अजूनकाही
सांस्कृतिक राष्ट्रवाद राष्ट्रासाठी घातक आहे. त्यामुळे जगातल्या अनेक देशांत सामाजिक व राजकीय विभाजनाच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. राष्ट्रातील लोकांचे हित प्रमाण मानणाऱ्या राष्ट्रवादाच्या संकल्पना आता मागे पडल्या आहेत. धार्मिक समूहांच्या हिताचा बाजार मांडला गेला की, आपसूकच इतर समाजाच्या हक्क-अधिकारांपेक्षा बहुसंख्याकांच्या हिताला अग्रक्रम दिला जातो. त्यातून एका बाजूला मागासलेपणा आणि दुसऱ्या बाजूला सरंजामी जीवनाचा अहंकार, एका बाजूला असहाय्य नाकारल्या गेलेल्या लोकांचा समूह आणि दुसऱ्या बाजूला सत्तेच्या, प्रगतीच्या साऱ्या संधी एकवटलेले शोषक, असा विचित्र विषमताग्रस्त समाज उदयास येतो.
१९२० नंतर देशाची राजकीय स्थिती बदलत गेली. सांस्कृतिक राष्ट्रवादाने राष्ट्राच्या राजकीय स्वातंत्र्यापेक्षा धर्मसमूहांच्या राजकीय आधिकारांच्या संघर्षाला जन्म दिला. त्यातून देशाची फाळणी उद्भवली. दुर्दैवाने आजही राष्ट्राच्या प्रगतीपेक्षा धर्मसमूहांवरील अन्याय व प्रगतीच्या चर्चा सुरू आहेत. त्यातून बहुसंख्य असणाऱ्या प्रत्येकाला आपल्या बळाचा अहंकार अल्पसंख्याकांवर सिद्ध करायचा आहे. अशा परिस्थितीत अल्पसंख्याकांना समजून घेण्याची, त्यांच्या समस्या, त्यांचे सामाजिक ऐतिहासिक स्वरूपावर चर्चा करण्याची गरज प्रकर्षाने समोर आली आहे.
मराठीतील काही संशोधकांची पुस्तके मुस्लीम समाजाचे स्वरूप व त्याच्या इतिहासाविषयी चर्चा करतात. त्यामध्ये य. दि. फडके यांच्या ‘स्वातंत्र्य आंदोलनातील मुसलमान’ हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचे आहे. भारतीय इतिहासात आणि स्वातंत्र्य आंदोलनात मुसलमानांचा सहभाग नाकारण्याची प्रतिगामी परंपरा एकीकडे मजबूत होत असताना फडके यांनी हा विषय मांडला होता. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत मुसलमानांचा सहभाग नव्हता, ते ब्रिटिशांचे सहकारी होते व त्यांच्या विभाजनवादी राजकरणामुळे भारताची फाळणी झाली असे आरोप आजपर्यंत मुसलमानांवर होत आहेत. स्वातंत्र्याने सत्तरी पार केल्यानंतरही भारतात मुसलमानांची प्रतिमा भारतीय राजकरणात शत्रुत्वाच्या अंगाने रंगवण्यात आली आहे. पहेलू खान, तबरेज, मोहसीन यांच्या हत्या आणि त्या माध्यमातून होणारे झुंडीने प्रेरित राजकारण आज अल्पसंख्याक समाजाच्या मुळावर उठले आहे.
इंग्रजांनी भांडवली वसाहतींच्या आधारे भारतीय समाजाला आणि राज्यकर्त्यांना वेठीस धरले. एकापाठोपाठ एक भारतीय राज्यकर्त्यांच्या राजवटी संपवल्या. त्यामध्ये मुस्लीम राजवटींची संख्या अधिक होती. त्यामुळेच मुसलमानांचा इंग्रजांशी संघर्ष स्वाभविक होता. म्हणूनच इंग्रजांनी मुस्लीम समाजाविषयी भारतीयांमध्ये द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण मुसलमान या संघर्षातून मागे हटले नाहीत. सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक पातळीवर त्यांनी हा संघर्ष सुरूच ठेवला. उर्दू काव्याने स्वातंत्र्याच्या प्रेरणा दिल्या. मुस्लिमांच्या सामाजिक चळवळींनी इंग्रज वसाहती- विरोधातील सामाजिक व राजकीय संघर्षांना चालना दिली. अलिगड, देवबंद, लाहोरच्या धार्मिक संस्थांनी चालवलेल्या स्वातंत्र्याच्या चळवळींची अपवादात्मक नोंद घेतली जाते. ज्या वेळी मुस्लीम समाजाकडून इंग्रजविरोध शिगेला पोहोचला होता, त्याच वेळी इंग्रजांच्या हस्तकांनी मुस्लिमांना अलग पाडण्याच्या सांप्रदायिक तत्त्वज्ञानाची मांडणी केली. त्यातून स्वातंत्र्याच्या राजकीय आंदोलनात हिंदू आणि मुस्लीम अशा दोन स्वतंत्र प्रवाहांचा जन्म झाला.
स्वातंत्र्य चळवळी सुरू असतांनाच मुस्लीम नेत्यांमध्ये बहुसंख्याकांकडून नाकारले जात असल्याची भावना वाढीस लागली. त्यातून जीना यांचे विभाजनवादी राजकारण, मुस्लीम लीगने त्यास दिलेला पाठिंबा आणि विभाजन करण्याच्या साम्राज्यशाही कारस्थानातून देशाची फाळणी झाली. त्याचा संपूर्ण दोष सर्वसाधारण मुसलमानांना देण्यात आला. त्यातून देशाच्या विकासप्रक्रियेपासून मुस्लिमांना दूर ठेवले गेले.
विसाव्या शतकाच्या अखेरच्या दशकापासून प्रबळ होत गेलेला ब्राह्मणवाद आणि त्याला समर्थपणे सहाय्य करणारी परिषद, दल, संघ व इतर फॅसिस्ट संघटना व त्यांचा अधिकृत राजकीय पक्ष हे प्रबळ होत जाऊन केंद्र सरकारची सत्ता हस्तगत करण्यात आली. धर्मप्रचाराच्या बळावर या देशातील मुसलमान हा परकीय होता आणि आहे, हे पसरवले जात आहे. धर्मावरून मुस्लिमांचे अस्तित्वच नाकारले जात असलेल्या काळात या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन, हे सद्यस्थितीत सामाजिक अभिसरणासाठी महत्वाचे पाऊल आहे.
या पुस्तकाची पहिली आवृत्ती १९८६ साली प्रकाशित झाली होती. त्यानंतर तब्बल ३२ वर्षांनी परिवर्तन अकादमी, सोलापूर यांनी सध्याच्या युवापिढीला मुसलमानांच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाचे ज्ञान देण्यासंबंधी उचललेले धाडसी पाऊल महत्त्वपूर्ण आहे. कारण फाळणी पश्चात गेल्या दोन दशकांपासून इथल्या सर्वसामान्य हिंदू बांधवांचे जमातवादी मुस्लीम द्वेषाचे राजकारण (हेट पॉलिटिक्स), झुंडशाही व मॉब लिंचिंगच्या रूपाने समोर येत आहे. सातत्याने इतिहासाची खोटी व भ्रामक मांडणी करून मुसलमानांच्या शत्रूकरणावर आधारित हिंदू राष्ट्र निर्मितीचा अजेंडा घटनेने मान्य केलेल्या धर्मनिरपेक्ष देशात अंमलात आणण्याच्या कालावधीत हे पुस्तक नव्या स्वरूपात समोर येत आहे.
या पुस्तकात एकूण चार प्रकरणे असून पहिल्या प्रकरणात १८५७ – १९१२ या कालखंडाची मांडणी आहे. ज्या मध्ये महत्त्वपूर्ण घटनांचा उल्लेख आहे. विशेष महत्त्वाचे म्हणजे त्या काळी ब्रिटिश राजवटी विरुद्ध उठाव हे केवळ शिपायांचे बंड होते असे भ्रम पसरवणारे इंग्रज इतिहासकार, सोबत त्यांचा प्रभाव असणारे काही भारतीय इतीहासकारांनी तसा दुजोरा दिलेला आढळतो. वि.दा. सावरकर यांनी ‘अठराशे सत्तावन्नचे भारतीय स्वातंत्र्य समर’ हे १९०७ साली लंडनच्या वास्तव्यात लिहिले. त्यांनी हिंदू आणि मुसलमान इंग्रजांविरुद्ध खांद्याला खांदा लावून कसे लढले याचे वर्णन केले. इतकेच नव्हे तर इंग्रजांविरुद्ध लढतांना मुस्लिमांनी फडकवलेल्या हिरव्या निशाणाचे हिंदूंनी फडकवलेल्या जरतारी निशाणाइतकेच सावरकरांनी कौतुक केले.
या स्वातंत्र्य संग्रामात मारल्या गेलेल्या फैयजाबादच्या मौलवी अहमद शहाच्या बलिदानाची कहाणी सांगून फडके पुढे म्हणतात- “इस्लामच्या सिद्धांतावरील डोळस निष्ठा ही हिंद भूमीबद्दलच्या गाढ आणि शक्तिशाली प्रेमाशी विसंगत असत नाही, हे या शूर मुसलमानांच्या आयुष्यावरून दिसते.”
१९०७-०८ साली धर्मावर श्रद्धा असलेला मुसलमान देशभक्त असतो अशी सावरकरांची धारणा होती. मात्र १९३७ साली कर्णावती येथील हिंदू महासभेच्या सार्वजनिक भाषणात ते म्हणतात- “हिंदुस्तानच्या बंधमोचनाच्या लढ्यात जे जे फासावर गेले, ज्या शेकडोंनी अंदमान येथील काळ्या पाण्याला सामोरे गेले, कारावास पत्करला ते सारे हिंदू होते.” सावरकरांनी कालांतराने स्वातंत्र्यलढ्याची केलेली सांप्रदायिक मांडणी अत्यंत घातक ठरली.
स्वातंत्र्योत्तर काळात अलीकडच्या काही दशकात जातीयवादी शक्ती प्रबळ होत असल्याने मुसलमान किंवा शीख धर्माच्या भारतीयांवर ते देशाचे तुकडे पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करून स्वातंत्र्य चळवळीतील त्यांच्या सक्रीय कार्याचे श्रेय नाकारण्याची प्रवृत्ती वाढतच आहे. अशा परिस्थितीत फडके यांनी म्हटल्याप्रमाणे इतिहासाच्या अभ्यासकाच्या भूमिकेतून स्वातंत्र्य चळवळीतील मुसलमानांच्या सहभागाची हकीकत सांगणे उपयुक्त ठरेल असे वाटते.
दुसऱ्या प्रकरणात १९१३ ते १९२२ च्या कालावधीतील चळवळींच्या महत्त्वपूर्ण घडामोडी (गदर, खिलाफत, असहकार) इ. बद्दल संशोधनपर पुराव्यासह विशद केलेल्या आहेत. तिसऱ्या प्रकरणात १९२४ ते १९३७ कालावधीतील सविनय कायदेभंग चळवळीचा आढावा व नेहरू समितीच्या अहवालावर फडके यांनी प्रकाश टाकला आहे.
शेवटच्या (१९३७ ते१९४७) प्रकरणात १९४२ ची चले जाव चळवळ, सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद फौजेत व १९४६च्या नौसेंनिक उठाव यामध्ये मुसलमानांचा कशा प्रकारे सक्रिय सहभाग होता हे मांडले आहे. काँग्रेसच्या लढ्यातील मुसलमानांचे योगदान देखील अत्यंत महत्त्वाचे आहे. अनेक मुस्लीम नेत्यांनी काँग्रेसचे नेतृत्व केले. त्यांच्या कार्याविषयी फडके यांनी खोलात जाऊन माहिती दिली आहे. मौलाना आझाद वगैरे नेत्यांचा काँग्रेसवरील प्रभावदेखील त्यांनी दाखवून दिला आहे.
एकंदरीत या पुस्तकाच्या संपूर्ण विवेचनामधून बॅ. जीना व मुस्लीम लीग हेच केवळ मुसलमानांचे प्रतिनिधित्व करत नव्हते, तर त्यांच्या प्रभावाबाहेर अनेक तरुण व राज्यकर्ते होते हे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हाच त्यांच्या पुस्तकाचा प्रमूख गाभा आहे. सद्यस्थितीत ‘ते आणि आम्ही’ ही विचारधारा आक्रमकपणे ठसवणाचा प्रयत्न करणाऱ्या काळात हे पुस्तक सामाजिक सौहार्द पुनःश्च प्रस्थापित व्हावा, यासाठी प्रयत्नशील असलेल्या कार्यकर्त्यांना, नवोदित अभ्यासकांना आणि सर्व सामान्य तरुण वर्गाला दिशादर्शक ठरेल असा विश्वास वाटतो.
............................................................................................................................................................
लेखक डॉ. युसूफ बेन्नूर शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत.
editor@aksharnama.com
............................................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment