अजूनकाही
इतिहासात थोडे मागे डोकावून पाहिले तर हवेतील कार्बन-डायऑक्साईड हा घटक प्रदूषणास जबाबदार मानला जात नसे. पण गेल्या काही शतकांच्या मानवीय हस्तक्षेपामुळे आज कार्बन-डायऑक्साईड वायू-प्रदूषणाचे मुख्य कारण मानला जातो. तसेच काहीसे मानवी मलाच्या बाबतीतही आहे. असे नेमके काय घडले, ज्यामुळे आज मानवी मल-मूत्र जल-प्रदूषणाच्या अनेक कारणांपैकी एक मुख्य कारण समजले जाते? त्यामुळे फक्त पाण्याच्या स्त्रोतांनाच नुकसान पोहोचले आहे की, अजूनही काही घडत आहे? या विषयांचा अभ्यासपूर्ण मागोवा लेखक सोपान जोशी आपल्या ‘जल थल मल’ या पुस्तकांतून घेतात. हे पुस्तक जुलै २०१६मध्ये ‘गांधी शांती प्रतिष्ठान’ने हिंदीमध्ये प्रकाशित केले. जवळपास दोन वर्षांच्या मेहनतीनंतर नागपूरच्या प्राजक्ता अतुल आणि मित्रमंडळी यांनी हे पुस्तक मराठीत अनुवादित केले. ‘ट्री इम्प्रिंट्स’ने हे पुस्तक मराठीत प्रकाशित करून अभ्यासपूर्ण मराठी साहित्यात मोलाची भर घातली आहे.
मलामुळे होणारे पाण्याचे प्रदूषण, हा या पुस्तकाचा विषय आहे असे एखाद्याला वाटू शकते. पण तसे नसून जल, थल (जमीन मुख्यतः माती) आणि मल यांचा एकमेकांशी असणारा संबंध हा या पुस्तकाचा मूळ विषय आहे. लेखक या तीन तत्त्वांची सामाजिक अंगाने ऐतिहासिक आणि वैज्ञानिक चौकशी करत त्यांच्यातील संबंध प्रस्थापित करतो. बहुतेकदा अशा पद्धतीने संबंध प्रस्थापित करताना लेखकाला तटस्थ भूमिका घ्यावी लागते. त्यामुळे लेखन रुक्ष होण्याची शक्यता वाढते. पण लेखकाची विषयाबद्दल असलेली आस्था आणि तळमळ लेखनाला धार देते. ‘स्वच्छता मंदिरातील वेदीवरील बळी’ या प्रकरणात लेखक सोपान जोशी गटार साफ करणाऱ्यांविषयी लिहिताना म्हणतात, ‘कुठलीही व्यक्ती इतके किळसवाणे व धोक्याचे काम केवळ नाईलाजास्तवच करते. आपल्या शहरांमध्ये इतके लाचार लोक मिळणे अवघड नाही. तसेच दुसऱ्याच्या अगतिकतेचा फायदा उचलणाऱ्यांचीही कमतरता नाही.’
जल-थल-मल यांतील संबंध पूर्वापार आहेत. ते पुढेही असणार आहेत. मानवाच्या उपभोगी आणि असंवेदनशील वृत्तीमुळे या संबंधांमध्ये बदल होतो आहे आणि त्याचा फटका मानवालाच बसणार हे नक्की. यासाठी लेखक एकपेशीय सूक्ष्मजीवापासून ते विशालकाय देवमाशापर्यंत, भारतातील खेड्यांपासून ते लंडनच्या गटारापर्यंत, आजपासून ते अब्ज वर्षांपूर्वीपर्यंतचे दाखले देतात. लेखक विषयानुसार सूक्ष्मातिसूक्ष्म दुनिया उलगडून दाखवतो, तसेच गरज पडल्यास विशालकाय पृथ्वीचा पसारा आपल्या समोर मांडतो. या सतत होणाऱ्या झूम-इन, झूम-आऊटमुळे हे पुस्तक वाचकाला खिळवून तर ठेवतेच पण विचार करायलाही भाग पाडते.
नुसतेच प्रश्न न मांडता ‘जल थल मल’ त्या प्रश्नांवर काही उपायही असल्याचे दाखले देते. ‘मैलापाण्याचे सोनेरी सत्य’ हे प्रकरण बंगालच्या मासेमाऱ्यांनी केलेल्या मैलापाण्याच्या सुयोग्य वापराविषयी भरभरून बोलते. हा प्रयोग कसा आणि का यशस्वी झाला, याविषयी स्थानिकांचे योगदान किती महत्वाचे हे ओघवत्या शैलीत आल्यामुळे हे प्रकरण वाचनीय झाले आहे. तसेच भारतातील मूसिरी नगरपरिषदेत यशस्वी झालेल्या इकोसॅन शौचालयाच्या प्रयोगाविषयी लिहिले आहे. एकीकडे यशस्वितेचे दाखले देत असताना मंगोलियात अयशस्वी ठरलेल्या याच इकोसॅन शौचालयाच्या प्रयोगाविषयी लिहायला लेखक मागे-पुढे पाहत नाही. त्यामागील स्पष्टीकरणही लेखक देतात. यामुळे एकूणच पुस्तकाची विश्वासार्हता वाढते.
बहुतेकदा पुस्तकाच्या शेवटी संदर्भ लिहिताना लेखकांची लेखणी तोकडी पडते किंवा त्यांना कदाचित ते अनावश्यक वाटत असावे असे मला वाटते. त्यामुळे वाचकही वरवर नजर फिरवून पुस्तक संपवतात. पण या पुस्तकात संदर्भ लिहिताना विशेष मेहनत घेतल्याचे जाणवले आणि संदर्भ प्रकरणसुद्धा मूळ पुस्तकाइतकेच वाचनीय झाले आहे. म्हणूनच तुमचे मुख्य पुस्तक जरी वाचून झाले तरी संदर्भ वाचावयास विसरू नका.
‘जल थल मल’ या मूळ हिंदी पुस्तकातील काही प्रकरणे वाचल्यामुळे मराठीत हे पुस्तक कसे अनुवादित होईल याविषयी वाचक म्हणून मला फार उत्सुकता होती. परंतु प्राजक्ता अतुल यांनी हे काम लीलया पार पाडले आहे. विषयातील क्लिष्टता भाषेत न उतरल्यामुळे विषय सोपा झाला आहे. पुस्तकातील मराठीवर दिवाकर मोहनी यांच्या शुद्धलेखन तत्त्वज्ञानाचा प्रभाव असल्यामुळे वाचताना सतत काही छपाई चूक झाली आहे का असे वाटते. नंतर मात्र त्याची सवय होते.
पुस्तकाच्या लेखनातून विषयाचा जसा सखोल अभ्यास जाणवतो तसा तो सोमेश कुमार यांच्या चित्रांमधून दिसतोही. पुस्तकात असलेले प्रत्येक चित्र लेखनाला पूरक असेच आहे. वाचताना ही चित्रे वातावरण निर्मितीचे काम चोख बजावतात. तसेच स्वतंत्र कलाकृती म्हणूनही आपली छाप सोडून जातात. त्याचप्रमाणे पुस्तकासाठी निवडलेला रंगही विषयसूचक आहे.
पुस्तकावर कोणत्याही प्रकारचा अधिकार मूळ लेखकाने दाखवलेला नाही. मराठी अनुवादित पुस्तकाने तीच परंपरा कायम ठेवली आहे. बौद्धिक संपत्तीचा विकास तिला आपल्या दावणीला बांधण्यापेक्षा मुक्त करण्यात आहे याची समज आजच्या काळात या लेखकांनी आणि प्रकाशकांनी दाखवल्यामुळे त्यांचे विशेष कौतुक.
अमेरिकन दूरचित्रवाणीवरील सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व फ्रेड रॉजर रिसायकलिंगवर (कचरा पुनर्वापर) भाष्य करताना म्हणतात, ‘अनेकदा जेव्हा आपल्याला वाटते की आपण एखाद्या गोष्टीच्या शेवटाला किंवा अंतिम टप्प्याला येऊन पोहचलो आहोत तेव्हा खरे तर आपण एका वेगळ्या गोष्टीच्या आरंभाशी उभे असतो.’ हे विधान आणखी पुढे नेल्यास लक्षात येते की मानवी मल-मूत्र कचरा नसून साधन आहे. आणि त्याचा पुनर्वापर झालाच पाहिजे. त्यासाठी योग्य दिशेने प्रयत्न होणे गरजेचे आहे. म्हणूनच प्रत्येक निसर्ग आणि पर्यावरण प्रेमीच्या संग्रही असावेच असे हे पुस्तक- ‘जल-थल-मल’!
............................................................................................................................................................
लेखक दिपेश जाधव इंजिनीअर आहेत व ‘प्रथम’ या शिक्षणविषयक संस्थेत कार्यरत आहेत.
dipesh89jadhav@gmail.com
............................................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
............................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
............................................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment