अजूनकाही
काही वर्षांपूर्वी बारावीनंतर डी.एड. केले की, तरुणांना मास्तरकीच्या चांगल्या संधी होत्या. बारावीनंतर दोन वर्षं झाले की, मुलं मास्तरकी करत जीवनमान बदलू लागली. मग डी.एड. कॉलेजेसचा बाजार इतका वाढला की, हजारो डी. एड. पदवीधारक बाहेर पडू लागले. त्यातून शासनाची धोरणं बदलली. डी एड. नंतर सीईटी, मग टीईटी पास केल्यानंतरही लाखोंचे डोनेशन दिल्यानंतरच त्यांचा विचार होऊ लागला. गरीब तरुणांसाठी हे अडचणीचं होते. पुढे अशा जागा भरणंही जवळजवळ थांबलं. त्यातून बेकारांची फौज गावोगावी निर्माण झाली. हजारो रुपये घालून शिकलेल्या या तरुणांच्या कुटुंबाची मुलाकडून घराला वर आणण्याची जी अपेक्षा असते, ती पाण्यात जायला लागली. त्यामुळे तरुणांचीच नव्हे त्या पूर्ण कुटुंबाची मानसिक, आर्थिक तुडवण व्हायला लागली. यातून प्रश्नांच्या साखळ्या वाढतच चालल्या.
कैलास दौंड हे वर्तमानाला थेटपणे भिडणारे कादंबरीकार. ‘पाणधुई’, ‘कापूसकाळ’ या कादंबरीनंतर ‘तुडवण’ या कादंबरीतून त्यांनी अनेक सुक्ष्म प्रश्नांच्या ताण्याबाण्यानं मांडली आहे. ही नारायण या डी. एड.धारक सुशिक्षित तरुणाच्या कुटुंबाची शोकांतिका आहे. नवनाथ, राधाक्का, नारायणची पत्नी यांची नारायणसोबत झालेली परवड वाचकांना सुन्न करून टाकते. हेच चित्र आजच्या शिक्षण व्यवस्थेतून येत असेल, तर अशा शिक्षणाचे फलित हेच काय, असा सवालही मनात आल्याशिवाय राहत नाही.
वडील नवनाथ नोकरीच्या डोनेशनसाठी जमीन विकायला तयार होत नाहीत, म्हणून नारायण रागाने घर सोडतो. चंदनचोरी करणाऱ्या टोळीत तो सामील होतो, परंतु त्यात त्याचे मन धजावत नाही. शिक्षणातून हाती काही लागत नाही, म्हणून तो आपला मार्ग बदलतो. नारायण उल्हासनगर गाठतो. तिथं गाडी शिकायच्या इच्छेने क्लीनर म्हणून सिंधी शेठकडे राहतो. तिथं अर्धपोटी राहत, गॅरेजमध्ये डास उंदराच्या सान्निध्यात तो दिवस काढतो. आपण गाडी शिकून लायसन मिळवावे, गाडीवर किंवा जमल्यास बसचा ड्रायव्हर व्हावे, अशी स्वप्ने त्याला पडतात.
दरम्यान त्याला गावाकडे मेव्हण्याने ठरवलेल्या मुलीबरोबर लग्न करावे लागते. लग्नानंतरही तो परत गाडीच्या लायसनसाठी गाव सोडून उल्हासनगरला जातो. जीवनात बायको आल्यामुळे त्याची टेम्पो घेऊन गावात स्थिर व्हायची इच्छा बळावते. त्यासाठी आई राधाक्क्का पती नवनाथला बळजबरीने जमीन विकायला भाग पाडते. टेम्पो घेतल्यावर आपले कुटुंब वरती येईल, असं नारायणला वाटतानाच उद्विग्न नवनाथ रागाने घर सोडून गावातून बेपत्ता होतो. एकानंतर एक संकटांत भरच पडते आणि त्या कुटुंबाच्या जगण्याची जी तुडवण होते, ती कैलास दौंड यांच्या शब्दांत वाचावी अशीच आहे.
या कादंबरीतून कोरडवाहू शेतीतले अनेक प्रश्न बारकाव्यानं आलेले आहेत. निरुपयोगी शिक्षणप्रणाली, बेभवशाची शेती, राजकारण, विकासापासून वंचित असलेल्या बकाल वाड्या-वस्त्या, छिन्न गावपरिसर, शहरी चमकदमक, कौटुंबिक घुसमट, भ्रष्टाचार, व्यक्तीप्रवृत्ती, मानवी हव्यासाचं छोट्याच प्रसंगातून केलेलं अचूक चित्रण लेखकाने प्रभावीपणे दाखवले आहे.
कादंबरीत रोह्यला, जमनी, तुकाराम, रुपली, भास्कर तोडकर, विष्णू ही काही पात्रेही आपापली स्वप्न, दु:खे, रागलोभ घेऊन कादंबरीला आकार देतात. कादंबरीत अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी परिसरारातली बोलीभाषा कादंबरीतल्या प्रसंगाला पूरक अशीच आहे. परिसरातले शब्द, वाक्प्रचार, म्हणी जागोजागी आल्यानं निवेदन प्रवाही झाले आहेत. उदाहरणार्थ पुढील म्हणी बघा- ‘उठ रे चिंदा, त्योच धंदा’, ‘काय मह्या घरात आन् वक मह्या दारात’ इत्यादी.
कादंबरीतली बोलीभाषा या कादंबरीचे बलस्थान म्हणावे लागेल. लेखनात चित्रमयता असल्याने प्रसंग ठळकपणे समोर उभे राहतात, कादंबरीत संवाद कमी आणि निवेदन अधिक आहे. काही वेळा तर ते दोन पानी दीर्घ येते, परंतु त्यामुळे कथनाची लय बिघडत नाही किंवा विस्कळीत वाटत नाही. कारण कादंबरीचे दमदार निवेदन व वाचनीयता हे तुडवणचे वैशिष्ट्य आहे.
गाव आणि शहरं प्रश्नाने वेढली आहेत. जगण्याच्या लढाया दोन्हीकडे चालूच आहेत. गाव-शहरात आता विशेष अंतर नाही. गावात मत्सर हेवेदावे, सत्शील माणसे, सारेच आहे. मंदिराच्या सप्ताहासाठी लोक पट्टी करतात, परंतु शाळा डिजिटल करायच्या खर्चासाठी शिक्षक बाहेरगावी जाऊन पट्टी मागतात, अशा अनेक विसंगती लेखक मांडतो. गावी इतरांसाठी हळहळणारी माणसे आहेत, तोंडापुरतं झटणारी माणसं आहेत. तशी भास्कर तोडकरसारखी पोटात पाप ठेवणारी उलट्या काळजाची माणसे आहेत. शिक्षणातून नोकरीची अपेक्षा ठेवणे तरुणांनी सोडून दिलंय, ते आपल्या कुवतीनुसार जगण्याचे मार्ग शोधत आहेत. संघर्ष करत आहेत.
कैलास दौंड यांचा नारायण शिक्षणव्यवस्थेला दोष न देता जगण्याचा लढा चिवटपणे लढतोच. तो कापसाच्या गाड्यावर रोजंदारीनं जातो, ट्रकवर क्लीनर होतो, आजच्या तरुणाईचे हे प्रतिनिधीक रूप लेखकाचे वेगळेपण आहे. तो मास्तरकीच्या नोकरीची आशा सोडून अनेक पर्याय शोधतो, हे मला महत्त्वाचे वाटते.
कादंबरीत अनेक नाट्यमय प्रसंग आहेत, परंतु त्यास अनावश्यक न वाढवता तटस्थपणे लेखक पुढे जातो. राधाक्कावर अत्याचाराचा प्रसंग झाल्यानंतर नवनाथ, नारायण, जमिनीची मानसिक आंदोलने टिपायला लेखक विसरला की, संपादनात ती वगळलीत, हे मला समजले नाही. कारण राधाक्का हे महत्त्वाचे पात्र या प्रसंगानंतर खूपच वेगळे होऊन जाते. या प्रसंगाचे वर्णन अतिशय कौशल्याने लेखकाने हाताळले आहे. कुटुंबाची आंदोलने स्पष्टपणे यायला हवी होती.
‘तुडवण’ ही आजच्या तरुण पिढीची काटेरी शोकात्म व्यथाच आहे. ही जेव्हा संपली तेव्हा प्रचंड अस्वस्थ झालो. नारायणबाबत घडलेला शेवटचा प्रसंग वाचताना काळजात कालवाकालव झाली. तो प्रसंग सांगणे इथे उचित नाही, तो मुळातून वाचावा.
‘तुडवण’ शिकलेल्यांच्या प्रश्नाविषयी सजग करते. यामध्ये एक अख्खा गाव अनेक प्रश्नाच्या सोबतीनं ठळकपणे उभा राहतो. जो तुमचा माझा कोणाचाही असू शकेल. गाव, दुष्काळ, कोरडवाहू शेतकऱ्याची जगण्याची धडपड, शिक्षणव्यवस्थेतील फोलपणा, तरुणांचं अंध:कारमय भविष्य, नातीगोती, रिवाज, पैशासाठी पायदळी चाललेली माणुसकी, याचे विस्मयकारक जग या कादंबरीतून लेखकाने उभे केले आहे. हे जग आजच्या वर्तमानाचेच भयावह प्रतिबिंब आहे.
सतीश भावसार यांनी रंगवलेले कादंबरीचे आशयपूर्ण मुखपृष्ठही वेधक आहे. निष्पर्ण होत जाऊन मोडलेलं झाड आजच्या तरुणाईचं प्रतीकात्मक रूप चित्रकारानं छान रंगवलंय. गावामागे काळा डोंगर, युवकाच्या भोवती उदास करडा रंग त्यानी सूचकपणे वापरला आहे.
.............................................................................................................................................
‘तुडवण’ या कादंबरीच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5176/Tudawan
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment