कांद्याचे अत्तर
संकीर्ण - व्यंगनामा
मुकुंद टाकसाळे
  • प्रातिनिधिक चित्र
  • Mon , 16 December 2019
  • संकीर्ण व्यंगनामा कांदा Onion कांद्याचे अत्तर कांद्याचा पर्फ्युम कांदा पुराण मुकुंद टाकसाळे Mukund Taksale गमतीगमतीत Gamtigamtit

मध्यंतरी कांदा बराच महाग झाला होता. पावणेदोनशे रुपये किलोच्या घरात जाऊन पोहचला होता. त्यामुळे तो वर्तमानपत्रे, वृत्तवाहिन्या यांच्या बातम्यांचा, चर्चेचा विषय झाला होता. आता परत कांदा स्वस्त होऊ लागला आहे. १९९८ सालीही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. तेव्हा प्रसिद्ध विनोदी लेखक मुकुंद टाकसाळे यांनी लिहिलेला हा लेख... त्यांच्या पूर्वपरवानगीसह पुनर्मुद्रित स्वरूपात... 

.............................................................................................................................................

कांदा आता स्वस्त होतो आहे, ही नक्कीच आनंदाची गोष्ट आहे.

मध्यंतरीचा काळ खरोखरच फार खडतर होता. कांद्यानं स्वत:ला महाग करून गृहिणी, सर्वसामान्य जनता, हॉटेलवाले, राजकारणी, भाजप या साऱ्यांच्याच डोळ्यात पाणी आणलेलं होतं. ‘कांद्यानं डोळ्यात पाणी आणणं’ ही कोटी मराठी-इंग्रजी (कदाचित इतर भाषांमधल्यासुद्धा असेल, आपल्याला काय ठाऊक?) वर्तमानपत्रांत, साप्ताहिकांत आणि अन्य नियतकालिकांत मधल्या काळात इतक्या वेळा वापरण्यात आली की, दर वेळी तीच तीच कोटी वाचूनही वाचकांच्या ‘डोळ्यात पाणी’ उभं राहिलं असेल. तेव्हा आता जो जमाना संपला. ही कोटी वाचण्याची, प्रिय वाचकहो, ही बहुधा शेवटचीच वेळ ठरेल आणि या आनंददायक कल्पनेनंच जर तुमच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहणार असतील, तर ‘वर्तमानपत्री’ कांद्यानं डोळ्यात आणलेलं हे (आनंदाचं का होईना, पण) शेवटचंच पाणी ठरेल. यापुढे मात्र पाणी म्हणजे खरा कांदा कापतानाच डोळ्यात येईल ते! (ही शेवटचीच संधी, त्यामुळे ‘पाणीदार’ कोट्यांचा मोह आवरत नाही.)

‘आपण कांदा खरेदी करण्यासाठी अमूकदिवशी जाणार आहोत, तेव्हा पोलिसांनी आपल्याला ‘पोलीस प्रोटेक्शन पुरवावं’ ही मागणी करणं, हा जसपाल भट्टीचा ‘स्टंट’ होता, पण मध्य प्रदेशात खरोखरच एका भेळवाल्याला सुरा दाखवून त्याच्याकडले कांदे लुटले. ही बातमी टीव्हीवर सांगितल्यानंतर अनेक भेळवाल्यांनी कांदा ठेवणंच बंद करून टाकलं. ते (म्हणे) कोबी कापून तो कांद्याऐवजी द्यायचे. अश्वत्थाम्याला दुधाऐवजी पिठात पाणी मिसळून दिल्यावर किती वाईट वाटलं असेल, याची अशा वेळी कल्पना येते.

मुंबईत हॉटेलवाल्यांनीसुद्धा पंजावी जेवण मागितल्यावर अगोदर येणारा फुकटचा कांदा बंद करून टाकला. या उलट काही पंजाबी हॉटेलवाल्यांनी (विशेषत: सरदारजींनी) आपल्या मेनूमध्ये ‘खास डिश’ म्हणून ‘फक्त कांदा’ (‘लासलगाव दा गंडा’ या पंजाबी नावाची) ही सर्वांत महागडी डिश नव्याने निर्माण केली. (गंमत म्हणजे ही डिश ऑर्डर करणाऱ्यांना ते नंतर जेवण फुकट द्यायचे.) काही फाइव्ह स्टार हॉटेलातसुद्धा कांद्याच्या पदार्थातच स्पेशल फेस्टिव्हल (फूड फेस्टिव्हल ओनियाना) आयोजित करण्यात आलं. तिथे जाणाऱ्यांना ‘आपण महागातला महाग पदार्थ खाल्ला’ हे समाधान हवं असतं. ते मिळावं, एवढाच या फेस्टिव्हलमागचा हेतू!

पूर्वी अंगाला, घामाला कांद्याचा वास येणं, ही गरिबांची मक्तेदारी होती आणि ‘गरिबी’ची खूण होती. कांदा महागला त्या काळात तसा वास अंगाला येणं, हे लोक श्रीमंतीचं लक्षण मानू लागले. पूर्वी कुणी बोलायला तोंड उघडलं आणि तोंडाला कांद्याचा वास आला की, लोक त्याच्याकडे तुच्छतेनं बघायचे. म्हणून श्रीमंत लोक कांदा खाल्ल्यावर मुद्दाम पेस्टनं दात घासायचे आणि तोंडात सुगंधी फवारा मारायचे. मधल्या काळात काही बड्या कंपनीतील एक्झिक्युटिव्ह मंडळी जेवण झाल्यावर कांद्याच्या वासाचं तोंड न धुता तसंच ठेवू लागले ‘शो ऑफ’ करायला. मुद्दाम ते आपलं तोंड पोरीबाळींच्या जवळ न्यायचे. त्यांच्या कानात उगाचच काहीतरी (स्वीट नथिंग्ज) कुजबुजायचे. हेतू हा की, मुलींवर ‘हा खूप श्रीमंत आहे’ असं इम्प्रेशन पडावं.

पण रोज कांदा खाण्याची चैन साऱ्यांनाच कुठली परवडायला? मग जे नवश्रीमंत होते किंवा जे श्रीमंत नव्हते, पण ज्यांना श्रीमंती दाखवण्याची हौस होती, त्यांच्यासाठी काही कल्पक उद्योजकांनी ‘ओ द्वान्यो’ ही फ्रेंच नावाची अस्सल भारतीय कंपनी उघडली. त्या कंपनीनं फ्रेंच नावं असणारा कांद्याच्या वासाचा बॉडी स्प्रे (ल व्हापोरी झातर द्वान्यो), कांद्याच्या वासाचे अत्तर (ला पारफाँ द्वान्यो), अशा नवनव्या गोष्टी बाजारात आणल्या. एकदा का हे अत्तर अंगाला लावून (किंवा हा फवारा अंगावर मारून) बाहेर पडलं की, तो गंध दिवसभर टिकण्याची गॅरेंटी होती. तोंडात (म्हणजे तोंडाच्या आत) मारण्याचाही असाच एक फवारा (ल प्युलव्हेरी झातर व्ह्यू पारफाँ द्वान्यो) बाजारात आणलेला होती. त्याच्याही किमती अफाटच होत्या. त्या किमती ऐकूनच अनेकदा तोंडात मारल्याचा ‘फील’ यायचा. पण रोज कांदा विकत घेऊन खाण्यापेक्षा ते केव्हाही परवडणारं होतं. हे पर्फ्युम एवढे पॉप्युलर झाले की, त्यांना खुन्नस देण्यासाठी दुसऱ्या एका फ्रेंच कंपनीनं ‘शाहरुख खान’ नावाचा सेंट बाजारात आणला. पण आता कांदा स्वस्त होऊ लागल्यानं या ‘कांदा-गंधा’च्या पर्फ्युमच्या किमती कमी होतील किंवा कदाचित बाजारातून ही उत्पादनं नष्टही होतील.

या महागड्या सेंटमुळं मात्र मुंबईच्या काही श्रीमंतांचा जीव चांगलाच धोक्यात आलेला होता. इन्कम-टॅक्सवाल्यांनी ‘टॅक्स कुणी भरायचा’ याचे काही निकष ठरवले आहेत. स्वत:ची चारचाकी गाडी, फ्लॅट इत्यादी. त्याच पद्धतीवर खंडणीवाल्यांनीही ‘खंडणी कुणाला मागायची’ याचे आपले म्हणून निकष ठरवले आहेत. एखाद्याच्या उत्पन्नाची इन्कम टॅक्सवाल्यांना नसेल एवढी माहिती या खंडणी मागणाऱ्यांपाशी असते. पण मधल्या काळात खंडणीवाले आणि इन्कम टॅक्सवाले यांनी फक्त ‘कांद्याचा अंगाला किंवा तोंडाला येणारा वास’ एवढाच एकमेव निकष ठरवलेला होता. इन्कम टॅक्सच्या अधिकाऱ्यांनी मध्यंतरी कांद्याच्या व्यापाऱ्यावर जशा धाडी घातल्या, तशा कांदा खाणाऱ्यांवरसुद्धा धाडी घातल्या. खंडणीवाल्यांच्या फोनवरचं तर संभाषण अगदी ठरलेलंच होतं –

‘हॅलो… भाई ने चार लाख देने को बोला है’

‘मगर मेरे पास इतना पैसा नहीं है’

‘ए…ज्यादा श्याणा मत बन. तेरे थोबडे को कांदे का वास मार रहा था ना कल… वो वास बता रहा था तेरे पास कितने पैसे हैं ये…’

अनेक श्रीमंतांनी खंडणीचा ससेमिरा मागं लागू नये म्हणून तोंडात आणि अंगावर नेहमीचे फ्रेंच फर्फ्युम्स पुन्हा मारायला सुरुवात केली. कुणी गरीब समजलं तरी हरकत नाही, पण खंडणीची नसती कटकट मागं लागायला नको.

कांदा महाग होता त्या काळात लोकांच्या बोलण्याचे सारे संदर्भच बदलून गेलेले होते. आपल्या दोन्ही जावयांचे दिवाळसण यथासांग पार पाडणाऱ्या शैलाताईंचं तिसऱ्या जावयाच्या दिवाळसणानंतर शेजारणीशी झालेलं हे संभाषण मोठं मनोरंजक आहे –

‘काय शैलाताई, काय म्हणतोय दिवाळसण?’

‘आमचा हा जावई संजय… आता बोलू नये… आमच्या प्रियाचाच नवरा पडतो… पण नंबर एकचा शिष्ट आहे. पहिले दोन जावई त्या मानानं सरळ होते हो… ते प्रेमानं आले. आम्ही जे खायला घातलं ते खाल्लं. आम्ही जी वस्तू भेट दिली ती निमूटपणे घेतली. यानं मात्र आल्या आल्याच जाहीर केलं – ‘मला भेटबिट काही देऊ नका. जेवणसुद्धा पक्वान्नाचं नको. गोड खाऊन खाऊन तोंडाची चवच गेलेली आहे. त्यापेक्षा मस्तपैकी कांद्याचा झुणका आणि बाजरीची गरमागरम भाकरी असा बेत करा. जोडीला कच्चा कांदा!’ आता तुम्हीच सांगा, दिवाळीत कुणी झुणका-भाकरी मागतं का? पण एकदा अडवणुकीचंच धोरण स्वीकारायचं ठरवलं आणि सासऱ्याला खड्ड्यातच घालायचं ठरवलं तर त्यावर काय बोलणार? बरं, मुलगी तिथं नांदणार असल्यानं काही बोलताही येत नाही हो… आपलचे दात आणि आपलेच ओठ… फक्त तुम्हाला म्हणून सांगत्ये, आमच्या पहिल्या दोन जावयांचं पुष्कळ बरं म्हणायचं. या तिसऱ्या जावयाचा दिवाळसण आम्हाला खूपच महागात पडला. यांनी तर हाय खाऊन दिवाळीनंतर अंथरुणच धरलं आहे.’

आणखी एक असंच मजेशीर संभाषण दिवाळीनंतर कानावर पडलं. छोटा बंडू आपल्या बापाला म्हणाला, ‘पप्पा, पप्पा, माझा मेंदू खूप भारी आहे का हो?’

‘बाळ, अशी शंका तुला का बरं आली?’

‘आमचे टीचरच म्हणाले तसं’

‘काय सांगतोय काय?’

‘अहो खरंच, ते म्हणाले, बंडू डोक्यात नुसते कांदे-बटाटे भरलेत!’

यावर खूश होण्याच्याऐवजी पप्पा एकदम घाबरून त्याला चूप करत म्हणाले, ‘गधड्या, हे बाहेर मोठ्यानं बोलू नकोस. एखादा चक्रम ते कांदे-बटाटे पळवण्यासाठी डोकं फोडायलाही कमी करायचा नाही, समजलं?’

.............................................................................................................................................

हा मूळ लेख मुकुंद टाकसाळे यांच्या ‘गमतीगमतीत’ या १९९९ साली अनुभव प्रकाशनातर्फे प्रकाशित झालेल्या पुस्तकातून घेतला आहे.

.............................................................................................................................................

लेखक मुकुंद टाकसाळे प्रसिद्ध विनोदी लेखक आहेत.

mukund.taksale@gmail.com

.............................................................................................................................................

मुकुंद टाकसाळे यांच्या ‘मुका म्हणे’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/3459

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......