‘थ्री सिस्टर्स’ : चेकॉव्हच्या या नाटकात जुनी व्यवस्था व नवी व्यवस्था यांच्यातला सनातन संघर्ष आहे!
कला-संस्कृती - नौटंकी
प्रा. अविनाश कोल्हे
  • ‘थ्री सिस्टर्स’चं पोस्टर
  • Sat , 14 March 2020
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti नौटंकी Nautanki अविनाश कोल्हे Avinash Kolhe थ्री सिस्टर्स Three Sisters अंतोन चेकॉव्ह Anton Chekho

जागतिक साहित्यात रशियन लेखक अंतोन चेकॉव्ह (१८६०-१९०४) याचं स्थान अढळ आहे. त्याने जशा दर्जेदार कथा लिहिल्या, तशीच दर्जेदार नाटकं लिहिली. त्याची अतिशय नावाजलेली नाटकं म्हणजे ‘अंकल वानिया’, ‘थ्री सिस्टर्स’, ‘द सिगल’ आणि ‘चेरी ऑकर्ड’. ही नाटकं माहिती नसलेला रंगकर्मी आढळणं जवळजवळ अशक्य. युरोपातील रंगभूमीवर आधुनिकता आणणाऱ्या हेनरिक इब्सेन आणि ऑगस्ट स्ट्रिंडबर्ग यांच्या जोडीनं चेकॉव्हचं नाव घेतलं जातं. चेकॉव्ह व्यवसायानं डॉक्टर होता. जगभरच्या रंगकर्मींना जसं शेक्सपिअरचं एखादं तरी नाटक करून बघायचं असतं, तसंच चेकॉव्हच्या नाटकांचं आहे. परिणामी त्याच्या नाटकांचे प्रयोग जगभर सतत सुरू असतात. चेकॉव्ह समकालीन रशियन लेखक म्हणजे लिओ टॉलस्टॉय. त्याला चेकोव्हच्या लेखनाचं फार कौतुक असायचं. टॉलस्टॉय, तुर्गेनेव्ह, डोस्टोव्हस्की वगैरे म्हणजे क्रांतीपूर्व रशियातील थोर लेखक.

चेकॉव्हच्या नाटकांपैकी त्याच्या खूप गाजलेल्या ‘थ्री सिस्टर्स’चा प्रयोग अलिकडे बघण्याची संधी मिळाली. ही अकरा वर्षापूर्वी मॉस्कोहून एका छोट्या गावात राहायला आलेल्या पोझोरोव्ह कुटुंबाची कथा आहे.

मुंबईतील खार (पश्चिम) येथे ‘द जेफ गोल्डबर्ग स्टुडिओ’ या नाट्यसंस्थेने प्रयोग मंचित केला होता. ही नाट्यसंस्था सुमारे पाच वर्षांपूर्वी स्थापन झाली. तिच्यातर्फे जागतिक पातळीवर गाजलेली नाटकं सातत्यानं सादर केली जातात. या संदर्भात चटकन आठवणारं नाव म्हणजे इटालियन नाटककार डॅरियल फो यांचं ‘डेथ ऑफ अ‍ॅन अनार्कीस्ट’. आता त्यांनी चेकॉव्हचं ‘थ्री सिस्टर्स’ सादर केलं आहे.

ही नाट्यसंस्था नाट्यनिर्मितीबरोबर अभिनयाचंही प्रशिक्षण देते. ‘थ्री सिस्टर्स’चा प्रयोग त्यांच्या विद्यार्थ्यांनी सादर केला होता. दिग्दर्शन अशोक पांडे या अतिशय गुणी रंगकर्मीनं केलं आहे. त्यांनी यापूर्वी मोहन राकेशच्या ‘आधे अधुरे’चंही दिग्दर्शन केलं होतं. शिवाय त्यातली मध्यवर्ती भूमिकासुद्धा सादर केली होती. या नाटकाला भारतीय बाज चढवला आहे. ते बरंचसं इंग्रजीत असलं तरी त्यात अधूनमधून हिंदीचा वापर केला आहे.

चेकॉव्ह क्रांतीपूर्व रशियात जगलेला लेखक असल्यामुळे तेव्हा युरोपात प्रचलित असलेली संरजामशाही व्यवस्थ त्याच्या नाटकात महत्त्वाची भूमिका पार पाडते. ‘थ्री सिस्टर्स’मध्ये नावाप्रमाणे तीन बहिणी आहेत. सर्वांत मोठी ओल्गा (अविवाहित, वय सुमारे ३२ वर्ष). ओल्गा शाळा मास्तरीण असते. वडिलांच्या मृत्यूनंतर हळूहळू त्या भल्याथोरल्या घरावर तिची सत्ता चालायला लागते. मधली बहीण माशा विवाहित असते. तिचा नवरासुद्धा शाळा मास्तर असतो. पण तो तिला नवरा गुंजभरही आवडत नाही. सर्वांत धाकटी एरिना अविवाहित, पण फार महत्त्वाकांक्षी असते. तिला सतत वाटत राहतं की, या छोट्या डबक्यासारख्या गावात सडत राहण्यापेक्षा पुन्हा मॉस्कोला जावं व मस्त जगावं.

या तिन्ही बहिणांच्या आई-वडिलांचा उल्लेख नाटक येत नाही. या तिघी भाऊ कबीरबरोबर राहत असतात. नाटक सुरू होतं, तेव्हा कबीर अविवाहित असतो, पण दरम्यान त्याचा विवाह होतो. हे कुटुंब आधी मॉस्कोत राहत होतं आणि अकरा वर्षांपूर्वी या लहान गावात आलेलं असतं. ही घटना नाट्याच्या दृष्टीनं वैशिष्ट्यपूर्ण वाटली. सहसा स्थलांतर ग्रामीण भागातून शहराकडे होत असतं. इथं चेकॉव्हने उलटं (रिव्हर्स मायग्रेशन) कथानक रचलं आहे.

गावातले गरीब लोक आणि त्या भल्याथोरल्या वाड्यात राहणारे हे बहीण-भाऊ यांच्यात आर्थिक दरी तर असतेच, शिवाय सांस्कृतिक दरीही असते. त्या सर्वांना अनेकदा मॉस्कोच्या, तेथील रंगीबेरंगी जीवनाच्या आठवणी येतात. त्या़ काळी सैन्यात अधिकारी असण्याला फार मान असायचा. रशियाचा सम्राट झार यांचं सैन्यसुद्धा प्रचंड होतं.

धाकट्या एरिनाचं लग्न झालेलं नसलं तरी गेली अनेक वर्षं गावातलाच सर्फराज तिला सातत्यानं मागणी घालत असतो. कोणत्याही तरुणीप्रमाणेच एरिनालासुद्धा वाटत असतं की, मस्तपैकी लग्न व्हावं आणि छान, मजेत जगावं. पण जीवन जगण्याचा भीषण संघर्ष तिच्या सर्व कोमल भावनांचा कोळसा करतो. ती कंटाळून सर्फराजशी लग्न करायचं ठरवतं, पण तो एका भांडणात मारला जातो.

कबीरला खूप शिकायचं असतं, पण त्यात त्याला यश मिळत नाही. तोसुद्धा गावातल्या एका साधारण मुलीच्या, नताशाच्या प्रेमात पडतो आणि लग्न करून तिला वाड्यावर आणतो. नताशासारखी ग्रामीण भागात वाढलेली आणि त्या तिघी मॉस्कोसारख्या शहरात वाढलेल्या. त्यामुळे त्या सतत नताशाचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पाणउतारा करत असतात. यथावकाश नताशाला मुलगा होतो. त्यानंतर तिचा रूबाब अतोनात वाढतो. कालपरवापर्यंत बहिणींची बाजू घेणारा कबीर बाप झाल्यापासून फक्त स्वतःच्या कुटुंबाचाच विचार करायला लागतो. यावरून बहिणी व कबीर यांच्यात खटके उडतात. कबीर संपत्तीचा काही भाग विकून टाकतो. हेसुद्धा बहिणींना मान्य नसतं.

थोडक्यात नाटकाच्या सुरुवातीला या कुटुंबात असलेलं सुखाचं वातावरण बघताबघता नासत जातं. नाटकाच्या शेवटी स्वतःला उच्चभू समजत असलेल्या पोझोरोव्ह बहिणी वाड्यातून जवळजवळ बाहेर फेकल्या जातात आणि वाड्याची नवी मालकीण होते नताशा. यानंतर काही वर्षांतच रशियात लेनिनने १९१७ साली कामगार क्रांती केली! काही अभ्यासकांच्या मते चेकॉव्हसारख्या लेखकाला या मूलभूत बदलाची चाहूल आधीच लागली होती.

नाटकातील तीन बहिणी तशा एकमेकींपासून दूर असल्या तरी ‘मॉस्कोबद्दलचे प्रेम’ हा त्यांना एकत्र आणणारा धागा असतो. यात चेकॉव्हने एकमेकांवर प्रेम नसलेले लोक एकत्र आणले आहेत. परिणामी नाटकात सतत एक प्रकारचा ताण असतो. मधली बहीण माशा तर सतत नवे कपडे, दागदागिने वगैरेंच्या जगात असते. ती नवऱ्याबरोबर सासरी जायला कधीही तयार नसते. नवरा तिला अक्षरशः बळजबरीनं अधूनमधून सासरी नेतो. ओल्गासुद्धा आता वाटायला लागलेलं असतं की, तिनं योग्य वयात लग्न करायला हवं होतं.

जसंजसं या तिन्ही बहिणीचं जीवन थकत जातं, तसंतसं त्यांचं मॉस्कोला परत जाण्याचं स्वप्नसुद्धा. त्यांना वाटतं राहतं की, आता वडील गेल्यावर या छोट्या गावात राहण्यासारखं काय आहे? त्यापेक्षा मॉस्कोला परत जाऊ व नव्यानं सुरुवात करू. पण या ना त्या कारणानं त्यांना हे शक्य होत नाही. बदललेल्या परिस्थितीत घुसमट सहन करत, अर्थहीन जीवन जगू लागतात.

चेकॉव्हचं हे नाटक म्हणजे जुनी व्यवस्था व नवी व्यवस्था यांच्यातला सनातन संघर्ष आहे. अलिकडेच हे नाटक नाजेरियातील उलथापालथींना समोर ठेवून आणि त्या कालानुरूप बदल करून सादर केलं होतं. नायजेरियात १९६७ ते १९७० दरम्यान नायजेरियाचे सरकार व ‘स्वतंत्र बायफ्रा’ची मागणी करणाऱ्या बंडखोरांत यादवी युद्ध झालं होतं. या पार्श्वभूमीवर ‘थ्री सिस्टर्स’मध्ये अनेक बदल करून प्रयोग सादर करण्यात आला होता. ‘थ्री सिस्टर्स’सारखी चांगली कलाकृती स्थळकाळाच्या मर्यादा उल्लंघून जाते, जाऊ शकते.

मुंबईत सादर करण्यात आलेल्या प्रयोगात दिग्दर्शक अशोक पांडे यांनी एक लांबच्या लांब रंगमंच बनवला होता. तिथं पारंपरिक पद्धतीचा, तीन बाजू असलेला रंगमंच नव्हता. रंगमंचाला एकच बाजू होती. त्याच्या अगदी डाव्या कोपऱ्यात घरातील बैठकीची खोली, मध्यावर जेवणाचं टेबल व अगदी उजव्या कोपऱ्यात विंग होती, ज्यातून पात्रं रंगमंचावर ये-जा करत.

नाट्यसंस्थेतर्फे घेण्यात आलेल्या अभिनय कार्यशाळेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी अभिनित केलेलं हे नाटक होतं. त्यामुळे रंगमंचावर तरुणाई सळसळत होती. दिग्दर्शक अशोक पांडे यांनी सर्व अभिनेत्यांकडून कसून तालीम करवून घेतली असल्याचं पदोपदी जाणवत होतं. फिरोजा सिंग (ओल्गा), शर्वी भुजबळ (माशा), सान्या सागर (एरिना), जेनिफर पिसीनाटो (नताशा) या सर्व मुलींनी दृष्ट लागेल, अशा भूमिका साकार केल्या. खास उल्लेख केला पाहिजे तो मोठी बहीण ओल्गाच्या भूमिकेत असलेल्या फिरोजा सिंगची. अविवाहित, जगण्याला कंटाळलेली, दोन बहिणींची जबाबदारी असलेली आणि स्वतःचं जगणं, स्वप्न, वासना वगैरे विसरूनच गेलेली ओल्गा सर्व नाटकावर पसरलेली दिसते.

दुसरा उल्लेख नताशाच्या भूमिकेत असलेल्या जेनिफरचा. छोट्या गावात लहानची मोठी झालेली, सुरुवातीला नणदांचे टोमणे मुकाटपणे सहन करणारी, शहरी संस्कार, कलासंस्कृतीत काहीही रस नसलेली आणि या सर्वांबद्दल एका प्रकारची तुच्छता असलेली नताशा जेनिफरने ठसक्यात सादर केली आहे. जेव्हा ती जाहीर करते की, ती गरोदर आहे तेव्हा आजूबाजूला तीन बहिणी असतात, ज्यापैकी एकीलाही अपत्य नसतं. यांच्यावर आपण आता कसा सूड उगवत आहोत, याचा आसुरी आनंद तिच्या चेहऱ्यावर व सर्व शरीरातून ओसंडून वाहतो!

चेकोव्ह एकोणिसाव्या शतकातील नाटककार असल्यामुळे त्या काळी जबरदस्त संहिता असलेली नाटकं लिहिली जात असत. ‘थ्री सिस्टर्स’ची संहिता वजनदार आहे. त्यात आधुनिक पद्धतीचं नाट्य नाही, पण जबरदस्त जीवनानुभव, एक भव्य पट आहे.

‘थ्री सिस्टर्स’ बघताना एक विचार सतत मनात होता. एकोणिसावं शतक संपत असताना जगभरातील अनेक समाजात संरजामशाही लयाला जात होती आणि त्याच्या जागी व्यापारी भांडवल (मर्कंटाईल कॅपिटॅलिझम) येत होता. या दोन व्यवस्थांत संघर्ष फारसा झाला नसला तरी एका व्यवस्थेचा अस्त व दुसऱ्या व्यवस्थेचा उगम या संधिप्रकाशाचं चित्रण करत जगातील अनेक कलाकारांनी उत्तमोत्तम कलाकृती निर्माण केल्या. ज्या काळात हे रशियात होत होतं, तेव्हा चेकॉव्ह हा मूलभूत बदल बघत होता.

सत्यजित रॉय यांच्या फारशा माहिती नसलेल्या ‘जलसाघर’ या चित्रपटात कलासक्त जमीनदार, त्याची लयाला जात असलेली जमीनदारी व त्याच्यासमोर उभा राहत असलेला एका व्यापारी; यांच्यातील संस्कृती-संघर्ष संयतशील पद्धतीनं हाताळला आहे. चित्रपटाच्या शेवटी घोड्यावर दूरपर्यंत रपेट मारायला गेलेला जमीनदार थकून कोसळतो व लगेच मरतो. ते एका व्यक्तीचं नसून सरंजामशाही व्यवस्थेचं कोसळणं असतं. तसंच चेकॉव्हच्या ‘थ्री सिस्टर्स’मध्ये त्या तीन बहिणींचं जग त्यांच्या डोळ्यांसमोर लयाला जातं.

.............................................................................................................................................

लेखक प्रा. अविनाश कोल्हे समीक्षक व कादंबरीकार आहेत.

nashkohl@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......