प्रत्येक भारतीय नागरिकाने हे पुस्तक वाचले पाहिजे
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
प्रशांत पोतदार
  • डॉ. आ. ह. साळुंखे आणि ‘धर्म की धर्मापलीकडे’
  • Fri , 14 June 2019
  • ग्रंथनामा शिफारस डॉ. आ. ह. साळुंखे A.H.Salunkhe धर्म की धर्मापलीकडे Dharm Ki Dharmapalikade

प्राच्यविद्यापंडित डॉ. आ. ह. साळुंखे यांनी नुकतीच वयाची पंचाहत्तरी पूर्ण केली. त्यानिमित्त १ व २ जून रोजी एसेम जोशी सोशलिस्ट फाउंडेशन, पुणे यांच्यावतीने साळुंखे यांचा साहित्य अभिवादन आणि सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. बहुजनांनी मानसिक गुलामगिरीतून मुक्त व्हावे यासाठी आणि अनार्य संस्कृतीच्या महामानवाचे मोठेपण समाजासमोर आणण्यासाठी साळुंखे यांनी दिशादर्शक लिखाण केले आहे. त्यामुळे फाउंडेशनचे सुभाष वारे यांनी साळुंखे यांच्या ७५ पुस्तकांविषयी ७५ कार्यकर्त्यांकडून लेख लिहून घेतले. या ७५ कार्यकर्त्यांच्याच हस्ते २ जून रोजी साळुंखे यांचा सत्कार करण्यात आला. त्या ७५ लेखांपैकी तीन लेख ‘अक्षरनामा’वर प्रकाशित होत आहेत. त्यातील हा एक.

.............................................................................................................................................

मी ज्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीत गेली २५ वर्षे काम करतो आहे, तिच्या चतु:सूत्रीतील तिसरे महत्त्वाचे सूत्र हे धर्माची विधायक, कठोर आणि कृतीशील चिकित्सा करणे. या अंगाने धर्म या संकल्पनेबाबत तटस्थपणे जाणून घेणे आणि त्याबाबत आपली वैचारिक भूमिका बनवणे. यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने आवर्जून वाचावे अशा ‘धर्म की धर्मापलीकडे’ या पुस्तकाची दुसरी आवृत्ती महाराष्ट्र अंनिसच्या पुढाकाराने आणि डॉ. नरेंद दाभोलकर यांच्या प्रेरणेतून प्रकाशित झाली. आणखी एक आठवण म्हणजे या पुस्तकाचा मजकूर लिहून घेण्याच्या कामी मी साळुंखे यांच्या घरी दोन ते तीन महिने रोज चार तास सलग जात असे. हा त्यांचा सहवास मला अत्यंत प्रेरणादायी वाटला, हे आवर्जून सांगावेसे वाटते.

या पुस्तकामध्ये एकूण सहा प्रकरणे आहेत. त्यांची मांडणी वाचकांना अत्यंत साध्या, सरळ व सोप्या भाषेत पुढे घेऊन जाते. पहिल्या प्रकरणात एकूणच धर्माचे स्वरूप, त्याची निर्मिती व उपयुक्तता याबद्दल सविस्तर विवेचन आहे. धर्म कोणाला हवा, कोणाला नको. तुम्हाला धर्म हवा की नको, या प्रश्नाचे एका शब्दात नेमके उत्तर द्या, असा प्रश्न अनेकदा विचारला जातो. धर्म की धर्मापलीकडे हा प्रश्नही काहीसा याच स्वरूपाचा आहे. मानवाच्या कल्याणासाठी धर्माचा स्वीकार करणे योग्य की, धर्म नाकारणे योग्य असा पेच आहे. तो अत्यंत गुंतागुंतीचा आहे. तो सोडवणे अशक्य नसले तरी अवघड आहे. पण मानवाला आणि विशेषतः भारतीय समाजाला आपली कल्याणाच्या दिशेने अत्युच्च झेप घ्यायची असेल तर हा पेच अत्यंत समर्थपणे व कुशलतेने सोडवावाच लागेल, असे साळुंखे नम्रपणे सांगतात.

धर्म हवा असे म्हणणारा मोठा वर्ग आहे. या वर्गातील लोक धर्माचा कमालीचा गौरव करत असतात. धर्माचे रक्षण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. धर्माच्या रक्षणासाठी आपले प्राणही दिले पाहिजेत किंवा दुसऱ्याचे प्राण घेतलेही पाहिजेत, इतकी टोकाची भूमिकादेखील काही घेतात. धर्म हे मानवाच्या दृष्टीने अत्यंत श्रेष्ठ मूल्य आहे. असे त्यांना वाटत असते. जे कोणी धर्म नाकारतील, धर्मावर टीका करतील वा धर्माची चिकित्सा करू पाहतील, त्यांना ते धर्मद्रोही म्हणतात. त्यांचा कमालीचा तिरस्कार करतात. दुसऱ्या बाजूला धर्म हा मानवी संस्कृतीमधील अत्यंत अनिष्ट घटक आहे, म्हणून तो फेकून दिला पाहिजे, असे म्हणणारे लोकही समाजात असतात. तुलनेने संखेने कमी असले तरी समाजावर त्यांचाही बऱ्यापैकी प्रभाव असतो. आपल्या शक्तीप्रमाणे ते धर्माचा निषेध करत असतात. धर्मामुळे मानव जातीचा विकास कुंठीत झाला आहे, धर्मामुळे काही लोकांना इतरांचे शोषण करण्याची संधी उपलब्ध झाली आहे, धर्मामुळे माणूस पिढ्यानपिढ्या अज्ञानाच्या अंधारात पिचत पडला आहे. म्हणून धर्माचा हा अडसर दूर केल्याखेरीज मानव जातीला मोकळेपणी व प्रसन्नपणे फुलता येणार नाही, असे काहींचे म्हणणे असते.

धर्माबद्दलचे दोन्ही मत प्रवाह जेव्हा समोर येतात, तेव्हा संभ्रम निर्माण होतो. अशा स्थितीत धर्माच्या कक्षेत राहून कल्याणाचा शोध घ्यायचा की धर्मापलीकडे जाऊन आपले कल्याण होईल, असे मानायचे? याची निवड ही अत्यंत विवेकपूर्ण केली पाहिजे. सर्वांगीण चिकित्सा करून केली पाहिजे. कारण घाईघाईने भलताच निर्णय घेतला तर तो आपल्या अहिताचा ठरण्याचा धोका संभवतो, असे साळुंखे सांगतात.

धर्म की धर्मापलीकडे याचा अंतिम निर्णय घेण्यापूर्वी काही प्राथमिक बाबी नीट समजून घेणे आवश्यक आहे. धर्माचा गौरव करणारे व त्याचा निषेध करणारे यांच्यात शाब्दिक विरोध आणि मूलगामी विरोध त्यांनी स्पष्ट केला आहे. ‘धर्म’ या शब्दाचा आशय समाजाच्या अहिताचा असेल तर त्या अर्थाचा धर्म नाकारावा आणि त्या शब्दाचा आशय समाजाच्या हिताचा असेल तर त्या अर्थाचा धर्म स्वीकारावा, अशी काहीशी भूमिका घेण्याचा साळुंखे सल्ला देतात.

धर्माच्या असंख्य व्याख्या आहेत. साळुंखे धर्माचा अत्यंत व्यापक अर्थ सांगताना म्हणतात, “कल्पित असूनही वास्तव मानल्या जाणाऱ्या विशिष्ट अशा अति मानवी शक्तीला अनुकूल करून घेण्यासाठी मानवाने निर्माण केलेली उपासना पद्धती म्हणजे धर्म होय.”

धर्मापलीकडे जाण्यामागची कारणे शोधताना दुसऱ्या प्रकरणात सर सांगतात. आता धर्माला एक बंदिस्तपणा आला आहे. देव-देवता, ईश्वर वगैरेंचे स्वरूप गूढ बनत गेले, तो गूढ ईश्वर सर्वसामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर गेला. त्यांना ईश्वरापर्यंत पोहचण्यासाठी मध्यस्थाची गरज निर्माण झाली. त्यातून एक पुरोहित वगैरेंचा वर्ग निर्माण झाला. या वर्गाचे स्वतःचे आर्थिक, सामाजिक असे स्वार्थ वा हित सबंध निर्माण झाले. त्यांनी धर्मग्रंथ निर्माण केले. धर्मग्रंथांतून मोजक्या लोकांच्या फायद्याचे नियम शब्दबद्ध केले गेले. किचकट कर्मकांडही तयार केले. पवित्र, अपवित्र, उच्च-नीच भेद निर्माण केले. स्वर्ग-नरक कल्पना तयार केल्या. एखाद्याला धर्माचे आचरण करायचे असेल तर त्याला स्वतःच्या विवेकाने स्वतंत्रपणे काही कृती करता येणे अशक्य बनले.

धर्मापलीकडे जाण्याच्या कारणांमध्ये धर्माच्या काही जमेच्या बाजूही लक्षात आणून दिल्या आहेत. जसे की माणसाला नीतीचे शिक्षण देण्याच्या बाबतीत धर्माने काही कामगिरी केली आहे, हे नाकारून चालणार नाही. धर्माच्या पलीकडे जाण्यासठी मन उतावीळ होऊन उठावे, अशा स्वरूपाचे काही गंभीर दोषही धर्मामध्ये आढळतात. त्याचेही विवेचन साळुंखे यांनी पुढील मुद्यांच्या आधारे पुस्तकात केले आहे. १) कार्यकारणाविषयीचे अज्ञान, २) नव्या ज्ञानाचे दरवाजे बंद, ३) शरणागतीची सवय, ४) मूलभूततावाद व पुनरुज्जीवनतावाद याचे दुष्परिणाम, ५) दुटप्पीपणा, ६) पावित्र्याची संकल्पना आणि विषमता, ७) धार्मिक व्यवस्था हि एक शोषण व्यवस्था, ८) हिंसाचारास कारणीभूत, ९) सर्वंकष हुकूमशाही, १०) ढोंगबाजी, ११) ऐहिक जीवनाची उपेक्षा इत्यादींचा सविस्तर लेखाजोखा अत्यंत विस्तृतपणे उदाहरणांसह मांडला आहे.

धर्मापलीकडे जाण्यातील अडथळे व त्यावरचे उपायही या पुस्तकात अनेक अंगांनी विचारपूर्वक साळुंखे यांनी मांडले आहेत. मानवाची प्रचंड हानी करणारे दोष धर्मामध्ये आहेत. या दोषांवर हल्ला करून धर्माला जबरदस्त आव्हान देणाऱ्या अनेक चळवळी काळाच्या ओघात होऊन गेल्या आहेत.  मानवजातीवर अपार प्रेम करणाऱ्या अनेक व्यक्तींनीदेखील धर्मावर अत्यंत कठोर टीका केली आहे. एवढे सगळे होऊनही धर्म नष्ट होणे दूरच तो कोलमडल्याचेदेखील दिसत नाही. त्याचा समाजावरचा प्रभाव खऱ्या अर्थाने वाढलेला असो अथवा नसो, तो फारसा कमी झाल्याचे नक्कीच दिसत नाही.

एखादी अत्यंत अनिष्ट गोष्ट एवढे मोठे आघात पचवून हजारो वर्षे टिकून राहते आणि नुसती टिकून राहत नाही तर लोकांच्या अंत:करणावर प्रभाव ही गाजवते. हे पाहून आपण एकीकडून चकित, विस्मितही होऊन जातो. आणि दुसरीकडून आपले मन काहीसे खिन्न ,विषण्णही होते. स्वाभाविकच धर्म कशाच्या जोरावर असा प्रभावीपणे टिकून राहतो, धर्माच्या पलीकडे जाण्याचे आपले बहुतेक प्रयत्न का फसत आले आहेत, हे समजून घेण्याचा अत्यंत गंभीर प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे साळुंखे सांगतात.

या अडथळ्यामध्ये धर्माला पर्याय दिला जात नाही, अनेकांची उपजीविका धर्मावर अवलंबून असते, कलाकृती व पुरांणकथांचे माध्यम, महत्त्वाचे प्रसंग निरस होता कामा नयेत, सांस्कृतिक कृती वर्ज्य करून चालणार नाही, गंभीरपणे अभ्यास नाही, लहानपणापासूनचे संस्कार, कोरडे युक्तिवाद अपुरे, जिव्हाळा हवा, समाज बांधणारे धर्मापलीकडचे घटक विकसित केले पाहिजेत. इत्यादी मुद्यांचे अभ्यासपूर्ण उदाहरणासह विवेचन केले आहे.

धर्म, विज्ञान व विवेक या चौथ्या प्रकरणात सरांनी प्राचीन काळापासून मानव सत्याचा आणि विशेषतः अंतिम सत्याचा शोध घेत आहे. धर्म, तत्त्वज्ञान, विज्ञान इत्यादींच्या माध्यमातून अविरतपणे माणसाचा हा शोध  चालू आहे, मी कोण आहे? म्हणजेच माझे खरे स्वरूप कोणते? या जगाची निर्मिती कोणी केली? मृत्युनंतर जीवाचे अस्तित्व कोणत्या ना कोणत्या स्वरूपात शिल्लक राहते, की पूर्णपणे नाहीसे होऊन जाते? बाह्य सृष्टीचे खरे स्वरूप काय? या आणि या सारख्या इतर अनेक गहन प्रश्नांचा विचार माणूस सतत करत आला आहे. तसेच मानवाला भोगावे लागणारे दुःख कोणत्या उपायांनी नाहीसे करता येईल आणि सर्वश्रेष्ठ असे सुख कसे प्राप्त होऊ शकेल, या विषयीचे विचार मंथनही सतत चालले आहे, असे मानवी संस्कृतीच्या इतिहासावरून आढळते.

विविध धर्मग्रंथ, संप्रदाय, पंथ, धर्मगुरू, धर्मसंस्थापक, संत महात्मे, साक्षात्कारी महापुरुष, प्रेषित, तत्ववेत्ते व शास्त्रज्ञ कीस्वतील सत्य शोधण्याचा प्रयत्न करत आहे, या पैकी काहीजण नम्रपणे असे कबूल करतात, की आपल्याला कळलेले सत्य अंशिक स्वरूपाचे वा अपूर्ण असून पूर्ण सत्याच्या दिशेने डोळसपणे वाटचाल करीत राहणे आवश्यक आहे, असे साळुंखे सांगतात.

हिंदू-मुस्लीम संघर्ष की सलोखा या प्रकरणात सलोख्याचा मार्ग मिळमिळीतपणाचा वाटला तरी इतिहासाची साक्ष वर्तमानाचा अनुभव व भविष्याविषयीचा तर्क हेच सांगतो, की मानव जातीच्या कल्याणासाठी याच्याखेरीज अधिक चांगला दुसरा मार्ग नाही. आपण दुबळे राहून दुसऱ्याबरोबर सलोखा करू शकत नाही, हे बरोबरच आहे. आणि म्हणून आपण शक्तिशाली बनण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केलच पाहिजेत. परंतु आपण शक्तिशाली झाल्यावर दुसऱ्याला चिरडून टाकू आणि त्याद्वारे सुखी होऊ अशी कल्पना करणे मात्र चुकीचे आहे. म्हणूनच आपल्या मनात कितीही संताप निर्माण झाला असला तरी हिंसाचाराचा वा शक्तीप्रदर्शनाचा मार्ग हा अनुचितच होय. रक्त हिंदूंचे सांडो वा मुसलमानाचे सांडो वा आणखी कुणाचे सांडो ते माणसाचेच सांडणार आहे. एक तर माणसाचे रक्त इतके स्वस्त बनवण्याचे कारण नाही आणि दुसरे म्हणजे रक्त सांडल्याशिवाय प्रश्न सोडवताच येणार नाहीत, इतक्या पाशवी पातळीवर मानवाने आपल्या बुद्धीला आता राहू देण्याचे कारण नाही, असेही साळुंखे सांगतात.

या पुस्तकाच्या समारोपात सरांनी धर्मचिकित्सेच्या संदर्भातील व्यवहारात निर्माण होणारे काही गुंते, अडचणी, प्रश्न, अपेक्षा इत्यादींचा विचार करायला लावणारे विवेचन केले आहे. आम्हाला अज्ञान नको, आम्हाला द्वेष नको, आम्हला हवे मधुरस्मित हास्य, आम्हाला हवा हृदया-हृदयामध्ये उत्कट आनंदाचा झरा, धर्म आमच्यासाठी हे सगळे करत असेल तर तो आमचा मित्र, आमचा सखा. तो आम्हला हवा. मग आम्ही त्याच्या पलीकडे जाण्याची भाषा करणार नाही. तो आमच्यासाठी हे करणार नसेल तर आम्हाला त्याची संगत नको. मग मात्र आम्ही त्याच्या पलीकडे जाण्याचा हर तऱ्हेने प्रयत्न करू, इतके साधे सरळ उत्तर धर्म की धर्मापलीकडे या पुस्तकाच्या शेवटी साळुंखे देतात.

एकूणच काय तर, धर्माच्या नावाखाली दुही माजवून विद्वेष पेरण्याचे काम आपल्या समाजात वर्षानुवर्षे सुरु आहे. शहाबानो प्रकरण असो की रूपकुंवरचे सती जाणे, बाबरी मशीद... जातीय दंगली... पुतळ्याची विटंबना, गणपतीचे दुध पिणे असो, अशा प्रसंगी सामूहिक उन्माद माजवण्याचे योजनाबद्ध प्रयत्न होत आहेत. समाजातील विद्वेष पेटता ठेवला जात आहे. या पार्श्वभूमीवर धर्म म्हणजे काय?, धर्माचे खरे स्वरूप काय?, धर्माची उपयुक्तता किती?, धर्माची मर्यादा कोणती?, धर्म मोठा की विज्ञान?, धार्मिक विद्वेषाचा फायदा कोणाला?, हिंदू मुस्लीम प्रश्नावर तोडगा काय?, अशा मूलभूत प्रश्नांचा वेध साळुंखे यांनी ‘धर्म की धर्मापलीकडे’ या पुस्तकात घेतला आहे. चळवळीतील कार्यकर्त्यानेच नव्हे तर प्रत्येक भारतीय नागरिकाने हे पुस्तक वाचले पाहिजे.

.............................................................................................................................................

डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/search/?

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे.......

जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक.......