रत्नाकर मतकरी : लेखक कसा असावा, त्याने काय करावे याविषयी अवाक्षरही न उच्चारता ज्यांनी मला खूप काही शिकवलं, असा हा फार मोठा लेखक, त्याहून मोठा माणूस!
संकीर्ण - श्रद्धांजली
रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ
  • रत्नाकर मतकरी (१७ नोव्हेंबर १९३८ - १७ मे २०२०) डावीकडून दुसरे आणि लेखक रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ डावीकडून पहिले
  • Mon , 25 May 2020
  • संकीर्ण श्रद्धांजली रत्नाकर मतकरी Ratnakar Matkari

परवा सकाळपासून मी स्वतःला एक गोष्ट पटवून देण्याचा प्रयत्न करतोय – एक्याऐंशी वर्षे वयाचा एक माणूस करोनाने गेला, यात न पटण्यासारखे काय आहे? पण मी आयुष्यभर जपलेला विवेकवाद किंवा त्याला न सापडलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी मी अलीकडे ज्याची तोंडओळख करून घेतोय, ते अध्यात्म – दोन्हीही  माझ्या मदतीला येत नाहीयेत. कारण जो गेला तो तर किती तरुण होता, उत्फुल्ल होता, जीवनरसाने परिपूर्ण होता! तो असा अचानक कसा काय मधूनच उठून जाऊ शकतो? आमचं कितीतरी  बोलायचं-ठरवायचं अजून शिल्लक असताना? 

रत्नाकर मतकरी हा मी जवळून पाहिलेला पहिला लेखक. त्यानंतर अनेक लेखकांशी संपर्क आला. पण लेखक कसा असावा, त्याने काय करावे याविषयी अवाक्षरही न उच्चारता ज्यांनी मला खूप काही शिकवलं, असा हा फार मोठा लेखक, त्याहून मोठा माणूस! लेखकाने स्वतःच्या सदसद्विवेकबुद्धीशी, लेखनाशी असणारी आपली नाळ कायम राखत कार्यकर्तेपण कसे करावे, समाजातील एक संवेदनशील, सक्रिय घटक या नात्याने भवतालाला लेखनातून आणि त्याबाहेरील आपल्या जगण्यातून कसा प्रतिसाद द्यावा, याचे झगझगीत उदाहरण म्हणजे रत्नाकर मतकरी.

मी मतकरींना पहिल्यांदा भेटलो ते नर्मदा आंदोलनाच्या काठाकाठाने वावरणारा शहरी कार्यकर्ता म्हणून. घाटीतील शेकडो आदिवासी आपली कैफियत मांडायला मुंबईत आले होते, चर्चगेट स्टेशनसमोर धरणे देत होते. त्यांची कहाणी सर्वत्र पोहचावी म्हणून आम्ही प्रयत्न करत होतो. मुंबईतील लेखकांचा एक समर्थनपर कार्यक्रम आम्ही धरण्याच्या ठिकाणी आयोजित केला होता. आंदोलन तेव्हा नवे होते. मोजक्याच साहित्यिकांनी तेव्हा आंदोलनाला पाठिंबा दिला, त्यात मतकरी होते. त्यांचा पाठिंबा निवेदनावर सही देण्यापुरता नव्हता. (लोकांच्या जीवन-मरणाचा प्रश्न असतो, तेव्हा ‘मान्यवरांची’ एकेक सहीदेखील महत्त्वाची असते!) ते वेळ काढून नर्मदा घाटीत गेले, फिरले, लोकांना भेटले, तिथली परिस्थिती त्यांनी आपल्या दोन्ही व कलाकाराच्या तिसऱ्या डोळ्याने न्याहाळली. परतल्यावर त्यांनी लेखणी सोडून कुंचला हातात घेतला. (त्यांच्याजवळ चित्रकाराची दृष्टी आहे, हे त्यांच्या वाचकाना माहीत आहे, पण त्यांचा हातही चित्रकाराचा आहे, हे आम्हाला तेव्हा कळले.) नर्मदेवर त्यांनी चित्रमालिका तयार केली, त्यांचे प्रदर्शन भरवले. त्या निमित्ताने ते आंदोलनाविषयी वारंवार बोलले. त्या चित्रांच्या विक्रीतून आलेला पैसा त्यांनी आंदोलनाला दिला. तेव्हापासून अगदी आतापर्यंत त्यांनी नर्मदा आंदोलनाची पाठराखण केली.

त्यांचा माझा परिचय झाला आणि मग जवळजवळ दोस्तीच झाली. ही त्यांची खासीयत. त्यांच्या संपर्कात आलेल्या शेकडो लोकांना आपण त्यांचे दोस्त बनल्याची सुखावह भावना स्पर्शून गेली असणार. त्यांच्याकडे केव्हाही जा, त्यांचे वागणे असे असायचे, जणू आपल्याशी बोलण्याशिवाय दुसरे कुठलेच काम त्यांच्याकडे नाही. हा ‘आविर्भाव’ नव्हता, ‘पोझ’ नव्हती, डेल कार्नेजीच्या पुस्तकाचा वस्तुपाठ नव्हता. दिलखुलासपणा हा त्यांच्या व्यक्तित्वाचा एक अविभाज्य भाग होता. कामाचे बोलणे तर होतच असे, त्याविषयीची आखणी, तपशिलाचा विचार सर्व सर्व होते, पण त्याबरोबरच कितीतरी गोष्टींवर बोलणे होई. माझे काय चालले आहे याची आस्थेने चौकशी होई. ‘राधा निवास’च्या पायऱ्या उतरताना मनात नेहमी तृप्ततेची भावना रेंगाळत असे.

ते माणसांची, आंदोलनाची पाठराखण कशी करतात, त्यांना कसे बळ देतात, हे मी त्यापूर्वी व त्यानंतर अनेकदा अनुभविले. बेटकबिलोली हे मराठवाड्याच्या सांदीकोपऱ्यातील एक गाव. तिथे डाव्या विचाराच्या एका समूहाने दलित भूमिहीन मजुरांचा लढा उभारला. तेथील धनदांडग्यांनी तो अर्थातच मोडून काढला. मतकरी त्या विचारधारेचे समर्थक नव्हते. पण तेथील श्रमिकांची वेदना, कार्यकत्यांच्या मनातील आग, व्यवस्थेची निर्ममता त्यांच्या मनाला भिडली आणि त्यातून मराठीतील ‘लोककथा – ७८’ या अजरामर राजकीय नाटकाचा जन्म झाला. त्याच्या प्रयोगाच्या वेळी या लढ्याची माहिती देणारी पत्रके वाटली जात असत. त्यातून हा लढाच नव्हे, तर महाराष्ट्रातील खेड्यांमधील दलित, गरिबांचे प्रश्न मराठी मध्यमवर्गापर्यंत पोहचले.

अरुंधती रॉयने मोठी धरणे, महाकाय विकासाचे प्रारूप यांच्या साजऱ्या ‘रूपा’ची  चिरफाड करत त्यामागील विनाशाचे ‘विद्रूप’ उघडे करणारी एक इंग्रजी पुस्तिका लिहिली होती. तिच्या ‘बहुजनहिताय’ या मराठी अनुवादाचे अभिवाचन करत मतकरी महाराष्ट्रातील अनेक गावांतून, लहान शहरांतून फिरले.

नव्वदच्या दशकात हिंदुत्वाचे व खाजगीकरण-उदारीकरण-जागतिकीकरणाचे (‘खा-ऊ-जा’)चे वारे देशात घुमू लागले. देशाचा, महाराष्ट्राचा राजकीय-सांस्कृतिक पट त्यामुळे विस्कटला. श्रमिक-गरिबांच्या चळवळींशी नाते जोडणारा, बाबा आमटे-मेधा पाटकर यांना आदर्श मानणारा मराठी मध्यमवर्ग झपाट्याने बदलला. ‘आपल्या’ सगळ्या प्रश्नांना ‘ते’ कारणीभूत आहेत असे मानू लागला. गरीब-श्रमिकांविषयीचा त्याचा तुच्छताभाव वाढीला लागला.

त्या काळात ‘आयडिया ऑफ इंडिया’ टिकवून ठेवण्यासाठी जे काही प्रयत्न करण्यात आले, त्यांच्यामध्ये सक्रीय सहभाग देणारे मतकरी हे एकमेव नामवंत मराठी साहित्यिक होते. ते गिरणी कामगार संघर्ष समितीच्या सोबत होते. लोकशाही हक्क संघटनेशी त्यांचे जवळचे नाते होते. ‘निर्भय बनो’ आंदोलनाचे तर ते अध्यक्षच  होते. ‘महानगर’वर झालेले हल्ले असोत, की एन्रॉनच्या विरोधात थेट गुहागरला जाऊन काढलेला मोर्चा असो, राज्यसत्ता, सत्ताधारी वर्ग आणि बहुसंख्यांची लोक-भावना यांच्या विरोधात भूमिका घेण्याचे, रस्त्यावर उतरण्याचे धाडस दाखविणारा विरळ साहित्यिक म्हणून मतकरींची नोंद इतिहासाला घ्यावीच लागेल.

अर्थात मतकरींच्या दृष्टीने ही एक सहज कृती होती. त्यांना जे भावले, मनाला पटले, विवेकाच्या निकषावर घासून उरले, त्यामागे ते सहजभावाने, बंधुत्वाच्या प्रेरणेने उभे राहिले. मोर्च्याहून घरी परतल्यावर त्यांनी लेखणी हातात घेऊन कथा, नाटक, कादंबरीचा पुढचा शब्द लिहायला सुरुवात केली असेल, याची मला खात्री आहे.

याच सहजप्रेरणेने त्यांनी ठाण्यातील झोपडपट्टीतल्या मुलांसाठी वेगळा ‘चाय-खोका’ रंगमंच स्थापन केला आणि त्यासाठी आपली शक्ती वेचली. अकोलेच्या हेरंब कुलकर्णी या शिक्षक-कार्यकर्त्याने नवा वेतन आयोग व त्यामुळे मिळणारे वाढीव वेतन नाकारले, तेव्हा त्याच्या पाठीशी मतकरी याच प्रेरणेने उभे राहिले.

अशी कितीतरी उदाहरणे आहेत. लेखक हा जन्मजात प्रतिभेचे लेणे लाभलेला ‘ईश्वराचा लाडका’ वगैरे असतो, त्याचा मर्त्य जगाशी फारसा संबंध नसतो व सभोवतालच्या क्षुद्र गोष्टींमध्ये त्याने आपला बहुमूल्य वेळ वाया घालवू नये, असे मानणाऱ्या समाजापुढे वेगळे उदाहरण आपल्या आचाराने मतकरींनी घालून दिले.

..................................................................................................................................................................

मतकरी यांची एक मुलाखत, राजहंस प्रकाशनाचे संपादक सदानंद बोरसे यांनी घेतलेली

..................................................................................................................................................................

गांधीजींमुळे अलीकडच्या काळात त्यांच्याशी नव्याने नाते जुळले होते. गांधींची भूमिका मांडणारी किंवा गांधी‘दर्शना’चा साक्षात्कार घडवणारी एकही समर्थ कलाकृती गेल्या ७० वर्षांत मराठी रंगभूमीवर का येऊ नये हा प्रश्न मला पडला होता. तसे घडावे यासाठी मी बेचैन होतो. असे नाटक निव्वळ प्रचारकी नसावे, कलाकृती म्हणून श्रेष्ठ दर्जाचे असावे व त्याचा व्यावसायिक रंगभूमीवर प्रयोग व्हावा असे मला मनापासून वाटत होते. असे नाटक लिहू शकणारा एकच माणूस माझ्या डोळ्यांसमोर होता – रत्नाकर मतकरी.

मी अडीच-तीन वर्षांपूर्वी हा विषय घेऊन त्यांना भेटलो. आम्ही वर्षभर बोलत राहिलो. गांधींचे आयुष्य हा महाकाव्याचा विषय. त्यातून त्यातील ‘अखेरचे पर्व’ हा कालखंडच मुळात एखाद्या ग्रीक शोकांतिकेसारखा आहे. मतकरींच्या प्रतिभेने त्यातील नाट्य अचूक हेरले व सजीव केले. त्यांच्या देदीप्यमान नाट्य-कारकिर्दीचा चरमोत्कर्ष शोभेल असे हे नाटक – ‘म. गांधी - अंतिम पर्व’. १३ फेब्रुवारीला त्याचा प्रकाशन समारंभ झाला. ते रंगमंचावर कसे आणायचे यावर आम्ही बोलत होतो. करोनामुळे सर्वांच्याच आयुष्यात ‘पॉज’ बटन दाबले गेले. हा टप्पा संपल्यावर पुढचे सर्व आम्हाला ठरवायचे होते. पण लेखक-दिग्दर्शक मतकरींना दिवस-रात्र ‘दिसणारे’ हे नाटक त्यांच्याशिवाय करण्याची वेळ येईल असे दुःस्वप्नातही वाटले नव्हते.

सहा दशकांहून दीर्घ काळ अविरत लिहिणारा हा ‘लिहित्या हाताचा’ लेखक. सव्वाशेहून अधिक पुस्तकांचा जन्मदाता. पण त्यांनी अलीकडे लिहिलेली ‘गॅस चेंबर’सारखी कथा आजच्या दाहक वास्तवाचे धारदार चित्रण करण्यात कुठेही कमी पडत नाही. वाहत्या पाण्यासारखी त्यांची प्रतिभा व त्यांचे आयुष्यदेखील. ते गेल्यावर शेकडो लोकांनी आतल्या उमाळ्याने त्यांच्याबद्दल लिहिले. वाचकांचे इतके प्रेम लाभणे हे लेखकाचे महद्भाग्य! त्यांच्या चतुरस्त्र, बहुप्रसवा पण कसदार लिखाणाची योग्य समीक्षा भावी काळात होईल, अशी आशा आपण करू या.

मतकरींनी कविता सोडून सर्व प्रकारचे लिखाण केले. माझ्या मते मतकरींचे आयुष्य हीच एक कविता होती, एक पल्लेदार पण अर्ध्यातच संपलेली कविता! माझ्या या मानण्याला साक्ष आहे लेखन व जीवन दोघेही ज्यांना कळले अशा एका दिग्गज कवीची, विंदांची एक लघुत्तम कविता. कविता करायला  काय लागते, या प्रश्नाला विंदांनी दिलेले मार्मिक उत्तर आहे – ‘पेन आणि शील’!

मतकरींनी या दोन्ही गोष्टी आयुष्यभर जीवापाड जपल्या. लेखणी, म्हणजे लेखनाशी असणारी त्यांची बांधीलकी आणि लेखक व माणूस (या दोन्ही गोष्टी वेगळ्या नसतातच) असणारे शील – आपण ज्या समाजात, पर्यावरणात जगतो, त्याबद्दल असणारे आपले कर्तव्य, बांधीलकी, ते देणे विविध पद्धतींनी देण्याची सहज ऊर्मी.

या दोन्ही गोष्टी जपल्यामुळे रत्नाकर मतकरी नावाचा कवी आयुष्याची, लेखनाची दीर्घ कविता तालासुरात रचू शकला. त्याविषयी कृतज्ञता मानत, ती अचानक खंडित झाली, हे स्वीकारणे तेवढे आपल्या हातात आहे.

..................................................................................................................................................................

रत्नाकर मतकरी यांच्या पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/author/8/Ratnakar-Matakari

..................................................................................................................................................................

लेखक रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ ‘आजचा सुधारक’ या मासिकाचे माजी संपादक आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत.

ravindrarp@gmail.com

..................................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

..................................................................................................................................................................

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......