अजूनकाही
महेंद्र कदम यांची ‘तणस’ ही कादंबरी नुकतीच मुंबईच्या लोकवाङ्मय गृहाने प्रकाशित केली आहे. स्थानिक ते जागतिक असा समकालीन प्रवास उलगडणारी ही कादंबरी आहे. सतीश भावसार यांनी तिचे आकर्षक व उदबोधक मुखपृष्ठ रेखाटले आहे.
विसाव्या शतकाच्या अखेरीस आगंतुकपणे शिरकाव केलेल्या जागतिकीकरणाच्या मूळ संकल्पनेला मध्यवर्ती ठेवून कादंबरीकाराने लेखन केले आहे. जागतिकीकरणाचे फायदे-तोटे, यांत्रिकीकरण, औद्योगिकीकरण याची अर्थशास्त्रीय पद्धतीने बरीचशी चर्चा सातत्याने होत आली आहे. परंतु या सर्व व्यवस्थेच्या केंद्रस्थानी असलेल्या सामान्य माणसाच्या जीवनावर - मग तो शहरी असेल किंवा ग्रामीण - नेमकेपणाने काय परीणाम झाला, याची चर्चा अभावानेच होताना दिसते. जागतिकीकरणाच्या प्रभावातून दुर्लक्षित राहिलेल्या नेमक्या याच धाग्याला पकडून कादंबरीकाराने नायक-नायिकांच्या दैनंदिन जगण्यातून, वागण्यातून आणि कृतीतून जागतिकीकरण उलगडण्याचा प्रयत्न केला आहे.
ही कादंबरी ग्रामीण व शहरी पार्श्वभूमीवर रेखाटण्याचे दिव्य कादंबरीकाराने पेलले आहे. कादंबरीचा नायक दिनकर त्याच्या कुटुंबाची गावाकडील तुटलेली नाळ आणि शहरामध्ये राहूनही शहरालगतच्या टेकडीविषयी त्याच्या मनात असलेली ओढ, टेकडीभोवतीच्या अनेक रहस्यमय हालचाली, त्याची स्वत:विषयीची स्वगतपर मनोगते बोलकी आहेत.
जागतिकीकरणामुळे सभोवतालचा परिप्रेक्ष्य झपाट्याने बदलत जातो. साधारण बुद्धिमत्ता लाभलेला दिनकर रोजीरोटीसाठी वाहन व्यवसायाकडे आकर्षित होतो. व्यवसायाच्या अनुषंगाने येणारी सगळ्या प्रकारची व्यसने दिनकरला लागतात. आज प्रत्येक शहरालगत अशी वाहनतळे विकसित झाली आहेत. सामान्य माणूस त्याच्याकडे लक्ष देत नाही, परंतु लेखकाने वाहनतळाला बोलके केले आहे. वाहनतळाच्या उदरात असंख्य घटना गाडल्या गेल्या आहेत, त्यांना बोलतं करून लेखकाने एक नवीन प्रयोग केला आहे. वाहनतळावर एकमेकांना भेटणारी वेगवेगळी माणसं, वाहन मालक, चालक, प्रवासी, व्यावसायिक, पुढारी, संघटना, जीपवाले-ऑटोवाले यांच्यातील स्पर्धा आणि मनोज, चिंतामणसारखे सुशिक्षित तरुण, त्यांचे त्यांच्या कुटुंबातील वास्तववादी जीवन यांचा लेखकाने चांगला आढावा घेतला आहे. कादंबरीकाराने समकालीन अवैध प्रवासी वाहतुकीचे अचूक आणि नेमकेपणाने वर्णन केले आहे.
जीपला झालेल्या अपघाताने दिनकरच्या जीवनाला वेगळे वळण लागते आणि तो अर्थकारणाचे केंद्र असणार्या पतसंस्थेमध्ये नोकरीला लागतो. सर्वसामान्यांना सहजासहजी अर्थसहाय्य उपलब्ध होण्यासाठी उदयास आलेल्या पतसंस्था कशा सर्वसामान्यांचे आणि कर्मचार्यांचे शोषण करतात, याचे वास्तवादी विवेचन कादंबरीत येते. उत्तमराव, त्यांचा मुलगा अमर, पंत, बाजीरावसारखे तरुण, त्याचे वडील शिवाजीराव काळे, दिनकरची गहाण शेती, त्यांच्या एनओसीसाठी त्याची अमरने केलेली फरफट हे प्रसंग वास्तववादी झाले आहेत. पतसंस्थेचे फुगे आणि त्यातून हवा निघून गेल्यानंतरची स्थिती हे सर्व भयानक होते. आभासी अर्थव्यवस्थेचा फुटलेला फुगा लेखकाने यानिमित्ताने वाचकांसमोर मांडला आहे.
दिनकरमधील तथाकथित स्पार्क ओळखून त्याच्या प्रेमात पडून अर्धांगिनी बनलेली उर्मिला हे या कादंबरीतील एक महत्त्वाचे पात्र ठरते. दिनकर, त्याचे आई-वडील, उर्मिला अशा छोट्या कुटुंबातील नाना कळा, एकमेकांविषयीची कमालीची तुसडी भूमिका, आर्थिक प्रश्नांची सोडवणूक करता करता झालेली फरफट, त्यामुळे दैनंदिन जीवनावर झालेले परिणाम, त्यातच परिस्थितीपुढे हतबल होऊन दिनकरचे सातत्याने नैराश्याच्या गर्तेत जाणे, हे जागतिकीकरणाच्या रेट्यामुळे हतबल झालेल्या कुटुंबव्यवस्थेचे वास्तव आहे. एक प्रश्न मिटवला की दुसरा निर्माण होणे, एकातून मार्ग काढेपर्यंत दुसर्याचे काय करायचे असे अनेक अनुत्तरित प्रश्न वाचकांना विचार करायला भाग पाडतात. पती-पत्नीमधील प्रेम, विरह, समर्पण, संवाद यांमुळे कादंबरीची उंची वाढवते. प्रसंग उभे करणे, प्रसंगानुरूप संवाद ही कादंबरीची जमेची बाजू आहे. वैश्विक घटनांमुळे भारतीय कुटुंबव्यवस्थेवर झालेले प्रहार दिनकरच्या कुटुंबाच्या रूपाने लेखकाने ठळकपणे मांडले आहेत.
कादंबरीतील सर्व पात्रं लक्षात राहण्याजोगी व प्रातिनिधिक आहेत. त्यांच्या असण्याने कादंबरीचं कथानक सजलं आहे. उर्मिलेचे वडील पंत, त्यांची महत्त्वाकांक्षा, अर्थकारणी व राजकारणी लोकांशी त्यांना सलगी करावीशी वाटणं, हे अफलातून आहे. शिक्षणसंस्थेची रचना, तिथली स्पर्धा, उर्मिलेनं बापाच्या मनाविरोधी केलेलं लग्न, तरीही पडद्याआडून लेकीला मुख्याध्यापिका बनवतानाची बापाची घालमेल यातून उर्मिलेल्या कुटुंबाचंही यथायोग्य वर्णन लेखकाने केलं आहे.
महेंद्र कदमांनी ‘तणस’च्या निमित्तानं जागतिक पातळीवरील घडणार्या घटनांचा स्थानिक पातळीपर्यंत उमटत जाणारा प्रभाव रेखाटला आहे. समकालावरती आधारित वास्तववादी कथानक, ओघवती लेखनशैली, भाषिक माधुर्य, प्रसंगानुरूप ग्रामीण बोलीभाषेचा आलेला वापर, उत्तम संवाद, स्थल-काळानुरूप सुसंगत घटनाक्रम, व्यक्तीचित्रं ही या कादंबरीची काही बलस्थानं वाटतात. जीवनातील चढउतारामुळे सातत्यानं हताश, उत्साही होणार्या नायकांच्या व्यक्तिमत्त्वातील घालमेल चिंतनीय वाटते. नव्हे ती समकालीन सर्वच तरुणांपुढील गंभीर समस्याच होऊन बसली आहे, असं वाटतं.
.............................................................................................................................................
'तणस' हे पुस्तक विकत घेण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/4906/Tanas
.............................................................................................................................................
लेखक प्रा. डॉ. राजेंद्र गायकवाड विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालय (टेंभुर्णी. ता. माढा. जि. सोलापूर) येथे इतिहास विभागप्रमुख आहेत.
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment