जीवनाध्वरि पडे आज पूर्णाहुती
संकीर्ण - पुनर्वाचन
पु. ल. देशपांडे
  • आचार्य अत्रे
  • Thu , 13 June 2019
  • संकीर्ण पुनर्वाचन आचार्य अत्रे Acharya Atre प्रल्हाद केशव अत्रे Pralhad Keshav Atre पु. ल. देशपांडे P. L. Deshpande

आज आचार्य अत्रे यांचा ५०वा स्मृतिदिन. त्यानिमित्त हा विशेष लेख. अत्रे यांचा काळ ज्यांनी पाहिला आहे, अनुभवला आहे, अशा व्यक्तींच्या लेखनात जी बहार येते, जो काळ येतो, ज्या उपमा आणि अलंकार येतात; जी विश्वसनीयता येते, ती अत्रे यांचा काळ न पाहिलेल्या व्यक्तींच्या लेखात येऊ शकत नाही. अत्रे ही केवळ त्यांची पुस्तके वाचून समजून घेण्याची व्यक्ती नव्हती, नाही. त्यामुळेच अत्रे गेले त्यानंतरचा हा लेख, ५० वर्षांपूर्वीचा.

‘नवयुग’ साप्ताहिकाने अत्र्यांच्या निधनानंतर म्हणजे  ऑक्टोबर १९६९ साली ‘आचार्य अत्रे स्मृति विशेषांक’ प्रकाशित केला होता. प्रस्तुत लेख त्या अंकातून घेतला आहे.

............................................................................................................................................................

काल रात्री अवेळी फोन खणखणला. वृत्तपत्र कचेरीतल्या एका मित्राने मोठ्या कष्टाने दोनच शब्द उच्चारले, ‘अत्रे गेले.’ ‘अत्रे गेले. गेली ४०-४२ वर्षे मराठी जीवनाच्या अनेक संदर्भात ज्या नावाचा उच्चार प्रेमाने, कौतुकाने, आदराने, चकीत होऊन, कृतज्ञतेने आणि कधी कधी रागवूनही होत होता, त्या नावाचा आणि त्या अफाट कर्तृत्वाचा उल्लेख यापुढे भूतकालवाचक क्रियापदाने करायचा. मराठी जीवनातली कुठलीही घटना असो, सांस्कृतिक असो वा राजकीय असो, त्यासंबंधी अत्रे काय म्हणतात ते वाचण्यासाठी किंवा ऐकण्यासाठी उद्याच्या ‘मराठ्या’कडे किंवा संध्याकाळच्या त्यांच्या कुठे ना कुठे तरी होणाऱ्या व्याख्यानाकडे डोळे लावून बसणाऱ्या मराठी माणसाचे आता त्या उद्याकडे डोळे लावून वाट पाहणे संपले. यापुढे अत्र्यांच्याविषयी बोलण्यासाठी फक्त स्मृतीची पाने चाळायची.

भवानीचा गोंधळी

गेली जवळ जवळ पन्नास वर्षे अत्र्यांनी महाराष्ट्रभवानी पुढे हातातल्या लेखणीचा आणि वाणीचा पलिता करून केवढा प्रचंड जागर मांडला होता. महाराष्ट्रभवानीचा हा महान गोंधळी. मराठी पोरांच्या शिक्षणापासून ते मराठी राजकीय जीवनातल्या खडतर प्रसंगांपर्यंत ठायीं ठायीं त्यांनी संचार केला! संबळ कडाडावी, झांजा झणाणाव्यात, उदोउदोचा नसननस फुलवणारा गजर व्हावा, भाविकांच्या मेळाव्याचे लक्ष हाती पलिता घेऊन नाचणाऱ्या गोंधळ्यावर खिळून राहावे, सभेत अत्रे आले म्हणजे अशा प्रकारचे चैतन्य येई. मग सभा पोरांची असो वा थोरांची. ब्रह्मदेवाच्या कमंडलूतून उगम पावलेल्या कऱ्हेच्या काठी जन्मलेले, तिच्याच अंगाखांद्यावर जेजुरीच्या खंडोबाच्या भंडाऱ्याने वाढलेले आणि भक्तीच्या मस्तीने धुंद झालेल्या गोंधळी-वाघ्ये आणि वारकरी ह्यांच्याच सारखे जीवनावरच्या अपार भक्तीने मस्त झालेले अत्रे हे साहित्य, संगीत, नाट्य, राजकारण, शिक्षण अशा असंख्य क्षेत्रांतल्या अबीर, बुका, हळद, कुंकुम, चंदन यांनी अंतर्बाह्य माखलेले असामान्य जीवनभक्त होते. त्यांचा दरबार हा जीवनभक्तांचा दरबार होता. गदारोळात घुसणे आणि हरिनामासारखा साक्षात जीवनाचा गजर करत भान विसरून जगणे, हा त्यांचा धर्म होता. औचित्याच्या फोल विवेकाला इथे जागा नव्हती.

वयाची सत्तरी संपली होती, पण अत्रे नामक मशालीची ज्वाला नव्या नव्या तेलाने भडकलेलीच होती! तोलून मापून, हातचे राखून जगणे किंवा शब्दापासून प्रकृतीपर्यंत कशाला जपणेही हे त्यांच्या पिंडाला ठाऊकच नव्हते! महाराष्ट्र देशाच्या वर्णनात अत्र्यांच्या साहित्यगुरू गडकऱ्यांनी, त्याला ‘राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा-नाजूक देशा, कोमल देशा फुलांच्याही देशा’ असे म्हटले आहे. महाराष्ट्र देशाइतकेच हे वर्णन राम गणेशांच्या या शिष्यालाही लागू पडते.

...............................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4851/Paul-Allen---Idea-Man

...............................................................................................................................................................

कसले ना कसले वेड

दहा दहा हजारांच्या सभेंत सह्याद्रीचा कडा चालत यावा तसे चालत येणारे अत्रे, खाजगी संवादांतही गर्जनेच्या सुरांत बोलणारे अत्रे, ‘यमुनाजळि खेळू खेळ कन्हय्या’सारखे नाजुक गाणे लिहिणारे अत्रे, भयानक पाठ्यपुस्तकाखाली चिरडल्या जाणाऱ्या मराठी पोरांसाठी त्यांची कोवळी मने फुलवणारी वाचनमाला लिहिणारे अत्रे, प्रतिपक्षाची धुळदाण उडवण्यासाठी जिभेचा आणि लेखणीचा दांडपट्टा करणारे अत्रे आणि स्तुतीची शाबासकी देताना घेणाऱ्याच्या पाठीतही उसण भरावी इतक्या जोरात पाठ थोपटणारे अत्रे, खाण्यापिण्याचाही कसलाही निर्बंध न पाळणारे अत्रे आणि उरुळीकांचनच्या आश्रमांत संपूर्ण निराहार करून बाळकोबा भाव्यांशी ब्रह्मसूत्रावरील चर्चेत तासन तास भान हरपून अध्यात्मविषयात रंगलेले अत्रे!

कसले ना कसले तरी वेड लावून घेतल्याशिवाय त्यांना जगताच आले नाही. कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत शिक्षक म्हणून काम करताना अठरापगड संस्कारांतून आलेल्या नाठाळ विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी निर्माण करण्यासाठी विद्यादानाच्या वेडाने त्यांना झपाटले होते. मा. विनायकांनी त्यांना पटकथालेखक केले. स्टुडिओच्या दरवाजांतून लेखक म्हणून आत गेलेले अत्रे लाखो रुपयांच्या उलाढाली करणारे स्टुडिओमालक झाले. चित्रपटांचे दिग्दर्शक झाले. चित्रपटाच्या पहिल्या राष्ट्रीय पारितोषिकाचे मानकरी झाले.

अत्र्यांची वेडे अनेक होती, पण त्यांचे सर्वांत मोठे वेड म्हणजे गर्दी! मराठी गर्दीने अत्र्यांच्यावर जितके प्रेम केले नसेल, तितके अत्र्यांनी गर्दींवर केले. त्यांच्याबरोबर व्यासपीठावर बसण्याचा माझ्या सुदैवाने मला अनेकदा योग आला. अत्र्यांचा नेहमीच प्रश्न असे- ‘किती वीसएक हजार माणसं असतील का?’ अत्र्यांच्या मास्तरांनी तर त्यांना बेकबेचा कारकुनी पाढा न शिकवता बेहजार एके बेहजार, बेहजार दुणे चार हजार ह्याच पाढ्यापासून शिकवायला सुरुवात केली असली पाहिजे. एकदा त्यांच्याबरोबर त्यांच्याच गाडीतून पुण्याला जात होतो. अत्रे मोटार अतिशय उत्तम हाकत असत. मोटार या विषयावरही त्यांचे अतोनात प्रेम होते. किंबहुना महाराष्ट्रातला स्वतःची मोटार असणारा हा पहिलाच पंतोजी असावा. घाट ओलांडून आम्ही वर आलो. खंडाळ्याला एक भजी विकणारा आहे. एका खोपटांत त्याचे दुकान आहे. तिथे आम्ही भजी घेतली. अत्रे लगेच मला म्हणतात – ‘अरे हा माणूस ठाऊक आहे का तुम्हाला? दिवसाला लाखो रुपयांची भजी विकतो!’

त्यांची कोष्टकेच निराळी होती. बापुडवाण्या शब्दांची त्यांना ओळखच नव्हती. अतिशयोक्ती हे विनोदाचे महत्त्वाचे अंग खरें, पण अत्र्यांना साधे बोलणे आणि लिहिणेही अतिशयोक्तीखेरीज जमले नाही. त्यांच्या त्या भव्य देहाला आणि गरजत्या आवाजाला त्यांची ती ‘जगांत असे नाटक झाले नाही’, ‘अद्भुत व्याख्यान झाले’, ‘गेल्या दहा हजार वर्षांत अमुक एक झाले नसेल’, ‘लाखो लोकांची सभा झाली’, असलीं धिप्पाड वाक्ये साजूनही दिसत. त्यांनी कुणाला नुसते चांगले म्हटले नाही, की नुसते मूर्ख म्हटले नाही. चांगला म्हणजे ‘अद्भुत-अलौकिक’ आणि मूर्ख म्हणजे ‘महामूर्ख!’ गेल्या वर्षीची गोष्ट आहे. पुणे महानगपालिकेतल्या अनंतराव जाधवांनी आम्हाला जेवायला बोलावले होते. अत्र्यांनी आइस्क्रीम आणि आंब्याचे वेड घेतले होते. जेवणाला अवकाश होता.

अत्र्यांनी बकेटभर आइस्क्रीम आणि आंबे खाण्याचा सपाटा लावला. ते पाहूनच मला भीती वाटायला लागली. मी म्हटले, ‘अहो अजून जेवायचं आहे आपल्याला!’ ‘छ्याट! आइस्क्रीम आणि आंबा ह्याच्यासारखं जगात काही नाही!’ वास्तविक अत्र्यांचे जेवण त्यांच्या शरीराच्या धिप्पाडपणाच्या मानाने फार नसे. माझ्या तरी पाहण्यात त्यांनी खादाडपणा चालवल्याचे स्मरत नाही, पण तो काळ आइस्क्रीम आणि आंब्याच्या वेडाचा होता.

विराट वसंतोत्सव

असली अनेक वेडे लावून घेत जगणारे अत्रे कशाने तरी झपाटून घेतल्याशिवाय जगताच न येणारे. आयुष्याच्या सुरुवातीला त्यांना काव्याने झपाटले. गीतगंगेत त्यांनी रविकिरण मंडळाच्या धर्तीची वैणिक काव्यरचना केली. आणि एके दिवशी जीवनात मुसंडी मारून न जगता काठाकाठाने ते पाहत आणि त्यावर नाजुक नाजुक भाष्ये करत जाणाऱ्या कवींचा तकलादू आणि शेणामेणाच्या सुख-दु:खाचा बावळटपणा त्यांच्या ध्यानी आला. आणि ‘झेंडूची फुले’ फुलली!

या शतकाच्या तिशी-पस्तिशीत आणि माझ्या विशीत ‘झेंडूची फुले’, ‘साष्टांग नमस्कार’ आणि अत्र्यांची व्याख्याने हा आमचा खुराक होता. व्याख्यानाला तासनतास राहणारा मराठी श्रोतृसमुदाय ही महाराष्ट्राच्या जीवनातली अत्र्यांची निर्मिती आहे. त्यापूर्वीची व्याख्याने म्हणजे एकतर देशभक्तिपर उपदेश किंवा सार्वजनिक काडेचिराइत प्राशन असे. अत्र्यांनी व्याख्यान नामक गोष्टीचा बाजच बदलला. हसतखेळत हे पोरांनाच नव्हे तर थोरांनाही शिकवावे लागते, हे शिक्षणाचे महान सूत्र या जन्मजात शिक्षकाने दाखवून दिले.

त्यांच्यातल्या असामान्य विनोदबुद्धीने खरे पांडित्य आणि नुसतीच पगडी यातला फरक लोकांना त्या काळी दाखवून दिला.

अत्रे-माटे वादासारखा प्रसंग म्हणजे प्रतिभा आणि वाणीविलासाच्या टूर्नामेंटस होत्या! चिरतरुण अत्रे आणि नवतरुण अफाट श्रोतृवृंद यांच्या त्या प्रचंड मेळाव्यात बुद्रुक मतांच्या नुसत्या चिंध्या उडत होत्या. बुरसटल्या विचारांची होळी पेटत होती. क्वचित अनवधानाने सुक्याबरोबर ओलेही जळले असेल. पण अत्र्यांच्या त्या सभा म्हणजे मराठी समाजात नव्याने फुललेल्या वसंताचा विराट वसंतोत्सव असे! त्यातून पुण्यासारख्या परंपराभिमानी शहरात सनातन्यांच्या दबदबा मोठा! प्रत्येक सभेत अत्रे एकेक बलून फोडत जात होते. हे पुणे बुद्रुकांचे नाही. हे आगरकरांचे पुणे आहे. जोतिबा फुल्यांचे पुणे आहे. जुन्या टाईमबार झालेल्या विचारांना कवटाळून बसणारे पुणे अशी पुण्याची दुष्कीर्ती होती. अत्र्यांनी त्याच पुण्यातल्या बंडखोरांचे नवे विचार आपल्या त्या काळात नव्याने अनुभवाला येणाऱ्या विनोदी भाषणांनी अत्यंत प्रभावीपणाने लोकांपुढे मांडले, अत्र्यांना सदाशिव पेठही चांगली ठाऊक होती. आणि भवानी, गंज, निहाल या उपेक्षित पेठांतून तर त्यांनी ज्ञानज्योत पेटवली होती. महाजनसमाजाइतकाच नव्हे त्यातूनही अधिक बहुजनसमाजाशी त्यांचा घनिष्ठ संबंध होता. त्यातूनच ते पुण्याच्या म्युनिसिपालटीच्या राजकारणात पडले. आणि पुण्याचा जीर्णोद्धार सुरू केला.

बोलके मराठी

आज पुण्यात दिसणाऱ्या अनेक नागर जीवनातल्या सुधारणाचा पाया अत्र्यांनी घातला आहे. गेल्या वर्षी संभाजी पार्कमध्ये सवाई गंधर्वांचा पुतळा बसवण्याचा समारंभ होता. अत्र्यांच्या हस्ते अनावरण होते. मी अध्यक्ष होतो. संभाजी पार्कच्या दारात फुललेल्या गुलमोहराकडे हात दाखवत अत्रे म्हणाले, “ही झाडे म्युनिसिपालटीच्या स्थायी समितीचा अध्यक्ष म्हणून मी माझ्या हाताने लावली आहेत. पुणेकरांना ठाऊकही नसेल की संभाजी उद्यान ही माझी कल्पना आहे.”

मराठी जीवनात अत्र्यांनी अशी अनेक गुलमोहराची झाडे लावली. मराठी माणसाची नसननस त्यांना ठाऊक होती. सासवडच्या खेड्यातून येऊन अखेरीस मुंबईत लक्षावधी रुपयाची उलाढाल करणाऱ्या अत्र्यांनी आपल्या पायांतली खेड्यांतली माती झडू दिली नाही. म्हणूनच त्यांच्या लेखनातल्या ओव्या आणि शिव्या अत्यंत सुबोध असत. अत्र्यांच्या लेखनाची जादूच अशी होती की, संतवाणीप्रमाणे सामान्य आणि असामान्य या दोघांचीही मने ते खेचून घेत. त्यांनी पांडित्य सुलभ केले. अत्र्यांच्या उशाशी तुकोबाची गाथा आणि समर्थांचा दासबोध हे दोन ग्रंथ सदैव ठेवलेले असत. इतके बोलके मराठी अत्र्यांच्या आधी क्वचितच लिहिले गेले. अग्रलेखांतून अत्रे आपल्याशी प्रेमाने, चेवाने, संतापाने, आनंदाने बोलत आहेत असे वाटे. साहित्यात बोलत्या शब्दावर त्यांचे अतोनात प्रेम होते. त्यांचे परममित्र कृ. पां. कुळकर्णी वारले त्या वेळचा ‘आहात काहो?’ या मथळ्याचा त्यांचा अग्रलेख मला अजून आठवतो. मित्र निधनाचे दु:ख मोकळे केल्यासारखा लिहिलेला तो अत्यंत हृदयस्पर्शी अग्रलेख! त्या उलट ‘आषाढस्य प्रथम दिवसे’सारखा पहिल्या पावसाच्या दर्शनाने उमटलेले आनंदोदगार असलेला काव्यमय, पंरतु संतवाणीसारखा प्रासादिक अग्रलेख.

बोलणे हा त्यांचा आवडत नाद, छंद, व्यवसाय, व्यसन. सारे काही! त्यांच्या त्या दरबारात माणसांचे व्हरायटी स्टोअर्स असायचे. महामहोपाध्याय दत्तोपंत पोतदार हे तर त्यांचे परममित्र. पोतदारासारख्या महापंडितापासून ते अशिक्षित भाबड्या पडदे रंगवणाऱ्या कारागिरापर्यंत अनेक माणसांनी नटलेली ती मैफल. तिथे वेदान्त सोपा होई. इतिहास सुबोध होई आणि किस्से-कहाण्याही रंगत! बैठकीची हीच रंगत त्यांच्या लेखनात येई. विदग्धांना त्यांची ही सुबोध रांगडी बोली वरून रुचत नसे, पण आतून अत्र्यांच्या शैलीतल्या प्रसादगुणांचे मनस्वी आकर्षण असे. बहुजनाला ‘इतो भ्रष्ट: तितो भ्रष्ट:’पेक्षा ‘गाढवही गेले, ब्रह्मचर्य गेले’ ही सोपी वाणी चटकन उमजते. त्यांच्या लेखणीतला प्रसादगुण अलौकिक होता.

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या काळात तर अत्र्यांच्या मशालीचा भडका उडला होता. मुंबईतल्या त्या अमानुष गोळीबारानंतर त्यांनी भयानक तळतळाट व्यक्त केला होता. मी त्यांना म्हटले की, “गोळ्या झाडणाऱ्यांची बोटे झडोत, त्यांना महारोग होवो, ही भाषा फार भडक आहे…”

“ती माझी भाषा नाही, पी.एल.” अत्रे गरजले, “ज्या आयांनी आपल्या पोरांच्या मेंदूच्या चिंध्या पाहिल्या त्यांच्या तोंडचे तळतळाट आहेत हे-”

...............................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4874/Deshbhakt-ani-andhbhakt

...............................................................................................................................................................

अत्र्यांच्या जीवनात भाग्याचे अनेक अफाट क्षण आले. ‘ब्रह्मचारी’सारखा बोलपट, घराबाहेरचे मुंबईतले असामान्य यश, ‘नवयुग’च्या अंकावर पडणाऱ्या उड्या, त्यांच्या व्याख्यानांना जमणारा अमर्याद जनसमर्द, या साऱ्या प्रसंगी अत्रे सम्राटासारखे मिरवत आले आणि मिरवत गेले. त्यांनी हारांचे डोंगर अंगावर घेतले, निराशेचे जबरदस्त तडाखेही सहन केले. पण अत्र्यांच्या आयुष्यातले माझ्या दृष्टीने सुवर्णयुग म्हणजे संयुक्त महाराष्ट्राचा लढा! ‘मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ ही भीमगर्जना त्यांनी ज्या क्षणी केली, त्यावेळी मला ड्रेफस खटल्याच्या वेळच्या एमिल झोलाची आठवण झाली. ड्रेफसविरुद्ध अन्याय झाला होता. सारी तोंडे गप्प होती. सर्वत्र तेरी भी चूप मेरी भी चूप होती. अशा वेळी फ्रान्सचा हा असामान्य कादंबरीकार लौकिक यशाच्या शिखरावर होता. वयानेही उतारी गाठली होती. पण ड्रेफस निर्दोष आहे ही खात्री झाल्याबरोबर त्या साहित्यशार्दुलाने गर्जाना केली की, ‘ड्रेफस सुटलाच पाहिजे!’ सारी फ्रेंच रियासत त्या गर्जनेने हलवून सोडली. अत्र्यांची गर्जना अशीच होती. लेखणीला प्रसंगोपात असंख्य रूपे धारण करावी लागतात. महाराष्ट्रावर भयंकर अन्याय होत होता. काँग्रेसचे कावेबाज मराठी म्हणवणारे पुढारी एका अभद्र सौद्याला तयार झाले होते. अत्र्यांनी मराठ्यांतून भीमगर्जना केली, ‘मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ आणि चांद्यापासून बांद्यापर्यंतचा सारा महाराष्ट्र खवळून उठला. त्या काळात अत्र्यांना पाहणे म्हणजे भारतीय युद्धातल्या भीमाचे दर्शन झाल्यासारखे वाटत असे.

रात्री दीडचा सुमार होता. मुंबई मराठी साहित्य संघात नाटक होते. ते आटपून मी केळेवाडीच्या गल्लीत आलो. दारातच अत्रे आणि इतर पाच-सहा लोक भेटले. त्या दिवशी अत्र्यांनी दहा की बारा व्याख्याने दिली होती. आणि शेवटले व्याख्यान रात्री दोन वाजता कोळ्याच्या वाडीत होते. ते द्यायला चालले होते. आवाजाचा पार निकाल लागला होता. नाटकाची गर्दी गल्लीतून निघाली होती. अत्र्यांनी तिथे आवाज दिला, ‘मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र…’ त्या मध्यरात्री त्या आसमंतातून अनेक आवाजातून प्रतिसाद आला - ‘झालाच पाहिजे!’

त्या क्षणी मला वाटले, देशाच्या फाळणीचा महाभयंकर कट चालू असताना अत्र्यांच्या आवाजासारखा जर एखादा आवाज घुमला असता आणि त्याने गर्जना केली असती की, ‘भारत अखंड राहिलाच पाहिजे’ तर भारताचा नकाशा असा छिन्नभिन्न झाला नसता. अन्यायाविरुद्ध असला आवाज उठवणाऱ्यांचे आवाज दाबले जातात, विकत घेतले जातात आणि देशाला अवकळा येते!

रंग भडक, वास नाजुक

सामाजिक आणि राजकीय अन्यायाविरुद्ध आपला गगनभेदी आवाज उठवणाऱ्या अत्र्यांना मृत्यूशिवाय शांत करणारे कोण होते? या आवाजाला आता आम्ही मुकलो. दरवेळी त्यांनी उठवलेला आवाज हा योग्यच होता असले भाबडे विधान कुणीही करणार नाही. किंबहुना त्यांच्या हातून निष्पापांवरही घाव पडले आहेत. परंतु समाजातल्या प्रत्येक प्रगत चळवळीत त्यांनी स्वत:ला झोकून दिले होते. अशा वेळी विरोधाला तोडत जाताना विवेक सुटतो. मात्र एखाद्या कचेरीतला चपराशी असो वा मोठा अधिकारी असो, माझ्यावरचा अन्यायाची दाद लावायला मी आचार्य अत्र्यांना भेटेन, असा त्यांनी साऱ्या समाजात विश्वास निर्माण केला होता. त्यांनी असंख्य मित्र जोडले आणि शत्रूही केले. आत्यंतिकता हा स्थायीभाव केवळ दोषास्पद खरा, पण केवळ दोषास्पदच नव्हे! याही रानफुलाचा रंग भडक होता, पण नाजुक होता. अत्र्यांचा हा रासवटपणा अनेकांच्या अंगचोरपणापेक्षा सुसह्य होता. शेवटी अत्रेही माणूसच होते. धिप्पाड व्यक्तिमत्त्वाच्या चुकाही धिप्पाड. पण त्यांच्या जीवनाचा जमाखर्च मांडणाऱ्याला हे नक्की उमजेल की, महाराष्ट्राच्या नशिबाने लाभलेल्या या अफाट माणसाने आम्हाला उदंड आनंदच दिला. अन्यायाविरुद्ध झुंजण्याचे सामर्थ्य दिले. लेखणीला केवळ वीणावादिनी सरस्वतीच केली नाही. योग्य वेळी उग्रचंडी चामुंडीही केली!

अनेक वर्षांपूर्वी कुठल्याशा मासिकात एक लेखमाला आली होती. त्यात एका होडीत अनेक मराठी लेखक, कलावंत, राजकारणी आहेत आणि त्यातल्या एकाने पाण्यात उडी मारल्याशिवाय होडी तरणार नाही. तेव्हा यातला कोण गेला तर चालेल? असा काहीतरी विषय होता. विषय थोडासा आचरटच होता. पण त्यात गोपीनाथ तळवलकरांनी एक मार्मिक विधान केले होते. त्यांनी लिहिले होते, “बाकीच्यापैकी कोणाही गेले तरी मला दु:खच होईल. पण अत्र्यांनी उडी मारली तर त्या नौकेतून प्रवास करणं मला शक्य होणार नाही. त्यांच्यामागून मीही आपला उडी मारीन. अत्र्यांशिवाय प्रवास करण्याऐवजी अत्र्यांबरोबर नाहीसे होणे मला आवडेल.” मराठी सांस्कृतिक वा सार्वजनिक जीवन हे अत्र्यांशिावाय सहनच करणे शक्य नाही, अशी अनेकांची भावना त्यावेळी तळवलकरांच्या उदगारांतून झाली होती.

मराठी जीवनाच्या नौकेत आता अत्रे नाहीत. अत्रे नाहीत आणि अत्र्यांशिवाय महाराष्ट्राचे सार्वजनिक जीवन आहे, या कल्पनेशी जुळवून घेत जगायला कष्टच वाटणार आहेत. जीवन काही थांबून राहत नाही. सभा भरतील. संमेलने होत राहतील. मराठी माणसांची गर्दी उसळलेली असेल… अशा वेळी आणखी अनेक वर्षे तरी ‘अरे, आजच्या समारंभाला अत्रे हवे होते’ हे उदगार उमटल्याशिवाय राहणार नाहीत. गर्दीवर जगणारा हा माणूस. आम्हा मराठ्यांची गर्दीही त्याच्या बोलण्यालिहिण्यावर जीव ओवाळून टाकत जगली. आपल्या ‘मी कसा झालो?’ या पुस्तकाच्या अर्पणपत्रिकेत त्यांच्या दुर्गुणाकडे दुर्लक्ष करून अपरंपार कौतुक करणाऱ्या महाराष्ट्राच्या रसिक आणि उदार जनतेच्या चरणांवर कृतज्ञतेची त्यांनी अनंत लोटांगणे घातली आहेत. महाराष्ट्रभवानीच्या रणांगणातल्या या महान गोंधळी, वारकरी आणि धारकरी या त्रिगुणांनी रंगलेल्या भक्ताच्या स्मृतीला या संयुक्त महाराष्ट्राच्या लाखो आबालवृद्धांचीही अशीच अनंत लोटांगणे!

महाराष्ट्रीय जीवनात ठिकठिकाणी पेटलेल्या सांस्कृतिक, शैक्षणिक आणि राजकीय यज्ञांत आपल्या वाणीने आणि लेखणीने क्षणोक्षणी, आहुती देणाऱ्या या अत्रिकुलोत्पन्न आचार्य प्रल्हाद केशव अत्र्यांची साऱ्यांनाच शेवटी द्यावी लागणारी पूर्णाहुती पडली. पुढल्या अनेक पिढ्या या जीवनाचा पट चकित होऊनच पाहात राहतील आणि आजच्या पिढीप्रमाणे त्याही पिढीतल्या माणसाचे मनोमन लोटांगणच पडेल.

............................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

............................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

............................................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......