‘कौमुदी’मधील चारही नटांचा अभिनय अपार आनंद देणारा आहे!
कला-संस्कृती - नौटंकी
प्रा. अविनाश कोल्हे
  • ‘कौमुदी’मधील एक दृश्य
  • Sat , 22 June 2019
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti नौटंकी Nautanki अविनाश कोल्हे Avinash Kolhe कौमुदी KAUMUDI अभिषेक मजुमदार Abhishek Majumdar

महाभारत-रामायण यांसारख्या महाकाव्यांचा कालानुरूप अन्वयार्थ लावणं हे जातिवंत कलाकाराचं/ अभ्यासकाचं एक महत्त्वाचं लक्षण असतं. समाज जसजसा पुढे जातो, तसतसे नवे दृष्टिकोन समोर येतात. त्यानुसार रामायणातील सीता किंवा महाभारतातील द्रौपदी वगैरे पात्रांची चर्चा केली जाते. या नव्या दृष्टिकोनांतून नाटकंसुद्धा लिहिली जातात. या संदर्भात चटकन आठवणारी नावं म्हणजे रत्नाकर मतकरींचं ‘आरण्यक’ आणि डॉ. धर्मवीर भारतींचं हिंदी नाटक ‘अंधायुग’. या परंपरेतील ताजं नाटक म्हणजे बंगलोरस्थित अभिषेक मजुमदार या बंगाली नाटककाराचं दोन अंकी हिंदी नाटक- ‘कौमुदी’.

३९ वर्षीय अभिषेक मजुमदार (जन्म १९८०) यांच्या नावावर आजपर्यंत १४ नाटकं आहेत आणि त्यांनी जवळजवळ १६ नाटकांचं दिग्दर्शनही केलेलं आहे. एक ज्येष्ठ रंगकर्मी म्हणून त्यांचं नाव आदरानं घेतलं जातं. मजुमदारांची बहुतेक नाटकं राजकीय भूमिका घेऊन लिहिलेली असतात. ‘मुक्तिधाम’, ‘ईदगाह के जिन्नात’ वगैरे त्यांची नाटकं गाजली आहेत. ‘कौमुदी’सुद्धा एक प्रकारे राजकीय नाटकच आहे.

‘कौमुदी’मध्ये महाभारतातील एकलव्य व अभिमन्यू ही दोन पात्रं आहेत. नाटकात एकलव्याचं भूत येतं, तर अभिमन्यू जिवंत स्वरूपात येतो. या पात्रांच्या जोडीला भगवान श्रीकृष्ण व अर्जुन ही दोन पात्रं आहेत. मजुमदारांनी एकलव्य जातीनं चांभार असल्याचं दाखवलं आहे. बहुतेक भारतीय व्यक्तीला एकलव्य आदिवासी होता हे माहीत असतं. पण जसं एकच रामायण नाही, त्याचप्रमाणे एकच महाभारतही नाही. काही ठिकाणी प्रचलित असलेल्या महाभारतात एकलव्य चांभार असल्याचं म्हटलं आहे.

.............................................................................................................................................

अधिक माहितीसाठी क्लिक करा -

https://tinyurl.com/y2756e25

.............................................................................................................................................

नाटकात दोन कथानकं आहेत. ती एकमेकांत गुंतलेली आहेत. एक कथा आहे सत्यशील या अलाहाबादला राहत असलेल्या ज्येष्ठ नटाची. काळ आहे १९७०चं दशक. सत्यशील महाभारतातील एकलव्य व अभिमन्यू वगैरे पात्रं सादर करण्यात वाकबगार आहे. आता तो म्हातारा व्हायला लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याची दृष्टी अधू होत आहे. आता त्याच्या नाटकाचे शेवटचे तीन प्रयोग होणार आहेत. त्यात अभिमन्यूची भूमिका करण्यासाठी बनारसहून परितोष नावाचा तरुण नट येतो. परितोषसुद्धा कसलेला नट असतो. जसं सत्यशीलचं अलाहाबादच्या रंगकर्मींमध्ये नाव असतं, तसंच परितोषचं बनारसला असतं.

दोघं एकमेकांसमोर उभे राहतात, तेव्हा प्रेक्षकांना त्यांच्यात असलेला ताण जाणवतो. हळूहळू कळतं की, ते पिता-पुत्र आहेत. अनेक वर्षांपूर्वी परितोष वडिलांना सोडून बनारसला जातो. पिता-पुत्रांतील या ताणाला कारणीभूत असतो- परितोषच्या आईचा म्हणजेच सत्यशीलच्या पत्नीचा समुद्रात बुडून झालेला मृत्यू. तेव्हा सत्यशीलला पत्नी किंवा मुलगा यापैकी कुणा एकालाच वाचवणं शक्य असतं. ते मुलाला वाचवतात. आईला वाचवलं नाही म्हणून तेव्हापासून पिता-पुत्रात ताण निर्माण झालेला असतो. याचा परिणाम म्हणून परितोष पित्यापासून दूर बनारसला जातो. आता अनेक वर्षानंतर ते पुन्हा एकमेकांसमोर उभे राहतात. हे एक कथानक.

यातच नाटककार मजुमदार यांनी महाभारतातील एकलव्याची आणि अभिमन्यूची कथा गुंफली आहे. एकलव्याची कथा वाचकांना परिचित आहे. आपला लाडका शिष्य अर्जुनाला सर्वश्रेष्ठ धनुर्धारी करण्यासाठी द्रोणाचार्य एकलव्याचा अंगठा मागतात व एकलव्य देतो. नाटककाराच्या मते अर्जुनाच्या सर्वश्रेष्ठ धनुर्धारी होण्याचा मार्गातील दुसरा महत्त्वाचा अडथळा म्हणजे खुद्द अर्जुनाचा पुत्र अभिमन्यू. ती कथासुद्धा वाचकांना परिचित असते. कौरवांचं आव्हान स्वीकारून अभिमन्यू द्रोणाचार्यांनी रचलेल्या चक्रव्यूहात शिरतो. अभिमन्यूला चक्रव्यूहात जाण्याचा मार्ग माहिती असतो, पण बाहेर पडण्याचा मार्ग माहिती नसतो. अशा स्थितीत चक्रव्यूहात अडकलेल्या कोवळ्या वयाच्या, असहाय्य अभिमन्यूला कौरव क्रूरपणे मारून टाकतात. नाटककार असे दाखवून देतो की, श्रीकृष्ण/ अर्जुन अभिमन्यूला वाचवू शकले असते. अर्जुनाच्या रथाचं सारथ्य भगवान श्रीकृष्णच करत होते. जर अभिमन्यू वाचला असता तर अर्जुनाचा ‘सर्वश्रेष्ठ धनुर्धारी’ हा लौकिक टिकला नसता. तो टिकावा म्हणून अभिमन्यूचा बळी देण्यात आला.

नेमका असाच आरोप आधुनिक काळातला परितोष सत्यशीलवर करतो की, तुम्ही स्वतःच्या रंगभूमीवरील करिअरच्या नादात माझ्याकडे साफ दुर्लक्ष केलं. तुम्हाला फक्त स्वतःच्या रंगभूमीवरील स्थानाची काळजी होती, मुलाची/ पत्नीची नाही. सर्वश्रेष्ठ धनुर्धारी म्हणून अमर होण्यासाठी स्वतःच्या मुलाचा बळी देणारा महाभारतातील अर्जुन आणि रंगमंचावर अमर होण्यासाठी स्वतःच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करणारा आजचा सत्यशील, एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. हा या नाटकाचा एक आयाम आहे.

पारंपरिक जातीव्यवस्था व उच्चवर्णीयांची हरामखोरी हा या नाटकाचा दुसरा आयाम आहे. लहानपणापासून आपण वाचलेल्या महाभारतात हे स्पष्टपणे नमूद केलेलं असतं की, आपल्या लाडक्या शिष्याच्या, अर्जुनाच्या पुढे कोणी धनुर्विद्येत जाऊ नये म्हणून द्रोणाचार्य एकलव्याचा अंगठा कापून मागतात. या शोषणाच्या व्यवहारात क्षत्रिय (अर्जुन) व ब्राह्मण (द्रोणाचार्य) यांच्यातील अभद्र युती दिसून येते.

तिसरा आणि जास्त महत्त्वाचा आयाम म्हणजे नाटककार मजुमदार यांनी रंगभूमी, नाटक या कलाप्रकारांबद्दल काही सैद्धांतिक प्रश्न उपस्थित केलेले आहेत. या नाटकात हे करणं नाटककाराला सहज शक्य होतं, कारण नाटकातील दोन प्रमुख पात्रं नट आहेत. अभिमन्यूच्या भूमिकेतील परितोष, कृष्ण व अर्जुन नाटकाच्या तालमी करत असतात, तेव्हा अनुभवी सत्यशील परितोषला म्हणतो की, नाटक ही कला विचित्र आहे. यात जे खोटं असतं तेच खरं असतं आणि जे खरं असतं तेच खोटं असतं. तेव्हा मराठी प्रेक्षकांना शिरवाडकरांच्या ‘नटसम्राट’मधील अप्पासाहेब बेलवलकरांचं स्वगत आठवतं. मुलगी, मुलगा, सून वगैरे सर्वांनी फसवल्यावर आणि पत्नीच्या मृत्यूनं पांगळा झाल्यावर बेलवलकर म्हणतात - ‘खबरदार. ही रंगमंचाची दुनिया आहे. इथं सर्व खोटं असतं म्हणूनच सर्व खरं असतं’. मजुमदारांचा एकलव्याच्या भूमिकेतील सत्यशीलसुद्धा हेच प्रश्न उपस्थित करतो आणि तरुण नट परितोषलासुद्धा सांगतो की, हे सर्व समजायला तुला अजून खूप वर्षं जावी लागतील.

कौमुदीचा प्रयोग खिळवून ठेवतो. कलाकारांच्या अभिनयाचा दर्जा फार वरचा आहे. यात एकुण चार पुरुष पात्र आहेत आणि प्रत्येकानं दोन भूमिका केल्या आहेत. कुमुद मिश्रा (एकलव्य/ सत्यशील) या अनुभवी नटानं या दोन्ही भूमिकेत प्राण ओतला आहे. त्यांचा रंगभूमीवरचा वावर इतका सहज होता की, प्रेक्षक खिळल्यासारखे झाले होते. मला सतत जुन्या हिंदी चित्रपटात बलराज सहानी ज्या सहजतेनं कॅमेऱ्यासमोर वावरत असत, त्याची आठवण होत होती. तीच सहजता, तोच आत्मविश्वास. मिश्रांनी आवाजात योग्य ठिकाणी केलेले चढउतार प्रसंगांचा प्रभाव वाढवत होते. आधी दृष्टी असलेला, रंगभूमी गाजवलेला पण आता कमी कमी होत असलेल्या दृष्टीने थोडासा चिडचिडा, थोडा लाचार झालेला सत्यशील असो की, श्रीकृष्ण व अर्जुनाची खिल्ली उडवणारं एकलव्याचं भूत असो; कुमुद मित्रा आपल्या लाजबाब अभिनयानं जिवंत करतात.

गोपाळ दत्त (थिएटरचा मॅनेजर/ श्रीकृष्ण) यांनी सत्यशील काम करत असलेल्या थिएटरच्या मॅनेजर व श्रीकृष्ण या दोन भूमिका केल्या आहेत. या गुणी नटाला फार दिवसांनी उत्तम भूमिका मिळाली आहे. गोपाळ दत्तांनी दोन्ही भूमिकांचं सोनं केलं आहे. नाटककारानं श्रीकृष्ण व अर्जुनाच्या काही प्रसंगात लोकनाट्याचं तंत्र वापरलं आहे. परिणामी कधी श्रीकृष्ण अर्जुनाची तर कधी अर्जुन श्रीकृष्णाची फिरकी घेतो. एका प्रसंग अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतो- ‘अब रहनेभी दो. वरना आप फिर चौदा हजार श्लोकोवाली गीता सुना दोगे’. संदीप शिखर (परितोष/ अभिमन्यू) आणि शुभ्रज्योती बारात (थिएटरमधील नोकर/ अर्जुन) या दोघांनी आपापल्या भूमिका समरसून केल्या आहेत. चौघांचे आवाज खणखणीत आहेत. रंगमंच व्यवस्थेची जबाबदारी शशांक एमसी यांच्याकडे होती तर वेशभूषा सोनल गुप्तांची. त्यांनी १९७० च्या दशकातल्या अलाहाबादची आठवण होर्इल, अशी वेशभूषा तयार केली आहे.

नाटककार अभिषेक मजुमदार यांनीच या नाटकाचं दिग्दर्शन केलं आहे. पृथ्वी थिएटरसारख्या इंटिमेट थिएटरमध्ये उपलब्ध असलेला मर्यादित अवकाश त्यांनी योग्य प्रकारे वापरला आहे. त्यांना नटांची फार चांगली साथ लाभली आहे. ते स्वतःच नाटककार असल्यामुळे दिग्दर्शक व नाटककार यांच्या दृष्टीत प्रसंगी जो फरक पडू शकतो, तो इथं दिसत नाही.

एकजिनसी परिणाम साधणारं नाटक म्हणून ‘कौमुदी’चा उल्लेख करावा लागेल. मात्र संहितेबाबत थोडं असमाधान नोंदवणं क्रमप्राप्त आहे. मजुमदारांनी एकलव्यला चांभार जातीचा दाखवला आहे, याबद्दल आक्षेप नाही. पण लोकमानसात रूढ झालेल्या प्रतिमांना जर धक्का लावायचा असेल तर मग त्यातून काही मोठं साधलं पाहिजे. एकलव्य आदिवासी दाखवला असता तरीही फारसा फरक पडला नसता. हिंदू समाजव्यवस्थेनं जसं दलितांना शेकडो वर्षं अंधारात ठेवलं, तसंच आदिवासी समाजालासुद्धा वंचित ठेवलं. आदिवासी एकलव्य शोषित समाजाचा प्रतिनिधी होता. तोसुद्धा ब्राह्मणी कावेबापणाचा शिकार होता. त्याला नागर समाजातला दाखवून, चांभार जातीतला दाखवून नाटककारानं नेमकं काय साधलं, जे एकलव्याला आदिवासी दाखवून साधता आलं नसतं?

अर्थात हे नजरेआड करत ‘कौमुदी’चा प्रयोग बघावा. यातील चारही नटांचा अभिनय अपार आनंद देणारा आहे.

.............................................................................................................................................

लेखक प्रा. अविनाश कोल्हे समीक्षक व कादंबरीकार आहेत.

nashkohl@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................                            

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......