‘तू जाऊन तीन तपं झाली’ : गावमातीतील माणसांच्या सत्त्वाचा शोध घेणारे काव्य 
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
इंद्रजित वीर
  • ‘तू जाऊन तीन तपं झाली’ या कवितासंग्रहाचे मुखपृष्ठ
  • Fri , 24 April 2020
  • ग्रंथनामा Granthnama शिफारस तू जाऊन तीन तपं झाली Tu Jaun Tin Tapa Zali महेंद्र कदम Mahendra Kadam

कादंबरीकार, समीक्षक डॉ. महेंद्र कदम यांचा ‘तू जाऊन तीन तपं झाली’ हा पहिला काव्यसंग्रह. तसं पाहता ही एक दीर्घकविता आहे. काबाड कष्ट करूनही वेदना, हाल-अपेष्टेचे जगणे वाट्याला आलेली माणसं सत्त्व जपण्याचा वसा घेऊन संघर्षमय जीवन जगतात त्याचे हे काव्य. तीन तपापूर्वी अस्तंगत झालेल्या आईच्या आठवणींचा जागर व संघर्षमय जीवन जगत एकाकी पुढे आलेल्या कवीची कहाणी सांगणारे हे आत्मकाव्य आहे.

आईच्या आठवणी

बहात्तरच्या दुष्काळी परिस्थितीपासून ही कहाणी आरंभ करते. पर्जन्य छायेचा प्रदेश, सततचा दुष्काळी भाग हीच ओळख असणारा गाव. त्यामुळे अन्नपाण्याची वाणवा. माणसाच्या वाट्याला आलेले मरणासन्न महाकष्टप्रद जगणे. त्यात साथीच्या रोगात घरातल्या माणसाच्या जाण्याने घरादाराची होळी होते. एका घरात तीन भावंडांसह फक्त पणजी उरलेली असते. अशात वय नसताना घरातल्या थोरल्या पोराच्या लग्नाची सतरंजी अंथरली जाते आणि कवीची आई या घरात लग्न होऊन येते. याचे वर्णन करताना कवी म्हणतो -

“कुंकवाचा दगड।

आई बानं तुझ्या पदरात।

चंद्र म्हणून बांधला।

तू त्याला जपताना।

सुपाएवढं काळीज करीत।

संसार मात्र सावरीत आणला”

हलाखीच्या स्थितीत असलेल्या धन्याच्या घरात येणे तिच्यासाठी फारसे सुखदायक नव्हते. तरीही धन्याला जपतानाच सुपाएवढं काळीज करत संसारालाही सावरते. इथूनच आईच्या संघर्षमय जगण्याची सुरुवात होते. पोटापाण्याची खळगी भरण्यासाठी नवऱ्याच्या बरोबरीने ती मोलमजुरीचा रस्ता धरते. पाठीला बाक आणणारी गवताची पेंडकी उचलण्यापासून ते खडी फोडण्याच्या कामापर्यंतची नानाप्रकारचे कष्ट ती उपसते. तरीही अनेकदा तिच्या वाट्याला उपासमारीची वेळ येते. कितीही दुःख वाट्याला आले तरी ती जगण्याला हसतहसत सामोरी जाते. याचे वर्णन करताना कवीने म्हटले आहे -

“उखणणं लिंपताना।

भिंतींवरचं पापुद्रं काढावेत शेलक्या हातानं।

तसं तू काढून टाकलंस तुझ्या चेहऱ्यांवरचं ।

आभाळवर्खी दुःख।”

दुःख, वेदना सोसत सख्यांसोबत ती काम करते. कष्टाच्या जोरावर गाण्यांचा हुंकार शिवारात पेरते. रानामातीचा गंध घरभर पसरते. भुंड्या माळावरचा एकेक दगड वेचून मातीला अंकुर फोडते. खोकडफळी रानात कणसांचा उत्सव साजरा करते. या सर्व कष्टदायक प्रवासात तिचं तरुणपण मात्र हरवते. बाळंतपणानंतर आलेल्या आजारपणातून अचानक एक दिवस ती आयुष्याचा किनारा गाठते. ही कहाणी केवळ कवीच्या आईचीच आहे असे नव्हे. थोड्याफार फरकाने दुःख, दारिद्रयात जगणाऱ्या ग्रामीण भागातील कैक स्त्रियांची आहे. यासंदर्भात कवीचे पुढील निवेदन समर्पक ठरते -

“तरीही,

तुला सांगतो, शहाबाई सुदाम कदम ही फक्त तुझीच कहाणी नव्हती।

यमुनाबाई, झुंबरबाई, कौतिकबाई अथवा ती कोणतीही बाई होती।                                          

परिस्थिती कितीही हलाखीची नाजूक टोकदार बनत गेली तरी सोशिक, सहनशील, संयमी, समंजस असलेली आई डगमगली नाही. ती नेहमी ठाम कणखरच होत गेली. याबाबतचे वर्णन करताना कवी म्हणतो-

“दिवसेंदिवस परिस्थिती बनत होती टोकदार।

तरीही तू होतीस ठाम उभी।

बेदरकार।”

अशी कणखर वृतीची आई शेजारधर्माच्या सुख-दुःखाला जागणारी होती. जातीपातीचा विचार न करता माणसाशी माणूस म्हणून वागणारी होती. नवऱ्या-मुलाबाळांसह भावा-बहिणीवर आभाळमाया करणारी होती. माणुसकी, ममत्वाची संवेदना तिच्यात ओतपोत भरून उरली होती. अंत्यदर्शनाच्या वेळी आलेल्या आया-बायांनी व्यक्त केलेल्या पुढील भावनांमधूनही तिच्यातील माणूसकीची, ममत्वाची भावना प्रकट होते-

“घरदार फुलासारखं जपायची ।

फाटक्या कापडांना टाकं घालून पोरं नीट ठिवायची।

आजारात काढलेली वैरण शेजारणीला द्यायची।

तोंडातला घास देऊन आडल्या-नडल्यांची भूक व्हायची।

कलू लागल्या खोपटाची आधार मेढी होवून जायची।”

असं हे ममत्वाचं छत्र हरपल्यानंतर कवी अतीव दुःखी होतो. मनासारखं आयुष्य जगण्याच्या ऐन उमेदीच्या काळातच तिचं जाणं कवीला हतबल करून टाकते. आपल्या आंतरिक भावना व्यक्त करताना कवी म्हणतो -

“पंधरा हे काय लग्नाचं आणि।

तीस हे काय तुझं जाण्याचं वय नव्हतं।

एखाद्याच्या पंखांना बळ मिळण्याच्या।

वयातच तू पंख मिटून घेतलंस।

कायमचं।”

आईला जाऊन तीन तपं झालीत. कवीही परिस्थितीवर मात करत एकाकी पुढं आला आहे. अशा स्थितीत आपली आई असती तर तिचं आणि आपलं नातं कसं राहिलं असतं, याची कल्पना कवी करतो. आई असती तर संवांदाचं पीक बहरल़ं असतं का, की सारचं करपून गेलं असतं, हा प्रश्न त्याला पडतो. कारण आईच्या पश्चात त्याचा ‘बा’शी संवाद हरवलेला आहे. घरामध्ये त्याचं मन कधीच रमलं नाही. फुललं नाही. त्याचं मन नेहमी आईच्या आठवणींमध्येच रमलयं म्हणून कवी म्हणतो-

“म्हणून कधीमधी वाटतं गेली ते बरं झालं।

किमान तुला आठवत जगता तरी आलं।

तुझी पोकळी भरून काढताना।

आठवांच्या पारंब्यांना चांदणं।

लगडून गेलं।”

अबोल बापाच्या दुःख, वेदनेचा हुंकार

मातीत राबून मातीमोल ठरलेला, व्यवहाराच्या गणितात कायम हरलेला, सगळ्यांच्या रोषांचा धनी ठरलेला बाप आयुष्यभर दुःख सहन करत जगला. तो माणसात कमी शेतामातीत, रानाफुलांमध्ये, शेळ्याकोकरांमध्ये अधिक रमला. त्याचा इतरांशी कमी अन् स्वतःचा स्वत:शीच आत्मसंवाद होत राहिला. याच कारण कोरडेच्या कोरडे पिकांशिवाय गेलेले हंगाम अन् खाणाऱ्या तोंडांची खांद्यावर असलेली जबाबदारी. कधी उपकाराची भाषा नाही. अबोल असला तरी नात्यातल्या माणसांना त्यानं कधी दूर लोटलं नाही. कधी परिस्थितीचा त्रागा केला नाही. जगायचं तर काबाडाचं धनी होऊन हेच त्याचं जगण्याचं सूत्र. प्रसंगी ‘आ रे’ला ‘का रे’ अन् जशास तसं वागणं.

असा धसमुसळा, कष्टाळू, अबोल, आत्ममग्न, कणखर, सडेतोड वृत्तीच्या बापाचं दर्शन ही कविता घडवते.

गावमातीतील माणसांच्या बदलत्या संवेदनांचे चित्रण

या दीर्घकवितेतून आई-बा व कवीच्या सत्त्व जपत संघर्षमय जगण्याची कहाणी ज्याप्रमाणे व्यक्त झाली आहे. तसेच गावमातीतील माणसांच्या बदलत्या संवेदनांचे चित्रणही अभिव्यक्त झाले आहे.

बहात्तरचा दुष्काळ वा तदनंतरच्या काळात पूर्वी माणसं एकमेकांच्या सुख दुःखात रमायची. अडीअडचणींना धावून जायची. आता मात्र तसं घडत नाही. माणसं संवाद हरवत चालली आहेत. दुरावत चालली आहेत, याची जाणीव कवीला प्रखरतेने होते. कवी जेव्हा गावाकडे घरी जात येत राहतो, त्या वेळी त्याला माणसं पूर्वीप्रमाणे रस्त्यावर दिलखुलास, मनमोकळं बोलताना दिसत नाहीत. जो तो आपापल्या घाईत, व्यवहारी जगण्याच्या मागे धावताना दिसतो. कुणी कुणाची ख्याली-खुशाली विचारात नाही. कवी म्हणतो-

“चहा टाकून ओट्यावरती।

कुणी कुणाला बोलवत नाही।

ख्याली-खुशालीच्या वार्तांची।

देवाण-घेवाण करीत नाही।”

आजकाल माणसं एकमेकांपासून दूरावत चालली आहेत. एकाकी होत आहेत. वृद्ध माणसं पूर्वी पारावर, झाडाखाली बसून सुख-दुःखं वाटायची पण आता तसं होताना दिसत नाही. दुष्काळ, अन्नधान्याची वाणवा असलेला एक काळ होता पण माणसं एकमेकांचा आधार व्हायची. काळीआई, मुकी जनावरं यांच्यात रमायची. आता मात्र माणसांना काळीआई वा मुक्या जनावरांची आस्था उरलेली दिसत नाही. याची खंत कवीला वाटते. कवी म्हणतो-

“नुसता डांबरी होत चाललेला गाव।

विसरत चालला आहे सारा संवेदनशील।

भाव।

अशा प्रकारे मायमाती, नातीगोती, माणसांबद्दलच्या संवेदना हरवत चालल्याची वेदना ही कविता व्यक्त करते.

सत्त्व पेरणाऱ्या कवीच्या संघर्षाची कहाणी

परिस्थितीवर मात करत, संघर्ष करत कवी एकाकी पुढे आला आहे. आता वयाची पंचेचाळीशी गाठत असताना अनेक प्रकारच्या पडझडीचा काळ त्यानं अनुभवलाय. बालवयातच आईच छत्र हरपल्यानंतर तिच्या जाण्यानं दुःखाचा डोंगर त्यानं अनुभवलाय. कुटुंबातील प्रत्येकासाठी अंधकारमय ठरू पाहणारा तो काळ. घरादाराला प्रचंड अवकळा आणणारा काळ हादरवून टाकणारा आहे. त्या काळाचे वर्णन करताना कवी म्हणतो-

“चारकोपऱ्यात चौघं बसून राह्यचो तास न् तास।

कुणीच नव्हतं सोबतीला नुसतं भास।”

अशा कठीण काळात भाऊबंदांनी वडलांची साथ सोडली. बहिणीची भाकरीसाठी कायमची शाळा सुटली. लहान्याचे हाल झाले. अशाही स्थितीत कवीने शिक्षणाची पाठ सोडली नाही. बिनातेलाची चटणी भाकरी एकट्यानं बसून खाली. मित्रांत मन रमेना अशा हालातीत पुस्तकांशी मैत्री केली-

“ह्या रोजमर्रा लढाईत शिक्षणाचं खरं नव्हतं।

केली पुस्तकांशी मैत्री अनेकदा।’

दिवाळी, उन्हाळ सुट्टीत प्रसंगी खडी फोडली. विहिरी, मुरुम खोदले. पुढे टेलरिंग काम केले. अशी अनेक कामं करत शिक्षण पूर्ण केले. यात बालपण हरवले पण शिक्षणाची कास कधी सोडली नाही.

“शिक्षणासाठी चाललेल्या वृथा वणवणीची।

फुल्यांच्या असूडानं करीत होतो नोंदवणी।

तरी उगवत राहिली रोज नवी वारूळलेणी।

घरातल्या उजेडाला सतत चिणत।

होत कोणी।”

अशा प्रकारे परिस्थितीवर मात करत काम व शिक्षणाची सांगड घालत शिक्षकपदापर्यंत कवी प्रवास करतो. या संघर्षाच्या काळात त्याच्या वाट्याला आलेली सुख-दुःखं, व्यथा-वेदना वर्गातील पोरांना आर्वजून सांगतो. पोरकेपणा वाट्याला आलेल्यांना नवी वाट दाखवण्यासाठी धडपडतो. कारण आईनं सत्त्व जपत सत्त्व पेरलं. तेच तो जपतो, तेच तो  पेरतो. कारण त्यानं दुधारक्तासह शोषून आईकडून तेच घेतलंय. म्हणून कवी म्हणतो-

“एक मात्र खरं।

दुधारक्तासह तुला शोषून घेताना।

माझ्यात जे उतरलंय।

ते प्राणपणानं जपत।

पोरांमध्ये पेरतोय।

मातीत पाय रोवून।

आभाळाकडं पाहताना।

कुणाचंच बोट रिकामं असू नये।म्हणून डोळ्यांत तेल घालून।

काळजी घेतोय।”

अशा प्रकारे ‘तू जाऊन तीन तपं झाली’ ही दीर्घकविता सत्त्व जपणाऱ्या आई-बा व ‘मी’च्या संघर्षाची कहाणी अभिव्यक्त करते.     

..................................................................................................................................................................

तू जाऊन तीन तपं झाली - महेंद्र कदम,

रेखाटन प्रकाशन, कोल्हापूर, पाने- ३६, मूल्य – ५० रुपये.

..................................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

..................................................................................................................................................................

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे.......

जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक.......