अजूनकाही
‘आस्वाद : भावलेल्या कवितांचा’ हे डॉ. सुधीर रा. देवरे यांचे समीक्षेचे पुस्तक वर्णमुद्रा प्रकाशनाकडून लवकरच प्रकाशित होत आहे. त्यातील हे एक प्रकरण...
............................................................................................................................................................
बहिणाबाई चौधरी यांच्या ‘गुढी उभारनी’ या कवितेच्या प्रत्यक्ष आस्वादाआधी मूळ कविता -
गुढीपाडव्याचा सन
आतां उभारा रे गुढी
नव्या वरसाचं देनं
सोडा मनांतली आढी
गेलसालीं गेली आढी
आतां पाडवा पाडवा
तुम्ही येरांयेरांवरी
लोभ वाढवा वाढवा
अरे, उठा झाडा आंग
गुढीपाडव्याचा सन
आतां आंगन झाडूनी
गेली राधी महारीन
कसे पडले घोरत
असे निस्सयेलावानी
हां हां म्हनतां गेला रे
रामपहार निंघूनी
आतां पोथारा हे घर
सुधारा रे पडझडी
करीसन सारवन
दारीं उभारा रे गुढी
चैत्राच्या या उन्हामधीं
जीव व्हये कासाईस
रामनाम घ्या रे आतां
रामनवमीचा दीस
पडी जातो तो ‘पाडवा’
करा माझी सुधारनी
आतां गुढीपाडव्याले
म्हना ‘गुढी उभारनी’
काय लोकाचीबी तर्हा
कसे भांग घोटा पेल्हे
उभा जमीनीच्या मधीं
आड म्हनती उभ्याले
आस म्हनूं नही कधीं
जसं उभ्याले आडवा
गुढी उभारतो त्याले
कसं म्हनती पाडवा?
गुढी पाडव्याचा सण असल्याने आज आपण सर्वजण गुढी उभारू या. गुढी पाडव्यापासून आपण मराठी नववर्षाची सुरुवात होते असे मानतो. म्हणून या नवीन वर्षाच्या शुभमुहूर्तावर आपल्या मनात कोणाबद्दल आजपर्यंतची जी अढी निर्माण झाली असेल, गैरसमज असतील, ते विसरून जाऊ आणि नवीन वर्षाचा नवा विचार करू या, असे बहिणाबाई सुरुवातीलाच आवाहन करतात.
गेलसालीं गेली आढी
आतां पाडवा पाडवा
तुम्ही येरांयेरांवरी
लोभ वाढवा वाढवा
गेल्या साली म्हणजेच या मागच्या काळात आपल्या मनात एखाद्याबद्दल अढी निर्माण झाली असेलही. पण आज पाडवा हा शुभ दिवस नवीन वर्षाची सुरुवात घेऊन आल्यामुळे आपण सगळ्यांनी एक व्हावे आणि एकमेकांशी आपला लोभ वाढवावा, जुने मतभेद विसरून जावेत असे बहिणाबाई पुढे म्हणतात. (‘येरांयेरांवरी’ हा शब्द अहिराणीसह काही बोली भाषांमध्ये आढळतो. येरांयेरांवरी म्हणजे ‘एकमेकांवर’.)
अरे, उठा झाडा आंग
गुढीपाडव्याचा सन
आतां आंगन झाडूनी
गेली राधी महारीन
आज पाडवा हा सण असल्यामुळे बहिणाबाई अगदी पहाटेच आजूबाजूला झोपलेल्या लोकांना आवाहन करतात, झोपेतून ऊठा, आंगण झाडा म्हणजे आळस झटका, अंघोळी करा. आत्ताच बाहेर राधी महारीन आंगण म्हणजे गल्ल्या झाडून गेली आहे. ज्या काळात कवयित्रीने कविता लिहिली, त्या काळी विशिष्ट एका गावी राधी महारीन नावाची महिला पहाटे गल्ल्या झाडत असावी. बहिणाबाईंच्या तत्कालीन काळातली विशिष्ट जीवन जाणीव, गावपरंपरा या कवितेत अधोरेखित झाली आहे (जातीयवाद नव्हे).
कसे पडले घोरत
असे निस्सयेलावानी
हां हां म्हनतां गेला रे
रामपहार निंघूनी
ज्यांना कवयित्री झोपेतून उठायचे आवाहन करत आहे, ते लोक इतक्या सुंदर पहाटेला अंथरुणात घोरत पडले आहेत. निस्सायेल- निसवायेल हा शब्द अहिराणी बोलीभाषेसह अजून काही बोलींमध्ये आढळून येतो. त्याचा अर्थ आहे निर्लज्ज अथवा कोणतीही काळजी नसलेला. निष्काळजी माणसासारखे झोपून राहिल्यामुळे, घोरत पडल्यामुळे घरावर गुढी उभारायचा जो मुहूर्त असतो रामपहार- रामाची पहार- पहाट तो मुहूर्त निघून चालला आहे, असे कवयित्री आपल्या कवितेत म्हणतात.
