आपल्या बारा पिढ्यात असे कोणी लिहिले होते काय?
संकीर्ण - पुनर्वाचन
ना. ग. गोरे
  • आचार्य अत्रे
  • Thu , 13 June 2019
  • संकीर्ण पुनर्वाचन आचार्य अत्रे Acharya Atre प्रल्हाद केशव अत्रे Pralhad Keshav Atre

आज आचार्य अत्रे यांचा ५०वा स्मृतिदिन. त्यानिमित्त हा विशेष लेख. अत्रे यांचा काळ ज्यांनी पाहिला आहे, अनुभवला आहे, अशा व्यक्तींच्या लेखनात जी बहार येते, जो काळ येतो, ज्या उपमा आणि अलंकार येतात; जी विश्वसनीयता येते, ती अत्रे यांचा काळ न पाहिलेल्या व्यक्तींच्या लेखात येऊ शकत नाही. अत्रे ही केवळ त्यांची पुस्तके वाचून समजून घेण्याची व्यक्ती नव्हती, नाही. त्यामुळेच अत्रे गेले त्यानंतरचा हा लेख, ५० वर्षांपूर्वीचा.

‘नवयुग’ साप्ताहिकाने अत्र्यांच्या निधनानंतर म्हणजे  ऑक्टोबर १९६९ साली ‘आचार्य अत्रे स्मृति विशेषांक’ प्रकाशित केला होता. प्रस्तुत लेख त्या अंकातून घेतला आहे.

............................................................................................................................................................

मराठी वाङ्मयाच्या इतिहासकाराला आचार्य अत्र्यांचे नाव अनेक संदर्भात घेणे भाग पडणार आहे. विडंबन कवी म्हणून, विनोदी लेखक म्हणून, नाटककार म्हणून, पटनिर्माते म्हणून, संपादक म्हणून. ‘झेंडुची फुले’ उधळून पुणेरी रसिकांच्या समोर अवतीर्ण झालेल्या कवी अत्र्यांची मुंबईच्या ‘मराठा’कार अत्र्यांपर्यंत परिणती कशी होत गेली ते पाहणे, एका व्यक्तीचे रूपांतर कसकसे होत गेले या दृष्टीनेच केवळ नव्हे, तर महाराष्ट्रातील सामाजिक परिवर्तनाच्या अभ्यासाच्या दृष्टीनेही बोधक ठरले असे वाटते. या विविध परिवर्तनामधून मार्ग आक्रमण करत असता अत्रे हे अव्याहत यशस्वी आणि कमालीचे प्रभावी लेखक ठरलेले आहेत, हीदेखील जशी नवलाची त्याचप्रमाणे अभ्यसनीय घटना होय.

