अजूनकाही
चित्रकार, लेखक, कवी संजीव खांडेकर यांचे ‘ऋतुसंहार’ हे सहा दीर्घलेखांचे पुस्तक आज (९ ऑगस्ट २०१९) संध्याकाळी ५:३० वाजता रवींद्र नाट्य मंदिर, मुंबई येथे समारंभपूर्वक प्रकाशित होत आहे. या पुस्तकाला समीक्षक अविनाश सप्रे यांनी लिहिलेल्या दीर्घ प्रस्तावनेचा हा संपादित अंश...
.............................................................................................................................................
प्रस्तुत ग्रंथामध्ये संजीव खांडेकर यांचे ‘युगांतर’च्या २०१५, १६, १७ आणि १८च्या दिवाळी अंकांतून प्रकाशित झालेले चार दीर्घ लेख, ‘पुरुष उवाच’च्या दिवाळी २०१८मधील लेख व दै. ‘लोकसत्ता’मधील एक असे सहा लेख अधिक विस्तारपूर्वक लिहून समाविष्ट करण्यात आले आहेत. लेख वेगवेगळे असले तरी त्यामध्ये एक समान सूत्र आहे; ते म्हणजे त्यांचा संदर्भ सद्यकालातील सर्वंकष स्थिती-गतीशी आहे आणि त्यातून त्यांनी या काळातील ‘अमानुषता’ आणि माणसाचे झालेले ‘वस्तूकरण’ व्यापक परिप्रेक्ष्यात अधोरेखित केले आहे. अतिशय गांभीर्यपूर्वक, अभ्यासपूर्वक आणि संदर्भसंपृक्त असे हे लेखन आहे. फुटकळ आणि उथळ शेरेबाजीने आणि अधिकारवाणीने केलेल्या लेखनास ‘वैचारिक लेखन’ म्हणून प्रतिष्ठित होण्याच्या आणि मान्यता मिळण्याच्या आजच्या काळात प्रस्तुतचे लेखन पूर्णपणे वेगळे असून मुळापासूनच विचार करायला वाचकाला प्रवृत्त करणारे आहे.
संजीव खांडेकर यांच्या या लेखातून प्रत्ययाला येणार्या मूलगामी चिकित्सेच्या केंद्रस्थानी ‘माणूस’ आहे आणि या माणसाची सद्यकाळातली (बिघडलेली) मानसिकता आणि त्याला सर्वांगाने घेरणार्या सामाजिक वास्तवाचे विवेचन करताना त्यांनी प्रामुख्याने फ्रॉईड आणि मार्क्स यांच्या विचारांचा आणि त्यांना वाट पुसत, त्यांच्या विचारात भर घालणार्या, नवी परिमाणे दाखवून देणार्या पुढील अभ्यासकांचा एकत्रित विचार केला आहे.
सर्वसाधारणपणे फ्रॉईड आणि मार्क्स हे दोन परस्परविरोधी ध्रुव आहेत, त्यांच्या भूमिका संपूर्णपणे वेगळ्या आहेत असे मानले जाते, पण वरवर पाहता तसे जाणवले तरी त्यांच्यामध्ये माणसाचा विचार करणारे परस्परपूरक समान दुवेही आहेत असे दाखवून खांडेकर आपल्या चिकित्सेमध्ये त्यांचा एकत्रित विचार करतात. (डेरिडाने ‘बायोनरी’ विचारपद्धतीला केलेला विरोध इथे आढळतो.) अशा तर्हेची भूमिका यापूर्वी जर्मन मानसोपचारतज्ज्ञ आणि प्रसिद्ध विचारवंत एरिक फ्रॉमने घेऊन भांडवलशाहीतील ‘सीकमॅन’ इन ‘सीक सोसायटी’ची चिकित्सा ‘बियाँड द चेन्स ऑफ इल्युजन’, ‘एस्केप फ्रॉम फ्रीडम’, ‘द सेन सोसायटी’, ‘टू हॅव ऑर टू बी’, ‘मॅन फॉर हिमसेल्फ’ इ. ग्रंथांतून केली होती आणि माणसाला भांडवली व्यवस्था कशी सातत्याने ‘भ्रमाच्या साखळी’मध्ये अडकवून ठेवते, त्याला कसे मनोरुग्ण बनवते, स्वातंत्र्यापासून पलायन करायला लावते हे दाखवून दिले होते. माणसाच्या जगण्यातून ‘स्वातंत्र्य’ वगळले तर त्याची वाटचाल ‘हुकूमशाहीकडे’ (फॅसिझम) होते, असा धोक्याचा इशारा एरिक फ्रॉमने देऊन ‘स्वातंत्र्या’चे माहात्म्य दाखवून दिले आहे; भ्रमाच्या साखळीतून मुक्त होण्याची गरज प्रतिपादली आहे, माणूस त्याने निर्माण केलेल्या जगापासून, आपल्या बांधवांपासून आणि मुख्य म्हणजे स्वत:पासून कसा ‘परात्म’ (एलीयनेटेड) झाला आहे, हे दाखवून दिले आहे.
आधुनिक औद्योगिक जगतातील पेचप्रसंगांची चर्चा करताना त्याने ‘हॅविंग’ आणि ‘बेईंग’ असे दोन प्रकार सांगितले आहेत. ‘हॅविंग’ या प्रकारात औद्योगिक जगताने निर्माण केलेल्या अतिरिक्त भौतिक गरजा आणि लालसांच्या मागे धावणारा माणूस आहे, तर ‘बेईंग’ या पर्यायी जाणिवेत सर्वोदयी सहभागाचा आणि सर्जनशील निर्मितीचा आनंद अभिप्रेत आहे आणि जगाला सर्वनाशापासून वाचवण्याचा हाच ‘मानवतावादी’ मार्ग आहे, असे त्याने म्हटले आहे. एरिक फ्रॉमचे लेखन प्रकाशित होऊन आता अनेक वर्षे लोटली आहेत आणि सद्यकाल अधिकच बिकट, गुंतागुंतीचा, आव्हानात्मक आणि विनाशकारी बनला आहे.
संजीव खांडेकर याच काळात वावरत आहेत आणि एरिक फ्रॉमप्रमाणेच फ्रॉईड आणि मार्क्स यांच्या विचारांच्या संश्लेषणातून संपूर्णपणे बदललेल्या आणि सतत बदलत असलेल्या सद्यकाळाची चिकित्सा करत आहेत. मराठी विचारविश्वात अशा तर्हेची चिकित्सापद्धती नवीन आहे.
संजीव खांडेकर यांच्या प्रस्तुत लेखनाचा संबंध सद्यकालाशी आहे आणि हा काळ ‘उत्तर-आधुनिकते’चा आणि ‘प्रगत भांडवलशाही’च्या तिसर्या टप्प्याचा आहे. इथे मुद्द्याची गोष्ट अशी की, ‘उत्तर-आधुनिकता’ आणि ‘प्रगत भांडवलशाही’ हे शब्द विशिष्ट मूल्यवाचक आहेत आणि समकालीन जगण्याशी त्यांचा थेट संबंध आहे. खांडेकर प्रस्तुत लेखनातून तो सविस्तरपणे विशद करून सांगतात आणि त्याचे अक्राळविक्राळ, अमानुष धोके दाखवून देतात.
‘नाझ, लाज आणि माज’मध्ये खांडेकरांनी नव्या भांडवली व्यवस्थेत निर्माण झालेल्या ‘आत्मरत’ (नार्सिस्ट) माणसाची चिकित्सा केली आहे. भांडवलशाहीने पोसलेल्या व्यक्तिवादाच्या अतिरेकातून ही मानसिक विकृती निर्माण होते. (‘रोमँटिसिझम’मध्ये अत्यंत महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या व्यक्तिवादामधून ‘दैवतीकरण’ (डेरीफिकेशन) आणि त्यातून पुढे जाऊन निर्माण होणारी ‘हुकूमशहा’सह अनेक प्रकारच्या विकृती कशा संभवनीय असतात याची चर्चा या वादसंकल्पनेच्या अभ्यासकांनी केली आहे याची इथे आठवण होते.
असे सांगून खांडेकरांनी टॉमस डेव्हिडने सांगितलेली अशा आत्मरतवृत्तीची १४ लक्षणे उद्धृत केली आहेत. याच अनुषंगाने त्यांनी ‘लाज वाटण्याची भावना’ ही मनुष्यप्राण्याच्या उन्नत भाव अवस्थेचे एक लक्षण कसे आहे, याची चर्चा केली असून तिच्यात ‘सामाजिक, मानसिक, राजकीय व म्हणून व्यक्तिगत अशा विविध पातळ्यांवर’ व्यक्त होताना केवढी शक्ती प्रकट होत असते हे सांगून आजच्या व्यवस्थेत आत्मरत होण्यामध्येच धन्यता मानणे हा ‘निर्लज्जपणा’ आणि ‘अनैतिकता’ आहे, ‘उद्धटपणा’ आहे, ‘रोगट व अमानुष आत्मप्रीतीवाद’ आहे, असे म्हटले आहे. ‘ऋतुसंहाराचा काळ : अर्थात भविष्याचा बर्फ खडा’मध्ये त्यांनी अशा स्वत:च्या पलीकडे न पाहणार्या आणि विस्तारलेल्या नवमध्यमवर्गाच्या मानसिकतेचा ऊहापोह केला आहे.
नवभांडवलशाहीने ‘कामगार वर्ग’ ही संकल्पनाच कशी नष्ट केली आहे, तिला पर्याय असलेला हा सोयीचा नवमध्यमवर्ग कसा पोसला आहे याचे विवेचन केले आहे. या वर्गाला ‘इतिहास नाही’, त्याचे राजकीय भान हरपले आहे, अशा लोकांनी बनलेल्या समाजाचे मानसिक संतुलन ढळले आहे, त्याची सर्जनशीलता लोप पावली आहे, वाढणार्या प्रचंड विषमतेची त्याला ‘लाज’ वाटत नाही आणि म्हणून हा काळ ‘भांडवली लालसेने व सुखलोलुपतेने’ भरलेला ऋतुसंहाराचा नव्हे तर ‘ऋतुविनाशाचा’ काळ आहे असे त्यांचे निष्कर्ष आहेत.
पंचमहाभूते आपणाला माहीत आहेत, पण आता ‘माणूस’ हे ‘सहावे महाभूत’ भांडवलशाहीने निर्माण केले आहे, त्याची भूक ‘रानटी’ आहे, त्याला भसम्या रोग झाला आहे आणि निसर्ग आणि पर्यावरणाचा विनाश करण्यात तो कसा रमला आहे आणि त्यामागे ‘भांडवली व्यवस्था’ कशी कार्यरत आहे, वेग हेच जीवन मानल्यामुळे सारासार विचार करण्याची वृत्ती कशी खुंटली आहे, त्यातून भवतालचा विसर (कसा) पडतो, माणसाचा संवाद (कसा) खुरटतो, यांत्रिकता वाढते, तात्त्विक व नैतिक प्रश्नांचा विसर पडतो, निसर्गाशी असलेल्या मानवी संबंधांचा पाया (कसा) उखडला जातो ते या लेखातून खांडेकर दाखवून देतात.
‘वेडे करून सोडावे सकळ जन’ हे लेखाचे शीर्षक अर्थाच्या दोन पातळ्या सूचित करते. वाच्यार्थाने घेतल्यावर सध्याच्या बाजारकेंद्री- भांडवली अर्थव्यवस्थेचा एककलमी प्रमुख हेतू त्यातून सूचित होतो आणि व्यंगार्थाने लक्षात घेतल्यावर रुजवलेल्या चाकोरीबद्ध व्यवस्थेला झुगारून देण्यासाठी आवश्यक असणारी क्रांतीगर्भता त्यातून सूचित होते, संभावित शहाणपणापेक्षा सर्जनशील, क्रियाशील वेडेपणाचे माहात्म्य व्यक्त होते. प्रस्तुत लेखात खांडेकर यांनी भाषेच्या सार्वभौम शक्तीचे स्वरूप विशद करून तिच्या सद्य:स्थितीची स्थिती आणि अवस्था सांगितली आहे.
भाषा म्हणजे समाज आणि संस्कृतीचे संचित. माणसाचे आत्मभान आणि अस्तित्वभान. माणसाच्या अभिव्यक्तीचे साधन. भाषा म्हणजे अर्थनिर्मिती. म्हणूनच ‘भाषा नासली की मने नासतात, मन नासले की माणसाचा कानूस होतो’, असे खांडेकर स्पष्टपणे सांगतात आणि म्हणूनच सद्यकाळात ‘भाषा गुदमरते आहे काय?’ असा प्रश्न उपस्थित करतात. भाषेच्या सर्जकशक्तीचा सर्वोत्तम आविष्कार कवितेत होत असल्याने ते या संदर्भात थोर मराठी कवी दिलीप चित्रे यांच्या ‘कवी काय काम करतो?’ या प्रसिद्ध लेखातील मते उद्धृत करतात आणि त्याचबरोबर भाषेचा राजकारणाशी असलेल्या संबंधांचा विचार करताना जॉर्ज ऑरवेलच्या ‘पॉलिटिक्स अॅण्ड इंग्लिश लँग्वेज’ या लेखाचा संदर्भ देतात आणि राजकीय सोयीसाठी वापरण्यात येणार्या भाषेच्या दंडुक्यामुळे (इंग्रजी) भाषाच कशी कुरूप, बेढब आणि अर्थशून्य होत आहे हे दाखवून देऊन ‘भाषा खोट्याला खरेपणाचा मुलामा चढवते’ याकडे आपले लक्ष वेधतात.
‘स्वप्नदोष, शीघ्रपतन, कमजोरी आणि राष्ट्रवाद’ अशा प्रक्षोभक शीर्षकांच्या लेखांतून खांडेकर यांनी आपल्याकडे लैंगिकता व राजकारण, लैंगिक दमन व अर्थकारण अशी सांगड घालून त्या सांगडीचा प्रत्यक्ष राजकीय कार्यक्रम करून व्यवस्था बदलाचे राजकारण तळागाळात वा कामगार व तरुण विद्यार्थी वर्गात पोहोचवण्याचे कोणतेच प्रयोग व प्रयत्न झालेले दिसत नाहीत, असे दृष्टोत्पत्तीस आणून देतात आणि त्यामुळे झालेले दुष्परिणाम अधोरेखित करतात. मोठ्या प्रमाणात निर्माण करण्यात आलेले आणि माणसाच्या मानसिकतेवर आरोपित केलेले ‘लैंगिक अपराधित्व’ हे आपल्या मानवी नैतिकतेचे मूळ आहे, असे सांगून त्याचाच पुढचा भाग म्हणजे लैंगिक दमनाचा सामाजिक आविष्कार होय हे ते दाखवून देतात तसेच ‘(लैंगिक) दमनाचा हेतूच मुळी त्या त्या वेळी अस्तित्वात असलेली समाजाची वर्गीय रचना बदलू नये हाच असतो’, असेही निदर्शनास आणतात.
त्यासाठी मुख्यत: कुटुंबसंस्था आणि त्याबरोबर शाळा, चर्च, मंदिर, मशीद, रीतिरिवाज, कर्मकांडे, धार्मिक आणि सांस्कृतिक संस्थांचा वापर पद्धतशीरपणे केला जातो आणि त्यांच्यामार्फत असे सोयीस्कर दमन प्रस्थापित केले जाते आणि ‘लैंगिक दमन हे केवळ इंद्रिय दमनापुरते न राहता सार्या जीवनाचेच भाग बनते. जीवनाच्या प्रत्येक अंगालाच ते स्पर्श करते’ आणि या सार्यात स्त्रीला ‘एक वस्तू एवढीच किंमत राहते’.
प्रस्तुत लेखात खांडेकर यांनी स्त्री-पुरुषातले लैंगिक संबंध नैसर्गिक, नितळ आणि निर्मळ का राहत नाहीत, त्यामुळे मानसिक आजार कसे निर्माण होतात याची मीमांसा राजवाडे, र.धों. कर्वे, मार्क्स, फ्रॉईड, फुको, ल्योतार आणि मुख्य म्हणजे राईश यांच्या विचारांच्या आधारे केली आहे आणि लैंगिक दमनाचे संस्थात्मक आणि सामाजिक-राजकीय स्वरूप उघड केले आहे.
प्रस्तुत लेखांतून चर्चिली गेलेली व्यक्तिवादी आत्मरतवृत्ती/द्वेष व ईर्षा, कामगारवर्ग नष्ट होणे आणि मध्यमवर्गाचा उदय, वर्गसंघर्ष बोथट होणे, समाजाचे राजकीय भान हरवणे, पर्यावरण विनाश आणि सोयीस्कर विकासवाद, अतिरिक्त इच्छांची निर्मिती, वेग हेच शक्तीचे केंद्र मानणे, परिणामी भवतालचा विसर पडणे, आत्मभान जाणे, भाषेचे सर्जक स्वरूप जाऊन सपाट, अर्थहीन भाषेचे प्राबल्य वाढणे, संस्कृतीचे वस्तूकरण होणे, मुक्त बाजारपेठ आणि फ्री इकॉनॉमीचा पुरस्कार, स्पर्धेचे तत्त्वज्ञान, विवाह संस्थेचे दमनकारी स्वरूप आणि लैंगिक दमन आणि त्यातून आलेले अपराधित्व, अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच आणि मुस्कटदाबी असे माणसाच्या जीवनमरणाशी थेट संबंध असलेले विषय अधोरेखित होतात.
हे विषय सर्वसाधारणपणे आपणाला माहीतही असतात, कारण ते सतत अंगावर कोसळत असतात. मात्र पृष्ठस्तरीय माहितीच्या पलीकडे त्यासंबंधी फार काही माहीत असत नाही. प्रस्तुत लेखांतून या पृष्ठस्तरांच्या आत शिरून या समस्यांच्या मुळाशी कोणत्या व्यवस्था कार्यरत आहेत, त्या कुणाचे हितसंबंध जपतात, त्यांचा आविष्कार कसा होत असतो, त्यांचे परिवेश कसे असतात आणि त्यांचा अंतिम परिणाम काय असतो याची जी मूलभूत चिकित्सा केली आहे, ती महत्त्वाची आणि या लेखांचे वेगळेपण अधोरेखित करणारी आहे.
संजीव खांडेकरांच्या लेखनाचे वैशिष्ट्य म्हणजे जवळपास प्रत्येक घटनेकडे वा तिच्या परिणामांकडे ते तात्त्विक (फिलॉसॉफिकल) दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी फ्रॉईड, मार्क्स व डार्विन असे त्रिमितीचे भिंग वापरणे हे येरागबाळ्याचे काम नव्हे. फ्रॉईडसाठी मानवी इच्छा किंवा लालसा ही अथांग आहे. या लालसेची पूर्ती करण्याचे साधन वा क्षमता माणसामध्ये नसते व म्हणूनच सतत एका गर्क असमाधानात किंवा दु:खात माणसाच्या मनाचा एक मोठा भाग बुडून गेलेला असतो. खांडेकर याच सिद्धांताचा वापर पायाभूत मांडणी करण्यासाठी व पाठोपाठ मार्क्सवादी विचारातून निर्माण झालेल्या ‘परात्मभावा’च्या संकल्पनेचा आधार घेऊन पुढे स्वत:चे चिंतन वाचकांसमोर ठेवतात. या चिंतनात अक्षरश: असंख्य संदर्भांचा उल्लेख असतो. हे संदर्भ जसे समकालीन साहित्य, कविता वा वैचारिक व तात्त्विक लेखक विचारवंतांचे असतात, तसेच समकालीन दृश्यकला, नाट्य व सिनेमा अशा मराठीत क्वचित आढळणार्या क्षेत्रांचेही असतात.
स्वत: दृश्यकलावंत व कवी असल्यामुळे खांडेकरांची भाषा मराठीसाठी नव्या क्षितिजांना स्पर्श करते. भाषेचा डौलदार वापर व भाषेचे चित्रात किंवा दृश्यकलेच्या अवकाशाचे भान असलेल्या भवतालात रूपांतर करण्याचे कसब त्यांचे लेखन वाचताना अनेकदा जाणवते.
शरद्चंद्र मुक्तिबोध असोत वा कॉ. श्रीपाद अमृत डांगे, इतिहासाचार्य राजवाडे असोत वा र.धों. कर्वे, अशा अनेक मराठी विश्वाला परिचित असलेल्या नामवंतांचे विचार व लेखन खांडेकर पूर्णपणे नव्या स्वरूपात व नव्या संदर्भासह आपल्यासमोर ठेवतात व ही या पुस्तकाची एक अत्यंत जमेची बाजू आहे.
एक अभ्यासक या नात्याने संजीव खांडेकर यांनी सद्य:स्थितीचा आरसा आपल्यासमोर धरला आहे. त्यात पाहिल्यावर आपण भ्रांतचित्त होणे साहजिक आहे, इच्छा असो वा नसो, गेल्या पंचवीस-तीस वर्षांत भांडवलशाहीच्या अजगराने आपणाला गिळंकृत करून टाकले आहे. त्याच्यातून बाहेर कसे पडायचे? पडता येईल का? पडू दिले जाईल का? माणसाचे हरवलेले माणूसपण, गमावलेली मानुषता कोणत्या मार्गाने पुन्हा स्थापित होईल? हे लेख वाचताना अशा यक्षप्रश्नांनी अस्वस्थ केले आणि अशी अस्वस्थता व्यक्तिगत न राहता सार्वत्रिक व्हायला हवी, अशा लेखांचे मोल म्हणूनच आहे.
.............................................................................................................................................
'ऋतुसंहार' हे पुस्तक विकत घेण्यासाठी क्लिक करा-
https://www.booksnama.com/book/5013/Rutusanhar
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment