अजूनकाही
प्राच्यविद्यापंडित डॉ. आ. ह. साळुंखे यांनी नुकतीच वयाची पंचाहत्तरी पूर्ण केली. त्यानिमित्त १ व २ जून रोजी एसेम जोशी सोशलिस्ट फाउंडेशन, पुणे यांच्यावतीने साळुंखे यांचा साहित्य अभिवादन आणि सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. बहुजनांनी मानसिक गुलामगिरीतून मुक्त व्हावे यासाठी आणि अनार्य संस्कृतीच्या महामानवाचे मोठेपण समाजासमोर आणण्यासाठी साळुंखे यांनी दिशादर्शक लिखाण केले आहे. त्यामुळे फाउंडेशनचे सुभाष वारे यांनी साळुंखे यांच्या ७५ पुस्तकांविषयी ७५ कार्यकर्त्यांकडून लेख लिहून घेतले. या ७५ कार्यकर्त्यांच्याच हस्ते २ जून रोजी साळुंखे यांचा सत्कार करण्यात आला. त्या ७५ लेखांपैकी तीन लेख ‘अक्षरनामा’वर प्रकाशित होत आहेत. त्यातील हा एक...
.............................................................................................................................................
“मनुस्मृतीवर काही लिहिणे, हा माझ्यासाठी अत्यंत क्लेशकारक, तरीही अटळ अनुभव आहे.” या वाक्यानं आ. ह. साळुंखे यांच्या ‘मनुस्मृतीच्या समर्थकांची संस्कृती’ या पुस्तकाची सुरुवात होते. मी त्यांचं वाचलेलं हे पहिलंच पुस्तक. पण माझ्यासाठीसुद्धा हे पुस्तक वाचणं, हा अत्यंत क्लेशकारक, तरीही अटळ अनुभव होता. साधारणपणे २१ वर्षांपूर्वी पदवीच्या वर्गाला असताना मी हे पुस्तक वाचलं होतं. पण हे पुस्तक वाचताना किमान ४ ते ५ वेळा तोंड धुवून पुन्हा वाचायला बसलो, इतकं या पुस्तकानं मला अस्वस्थ केलं होतं. एखादं पुस्तक वाचताना टिपणं काढण्याची ही पहिलीच वेळ होती.
साळुंखे यांनी या पुस्तकातून मनुस्मृतीच्या समर्थनामागील विचारसरणीची दिशा दाखवून देण्याचा हेतू असल्याचं स्पष्ट केलं आहे. ‘मनुस्मृती’ हा भारताच्या इतिहासातील सामाजिकदृष्ट्या सर्वांत विकृत, सर्वांत अधिक विकृत ग्रंथ असल्याचं ते अतिशय परखडपणे सांगतात.
अगदी सुरुवातीलाच मनू या व्यक्तीचा आणि मनुस्मृतीचा काहीही संबंध नसल्याचं स्पष्ट करत ते पहिला धक्का देतात. मनुस्मृतीच्या प्रारंभी सांगण्यात आलेल्या कथेनुसार मनू असे म्हणतो, “ब्रह्मदेवाने हे शास्त्र तयार करून मला शिकवले आणि मी मरीची वगैरे महर्षींना शिकविले. आता हा भृगू तुम्हाला हे शास्त्र ऐकवेल.”(१.५८, ५९) याचाच अर्थ हा ग्रंथ म्हणजे मनूने नव्हे तर भृगूने केलेला उपदेश आहे.
या ग्रंथाचे समर्थन करणारे ‘हा कायद्याचा आणि नीतिनियमांचा ग्रंथ’ असल्याचे सांगत असले तरी प्रत्यक्षात कायद्याचा ग्रंथ कसा असू नये, याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे हा ग्रंथ होय. यातील वचने ही न्यायाची असल्याचे या ग्रंथाचे समर्थन करणारे लोक सांगतात, पण प्रत्यक्षात मात्र यातील काही मोजकी वचने ही न्यायाची आणि इतर बहुतेक मांडणी ही अन्यायाचे नियम सांगणारी असल्याचे दिसून येते.
इ.स.पू. ३२१ मध्ये चंद्रगुप्त मौर्यापासून सुरू झालेल्या मौर्य राजवटीत बृहद्रथ या राजाच्या पुष्यमित्र नावाच्या ब्राह्मण सेनापतीने कटकारस्थानाने राजाला मारून सत्ता बळकावली. त्याला धर्मशास्त्राचा आधार देण्यासाठी बनवलेल्या मनुस्मृतीत फेरफार होत इ.स. २०० च्या आसपास या ग्रंथाला आजचे स्वरूप मिळाले. त्यापूर्वी मार्गदर्शक मानले जाणारे कौटिल्याचे अर्थशास्त्र बाजूला सारून धर्म हेच अर्थ आणि काम या पुरुषार्थांचे मूळ आहे, असे मनुस्मृती म्हणते. यातील बहुतेक वचने ही वर्णवादाचाच पुरस्कार करतात.
जसे, ब्राह्मणाची पूजा हेच राजाचे कर्तव्य असल्याचे मनुस्मृती म्हणते. (४.३७) इतकेच नाही तर, ‘राजा मरू लागला असला म्हणजेच खजिना रिता पडून कंगाल होण्याची वेळ आली, तरी वेदज्ञ ब्राह्मणाकडून कर घेऊ नये, कारण ब्राह्मण हे सर्वश्रेष्ठ दैवत होय. (९.३१९) असेही मनुस्मृती सांगते.
मनुस्मृतीत काही ठिकाणी ‘अज्ञानी लोकांपेक्षा ज्ञानी लोक श्रेष्ठ होत, बुद्धी ज्ञानाने शुद्ध होते,’ अशी विद्येची प्रशंसा आणि अविद्येची निंदा करणारी काही वचने दिसतात. त्यांचा संदर्भ देऊन ज्ञानाबद्दल मनुस्मृतीतील विचार स्तुत्य असल्याचे तिचे समर्थक म्हणू शकतात. ज्ञान घेण्याचा अधिकार मात्र संकुचित ठेवण्यात आला आहे. ‘शुद्र विप्रांना धर्मोपदेश करू लागला असता राजाने त्याच्या तोंडात व कानात तापलेले तेल ओतावे.’ (८.२७२) असे हीच मनुस्मृती का बरे म्हणत असेल?
आज आरक्षणाची चर्चा करताना अनेक तथाकथित उच्च जातीतील लोक जेव्हा तथाकथित खालच्या समजल्या जाणाऱ्या जातीतील लोकांच्या बुद्धिमत्ता आणि गुणवत्तेची नकारात्मक चर्चा करत असतात, तेव्हा ते नकळतपणे मनुस्मृतीतील ‘शुद्र आणि अवर्ण व्यक्ती वेद व स्मृती यांचे आकलन करून घेण्यास मुळीच समर्थ नसतात. त्यामुळे ते न्यायाधीश बनण्यास अपात्र असतात.’ (२.१३) यासारख्या वचनाचेच समर्थन करत असतात.
मनुस्मृती समर्थकांच्या मते, उदरनिर्वाहाच्या दृष्टीने उपयोगी विद्या इतरांकडे व निरुपयोगी विद्या ब्राह्मणांकडे होत्या. अर्थात, असे मांडण्यामागे ब्राह्मण किती निःस्पृह वृत्तीचे होते, असा आभास निर्माण करण्याचा त्यांचा हेतू असतो. पण या उपजीविकेच्या विद्या जरी इतरांच्या हातात ठेवल्या असल्या तरी, त्यांच्यापासून मिळणारे फळ आपोआप आपल्याला आयते मिळेल, असे नियमही त्यांनी याच मनुस्मृतीत करून ठेवलेले आहेत.
मनुस्मृती ब्राह्मण आणि इतर वर्णांच्या व्यक्तींमध्ये किती भेदभाव करते, याची अनेक उदाहरणे दिसतात. उदा. दहा वर्षाचा ब्राह्मण आणि शंभर वर्षाचा क्षत्रिय यांना पिता-पुत्र जाणावे. मात्र त्या दोघांपैकी दहा वर्षाच्या ब्राह्मणाला पिता समजावे, असे सांगणारी मनुस्मृती विषमतेचे नवे मापदंड उभे करते.
त्याचप्रमाणे विवेकी चिकित्सेमुळे ज्ञानाचा आणि पर्यायाने समाजाचा विकास होतो. परंतु मनुस्मृती मात्र अशी कसलीही चिकित्सा करण्यावरच बंदी घालते. अलीकडच्या काळात विवेकीपणे चिकित्सा करणाऱ्या आणि मानवतावाद, सुधारणावाद यांचा प्रसार करणाऱ्या डॉ. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांसारख्या विचारवंतांच्या हत्या झाल्या. त्याचे समर्थन करणाऱ्या व्यक्ती आणि संघटना या त्यांच्या कृतीतून आजही ते मनुस्मृतीतील या संस्कृतीचेच समर्थक असल्याचे सिद्ध करतात.
एकीकडे आदर्श कायद्याची आणि नैतिकतेची परिभाषा बोलताना मनुस्मृतीचे समर्थक चोरीच्या गुन्ह्यासाठी ब्राह्मणांना जास्त दंड करावा असे मनुस्मृतीत असल्याचे सांगतात. पण ‘आपला यज्ञ पूर्ण करण्यासाठी प्रसंगी इतर वर्णाच्या घरातून खुशाल संपत्तीचे हरण करावे, कारण शूद्रांना संपत्तीवर अधिकार नसतो’, ‘ब्राह्मणाने आपला यज्ञ पूर्ण करण्यासाठी शुद्र वगैरेंची संपत्ती लुटून आणली तरी राजाने त्याला कसलाही अडथळा करू नये’, ‘ब्राह्मणांनी कितीही मोठा गुन्हा केला तरी त्याचे धन जप्त करू नये’, ‘दंड वसुलीतून मिळालेले सर्व धन राजाने न वापरता ते सर्व ब्राह्मणांना वाटून द्यावे’, अशा या नियमांमागील नैतिकता कशाच्या आधारे मांडणार?
मनुस्मृतीमध्ये ‘शुद्र, कारू (कारागीर) आणि शिल्पी (सुतार, लोहार इ.) हे कर्मोपकरण होत.’ या वचनाचा आधार घेत मनुस्मृती शुद्रांकडून कर न घेऊन त्यांच्याबद्दल खूप संवेदनशील असल्याचे सांगितले जाते, मात्र ज्याप्रमाणे राजाने वेदज्ञ ब्राह्मणाकडून कर घेऊ नये, असे स्पष्टपणे म्हणते; तसे शुद्रांबाबत म्हणत नाही, तर त्याच्याकडून कर रोख स्वरूपात न घेता कामाच्या स्वरूपात घ्यावा असे म्हणते, तेव्हा यातील फोलपणा लक्षात येतो.
स्त्रियांच्या बाबतीत तर मनुस्मृतीची भूमिका मात्र खूपच असंस्कृतपणाची आहे. मनुस्मृतीतील ‘ज्या घरात पतीला पत्नी व पत्नीला पती नित्य संतुष्ट ठेवतो, त्या घरात नेहमी कल्याण नांदते’, या विधानाचे कौतुक केले जाते, पण संतुष्ट करण्याच्या नियमात मात्र प्रचंड विषमता आहे. ‘पत्नी अप्रिय बोलली तरी पतीने लगेच दुसरे लग्न करावे,’ असे सांगणारी मनुस्मृती ‘पती चारित्र्यहीन असला, तरी स्त्रीने त्याची देवाप्रमाणे पूजा करावी’ असे सांगते. तसेच ‘अब्राह्मण पुरुषाने व्यभिचार केला तर, तो प्राणान्त दंडाला पात्र ठरतो. चारही वर्णाच्या स्त्रियांचे नेहमी रक्षण करायचे असते.’ असे म्हणणारी मनुस्मृती त्यासाठी देहदंड मात्र फक्त अब्राह्मण व्यक्तीलाच द्यायला सांगते. तसेच एका श्लोकात व्यभिचारी पुरुषाला देहदंडाची शिक्षा लिहिली आहे. परंतु पुढच्याच श्लोकात ‘असे वर्तन करणाऱ्या पुरुषाने एक वर्षांनतर पुन्हा तेच केले, तर त्याला दुप्पट दंड करावा.’ असे म्हणते. याचाच अर्थ पहिल्या वेळीही त्याला देहदंडाऐवजी काही दंडाचीच शिक्षा झाली असणार, हे उघड आहे. मनुस्मृतीतील बंधने ही सर्वच वर्णातील स्त्रियांना लागू होतात.
‘बालपणी वडील, तरुणपणी पती आणि वृद्धापकाळात मुलगा स्त्रीचे रक्षण करतो. त्यामुळे स्त्रीला स्वातंत्र्याची गरजच नाही.’ (९.३) अशी स्पष्ट भूमिका मनुस्मृती मांडते. याचेही समर्थन करताना परकीय आक्रमणाचे आणि विशेषतः मुसलमानांच्या आक्रमणाचे उदाहरण दिले जाते. मात्र मनुस्मृतीच्या निर्मितीच्या वेळी इस्लाम धर्माची निर्मितीच झालेली नव्हती. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्त्रियांचे असे रक्षण करण्यासाठी आपण त्यांच्यावर ही बंधने घालत असल्याचे मनुस्मृतीत कोठेही म्हटलेले दिसत नाही. मात्र ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते’ म्हणणाऱ्या मनुस्मृतीत ‘व्यभिचार हा स्त्रियांचा स्वभाव असतो,’ असे मात्र अनेकदा म्हटले आहे.
मनुस्मृतीचे समर्थन करताना अनेकदा भारतीय संस्कृती आणि भारताचा प्राचीन इतिहास यांचा आधार घेतला जातो. पण तो अत्यंत तकलादू आहे. ज्यांच्या पूर्वजांनी या मनुस्मृतीच्या आधारे शोषण केले, किंवा ज्यांना आपल्या वर्ण-जातीच्या बचावासाठी मनुस्मृतीचे समर्थन आणि गौरव करायचा आहे, त्यांनी तर आजच्या बदलत्या काळात आपली मानसिकता बदलली पाहिजेच, पण ज्यांचे पूर्वज हजारो वर्षे या शोषणाला बळी पडले आहेत, त्यांनी तरी स्वतःचा वेगळा, स्वतंत्र दृष्टीकोन ठेवला पाहिजे. अन्यथा मनुस्मृतीच्या समर्थकांनी सांगितलेला इतिहास अंधपणे, चिकित्सा न करता स्वीकारणे, ही आपली सांस्कृतिक आत्महत्या असेल, असा स्पष्ट इशारा साळुंखे यांनी दिला आहे.
हे पुस्तक वाचल्यामुळे माझ्या आयुष्यात झालेली सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतीय संविधानाबद्दल जाण व भान येण्यास आणि संविधान जागर अभियानात अधिक सजगपणे, गांभीर्याने मांडणी करण्यास मदत झाली. सध्याच्या काळात द्वेष आणि असत्याच्या आधारावर युवा पिढीला भटकवण्याचे जे काम होत आहे, अशा काळात तर या पुस्तकाचा प्रसार आणि प्रचार केलाच पाहिजे.
साळुंखे यांनी पुस्तकाचा शेवटी लिहिले आहे, ‘मनुस्मृतीच्या समर्थकांची ही तथाकथित संस्कृती म्हणजे राष्ट्रीय आपत्ती आहे. कारण स्वतः मनुस्मृती हाच भारतीय संस्कृतीवरचा कलंक आहे. मनुस्मृतीच्या समर्थकांना मी अंतःकरणापासून आवाहन करू इच्छितो, या, इतरांच्या हातात हात घालून हा कलंक पुसून टाकूया. शोषकांचा अहंगंड आणि शोषितांचा न्यूनगंड या दोहोंचे विसर्जन करून एक विवेकी, सहकार्यशील, संवेदनशील आणि प्रतिभाशाली समाज निर्माण करूया.’
घटनेचे शिल्पकार असणाऱ्या बाबासाहेबांनी १९२५ मध्ये मनुस्मृती का जाळली, त्याचे गांभीर्य हे पुस्तक वाचल्यावर लक्षात येते. तसेच त्याच बाबासाहेबांनी पुढे जाऊन स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय यावर आधारित जे भारतीय संविधान साकारले, त्याचेही अनन्यसाधारण महत्त्व समजण्यास मदत होते. त्यामुळे प्रत्येक लोकशाही, समतावादी चळवळीतील कार्यकर्त्यांनी तर हे पुस्तक अभ्यासपूर्वक वाचले तर पाहिजेच, पण प्रत्येक जबाबदार नागरिकाने हे पुस्तक आवर्जून वाचलेच पाहिजे.
.............................................................................................................................................
डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/client/search/?
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment