पुलं म्हणजे बाई अगदी पुलं...
ग्रंथनामा - झलक
मेघना पेठे
  • ‘पुलं - असा असा मी’चे मुखपृष्ठ
  • Fri , 10 January 2020
  • ग्रंथनामा Granthnama झलक पुलं - असा असा मी पु. ल. देशपांडे Purushottam Laxman Deshpande मेघना पेठे Meghana Pethe

२०१९ हे पुलंचं जन्मशताब्दी वर्ष. त्यानिमित्त साहित्य-संस्कृती मंडळाने ‘पुलं - असा असा मी’ हा गौरवग्रंथ नुकताच प्रकाशित केला आहे. तो प्राध्यापक व समीक्षक राजशेखर शिंदे यांनी संपादित केला आहे. तब्बल सव्वापाचशे पानांच्या या गौरवग्रंथात जवळपास ६० लेख आणि दोन परिशिष्टे आहेत. यात दिनकर गांगल, हर्षवर्धन निमखेडकर, मंगला गोडबोले, स. गं. मालशे, मुकेश माचकर, विजय भटकर, उमा कुलकर्णी, राम गबाले, अरुणा ढेरे, सुधीर गाडगीळ, सतीश जकातदार, शांता शेळके, सुशील धसकटे, अशा मान्यवर लेखकांचे लेख आहेत. हा त्यातील एक लेख...

.............................................................................................................................................

‘पृथ्वी सूर्याभोवती फिरते’ या निष्कर्षालासुद्धा आपले पोस्ट मॉडर्न देशी बंधू ‘कशावरून?’ अशा प्रश्‍नाची घुंगुरकाठी आपटत एक वेळ आव्हान देतील; पण ‘पुलं मोठा माणूस होता’ हे विधान ‘सूर्य पूर्वेला उगवतो’ या विधानाइतकंच बेलाशक खात्रीनं करता येईल.

पुलं म्हणजे बाई (किंवा बुवा!) अगदी पुलं आहेत! हे पुलंच्या अट्टल चाहत्यांचं लाडकं विधान! हजारो वेळा ऐकू आलेलं. यावर बोलताना आमचा एक समीक्षक मित्र (बर्‍याच समीक्षकांसारखा हाही किंचित् सिनिक असतो) म्हणाला होता- ‘तसं तर वपु म्हणजेही वपुच किंवा विश्‍वास पाटील म्हणजेही विश्‍वास पाटीलच की! अरे, लोकप्रियता आणि पुस्तकांचा खप हेच काय मोठेपणाचे निकष आहेत काय? मी तर ते ‘कोते’पणाचे निकष मानायलाही तयार आहे.’

‘अय्या, पण पुलं काही फक्त लिहीत नाहीत. त्यांना किती गोष्टीत केवढी गती... गाण्यातलं कळतं, नाटकातलं जमतं...’

यावर तो उसळला. ‘आता हे काय नवीनच? मी म्हणतो गती म्हणजे सगळ्याची माती! नेमाड्यांना नृत्यात गती नव्हती आणि ग्रेस, जीएंना राजकारण वा गाणं यात गती नाही, हे आमचं भाग्यंच की. लता मंगेशकर डॉक्टर नाही झाली आणि सच्या गणितात कच्चाच म्हणून बरं... नाहीतर च्यायला, त्यांनी जे करून ठेवलं, ते कोण करणार होतं?’ यावर आम्ही सगळे गप्प. कारण यातला अतिरेकी अभिनिवेश वगळला, तरी यातलं तथ्य नाकारता येत नव्हतं.

मग मध्येच एकदा ‘आहे मनोहर तरी’ थडकलं. त्यानंतर समर्थन, निरसन वा निराकरण यांपैकी कुठल्याच निमित्ताचा आधार घेऊन पुलंनी ‘तेरे फूलों से भी प्यार, तेरे काँटो से भी प्यार’ या आपल्या आयुष्यविषयक भूमिकेला एकाही शब्दानं डागाळलं नाही. एखाद्या सच्च्या सुरानं, चित्रानं वा शब्दानं डागाळलं नाही. एखाद्या सच्च्या सुरानं, चित्रानं वा शब्दानं गहिवरून गप्प होतानाची त्यांची अभिजात अभिरुचीच यातही प्रत्ययाला आली. अर्थात, आमच्या समीक्षक महोदयांनी निराळी शक्यता वर्तवलीच. ‘असं पाहा, या गप्प बसण्यात बरं का, I am not deaf, nor am I dumb, but I am just choosing to ignore you! अशी अहंमन्य भूमिकाही असू शकते.

या वेळी मात्र ती अट्टल पुलंवादी तितक्याच शांतपणे त्याला म्हणाली- ‘कधी कधी रागावलेलं, रुसलेलं मूल आईचे केस ओढतं. तिला ओरबाडातं आणि मग थकून तिच्यात खांद्यावर मान टाकतं. आता मुलाचा हा आकांत समजून घेतला आणि म्हणून आईनं मुकाट मार सोसला, तर दुबळीही नसते वा अहंमन्यही! आपली भूमिका, आपले नाईलाज, आपली माया आणि तिच्या मर्यादा समजलेली ती एक खंबीर व्यक्ती असते इतकंच!’

अर्थात् काहीही न करता, बोलता, लिहिताही महाराष्ट्राचं लाडकं वगैरे होऊन बसलेल्या पुलंसारख्या लोकजीवी माणसाच्या वाट्याला पावलोपावली अन्वयाचे सार्थ-निरार्थ काटे येणं अटळच आहे.

चुकली दिशा तरीही, आकाश एक आहे

हे जाणतो तयाला, वाटेल तेथे न्या रे!

असं जे आपल्या विंदांनी म्हणून ठेवलंय, त्यांची पुलंसंदर्भात मला नेहमीच आठवण आशय रक्तातून कळल्याप्रमाणे पुलंनी स्वतःला वाटेल तेथे नेले. ते नाचले, बोलले, त्यांनी सिनेमे काढले, नाटकं केली, पेटी वाजवली आणि लिहिलेसुद्धा!

यातली कुठलाही एकच गोष्ट करण्यात आपल्या जन्माचं प्रयोजन आहे, असं त्यांनी मानलं नाही. एखाद्यानं मळलेल्या दिशाहीन, निर्हेतूक पावलं ओढता ओढता वाटेत लागलेला डोंगर चढावा तो चढता चढता, दुसर्‍याच डोंगराच्या ओढीनं आधीचा उतरावा आणि मग तिसराच, तसं त्यांनी केलं. आपल्या तात्कालीक, पण अनावर उर्मींना न्याय देणारा आत्मदंग प्रवास आहे.

या प्रवासात कुठल्याच शिखरावर ते पोचले नाहीत, हे खरं. पण या प्रवासात मळलेल्या पायवाटेवरून पाय ओढणार्‍या जथ्याचं गर्दीतलं एकटेपण त्यांना समजलं; त्याचबरोबर निराळाच हाकारा ऐकू आल्यावर एकट्यानं उरफोडी चढण चढून, शिखरावर जाऊन बसलेल्या दिग्गजांचं एकाकी प्राक्तनही. हे समजल्यावरही त्यांनी एकाची कीव केली नाही वा दुसर्‍याची असूया. कदाचित त्या दोघांबरोबरीनं आपल्या स्वतःच्या वाटेकडेही त्यांनी करुणेनंच पाहिलं. असं पाहताना कधी कुणाच्या पाठीवरून हात फिरवला, कधी लवून कुणाच्या पायाला लावला, कधी दुरून हात जोडले, कधी पाठीवर थाप दिली आणि कधी कुणाला ऐकू येवो न येवो, अशी एकट्यानंच टाळी वाजवली. या जाणत्या रसिकतेत पुलंचा मोठेपणा गोळीबंद झाला आहे.

पुलंच्या आयुष्यानं किती वळणं घेतली आणि त्यांनी आयुष्याच्या किती तर्‍हा पाहिल्या! एकाच आयुष्यात पुलंनी गरिबीचे चटके भोगले, मध्यमवर्गाची कुचंबणा साहिली आणि श्रीमंतीचं सुखही उपभोगलं. एकाच आयुष्यात त्यांनी कारकुनी केली. आकाशवाणी आणि दूरदर्शनसारख्या सरकारी माध्यमांत अधिकारपदं गाजवली, शाळा-कॉलेजात शिकवलं, अगदी गप्पांपासून गाण्यापर्यंतच्या कितीतरी मैफिली जमवल्या आणि रंगवल्या. नाटक-सिनेमांसारख्या सांघिक कलांच्यात अभिनयच नव्हे, तर दिग्दर्शनही केलं. जगभर प्रवास केले. या सार्‍या काळात त्यांना किती चेहर्‍यांची आणि स्वभावांची माणसं भेटली, किती तर्‍हांची आयुष्य जवळून निरखता आली, किती प्रसंग आले आणि किती घटना घडल्या असतील, याची साधी कल्पना करणंही थकवणारं आहे. पण हे सारं असूनही त्यांच्या लिखाणात मात्र या निबीड घनदाट अनुभारण्याचं सखोल आणि समग्र दर्शन कधीच झालं नाही!

जीवनकलहाचे हे कल्लोळ आणि त्यांची अनवट गुंतागुंत, षडरिपुंचं हे मायालाघव, नियती आणि कर्मगतीचं हे अहिनकुल द्वंद्व यांना दिसलं तर निश्‍चित. तसं ते इतरही अनेक निनावी भाग्यवंतांना दिसलं आहे. पण इतर अनेकांत आणि सुजनशील कलावंतांत एक महत्त्वाचा गुणात्मक फरक असतो. कलावंताला नुसतं दिसत नाही, तो ते पाहतो. दिसणं हे वरवरचं आणि तात्कालीक असू शकतं. पण पाहणं हे समूळ, समग्र असावं लागतं आणि या पाहणार्‍याला सगळ्यांचं सगळंच साहण्याचा शाप असतो. साहण्याचा हा शाप स्वीकारणारा माणूसच निर्मितीच्या वणव्यात शिरतो आणि तिथे शिरल्यानंतर कुठलेच चतुर, कातडीबचाऊ पवित्रे कामी येत नसतात. पुलंना हे ठाऊक नसण्याची शक्यता नाही. आणि तरीही निव्वळ विनोदाचं घोंगडं पांघरून नॉस्टॅल्जियाचा खुळखुळा वाजवत काही जणांना काही काळ रिझवण्याचा निर्णय त्यांनी घेतला. हे आपल्यासारख्या वाचकांचं दुर्दैव तर आहेच, पण त्याहूनही त्यांनी स्वतःवरच केलेला हा घोर अन्याय आहे. माझे आजोबा शाळेत शिक्षक होते. अनेक वर्षांच्या अनुभवानंतर, त्यांना आपल्या विद्यार्थ्यांची कुव्वत झटक्यात जोखता यायची आणि ते त्याचं रेटींग् टक्क्यांमध्ये (मनोमन) करून टाकायचे. मॅट्रिकनंतर पुढे होऊन येणार्‍याला ते म्हणायचे, “अरे, मला वाटलं होतं, तू निदान ५२ चा. तुला फक्त ४५ रे का मिळाले?”

असं देवाघरचं लेणं घेऊन पुलं आले आणि इतक्या तर्‍हांचं भरभरून देऊ लागले, ते पाहत, चित्रगुप्तही त्यांना कदाचित असंच विचारेल काय असं वाटतं - “अरे मला वाटलं तू किमान ७० चा! तुला ५२ च का रे मिळाले?”

पुलंच्या लाडक्या पेटीची प्रतिमा वापरायची, तर तिथल्या सर्व शुद्ध, कोमल सुरांची आणि श्रुतींची जाणकारी असलेला हा माणूस एकच सुरावट बोट धरून बसला हे कठीणच! उदाहरणादाखल बोलायचं झालं, तर त्यांची चाळ, चाळीतले सर्व उदास, भीषण, रटाळ, कुरूप आणि मनुष्यत्वच कुचंबित करणारे सांदीकोपरे टाळून या आनंदयात्रीनं ही चाळ सुसह्यच नव्हे, तर सुंदर केली आहे! आणि चिंतनात तर परस्परांबद्दलचा समस्त जिव्हाळा, प्रेम आणि आदर फक्त चाळीतच जिवंत होता आणि असेल, असंही सुचवलं आहे. चाळीतले अनुभव असणार्‍या माझ्यासारख्यांना हे निव्वळ अचंबितच करतं. (पार्ल्याच्या ब्लॉकमध्ये राहून पुलंना जे कळलं, ते आपल्याला सापडायचं राहून गेलं, याची खंत वेगळीच!)

थोडक्यात काय, तर आयुष्याचे हे निवडक वेचे म्हणजे साहित्य नव्हे. मोठं तर नव्हेच! तर एकूणातच, पुलंचा साहित्यिक मोठेपणा वादातीत नाही. जसं त्यांचं साहित्य कालातीत नाही. त्यांनी रंगवलेल्या शेकडो मैफिली आणि त्यांचे साक्षीदारही काळाच्या पडद्याआड जातील. जसे त्यांच्या नाटकासिनेमांचे! तरीही जिथे स्वतःचं थिटेपण त्यांना जाणवलं, तिथेही दुसर्‍याच्या मोठेपणाला मुजरा करण्याची त्यांची दिलदार वृत्ती आणि वाट्याला आलेली सगळी यशापयश आणि चढउतार रिचवूनही कटुतेचा स्पर्शही नसलेला, प्रेम आणि पैशांसकट सारं गरजूंवर उधळणारा फकिरी बाणा... पुलंचं हे सांस्कृतिक योगदान मोठं आहे.

पुलं हसता हसता अंतर्मुख व्हायला लावतात, असा एक गुळगळीत झालेला वाक्यप्रचार मराठी विनोदी समीक्षेत रूढ आहे. पण पुलं स्वतः मात्र अंतर्मुख होता होता हसू लागलात! ही त्यांच्या पुलंपणाची व्याख्या म्हणूयात किंवा त्यांच्या विनोदी लेखणाची महत्ता. पण माझ्या मते निखळ साहित्यिक म्हणून ही त्यांची मर्यादाही आहे. बाकी म्हणायचं म्हटलं तर मात्र ‘पुलं म्हणजे बाई, अगदी पुलं आहेत!’

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे.......

जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक.......