कोणाकडे किती ग्रंथ आहेत किंवा कोण किती तास वाचतो, हे माझ्या मते फजूल प्रश्न आहेत.
संकीर्ण - पुनर्वाचन
अरुण टिकेकर
  • प्रातिनिधिक चित्र
  • Thu , 23 April 2020
  • संकीर्ण पुनर्वाचन जागतिक पुस्तक दिन World Book Day अरुण टिकेकर Arun Tikekar

‘मॅजेस्टिक बुक स्टॉल’तर्फे कै. तुकारामशेठ उर्फ अण्णा कोठावळे यांच्या स्मरणार्थ श्री. अरुण खाडिलकर या ग्रंथ-संग्राहकाला १९९४मध्ये एक पुस्तक-भेट दिली गेली. त्या प्रसंगी दै. ‘लोकसत्ता’चे तत्कालीन संपादक डॉ. अरुण टिकेकर यांनी केलेल्या भाषणाचा हा संपादित अंश…

..................................................................................................................................................................

मॅजेस्टिक बुक स्टॉलच्या या कार्यक्रमांत आपल्यासारख्या वाचनप्रेमींबरोबर तीन अरुण (आठल्ये, खाडिलकर आणि टिकेकर) एकत्र आले हा गंमतीचा योगायोग आहे. आपल्याच पिढीतील एका ग्रंथप्रेमी अरुणचा सत्कार आपल्याच हातून आणि तोही तिसऱ्या ग्रंथप्रेमी अरुणच्या साक्षीने व्हावा,  याचा मला आनंद होत आहे.

महाराष्ट्रात गाजलेल्या वाचकांची संख्या बरीच मोठी नसली तरी बऱ्यापैकी आहे. ग्रंथप्रेमी आणि वाचक या दोन विशेषणांनी अलंकृत झालेल्या व्यक्तीला ‘हल्ली काय वाचताय?’ या प्रश्नाला नेहमी सामोरं जावं लागतं. कारण चोखंदळ वाचक सतत – म्हणजे दिवसाकाठी १८ तास (हे १८ तास वाचणं म्हणजे काय आणि १८ तास का?) वाचणारी व्यक्ती, तशी अखिल महाराष्ट्रानं समजूत करून घेतलेली असते. मी गाजलेला वाचक नाही, पण वाचक आहे अशी अनेकांनी – मॅजेस्टिकच्या कोठावळ्यांनीसुद्धा – समजूत करून घेतली आहे. मलाही हा प्रश्न सदैव विचारला जातो – माझं उत्तरही तयार असतं  – ‘हल्ली लिहितोय’! वाचन हा ‘फुलटाइम जॉब’ आहे, अशी समजूत करून घेतल्यानं पसरला गेलेला गैरसमज आहे. महिन्याकाठी, आठवडाभरात, नित्यनेमानं एखादा ताससुद्धा वाचता येतं, हे समजून येईपर्यंत अपसमज कायम राहणार. वाचनाला वेळेचं बंधन नसावं, असू शकत नाही.

मॅजेस्टिकनं आपल्या एका नव्या पुस्तकाची जाहिरात करताना म्हटलं आहे – ‘लेखक असावा लागतो, तो होत नाही’. आज लेखकाबद्दल बोलण्याचं कारण नाही. पण या वाक्यात बदल करून म्हणावं लागेल की, ‘वाचक असत नाही, तो व्हावा लागतो’. वाचक होण्याची प्रक्रिया ही सर्वार्थानं सांस्कृतिक आहे. तिचा प्रारंभ शाळा-कॉलेजमधून व्हावा लागतो. तो हल्ली होत नाही वगैरे टीका होत असते. काही प्रमाणात ती खरी असली तरी पूर्णपणानं ती खरी नाही. वाचक हा आपल्या इथं संख्येनं नेहमीच कमी राहिला आहे. समाजाचा सांस्कृतिक दर्जा दाखवणारं हे एक परिमाण आहे. १८९५ सालची ‘वाचन’ नावाची पुस्तिका एकदा माझ्या हाती लागली. गतशतकातली जगन्नाथ शंकर स्कॉलरशिप मिळवणाऱ्या ‘वावीकर’ नावाच्या लेखकानं ती लिहिली आहे. या पुस्तिकेच्या प्रस्तावनेत ‘हल्लीचे शिक्षक-प्राध्यापक टेक्स्टबुकांखेरीज अन्य काही वाचत नाहीत’ अशी तक्रार केली आहे. शंभर वर्षांनंतरही तीच तक्रार होत आहे. सुशिक्षितांची संख्या वाढली की, ग्रंथांचं वाचन वाढेल, अशी अटकळ होती. ती खरी ठरली नाही, असा याचा अर्थ. पण ‘वाचना’चं कार्य हे ‘ऐकून’\पाहूनसुद्धा होऊ शकतं, याचा आपल्याला विसर पडलाय. हा मुद्दा अगदी वेगळा आहे. मी आज फक्त ग्रंथवाचन या मुद्द्याबद्दलच बोलणार आहे.

कोणाकडे किती ग्रंथ आहेत किंवा कोण किती तास वाचतो, हे माझ्या मते फजूल प्रश्न आहेत. कारण वाचनाचा हेतू या प्रश्नांची उत्तरं देताना मिळत नाहीत. वाचल्यानंतर डोक्यात किती उरतं, शिल्लक राहतं, हे महत्त्वाचं आहे. अन्यथा उगाच आपलं ‘इकडून तिकडे गेले वारे’ वगैरे. इतरांनी वाचलं पाहिजे, असं आग्रहानं सांगणारा वर्ग आपल्या इथं मोठा आहे. त्यात आपण वाचत नसल्याची उणीव झाकता येते. हे सारे प्रकाशकच असतात असं नाही. पण वाचनानंद घेणारा इतरांना वाचनाचं महत्त्व पटवून देण्याच्या फारशा भानगडीत पडत नाही. असो.

वाचन कशासाठी करायचं? आनंदासाठी, प्रबोधनासाठी, उन्नयनासाठी की अन्य कशासाठी, यासंबंधी मी बोलणार नाही. ते आज इथं हजर असलेल्या सर्वांना चांगलं ठाऊक आहे. पण वाचन आणि वाचक यासंबंधीची माझी काही मतं मी मांडणार आहे.

सुशिक्षित लोक वाचत नाहीत, यावर माझा विश्वास नाही. जरूर वाचतात. पण त्यांनी जे वाचलं  पाहिजे ते वाचतात का, हा खरा प्रश्न आहे. वयोमानाप्रमाणे आणि बौद्धिक प्रगतीनुसार बाल, कुमार आणि प्रौढ अशी तीन गटांत वाचकांची विभागणी करण्यात येते. आज प्रौढ गटांत वाचक अत्यल्प आहेत, ते का, हेही मी नंतर सांगतो. दुसऱ्या पद्धतीनंही वाचकांची गटवारी करता येईल -

१) वाचणारा परंतु वाचनासाठी निश्चित मोजपट्ट्या नसणारा. (आजचा ९० टक्के वाचक या गटांत मोडतो )

२) न वाचता वाङ्मयीन मतं मांडत राहणारा. (माझ्या लहानपणी साम्यवादी विचारसरणीची व्यक्ती बुद्धिमान समजली जाई. बुद्धिमान समजलं जावं म्हणून साम्यवादी विचार उथळपणे बोलून दाखवणारे कमी नव्हते. आज त्यांची जागा कुमार गंधर्व/किशोरी आमोणकर आदींच्या गायनानं, चिं. त्र्यं. खानोलकर/जी. ए. कुलकर्णी यांच्या लेखनानं घेतली आहे. हे संगीत वाङ्मय समजण्यासाठी प्रगत संवेदनक्षमता पाहिजे, त्याची मला जाण नाही.)

३) वाचणारा आणि वाङ्मयीन निकषाच्या निश्चित मोजपट्ट्या असणारा.

४) समीक्षक – (अ) न वाचता समीक्षा करणारा, (ब) समीक्षा करण्यासाठीच वाचणारा.

वाङ्मयीन निकषाच्या निश्चित मोजपट्ट्या सहजासहजी उपलब्ध नसल्यामुळे आजचा वाचक गोंधळलेला आहे, असं मला वाटतं. त्यामुळे त्याला हाती लागेल ते साहित्य तो वाचत असतो. ही अवस्था पालटावयाची असेल, तर उच्च दर्जाच्या वाङ्मयाची व वाचकाची ओळख झाली पाहिजे. ही करून देण्यासाठी वाचक घडवले गेले पाहिजेत. बिअरच्या चवीप्रमाणे वाचनाची चव अंगी बाणावी लागते. या आनंदासाठी इतर जीवनानंदाला थोडंसं मुकावं लागतं. पण हा आनंद जरूर घेण्यासारखा आहे. श्री. खाडिलकर, श्री. आठल्ये यांच्याप्रमाणे मलाही ग्रंथ खरेदी करण्याचं व्यसन लागलं. त्यातही दुर्मीळ ग्रंथ मिळवण्याचं खर्चिक व्यसन लागलं. दोन दशकांहून अधिक काळ मी ते जोपासलं आहे.

दुर्मिळता कशी ठरवायची? दुर्मीळ ग्रंथांचा शोध कुठे आणि कसा करायचा? किंमती स्वतः कशा ठरवावयाच्या? हे अनुभवानं मी शिकत गेलो. २०० रुपयांना आपण घेतलेला ग्रंथ दुसरीकडे ३५ रुपयांना मिळत असला की बसची वाट पाहून कंटाळून टॅक्सी करावी, टॅक्सीत बसावं आणि बस यावी, या वेळी जी भावना होते, ती अनुभवावयास मिळाली. पण उलटं झालं की दुसऱ्याची नेमकी बस चुकली की, आपल्याला जे वाटतं तसं वाटतं. असो.

वाचक म्हणून होणाऱ्या प्रगतीच्या अवस्था मला आपल्याला आवर्जून सांगाव्याशा वाटतात.

यौवन म्हणजे कविता

तारुण्य म्हणजे कथा\कादंबरी

प्रौढत्व म्हणजे चरित्र\आत्मचरित्र

वृद्धत्व म्हणजे तत्त्वचिंतनात्मक वाङ्मय

कविता, कथा, कादंबरी असं वाचत चाललेला वाचक कधी तरी चरित्र\आत्मचरित्र या वाङ्मय प्रकारापर्यंत येऊन पोचतो. जीवनातले टक्के टोणपे खाणा-याला यशस्वी\अयशस्वी व्यक्तींनी आपलं जीवन कसं व्यतीत केलं, हे जाणून घ्यायची इच्छा असते. म्हणून चरित्र\आत्मचरित्र वाचण्याची चांगल्या वाचकाला उर्मी येतेच.

मुंबईच्या एका वृत्तपत्रात चोखंदळ आणि प्रगल्भ वाचन करणाऱ्यांची त्यांनी वाचलेल्या ग्रंथांबद्दल, त्यांनी केलेल्या ग्रंथसंग्रहाबद्दल एक सुरेख लेखमालिका प्रसिद्ध होत आहे. त्यातील कित्येक लेख स्मरणीय असे वठले आहेत. पण आतापर्यंतच्या लेखांत वाचक म्हणून घडत गेलेल्यांनी आपल्या वाचनात प्रगल्भता कशी येत गेली याचं तटस्थपणे चित्रण केलेलं आढळलं नाही. बहुतांश वाचकांनी कोणते ग्रंथ स्मरणात राहिले, कोणत्या ग्रंथांचा आपल्यावर प्रभाव पडला, याची यादी देणंच पसंत केलं. चरित्र\आत्मचरित्र वाचण्याची पायरी ओलांडून वाचक जेव्हा तत्त्वचिंतनाच्या/ फिलॉसॉफीच्या दिशेने जाऊ लागतो (उदा. इतिहास हा आवडीचा विषय असल्यास ‘फिलॉसॉफी ऑफ हिस्ट्री’कडे तो वळतो वगैरे), तेव्हा त्यानं प्रगत वाचनावस्था गाठली असं म्हणता येईल. आपण त्या अवस्थेला पोहोचलो की नाही, हे ज्याचं त्यानं ठरवायचं आहे.

महामानव विवेकानंदांची एक गोष्ट सांगतात. हजार एक पानांचा ग्रंथ त्यांच्यासमोर ठेवून यजमान काही कामानिमित्त दूर गेला. तासाभरात तो परत येतो, तोपर्यंत स्वामी विवेकानंद ६०० पानांच्या पुढे गेले होते. त्यांची परीक्षा पाहण्यासाठी त्यांनी वाचलेल्या पानांचा सारांश विचारला. विवेकानंदांनी तो व्यवस्थितपणे सांगितला. वाचण्यातली गती कशी वाढवावी, या बद्दल आपण विचार केलेला नाही. स्वामी विवेकानंद हे असामान्य होते. त्यांची बात सोडा, पण आपण सामान्यांनी वाचताना वेग वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे, याची माहिती देणारा ग्रंथ मराठीत आहे का? नाही. इंग्रजीत आहेत- ‘How to read faster?’ वगैरे.

वाचन हे तंत्र आहे. सबंध ओळच्या ओळ नजरेच्या टप्प्यात घेतली, मान या दिशेकडून त्या दिशेकडे वळवत बसलं नाही तर वेगानं वाचन होतं. वेग प्रयत्नपवूर्वक वाढवता येतो. अर्थात कथा\कादंबऱ्या ज्या गतीने वाचल्या जातील, तीच गती तात्त्विक विचारलेखनाला उपयोगी नाही, असो.

वाचन हा सर्वस्वी खाजगी व्यवहार आहे. ज्याचा त्याचा आनंद ज्यानं त्यानं मिळवायचा आहे. चांगल्या वाङ्मयकृतीचं वाचन करणाऱ्यांची संख्या वाढो, प्रगल्भ वाचन करणाऱ्यांची संख्या वाढो, एवढीच इच्छा.

जाता जाता हल्लीच्या जमान्याबद्दल एक घटना सांगतो. एका वाचनप्रिय संपादकानं नव्या पिढीतील तीन-चार तरुण पत्रकारांना बोलावून ‘वाचन वाढवा, स्वतःचा असा विषय बनवा’, वगैरे युक्तीच्या चार गोष्टी सांगितल्या. त्या तरुण पत्रकारांपैकी एक म्हणाला, ‘पत्रकारानं वाचलंच पाहिजे असं मला वाटत नाही.’ आज तोही पत्रकार एका वृत्तपत्राचा संपादक आहे. आपणासारख्या सुज्ञ मंडळींना अधिक काय सांगायचं?

 (‘ललित’च्या जून १९९४च्या अंकातून साभार)

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......