शैली बोलघेवडी आणि पारदर्शक

गेली किमान पन्नास वर्षे तरी अत्रे एकसारखे लिहीत आहेत. समग्र केळकरांच्याप्रमाणे समग्र अत्रे जेव्हा केव्हा प्रकाशित होईल, तेव्हा त्या खंडांची उतरंड आचार्य अत्र्यांच्या इतकी तरी उंच उभी राहील याविषयी मला शंका नाही. इतके विपुल लिखाण करणारा लेखक अंतर्मुख असण्याचा संभव अगदीच कमी; तो बहुधा बहिर्मुखच असावयाचा. ‘मी कसा झालो?’मध्ये अत्र्यांनी लिहून ठेवलेले आहे की, ‘मांजर ज्याप्रमाणे कोठेही दार उघडे दिसले की, आंत डोकावल्यावाचून पुढे सरकणार नाही, त्याप्रमाणे माझेही असते.’ हे त्यांनी केलेले स्वत:चे वर्णन अगदी यथार्थ आहे. अत्र्यांच्या जिज्ञासेला पार नाही, अनुभवण्याच्या हौसेला मोल नाही आणि जे आपणाला दिसेल ते इतरांना सांगून टाकण्याच्या त्यांच्या उत्साहाला शीण ठाऊक नाही. साहजिकच ज्याला खूप पहावयाचे आहे, टिपावयाचे आहे आणि आपण पाहिलेले, टिपलेले सगळे इतरांना सांगून टाकावयाचे आहे त्याची लेखनशैली बोलघेवडी, प्रसन्न आणि सोप्या विणीचीच असली पाहिजे. तिचे रंग कोंगाडी स्त्रियांच्या वस्त्रासारखे साधे, पण सहज डोळ्यात भरतील असे झळझळीत असले पाहिजेत. बाळबोधपणा हा तिच्यामधील एक अवश्य गुण होय! गूढ, तुटकी, आपल्यापाशीच पुटपुटल्यागत भाषा, विचाराचे बारीक आणि किचकट नक्षीकाम, शब्दाशब्दांशी झोंबाझोंबी केल्यावाचून अर्थाचा कणदेखील हाताला न लागावा अशी दुर्बोधता अत्र्यांच्या कथनप्रवृत्तीशी मुळी विसंगत होय. आपला कथनाचा विषय आणि कथन यांच्यामध्ये आपल्या लेखनाचा पडदा उभा राहता कामा नये, उलट कथनाच्या काचेमधून पाहत असतानासुद्धा वाचकाला कथ्य विषयच काय, पण आपण देखील स्वच्छ दृग्गोचर झालो पाहिजे, अशा पद्धतीने अत्रे लिहीत; म्हणून त्यांच्या शैलीला मी पारदर्शक शैली म्हणतो. मराठी भाषेत पारदर्शक शैलीचे जे हाताच्या बोटावर मोजण्याजोगे लेखक होऊन गेले व आज विद्यमान असतील त्यांच्यात आचार्य अत्र्यांचे आसन कोणालाही पहिल्या श्रेणीत मांडावे लागेल. याचा अर्थ असा नाही की, अत्र्यांच्या शैलीची ही काच निर्गुण होती, रंगहीन अथवा आकारहीन होती. तशी ती असती तर अत्र्यांचे लेखन कॅमेऱ्यामधून निर्जीवपणे केलेल्या चित्रणाप्रमाणे झाले असते.

ही जातच भीमपुरुषाची

अत्रे ही इतकी आक्रमक प्रकृती होती की, तिच्या लेखन माध्यमाला काचेचा गरीब, तटस्थ व निरुपद्रवी पारदर्शकपणा सहन होणे कधीच शक्य नव्हते. इंग्रजीत ज्याचे वर्णन ‘He man’ या शब्दाने करता येईल, त्या प्रकारचे अत्रे होते. म्हणजे त्यांची जात पुं.-पुरुषाची अथवा भीम-पुरुषाची होती असे वाटल्यास म्हणावे. अर्थात पुं.-पुरुषाचे सर्व गुणदोषही त्यांच्या ठिकाणी होते. विषयपिपासा, आक्रमणशीलता, आग्रह, काव्यविषयाचा शेवटपर्यंत पाठलाग, महत्तेपणा, आत्मप्रदर्शन हे पुं.-पुरुष प्रवृ्तीचे नानाविध पैलू होत. या यादीत विषय-पिपासेसारख्या गुणांचा समावेश जरी मी केलेला असला तरी त्यामुळे कोणीही बिचकून जाण्याचे कारण नाही. विषयपिपासा म्हणजे इंद्रियलोलुपता नव्हे. विषय या शब्दाने पंच कर्मेंद्रिये आणि पंच ज्ञानेंद्रिये यांच्या योगाने ज्यांचा आस्वाद घेता येतो, ते सर्व रस मला अभिप्रेत आहेत. शृंगारापासून बीभत्सापर्यंतचे रस तर त्यात समाविष्ट होतातच, पण संतांनी प्रतिपादलेला जो भक्तिरस किंवा कै. आचार्य जावडेकरांनी सुचवलेला क्रांतिरस यांनासुद्धा या रसावलीमध्ये स्थान देण्यास माझा प्रत्यवाय नाही. आपल्याकडील लेखकांत क्वचितच आढळून येणारी निर्भयता त्यांच्या आक्रमकपणामध्ये आवर्जून होती. तसेच महत्तेपणा हा शब्द वापरताना माझ्या मनात ‘मॅगॅलोमॅनिया’सारखे काहीतरी, पण तेच मात्र नव्हे, सुचवावयाचे आहे. हवे तर त्याचे वर्णन ‘भव्यभक्ती’ या शब्दात करता येईल. जे जे काही भव्य दिसे, त्याबद्दल त्यांना आकर्षण वाटे, मग ते भव्य तुकारामासारखे संत असोत, संयुक्त महाराष्ट्रासारखी एखादी चळवळ असो, राम गणेश गडकऱ्यांसारखा एखादा लेखक असो, किंवा काश्मीरसारखा एखादा भूभाग असो.

...............................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4900/Smart-Nirnay-Kase-ghyawe

...............................................................................................................................................................

मात्र रसास्वाद घेत असताना आणि भव्योत्कटाविषयी भक्ती वाटत असताही अत्रे त्यात संपूर्ण विरघळून गेले असे कधी झाले नाही. रामकृष्ण परमहंसाच्या प्रवचनामधून समुद्राचा तळ काढावयास निघालेल्या मिठाच्या बाहुलीचा दृष्टान्त वारंवार आलेला आहे! तो अत्र्यांच्या रसमग्रतेला लागू पडणार नाही. रसमग्न झाले असताही आचार्य अत्रे पुन्हा हातभर वरच राहात आणि रसामध्ये ते आपादमस्तक बुडून जात नव्हते. म्हणूनच तर ते लेखक, निवेदक झाले. नाही तर भक्त वा संत झाले नसते काय? अत्र्यांचे विलिनीकरण झाले नाही. उलट, पाहा मी किती अनन्य सामान्य रसिक आहे, केवढा भोक्ता आहे, लढवय्या आहे, याची जाणीव त्यांनी कायम ठेवली आणि तिचा जगालाही विसर पडू दिला नाही. सगळा गाव गोळा करून ते सांगत सुटतील की, ‘पहा हे आमचे कर्तृत्व, आमचही रसिकता; हे अपूर्व कर्तृत्व; हे अलौकिक लेखनकौशल्य तुमच्या बारा पिढ्यात असे कोणी कधी पाहिले होते काय?’ स्वत:ची माहिती व महती व इतक्या निरलसपणे, इतक्या नि:संकोचपणे आणि इतक्या उच्चरवाने सांगणारा अत्र्यांच्या व्यतिरिक्त दुसरा साहित्यिक मराठीत माझ्या वाचनात नाही. पुढील नमुना पहा.

“दोन तासपर्यंत मी एकसारखा बोलत होतो. हास्याच्या आणि टाळ्यांच्या पर्वतप्राय लाटा माझ्याभोवती उसळत होत्या. वास्तविक व्याख्यानाची तयारी करावयास मला वेळसुद्धा मिळालेला नव्हता. प्रसंगाच्या स्फूर्तीवर विश्वास ठेवून मी व्याख्यानाला उभा राहिलो होतो. आणि आनंदाची गोष्ट ही की, माझ्या स्फूर्तीने मला यत्किंचितही दगा दिला नाही. वक्तृत्वाचे सारे चमत्कार त्या व्याख्यानात मी करून दाखवले. माझ्या म्हणण्यातला शब्द न शब्द, अक्षर न अक्षर मी श्रोत्यांच्या गळी उतरवले. प्रतिपक्षांनी घेतलेल्या आक्षेपाच्या आणि टीकेच्या मी अगदी चिंधड्या अन चिंधड्या उडवून टाकल्या. व्याख्यानाच्या अखेरीस मी माझ्या वक्तृत्वाचा पारा असा नेला की, शेवटचे वाक्य संपवून मी खाली बसताच साऱ्या वातावरणामधून टाळ्यांचा आणि जयघोषांचा प्रचंड ध्वनी उमटला. शेकडो लोक व्यासपीठावर धावत आले आणि एखाद्या पैलवानाने कुस्ती जिंकली म्हणजे लोक त्याचा गौरव करतात, त्याप्रमाणे अनेकांनी मला कडकडून मिठ्या मारून माझे अभिनंदन केले. आखाड्यामधल्या गर्दीमधून बाहेर पडायला मला पाऊण तास लागला. त्या दिवशी रात्री पुणेकरांना बोलायला दुसरा विषय नव्हता. दुसऱ्या दिवशी पुण्यातील वृत्तपत्रे माझ्या व्याख्यानाच्या वर्णनाने आणि वृत्तान्ताने शिगोशीग भरून वाहत होती.”

अशी गुणग्राहकता

हा आत्मप्रशंसेचा मासला झाला. पण परप्रशंसेची वेळ येते तेव्हाही अत्र्यांच्या लेखणीने हात आखडून लिहिले नाही. ‘मराठी माणसे आणि मराठी मने’ यामधील सर्वच लेख मोकळी गुणग्राहकता व सढळ गौरव यांच्या दृष्टीने वाचनीय आहेत. गाडगेमहाराजांच्या विविध गुणांसंबंधी इतक्या खुलास वृत्तीने एका तरी पट्टीच्या मराठी साहित्यिकाने आत्तापर्यंत लिहिलेले आढळले आहे काय? नाही म्हटले तरी आम्हा साहित्यिकांमध्ये जाती-पोटजाती आहेतच की! अत्रे हे त्याला अपवाद आहेत. ‘मी गुणांचा पूजक आहे, हे माझे सर्वांत मोठे सामर्थ्य आहे. भुंगे जसे फुलांवर झेप घेतात, तसे गुण मला दिसले रे दिसले की मी त्यावर तुटून पडतो. कुठून सुवास आला की मी चाललोच त्या बाजूला. कुठून चांगला सूर ऐकू आला की मी धावलो तिकडे’, असे आपल्या वृत्तीचे वर्णन अत्र्यांनी केलेले आहे. पण या गुणग्रहणाच्या वेळीही अत्र्यांच्या अस्मितेला विसावा ठाऊक असतो काय? पंढरपुरात विठ्ठलाचे मंदिर सर्व हिंदूंना मोकळे व्हावे म्हणून उपवास करत असलेल्या साने गुरुजींचे हृद्य वर्णन केल्यावर लगेच अत्रे कसे लिहितात पहा –

अशी अस्मिता

“श्रोत्यांच्या अंत:करणाला पीळ पडेल आणि पाझर फुटेल असाच माझ्या व्याख्यानाचा पूर्वार्ध होता. इतक्यांत एक माणूस हातात तार घेऊन धावत आला, ‘पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळाला. गुरुजींचे उपोषण सुटले.’ तारेतला मजकूर मी श्रोत्यांना सांगताच टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला, अन श्रोते हर्षाने नाचू लागले. त्यानंतर सभेचा साराच रंग बदलला. पूर्वीची रागदारी एकदम बदलून, नवीन स्वरांत आणि नवीन रागात माझ्या व्याख्यानाला मी सुरुवात केली. व्याख्यानाच्या पूर्वार्धात एक अन उत्तरार्धात अजिबात निराळा रस असे अदभुत आणि नाट्यपूर्ण भाषण मी माझ्या आयुष्यात कधी केले नसेल… वक्तृत्वाची ती एक विलक्षण कसोटी होती म्हणानात!”

म्हणजे साने गुरुजी हा वर्ण्य विषय मागे पडून अत्रे हाच वर्ण्य विषय कसा बनला! स्वत:च्या सहा फूट उंचीच्या आणि दोनशे वीस पौंड वजनाच्या देहाचा उल्लेखही अत्र्यांच्या लिखाणात येई. त्याचे कारणदेखील येथून तेथूनच भव्यतेविषयी त्यांना वाटणाऱ्या बालसदृश आकर्षणामुळे; स्वत:च्या भव्यतेचे आकर्षणही परिचयाने कमी झालेले नाही!

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4772/Mahilanvishayiche-Kayade

.............................................................................................................................................

अत्रे हे आपलेच रूपांतर

परंतु वाचकांना अत्र्यांच्या लेखनाचे एवढे आकर्षण वाटण्याचे कारण काय? केवळ त्यांचे लेखन उत्तान (शृंगारिक या अर्थी नव्हे) आणि विकट होते म्हणून? माझ्या मते हे त्याचे कारण नाही.. प्रत्येक व्यक्तीच्या अंतरंगात कामक्रोधादिक भावना तर असतातच आणि ती आपल्या कुवतीप्रमाणे त्या प्रकटही करत असते. पण परिस्थितीने माणूस असा कोंडला गेलेला असतो की, त्याला आपल्या भावनांना नेहमी आवर घालावा लागतो. तो इतका की, बहुधा त्यांचे यथातथ्य प्रकटन त्याला कधी करताच येत नाही. तोंडाने थोडे फार ते कार्य होते, लेखणीने मुळीच होत नाही. त्यामुळे धूसफूस, चिडाचीड किंवा कुढणे या खर्ज स्वरूपात सर्वसामान्य भावनांचे रूपांतर होत राहते. काशीबाई हळबरसारख्या स्त्रीवर इंगवल्यासारख्या फौजदाराने अत्याचार केल्याचे ऐकले की, आपलेही रक्त तापते आणि काही तरी करावे, ओरडून आपला संताप व्यक्त करावा, शब्दांच्या चाबकांनी त्या अमलदाराला फोडून काढावा असे वाटते; पण ते जमत नाही. मग ‘मी पाया पडते! माझे लुगडे फेडू नका! माझी अब्रू घेऊ नका!’ अशा हृदयाच्या लचका तोडणाऱ्या शब्दांनी सुरू झालेला ‘काशीबाईची करुण किंकाळी’ हा अत्र्यांचा लेख वाचक म्हणून आपण जेव्हा वाचू लागतो आणि ‘ढगांची काळीकुट्ट काळजे टराटर फाडीत वीज ज्याप्रमाणे आभाळातून आरपार जाते, तशी काशीबाईची ती करुण किंकाळी दाही दिशांच्या छातीच्या चिंधड्या करत, आकाशाची कड्याकपारे फोडून स्वर्गामधल्या तेहतीस कोटी देवांच्या कानांपर्यंत जाऊन थडकली असेल,’ अशी एकाहून एक दमदार आणि सावेश कल्पनांनी नटलेली वाक्ये वाचू लागतो. त्यावेळी आपण सैरंध्रीवर हात टाकू पाहणाऱ्या पापात्म्या कीचकाला बुकलून बुकलून यमसदनाला पाठवणारे प्रतिभीमच आहोत, असे मानसिक समाधान आपणाला वाटते. खाजगी संभाषणात मुरारजीभाईंचा उल्लेख ‘राक्षस’ या शब्दावाचून दुसऱ्या शब्दात न करणारे थोर लोक माझ्या परिचयाचे आहेत. पण मुरारजीभाईंना ‘नरराक्षस’ या शब्दाने जाहीररीत्या संबोधणारे अत्र्यांच्यासारखे लेखक किती सापडतील? एखाद्या माणसाचे आचरण पाहून त्याला ‘भामटा’च म्हटला पाहिजे, एखाद्या स्त्रीची ‘टवळी’ या शब्दानेच यथायोग्य संभावना करता येईल असे आपल्या अनेकवार मनात येते. पण तो शब्द मनात दाटलेल्या भावनेचा निचरा करणारा तो एकमेव शब्द लिहीत अथवा उच्चारीत फक्त अत्रेच. अत्र्यांच्या संगतीत प्रत्येक भावनेच्या क्षेत्रात वाचकाला पुं.-पुरुषासारखे वावरल्याचा व उपभोगल्याचा अनुभव चाखता येई, हे त्यांच्या लेखनाचे माझ्या मते मूळ आकर्षण होय. लेखनामध्ये लेखक जितका कमी डोकावेल तितके लेखन चांगले, या शिष्टमान्य तत्त्वाच्या सर्वस्वी विरुद्ध वागणारे अत्रे रसभंगाला कारणीभूत होत नाहीत, याचे कारण अत्र्यांच्या रूपाने आपणच वावरत आहोत, अत्रे हे आपलेच प्रचंड रूपांतर आहे, असा प्रत्यय वाचकाला येत राहतो, यावाचून दुसरे काय असू शकेल?

हेही एक वैशिष्ट्यच!

मनुष्याच्या प्रतिक्रिया इतरांना संक्रमित करण्याची जी अनेक माध्यमे आहेत, त्यात लेखणी आणि वाणी ही दोन प्रमुख माध्यमे होत. अत्र्यांच्या बाबतीत तरी असे नि:शंकपणे म्हणता येईल की, त्यांचे मनन, त्यांचे भाषण आणि त्यांचे लेखन ही परस्परांशी अधिकात अधिक इमान राखतात. त्यांच्या भाषणांमधून आणि लेखनामधून त्यांच्या मनातील खळबळ आणि शुद्धाशुद्ध सगळेच्या सगळे नजरेला दिसते. म्हणून त्यांच्या शैलीला मी पारदर्शक म्हटले. आणखी एका आणि मोठ्या दृष्टीने ती पारदर्शक आहे, ती अशी की, तिच्यामधून अत्रे ज्या समाजात व ज्या समाजाचे म्हणून उभे होते, त्याच्याही मनाचा तळ आपण पाहू शकतो; असा पारदर्शकपणा विरळा आहे.

............................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

............................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

............................................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......