अजूनकाही
१९९४ साली फुलन देवीची सुटका झाल्यानंतर मारी तेरेज क्यूनी आणि पॉल रोंबाली यांनी तिला भेटून तिला स्वत:बद्दल पुस्तक लिहिण्याची विनंती केली. फुलनला पुस्तक म्हणजे काय हेसुद्धा माहिती नव्हतं. तिनं संमती दिल्यानंतर मारी तेरेज क्यूनी आणि पॉल रोंबाली यांनी फुलनची कहाणी तिच्याच शब्दांत रेकॉर्ड केली आणि नंतर शब्दांत उतरवून पुस्तकरूपानं प्रकाशित केली. हे पुस्तक पूर्ण होण्यासाठी दोन वर्षं लागली. नुकताच मूळ इंग्रजी पुस्तकाचा डॉ. प्रमोद जोगळेकर यांनी मराठी अनुवाद केला आहे. हे पुस्तक मेहता प्रकाशनानं जानेवारी २०१९ मध्ये प्रकाशित केलं आहे.
फुलनच्या आयुष्यावर शेखर कपूर यांनी बनवलेला ‘बँडिट क्वीन’ हा चित्रपट मी १४-१५ वेळा बघितला आहे. तेव्हापासूनच मला फुलनबद्दल जाणून घेण्याची इच्छा होती. चित्रपटामध्ये दाखवलं गेलेलं प्रत्येक दृश्य बघून अंगावर काटा येतो. मात्र या चित्रपटामध्ये अनेक प्रसंग दाखवलेले नाहीत व काही प्रसंग खरेसुद्धा नाहीत. कारण तो सिनेमा फुलनची परवानगी घेऊन बनवलेला नाही. पण या पुस्तकामध्ये फुलननं स्वतःच आपली जीवनकहाणी सांगितली आहे.
या पुस्तकामधून आपल्या समाजाचा भयानक व कुरूप चेहरा समोर दिसतो. जातिव्यवस्था, गरिबी, उच-नीच, भेदभाव, स्त्रियांना दिली जाणारी हीन वागणूक, यौनशोषण, बालविवाह, कर्मठपणा, अज्ञान, रूढी-परंपरा, अंधश्रद्धा, हुंडा, भ्रष्टाचार अशा अनेक समस्यांवर हे पुस्तक भाष्य करतं.
गुन्हेगार किंवा समाजाशी विद्रोह करणारे लोक हे आपल्याच समाजाचे घटक असतात. ते अचानक गुन्हेगार का बनतात? या गोष्टीबद्दल आपला समाज कधी विचार का करत नाही? आपण फुलनचंच उदाहरण बघू. एका साध्यासुध्या घरातली, शेतात काम करणारी मुलगी हातामध्ये बंदूक घेण्यासाठी का प्रवृत्त होते? या गोष्टीला समाजसुद्धा जबाबदार नाही का? असे अनेक प्रश्न आपल्याला हे पुस्तक वाचत असताना पडतात.
फुलनचा एकूण जीवनसंघर्ष खूपच दुःखद आहे. पुस्तक वाचत असताना मी कितीतरी वेळा रडलो. फुलनच्या कथेतून आपल्याला आपल्या समाजरचनेबद्दल खूप माहिती मिळते. गुन्हेगार, पोलीस, डाकू आणि डाकूंचा राजकारणासाठी उपयोग करणारे मतलबी सत्ताधारी, अशा अनुभवांचं प्रत्ययकारी चित्रण या आत्मकथेतून वाचलं की मन अंतर्मुख होतं.
उत्तर प्रदेशातील एका गरीब मल्लाह (हे लोक मासेमारी किंवा नावड्याचा व्यवसाय करणारे) जातीच्या कुटुंबात फुलनचा जन्म झाला. वसंतोत्सवाच्या दिवशी जन्म झाला म्हणून तिचं नाव ‘फुलन’ ठेवण्यात आलं. तिचे वडील खूपच गरीब आणि दुर्बल होते, तर आई स्वभावानं कडक आणि रुबाबदार होती. फुलन तिच्या आईवरच गेली होती. ती कोणालाही घाबरत नसे. फुलनला तीन बहिणी आणि एक भाऊ अशी चार भावंडं होती. फुलन दुसऱ्या नंबरची. फुलनच्या वडिलाची सारी शेतजमीन त्यांच्याच सख्या भावानं (बिहारी) कपटानं घेतली होती. तो त्यांना नेहमी धमक्या देत असे. तो नेहमी फुलन व तिच्या बहिणीला मारत असे. त्यांना शेतात पायसुद्धा ठेवू देत नसे.
फुलन घरचं सर्व काम करत असे. दुसऱ्यांच्या शेतात राबणं, गाई-म्हशी सांभाळणं, शेतातून गवत कापून आणणं, जळण आणणं, कधी कधी वडिलांसोबत गवंडी कामाला जाणं, अशी कामं फुलन करत असे. त्यांची आर्थिक परिस्थिती खूपच बिकट होती. त्यांना कधी कधी उपाशीही राहावं लागतं असे.
मोठ्या बहिणीनंतर वयाच्या ११ व्या वर्षीच फुलनचं लग्न तिच्या वडिलांच्या वयाच्या इसमासोबत झालं (तिच्या नवऱ्याचं नाव पुट्टीलाल). त्यानं वयात येण्याच्या अगोदरच तिला आपल्या सोबत नेलं. फुलनचं यौनशोषण केलं. तिचा मानसिक, शारिरीक छळ केला. तो तिला नेहमी मारहाण करत असे. त्याच्या त्रासामुळे फुलन दोन-तीन वेळा घरातून पळालीसुद्धा. पण तिला समजावुन पुन्हा त्या नराधमाच्या हवाली केलं गेलं. पण नंतर तिचा नवरा तिला एका बोटीवर सोडून पळून गेला. नंतर त्यानं तिकडे दुसरं लग्न केलं. फुलन तिच्या गावी परत आली आणि पुन्हा पहिल्यासारखी कामं करू लागली. पण आता गावकरी तिचा छळ करू लागले. ‘नवरा सोडून आलेली रांड’ म्हणून तिला हिनवू लागले. तिला गावातून हाकलून लावा असं म्हणू लागले. कारण नवरा नसलेली बाई गावात राहणं ही त्यांच्या दृष्टीनं चांगली गोष्ट नव्हती. गावातील सरपंच, पाटील आणि तिचा चुलत भाऊ (मायादीन) तिला धमकावू लागले.
वयाच्या १५ व्या वर्षी तिच्यावर बलात्कार झाला, तोसुद्धा तिच्या आई-वडिलांसमोर. बलात्कार करणारा सरपंचाचा मुलगाच होता. फुलन त्याला काही उलटसुलट बोलली होती. फुलननं पोलिसांकडे मदत मागितली, पण पोलिसांनी तिला काही मदत केली नाही. काही दिवसांनंतर फुलन तीच्या बहिणीच्या गावी गेली. तेव्हा इकडे सरपंच आणि तिचा चुलत भाऊ तिच्यावर डाकू असण्याचा खोटा आरोप लावून तिला व तिच्या बापाला पोलिस ठाण्यात टाकतात. तिथं काही पोलीस अधिकारी तिच्यावर बलात्कार करतात. तिच्यावर अनेक अत्याचार करतात आणि तिला धमकीही देतात की, ‘कोणाला सांगू नकोस. अन्यथा आम्ही तुझ्या xxx मध्ये चटणी/मिरची टाकू...’ ती भीतीमुळे गुन्हा कबूल करते आणि काही महिने जेलमध्ये राहते. नंतर तिची आई कर्ज काढून तिचा जामीन घेते..
जेलमधून सुटल्यावर ती तिच्या गावी येते, पण इकडे सरपंच आणि तिचा चुलत भाऊ काही शांत बसत नाहीत. ते तिला ठार करण्यासाठी बाबू गुज्जर या डाकूला तिची सुपारी देतात. नंतर काही डाकू येऊन फुलन व तिच्या आई-वडिलांना खूप मारहाण करतात आणि तिला आपल्यासोबत घेऊन जातात. बाबू गुज्जरसुद्धा तिच्यावर बलात्कार करतो. हे बघून त्याच्याच गँगमधला एक डाकू (विक्रम मल्लाह) बाबू गुज्जरला ठार करतो व फुलनला वाचवतो. कारण तो फुलनच्या जातीचा असतो. पुढे तो फुलनशी लग्न करतो आणि तिला आपल्या गँगमध्ये सामिल करून घेतो.
येथून फुलन डाकू बनते. त्यांची गँग अनेक गावांमध्ये जाऊन धाडी टाकते. श्रीमंतांना लुटून गरिबांना काही पैसे देते. गरिबांवर कोणी अत्याचार केला तर त्याला शिक्षा करते. अनेक गरीब मुलींचं लग्न लावून देते. ते गरिबांसाठी एक प्रकारे मसीहा बनतात.
डाकू बनल्यानंतर फुलन पुट्टीलालनं केलेल्या अत्याचाराचा सूड घेण्याचं ठरवते. ती त्याला ठार करते. सरपंच, पाटील व मायादीन यांनासुद्धा खूप बदडते. पुढे विक्रम मल्लाहचा मित्र असलेला डाकू श्रीराम (ठाकूर) - ज्याला स्वतः विक्रम जेलमधून सोडवतो - विक्रम मल्लाहला ठार करतो. फुलनला नागडी करून गावागावांत फिरवतो. तिच्यावर अनेक जणांना बलात्कार करायला लावतो आणि तिला एका बंद खोलीत कोंडून ठेवतो. एके दिवशी एका ब्राह्मण व्यक्तीच्या मदतीनं फुलन तेथून पळून जाते. ही बातमी कळताच श्रीराम त्या ब्राह्मण व्यक्तीला जिवंत जाळतो.
तेथून पळून जाऊन फुलन काही डाकूंची मदत घेऊन एक नवीन गँग बनवते. ती श्रीरामनं केलेल्या विक्रमच्या खुनाचा व तिच्या सोबत केलेल्या बलात्काराचा सूड घेण्याचं ठरवते. ती श्रीरामला शोधत शोधत एका गावात येते. त्या गावामधील २२ ठाकूर व्यक्तींना गोळ्या घालून ठार करते. कारण त्यांनी श्रीरामला लपण्यासाठी मदत केलेली असते.
ही बातमी आगीच्या वेगानं देशभरात पसरते. पोलिसांचा बंदोबस्त कडक होतो. फुलनवर सरकार एक लाखाचं बक्षीस जाहीर करतं. पण फुलन कोणाच्याच हाती येत नाही. श्रीरामला शोधत असतानाच तिला महिती मिळते की, श्रीराम ठाकूरला त्याच्याच भावानं ठार केलं आहे. पोलीस इकडे फुलनचा शोध घेत असतात. ती त्यांना जिंदा किंवा मुर्दा हवी असते. फुलनवर खूप दबाव निर्माण होतो. ती विचारात पडते. तिच्या कुटुंबावरही खूप अत्याचार होतात. त्यामुळे फुलन आत्मसमर्पण करण्याचा निर्णय घेते. १२ फेब्रुवारी १९८२ रोजी ती मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री अर्जुनसिंह यांच्यासमोर आत्मसमर्पण करते. तेव्हा तिला बघण्यासाठी हजारो लोक येतात. तिला ११ वर्षं विनाखटला जेलमध्ये राहावं लागतं. १९९४ मध्ये तिच्यावरील सर्व आरोप माफ होतात. ती जेलमधून मुक्त होते...
.............................................................................................................................................
‘मी फूलन देवी’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5012/Mi-Phoolandevi
.............................................................................................................................................
इथं हे पुस्तक संपतं. पण त्यानंतर फुलनच्या आयुष्यात मोठा बदल होतो. ती १९९६ साली समाजवादी पक्षाकडून मिर्झापूरची खासदार होऊन संसदेत जाते. १९९९ साली ती पुन्हा खासदार म्हणून निवडून येते. २५ जुलै २००१ रोजी दिल्लीतील शासकीय निवासस्थानाबाहेर तिची गोळी मारून हत्या केली जाते.
१९७६ ते १९८३ या काळात चंबळच्या खोऱ्यात फुलनचं राज्य होतं, दहशत होती. फुलनचा बालपणापासून ते शत्रूच्या मनात धडकी भरवणारी डाकू इथपर्यंतचा प्रवास काळीज चिरणारा आहे. तो वाचताना आपण थरारून, थिजून जातो.
.............................................................................................................................................
मोईन के
upscaspirant22@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment