वसंत सरवटे : समंजस दृष्टीचा व्यंगचित्रकार
संकीर्ण - पुनर्वाचन
मधुकर धर्मापुरीकर
  • वसंत सरवटे - ३ फेब्रुवारी १९२७ - २४ डिसेंबर २०१६
  • Sun , 25 December 2016
  • पुनर्वाचन Rereading वसंत सरवटे Vasant Sarwate कथाचित्रे Illustrations बटाट्याची चाळ Batatyachi Chaal पु.ल.देशपांडे P.L. Deshpande जयवंत दळवी Jayant Dalvi ठणठणपाळ Thanthanpal

निव्वळ चित्रकलेत प्रावीण्य असलेला माणूस जेव्हा व्यंगचित्रकार होतो, तेव्हा त्याची व्यंगचित्रे नुसतीच देखणी होतात. त्या उलट, असं प्रावीण्य नसलेला, मात्र जीवनव्यवहारातलं नाट्य, विसंगती याची जाणीव असलेला माणूस जेव्हा व्यंगचित्रकार होतो, तेव्हा त्याच्या चित्रापेक्षा चित्रातला मुद्दाच आपल्याला जाणवतो. दोनही व्यंगचित्रकार हे अशा अर्थाने अपूर्णच राहतात. मराठी व्यंगचित्रकलेत आज असे दोन भाग पडलेले जाणवतात. (आजकाल तर चित्रकला हे व्यंगचित्रकलेचं आवश्यक अंग आहे, याचा जणू विसर पडतो आहे.)

वसंत सरवटे हे मात्र मराठीतले एकमेव आणि पूर्ण व्यंगचित्रकार आहेत. उत्तम चित्रकार आणि व्यंगविषयाची समज असल्याने त्यांचं व्यंगचित्र म्हणजे रेषा आनि आशय यांचा सुरेख मिलाफ असतो. त्यांच्या चित्रातली पात्रं ही 'एकसारखी' नसून चित्रातल्या विषयाशी, वातावरणाशी सुसंगत असं व्यक्तिमत्त्व लाभलेली पात्रं असतात, हा एवढा मुद्दाही सरवटे यांचं या क्षेत्रातलं मोठेपण सिद्ध करायला करायला पुरेसा आहे. सरवटे यांच्यापूर्वी मराठीत हास्यचित्रे, टीकाचित्रे काढली, ती चित्रकार म्हणूनच प्रसिद्ध असलेल्या मंडळींनी. आणि त्यावेळी मराठी व्यंगचित्रकला मुळातच प्राथमिक अवस्थेत असल्याने तेवढ्या गांभीर्याने या विषयाकडे पाहिलं गेलं नाही.

१९५०च्या सुमारास मराठी नियतकालिकांचा सुवर्णयोग आला; आणि त्या अनुषंगाने व्यंगचित्रकला बहरली. व्यंगचित्राचं जे साहित्यिक रूप आहे, ते या काळात खऱ्या अर्थाने विकसित झालं. वसंत सरवटे, शि. द. फडनीस, नागेश आर्डे, प्रभाकर ठोकळ यांची चित्रे गाजली. मराठी व्यंगचित्रकलेला आकार आला, तो 'वसुधा', 'मौज', 'वीणा', 'सत्यकथा', 'आवाज', 'हंस', 'मोहिनी' या मासिकांच्या सुवर्णकाळात. आणि साहित्यिक प्रकृती लाभलेले वसंत सरवटे; त्यांनी या काळात असंख्य चित्रे काढली. माणसाचं रूप, त्याचं वागणं हे, व्यंगाच्या मजेदार भिंगातून त्यांनी शोधलं.

तीस-पस्तीस वर्षं झाली असतील - 'माणूस' साप्ताहिकात सरवटे यांचं एक व्यंगचित्र मागच्या पृष्ठावर असायचं. एक चित्र होतं - कोर्टाच्या पिंजऱ्यात आरोपी उभा आहे अन त्याला न्यायाधीश म्हणतो आहे - 'तुमच्यावर जाळपोळीत प्रत्यक्ष भाग घेतल्याचा आरोप आहे. लहान का तुम्ही, आता अशी कामं करायला?'

वसंत सरवटे कोण, त्यांची कामगिरी काय हे माहीत असण्याचं ते वय नव्हतं. (मात्र चित्रात, कोपऱ्यातली त्यांची स्वाक्षरी; त्याची सवय झाली होती.) या व्यंगचित्राची मला गंमत वाटली होती. 'लहान का तू, आता असं करायला?' या प्रश्नाची उजळणी व्हायचे ते माझे दिवस. 'मोठेपणा'ची बिनमहत्त्वाची जाणीव त्यावेळी होऊ लागलेली. मोठ्या माणसांच्या वागण्याबोलण्याकडे लक्ष जाऊ लागलेलं, अन पिंजऱ्यातला हा मोठा माणूस त्याला, पण हाच प्रश्न ऐकावा लागतो आहे. सुरुवातीला मला या विनोदावर शंकाच वाटली होती, त्यावेळी. त्यामुळे या चित्राकडे लक्ष वेधलं; आणि मग न्यायाधीशातल्या त्या 'लहानपणा'चं भलतंच कौतुक वाटू लागलं; हसू येऊ लागलं.

केवळ आठवणीत राहिलेली अशी चित्रं आता संग्रहात नाहीत. आज असं वाटतं की, सरवटे यांच्या अशा सुट्या सुट्या व्यंगचित्रांचा संग्रह प्रसिद्ध झाला, तर त्यांच्या विनोदप्रवृत्तीचं वैशिष्ट्य म्हणून तो सिद्ध झाला असता. ('खडा मारायचा झाला तर...' किंवा त्यापुढल्या संग्रहात एकाच विषयाच्या अनुषंगाने काढलेल्या चित्रांचं प्रमाण अधिक आहे. त्यामुळे नकळत का होईना, स्वतंत्र चित्राचा आस्वाद घेण्यात जी मजा असते, ती राहून जाते.)

सरवटे यांचं त्याहीपेक्षा जुनं व्यंगचित्र आहे. डोळ्याच्या डॉक्टरकडे आलेला पेशंट, त्याच्या समोरचा बोर्ड वाचायचा प्रयत्न करतो आहे. मोठ्या अक्षरांपासून लहान लहान होत गेलेल्या त्या ओळी. प्रत्येक ओळ ही, डॉक्टरची फीस सांगणारी, आणि ओळीगणिक अक्षरं बारीक झालेली, फीसची रक्क्मपण कमी कमी झालेली. आणि हा दृष्टी अधू असलेला मध्यमवर्गीय पेशंट शेवटची ओळ वाचतो आहे. .... काही नाही!

या चित्रात केवळ गमतीमुळे साधलेला विनोद नाही. पेशंट ज्या तऱ्हेने वाचण्याचा प्रयत्न करतो आहे, ते पाहताना, तो पैसे वाचविण्याची धडपड करतो आहे, हे दिसतं. शिवाय एवढी बारीक ओळ वाचता आली, तर त्याची दृष्टी क्षीण कशी म्हणता येईल. पण ज्या तऱ्हेने तो वाचतो आहे, ते पाहून फीसचे पैसे वाचविण्याची प्रबळ इच्छा, शारीरिक कमजोरीवर मात करते आहे हे दिसतं. पण डॉक्टरचा (विकेट गेल्यासारखा!) चेहरा पाहून असं वाटतं, की त्याच्या या अभिनव कल्पनेला शह देणारे पेशंट आज आलेले आहेत! 'वसंत' मासिकाने १९४९मध्ये दिवाळी अंकासाठी व्यंगचित्र स्पर्धा घेतली होती. त्यात पुरस्कार मिळालेले हे व्यंगचित्र.

या चित्रात, डॉक्टर आणि पेशंट या दोघांची सरवटे यांनी टर उडविली नाही, हे महत्त्वाचं आहे. व्यंगचित्र हा हसण्यासाठी आणि हसविण्यासाठीचा सोपा मार्ग आहे असा समज सर्वसाधारण आहे, आणि त्यामुळे व्यंगचित्रांतला विनोद हा, थट्टा ओलांडून टिंगलटवाळीकडे गेलेला सहसा दिसतो. व्यंगचित्रांबद्दल नाराजी तयार होते, ती यामुळेच. व्यंगचित्रकार हा चित्रातल्या पात्राची टिंगल करतो आहे, हे लक्षात आलं, की संवेदनशील वाचकाला ते पटत नाही.

वसंत सरवटे यांनी आपल्या चित्रातल्या कोणत्याही पात्राची अशी टिंगल केली नाही. प्रत्येक चित्रातून चित्रातल्या पात्राबद्दलची त्यांची आस्था आपल्याला जाणवते. आणि मानवी जीवनव्यवहारांबद्दल जिव्हाळा असणारा असा कलावंत, त्या व्यवहाराची जेव्हा थट्टा करतो, तेव्हा ती थट्टा, त्या विनोदाला आपण दाद देतो. ते चित्र आपल्याला कायम असं जाणवत राहतं. विनोदी कथांत आपल्याला असा अनुभव येतो. या कथांत मुख्य पात्राच्या बावळटपणाशी संबंधित किस्से रचले जातात. मात्र 'बटाट्याची चाळ'मधली सगळी पात्रं, विक्षिप्त असून ही हास्यास्पद झाली नाहीत. सरवटे यांच्या चित्रांतली पात्रं अशीच आपापलं वैशिष्ट्य दाखविणारी. मग तो दूधातला भय्या असो, किंवा लाँड्रीतला माणूस, शिक्षक, सिनेमा दिग्दर्शक असो किंवा तबलावर्गाचा गुरुजी किंवा तबला वाजविणारा! 'सावधान! पुढे वळण आहे!'मधली 'चरित्र-नाटक' मालिकेतली पात्रं तर अफलातून आहेत. याच संग्रहातली इमारतींची आणि मोर्चांची चित्रं, पाहता पाहता विचार करायला लावणारी आहेत.

जीवनव्यवहारातली हास्यास्पदता सरवटे यांनी जेवढ्या तीव्रतेने रेखाटली आहे, तेवढी तीव्रता इतरांच्या चित्रांत अभावानेच दिसते. भूकंपाची बातमी वाचणाऱ्या माणसाचे चित्र, हे त्याचे उदाहरण. (चित्र क्र. १) भूकंपामुळे शेकडो लोकांचे प्राण गेले, ती घटना वृत्तपत्रात वाचणारा मध्यमवर्गीय गृहस्थ, त्याला चहा पोळतो. (चहा पोळताच त्याचा पाय अर्धवट उचलला गेला, जीभ बाहेर आली!) आणि 'किती गरम चहा ओतलायस?' म्हणून तो बायकोवर खेकसतो. या चित्रातलं व्यंग आपल्याला आधी लक्षात येत नाही. याचं कारण ते चित्र आपल्याला भलतंच जवळचं वाटलेलं असतं! (खरं तर ते आपलंच असतं).... मग आपण स्वतःवर हसायला शिकलो, की या चित्रातली गंमत ध्यानात येते. सरवटे यांच्या चित्रांचा आस्वाद घेताना आपण असे शहाणे होत असतो.

सरवटे यांची दृश्य-संवेदना किती तीव्र आहे, याचे आणखी एक उदाहरण म्हणजे, खिडक्या, खुर्च्या, अक्ष आणि अशाच निर्जीव वस्तूंच्या, त्यांनी शब्दबद्ध केलेल्या भावना! वेगवेगळ्या प्रकृतीच्या खुर्च्या आपल्याशी बोलतात किंवा कोल्हापुरी चपलांचं मनोगत, ही केवळ मनोगतं नसून, त्या खुर्चीवर बसलेला माणूस, त्या चपलांचा मालक हे डोळ्यासमोर उभे राहतात. या दृश्य माध्यमावर सरवटे यांची किती पकड आहे, हे पाहून आपण अचंबित होतोच, आणि त्या अनुषंगाने नव्या संवेदना आपल्यात जागृत होतात. (चित्र क्र. २)

शब्दांतून जे सांगता येत नाही, त्यासाठी व्यंगरेषा किती समर्थ आहे, हे त्यांच्या शिकाऱ्याच्या चित्रातून सिद्ध होते. 'खडा मारायचा झाला तर....' या संग्रहातल्या चित्रासोबतचं वाक्य पाहा (चित्र क्र. ३) हे जे सांगितलं आहे, ते कुणी सांगितलं आहे - शिकाऱ्याने? त्याने सांगितलं आहे, पण आता असं धावताना सांगितलं नाही. शिकारीतले अनुभव सांगताना, रुबाबाने सांगितलेले हे त्याचं विधान, दिवाणखान्यात बसून मित्रांशी बोलतानाचं आहे. आणि त्यावेळी त्याला ही घटना आठवते आहे - वाघाच्या भीतीने गर्भगळित होऊन पळून जाण्याचा तो प्रसंग! (वाकून पळतानाचा त्याचा वेगसुद्धा जाणवतो आहे.) फजितीच्या प्रसंगाला तो साहस म्हणतो आहे, आणि त्याचं साहस म्हणजे फजिती. हे आपल्याला दिसतं आहे!

वसंत सरवटे यांची, मराठी साहित्याला अजरामर अशी देणगी, म्हणजे त्यांची अर्कचित्रे. साहित्यिक वातावरणात राहिलेले आणि साहित्याचा व्यासंग असलेले सरवटे, त्यांनी साहित्यिकांची अप्रतिम अशी कॅरिकेचर्स काढली. मराठी साहित्याच्या रसिक वाचकाने ही अर्कचित्रे डोक्यावर घेतली, ती यामुळेच - त्यात साहित्यिकांचं केवळ दिसणं समाविष्ट नव्हतं, तर असणंही होतं. या चित्रांसोबत, ‘कॅरिकेचर’ या शब्दाला रूढ झालेला 'अर्कचित्र' हा प्रतिशब्द हीसुद्धा सरवटे यांचीच देणगी. (चित्र क्र. ४)

युद्ध, मानवी संहार, हत्या अशा विषयांवर व्यंगचित्रकार जेव्हा विचार करतो, त्यावेळी त्याची कसोटी असते. व्यंगाचे जे हत्यार त्याचेकडे असते, ते यावेळी त्याला काळजीपूर्वक हाताळावे लागते, आणि इथेच त्याची चिंतनशीलता कशी आहे, हे लक्षात येतं. इंदिरा गांधींची हत्या झाल्यानंतर, किंवा भुत्तोंना फाशी दिल्यानंतर प्रसिद्ध झालेली लक्ष्मण यांची व्यंगचित्रं गाजली होती.

परवाच्या अफगाणिस्तानच्या युद्धाच्या अनुषंगाने प्रसिद्ध झालेली, जयचंद्रन आणि सरवटे यांच्या व्यंगचित्रांची इथे तुलना करता येईल. अमेरिकेचा हवाई हल्ला हा दोनही चित्रांचा मुख्य मुद्दा. अमेरिकेने जे हवाई हल्ले केले, त्यावेळी त्यांनी आपद्ग्रस्त जनतेसाठी अन्न व औषधेपण टाकली. आनि तालिबानचा बंदोबस्त झाल्यावर नॉर्दन अलायन्सला वाटू लागलं की, नवीन राज्यकर्तेही आता अमेरिकाच लादणार (टाकणार!) की काय! ही घटना एका दृष्टीने तात्कालिक घटना. जयचंद्रन यांनी त्या अनुषंगानेच या घटनेची मजेदार राजकीय थट्टा केली आहे. तथापि, जयचंद्रन यांच्या चित्रात (कल्पनेत आणि चित्रणात) जो खट्याळपणा आहे, तो सरवटे यांच्या चित्रात नाही. सरवटे यांनी केलेली थट्टा पाहता, त्यातलं गांभीर्य मनात रेंगाळते. अमेरिकेने हल्ल्याच्या संदर्भात केलेल्या विधानातली दारुण विसंगती (हिंसाचाराला हिंसेनेच उत्तर देताना, त्या हिंसेचं समर्थन करण्याच्या मूलभूत प्रवृत्तीची ही थट्टा आहे.) आणि चित्रात पार्श्वभूमीवर दाखविलेल्या अंधारातून होणारे हल्ले! आतंकवादी कोण आणि जनता कोण, कसं ठरविलं गेलं? म्हणजे थट्टेच्या पुढे जाणाऱ्या गांभीर्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न जेव्हा चित्रातून जाणवतो तेव्हा चित्रकाराने अशा प्रसंगावर आधी गंभीर विचार करूनच त्याची थट्टा केली आहे, हे लक्षात येतं. (चित्र क्र. ६अ व ६ब)

सरवटे यांनी काढलेली 'ललित' दिवाळी अंकांची किंवा अनेक पुस्तकांची मुखपृष्ठं नुसतीच सुंदर नसून अर्थपूर्णही असतात. त्याचप्रमाणे त्यांची व्यंगचित्रं नुसतीच विनोदी नसून आशयपूर्णही असतात. दिवाळी अंकात प्रसिद्ध होणारी सरवटे यांची व्यंगचित्रं म्हणजे, मराठी मन त्या त्या वर्षी कोणत्या विषयानं झपाटलं होतं त्याबद्दल आणि त्या विषय-व्यवहारातली हास्यास्पदता यावरचं जणू प्रकट चिंतनच. टीव्ही, टोळीयुद्ध, आतंकवाद, स्वातंत्र्याची सुवर्णजयंती, रिमोटचे युग, अफगाण युद्ध.... (पण कधी असंही वाटून जातं, की आजकाल या चित्रांतलं गांभीर्य, सूचकता याचं प्रमाणच एवढं असतं, की व्यंगचित्रातली, पाहताक्षणीची पहिली प्रतिक्रिया, जी हास्याची पाहिजे असते, त्या संदर्भात ही चित्रं जाणवत नाहीत.) सरवटे यांच्या व्यंगचित्रांचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, त्यातले विनोद हे अंतर्मुखतेकडे वळणारे असतात. त्या विनोदाच्या आस्वादाने समाधानाची भावना तयार होते. सहसा असं होतं, की व्यंगचित्रं क्षणिक विनोदी असतात, पण विनोदाच्या तत्कालीन परिणामानंतर वेगळं असं काही जाणवत नाही; आणि चित्रं विसरली जातात.

व्यंगचित्रकला या माध्यमाची क्षमता आणि मर्यादा यावर सतत विचार करणे सरवटे आपल्या लेखनातून, मुलाखतीतून बोलतात, तेव्हा हे जाणवतं. व्यंगचित्र हा साहित्याचा प्रकार असून, व्यंगचित्रकार हा रेषांच्या अनुषंगाने जीवनानुभूती व्यक्त करतो, असं ते म्हणतात. शिवाय, राजकीय व्यंगचित्रात सर्वसाधारणपणे, माणूस, त्याचं माणूसपण गृहीत न धरता टिप्पणी केली जाते, त्यामुळे राजकीय व्यंगचित्राला मर्यादा पडतात असं मत त्यांनी एका मुलाखतीत स्पष्ट केलं.

'परकी चलन' या संग्रहात परकीय व्यंगचित्रांच्या अनुषंगाने सरवटे यांनी लिहिलं आहे, ते वाचून व्यंगचित्रांबद्दलची आपली अभिरुची अधिक संपन्न होते.

पार्ल्याच्या व्यंगचित्रकारांच्या संमेलनात (ऑक्टोबर १९८३) अध्यक्षीय भाषणात सरवटे यांनी स्पष्ट केलं, की खेळकर दृष्टीसाठी व्यंगचित्रांचा आस्वाद आवश्यक आहे. अर्थात, खेळकर दृष्टी तयार करणारी व्यंगचित्रे काढणारा कलावंत हा, मुळात समंजस असावा लागतो. (व्यंगचित्रकार सहसा आक्रमक असतो.)

वसंत सरवटे अशी समंजस दृष्टी लाभलेले व्यंगचित्रकार आहेत.

(‘हसर्‍या रेषेतून हसविण्याच्या पलीकडले’ या मधुकर धर्मापुरीकर यांनी लिहिलेल्या आणि मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, मुंबई यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकातील लेख संपादित स्वरूपात.)

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......