आपल्या वाचनाची इयत्ता सुधारलेली नाही!
ग्रंथनामा - झलक
नीतीन रिंढे
  • ‘पासोडी’चं मुखपृष्ठ
  • Mon , 07 September 2020
  • ग्रंथनामा झलक पासोडी Pasodi नीतीन रिंढे Nitin Rindhe पपायरस प्रकाशन Papyrus Prakashan

कवी, समीक्षक आणि ग्रंथप्रेमी नीतीन रिंढे यांचं ‘पासोडी’ हे पुस्तक काल पपायरस प्रकाशनातर्फे प्रकाशित झालं आहे. हा त्यांनी गेल्या काही वर्षांत पुस्तक, पुस्तक व्यवहार यांविषयी लिहिलेल्या लेखांचा संग्रह आहे. पपायरस प्रकाशनाचं हे पहिलं पुस्तक अतिशय देखण्यारूपात प्रकाशित झालं आहे. या पुस्तकातल्या एका लेखाचा हा संपादित अंश...

..................................................................................................................................................................

“दक्षिणी हिंदु लोकांत अजून मराठी ग्रंथ अथवा वर्तमानपत्रें वाचण्याची गोडीच लागली नाहीं. आमच्या लोकांस मराठी ग्रंथ वाचण्याचाच आळस इतकेंच केवळ नाहीं. परंतु इंग्रजी ग्रंथ तरी लक्ष लावून वाचायास ते कोठें इच्छितात. सांप्रत काळी त्यांची मने बहुत करून ख्यालीखुशालीकडे व डामडौलाकडे लागलीं आहेत.”

- गोविंद नारायण माडगांवकर (‘मुंबईचें वर्णन’)

हे आजच्या महाराष्ट्राचंं वर्णन वाटेल. पण प्रत्यक्षात ते गो० ना० माडगांवकरांनी ‘दक्षिणी हिंदू’, म्हणजे देशावरून आणि कोकणातून मुंबईत राहायला आलेल्या महाराष्ट्रीय लोकांविषयी १८६३मध्ये केलेलं विधान आहे. मुंबईत त्या काळी राहणाऱ्या पारशी आणि गुजराती या लोकांशी तुलना करत महाराष्ट्रीय लोकांविषयी त्यांनी नोंदवलेलं हे निरीक्षण आहे. १८६३मध्ये मराठी समाजाची लोकसंख्या काही लाख होती; साक्षरता दहा टक्क्यांपेक्षा कमी होती; दीर्घ काळापासून चालत आलेल्या मौखिक परंपरेचे संस्कार आणि वर्चस्व कायम होतं; तेव्हा एका मराठी पुस्तकाची आवृत्ती हजार प्रतींची निघे. आज, मराठी भाषक समाजाची संख्या दहा कोटीच्या आसपास आहे; साक्षरता ऐंशी टक्क्यांच्या घरात गेली आहे; मराठी पुस्तकाची आवृत्ती मात्र तेवढीच, हजार प्रतींचीच राहिली आहे.

एका ग्रंथकाराचं द्रष्टेपण की दुःस्वप्न?

मराठीतल्या पु० ल० देशपांडे, व० पु० काळे अशा लोकप्रिय लेखकांच्या गाजलेल्या पुस्तकांच्या गेल्या चाळीसेक वर्षांत (आवृत्त्यांच्या हिशोबाने) प्रत्येकी पन्नास हजार ते एक लाख प्रती संपल्या असाव्यात. आता पु० ल० देशपांड्यांच्या एका पुस्तकाची प्रत्येक प्रत सरासरी वीस वाचकांनी वाचली (वाचकांच्या खाजगी संग्रहातली पु० ल० देशपांड्यांच्या पुस्तकाची एक प्रत तीन-चार वाचक वाचतील, तर ग्रंथालयातली एक प्रत तीस-चाळीस वर्षांच्या काळात पन्नास ते शंभर वाचक वाचतील-) असं गृहित धरलं, तर एक लाख प्रती सुमारे वीस लाख वाचकांनी वाचल्या असं अनुमान करता येतं. ‘मृत्युंजय’ या शिवाजी सावंतांच्या कादंबरीच्या १९६७ ते २०१२ या काळात सव्वीस आवृत्त्या झाल्या. याही पुस्तकाच्या पन्नास हजार ते एक लाख प्रतींची आजवर विक्री झाली असं मानलं तर, गेल्या पंचेचाळीस वर्षांतली या कादंबरीची एकूण वाचकसंख्या दहा लाख ते वीस लाख या दरम्यान. हे मराठीतलं वाचकप्रियतेचं सर्वोच्च शिखर आहे. मंगेश पाडगावकरांच्या ‘जिप्सी’ या कवितासंग्रहाच्या १९५३ ते २००८ या काळात सोळा आवृत्त्या निघाल्या. ‘सलाम’, १९७८ ते २००८ : आठ आवृत्त्या; ‘बोलगाणे’, १९९० ते २००८ : अठरा आवृत्त्या. पाडगावकरांच्या  वाचकांची संख्या साधारणतः पु० ल० देशपांडे, शिवाजी सावंत यांच्या वाचकांइतकीच येईल.

ही पुस्तकं वाचण्याच्या काळात महाराष्ट्राची लोकसंख्या सहा कोटींवरून बारा कोटींवर गेली आहे. आजच्या या बारा कोटींपैकी सहा कोटी लोक तरुण व प्रौढ वयातले आहेत. त्यापैकी एक कोटी लोकांना काही कारणाने वाचता येत नाही (अल्पशिक्षण, निरक्षरता किंवा आणखी काही) म्हणून बाजूला ठेवू. म्हणजे आज महाराष्ट्रात सुमारे पाच कोटी लोक वाचनक्षम आहेत. या पाच कोटी लोकसंख्येशी वरील लेखकांच्या वाचकांची टक्केवारी काढली तर ती चार ते सहा टक्क्यांच्या आसपास येते. पण या लेखकांच्या पुस्तकांच्या आजवरच्या आवृत्त्यांचे वाचक गेल्या तीस-चाळीस वर्षांमध्ये विखुरले गेले आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.  

..................................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5201/Maay-Leki-Baap-Leki

ई-बुक खरेदीसाठी पहा -

https://www.amazon.in/Maayleki-Baapleki-Marathi-Bhagyashree-Bhagwat-ebook/dp/B08DLGCNXL/

..................................................................................................................................................................

आता काही समकालीन पुस्तकांच्या वाचकांचे आकडे पाहू. म्हणजे केवळ ‘आज’च्या लोकसंख्येतलं वाचकांचं प्रमाण कळेल. शिवाजी सावंतांच्या अलीकडे प्रकाशित झालेल्या ‘युगंधर’ या कादंबरीच्या २००० ते २०१२ या काळात पाच आवृत्त्या निघाल्या. शिवाजी सावंतांसारख्या खूपविक्या लेखकाचं पुस्तक असल्याने प्रत्येकी दोन हजार प्रतींची एक आवृत्ती मानली तर दहा हजार प्रती. वाचकसंख्या प्रत्येक प्रतीमागे (वाचनालयातल्या पुस्तकांची अधिकची वाचकसंख्या गृहित धरून) वीस मानली तर एकूण वाचकसंख्या दोन लाख. अच्युत गोडबोल्यांच्या ‘किमयागार’ या २००७मध्ये प्रकाशित झालेल्या माहितीपर पुस्तकाच्या २०१२पर्यंत बारा आवृत्त्या निघाल्या. एक आवृत्ती एक हजार प्रतींची धरल्यास बारा हजार प्रती आतापर्यंत विकल्या गेल्या. प्रत्येक प्रतीची वाचकसंख्या दहा मानली तरी एकूण वाचक, पाच वर्षांत सव्वा लाखाच्या आसपास. ‘खरेखुरे आयडॉल्स’ या सध्याच्या आणखी एका गाजलेल्या माहितीपर पुस्तकाच्या तीन वर्षांत सव्वीस आवृत्त्या निघाल्या. एकूण वाचकसंख्या सुमारे अडीच लाख.

म्हणजे आजच्या मराठी समाजात अत्यंत लोकप्रिय ठरणाऱ्या पुस्तकाला पाच-सात वर्षांच्या अवधीत एक ते अडीच लाख वाचक मिळतात. हे चालू काळातलं मराठी पुस्तकाच्या लोकप्रियतेचं सर्वोच्च शिखर आहे. या पुस्तकांना पुढची वीस ते तीस वर्षं असाच वाचकवर्ग मिळाला तर ढोबळमानाने त्यांचीही एकूण वाचकसंख्या वर उल्लेखलेल्या पु० ल० देशपांडे, मंगेश पाडगावकर या लेखकांच्या वाचकांइतकीच होईल. अर्थात लोकप्रियतेलाही काळाची मर्यादा असतेच. सर्वच पुस्तकं सर्व काळ मोठ्या प्रमाणावर विकली वाचली जात नाहीत. सुधीर फडक्यांसारख्या मराठीतल्या लोकप्रिय संगीतकाराचं आत्मचरित्र ‘जगाच्या पाठीवर’ या पुस्तकाची पहिली आवृत्ती २००३मध्ये प्रकाशित झाल्या झाल्या एका आठवड्यात संपली, ही प्रकाशनक्षेत्रातली एक बातमी ठरली. सहा महिन्यांत चार आवृत्त्या संपल्या. पण आता २०१०पासून गेली दोन वर्षं या पुस्तकाची आठवी आवृत्ती बाजारात खपते आहे. याचा अर्थ खास सुधीर फडक्यांचा फॅन असलेला वाचकवर्गापर्यंत पोचल्यानंतर, आता ते पुस्तक इतर सर्वसामान्य मराठी पुस्तकांप्रमाणे हळूहळू विकलं जाईल.

लेखाच्या सुरुवातीलाच आकड्यांचा हा पसारा मांडण्याचं कारण असं : पाच कोटी वाचनक्षम लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रात अत्यंत लोकप्रिय ठरलेली पुस्तकं वाचणारे वाचक जेमतेम पाव टक्का ते अर्धा टक्का इतकेच असतात, हे आपल्या ध्यानात यावं. हा एवढाच मराठी पुस्तकाच्या गाजण्याचा परीघ आहे. सगळीच गाजलेली पुस्तकं इतक्या प्रमाणात विकली, वाचली जात नाहीत. याचा अर्थ त्यांच्या वाट्याला पाव टक्क्यांहूनही कमी वाचक येतात. मराठी पुस्तकांचा गाजण्या-न गाजण्याचा परीघ हा इतका छोटा आहे. आणि मराठी समाजातलं हे छोटं वाचकसमुदायाचं वर्तुळ, त्या वर्तुळात गाजलेली-न गाजलेली पुस्तकं हा या लेखाचा विषय आहे. तेव्हा या लेखात होणाऱ्या चर्चेचा एकूण मराठी समाजाशी संबंध काय आहे, असा प्रश्न मला पडलेला आहे. हा प्रश्न मनात ठेवूनच हा लेख वाचावा ही विनंती. आणखी एक : कोणत्याही लेखकाला तो द्रष्टा ठरला तर ते आवडेल. पण, आपण एकोणिसाव्या शतकात समकालीन समाजाच्या वाचनाविषयी केलेलं निदान एकविसाव्या शतकातही कायम राहण्याइतपत द्रष्टेपणाचं ठरावं, असं दुःस्वप्न गो. ना. माडगांवकरांसारख्या हाडाच्या ग्रंथकाराने दीडशे वर्षांपूर्वी नक्कीच पाहिलं नसेल.

एखादं पुस्तक गाजण्यामागे किंवा न गाजण्यामागे अनेक कारणं दडलेली असतात.

‘पुस्तक गाजतं’ म्हणजे नेमकं काय होतं? काही पुस्तकांविषयी खूप चर्चा होते. पण विक्री मात्र त्या मानाने कमी होते. मराठीत अशी अनेक पुस्तकं आहेत. काही पुस्तकं कोणत्या ना कोणत्या कारणाने वादग्रस्त ठरून गाजतात. यामुळे त्यांची विक्री वाढू शकते. काही लेखकांचा वाचकवर्ग विस्तारत जातो, तसतशी त्यांची पुस्तकं गाजू लागतात, विकली जाऊ लागतात. अरुण कोलटकरांच्या अलीकडच्या कवितासंग्रहांचं उदाहरण इथं देता येईल. काही पुस्तकांचा प्रसारमाध्यमांतून, समीक्षकांकडून फारसा गाजावाजा न होताही त्यांची विक्री, वाचन मोठ्या प्रमाणावर होतं. काही पुस्तकं वाचकांच्या ठरावीक वर्तुळातच गाजतात, वाचली जातात. पण त्यांचा परिणाम मात्र त्यामानाने व्यापक पातळीवर दिसून येतो. उदाहरणार्थ, मर्ढेकरांच्या कविता त्यांच्या काळात ज्या प्रमाणात गाजल्या, वादग्रस्त ठरल्या, तेवढ्या प्रमाणात त्या मराठी वाचकांकडून वाचल्या गेल्या नाहीत. मर्ढेकरांचा वाचक प्रामुख्याने अकॅडमिक वर्तुळातलाच राहिला आहे. पण त्यांच्या कवितांमुळे त्यांच्यापूर्वीची रोमँटिक कविता आणि स्फूर्तिगीतं काळाच्या पाटीवरून पुसल्यासारखी झाली. मर्ढेकरांनंतर सर्वच मराठी कवींची कविता बदलली. ते मराठीतले युगप्रवर्तक कवी ठरले.

मुळात एखादं पुस्तक गाजलं तरी ते समाजातल्या संपूर्ण वाचकवर्गाकडून वाचलं जातं असं नाही. प्रत्येक पुस्तकाचा एक उद्देशित वाचक समुदाय (target reader) असतो. वाचकांत अभिरूचीनुसार समुदाय तयार झालेले असतात. उदाहरणार्थ व० पु० काळे, शं० ना० नवरे यांची पुस्तकं वाचणारा वाचक दिलीप चित्रे किंवा अरुण कोलटकर यांच्या कविता वाचणार नाही. त्याला मंगेश पाडगावकरांच्याच कविता भावतील. अर्थात, अभिरुचीचे काही सामायिक प्रदेशसुद्धा असतात. एकच वाचक भालचंद्र नेमाडे यांच्या कादंबऱ्या आवडीने वाचेल; सुहास शिरवळकर, नारायण धारप यांच्या रहस्यकथांमध्ये रमेल; आणि इंदिरा संतांच्या हळुवार कवितांचाही तो आस्वाद घेईल. वाचनाच्या कृतीमागे वाचकाच्या निरनिराळ्या मानसिक, बौद्धिक, भावनिक गरजा असू शकतात. कोणत्या पुस्तकांद्वारे आपल्या या गरजा पूर्ण होतील याची त्याला जाणीव असेल, तर तो त्या त्या प्रकारच्या पुस्तकांची वाचनासाठी निवड करतो. पुस्तकाचा वाचकवर्ग अशा वेगवेगळ्या प्रेरणांतून आकाराला येत असतो.

ऐतिहासिक कादंबऱ्या गाजतात?

आता, पुस्तक गाजण्याविषयी मराठीत काही ठोकताळे आहेत. पैकी एक ठोकताळा म्हणजे, ऐतिहासिक, पौराणिक कादंबऱ्या अधिक लोकप्रिय होतात. हा समज पुरेसा खरा आहे, हे हरि नारायण आपटे, नाथमाधव, वि० वा० हडप यांच्यापासून रणजीत देसाई, विश्वास पाटील यांच्यापर्यंतच्या ऐतिहासिक कादंबऱ्यांच्या उदाहरणांनी दाखवून देता येईल. त्यामुळेच त्र्यं० शं० शेजवलकरांचं ‘पानिपत’ हे पुस्तक गाजलं तरी विकलं गेलं नाही. पण विश्वास पाटलांची ‘पानिपत’ ही ऐतिहासिक कादंबरी मात्र खूपविकी (best seller) ठरली. शिवाजी सावंतांची ‘मृत्युंजय’ ही कादंबरी आजही लोकप्रिय आहे, पण महाभारताची चर्चा करणारी इरावती कर्वे यांचं ‘युगान्त’ किंवा दुर्गा भागवतांचं ‘व्यासपर्व’ ही पुस्तकं ‘मृत्युंजय’च्या तुलनेत केवळ बहुचर्चित ठरली. मराठीतल्या ऐतिहासिक कादंबऱ्या वाचकांच्या भावनेला आवाहन करतात, त्यांचं स्मरणरंजन करतात. याऊलट शेजवलकरांचं ‘पानिपत’ किंवा ‘युगान्त’, ‘व्यासपर्व’ ही पुस्तकं इतिहास, महाकाव्य यांतील घटनांचं, त्या घटनांमागील व्यवस्थेचं विशिष्ट दृष्टिकोनातून विश्लेषण करतात. हा चिकित्सक दृष्टिकोन गेल्या शंभर वर्षांपासून ऐतिहासिक कादंबऱ्यांच्या वाचनातून भावनाविव्हलता आणि स्मरणरंजन यांवर पोसल्या गेलेल्या वाचकाला पेलवत नाही. त्यामुळे मराठीत ऐतिहासिक, पौराणिक कादंबऱ्या लोकप्रिय होत असल्या तरी इतिहास-पुराणाविषयी वैचारिक चर्चा करणारी गंभीर पुस्तकं मात्र लोकप्रिय झालेली नाहीत.

असा चिकित्सक दृष्टिकोन ज्या तुरळक ऐतिहासिक कादंबऱ्यांमध्ये दिसतो त्या देखील (ऐतिहासिक असल्या तरी) लोकप्रिय झालेल्या नाहीत. उदाहरणार्थ, नंदा खरे यांच्या ‘अंताजीची बखर’ आणि ‘बखर अंतकाळाची’, किंवा आनंद विनायक जातेगावकर यांची ‘श्रीमंत गोपिकाबाईंची बखर’ या कादंबऱ्या. मराठीतल्या ऐतिहासिक कादंबऱ्यांनी केलेला भूतकाळाचा गौरव, मराठ्यांच्या नायकांच्या, मराठा सैन्याच्या पराभवांचं, दोषांचं उदात्तीकरण या गोष्टी मराठी वाचकांचा स्वाभिमान कुरवाळतात. असं गौरवीकरण, उदात्तीकरण टाळून पेशवाईतल्या नकारात्मक गोष्टी दाखवणाऱ्या ‘अंताजीची बखर’ किंवा ‘बखर अंतकाळाची’ अशा कादंबऱ्या या वाचकाच्या पचनी पडणं अवघड आहे. म्हणजे, मराठी वाचकांना इतिहासविषयक पुस्तकांपेक्षा ऐतिहासिक कादंबरी या साहित्यप्रकारातली पुस्तकं आवडतात हा समज गैर आहे. असं म्हणायला हवं की, मराठी वाचकांना मराठेशाहीचा, पेशवाईचा गौरव करणारी, त्यांचं उदात्तीकरण करणारी पुस्तकं आवडतात. असं गौरवीकरण, उदात्तीकरण ज्या ऐतिहासिक कादंबऱ्यांनी केलं आहे, त्या मराठी वाचकांमध्ये गाजल्या आहेत. या दोन कालखंडांची चिकित्सा करणारी पुस्तकं (कादंबरी किंवा अन्य साहित्यप्रकारांतली) मराठी वाचकांनी दुर्लक्षिली आहेत.

.................................................................................................................................................................

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं नवंकोरं पुस्तक 

‘मोदी महाभारत’ प्रकाशित झालं...

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

इथंच मराठी वाचकांबद्दलचा आणखी एक मुद्दा स्पष्ट होईल. मराठी वाचकांना मराठेशाही आणि पेशवाई या दोनच ऐतिहासिक कालखंडांवरचं साहित्य वाचण्यात रस आहे. या कालखंडातल्या राजघराण्यातल्या व्यक्ती याच केवळ ऐतिहासिक कादंबरीचा विषय ठरू शकतात असाही समज आहे. हाच इतिहास महाराष्ट्रात लोकप्रिय आहे, कारण त्याद्वारे मराठी समाजाच्या जात्याभिमानी (मराठा, ब्राह्मण) आणि धर्माभिमानी (मुस्लिमांच्या विरुद्ध हिंदुत्व) अस्मिता गोंजारल्या जातात. प्रत्यक्षात महाराष्ट्राचा दोन हजार वर्षांचा सलग इतिहास उपलब्ध आहे. पैकी इ.स.च्या पहिल्या सहासात शतकांच्या काळातला बौद्ध महाराष्ट्र किंवा त्यानंतरचा नाथपंथी, महानुभाव, वारकरी महाराष्ट्र या कालखंडांचा इतिहास मराठी ऐतिहासिक कादंबरीकारांना का खुणावत नाही, हे स्पष्ट आहे.

माहितीपर पुस्तकं गाजतात?

अलीकडचा दुसरा एक समज असा की, आता माहितीयुग सुरू झालं आहे. त्यामुळे माहितीपर पुस्तकं मोठ्या प्रमाणावर वाचली जात आहेत. विज्ञान, अर्थशास्त्र, मानसशास्त्र या शास्त्रांच्या वाटचालीचा परिचय करून देणारी अच्युत गोडबोले यांची पुस्तकं गेल्या साताठ वर्षांत प्रचंड लोकप्रिय ठरली.

माहितीपर पुस्तकं मराठीत पूर्वीपासून प्रकाशित होत आहेत. नॅशनल बुक ट्रस्टतर्फे विज्ञान, समाजशास्त्र, इतिहासातले निरनिराळे कालखंड या विषयांवरची कितीतरी पुस्तकं आजवर प्रकाशित झाली आहेत. आज माहितीयुग अवतरूनही या पुस्तकाला वाचकवर्ग मिळालेला नाही. नॅशनल बुक ट्रस्ट, साहित्य संस्कृती मंडळ या सरकारी प्रकाशनसंस्था आहेत. त्यांची अनेक चांगली पुस्तकं वितरणव्यवस्थेअभावी पडून आहेत. ही पुस्तकं फक्त त्यांच्या मुंबई, पुणे अशा शहरांतल्या विक्री केंद्रातच मिळतात. महाराष्ट्राच्या निमशहरी-ग्रामीण भागात नवा वाचकवर्ग तयार झाला आहे. त्यांच्यापर्यंत ही पुस्तकं पोहचतच नाहीत. शिवाय हे जसं माहितीचं युग आहे, तसंच जाहिरातीचंही युग आहे. आजच्या बाजारव्यवस्थेत प्रत्येक व्यक्ती ग्राहक बनलेली आहे. या व्यवस्थेच्या नियमानुसार ग्राहकाला ती वस्तू विकत घेण्याची इच्छा होण्याचा एकमेव मार्ग, त्या वस्तूची जाहिरात करणे हाच आहे. जाहिरात आणि विक्रीव्यवस्था नसल्याने या पुस्तकांना वाचक मिळाला नाही असं समजू.                 

पण अलीकडं मनोविकास प्रकाशनाने प्रकाशित केलेलं, मानवाच्या आदिम काळापासूनच्या मानवप्राण्याच्या वाटचालीचा इतिहास रेखाटणारं, नंदा खरे यांचं ‘कहाणी मानवप्राण्याची’ हे पुस्तक भरपूर जाहिरात करून आणि उत्तम विक्रीव्यवस्था असून देखील खपाच्या बाबतीत मात्र अच्युत गोडबोल्यांच्या पुस्तकांच्या तुलनेत मागं पडलं. याचं कारण काय? ‘कहाणी मानवप्राण्याची’ या पुस्तकात मानवजातीशी संबंधित अनेक विषय आलेले आहेत. सैद्धान्तिक माहितीचं प्रमाण अधिक आहे. खऱ्यांची किंवा जयंत गडकरी, मिलिंद मालशे या सहलेखकांची भाषा संदर्भसंपृक्त, सामान्य वाचकाला थोडी जड जाणारी अशी आहे; याउलट अच्युत गोडबोल्यांची भाषा रसाळ, आकलनसुलभ आहे, असं सामान्य वाचकातर्फे म्हणता येईल.

लेखकाविषयीची मिथ्

पुस्तक गाजण्यामध्ये प्रकाशकाच्या ब्रँडप्रमाणे लेखकाभोवती तयार झालेल्या एखाद्या मिथचाही काही प्रमाणात हातभार लागत असतो. अच्युत गोडबोले आणि नंदा खरे या लेखकांची तुलना करून पाहू. अच्युत गोडबोले हे लेखक म्हणून, त्यांची किंवा कोणाचीच पुस्तकं न वाचणाऱ्या मराठी समाजालाही काही प्रमाणात परिचित आहेत. गोडबोल्यांच्या ‘लोकसत्ते’सारख्या मोठ्या खपाच्या वृत्तपत्रातून बराच काळ चाललेल्या वेगवेगळ्या विषयांवरील लेखमाला, शहरोशहरी वेगवेगळ्या सभांमधून त्यांनी दिलेली भाषणं यांद्वारे, विशेषतः महानगरांमध्ये आणि शहरांमध्ये राहणाऱ्या मध्यमवर्गीय वाचकांमध्ये त्यांची लेखक म्हणून एक प्रतिमा तयार झाली आहे. गोडबोल्यांची भाषणं आणि मुलाखती यांमधून त्यांच्या वैयक्तिक जीवनाचा जो तपशील या वाचकवर्गात प्रसृत होत आला, त्याद्वारे लेखक म्हणूनच्या त्यांच्या प्रतिमेत काही रंग भरले गेले. निमशहरी कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेला हुषार मुलगा आयआयटीसारख्या सर्वोच्च संस्थेतून पदवीधर होतो; आणि हे शिक्षण घेऊनही तो शहाद्यासारख्या दुर्गम भागात आदिवासींमध्ये कार्य करायला जातो. आणि असं कार्य करूनही तो नंतर अमेरिकेत जाऊन संगणकक्षेत्रात नोकरी, सल्लागारी करून कोट्यवधी रुपये मिळवतो. आणि अशा प्रकारे कोट्यधीश झाल्यानंतरही तो अर्थशास्त्र, मानसशास्त्र, संगीत, विज्ञान अशा वेगवेगळ्या विषयांवर सोप्या मराठी भाषेत मोठाली पुस्तकं लिहितो, ही सगळीच माहिती अच्युत गोडबोले नावाच्या लेखकाभोवती वलयं निर्माण करते. अशा चरित्रात्मक तपशिलांमधून लेखकाची एक मिथ् वाचकांमध्ये तयार होत असते.

नंदा खऱ्यांच्या व्यक्तिमत्त्वाभोवती अशी वलयं नाहीत. त्यांनी दीर्घकाळ संपादित केलेल्या विवेकवादी विचाराला वाहिलेल्या ‘आजचा सुधारक’ या गंभीर मासिकाचा वाचकवर्ग अत्यंत मर्यादित आहे. त्यांनी यापूर्वी लिहिलेलं ‘ज्ञाताच्या कुंपणावरून’ हे वैशिष्ट्यपूर्ण विज्ञानविषयक पुस्तक ग्रंथालीसारख्या वाचक चळवळीतल्या संस्थेने प्रकाशित करूनही फारसं कोणी वाचलेलं नाही. थोडक्यात, त्यांचा वाचकवर्ग मराठीत अत्यंत मर्यादित आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाभोवती कोणतीही वलयं निर्माण न झाल्याने त्यांची लेखक म्हणून मिथ् देखील तयार झालेली नाही. या गोष्टीचा परिणाम त्यांच्या ‘कहाणी मानवप्राण्याची’ या ताज्या पुस्तकाच्या लोकप्रियतेवर निश्चितच झाला असणार.

याचा अर्थ, आपली लेखक म्हणून मिथ् तयार होण्यासाठी स्वतः अच्युत गोडबोल्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले, किंवा त्यांच्या प्रकाशकांनी तसे प्रयत्न केले असं मला म्हणायचं नाही. बऱ्याचदा समाजालाच लेखकांभोवती अशी वलयं निर्माण करण्याची गरज असते. सिनेमातल्या नायकांमध्ये सामान्य प्रेक्षक ज्याप्रमाणे स्वतःची स्वप्नपूर्ती बघतो, कादंबऱ्यांमधल्या नायकांद्वारे तो आपल्या इच्छा पूर्ण करून घेतो, तसाच काहीसा हा प्रकार असतो. समाजाला वेगवेगळ्या पातळ्यांवर नायक हवेच असतात.

भाषांतरित पुस्तकं : एक समस्या

सध्या मराठीत भाषांतरित पुस्तकांचं वारं जोराने वाहू लागलं आहे. पण परभाषांतून, विशेषतः इंग्रजीतून कोणती पुस्तकं भाषांतरित होतायत? खूपविक्या कादंबऱ्या आणि माहितीपर पुस्तकं. अनेक प्रस्थापित प्रकाशक मराठी साहित्यातला भाषांतरित पुस्तकांचा कचरा अत्यंत झपाट्याने वाढवत आहेत. खरं तर परभाषेतून कोणती पुस्तकं आपल्या भाषेत यावीत याचे निर्णय जबाबदारीने जाणीवपूर्वक घ्यावे लागतात. केवळ बाजारातला फायदा बघितला तर प्रकाशकांची कमाई वाढते, पण स्वभाषकांची अभिरुची मात्र बिघडते. इंग्रजीतून मराठीत आलेल्या खूपविक्या कादंबऱ्या वाचून असलंच साहित्य इंग्रजीत (पर्यायाने जागतिक स्तरावर) थोर मानलं जातं असा गैरसमज सामान्य वाचकांचा होतो. मध्यंतरी जुझे सारामागो या नोबेलविजेत्या पोर्तुगीज लेखकाची ‘ब्लाईंडनेस’ ही कादंबरी (अनुवाद : भा० ल० भोळे) साकेत प्रकाशनाने प्रकाशित केली. ही एक कादंबरी वाचली तरी मराठी कादंबरी नेमकी कुठल्या स्थानावर आहे, हे मराठी कादंबरीकार आणि वाचक दोघांनाही कळेल.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

गेल्या शतकभरात जागतिक पातळीवर श्रेष्ठ मानल्या गेलेल्या किती कवी-लेखकांचं साहित्य मराठीत अनुवादित झालं? शोधून सापडणंही मुश्किल. मराठीत दोस्तोवस्की, तॉलस्तॉय, चेखव, स्टेफान झ्वाईग अशा काही जुन्या मोठ्या लेखकांचे अनुवाद आधीच्या पिढीतल्या अनुवादकांनी केले. पण सार्त्र, कामू, काफ्का या मराठीत गाजावाजा झालेल्या लेखकांची एकही महत्त्वाची कादंबरी मराठीत आली नाही (शकू नि कनयाळकरांनी केलेला काफ्काच्या कादंबरीचा अनुवाद, असे काही तुरळक प्रयोग झाले). मोठ्या प्रकाशकांनी तसे प्रयत्न केल्याचं दिसत नाही. त्यामानाने नाट्यक्षेत्रातल्या लोकांनी त्यांना समकालीन असलेल्या जागतिक नाट्यकृतींचे मराठी अनुवाद बरेच केले. गेल्या चाळीस वर्षांतले जगातले मोठे लेखक मराठीत माहीतही नाहीत. त्यांचे अनुवाद होणं दूरच.

याऊलट हिंदीमध्ये जगातले बहुतेक मोठे लेखक-कवी वाचायला मिळतात. पूर्वी, म्हणजे विसाव्या शतकाच्या सुरुवातीला तिकडं इंग्लंडमध्ये एकदम तिय्यम दर्जाचा मानला जाणारा रेनॉल्डस् नावाचा लेखक मराठीत लोकप्रिय होता. त्याच्या कादंबऱ्यांचे अनुवाद तर मराठीत झाले होतेच, पण तो मराठी वाचकांमध्ये इंग्रजीतूनही मोठ्या प्रमाणावर वाचला जात होता. आजही युरोपात ‘खूपविक्ये’ मानले जाणारे डॅन ब्राऊन, पाउलो कोएलो यांच्यासारखे दुय्यम-तिय्यम दर्जाचे लेखकच मराठीत अधिक अनुवादिले, वाचले जातात. आपल्या वाचनाची इयत्ता सुधारली नाही, हेच यावरून दिसून येतं. 

..................................................................................................................................................................

‘पासोडी’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5227/Pasodi

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

Post Comment

Vividh Vachak

Tue , 08 September 2020

* मागच्या प्रतिसादात बिल गेट्स यांचा उल्लेख चुकून लेखक असा झाला. त्याऐवजी ते आपल्या ब्लाॅगवरून लिहितात असा अर्थ अपेक्षित होता.


Vividh Vachak

Mon , 07 September 2020

छान लेख. पुष्कळ निरीक्षणे पटली. सध्याचे युग जाहिरातीचे आहे आणि त्यामुळे लेखकाचे पुस्तक उचलताना त्या व्यक्तीला जरा वलय असण्याने फायदा होणार नक्की. याशिवाय अमेरिकेत जसे बिल गेट्स् यांच्यासारखे लेखक वाचलेल्या पुस्तकांबद्दल लिहितात, तसे मराठीत समाजमान्य व्यक्ती मराठी पुस्तकांबद्दल लिहीत नाहीत (ते मराठी साहित्य वाचतात की नाही तेही माहित नाही). आणखी एक म्हणजे महिला व पुरुषांचे बुक क्लब हा चांगल्या पुस्तकांची चर्चा होऊ देण्याचा उत्तम उपाय आहे पण तोही विशेष फोफावलेला दिसत नाही. सर्वात महत्त्वाचे : आपली शिक्षणपद्धतीच अशी आहे की ज्यातून दहावीनंतर बहुतेक हुशार मुले भाषेचा अभ्यास सोडतात. त्यामुळेही अवांतर वाचन जवळ जवळ थांबतेच.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......