‘दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी’ : गोंधळवणारा, सैरभैर करणारा, तरीही फुकाच्या मिरवण्याला महत्त्व देणारा कालखंड
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
मेघश्री दळवी
  • ‘दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी’ या कथासंग्रहाचं मुखपृष्ठ
  • Fri , 08 November 2019
  • ग्रंथनामा शिफारस दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी Don Shatakanchya Sandhyavarchya Nondi बालाजी सुतार Balaji Sutar

बालाजी सुतार हे आजच्या लिहित्या लेखकांमधलं एक महत्त्वाचं नाव. नुकताच त्यांना मुंबई मराठी साहित्य संघाचा ‘कथाकार शांताराम पुरस्कार’ जाहीर झाला आहे, तो यथोचितच म्हणायला हवा. त्यासाठी त्यांचं मन:पूर्वक अभिनंदन! ‘दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी’ हा बालाजी सुतार यांचा या वर्षी प्रकाशित झालेला संग्रह. याच वर्षी त्याची दुसरी आवृत्ती निघाली ही बाब खास नोंद घ्यावी अशी. शब्द पब्लिकेशनचं हे पुस्तक वाचून पूर्ण केल्यावर चार जणांना आवर्जून सुचवावंसं वाटलं. असं काय आहे त्यात?

कथालेखनाचा काळ विसावं आणि एकविसावं शतक जोडणार्‍या पंचवीसेक वर्षांमधला. या काळात जगात उलथापालथ झालीच, भारतातही खूप बदल झाले. खासगीकरण, उदारीकरण, आणि जागतिकीकरण झालं! सोबत तंत्रज्ञान आपल्याकडे फार वेगानं आलं. डेस्कटॉपकडे नवलाईनं पाहणारी माणसं बघता बघता मोबाईल सहजतेनं हाताळायला लागली, इंटरनेट वापरून वेबवर विहरायला लागली. जगायच्या नव्या पद्धती समजून घ्यायला लागली. बाजारीकरणाला सरावली. शहराप्रमाणे निमशहरी भागातही या सगळ्या बदलाचे पडसाद उमटले. माणसं अस्वस्थ झाली, एकेकदा नक्की कशानं ते ठाऊक नाही अशा मन:स्थितीत अडकली. ‘विच्छिन्न भोवतालचे संदर्भ’ या कथेत म्हटल्यासारखे “सतत येणार्‍या बधिर कंटाळ्याचं काय करावे हे त्याला नीट उमगत नाही, एवढीच त्याची गोची आहे.” अशी गोची झालेली पात्रं या कथांमधून भेटत राहतात. सुतार यांचं कसब की, ते या पात्रांच्या आतलं आयुष्य नेमकं टिपून आपल्यासमोर मांडतात.

‘डहूळ डोहातले भोवरे’मधला हरिश्चंद्र एका विचित्र परिस्थितीतून जात आहे. एका बाईच्या आत्महत्येनंतर तो आपलं हतबल आयुष्य तपासून पाहतो. ‘राख झाल्या चितेचे तपशील शोधण्यात नंतर काय हशील होतं?’ हा प्रश्न सतावत असताना तो आपल्या परीनं एक उपाय काढू पाहतो. यातली शांताराम, व्यंकटी ही पात्र नेमकी उभी राहिली आहेत आणि या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर हरिश्चंद्रचा डहूळला डोह आपल्या मनातही कुठकुठले प्रश्न उमटवून जातो.

सोशल मीडिया, त्यातलं आभासी जग आणि तिथली फसवी-तात्पुरती नाती हा विषय अलीकडे अनेक कथाकारांना खुणावत असतो. त्यातला फोलपणा ते आपल्या पद्धतीनं शोधत असतात. त्या प्रकारची संग्रहातली कथा ‘निळ्या चमकदार काळोखातले अप-डाऊन्स’. कम्प्युटरच्या निळसर चमकदार पडद्यामागचं जग निवेदिकेच्या आयुष्यात एक हलचल माजवून जाते. थोड्या काळापुरती. स्त्री-पुरुष नात्यांचा आदिम अर्थ कायम तोच असतो का, याचा निर्देश त्यात आहे. पण एक सर्वसामान्य स्त्री हेही शांतपणे पचवून पुढे जाते, हे विशेष लक्षात घेण्यासारखं.

अस्वस्थ, नव्या काळाला जुळवून घेण्याच्या प्रयत्नात, स्वत:ची कोणतीही निश्चित आयडेंटिटी सापडत नसणारं असं एक वेगळं विश्व सुतार यांच्या लेखनात आहे. निमशहरी किंवा शहरातल्या अपरिचित भागातल्या माणसांचं. तंत्रज्ञान तिथं पोचलंय, बातम्या आणि इतर माहिती, व्हिडिओचं जग हाताशी आहे. आयुष्यातल्या अपरिहार्य घटना वा तडजोडी निमूट घेतल्या जात आहेत. पण त्याच वेळी एक बिनकामाचा निवांतपणा आहे आणि त्याचं काय करायचं हे निश्चित नसल्यासारखी ही माणसं रोजच्या आयुष्यात काही अर्थ शोधू पाहत आहेत. ‘विच्छिन्न भोवतालचे संदर्भ’मधला राघव असाच. एका कम्प्युटर सेंटरवर नोकरी करणारा. फारसं काही न घडणारं आयुष्य, त्यातली काही माणसांच्या आतल्या दु:खाशी आपलं दु:ख उगीचच ताडून पाहणारा. ज्या काळाविषयी हा संग्रह आहे, त्यावर जास्त न बोलता भाष्य करणारी ही कथा आहे.

साहित्याचं जग खूप भावत आहे, कविता करणं सुरू आहे, पण त्या स्वप्नवत जगात शिरताना वास्तव जग इतकं सहज नाही सोडता येत, हे ‘दोन जगातला कवी’ या कथेत अत्यंत प्रभावीपणे आलं आहे. या कथेतला कवीसंमेलनाचा माहोल, सादरीकरणावरून राजाचा उद्वेग, तिथले श्रोते आणि कवी, कवितेवरची चर्चा, त्याच वेळी आपली इतर कर्तव्य सांभाळण्याची राजाची तगमग प्रचंड जिवंतपणे आलीय. ‘पर्सनल इज युनिव्हर्सल’ याचा क्षणोक्षणी प्रत्यय कथेत येत राहतो.

‘दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी’ या कथेचा कालावधी मोठा आहे, आणि एकूणच कॅनव्हासदेखील बरंच काही कवेत घेणारा. १९९२च्या दंगली. त्यात बिलालचा संदर्भ. मग पुढे २००८मध्ये पाण्याच्या प्रश्नावरचं राजकारण आणि गावपातळीवरचं समाजकारण. नंतर २०१३मध्ये शेतकर्‍यांच्या आत्महत्येमागचं अर्थकारण, आणि २०१७मधली हलवून टाकणारी टिपणं. रूढार्थानं कथा नसलेल्या या नोंदी एका संवेदनशील मनानं टिपलेल्या आहेत. बालाजी सुतार यांच्या लेखनात एक वेगळं सामर्थ्य जाणवतं ते यासारख्या कथांमुळे. 

शिक्षणक्षेत्रातला बजबजाट आणि त्यानं निर्माण केलेले उच्चशिक्षितांचे चमत्कारिक प्रश्न हे आजचं वास्तव. विशेषत: शिकून चांगली नोकरी करून कुटुंबाला वर काढण्याच्या उद्देशानं कष्ट करून घेतलेलं शिक्षण आणि त्याची प्रत्यक्षातली किंमत हे प्रखरतेनं दिसतं ते तालुका किंवा निमशहरी पातळीवर. सोबत आज त्यात पैशांचं साधन बनलेल्या शिक्षणसंस्था आणि स्पर्धा परीक्षा केंद्रं हे ‘पराभवच्या बखरीतली काही पानं’ या कथेतून सामोरं येतं. धर्म, जातीयता, पैसा, सत्तेच्या अमर्याद वापराखाली भरडले जात कसल्याही कामाला जुंपलेले शिक्षक-प्राध्यापक, स्त्री-पुरुष संबंधांमध्ये एकीकडे येत चाललेला मोकळेपणा, पण दुसरीकडे न टाळता येणारं गावकुसातलं पारंपरिक आयुष्य अशा पार्श्वभूमीवर निवेदकाची पराभूत आणि भ्रमनिरास झालेली स्थिती विलक्षण विदारकतेनं येते.

‘अमानवाच्या जात्यातला पाळू’ या कथेत तालुक्याचा गाव आहे. त्यात जातीय ध्रुवीकरण आहे. तिथल्या करीमनगर वस्तीतली अनुबाई ही उद्योगी स्त्री करीमभाईच्या पोरग्याला धरून आहे. कथेला पदर वस्तीतल्या अनेक गोष्टींचे आहेत. पुढे या पोराचा मृत्यूनंतर आणि तिच्या निष्क्रिय नवर्‍याच्या मृत्यूनंतर वस्तीपलीकडील जगाचे. पुरुषाची नजर ओळखून राहणारी अनुबाई पुन्हा पुन्हा त्याच नजरेच्या परिघात येत राहते. पुढे तर जातीधर्माच्या राजकारणात एक प्यादं होऊन. ही समस्या नवी नाही, पण इथली संयत हाताळणी अस्सल आहे. एकूणच सुतार यांचं लेखन कमालीच्या काटेकोरपणे संयम राखून आहे, आणि ते त्यांचं बलस्थान आहे.

थिजलेल्या निरुद्देश आयुष्याचे संदर्भ वारंवार आले तरी या कथा निराशावादी सूर काढत नाहीत. तिथं राजकारण आणि समाजजीवन आहे, तसं स्वीकारलेलं दिसतं. माणसं बंड वगैरे करून उठत नसली तरी आयुष्य पूर्ण फोलदेखील नाही मानत. कधीतरी घेतलेला शकूचा रसरशीत अनुभव आठवत राहणारा ‘पराभवच्या बखरीतली काही पानं’मधला निवेदक आयुष्यातल्या पोकळ्या समजून उमजून राहताना दिसतो.  ‘संधिकाळातले जहरी प्रहर’कथेतला निवेदक बर्‍यापैकी निरुत्साहात आहे, काहीच बदलत नाही या संभ्रमात आहे. नव्या शतकाच्या पहाटेदेखील त्याला फार काही वाटत नाही. हीच कदाचित या संग्रहाचं निदर्शक संकल्पना म्हणावी लागेल.

या संग्रहातल्या आठ कथा अतिशय वेगवेगळे विषय कौशल्यानं हाताळणार्‍या आणि तरीही एका धाग्यात बांधता येतील अशा, संक्रमणाचा काळ आणि त्यातली बदलती नाती यांच्या संदर्भात माणसांचं आजचं आयुष्य तपासणार्‍या आहेत. या बदलत्या काळात स्त्री-पुरुष संबंधांचे बदलते आयाम, त्यांचं डळमळतं समीकरण, यासोबत एकूणच एकमेकांना जोखून बघणारी नाती आहेत. अगदी मित्रा-मित्रांमधला अलिप्तपणा आणि कोरडेपणा जाणवणारा. हात राखून जेवढ्यास तेवढे संबंध हीच बहुधा या काळाची लक्षणीय ओळख. हा गोंधळवणारा, सैरभैर करणारा, तरीही फुकाच्या मिरवण्याला महत्त्व देणारा कालखंड अनुभवला असेल तर हे सशक्त लेखन अधिकच भिडत जातं.

या कथा आजच्या डोळस लेखकाच्या आहेत. लेखनात प्रयोग करण्यासाठी लागणारी सर्जनशीलता त्याच्याकडे आहे. पण लेखकाला जे सांगायचं आहे ते प्रयोगांमध्ये कुठेच झाकोळून जात नाही हे विशेष. केवळ प्रयोगात अडकून राहणं टाळणारी वस्तुनिष्ठता असल्यानं बालाजी सुतार यांच्या कथा निश्चितच आश्वासक ठरतात.

शीर्षकात अस्वस्थ शब्द नसला तरी दोन शतकांच्या मध्यावरचा तो सांधा आणि त्यावरची माणसं अस्वस्थ आहेत. त्यांचं सूक्ष्म निरीक्षण आणि ताकदीनं मांडणी दिसून येणारं हे लेखन आपल्यालाही अवस्थ करून सोडतं यात शंकाच नाही.

............................................................................................................................................................

‘दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी’ या कथासंग्रहाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4781/Don-Shatakanchya-Sandhyawarchya-Nondi

............................................................................................................................................................

लेखिका मेघश्री दळवी विज्ञानकथालेखक व समीक्षक असून आयटी क्षेत्रात कार्यरत आहेत.

meghashri@gmail.com

............................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘भैया एक्स्प्रेस आणि इतर कथा’ : बिहारमधून येणाऱ्या गाडीला पंजाबात ‘भैया एक्स्प्रेस’ म्हटलं जातं. पण या एक्स्प्रेसमधून उतरणाऱ्या श्रमिक वर्गाकडे इतर वर्गाचा पाहायचा दृष्टीकोन मात्र तिरस्काराचाच असतो

अरुण प्रकाश यांची 'भैया एक्स्प्रेस' ही कथा नोकरीसाठी स्थलांतर कराव्या लागणाऱ्या गरीब बिहारी समूहाची व्यथाकथा कथन करते. रामदेव हा अठरा वर्षांचा तरुण पंजाबमध्ये मजुरीसाठी गेलेल्या आपल्या भावाला - विशुनदेव - शोधायला निघतो. पंजाबमध्ये दंगली सुरू असतात. कर्फ्यू लागणं सामान्य घटना होऊन जाते. अशा परिस्थितीत रामदेवला पंजाबात जावं लागतं. प्रवासात त्याला भावाविषयीच्या भूतकाळातील घटना आठवत राहतात.......

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......