाही. एवढं मात्र निश्चित की, तिचा आवाज पडसादासारखा असल्यामुळे त्याची मनावर एक विलक्षण मोहिनी पडते.

४) सुधीर फडके – रेकॉर्डिंगची सारी तयारी झाली होती, इतक्यात ‘सजनी’चे दिग्दर्शक बाबूराव पेंटर यांच्या मनात एक कल्पना आली. ‘किस्मत का नहीं दोष बावरे…’ हे गाणं चित्रपटात एका भिकाऱ्याच्या तोंडी होतं. बहुतेक भिकाऱ्यांबरोबर एक लहान मूल अथवा मुलगी असते आणि भिकारी म्हणत असलेल्या गाण्यात ती आपलाही सूर मिळवून देत असते. तेव्हा या गाण्यात फक्त एक ओळ लहान मुलीच्या तोंडी असावी अशी कल्पना बाबूराव पेंटरना सुचली व ते म्हणाले, “बाबूजी, लताबाईंना एक ओळ म्हणायला सांगाल काय?” मी म्हणालो, “काय वेडबिड लागले की काय तुम्हाला? अहो, ती केवढी मोठी, सर्वश्रेष्ठ कलावंत. तिला काय कोरससारखी एक ओळ म्हणायला सांगू? तुमची कल्पना पटतदेखील नाही.” रात्रीचे ९-३० झाले होते. आता एक ओळ म्हणायला मुलगी आणायची कोठून? प्रसंग मोठा बाका होता. बाबूराव पुन्हा आले. “बाबूजी काय करायचं?” त्यांचं पालुपद चालूच होतं. शेवटी मी बिचकत बिचकत लताला विचारलं, आणि तिने पटकन संमती दिली. गाणं सुरू झालं. लताने एक ओळ म्हटली, वेळ निभावून गेली आणि जाता जाता लताचा मोठेपणा सांगून गेली. ‘सोलो सिंगर’ म्हणून अफाट लोकप्रियता मिळत असताना ती प्रथमच अशी कोरसमध्ये गातात तशी गायिली. त्या वेळी ती म्हणालीदेखील, “तुम्ही मला आज कोरस आर्टिस्ट बनवलंत.”

५) रोशन – गाणं लताबाईंच्या नुसत्या कंठातून बाहेर पडत नाही. ते त्यांच्या नसानसांतून वाहत असतं. त्या गायला लागल्या की, मूर्तिमंत गाणंच पुढं उभं राहिल्यासारखं वाटतं. माइकपाशी गाण्यासाठी त्या उभ्या राहिल्या की, हे गाणं त्यांना चढतं. ते ‘हिट’ होणार की, नाही हे त्यांना तेव्हाच कळून चुकतं… शब्द कसे उच्चारावेत, कोठे जास्त भर दिल्याने बहार येईल, याची कमालीची समज लताबाईंना आहे. मेलोडियस गाण्यांना त्यांचा आवाज जास्त योग्य असला तरी त्यांच्या आवाजात एक वेगळेच नाट्य आहे. सगळे सूर एकजात काबूत, त्यामुळे सुरांची त्या अशी काही मजेदार खुलावट करतात की, देहभान हरपावे!

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

६) उषा मंगेशकर – दीदी बाहेरच्या जगात एक अत्यंत प्रसिद्ध अशी व्यक्ती आहे. मोठी कलावंत आहे. बाहेर ती कुठेही गेली तरी सर्वत्र तिला विशेष वागणूक मिळते. पण घरात ती स्वत:चे वेगळेपण कधीही जाणवू देत नाही. थोरली बहीण म्हणूनही नाही, की, मोठी कलावंत म्हणूनही नाही. घरात ती सतत आमच्यातलीच एक असते.

७) वि. स. खांडेकर – मराठी माणसांसंबंधी, मराठी चित्रपट व्यवसायासंबंधी बाईंना कमालीची आत्मीयता आहे. आपली माणसे पुढे यावीत, मराठीचे मराठीपण कायम टिकावे म्हणून त्या सर्वतोपरी प्रयत्न करीत असतात. लताची मराठी वाचनाची आवड दांडगी आहे. परप्रांतीय साहित्यिकांच्या उत्कृष्ट साहित्याशीही तिचा सतत संपर्क आहे. शरश्चंद्र हे तिचे आवडते लेखक. सामाजिक व राजकीय परिस्थितीबाबत तिची निश्चित मते आहेत. समाजाचा एक घटक म्हणून आवश्यक असणाऱ्या सर्व बाबींमध्ये लताला गोडी आहे. कामाचा प्रचंड व्याप सांभाळून या सर्व आघाड्यांशी ती सतत संपर्क ठेवते, हे विशेष आहे.

८) ‘माणूस’ प्रतिनिधी – लता मंगेशकर बोलत आहेत. सूर दूरवर कोठेतरी थबकलेले, तरीदेखील त्यांच्या आवाजाला सुरांचा दिव्य स्पर्श आहे. गेली पंचवीस वर्षं आमच्या जीवनाला याच सुराने व्यापून टाकले आहे. कधी न मावळणाऱ्या या सुरांच्या इंद्रधनुष्याने जीवनाला काही अर्थ असल्याची विलक्षण जाणीव करून दिली आहे. हा सूर अखंडपणे वाहतो आहे, आमच्या रोमारोमांत तो भिनून गेला आहे. लताबाईंनी खूप गायलं आहे आणि त्याहून कितीतरी पटीने ऐकलं आहे. त्यांच्या कानांनी एकच गोष्ट केली आहे, गाणं आणि संगीत ऐकण्याची.

९) सी. रामचंद्र – लताचा आवाज मेलोडियस गाण्यांनाच साजेसा आहे. तशाच गाण्यांमध्ये तिचा आवाज खरा खुलतो, हे खरे आहे. पण ऱ्हिदमिक गाण्यांमध्ये किंवा इतर प्रकारच्या गाण्यांमध्येही लताच्या गाण्याला जो फिनिश असतो, तो इतर कोणामध्येही दिसणार नाही. त्यामुळे त्याची बरोबरी असंभवनीयच आहे.

१०) इंटरनॅशनल स्काला - सर्व जगात जिच्या गाण्यांच्या सर्वांत जास्त रेकॉर्डस आणि टेप रेकॉर्डस झालेल्या आहेत, अशी व्यक्ती म्हणजे लता मंगेशकर नावाची एक ३३ वर्षे वयाची भारतीय स्त्री आहे; याची कुणाला कल्पनाही येणार नाही. केवळ पंचेचाळीस कोटी भारतीयच नव्हे, तर ज्या ज्या आफ्रिकन आणि आशियन देशातून भारतीय चित्रपट दाखविले जातात, अशा सर्व देशांतून तिचे चाहते श्रोते आहेत. (‘इंटरनॅशनल स्काला’, पश्चिम जर्मनीतील एक लोकप्रिय मासिक : डिसेंबर १९६४च्या अंकातून)

११) माधवराव शिंदे – लता मंगेशकरने गाणी मिळावी म्हणून अपार कष्ट केले. परंतु सुरुवातीच्या काळात तेव्हाच्या मान्यवर दिग्दर्शकांनी तिच्या आवाजासंबंधी अनेक तक्रारी केल्या. कोणी म्हणे, आवाज किरटा आहे; तर कोणाला या आवाजात बालिशपणाचा भास होई; परिणामी नकार पदरी येई. परंतु बाईंनी निराश न होता अधिक नेटाने प्रयत्न चालू ठेवले. यशाची पहिली चाहूल ‘मजबूर’ची गाणी मिळाल्यानंतर लागली.

१२) वसंतराव देशपांडे – लताच्या बाबांनीच संगीताचा हा कल्पवृक्ष तिच्यासाठी लावला होता. त्याची जोपासना तिने पुढे केली. पण बीजसंस्कार हा पित्याचा, आणि तोच खोल आणि अवीट असेल तर परिश्रमाने त्यातून वटवृक्ष फुलू शकतो, वाढू शकतो. मास्तरांनी लताला प्रत्यक्ष तालीम कमी दिली असेल, मास्तरांची आणि लताची गायकीही वेगळी असेल, पण ‘सूर’ मास्तरांनी दिला. अगदी लहान वयात हा ‘सूर’ तिच्या काना-मनात, हृदयात खोल रुजला. संगीताच्या वातावरणात ती लहानाची मोठी झाली. याचे मोल फार आहे.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5201/Maay-Leki-Baap-Leki

ई-बुक खरेदीसाठी पहा -

https://www.amazon.in/Maayleki-Baapleki-Marathi-Bhagyashree-Bhagwat-ebook/dp/B08DLGCNXL/

..................................................................................................................................................................

१३) गृहमंत्री, दिल्ली १९६७ – कु. लता मंगेशकर हे अदभुततेचा स्पर्श झालेले भारतीय संगीतसृष्टीचे लेणे आहे. त्यांची गीते ऐकण्याची संधी मला बरेच वेळा मिळाली. शब्द आणि भावना यांना जोडणाऱ्या त्यांच्या मधुर स्वरांतून संगीताची नवी सृष्टी उभी राहते व त्या स्वरांनी रसिकांची हृदये हेलावतात. गीतांतील भावनांचा उत्कट अनुभव येतो. १९६३ सालच्या प्रजासत्ताकदिनानिमित्त दिल्लीस झालेल्या कार्यक्रमाच्यावेळी सीमेवरून परत न आलेल्या सैनिकांच्या स्मृतीचे ‘ये मेरे वतन के लोगों’ हे प्रसिद्ध गीत त्यांनी गायले तेव्हा पं. नेहरूंचे डोळे पाणावलेले मी पाहिले आहेत.

१४) वसंतराव नाईक – श्रीमती लता मंगेशकर यांनी आपल्या गोड गळ्याने अक्षरक्ष लाखो रसिकांना वेड लावले. संगीत कलेचा थोर वारसा लताबाईंना आपले वडील कै. मा. दीनानाथ यांचेकडून मिळाला. कलेच्या सेवेसाठी सर्व कुटुंबाने आपले आयुष्य वाहिल्याचे उदाहरण अगदी विरळा. श्रीमती लता मंगेशकर यांच्या सर्व कुटुंबियांनी गायन कलेच्या क्षेत्रात अत्यंत मानाचे स्थान प्राप्त करून घेतले आहे, ही गोष्ट या कुटुंबास खरोखरच भूषणावह अशी आहे.

१५) शांता शेळके (?) - दीनानाथ आजारी असताना लहानग्या लतेला जवळ घेऊन म्हणाले होते, “तो कोपऱ्यातला माझा तंबोरा, ही उशाशी ठेवलेली चिजांशी वही आणि श्री मंगेशाची कृपा या वेगळे तुला देण्यासारखे माझ्याजवळ काही नाही.” वडलांनी दिलेला हा अदभुत वारसा लताने श्रद्धेने सांभाळला, जोपासला आणि वाढवला. छोट्या लताने आकाशवाणीवर झालेला एक कार्यक्रम ऐकताना अंथरुणाशेजारी बसलेल्या आपल्या पत्नीला डबडबलेल्या डोळ्यांनी आणि गहिवरल्या आवाजाने दीनानाथ म्हणाले होते, “अग, माझा आवाज मी आज ऐकतो आहे.” त्या दीनानाथांचा स्वर – ही लता.

१६) शांता शेळके (?) - लता ही मा. दीनानाथांची सर्वांत थोरली मुलगी. तिच्या जन्माच्या वेळी तिच्या मातुश्री माई इंदूरला आपल्या बहिणीकडे होत्या. तेथे दि. २८ सप्टेंबर १९२९ रोजी शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास लताचा जन्म झाला. जन्मपत्रिकेनुसार ‘ह’ हे अक्षर आले होते. म्हणून ‘हेमा’ हे तिचे नाव ठेवले होते. दीनानाथांनी आपल्या आवडीचे म्हणून ‘हृदया’ असे तिचे नामकरण केले. शिवाय लताच्या पहिल्या मातुश्रींना म्हणजे माईंच्याच थोरल्या बहिणीला एक मुलगी झाली होती. ती नवव्या महिन्यातच निधन पावली. तिचे नाव ललिता ठेवलेले होते. तिची स्मृती म्हणून या नवजात बालिकेचे नावही ‘लता’ ठेवले. 

१७) वि. स. खांडेकर – पार्श्वगायिका म्हणून चित्रपटसंगीताच्या क्षेत्रात लताबाईंनी पाऊल टाकताच त्याच्या अगदी आगळ्या कंठमाधुर्याने आणि कोणत्याही प्रकारचे गाणे त्याला शोभेल अशा ढंगाने म्हणण्याच्या शैलीमुळे संगीतप्रेमी लोक तात्काळ त्यांच्याकडे आकृष्ट झाले. कानन, सुरैया, शमशाद बेगम, नूरजहान वगैरे अनेक गायिका त्यापूर्वी आपापल्या परीने लोकप्रिय होत्या, पण लताबाईंचा या क्षेत्रात उदय होईपर्यंत ते चांदण्यांनी भरलेले आकाश होते. त्याच चंद्रकोर उगवलेली नव्हती!

१८) माई मंगेशकर – लता दहा-अकरा महिन्यांची होती, तेव्हाची एक आठवण अगदी सांगण्यासारखी आहे. त्या वेळी आमचा मुक्काम पुण्याला होता. कशी कोण जाणे तिला माती खाण्याची बुद्धी झाली. मालक तेव्हा सारंगी वाजवत बसले होते. त्यांचे लक्ष गेले. तिला माती खाताना पाहून ते खूप रागावले. अचानक त्यांच्या रागाचे पर्यवसान अश्रू ढाळण्यात झाले. आणि त्यांना रडताना पाहून चिमुरड्या लतानेही सारंगीच्या सुरातच आपला सूर मिसळला. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात ते असे! पुढे सव्वा वर्षांची झाली नाही तो ती ऐकलेली रेकॉर्ड जशीच्या तशी गाऊन दाखवू लागली.

१९) बाळासाहेब देसाई - लताबाई या केवळ महाराष्ट्रीय नव्हेत, केवळ राष्ट्रीय नव्हेत, तर आंतरराष्ट्रीय गायिका आहेत. ‘जागतिक कलाकार’ हे विशेषण स‌‌र्वार्थाने जर आज कोणा भारतीय कलावंताला लागू पडत असेल तर ते लताबाईंनाच. संगीत ही विश्वभाषा आहे. म्हणून श्रेष्ठ संगीतकार हा कोणत्याही एका प्रांताच्या मालकीचा राहू शकत नाही. त्याचे साऱ्या जगाशीच नाते जडलेले असते, जसे लताबाईंनी सर्व विश्वाशी नाते जोडले आहे.

२०) प्रल्हाद केशव अत्रे – मधुर आणि मुलायम आवाज, स्पष्ट आणि अर्थपूर्ण शब्दोच्चार यामुळे लताचे गाणे ऐकणाराचे देहभान गळून पडते. दु:ख, क्लेश, यातना यांना विसरायला लावण्याचे विलक्षण सामर्थ्य लताबाईंच्या स्वर्गीय गळ्यात आहे. जवळजवळ सर्व भारतीय भाषांत गाणी गाऊन त्यांनी आपले दिव्य स्वर कन्याकुमारीपासून ते काश्मीरपर्यंत पोहोचविले आहेत.

२१) भालजी पेंढारकर – लताच्या आवाजाचा, संगीताचा, तिच्या अचूक शब्दफेकीचा, सूर आणि शब्द यांच्या द्वारा ती उभवीत असलेल्या अमृतमय भावविश्वाचा आनंद लुटणारे शेकडो, नव्हे सहस्त्रावधी गानप्रेमी सज्जन तिचे गाणे ऐकतात. आनंदी होतात. ‘वा! ईश्वराची काय देणगी आहे’ असे म्हणतात. आणि तिला अगत्य, आशीर्वाद, शाबासकी यापैकी काहीतरी देऊन पुन्हा आपल्या दैनंदिन उद्योगात मग्न होतात. त्यांच्या दृष्टीने लता म्हणजे फक्त गीत. लता म्हणजे थकल्याभागल्या जीवाचा एक सुंदर विरंगुळा!

२२) शिवाजी गणेशन – लताचा स्वर हा शतकाशतकातून एकदाच निर्माण होणारा स्वर आहे. तसा स्वर पुन्हा सिद्ध होणे अवघड, नव्हे अशक्य आहे.

२३) पंकज मलिक – लताचा गळा अत्यंत गोड आहे, स्वरांची समृद्धी आणि संपन्नता तिच्याजवळ फार मोठी आहे, हे तर खरेच. पण तिचा आवर्जून उल्लेख करण्यासारखा आणखी एक विशेष म्हणजे आवाज हवा तसा वळवण्याचे तिचे असामान्य कसब. या बाबतीत ती केवळ अनन्य आहे, असे म्हणावयास काही प्रत्यवाय नाही. हे वैभव तिला निसर्गात:च लाभले आहे.

२४) दयानंद बांदोडकर – चित्रपटक्षेत्रात वावरत असूनही लताने आपल्या व्यक्तित्वाची जाणीवपूर्वक जोपासना केली आहे. तिच्या स्वभावातील शालीनता समोरच्या व्यक्तीला प्रभावित करते. देशाविषयी, धर्माविषयी जाज्ज्वल्य अभिमान तिच्या रोमारोमात भिनला आहे.

२५) नौशाद – लता ही अत्यंत हळवी आणि संवेदनाशील अशी कलावंत आहे. मी तर म्हणेन की, ती वाजवीपेक्षा अधिक हळवी आहे. त्यामुळे चित्रपटातील वेगवेगळ्या भूमिकांसाठी गाताना त्या त्या भूमिकांच्या भावभावनांशी, सुखदु:खाशी ती चटकन समरस होते. त्याच्या वेदना, व्यथा तिच्या हृदयाला जाऊन भिडतात. कधी कधी या साऱ्याचा फारच तीव्र परिणाम तिच्यावर होतो. कित्येकदा एखाद्या दु:खी गाण्यामागची भूमिका दिग्दर्शक लताला समजावून सांगत असताना तिचे डोळे भरून येताना आणि तिच्या गालांवरून आसवे ओघळताना मी पाहिले आहे.

.................................................................................................................................................................

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं नवंकोरं पुस्तक 

‘मोदी महाभारत’ प्रकाशित झालं...

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

२६) ललिता पवार – लताबाईंकडे पाहिले म्हणजे दोन गोष्टी प्रामुख्याने मनावर बिंबतात, ठसतात. पहिल गोष्ट म्हणजे त्यांचे ते अत्यंत पाणीदार पण नितांत शांत, गंभीर डोळे!... लताबाईंच्या व्यक्तित्वातली मनाला जाणवणारी दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचा अभिजात साधेपणा. इतके अफाट वैभव, दिगंत कीर्ती आणि अपूर्व लोकप्रियता लाभूनही लताबाईंचा सुसंस्कृत साधेपणा तसाच निर्मळ राहिला आहे.

२७) ग. दि. माडगूळकर – लतेच्या स्वरात अलौकिक गोडवा आहे. कुठल्याही रसाचे गाणे तिने गायले तरी ती त्या रसाचा पूर्ण परिपोष साधल्यावाचून राहत नाही. तिने गायलेले प्रत्येक गाणे श्रवणीय होते. कुणाही लतेवरच्या साऱ्या कळ्याची फुले होत नाहीत. या लतेच्या कंठातला प्रत्येक स्वर श्रोत्यांना कानाच्या ओंजळी करून झेलावासा वाटतो. तिचा स्वर म्हणजे चमत्कार आहे.      

२८) सुलोचना – एवढ्या मोठ्या लताबाई या आपल्या आहेत, महाराष्ट्राच्या आहेत या जाणिवेने आपणच कुठे तरी मोठे झालो आहोत असे वाटून मस्तक उंचावते. कुणा काही म्हणो, पण आपल्या माधुर्याने व आर्ततेने ऐकणाऱ्याच्या काळजाचा ठाव घेणारा असा अलौकिक आवाज पूर्वी कधी निर्माण झाला नाही आणि पुढेही होणार नाही.

२९) विश्वनाथ कोल्हापुरे – लतेचे वडील हे माझे मामा. मी त्यांना अप्पा म्हणत असे. ते ज्योतिषावर बोलताना सांगायचे, “विश्वनाथ, लतेच्या पत्रिकेतल्या गुरू, चंद्र, शुक्र, शनि आणि राहू यांच्या शुभयोगामुळे ही मुलगी मोठी कीर्तिवंत होईल.” त्यांचे बोल अक्षरक्ष: खरे ठरले.

३०) दत्ता डावजेकर – पार्श्वगायनातील गुणवत्तेमुळे तर लता सर्व प्रसिद्ध आहेच, पण तिच्या कलेचा आणखी एक तेजस्वी पैलू म्हणजे तिने केलेले संगीत दिग्दर्शन. ‘रामराम पाव्हणं’ या चित्राला प्रथम तिने संगीत दिले. आणि अगदी अलीकडे अवघ्या चार-पाच वर्षांत ‘मोहित्याची मंजुळा’पासून ‘साधी माणसं’पर्यंतच्या चित्रपटातून शुद्ध मराठी वळणाची सुंदर सुंदर गीते तिने जनतेला सादर केली. विशेष म्हणजे अगदी कमी वादक घेऊन तिने हे कौशल्य दाखवले आहे. या संगीताचे वैविध्य आणि वैचित्र्य दीर्घकाळ रसिकांच्या ध्यानी राहील!

३१) कमलनाथ मंगेशकर – एकोणिसशे तेहतीस-चौतीस साल. आम्ही तेव्हा सांगलीला राहत असू. लता असेल तेव्हा सरासरी तीन-चार वर्षांची. या वयाची मुले खेळण्या-बागडण्यात अधिक रमतात, पण लता कधी आपल्या बरोबरीच्या मुलांत खेळत रमून गेलेली आम्हाला पाहायलाच मिळाली नाही. ती बहुधा व्हरांड्यात एकटीच खेळत असे. अशा वेळी अप्पांनी – दीनानाथांनी – तंबोऱ्याची गवसणी काढली, तारा झंकारू लागल्या की, लताने तिकडे धाव घेतलीच म्हणून समजावे. त्यांना गाणे म्हणायला प्रारंभ केला की, लताही गाऊ लागे. अनेकदा तो एवढासा जीव कठीण कठीण चिजा आपल्या गळ्यातून अशा सफाईने साकार करी की, अप्पासुद्धा तिच्याकडे आश्चर्याने बघत राहत.

३२) वि. वा. शिरडवाडकर – माझ्या खोलीतील रात्रीच्या नीरवतेवर किती तरी वेळा लताच्या स्वराने आपले सोनेरी शिक्कामोर्तब केले आहे. परवाच ‘ऐ मेरे वतन के लोगो’ हे गीत असेच ऐकत होतो. पूर्वी अनेक वेळा ऐकलेले. शब्द तर चांगले आहेतच, पण जाणिवेवर आणि भोवतालच्या हवेवर गाढ सोलीव भावनेचा कशिदा काढीत गेला तो त्या गीताचा स्वर.

३३) रविशंकर – अशा तऱ्हेचे अलौकिक प्रतिभावंत खरोखरच दुर्मीळ असतात, कारण त्यांना घडवताना वापरलेला साचा निसर्ग पुन्हा क्वचितच वापरतो. प्रत्येक संगीत दिग्दर्शकाच्या गरजेनुसार आणि कल्पनेनुसार स्वत:ला हवे तसे वळवू शकणारा विलक्षण लवचिक आवाज जसा त्यांना लाभला आहे, त्याप्रमाणेच कोणतेही गीत अत्यंत भावपूर्ण रीतीने कसे म्हणावे आणि त्यातून काळजाला स्पर्श करणारी असाधारण कलाकृती निर्माण व्हावी यासाठी कंप, मृदुता, कारुण्य, लयबद्धता या साऱ्याचा यथाप्रमाण वापर कसा करावा, याचीही एक उपजत समज त्यांना आहे.

३४) उषा मंगेशकर – दीदीबरोबर चित्रपटातली अनेक गाणी मी गाइली आहेत. कलावंत म्हणून तर ती मोठी आहेच. पण सहकारी म्हणून ती फार मदत करणारी आहे. गाण्याचे मर्म समजावून देईल, अनवट जागा स्वत: गळ्यातून काढून दाखवील, शब्दोच्चार चुकत असल्यास ते दुरुस्त करील. अशी ती गाताना पावलोपावली मार्गदर्शन करते. तिच्याबरोबर गाणे म्हणावयाची संधी मिळणे, ही आनंदाची व भाग्याची गोष्ट आहे.

३५) बालगंधर्व – कुमारी लता चित्रपटसंगीतातल्या आपल्या कारकिर्दीची पंचवीस वर्षे पूर्ण करीत आहे, हे ऐकून आश्चर्य आणि आनंद वाटला. या क्षेत्रातली तिची कामगिरी फार मोठी आहे. वडलांनी नाट्यक्षेत्र गाजवले. मुलगी आज चित्रपटक्षेत्रात आपला जमाना गाजवीत आहे.

३६) हिराबाई बडोदेकर – चित्रपटसृष्टीत लताच्या तोडीची दुसरी गायिका नाही. कोणत्या वेळी भावनेचा अचूक परिपोष करावा याची अचूक जाणीव आणि विलक्षण भावपूर्णता यामुळे तिने म्हटलेले कोणतेही गाणे हमखास जमून जाते आणि रंगते.

३७) मास्तर कृष्णराव फुलंब्रीकर – ‘कीचकवध’ या चित्रपटातले ‘धुंद मधुमती रात रे’ हे गीत मुंबईला ध्वनिमुद्रित केले गेले. लताबाई दोन-तीन दिवस या गाण्याची तालीम करीत होत्या. त्यातील गंधाराची तान त्यांनी चटकन आत्मसात केली. या गीताचे ध्वनिमुद्रण झाल्यावर ‘आज आपण प्रभातची आठवण करून देणारे संगीत मला दिले आणि मी ते गाईले’ असे तृप्त मनाने त्या म्हणाल्या.

३८) भीमसेन जोशी – अत्यंत परिणामकारक गाणे म्हणण्याची त्यांची शैली केवळ अजोड आहे. कोणत्याही भाषेतील गीते म्हणताना त्या भाषेला योग्य अशा प्रकारे स्वत:च्या आवाजाला वळण देणे आणि त्या त्या भावानुरूप शब्दोच्चार करणे, या दोन गुणांनी लताबाईंच्या असाधारण लोकप्रियतेला फार मोठा हातभार लावला आहे.

३९) हरिप्रसाद चौरासिया – त्यांच्या संगतीत घालवलेल्या आनंदाच्या क्षणांचा मला कधीही विसर पडणार नाही. त्यांच्या लोकविलक्षण आवाजाइतकाच किंबहुना थोडा अधिकच मधुर असलेला त्यांचा स्वभाव माझ्या मनात कायम ठसून राहिला आहे.

४०) संध्या मुकर्जी – एकोणिसशे एकावन्न साली सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक अनिल विश्वास यांनी दिग्दर्शित केलेल्या एका हिंदी चित्रपटासाठी लताबरोबर द्वंद्वगीत गाण्याची दुर्मीळ संधी मला लाभली होती. सूर्यप्रकाशाने उजळलेली ती सुंदर सकाळ, लताची सुखद संगत आणि तिच्याबरोबर केलेली ती गाण्याची तालीम मी कधीही विसरणार नाही.

.................................................................................................................................................................

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं नवंकोरं पुस्तक 

‘मोदी महाभारत’ प्रकाशित झालं...

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

४१) शिवकुमार शर्मा – लताजींचा मधुर स्वर हे त्यांचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य. हा स्वर स्वप्नाळू आहे, ऐंद्रिय संवेदनांना जाग आणणारा आहे, भावनेने भरपूर आहे, आणि त्यात खास बायकी असा एक ढग, कोवळीक आणि मृदुता आहे.

४२) जितभाई प्र. मेहता – अभिजात, सुसंस्कृत गायिका असे मी लताबाईंचे वर्णन करीन. आजवर त्यांनी हजारो गीते गाइली, घराघरातून संगीताला मानाचे स्थान दिले, आणि गायकांना या समाजात मोठी प्रतिष्ठा मिळवून दिली. आज सर्वत्र संगीतमय वातावरण निर्माण झाले आहे, याचे श्रेय लताबाईंनाच द्यायला हवे.

४३) वामनराव देशपांडे – गेली पंचवीस वर्षे लाखो लोकांना सांगीतिक आनंद आणि सुख देण्याचे कार्य लताबाईंनी अव्याहत केले आहे.

४४) विजय तेंडुलकर – एक मुलगी गाते. रोज गाते. एकसारखी ती गातेच आहे. थांबत नाही. वेळूचे बन असते ना, त्यात वेडे वारे सुटले म्हणजे कसे भणभणत, गुणगुणत, कुजबुजत आणि कधी नुसतेच वणवण राहते – थकले, भागले, - तशी ही गात राहिली आहे असे माझ्या मनात नेहमी येते.

४५) सुधीर फडके – लता मंगेशकर ही केवळ एक व्यक्ती नसून अशी एक दिव्य शक्ती आहे की, जिने आपले स्वत:चेच नव्हे तर साऱ्या देशाचे नाव जगाच्या इतिहासात अमर करून ठेवले आहे.

४६) कुमार गंधर्व – माणसात जशी माणुसकी तसे गाण्यात ‘गाणेपण’ हवे. आणि लताचे कुठलेही गाणे घेतले तरी त्यात हे गाणेपण अगदी शंभर टक्के सापडते. हे प्रभावी गाणेपण लताच्या लोकप्रियतेचे मुख्य मर्म आहे. लताच्या गाण्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिच्या स्वराचा निर्मळपणा आणि निरागसपणा… लताच्या गाण्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिचे नादमय उच्चार.

४७) दिनकर पाटील – फुलपाखरू जसा फुलाफुलांतून मध गोळा करते, त्याप्रमाणे लता संगीताचा मधुगंध कोठे शोधील याचा नेम नाही… कलाक्षेत्रात जगन्मान्य झालेली ही माझी छोटी दीदी महाराष्ट्राचेच नव्हे तर भारताचेही भूषण आहे. शतकाशतकातून एकदाच हे असे भूषण परमेश्वरालाही निर्माण करता येत असावे!

४८) वसंत देसाई – लताबाईंच्या गळ्यातून शोकात्म करुणरसाची गाणी जास्त फुलतात, असा समज आहे. पण माझ्या अनुभवाप्रमाणे लताबाईंची समजूतदार कलावंत दृष्टी ही सर्व रसांत सारख्याच रीतीने कामगिरी बजावते. आणि कोणत्याही भावनेचा वा रसाचा आविष्कार करणाऱ्या गीतातून आपला गळा त्या सारख्याच परिणामकारकतेने फिरवू शकतात.

४९) मिनू कात्रक - या मुलीचा आवाज ध्वनिमुद्रणाच्या दृष्टीने कसा व किती उपयोगी पडेल कोण जाणे, असा तिच्या बाबतीत प्रारंभी मला प्रश्न पडला होता. तोच तिचा आवाज आज ध्वनिमुद्रणाला सर्वांत सोपा आणि सर्वाधिक सहकार्य देणारा असे मान्य करण्यापर्यंत आमची मजल येऊन ठेपली आहे.

५०) मीना खडीकर – दीदीच्या गाण्यासंबंधी मी काय लिहिणार? तिची बहीण म्हणून लिहीत नाही. पण तिच्या आवाजाची, गाण्याची मी फार मोठी भक्त आहे. आमचे एक स्नेही दीदीचे गाणे ऐकून नेहमी म्हणतात, “दीदी म्हणजे संगीतक्षेत्रातील ‘ब्रॅडमन’ आहे.” मीही तेच म्हणते.

५१) सचिनदेव बर्मन – मी संगीतमय वातावरणात वाढलो आहे. असंख्य गायकांशी परिचय करून घेण्याचे, त्यांची गाणी ऐकण्याचे भाग्य मला लाभले आहे. कितीतरी असाधारण सुंदर स्वर माझ्या कानात घुमत आहेत, पण लताच्या आवाजाचा गोडवा, त्याचा लवचीकपणा केवळ अतुलनीय आहे. स्वत:ची अशी खास शैली असलेल्या श्रेष्ठ दिग्दर्शकांच्या आणि गीतकारांच्या रचनांना लताइतका योग्य न्याय क्वचितच कोणी दिला असेल.

५२) गोपाल नीलकंठ दांडेकर – गीत सुरूच होते. अचानक थांबून दीदीने अति करुण स्वरात घातलेली साद ऐकली – “जोगी…!” ज्या मधुर भक्तीसाठी साधक देव पाण्यात घालून बसतात, तिचा ईषत् स्पर्श या हाकेला झाला आहे. या एकाच समर्पित स्वरासाठी योगी जन्मजन्माचे गर्भवास सहन करत असतात.

५३) तलत महमूद – लताजी गायिका म्हणून मला जितक्या थोर वाटतात, त्यापेक्षाही माणूस म्हणून त्या मला आभाळाएवढ्या श्रेष्ठ वाटलेल्या आहेत… लताजींच्या आवाजाबद्दल आणि गायकीबद्दल वेगळे काय बोलावे? अत्यंत कठीण ताना आणि अवघड हरकतीही त्यांच्या गळ्यातून लीलया निघतात. प्रत्येक सूर अगदी सच्चा आणि सुरेल असल्याने ऐकण्यास अतिशय आनंददायक होतो.

५४) गोपाळकृष्ण भोबे – सर्व स्वरालंकारात रसयुक्त भावना आहेत, व त्याचा उपयोग कसा करायचा हे योजनाचातुर्यही लताबाईंजवळ पूर्णांशाने आहे. मात्र करुण आणि शांत रसात त्या विशेष तन्मय होतात. तो त्यांचा पिंडच असावा. पूरब, पंजाब, महाराष्ट्र, दक्षिण इत्यादी प्रांतातल्या गायकींतील पद्धतीची सर्व वैशिष्ट्ये, गेय संगीतातील नखरा वगैरे गुणांचा आविष्कार त्यांच्या गळ्यातून सहजरीत्या होतो.

५५) नर्गिस – आजचे लताजींचे धवल यश, अमाप वैभव आणि त्यांना लाभलेली अमाप जागतिक कीर्ती पाहताना एक आवाज केवढे आधिपत्य गाजवू शकतो, याची प्रचिती येते. त्यांचे हे स्थान हिरावून घेण्याचे सामर्थ्य असलेली गायिका जन्माला यावयास कित्येक युग लागतील. ही अतिशयोक्ती नाही. ‘प्रतिलता’, ‘सवाई लता’ बनवण्याच्या घोषणा मी ऐकते तेव्हा मला हसू येते.

.................................................................................................................................................................

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं नवंकोरं पुस्तक 

‘मोदी महाभारत’ प्रकाशित झालं...

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

५६) वसंत जोगळेकर – लता एक निकोप आणि स्वच्छ मनोवृत्तीची व्यक्ती आहे. तिला समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि स्वार्थ नसला तर ती एक अत्यंत विश्वासू मित्र आहे.

५७) जयश्री गडकर – ‘मोहित्यांची मंजुळा’मध्ये संगीतकार ‘आनंदघन’ यांचे ‘बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला’ हे गीत लताबाईंनी गाइलेले आहे. मला ते रजतपटावर माझ्या कुवतीप्रमाणे साकार करावयाचे होते. प्रत्यक्ष चित्रणाच्या दिवशी माझी प्रकृती अगदीच नरम होती. पण त्या दिवशी ते चित्रण व्हायलाच हवे होते. मी थोड्याशा नाखुशीतच ते गीत ऐकायला लागले आणि काही क्षणांतच माझ्यातील निरुत्साह पार नाहीसा झाला. एका वेगळ्या धुंदीतच मी कॅमेऱ्यापुढे उभी राहिले.

५८) हृदयनाथ मंगेशकर – एकदा मैफलीत भैरवी रंगात आली होती. बडे गुलामअली ठुमरी म्हणत होते. तो शेजारी कुणीतरी रेडिओ लावला आणि ‘कदर जानेना हो कदर जानेना’ हे दीदीचे गाणे लागले. खासाहेबांनी स्वरमंडल खाली ठेवले. म्हणाले, “माशाल्ला, इसे कहते है सही सूर! अब मैं और नहीं गाउंगा.”… हिच्या स्वरातली आर्तता इतकी विलक्षण आहे की, म्हाताऱ्या माणसांनी – अगदी वृंदावनातल्या साधूंनी तिच्या पायाखालची माती डोक्याला लावताना मी प्रत्यक्ष पाहिले आहे.

५९) राजाराम हुमणे – लताबाईंची शेकडो गाणी माझ्या मनात रुंजी घालतात, परंतु माझं मन अधिक भारावून जाते ते भास्करराव तांब्यांच्या कविता त्यांच्या मुखातून ऐकताना. ‘जन पळभर म्हणतिल हाय हाय’ किंवा ‘मावळत्या दिनकरा’ या सारख्या कवितांतील तांब्यांच्या साऱ्या भावना जणू स्वराची लेणी चढवून समूर्त होतात. लताबाईंचे सूर तर समर्थ आहेतच, परंतु स्वरांत कुठलीही कविता सजीव होते, त्याचे कारण वेगळेच आहे. आणि ते म्हणजे लताबाईंची काव्यात्म वृत्ती.

६०) मजरुह सुलतानपुरी – चित्रपटात एखाद्या व्यक्तिरेखेचे स्थान कोणतेही असले आणि तिचा स्वभाव कोणत्याही प्रकारचा असला तरी सैगल आणि नूरजहा आपापल्या विशिष्ट धाटणीनेच सर्व गाणी गात आणि त्या त्या व्यक्तींतील, प्रसंगातील भाववृत्तींची विविधता झाकाळून टाकीत. लता मंगेशकरच्या नवनिर्माणक्षम प्रज्ञेनेच प्रत्येक भूमिकेतील कमी-अधिक सखोलता आणि वेगळेपणा प्रथमत: व्यक्त केला. तिने आपल्या आवाजातील जादूच्या साह्याने असे दाखवून दिले की, चित्रपटातील एखादी भूमिका ही केवळ कवी-लेखकाच्या शब्दांतून साकार होत नसते, तर तिच्या मुलायम स्वराच्या एखाद्याच आरोह-अवरोहातूनही ती मूर्त होते… आमच्या चित्रपटसृष्टीत स्वराची इतकी विविधता असलेला, इतका चपळ आणि इतका जादूने भरलेला आवाज यापूर्वी कधीच प्रकटला नसेल.

६१) चित्रलेखा – लता आज वर्षानुवर्षे गात आहे. जवळजवळ रोज तिची गाणी ध्वनिमुद्रित होत असतात. आणि तरीही ‘लताचे रेकॉर्डिंग’ ही चित्रपटसृष्टीतली एक महत्त्वाची घटना असते. तो एक Event असतो. त्यामुळे तिचे रेकॉर्डिंग असले की, ते ऐकण्यासाठी धंद्यातल्या उत्तमोत्तम तंत्रज्ञापासून तो परदेशी पाहुण्यांपर्यंत आणि चित्रपटनिर्मात्यांच्या नातेवाईकांपासून तो रेकॉर्डिंग आणि लताही कुतूहलाने बघायला येणाऱ्या सर्वसामान्य माणसांपर्यंत अनेक जण येत असतात.

६२) कानन नेहरू – तिच्या स्वराची अनुपम जादू एकदा ताजमहालाच्या सान्निध्यातच माझ्या प्रत्ययाला आली होती. तो मार्च महिना होता. आम्ही सर्वजण आग्ऱ्याला गेलो होतो. चांदणी रात्र होती. संगमरवरी ताजमहाल चांदण्यात न्हात संथ उभा होता. सर्वत्र विलक्षण शांतता पसरली होती. झाडाचे पानदेखील हलत नव्हते. आणि एकाएकी उत्स्फूर्तपणे ही गाऊ लागली. सारे वातावरण स्वरांनी भरून गेले. आम्ही सारेजण स्वरसागरात बुडून आमची तंद्री लागली. ताजची देखभाल करण्यासाठी ठेवलेला सेवकवर्गही भोवती गोळा झाला. समोर मृत्युचे विश्रांतिस्थान. आणि इकडे हिचे विलक्षण चैतन्यमय संगीत. विरोधाने ते दृश्य मनावर अधिकच ठसत होते. सारे जण तिच्या गाण्याच्या प्रभावाने मंत्रमुग्ध होऊन गेले होते.

६३) हेमंतकुमार – लता मंगेशकर हे आता एका व्यक्तीचे नाव राहिलेले नाही. चित्रपटसंगीताच्या इतिहासातील एका कालखंडाचेच ते नाव होऊन बसले आहे. सम्राज्ञीप्रमाणे राज्य भोगलेल्या सुराचे ते नाव आहे.

६४) कल्याणजी – लताजींचा आवाज म्हणजे परिपूर्णतेने धारण केलेले साकार स्वरूप आहे. या लोकविलक्षण आवाजाने लता मंगेशकर ही एक चालती-बोलती दंतकथा बनवली आहे. आमच्या काळात ही दंतकथा प्रत्यक्ष वावरत आहे, हे आपले केवढे भाग्य!

६५) मदनमोहन – लताजींना मी प्रथम पाहिले ते ‘महल’मधील त्यांच्या खूप गाजलेल्या ‘आयेगा आनेवाला’ या गाण्याच्या तालमीच्या वेळी. मी तेव्हा चित्रपटाच्या व्यवसायात अगदीच नवीन होतो. त्या सुरावटीने भारावून मी मनात ठरवून टाकले, “आपण जेव्हा पहिला चित्रपट काढू, तेव्हा पार्श्वगायिका म्हणून लताजींना गाणी म्हणायला बोलवायचे.”

.................................................................................................................................................................

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं नवंकोरं पुस्तक 

‘मोदी महाभारत’ प्रकाशित झालं...

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

६६) ओमप्रकाश कहोल – आजच्या जगातला ‘लता’ हा एक अदभुत चमत्कारच आहे. या शतकात तीन जगज्जेते झाले आहेत असे मी मानतो. एक हिटलर, दुसरा आईन्स्टाईन आणि तिसरी लता मंगेशकर!

६७) सुधा करमरकर – लताताई म्हणजे एक न सुटणारे कोडे आहे. एवढी मोठी कलाकार, पण राहणी अगदी साधी. पांढरे शुभ्र पातळ, कोपरापर्यंत बाह्यांचा पांढरा पोलका, दोन लांबसडक वेण्या, ठसठशीत कुंकू, मोजकाच एखादा दागिना आणि अंगभर पदर – या साधेपणाला साजेसा चेहऱ्यावर सात्त्विक भाव आणि लोभस हास्य. स्वभाव तर इतका प्रेमळ आणि उदार की दुसऱ्यांना किती देऊ नि किती नको असे त्यांना होते.

६८) जयकिशन – वेगवेगळ्या आवाजात गाण्याची लताबाईंची कला केवळ असामान्य आहे. तयार गायकी आणि नाना ढंग निर्माण करण्यात वाकबगार असलेला गळा त्यांच्याजवळ असल्याने आम्ही त्यांचा अनेक प्रकारे उपयोग करून घेतला. लताजींच्या असामान्य कुवतीवर मनातून विश्वासूनच आम्ही अनेक प्रयोग करत गेलो.

६९) सुनील दत्त – लताजींच्या आवाजात एक घरगुतीपणाची छटा आहे. त्या आवाजाने मनात अनेक स्मृती जाग्या होतात, आत्मशोध सुरू होतो, जिवलगाची ओढ वाटू लागते… असा ऐकणाऱ्या व्यक्तीच्या अंतरंगाचा त्या अगदी ठाव घेतात.

७०) रामूभय्या दाते – लताबाईंनी एकदा आपल्या घरी मला शास्त्रीय संगीताच्या काही ‘टेप्स’ ऐकवल्या. ते संगीत त्यांनी स्वत: गाइलेले होते. त्या ‘टेप्स’ ऐकून मी विस्मचकित झालो. असे असामान्य कसब त्यात प्रकट झाले होते. माझ्या मनात आले, “लताताई शास्त्रीय गात नाहीत हे शास्त्रीय गवयांवर त्यांचे खरोखरच उपकार आहेत. एरव्ही, या क्षेत्रांतही त्यांनी आपला असा अधिकार प्रस्थापित केला असता की, इतरांना त्यांची बरोबरी करणे जडच गेले असते.”

७१) सलिल चौधरी – कोणी म्हणतात, लताचे वैशिष्ट्य म्हणजे तिचा सोनेरी स्वर. कोणी म्हणतात, तिचे वैशिष्ट्य म्हणजे तिचे भावपूर्ण उच्चार. पण मला वाटते हे सत्य असले तरी संपूर्ण सत्य नव्हे. कोणतेही गाणे गाताना लता त्याच्याशी आपला आत्मा मिसळून ते गाते. गाण्याशी तिचे होणारे हे सायुज्य हेच तिच्या श्रेष्ठतेचे मुख्य लक्षण आहे.

७२) पु. ल. देशपांडे – संगीतात लयीतला प्रत्येक क्षण हा सुराच्या मजकुराने भरून काढावा लागतो – नव्हे, तिथला सुराचा अभाव असलेला विराम हादेखील बोलका असावा लागतो. चित्रपटासाठी गाइलेल्या साडेतीन मिनिटांच्या गाण्यालादेखील चांगल्या ख्यालगायकाइतकीच लयकारीची जाणीव असावी लागते. लताचा सूर सारेच मानतात, पण निर्म‌ळ मनाने सर्व तऱ्हेच्या संगीताचा आस्वाद घेणारांना जर मंत्रमुग्ध करणारी कुठली गोष्ट असेल तर शब्दाची फेक करताना दिसणारी लताची विलक्षण मोठी अशी लयकारीची जाणीव!... सुराच्या वर्तुळातला मध्यबिंदू पकडणारा आणि लयकारीत वाहत्या काळातला निमिषानिषातला लक्षांश पकडणारा हा लताचा गळा आहे. आणि म्हणूनच तिच्या गीतातले शब्दच नव्हे तर व्यंजमुक्त स्वरही आज किती आशयगर्भ वाटतात!

७३) जयसिंग आबदार (लतादीदींचा ड्रायव्हर) – दीदींबरोबर मी हजारो मैलांचा प्रवास आजवर केला आहे. जी त्यांची गाणी पुढे खूप गाजतात, ती अगदी पहिल्या प्रथम रेकॉर्डिंगच्या वेळी ऐकण्याची दुर्मीळ संधी मला मिळाली आहे. त्यांच्याबरोबर मी जेथे जेथे जातो तेथे तेथे त्यांच्यामुळे मलाही मोठेपणा मिळतो. मेजवान्या मिळतात…. त्यांच्या गाण्यांचा, त्यांच्या अफाट प्रसिद्धीचा, जनतेच्या त्यांच्यावरील प्रेमाचा मला फार अभिमान वाटतो.

७४) उषा मंगेशकर – गाणं तिच्यासाठी सर्वस्व आहे. मी सांगते, दीदीसारखं आता कोणी होणं सर्वस्वी अशक्य आहे. सूर, शब्दफेक, भावना, कुठे श्वास सोडायचा, ताल, लय, माईकपासून किती दूर आहोत, अशा एक ना अनेक गोष्टी – ती गायला लागली की, सारं अपूर्व होऊन जातं. इतकं सगळं कोणात सापडतं?

७५) खय्याम – एक गाणं होतं ते ‘ए दिले नादान’, हे… आजही तुम्ही ते गाणं ऐका आणि पडद्यावर पाहा. तुम्हाला वाटेल की, त्या नायिकेचं जणू मनच गातं आहे. विशेषत: दोन सुरांच्या मधील जागा घेण्याचं त्यांचं कसब हा प्रतिभेचा अदभुत चमत्कार आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

७६) सुनील गावस्कर – आपला कलात्मक, सांस्कृतिक वारसा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणाऱ्या दीदी या खऱ्या अर्थाने उत्कृष्ट राजदूत आहेत.

७७) अनिल मोहिले – दीदींचा स्टेज शो असला की, त्याची सुरुवात होते ती गीतेच्या श्लोकाने. इतकी वर्षं झाली यात कधी बदल झालेला नाहीये. श्लोकानंतर पाच गाणी लागोपाठ त्या गातात… पूर्ण तीन-साडेतीन तासांचा हा कार्यक्रम असतो. जवळपास तीस-बत्तीस गाण्यांपैकी अर्धी-अधिक गाणी त्या गातात, याचंच मला खूप आश्चर्य वाटतं!

७८) मधु मंगेश कर्णिक – माझी पिढी लता मंगेशकरच्या गाण्यांवर आणि गाण्यांबरोबर वाढली… आमच्या दोन पिढ्यांवर तिच्या स्वर्गीय स्वरांनी गारूड केलेलं आहे. महाराष्ट्राचे बालगंधर्व त्या काळच्या तांत्रिक मर्यादांमुळे फक्त महाराष्ट्रात राहिले. परंतु त्यांच्या नंतरचं लता मंगेशकर हे आमचे चिरंतन स्वरधन आता महाराष्ट्र, भारतच नव्हे तर दशदिशांमध्ये पुरून उरलेलं आहे.

७९) बाबुराव सडवेलकर – लताबाईंच्या गाण्यातील मला जाणवलेला महत्त्वाचा गुण म्हणजे त्यांच्या गाण्यातील भावपूर्णता. कुणाच्याही हृदयाला जाऊन भिडण्याची ताकद त्यांच्या गाण्यात आहे. आमच्या चित्रकलेच्या भाषेत तंत्रदृष्ट्या परिपूर्ण असलेल्या चित्रात जर चैतन्य नसेल तर सारंच व्यर्थ आणि हे चैतन्य म्हणजे कलावंताचं कवीमन! लताबाईंना हे कवीमन लाभलं आहे. म्हणूनच त्यांच्या गाण्यात एक वेगळी भावपूर्णता आहे.

८०) प्रमोद नवलकर – १९४७ साली हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशोदेशीचे अनेक राजदूत होऊन गेले. पण खऱ्या अर्थाने सर्व जगातील हिंदुस्थानचा कायम स्वरूपाचा राजदूत म्हणून कुणाचा उल्लेख करायचा झाल्यास तो लता मंगेशकरांचाच करावा लागेल. जेथे रेल पोहोचू शकत नाही, तेथे शैतान पोचतो, अशी एक म्हण आहे. त्याप्रमाणेच जेथे मानव पोचू शकत नाही, तेथे मानवाचा आवाज सहजतेने पोचू शकतो, याची प्रचिती लतादीदींनी सर्व जगाला दाखवली आहे.

८१) सुभाष दांडेकर – मार्दव ही तर तिची खासीयतच. लताचा आवाज कधीही आणि कितीही ऐका, कंटाळा येणारच नाही. गाणं समजायला लागल्यापासून ते आतापर्यंत तिच्या आवाजातली एवढी गाणी ऐकलीत की, आता कानांनाही त्या सुरेल, गोड आवाजाची सवय झालीय. दुसरा कुठलाही आवाज त्यापुढे फिका पडतो.

८२) श्रीनिवास खळे – हिंदी चित्रपटसृष्टीत त्या सर्वोच्च स्थानावर गेल्या. आजही जवळपास ते अबाधित आहे. शास्त्रीय संगीताच्या कर्मठ अभिमान्यांपासून ते सामान्य माणसांपर्यंत सर्वांना रिझविणारं त्यांचं गाणं अजरामर न ठरतं तरच नवल. दोन स्वरांमधील आशय सहजतेने प्रकट करणारी त्यांची गायकी ही एकमेवाद्वितीयच आहे.

८३) सुरेश वाडकर – त्यांच्या गाण्याचं दुसरं नाव परिपूर्णताच आहे. गाण्यातली संपूर्ण सिद्धी त्यांना प्राप्त झालेली आहे. आपल्यातल्या कित्येकांच्या जगण्याचं दुसरं टोक आज त्यांचं गाणं आहे. नजर रोखल्या रोखल्या तिरंदाजाचा बाण जणू सपकन लक्ष्यस्थळी बसावा असा त्यांचा सूर लागतो. दीदींना ती दैवी देणगी लाभली आहे.

.................................................................................................................................................................

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं नवंकोरं पुस्तक 

‘मोदी महाभारत’ प्रकाशित झालं...

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

८४) डॉ. अशोक दा. रानडे – जनसंगीताच्या प्रवाहाच्या प्रत्येक वळणावर लताबाईंनी आपली कश्ती काही काळ का होईना नांगरली आहे आणि त्या त्या वळणावरचे कान सुखावले आहेत. बहुतेक गीतप्रकार, विविध माध्यमे, होतकरू ते मातब्बर संगीतरचनाकार, वेगवेगळ्या वकुबाचे कवी, अनेक भाषा, प्रसारमाध्यमे, सर्व प्रकारचे श्रोते या प्रचंड आवाक्याला काय म्हणावे!... जनसंगीत हे आपले क्षेत्र अशी लताबाईंनी निवड केली, का त्याचा स्वीकार केला, हे महत्त्वाचे नाही. हा संयोग झाल्यावर समसमा ठरला, कारण जनसंगीताच्या आधुनिक अवताराला ज्या घटकांची गरज होती, तेच लताबाईंच्या आवाजाचे गुण आहेत. (‘संगीत संगती’, राजहंस प्रकाशन, पुणे, २०१४ मधून)

८५) कमलाकर कदम - गोडवा तर सुरीलपणाप्रमाणेच लताबाईंच्या गळ्याचा जणू स्थायीभाव होऊन बसलेला आहे – सुरासुरातच काय, पण सुरांबरोबर एकजीव होऊन गेलेल्या शब्दांच्या उच्चारातसुद्धा! शब्दोच्चारांचे सौंदर्य पाहायचे असेल, त्यातला गोडवा ऐकायचा असेल तर तो या गायिकेकडून ऐकावा… (‘सुरावटींच्या सहवासात’, प्रतीक्षा प्रकाशन, २००१)

८६) कमलाकर कदम - लताबाईंच्या गाण्याला एक मनोहर स्वरूप आहे, एक अवीट शृतिरम्यता आहे, मोहक सुगंध आहे, मधुर रुची, सुखद स्पर्श सारं काही आहे. त्यांचं गाणं म्हणजे एक दिव्य असं रसायन आहे. कशातही मिसळल्यानं रंग बदलावा असं ते निव्वळ पाणी नाही. (‘सुरावटींच्या सहवासात’, प्रतीक्षा प्रकाशन, २००१)

८७) सुलभा पिशवीकर- अच्युत गोडबोले – यमनमधल्या केवळ सिनेगीतांविषयी लिहायचं झालं तर किती लिहिणार? थांबणार तरी कुठे? एकट्या लतानं यमनमध्ये इतकी गीतं गायली आहेत की, लतानं जांभई दिली, तर ती यमनचीच असते, असं सी. रामचंद्रांनी म्हटलंय. (‘नादवेध’, राजहंस प्रकाशन, २००५)

८८) शांता शेळके - लताबाईंशी माझा प्रथम संपर्क आला तो चित्रपटांतली गाणी लिहिण्याच्या निमित्ताने. त्यावेळी त्या ‘आनंदघन’ या नावाने मराठी चित्रपटांना संगीत देत होत्या. त्यांच्याबरोबर काम करायचे या कल्पनेने प्रथम माझ्या मनावर मोठेच दडपण आले होते. पण प्रत्यक्षात तो एक अतिशय सुंदर, सुखद अनुभव ठरला. गाणी करताना त्या पुढ्यात पेटी घेऊन बसत. ‘मला पेटी फार चांगली वाजवता येत नाही हं!’ असे हसत हसत म्हणून पेटीवर मला चाली सांगत. ‘मराठी तितुका मेळवावा’, ‘तांबडी माती’, ‘मोहित्यांची मंजुळा’ अशा चित्रपटांची गाणी मी त्यांच्याबरोबर केली. ही गाणी करताना त्या त्या चालींचा उगम त्या मला सांगत. काही गाणी आपल्या आजीकडून ऐकलेल्या जुन्या लोकगीतांच्या चालीवर त्यांनी बसवली आहेत, तर ‘रेशमाच्या रेघांनी’ ही लावणी त्यांनी एका कानडी गाण्याच्या चालीवर स्वतंत्र चाल बांधून केली आहे. सहजता, सोपेपणा, चालींचे अस्सल मराठमोळं वळण आणि विलक्षण गोडवा ही त्यांच्या स्वररचनेची वैशिष्ट्ये मला प्रामुख्याने जाणवली. (‘वडीलधारी माणसे’, सुरेश एजन्सी, पुणे, )

८९) शंकर अभ्यंकर – लतादीदी म्हणजे विसाव्या सहस्त्रकाची अमृतवेल आहे, श्रुतींचा बहार आहे, स्वरांचा वसंत आहे, भैरवीचे शीतल चांदणे आहे. त्यांच्या सांगीतिक जीवनाचा पट इतका विशाल आहे की, तो दोन डोळ्यांत मावणार नाही आणि दोन कानांतही साठविता येणार नाही. लतादीदींचे गाणे ज्ञानदेव माउलींच्या दृष्टान्ताप्रमाणे ‘शुक्लपत्रीच्या सोळा | दिवसा वाढती कळा | परी चन्द्र मात्र सगळा | चन्द्री जेवी ||’ असे आहे.  (‘मोठी तिची सावली’- मीना मंगेशकर-खडीकर, परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई)

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

९०) मीना मंगेशकर-खडीकर – आम्ही भावंडं एकाच वेळी एकाच परिस्थितीतून जात होतो. सर्वच जण मास्टर दीनानाथांची मुलं होतो. पण ‘लता मंगेशकर’ मात्र एकच घडली. (‘मोठी तिची सावली’- मीना मंगेशकर-खडीकर, परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई)

९१) कवी ग्रेस –

माहेराहुन गलबत आले

मला सखीये स्वप्न जडे

हृदयामधल्या गुपितामध्ये

निशिगंधाचे फूल पडे

 

अंतर्ज्ञानी युगांप्रमाणे 

शब्द परतले घरोघरी

जडबंधाच्या मिठीत रुसली

चैतन्याची खुली परी

 

या वाटेवर रघुपति आहे

त्या वाटेवर शिळा

सांग साजणी कुठे ठेवू मी

तुझा उमळता गळा? (सांध्यपर्वातील वैष्णवी - ग्रेस, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई)

..................................................................................................................................................................

संदर्भ व ऋणनिर्देश

१ ते १२ - लतादीदींच्या पार्श्वगायनास २५ वर्षं पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने ‘माणूस’ साप्ताहिकाने (२२ एप्रिल १९६७) काढलेल्या विशेष पुरवणीतून.

१३ ते ७३ - लतादीदींच्या पार्श्वगायनास २५ वर्षं पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने ‘लता’ या शांता शेळके यांनी संपादित केलेल्या पुस्तकातून.

७४ ते ८३ - लतादीदींच्या पार्श्वगायनास ५० वर्षं पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने ‘चंदेरी’ या पाक्षिकाने (१५ ते ३० सप्टेंबर १९९२) काढलेल्या ‘५० सुरीली वर्षं’ या विशेषांकातून.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......