आतां पोथारा हे घर
सुधारा रे पडझडी
करीसन सारवन
दारीं उभारा रे गुढी
घर पोतारणे ही एक लोकपरंपरा आहे. पूर्वी ग्रामीण भागात मातीची घरे असत. मातीच्या भिंती असत. अंगण, ओटा, घराची जमीन जशी शेणाने सारवली जात, तशा मातीच्या भिंती सणासुदीच्या दिवशी पांढर्याशुभ्र मातीच्या पाण्याने कापडाच्या साहाय्याने पोतारत असत- सारवत असत. त्याला ‘पोथारा हे घर’ असे बहिणाबाई म्हणतात. भिंतींच्या पडझडी झाल्या असतील तर त्या सुधारा, डागडुजी करा, सारवण करा आणि मग गुढी उभारा असे आवाहन कवितेत आहे. ‘घर’ या शब्दाचाही इथे प्रतीकात्मक अर्थ आहे. घर म्हणजे हे गाव, विश्व, व्यवस्था. ‘पडझडी सुधारा’ याचा लक्षणार्थ- व्यंगार्थही इथे दिसतो. नात्यागोत्यांमध्ये जर काही पडझडी झाल्या असतील तर या शुभ मुहूर्तावर त्या सुधारा. एकमेकांशी गोड व्हा, असा संदेश देण्याचा प्रयत्न कवयित्री करतात.
चैत्राच्या या उन्हामधीं
जीव व्हये कासाईस
रामनाम घ्या रे आतां
रामनवमीचा दीस
चैत्राच्या सुरुवातीला पाडवा आणि लगेच नऊ दिवसांनी रामनवमी येते. चैत्र महिना म्हणजे उन्हाळा. उन्हाळ्यात जीव कासावीस होतो म्हणून रामनवमीच्या निमित्ताने तरी रामाचे नाव घ्या, म्हणजे जीवनातला नकोनकोसा उन्हाळाही थोडा हलका होईल, अशी पारंपरिक लोकसमजूत कवयित्री इथे उदधृत करतात.
पडी जातो तो ‘पाडवा’
करा माझी सुधारनी
आतां गुढीपाडव्याले
म्हना ‘गुढी उभारनी’
गुढी पाडव्याची गुढीच आपल्याशी बोलते आहे, अशी ही रचना असून पडतो तो पाडवा असा जर पाडवा या संज्ञेचा सरळ अर्थ असेल तर मला पाडवा असे न म्हणता ‘गुढी उभारनी’ असे म्हणावे, अशी सुधारणा करण्याचे आवाहन स्वत: पाडवा हा सण आपल्याला करताना दिसतो.
काय लोकाचीबी तर्हा
कसे भांग घोटा पेल्हे
उभा जमीनीच्या मधीं
आड म्हनती उभ्याले
‘पाडवा’ हा शब्द जसा गुढीला छेद देतो, म्हणजे पाडवा याचा अर्थ पडून जाणे असा असूनही गुढी मात्र उभारली जाते. तसाच आड हा जमिनीच्या पोटात सरळ खोल असा उभा गेलेला असूनही लोक त्याला आड म्हणजे आडवा म्हणतात, अशी टिपणी कवयित्री करतात. आणि ज्या लोकांनी आड आणि पाडवा अशा उलट्या संज्ञा तयार केल्यात, ते लोक भांगेच्या नशेत होते की काय अशी आपली शंका बोलून दाखवतात. लोकपरंपरेने- लोकसंचिताने दिलेल्या संज्ञाच कशा विपरीत आहेत, याची चिकित्सा करत आपल्या काही पारंपरिक संज्ञा आणि कृती कशा परस्पर विरुद्ध आहेत, असे दाखवण्याचा प्रयत्न इथे कवयित्री करताना दिसतात.
आसं म्हनूं नही कधीं
जसं उभ्याले आडवा
गुढी उभारतो त्याले
कसं म्हनती पाडवा?
आणि म्हणून शेवटी कवयित्री आपल्या सगळ्यांना आवाहन करतात की, माणसाने उभ्याला आडवे म्हणू नये, तसे पाडवा या सणालाही पाडवा न म्हणता गुढी उभारनी असे म्हणावे. शेवटच्या दोन कडव्यांमध्ये बहिणाबाईंनी त्या काळीही ‘ब्लॅक कॉमेडी’ केली आहे, असे म्हणायला इथे वाव आहे.
............................................................................................................................................................
‘आस्वाद : भावलेल्या कवितांचा’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5173/Aswad-Bhavalelya-kavitancha
............................................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment