सध्या तरी मी निखिलचा नंबर ‘‘निखिल ‘मन्नत’ महाजन’’ म्हणून सेव्ह केलाय!
सदर - इनसाइडर
अमोल उदगीरकर 
  • दिग्दर्शक निखिल महाजन आणि ‘पुणे ५२’ व ‘बाजी’ या चित्रपटांची पोस्टर्स
  • Sat , 07 December 2019
  • इनसायडर Insider अमोल उदगीरकर Amol Udgirkar निखिल महाजन Nikhil Mahajan पुणे ५२ Pune 52 बाजी Baji संदीप रेड्डी वनगा Sandeep Reddy Vanga अर्जुन रेड्डी Arjun Reddy बेताल Betaal शाहरुख खान Shahrukh Khan

तो काळ मोठा विचित्र होता. अनुरागसोबत होणाऱ्या फिल्मचं काय होईल ते माहीत नव्हतं (किंबहुना अजूनही माहीत नाही). मी वर्तमानपत्रात, वेबपोर्टलवर चित्रपटविषयक लिखाण जवळपास थांबवलं होतं. फेसबुकवर मोठमोठे स्टेट्स टाकून लाईक्स मोजायचे आणि स्वतःची पाठ थोपटून घ्यायची असे ते निरर्थक दिवस. मी आठवडा आठवडा बिल्डिंगच्या बाहेरही जात नव्हतो. फारच नाईलाज झाला तर फोन करून करून कंटाळलेल्या मित्रांचे फोन उचलायचो. मला हा कम्फर्ट झोन प्रचंड आवडायला लागला होता. मी आयुष्यभर असं राहू शकलो असतो. मला आवडतं जगापासून तोडून घ्यायला. पण त्या बोचऱ्या थंडीच्या दिवशी मला एक फोन कॉल आला. त्या कॉलने मला कम्फर्ट झोनच्या बाहेर खेचून आणलं. फोन वाजला. स्क्रीनवर ‘निखील महाजन’ हे नाव झळकत होतं. मला थोडं आश्चर्य वाटलं. फोन उचलावा का नाही, असा नेहमीच पडणारा प्रश्न. निखिलची आणि माझी एकदम ओळख नव्हतीच असं नाही.

माझा ‘अक्षरनामा’वरचा शाहरुख खानवरचा ‘मामू कहानी सुनाते रह गये और लडकेने चांद चुम लिया’ हा लेख वाचून त्याने मला मॅसेज केला होता. निखिलला तो लेख प्रचंड आवडला, याला कारणीभूत होतं त्याचं प्रचंड शाहरुख प्रेम. मग मॅसेजेसमधून बोलणं झालं आणि नंबरची देवाणघेवाण झाली.

आमच्या दोघांना जोडणारा अजून एक समान दुवा म्हणजे जितेंद्र जोशी उर्फ जितू, निखिलचा खूप जवळचा मित्र. मी जितूसोबत असताना त्याला एकदा निखिलचा फोन आला होता, तेव्हा फोनवर आमचं बोलणं जितूनं करून दिलं होतं. पण ते तेवढंच. त्यामुळे निखिलने मला फोन का केला असावा, असा प्रश्न मला पडला. शेवटी मी धीर एकवटून फोन उचलला. थोडं इकडचं तिकडचं बोलून झाल्यावर निखिलने मला त्याच्या एका वेबसिरीजवर हेड रायटर म्हणून काम करशील का, अशी विचारणा केली. मला पहिल्यांदा वाटलं की, जितूने माझं नाव सुचवलं असणार निखिलला. पण नंतर कळलं की, रितेश देशमुख यांनी माझं नाव निखिलला सुचवलं होतं.

खरं तर माझी अशी परिस्थिती अशी होती की, मिळणाऱ्या प्रत्येक कामावर झडप मारणं आवश्यक होतं. पण मी निखिलला आपण एकदा भेटू, चर्चा करू आणि ठरवू असं सांगितलं.

निखिलसोबत काम करावं की नाही याबद्दल माझी मन:स्थिती द्विधा होती. त्याचा ‘पुणे ५२’ हा सिनेमा माझ्या आवडत्या सिनेमाच्या यादीत फार वरच्या क्रमांकावर होता. पण त्याचा ‘बाजी’ हा माझ्या नावडत्या सिनेमाच्या यादीत होताच. ‘बाजी’ प्रदर्शित होऊन आता चार वर्षं होत आली होती. शेवटी निखिलला त्याच्या ऑफिसमध्ये भेटू असं ठरवलं. धूळ खात पडलेली गाडी स्वच्छ केली आणि मुंबईला प्रस्थान केलं. ती एका उबदार कम्फर्ट झोनमधून बाहेर पडण्याची सुरुवात होती.

ख्रिसमसचा दिवस. सुट्टी असल्यामुळे रस्ते रिकामे होते. त्यामुळे मुंबईला लवकर पोहोचलो. मी अंधेरीतल्या ‘ब्ल्यू ड्रॉप’च्या ऑफिसमध्ये पोहोचलो. ऑफिसमध्ये शिरताच एक विचित्र प्रकार अनुभवायला मिळाला. ऑफिसमध्ये पाऊल टाकताच कानावर जोरजोरात त्वेषानं हासडलेल्या शिव्या ऐकू येऊ लागल्या. मी बिचकलोच. नंतर कळलं की निखिल आणि त्याची टीम ‘पब जी’ खेळत होते. मी आल्याचं कळल्यावर त्यांनी खेळ थांबवला.

आणि थोड्या वेळापूर्वी खेळात एकमेकांचा उद्धार करणाऱ्या त्या टीमनं मला प्रोजेक्टचं जबरदस्त प्रेझेंटेशन दिलं. मला वेबसिरीजची कन्सेप्ट एकदम आवडलीच. मी निखिलला सांगितलं मला आवडेल प्रोजेक्टवर काम करायला. आणि मी बोर्डवर आलो. आता लक्षात येतंय की, निखिलने मला काम देण्यापेक्षा मोठी गोष्ट केली होती. त्याने मला माझ्या उबदार कोषातून बाहेर खेचून आणलं होतं. त्यावेळेस निखिलचा तो कॉल आला नसता तर मी त्याच उबदार गोधडीत गुरफटून राहिलो होतो. 

निखिलसोबत काम करावं की नाही करावं, असा प्रश्न काही काळ मनात होता असा प्रश्न पडला होता, हे मान्य करायला पाहिजे. निखिलने गेल्या आठ वर्षांत अवघे दोन सिनेमे केले आहेत. ‘पुणे ५२’ला समीक्षकांकडून पसंती मिळाली असली तरी प्रेक्षकवर्ग या सिनेमाबाबत विभागलेला आहे. हा सिनेमा प्रचंड आवडलेला एक प्रेक्षक वर्ग आहे, तर या सिनेमातून दिग्दर्शकाला काय म्हणायचं आहे, हे आम्हाला कळलंच नाही असं मानणारा वर्ग आहे. ‘पुणे ५२’ला एका वर्गाचं प्रेम तरी लाभलं. निखिलचा दुसरा सिनेमा ‘बाजी’ (जी एक सुपरहिरो फिल्म होती) च्या नशिबी हे पण भाग्य नव्हतं. ‘बाजी’ला बॉक्सऑफिसवर आणि सोशल मीडियावर बॅकलॅशचा सामना करावा लागला. इतकंच काय, ज्या तुरळक समीक्षकांनी सिनेमाचं कौतुक केलं, त्यांना पण वाचकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. दोन्ही सिनेमांना पाहिजे तितका जनाश्रय मिळाला नव्हता हेही होतंच. पण काहीही असलं तरी निखिल महाजन हा सध्याच्या घडीला मराठी फिल्म इंडस्ट्रीमधला, ज्याच्याकडून अपेक्षा ठेवल्या जाव्यात असा दिग्दर्शक आहे, हेही मला माहीत होतं. याचं कारण दिग्दर्शक निखिलला त्याच्या सिनेमातून काय मांडायचं आहे, त्याचं म्हणणं त्याच्या समकालीन इतर दिग्दर्शकांपेक्षा खूप वेगळं होतं.

‘पुणे ५२’मधले जागतिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर नायकाच्या आयुष्यात निर्माण होणारे नैतिक तिढे हे बऱ्याचशा मध्यमवर्गीय लोकांची गोष्ट आहे. आयुष्यात, समाजात, अर्थकारणात होणारे आमूलाग्र बदल आणि त्या पार्श्वभूमीवर उकलणार इंटरेस्टिंग कथानक हे फार युनिक होतं. ‘पुणे ५२’ची तुलना मी बऱ्याच वेळा ‘मनोरमा सिक्स फिट अंडर’ या माझ्या दुसऱ्या अतिशय आवडत्या भन्नाट सिनेमाशी करत असतो.

निखिल आणि मी ऐंशीच्या दशकात जन्मलेल्या पिढीचे. ही तीच पिढी आहे जिने मुळापासून हादरवणारी ट्रान्सफॉर्मशन्स अनुभवली आहेत. पोस्टकार्डपासून मेलपर्यंत, सिंगल स्क्रीनपासून ते मल्टिप्लेक्सपर्यंत, माठापासून फ्रिजपर्यंत आणि कित्येक. ‘पुणे ५२’मधला भवताल हा असाच ट्रान्सफॉर्मेशनचा आहे आणि सिनेमाला तो भवताल अचूक गवसलेला आहे. सिनेमाच्या भाषेच्या दृष्टीने हा सिनेमा बराचसा बोल्ड होता.

‘बाजी’बद्दल माझं फारसं सकारात्मक मत असलं तरी मराठी सुपरहिरो ही वेगळी संकल्पना मांडण्याचं श्रेय दिग्दर्शकाला द्यावंच लागेल. ‘बाजी’ ही ‘missed opportunity’ आहे, असं मानणारा एक वर्ग आहेच. माझा मित्र आणि समीक्षक पवन गंगावणे याने ‘बाजी’मध्ये काय वेगळं करायला पाहिजे, म्हणजे तो सिनेमा भारी बनला असता आणि शिवाय या फिल्मचा सिक्वेल यायला हवा, हा सिद्धान्त मांडणारी एक डिटेल ‘कन्सेप्ट नोट’ तयार केली होती. त्याने ती धडपड करून निखिललाही पाठवली होती. म्हणजे ‘बाजी’कडून अपेक्षा असणारा वर्ग आहेच.

निखिलचा शेवटचा सिनेमा येऊन चार वर्षं झाली. पण त्याच्या पुढच्या सिनेमाची वाट बघणारा प्रेक्षक आहेच. बॉक्स ऑफिसने साथ दिली नाही तरी या दिग्दर्शकाच्या सिनेमात काहीतरी वेगळं मांडलं जाईल अशी खात्री या प्रेक्षकवर्गाला आहे. त्याच्या पहिल्या दोन सिनेमांची ही पुण्याई.

आमच्या प्रोजेक्टच्या निमित्तानं ‘रायटर्स रूम’ नावाचा प्रयोग बहुदा पहिल्यांदाच मराठी मनोरंजन क्षेत्रात झाला असावा. सगळ्यात पहिले मी बोर्डवर आलो. नंतर शार्दूल सराफ हा अनुभवी लेखक आला. जीवीजीशा काळे होतीच. निखिल प्रत्यक्ष लेखन प्रक्रियेत सामील नव्हता. तो ‘शो रनर’ म्हणून काम करत होता. हृषीकेश दळवी हा उत्साही आणि अनुभवी मुलगा क्रिएटिव्ह प्रोड्युसर म्हणून सगळ्या लिखाणाच्या प्रक्रियेवर नजर ठेवून होता.

मी यापूर्वी जी कामं केली होती, ती एकट्यानं केली होती. टीममध्ये काम करायला सुरुवात केल्यावर माझ्या एकूणच मर्यादा मला जाणवायला लागल्या. आपण टीममध्ये काम नाही करू शकत, याची जाणीव उफाळून वर यायला लागली. याला कारणीभूत मुळातच आत्मविश्वासाची असणारी कमतरता आणि अनेक जन्मजात न्यूनगंड. पण आपण कामात आपलं शंभर टक्के देऊ शकत नाही आहोत, ही जाणीव आतून पोखरून खायला लागली. पलायनवादी असणं हे माझ्यात इनबिल्ड आहे. नेहमीप्रमाणं मी त्या प्रोजेक्टमधून काढता पाय घेण्याची तयारी सुरू केली. निखिलला ‘मला हे जमत नाहीये. मला जाऊ दे,’ असं कुठल्या तोंडाने सांगणार, असा प्रश्न पडला.

एके दिवशी ऑफिसमध्ये आम्ही दोघंच असताना मी चाचरत निखिलकडे विषय काढला. निखिलने शांतपणे माझी कैफियत ऐकून घेतली. मग थोडा वेळ विचार केला आणि म्हणाला, “तुला मी कुठंही जाऊ देणार नाहीये. तू चांगलं काम करतोयस. मला तू हवा आहेस या प्रोजेक्टवर.”

गेल्या कित्येक वर्षांत माझ्यावर इतका विश्वास कुणीही दाखवला नव्हता. आपल्यावर कुणाचा इतका विश्वास आहे, या कल्पनेनंच मला फार छान वाटलं. पण प्रश्न सुटला अशातला भाग नाही. नंतरही दोनदा माझ्यातला पलायनवादी जागा झाला. पण प्रत्येक वेळेस निखिलने माझे पलायनाचे मनसुबे उधळून लावले. मग हळूहळू मी टीममध्ये रुळलो. हळूहळू काम जमायला लागलं. आणि नंतर एकदम सुसाट काम व्हायला लागलं.

नंतर जेव्हा एखादा भन्नाट एपिसोड लिहून व्हायचा तेव्हा निखिलची शाबासकीची थाप मिळायची ती पृथ्वीमोलाची असायची. कारण कुठल्याही लेखकासाठी दिग्दर्शक निखिल महाजनच समाधान करणं हे किती अवघड आहे, हे निखिलसोबत काम करणारा लेखकच सांगू शकतो.  त्या चार महिन्यांत आम्ही सोळा सोळा तास काम केलं. पण तो खूप अमेझिंग, शिकवून जाणारा अनुभव होता. आता मी कुठल्याही टीमसोबत काम करू शकतो. माझ्यातल्या या ट्रान्सफॉर्मेशनच श्रेय निखिलला.

आम्ही वेबसिरीजवर काम करत होतो खरं. पण वेबसिरीजवर काम करण्याचा हा माझा पहिलाच अनुभव होता. वेबसिरीजचं स्वतःच असं ग्रामर असतं. ते सिनेमा आणि मालिकांपेक्षा बरंच वेगळं असतं. ही लिखाणाची प्रक्रिया कशी असावी याची उकल करण्यातच आमचा बराच वेळ गेला. पण निखिलने शेवटी सूत्रं हाती घेतली आणि प्रक्रियेला एक वळण मिळालं.

ही वेब सिरीज करणं हा खूप शिकवून जाणारा अनुभव होता. विशेषतः माझ्यासारख्या लेखनाचं कुठलंही प्रशिक्षण न घेतलेल्या माणसासाठी. निखिल हा स्वतः उत्तम लेखक आहे. त्याची लिखाण करण्याची प्रक्रिया वेगळी आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतर कुठल्याही लेखकाप्रमाणे त्याला पण डेडलाईनच्या दिवशी खडबडून जाग येते. मग तो बैठक मारून बसतो. ही बैठक म्हणजे डेंजर प्रकार असतो. तो एका रात्रीत मग एकशे वीस पानांचा स्क्रीन प्ले हातावेगळा करतो. हे निव्वळ अफाट आहे. तो लिहायला जरी डेडलाईनच्या आदल्या रात्री बसत असला तरी त्याच्या डोक्यात त्या स्क्रिन प्लेवर सतत विचार चालू असतो. मग एकदा कच्चा माल पुरेसा डोक्यात साठला की, मग त्याचं पक्क्या मालात रूपांतर करायला काय वेळ लागतो!

निखिल आणि मला जोडणारे काही समान दुवे म्हणजे, निमशहरी भागात गेलेला आयुष्याचा काही भाग, त्यातून हिंदी सिनेमाकडे असणारा (विशेषतः नव्वदच्या दशकातल्या सिनेमाकडे) असणारा ओढा आणि करिअरला अचानक मिळालेली वेगळी वाट. बारामतीला इंजिनियरिंग करत असताना इंजिनीअरिंगमधून त्याचा मेजर भ्रमनिरास झाला. तिथल्या एका मॅडमशी काही कारणांनी शत्रुत्व प्रस्थापित झालं. त्याचा फटका बसणं इंजिनीअरिंगमधून त्याचं लक्ष उडायला खूप होतं. इंजिनीअरिंग करणारी असंख्य लोक एन्टरटेनमेन्ट इंडस्ट्रीकडे का वळत असतील याचं निखिल प्रातिनिधिक उत्तर. सिनेमाचं रीतसर शिक्षण घ्यायला  निखिल ऑस्ट्रेलियाला गेला.

औरंगाबादसारख्या शहरातून मध्यमवर्गीय घरातला एक मुलगा ऑस्ट्रेलियात सिनेमाचं शिक्षण घ्यायला जातो, हीच मोठी गोष्ट होती. घरात आर्थिक स्थैर्य असलं तरी फार सुबत्ता होती अशातला प्रकार नव्हता. खूप मोठी रिस्क होती. पण ती त्या परिवारानं घेतली.

निखिल ऑस्ट्रेलियात चार वर्षं होता, तेव्हा त्याचा जवळचा मित्र होता संदीप वनगा रेड्डी. ‘कबीर सिंग’ या वर्षीच्या सगळ्यात मोठ्या हिट सिनेमाचा दिग्दर्शक. योगायोगानं मी आणि निखिल एकत्र काम करत असतानाच ‘अर्जुन रेड्डी’ प्रदर्शित झाला. बॉक्सऑफिसवर तुफान हिट झाला.

मी एकदा न राहवून विचारलं होतं, “तुला असुरक्षित नाही वाटत, तुझ्या मित्राने एवढा मोठा हिट दिला. तो एवढ्या मोठ्या स्टार्ससोबत काम करत आहे. आणि तू मागं पडलायेस नाही म्हटलं तरी.” यावर निखिलने दिलेलं उत्तर खूप शिकवून जाणार होतं. तो म्हणाला, “जेव्हा माझ्या दोन फिल्म झाल्या, तेव्हा संदीपची एकही फिल्म झाली नव्हती. तो ‘अर्जुन रेड्डी’ची स्क्रिप्ट घेऊन निर्मात्यांचे उंबरे झिजवत होता. पण कोणीच त्याला दारापाशी उभं करायला तयार नव्हतं. ‘अर्जुन रेड्डी’च्या स्क्रिप्टचा पहिला draft संदीपने मलाच वाचून दाखवला होता. संदीपला निर्माता मिळावा म्हणून मुंबईतल्या अनेक मीटिंगला मी त्याच्यासोबत गेलो होतो. त्याच्या त्या काळातल्या संघर्षाचा, फ्रस्ट्रेशनचा मी साक्षीदार आहे. आणि ‘पुणे ५२’ आणि ‘बाजी’च्या वेळेस सगळ्यात आनंदी संदीप होता. त्याचं कशात काही नसताना. आज तो यशस्वी आहे आणि माझ्या त्याच्याबद्दल याच भावना आहेत. संदीप तर मित्रच आहे पण इतर कुणीही समकालीन दिग्दर्शक काही वेगळा प्रयोग करतो, यशस्वी होतो तेव्हा पण मला आनंद आणि आनंदच होतो. माझ्यात insecure असणं नाहीये.”

हे उत्तर खूप शिकवून जाणारं. काळ सगळ्यांचा सारखा नसतो आणि हर एक का टाइम आता है, हे शिकवून जाणारं. 

निखिलची थिंकिंग प्रोसेस मराठीमधल्या इतर दिग्दर्शकांपेक्षा खूप वेगळी आहे. त्याचा सिनेमाकडे बघण्याचा अॅप्रोच खूप अमराठी आहे असं म्हणता येईल. मराठी चित्रपटसृष्टी असं आपण ज्याला म्हणतो त्याचं स्वरूप खूप इन्फॉर्मल आहे. मराठी चित्रपटसृष्टीला एक पारिवारिक तोंडावळा आहे. इथं जवळपास सगळेच एकमेकांना दादा, भाई, मामा, बाई, तायडे असं एकमेकांना संबोधतात. संबंध पण एकमेकांशी अतिशय जिव्हाळ्याचे. लोक काम निवडताना पण नातेसंबंधांना प्राथमिकता देतात. याचे काही फायदे आहेत आणि काही तोटे. मेजर तोटा असा की नातेसंबंध जपण्याच्या नादात प्रोफेशनलिझम अनेकदा बॅकसीटला जाण्याची शक्यता असते. एखादा अभिनेता दुसऱ्या टेकचा आग्रह करणाऱ्या दिग्दर्शकाला, “राहू दे ना भाई, छान झालाय हा टेक. थकलोय रे खूप. चल बीडी मारू” असं म्हटलं की दिग्दर्शकाचा निरुपाय होतो. म्हणजे मराठी अभिनेते अव्यवसायिक आहेत का? तर नाही. ते देशातल्या कुठल्याही अभिनेत्यांइतकेच व्यावसायिक आहेत. पण वर जसं म्हटलं आहे, तसे अनौपचारिक संबंध असले की, एका मर्यादेपलीकडे तुम्हाला ताणता येत नाही.

निखिल या इंडस्ट्रीमध्ये इतकी वर्षं आहे, पण तो अजूनही या ‘परिवारा’चा भाग नाही. हे किती अवघड असतं हे इथं काम करणारा कुणी पण सांगू शकेल. ‘पुणे ५२’ ज्याने डायरेक्ट केला आहे, त्या माणसाला प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या unapologetic व्यावसायिक सिनेमाबद्दल प्रचंड जिव्हाळा आहे.

एरवी प्रचंड कुल असणारा माणूस कधीकधी खूप क्रूर आणि कठोर होऊ शकतो. एखाद्याला धुळीस मिळवायचं ठरवलं तर निखिल ते करतोच. एखाद्यावर शाब्दिक चढ चढ चढणारा निखिल बघितला तर तुमच्या पायातली हवा जाऊ शकते. मला निखिलच्या या बाजूची जाम भीती वाटते. पण असंही वाटतं की, एकाच वेळेस अनेक निर्मितीच्या वेळेस डिपार्टमेंट  सांभाळताना, शेकडो लोकांची पीपल मॅनेजमेंट करताना माणसाला काही प्रमाणात आक्रमक असणं भागच असावं. त्याशिवाय हा जगन्नाथाचा रथ हलवणं अवघड असावं.

निखिलने शाहरुख खानच्या रेड चिलीज प्रोडक्शन हाऊससाठी एक वेब सिरीज दिग्दर्शित केली आहे. निखिलचं शाहरुख खान प्रेम हे त्याला ओळखणाऱ्या लोकांमध्ये सर्वश्रुत आहे. आपण सिनेमा करावा असं निखिलला वाटलं ते गोवारीकर-शाहरुख जोडगोळीचा ‘स्वदेस’ बघून. जेव्हा जेव्हा निखिलला थोडं निराश वाटायचं, तेव्हा तो रात्री शाहरुखच्या ‘मन्नत’ बंगल्यासमोर जाऊन बसतो. कधी मित्राला घेऊन तर कधी एकटाच. ते त्याच्यासाठी बूस्टर आहे. संदीप वनगाने ‘अर्जुन रेड्डी’चा draft निखिलला वाचून दाखवला तो ‘मन्नत’समोरच. निखिलने शाहरुखसोबत वेबसिरीज करणं हा एक काव्यात्मक न्याय आहे. संयम ठेवला तर स्वप्न पूर्ण होऊ शकतात हे सिद्ध करणारा न्याय.

ज्या ‘मन्नत’समोर अनेक विमनस्क रात्री घालवल्या, त्याच ‘मन्नत’चे दरवाजे एके दिवशी करकरत उघडले. निखिल त्यातून आत गेला. आपल्या दैवताला शाहरुख खानला भेटला. त्याच्यासोबत अनेक तास घालवले. हे सगळं स्वप्नवत होतं. निखिलसाठी आणि मोठी स्वप्नं बघणाऱ्या प्रत्येकासाठी. या प्रोजेक्टच्या निमित्ताने निखिल हिंदीमध्ये आलाय. मागची पाच वर्षं अनेक अपयश, अकाली गर्भपात झालेले प्रोजेक्ट्स, लोकांच्या शंका यांच्यासोबत घालवून vulnerable झालेल्या निखिलला यशाची चव चाखायला मिळाली. आता त्याचं मोठ्या यशात रूपांतर कसं करेल याची उत्सुकता आहे. सध्या तरी मी निखिलचा नंबर निखिल ‘मन्नत’ महाजन म्हणून सेव्ह केलाय.

.............................................................................................................................................

लेखक अमोल उदगीरकर फँटम फिल्म्ससोबत पटकथा लेखक म्हणून काम करतात.

amoludgirkar@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.      

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......